व्यसन का लागते? मानसशास्त्रीय
विश्लेषण
व्यसन (Addiction) ही केवळ एक वाईट सवय नसून ती एक गुंतागुंतीची मानसिक, सामाजिक व जैविक
प्रक्रिया आहे. अनेकदा व्यक्तीला असे वाटते की तो कोणत्याही क्षणी व्यसन सोडू शकतो,
परंतु वास्तवात व्यसन मनाच्या आणि मेंदूच्या संरचनेत खोलवर रुतलेले
असते, जे विशिष्ट टप्प्यानंतर सुटणे कठीण असते. या लेखात आपण व्यसन का लागते याचे
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण पाहणार आहोत.
व्यसन म्हणजे काय?
मानसशास्त्रात ‘व्यसन’ ही संज्ञा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतील बक्षिस प्रणालीतील (reward
system) असंतुलनाशी निगडित असते. व्यसन म्हणजे अशा प्रकारचे पुनरावृत्तीशील
वर्तन किंवा पदार्थसेवन (substance
use) जे
सुरुवातीस आनंद, आराम किंवा तात्पुरती तणावमुक्ती प्रदान करते; परंतु नंतर तेच
वर्तन/पदार्थ आयुष्याच्या इतर बाबतीत (शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक) गंभीर
नकारात्मक परिणाम घडवू लागते. तरीदेखील व्यक्ती त्या वर्तनापासून स्वतःला थांबवू
शकत नाही. ही स्थितीच ‘व्यसन’ होय (American
Psychiatric Association, 2013).