शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

NEP-2020 आणि मूल्यमापन

 

NEP-2020 आणि मूल्यमापन

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

भारत सरकारने जाहीर केलेली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP-2020) ही केवळ अभ्यासक्रम बदलण्याची योजना नाही; ती संपूर्ण शैक्षणिक तत्त्वज्ञान बदलण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानकेंद्री (content-centric) पद्धतीपासून कौशल्यकेंद्री (skill-centric), अनुभवाधारित (experiential) आणि बहुविद्याशाखीय (multidisciplinary) शिक्षणाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. परंतु एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, जर अध्यापन प्रक्रिया बदलत असेल, तर मूल्यमापन प्रक्रिया जुन्याच चौकटीत राहू शकते का? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. NEP-2020 मधील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक बदल हा मूल्यमापन प्रक्रियेत करणे अत्यावश्यक आहे.

NEP-2020 ची मूलभूत उद्दिष्टे

NEP-2020 हे भारतीय शिक्षणव्यवस्थेचे पुनर्रचना करणारे धोरण असून त्याचा केंद्रबिंदू रटाळ शिक्षणापासून संकल्पनात्मक आकलन आणि कौशल्याधारित शिक्षणाकडे संक्रमण हा आहे. धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की विद्यार्थ्यांनी केवळ माहिती पाठ न करता ती समजून घेतली पाहिजे, तिचा विविध संदर्भांमध्ये उपयोग करता आला पाहिजे आणि समस्यांचे निराकरण करता आले पाहिजे (Ministry of Education [MoE], 2020). पारंपरिक “content-heavy” अभ्यासक्रमाऐवजी core concepts आणि higher-order thinking skills यांवर भर देण्याची भूमिका धोरण मांडते. ही भूमिका शैक्षणिक मानसशास्त्रातील Bloom च्या उद्दिष्टांच्या वर्गीकरणाशी सुसंगत आहे, ज्यात स्मरणशक्तीपेक्षा विश्लेषण, मूल्यांकन आणि सृजन या उच्च स्तरांवर भर दिला जातो (Anderson & Krathwohl, 2001).

NEP-2020 मध्ये 21व्या शतकातील चार प्रमुख कौशल्ये 4C यांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले आहे. ही कौशल्ये जागतिकीकरण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ज्ञानाधारित समाजात अत्यावश्यक ठरतात (OECD, 2018). चिकित्सक विचार (critical thinking) हे विद्यार्थ्यांना माहितीचे विश्लेषण, पुराव्यांचे परीक्षण आणि तार्किक निष्कर्ष काढण्यास सक्षम करतो; सर्जनशीलता (creativity) हे नवोन्मेषाला चालना देते; संवाद कौशल्य (communication) हे वैचारिक अभिव्यक्ती सुलभ करते; आणि सहकार्य (collaboration) हे सामाजिक व व्यावसायिक जीवनासाठी आवश्यक असते. धोरणात स्पष्टपणे नमूद आहे की शिक्षण हे केवळ विषयज्ञानापुरते मर्यादित नसून “holistic development” साधणारे असावे (MoE, 2020).

बहुविद्याशाखीय दृष्टिकोन हा NEP-2020 चा आणखी एक महत्त्वाचा स्तंभ आहे. कला, विज्ञान, वाणिज्य यांच्यातील कृत्रिम भिंती दूर करून विद्यार्थ्यांना विविध विषयांची सांगड घालण्याची संधी देणे हे उद्दिष्ट आहे. हे तत्त्व liberal education च्या संकल्पनेशी संबंधित आहे, ज्यात ज्ञानाचे परस्परसंबंध आणि समग्र दृष्टीकोन महत्त्वाचा मानला जातो (Nussbaum, 2010). बहुविद्याशाखीय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची विचारक्षमता व्यापक होते आणि जटिल सामाजिक समस्यांकडे बहुआयामी दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होते.

अनुभवाधारित आणि प्रकल्पाधारित शिक्षण हे NEP-2020 मधील आणखी एक केंद्रस्थानी तत्त्व आहे. जॉन ड्यूई यांच्या “learning by doing” या तत्त्वाशी सुसंगत असलेली ही भूमिका विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यावर भर देते (Dewey, 1938). प्रकल्पाधारित शिक्षणामुळे समस्या सोडवणे, संशोधन कौशल्य, संवाद आणि सहकार्य या सर्वांचा विकास होतो. अशा प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे तर जीवनासाठी तयार करते.

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण ही NEP-2020 ची मूलभूत दिशा आहे. यात शिक्षकाची भूमिका “ज्ञानदाता” (knowledge transmitter) पासून “मार्गदर्शक” (facilitator) अशी बदलते. ज्ञानरचनावादी दृष्टिकोनानुसार विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करतो (Piaget, 1970; Vygotsky, 1978). त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, चर्चा, चिंतन आणि प्रत्यक्ष कृती यांना महत्त्व दिले जाते.

जीवनकौशल्ये आणि रोजगाराभिमुखता यांवरही NEP-2020 मध्ये विशेष भर आहे. संवाद, नेतृत्व, निर्णयक्षमता, भावनिक बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता यांसारखी कौशल्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मानली जातात (WHO, 1999). व्यावसायिक शिक्षण मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रस्तावही धोरणात आहे, ज्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी होईल (MoE, 2020).

परंतु ही सर्व उद्दिष्टे केवळ अभ्यासक्रम बदलून साध्य होऊ शकत नाहीत. कारण विद्यार्थी जे शिकतो ते तो मुख्यतः परीक्षेसाठी शिकतो. जर परीक्षा रटाळ पद्धतीची असेल तर शिक्षणही तसेच राहते. शैक्षणिक मानसशास्त्रात याला “Assessment drives Learning” असे म्हटले जाते (Biggs, 1996). म्हणजेच मूल्यमापनाची पद्धतच शिकण्याचा प्रकार निश्चित करते. म्हणून NEP-2020 मधील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रियेतील परिवर्तन अत्यावश्यक आहे.

पारंपरिक मूल्यमापनाची मर्यादा

भारतातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आजही मूल्यमापनाची प्रमुख साधने म्हणजे लेखी परीक्षा, वस्तुनिष्ठ प्रश्न, पाठांतरावर आधारित प्रश्न आणि वर्षाअखेर एकच अंतिम परीक्षा. या पद्धतीचे मूळ वसाहतकालीन परीक्षापद्धतीत आहे, ज्याचा उद्देश प्रशासनासाठी कर्मचाऱ्यांची निवड करणे हा होता (Kumar, 2005; Rao, Pramila 2024). त्यामुळे ज्ञानाच्या पुनरुत्पादनावर भर देण्यात आला.

या पद्धतीची पहिली मर्यादा म्हणजे ती केवळ माहितीची पुनरावृत्ती तपासते; संकल्पनात्मक आकलन किंवा उपयोजन तपासत नाही. Bloom च्या वर्गीकरणानुसार स्मरण हा सर्वात खालचा स्तर आहे, परंतु पारंपरिक परीक्षांमध्ये तोच प्रमुख मानदंड ठरतो (Anderson & Krathwohl, 2001). परिणामी विद्यार्थी पाठांतरावर अवलंबून राहतो.

दुसरी मर्यादा म्हणजे कौशल्यांचे अपुरे मापन. चिकित्सक विचार, सर्जनशीलता, संवाद कौशल्य किंवा सहकार्य यांसारखी कौशल्ये लेखी परीक्षेत मोजणे कठीण असते. त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया कौशल्यविकासाऐवजी गुणप्राप्तीकडे वळते. तिसरी मर्यादा म्हणजे सर्जनशीलतेचे दमन. जर प्रश्नांची उत्तरे ठरावीक स्वरूपाची असतील तर विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन मिळत नाही (Torrance, 1974).

चौथी समस्या म्हणजे परीक्षेचा ताण. एकाच अंतिम परीक्षेवर संपूर्ण निकाल अवलंबून असल्यास विद्यार्थ्यांमध्ये भीती, ताण आणि मानसिक दडपण वाढते. पाचवी आणि सर्वात गंभीर समस्या म्हणजे शिकण्याऐवजी गुण मिळवण्यावर भर राहतो. शिक्षण हे अंतर्गत प्रेरणेपेक्षा बाह्य बक्षीस प्रणालीवर आधारित होते (Deci & Ryan, 2000).

जर आपण स्किल-आधारित शिक्षण राबवत असू, तर अशा पारंपरिक मूल्यमापन पद्धतीने अपेक्षित उद्दिष्ट साध्य होणार नाही. कौशल्य, सर्जनशीलता आणि जीवनाभिमुख शिक्षण साध्य करण्यासाठी मूल्यमापनही तितकेच बहुआयामी, सातत्यपूर्ण आणि कौशल्याधारित असणे आवश्यक आहे. अन्यथा NEP-2020 मधील उद्दिष्टे केवळ कागदावरच राहतील.

कौशल्य-आधारित शिक्षण आणि मूल्यमापन

NEP-2020 मध्ये शिक्षणाची दिशा “काय शिकले?” यापेक्षा “कसे वापरले?” याकडे वळविण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो. या संदर्भात ‘कौशल्य’ ही संकल्पना केवळ माहिती किंवा तथ्य आधारित ज्ञान यापुरती मर्यादित नाही. आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्रात कौशल्य म्हणजे ज्ञान, अभिवृत्ती आणि प्रत्यक्ष कृती यांचा एकत्रित परिणाम होय.

Benjamin Bloom यांनी मांडलेल्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणात ज्ञान ही केवळ प्राथमिक पातळी आहे; त्यानंतर आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन या उच्च पातळ्या येतात (Bloom, 1956). यावरून स्पष्ट होते की, केवळ माहिती आठवणे हे कौशल्य नसून त्या माहितीचा परिस्थितीनुसार वापर करणे ही खरी कौशल्यात्मक क्षमता आहे. पुढे Anderson आणि Krathwohl (2001) यांनी Bloom चे सुधारित वर्गीकरण करताना निर्मिती (Create) ही सर्वात उच्च पातळी मानली आहे, जी सर्जनशील कौशल्यांचे द्योतक आहे.

1. ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता (Application of Knowledge)

कौशल्य म्हणजे शिकलेल्या ज्ञानाचा वास्तव जीवनातील परिस्थितीत योग्य वापर करण्याची क्षमता. उदाहरणार्थ, गणितातील सूत्रे पाठ असणे हा ज्ञानाचा भाग आहे; परंतु त्या सूत्रांचा वापर करून नवीन समस्या सोडवणे हे कौशल्य आहे. David Kolb यांच्या अनुभवाधारित शिक्षण सिद्धांतानुसार, ज्ञानाची खरी निर्मिती अनुभव, चिंतन, संकल्पना निर्मिती आणि प्रयोग या चक्रातून होते (Kolb, 1984). याचा अर्थ, कौशल्य हे अनुभवाधारित आणि क्रियाशील प्रक्रियेतून विकसित होते.

2. समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता (Problem-Solving Ability)

21व्या शतकातील शिक्षणात समस्या सोडवण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. Organisation for Economic Co-operation and Development (OECD) च्या PISA अहवालानुसार, आधुनिक शिक्षणात विद्यार्थ्यांची समस्या विश्लेषण, तर्कशक्ती आणि नवोन्मेषी उपाय शोधण्याची क्षमता मोजली जाते (OECD, 2019). समस्या निराकरण ही बहुआयामी प्रक्रिया आहे ज्यामध्ये समस्या ओळखणे, पर्याय तयार करणे, परिणामांचे विश्लेषण करणे आणि योग्य निर्णय घेणे. हे सर्व घटक लेखी परीक्षेतील वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे पूर्णतः मोजणे शक्य नाही. कारण समस्या सोडवणे ही गतिशील आणि संदर्भाधारित प्रक्रिया आहे.

3. संवाद कौशल्य (Communication Skills)

संवाद कौशल्य म्हणजे विचार स्पष्टपणे मांडण्याची, ऐकण्याची आणि परस्पर समज विकसित करण्याची क्षमता. World Economic Forum च्या “Future of Jobs Report” मध्ये संवाद कौशल्य हे भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक मानले गेले आहे (WEF, 2020). संवाद हा केवळ शा‍ब्दिक नसून अशाब्दिक, लेखी आणि डिजिटल माध्यमांद्वारेही व्यक्त होतो. या सर्व पैलूंचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेद्वारे करणे अपुरे ठरते. मौखिक सादरीकरण, गटचर्चा, वादविवाद आणि प्रकल्प सादरीकरण या पद्धती संवाद कौशल्य अधिक प्रभावीपणे मोजू शकतात.

4. सहकार्य/ टीमवर्क (Collaboration Skills)

आजच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत सहकार्य हे अत्यावश्यक कौशल्य आहे. Lev Vygotsky यांच्या सामाजिक-सांस्कृतिक सिद्धांतानुसार, शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे आणि ज्ञानाची निर्मिती परस्परसंवादातून होते (Vygotsky, 1978). टीमवर्कमध्ये समन्वय, नेतृत्व, सहिष्णुता आणि परस्पर आदर या घटकांचा समावेश होतो. हे सर्व गुण विद्यार्थ्यांच्या वर्तनातून, गटप्रकल्पातून आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून समजतात; लेखी परीक्षेतून नाही.

5. नैतिक निर्णय क्षमता (Ethical Decision-Making)

शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट केवळ रोजगारनिर्मिती नसून जबाबदार नागरिक घडवणे आहे. Lawrence Kohlberg यांच्या नैतिक विकासाच्या टप्प्यांनुसार, व्यक्ती नैतिक निर्णय घेण्याच्या विविध पातळ्यांवर विकसित होत जाते (Kohlberg, 1981). नैतिक निर्णय क्षमता म्हणजे योग्य-अयोग्य याचा विचार करून परिस्थितीनुसार जबाबदार कृती करणे. हे कौशल्य परिस्थितीजन्य प्रश्न, भूमिका पालन, केस स्टडी आणि चिंतनात्मक लेखनाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे तपासले जाऊ शकते. पारंपरिक वस्तुनिष्ठ परीक्षेत नैतिकता केवळ सैद्धांतिक पातळीवरच राहते.

लेखी परीक्षेची मर्यादा

पारंपरिक लेखी परीक्षा प्रामुख्याने स्मरणशक्ती आणि पुनरुत्पादन यावर आधारित असते. Grant Wiggins आणि Jay McTighe यांनी त्यांच्या “Understanding by Design” संकल्पनेत नमूद केले आहे की, खरी समज (deep understanding) तपासण्यासाठी कार्याधारित मूल्यमापन आवश्यक आहे (Wiggins & McTighe, 2005).

कौशल्ये ही प्रक्रिया-आधारित (process-oriented) असतात; ती केवळ अंतिम उत्तरावरून मोजता येत नाहीत. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याने योग्य उत्तर दिले असले तरी त्यामागील विचारप्रक्रिया, सर्जनशीलता किंवा नैतिक विवेक लेखी उत्तरपत्रिकेत पूर्णपणे दिसत नाही.

कौशल्य म्हणजे केवळ माहितीचे संचयन नव्हे, तर ज्ञानाचा उपयोग, समस्या निराकरण, प्रभावी संवाद, सहकार्य आणि नैतिक निर्णय घेण्याची एकात्मिक क्षमता होय. आधुनिक शिक्षणात या कौशल्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे मूल्यमापनही बहुआयामी, अनुभवाधारित आणि कार्याधारित पद्धतींनी करणे आवश्यक आहे. जर शिक्षण कौशल्य-आधारित असेल, तर मूल्यमापनही तितकेच कौशल्य-आधारित असणे अपरिहार्य आहे; अन्यथा शिक्षण आणि परीक्षा यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि NEP-2020 सारख्या धोरणांची उद्दिष्टे अपूर्ण राहतात.

नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील मूल्यमापन पद्धती

NEP-2020 नुसार शिक्षण केवळ माहिती-संचयनाची प्रक्रिया नसून कौशल्य, मूल्ये आणि जीवनानुभवाशी निगडित असावे, असा स्पष्ट दृष्टिकोन मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मूल्यमापन प्रक्रिया ही केवळ निकाल देणारी नसून शिकण्याची दिशा दाखवणारी आणि सुधारणा घडवणारी असावी, असे शैक्षणिक मानसशास्त्र अधोरेखित करते (Black & Wiliam, 1998). पुढील पाच नाविन्यपूर्ण मूल्यमापन पद्धती या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

1. प्रकल्पाधारित मूल्यमापन (Project-Based Assessment)

प्रकल्पाधारित मूल्यमापन ही पद्धत ज्ञानरचनावादी शिक्षणतत्त्वावर आधारित आहे. John Dewey यांनी “Learning by Doing” या संकल्पनेद्वारे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याच धर्तीवर प्रकल्पाधारित मूल्यमापनात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवण्याचे कार्य दिले जाते. उदाहरणार्थ, CC, CEP, OJT किंवा FP अंतर्गत स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास करणे, गावातील पाण्याच्या प्रश्नावर सर्वेक्षण करणे, किंवा एखाद्या सामाजिक समस्येवर छोटा संशोधन प्रकल्प करणे.

या प्रक्रियेत विद्यार्थी माहिती गोळा करतो, तिचे विश्लेषण करतो, निष्कर्ष काढतो आणि सादरीकरण करतो. त्यामुळे संशोधन कौशल्य, विश्लेषण क्षमता, टीमवर्क, संवादकौशल्य आणि समस्या-निराकरण क्षमता यांचे मूल्यमापन होते. Lev Vygotsky यांच्या सामाजिक-सांस्कृतिक सिद्धांतानुसार शिकणे हे सामाजिक परस्परसंवादातून घडते; प्रकल्पाधारित कार्यामुळे सहकार्य आणि सहनिर्मितीची संधी मिळते (Vygotsky, 1978). Thomas (2000) यांच्या संशोधनानुसार PBL विद्यार्थ्यांच्या उच्च-स्तरीय बोधात्मक कौशल्यांचा विकास करते. त्यामुळे ही पद्धत NEP-2020 च्या कौशल्याभिमुख उद्दिष्टांशी सुसंगत ठरते.

2. पोर्टफोलिओ मूल्यमापन (Portfolio Assessment)

पोर्टफोलिओ मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याच्या विविध कामांचा नियोजित संग्रह जसे की प्रकल्प, लेखन, सर्जनशील उपक्रम, शिक्षकांची व सहकाऱ्यांची प्रतिक्रीया. ही पद्धत विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सतत आणि सर्वंकष आढावा घेते.

Paulson, Paulson & Meyer (1991) यांच्या मते, पोर्टफोलिओ हे “a purposeful collection of student work that exhibits the student's efforts, progress, and achievements.” म्हणजेच हे केवळ अंतिम उत्पादन नसून प्रगतीची कहाणी सांगते.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांमध्ये आत्मचिंतन आणि मेटाकॉग्निशन वाढवते (Zimmerman, 2002). विद्यार्थी स्वतःच्या कामाकडे चिकित्सक दृष्टीने पाहतो आणि सुधारणा करतो. त्यामुळे मूल्यमापन ही एक विकासात्मक प्रक्रिया बनते.

3. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन (Formative Assessment)

Formative Assessment ही संकल्पना विशेषतः Black & Wiliam (1998) यांनी लोकप्रिय केली. त्यांच्या संशोधनानुसार, वर्गात चालणारे लहान उपक्रम, चर्चा, मौखिक सादरीकरण आणि शिक्षकांचे निरीक्षण हे विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर सकारात्मक परिणाम करतात. ही पद्धत केवळ अंतिम निकालासाठी नसून शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा घडवण्यासाठी असते. शिक्षक विद्यार्थ्याच्या चुका ओळखतो, तात्काळ अभिप्राय देतो आणि पुढील शिकण्याची दिशा ठरवतो. त्यामुळे 50:50 टक्के भार हा Formative आणि Summative Assessment साठी असावे असे अनेक शिक्षण तज्ञांचे मत आहे.

Bloom यांनी Mastery Learning संकल्पनेत सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे महत्त्व स्पष्ट केले आहे (Bloom, 1968). त्यांच्या मते, योग्य अभिप्राय आणि वेळेवर हस्तक्षेप केल्यास बहुतेक विद्यार्थी उच्च प्रावीण्य गाठू शकतात. त्यामुळे Formative Assessment ही समावेशक आणि प्रगतीशील पद्धत ठरते.

4. समवयस्क मूल्यमापन (Peer Assessment) व स्व-मूल्यमापन (Self-Assessment)

स्वमूल्यमापन  आणि सहमूल्यमापन  या पद्धती विद्यार्थ्यांना मूल्यमापन प्रक्रियेचा सक्रिय भाग बनवतात. विद्यार्थी स्वतःचे काम तपासतो, मित्रांचे काम विश्लेषित करतो आणि अभिप्राय देतो. Albert Bandura यांच्या सामाजिक अधिगम सिद्धांतानुसार निरीक्षण आणि परस्परसंवादातून शिकणे प्रभावी ठरते (Bandura, 1977). समवयस्क मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, जबाबदारीची भावना आणि चिंतनशीलता वाढते.

Boud (1995) यांच्या मते, स्व-मूल्यमापन विद्यार्थ्यांमध्ये आजीवन शिक्षणाची वृत्ती निर्माण करते. विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीचा जबाबदार भागीदार बनतो, जे NEP-2020 च्या विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

5. कौशल्य-आधारित रुब्रिक्स (Rubrics)

रुब्रिक्स म्हणजे स्पष्ट निकषांवर आधारित मूल्यांकनाची चौकट. यात संकल्पनांची समज, सर्जनशीलता, विश्लेषण क्षमता आणि सादरीकरण कौशल्य यांसाठी विशिष्ट स्तर निश्चित केलेले असतात. Andrade (2000) यांच्या संशोधनानुसार, स्पष्ट रुब्रिक्समुळे विद्यार्थ्यांना अपेक्षा समजतात आणि कामाची गुणवत्ता सुधारते. पारदर्शकता आणि न्याय्यता वाढते, कारण मूल्यमापन वैयक्तिक मतांवर नव्हे तर ठरवलेल्या निकषांवर आधारित असते. रुब्रिक्स ही पद्धत विशेषतः कौशल्याधारित शिक्षणात उपयुक्त ठरते, कारण ती ज्ञानाबरोबरच प्रक्रियात्मक आणि सर्जनशील कौशल्यांचेही मूल्यांकन करते.

नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील मूल्यमापन पद्धती या केवळ पर्यायी उपाय नसून 21व्या शतकातील शिक्षणासाठी अत्यावश्यक आहेत. प्रकल्पाधारित मूल्यमापन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांशी जोडते; पोर्टफोलिओ त्यांच्या प्रगतीची कहाणी सांगते; सतत मूल्यमापन शिकण्याला दिशा देते; सहमूल्यमापन आत्मजाणीव वाढवते; आणि रुब्रिक्स पारदर्शकता सुनिश्चित करतात. या सर्व पद्धती एकत्रितपणे शिक्षणाला गुणकेंद्रिततेपासून कौशल्यकेंद्रिततेकडे नेतात. त्यामुळे NEP-2020 च्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मूल्यमापन प्रक्रियेत अशा सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि कौशल्याधारित बदलांची अंमलबजावणी अपरिहार्य आहे.

उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी आवश्यक बदल

NEP-2020 मध्ये उच्च शिक्षण क्षेत्राला ज्ञाननिर्मितीचे आणि नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. धोरणानुसार भारताने केवळ ज्ञान-उपभोगता न राहता ज्ञान-निर्माता बनले पाहिजे. यासाठी बहुविद्याशाखीय विद्यापीठे, संशोधन-केंद्रित संस्था, उद्योग-सहकार्य, आणि स्टार्टअप संस्कृती यांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक ठरतो, कारण संशोधनाभिमुख शिक्षणासाठी केवळ माहितीची पुनरावृत्ती तपासणाऱ्या परीक्षांनी अपेक्षित कौशल्यांचा विकास होत नाही (MoE, 2020).

NEP-2020 अंतर्गत स्थापन होणारी National Research Foundation (NRF) ही संस्था संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. परंतु संशोधन संस्कृती फुलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय विकसित होणे अत्यावश्यक आहे. पारंपरिक परीक्षांमध्ये “योग्य उत्तर” महत्त्वाचे असते; संशोधनात मात्र “योग्य प्रश्न” अधिक महत्त्वाचा असतो. जॉन ड्यूई यांच्या अनुभवाधारित शिक्षण तत्त्वज्ञानानुसार (Dewey, 1938) शिक्षण हे जिज्ञासेपासून सुरू होते. म्हणूनच उच्च शिक्षणातील मूल्यमापनात मुक्त प्रश्नांचा, संशोधन प्रस्तावांचा, आणि समस्यांवर आधारित अध्ययनाचा समावेश असणे गरजेचे आहे.

विश्लेषण कौशल्य हे 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य मानले जाते. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार (Bloom et al., 1956; Anderson & Krathwohl, 2001) उच्च स्तरावरील बोधनिक कौशल्यांमध्ये विश्लेषण, मूल्यमापन आणि सर्जनशीलता यांचा समावेश होतो. जर मूल्यमापन केवळ स्मरणशक्ती आणि आकलन यांपुरते मर्यादित राहिले, तर विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ खुंटते. म्हणूनच केस स्टडी विश्लेषण, डेटा इंटरप्रिटेशन, संशोधन निबंध, आणि प्रकल्पाधारित मूल्यांकन यांचा समावेश उच्च शिक्षणात अनिवार्य असायला हवा. यामुळे विद्यार्थी माहितीचे विश्लेषण, तुलना, आणि तर्कसंगत निष्कर्ष काढण्याची क्षमता विकसित करतो (Biggs & Tang, 2011).

स्वतंत्र विचार हा नवोन्मेषाचा पाया आहे. पाउलो फ्रेरे (Freire, 1970) यांनी “बँकिंग मॉडेल ऑफ एज्युकेशन” यावर टीका करताना विद्यार्थ्यांना केवळ माहिती साठवणारी पात्रे न समजता विचार करणारे, प्रश्न विचारणारे नागरिक बनवण्याची गरज अधोरेखित केली. NEP-2020 मध्येही बहुविद्याशाखीय शिक्षण, लवचिक अभ्यासक्रम, आणि निवड स्वातंत्र्य यावर भर देण्यात आला आहे. परंतु जर अंतिम मूल्यमापन कठोर, एकसुरी आणि स्मरणाधारित असेल, तर अभ्यासक्रमातील लवचिकता निष्फळ ठरेल. म्हणूनच संशोधन पेपर्स, प्रेझेंटेशन, डिझाईन थिंकिंग प्रकल्प, स्टार्टअप मॉडेल विकसित करणे, इंटर्नशिप अहवाल यांसारख्या उपक्रमांवर आधारित मूल्यमापन आवश्यक आहे.

स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यासाठी जोखीम घेण्याची तयारी, समस्या ओळखण्याची क्षमता, आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती महत्त्वाची असते. पारंपरिक परीक्षा विद्यार्थ्यांना “चुका टाळण्याचे” प्रशिक्षण देते; परंतु उद्योजकतेसाठी “चुका करून शिकण्याची” मानसिकता आवश्यक आहे (Dweck, 2006). त्यामुळे formative assessment, prototype testing, peer feedback आणि iterative evaluation या पद्धती उच्च शिक्षणात समाविष्ट केल्यास संशोधन व उद्योजकता वृत्तीला चालना मिळेल.

एकूणच, NEP-2020 मधील संशोधन व नवोन्मेषाचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया बहुआयामी, चिंतनशील आणि कौशल्य-आधारित असणे आवश्यक आहे. ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणारी मूल्यांकन रचना हीच उच्च शिक्षणातील परिवर्तनाची किल्ली आहे.

शिक्षकांची भूमिका

मूल्यमापन प्रक्रियेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षकांची भूमिका केंद्रस्थानी आहे. NEP-2020 मध्ये शिक्षकांना “learning facilitator” म्हणून पाहिले गेले आहे (MoE, 2020). म्हणजेच शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसून शिकण्याच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करणारा असतो. अशा परिस्थितीत मूल्यमापन हे केवळ गुण देण्याचे साधन नसून विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मार्ग दाखवणारे साधन बनते.

प्रथम, शिक्षकांना सतत व्यावसायिक प्रशिक्षण आवश्यक आहे. आधुनिक मूल्यमापन पद्धती जसे की formative assessment, competency-based evaluation, authentic assessment यांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे “जे आजतागायत झालेले नाही” (Black & Wiliam, 1998). शिक्षकांनी मूल्यांकनाच्या मानसशास्त्रीय आधारांची जाण ठेवली पाहिजे, कारण मूल्यमापनाचा विद्यार्थ्यांच्या स्व-संकल्पना आणि प्रेरणा यावर थेट परिणाम होतो.

दुसरे म्हणजे, रुब्रिक्स तयार करण्याचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्पष्ट निकषांवर आधारित रुब्रिक्समुळे मूल्यांकन पारदर्शक, सुसंगत आणि न्याय्य होते (Brookhart, 2013). उदाहरणार्थ, संशोधन प्रकल्पाचे मूल्यमापन करताना समस्या मांडणी, संशोधन साहित्य समीक्षा, पद्धतीशास्त्र, विश्लेषण आणि निष्कर्ष या घटकांसाठी स्वतंत्र निकष असावेत. यामुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या कामातील ताकद आणि मर्यादा समजतात.

तिसरे, डिजिटल साधनांचा वापर अपरिहार्य बनला आहे. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम (LMS), ई-पोर्टफोलिओ, ऑनलाइन क्विझ, प्लेजरिझम तपासणी साधने इत्यादींच्या माध्यमातून मूल्यांकन अधिक परिणामकारक आणि डेटा-आधारित करता येते. डिजिटल मूल्यमापनामुळे वैयक्तिक अभिप्राय देणे शक्य होते, जे शिकण्याच्या गुणवत्तेत वाढ करते (Hattie & Timperley, 2007).

चौथे, निरीक्षण कौशल्य शिक्षकासाठी अत्यावश्यक आहे. वर्गातील चर्चा, गटकार्य, सादरीकरण, आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांचे बारकाईने निरीक्षण करून शिक्षक विद्यार्थ्यांच्या बोधनिक व सामाजिक कौशल्यांचे मूल्यांकन करू शकतो. Vygotsky (1978) यांच्या “Zone of Proximal Development” संकल्पनेनुसार योग्य मार्गदर्शन व अभिप्राय विद्यार्थ्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ घडवतो. म्हणूनच शिक्षकाने मूल्यांकन प्रक्रियेला मार्गदर्शक स्वरूप द्यावे.

अंततः, मूल्यमापन ही केवळ गुण देण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारी मार्गदर्शक प्रक्रिया आहे. जेव्हा शिक्षक मूल्यांकनाला शिक्षणाचा अविभाज्य भाग मानतो, तेव्हा विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी सतत अभिप्राय, सुधारणा आणि चिंतन यांची साखळी निर्माण होते. NEP-2020 च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेला नव्या दृष्टीकोनातून स्वीकारणे आणि त्यात सर्जनशीलता व कौशल्यकेंद्री दृष्टिकोन आणणे अत्यावश्यक आहे.

डिजिटल मूल्यमापन

डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शिक्षण क्षेत्रात मूल्यमापनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आले आहेत. NEP-2020 मध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक लवचिक, सर्वसमावेशक आणि कौशल्याधारित करण्यावर स्पष्ट भर देण्यात आला आहे (MoE, 2020). डिजिटल मूल्यमापन हे केवळ परीक्षांचे ऑनलाइन रूपांतर नसून शिकण्याच्या प्रक्रियेचे सतत, डेटा-आधारित आणि वैयक्तिकृत निरीक्षण करण्याची एक व्यापक चौकट आहे.

(अ) ऑनलाइन क्विझ (Online Quiz)

ऑनलाइन क्विझ ही मूल्यमापनाची त्वरित आणि प्रतिसादक्षम पद्धत आहे. पारंपरिक लेखी परीक्षेपेक्षा ऑनलाइन क्विझमध्ये तात्काळ अभिप्राय देणे शक्य होते. ब्लॅक आणि विल्यम (1998) यांनी Formative Assessment संदर्भात मांडले की, तात्काळ अभिप्राय विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गती आणि गुणवत्ता सुधारतो. ऑनलाइन क्विझमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समजुतीतील त्रुटी लगेच ओळखता येतात.

याशिवाय, क्विझमध्ये बहुपर्यायी प्रश्न, परिस्थितीनिष्ठ प्रश्न, व्हिडिओ-आधारित प्रश्न इत्यादींचा समावेश करता येतो. यामुळे केवळ स्मरणशक्ती नव्हे तर विश्लेषण, उपयोजन आणि मूल्यमापन यांसारख्या उच्च-स्तरीय बोधनिक कौशल्यांचे (Bloom, 1956; Anderson & Krathwohl, 2001) परीक्षण करता येते. अशा प्रकारे ऑनलाइन क्विझ हे कौशल्याधारित मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन ठरते.

(ब) ई-पोर्टफोलिओ (E-Portfolio)

ई-पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा डिजिटल दस्तऐवज. यात प्रकल्प, सर्जनशील लेखन, सादरीकरणे, व्हिडिओ, संशोधन अहवाल, शिक्षकांचे अभिप्राय आणि विद्यार्थ्यांचे स्वमूल्यमापन यांचा समावेश असतो. Barrett (2007) यांच्या मते, ई-पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांच्या चिंतनशील क्षमतेचा विकास करतो आणि त्यांना त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाची जाणीव करून देतो.

ई-पोर्टफोलिओमुळे शिक्षण ‘प्रक्रिया-केंद्रित’ बनते. विद्यार्थी केवळ अंतिम गुणांवर लक्ष केंद्रित न करता प्रगती, सुधारणा आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करतो. NEP-2020 मध्ये 360-अंश प्रगती अहवालाची संकल्पना मांडण्यात आली आहे, ज्यात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो (MoE, 2020). ई-पोर्टफोलिओ ही संकल्पना त्याच तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे.

(क) अ‍ॅडॅप्टिव टेस्टिंग (Adaptive Testing)

अ‍ॅडॅप्टिव टेस्टिंग ही संगणकाधारित परीक्षा प्रणाली आहे ज्यात विद्यार्थ्याच्या उत्तरांनुसार पुढील प्रश्नांची काठीण्य पातळी बदलते. ही पद्धत Item Response Theory या मानसशास्त्रीय मापन सिद्धांतावर आधारित आहे (Hambleton & Swaminathan, 1985).

उदाहरणार्थ, जर विद्यार्थी एखाद्या संकल्पनेत प्रावीण्य दाखवतो, तर पुढील प्रश्न अधिक अवघड दिले जातात; जर चूक झाली, तर तुलनेने सोपे प्रश्न दिले जातात. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परीक्षा वैयक्तिक अनुभव बनते. अ‍ॅडॅप्टिव टेस्टिंगमुळे केवळ गुणांकनच नव्हे तर विद्यार्थ्याच्या नेमक्या क्षमतेचा अंदाज अधिक अचूकपणे लावता येतो. ही पद्धत विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभिन्नता लक्षात घेते, जे मानसशास्त्रातील एक मूलभूत तत्त्व आहे (Anastasi & Urbina, 1997). त्यामुळे शिक्षण अधिक समावेशक आणि न्याय्य बनते.

(ड) डेटा-आधारित विश्लेषण (Data-Driven Analytics)

डिजिटल मूल्यमापनामुळे मोठ्या प्रमाणात अध्ययन संबंधित डेटा उपलब्ध होतो. Learning Analytics च्या साहाय्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती, गती, अडचणी आणि प्रगती यांचे विश्लेषण करू शकतात (Siemens, 2013).

डेटा-आधारित विश्लेषणामुळे शिकण्यातील कमकुवत घटक ओळखणे, वैयक्तिक मार्गदर्शन देणे, शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे, शाळा किंवा संस्थेच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेणे या गोष्टी शक्य होतात. यामुळे शिक्षण ‘एकसमान’ (one-size-fits-all) न राहता ‘वैयक्तिकृत’ (personalized) बनते. NEP-2020 मध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैयक्तिक शिक्षण निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे (MoE, 2020). डिजिटल मूल्यमापन हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

NEP-2020 चे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे, तर सर्वांगीण आणि कौशल्याधारित विकास आहे. जर आपले ध्येय सर्जनशील विद्यार्थी, कौशल्यसंपन्न युवक आणि संशोधनाभिमुख शिक्षण असेल, तर मूल्यमापन प्रक्रियेतही त्याच तत्त्वांचा समावेश असणे आवश्यक आहे.

समारोप:

NEP-2020 चे यश केवळ अभ्यासक्रम बदलावर अवलंबून नाही. खरा बदल तेव्हाच होईल जेव्हा परीक्षा पद्धती बदलेल. रटाळ शिक्षणाऐवजी समज, गुणांऐवजी कौशल्य, स्पर्धेपेक्षा सहकार्य, आणि निकालाऐवजी शिकण्याची प्रक्रिया यावर भर देणे काळाची गरज आहे. जर आपण कौशल्य-आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया राबवत असू, तर मूल्यमापन प्रक्रिया सुद्धा तितकीच सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि कौशल्य-आधारित असणे अपरिहार्य आहे. NEP-2020 हे धोरण आहे; परंतु त्याचे यश हे मूल्यमापन प्रक्रियेतील परिवर्तनावर अवलंबून आहे.

संदर्भ:

Amabile, T. M. (1996). Creativity in context. Westview Press.

Anastasi, A., & Urbina, S. (1997). Psychological testing (7th ed.). Prentice Hall.

Anderson, L. W., & Krathwohl, D. R. (Eds.). (2001). A taxonomy for learning, teaching, and assessing: A revision of Bloom’s taxonomy of educational objectives. Longman.

Bandura, A. (1977). Social learning theory. Prentice Hall.

Barrett, H. C. (2007). Researching electronic portfolios and learner engagement: The REFLECT initiative. Journal of Adolescent & Adult Literacy, 50(6), 436–449.

Biggs, J. (1996). Enhancing teaching through constructive alignment. Higher Education, 32(3), 347–364.

Biggs, J., & Tang, C. (2011). Teaching for quality learning at university (4th ed.). Open University Press.

Black, P., & Wiliam, D. (1998). Assessment and classroom learning. Assessment in Education: Principles, Policy & Practice, 5(1), 7–74.

Bloom, B. S. (1968). Learning for mastery. Evaluation Comment, 1(2).

Bloom, B. S., Engelhart, M. D., Furst, E. J., Hill, W. H., & Krathwohl, D. R. (1956). Taxonomy of educational objectives: The classification of educational goals. Handbook I: Cognitive domain. Longmans, Green.

Boud, D. (1995). Enhancing learning through self-assessment. Kogan Page.

Brookhart, S. M. (2013). How to create and use rubrics for formative assessment and grading. ASCD.

Deci, E. L., & Ryan, R. M. (2000). The “what” and “why” of goal pursuits: Human needs and the self-determination of behavior. Psychological Inquiry, 11(4), 227–268.

Dewey, J. (1938). Experience and education. Macmillan.

Dweck, C. S. (2006). Mindset: The new psychology of success. Random House.

Freire, P. (1970). Pedagogy of the oppressed. Continuum.

Hambleton, R. K., & Swaminathan, H. (1985). Item response theory: Principles and applications. Kluwer-Nijhoff.

Hattie, J., & Timperley, H. (2007). The power of feedback. Review of Educational Research, 77(1), 81–112.

Kohlberg, L. (1981). Essays on moral development: Vol. 1. The philosophy of moral development. Harper & Row.

Kolb, D. A. (1984). Experiential learning: Experience as the source of learning and development. Prentice Hall.

Kumar, K. (2005). Political agenda of education: A study of colonialist and nationalist ideas. Sage Publications.

Messick, S. (1995). Validity of psychological assessment: Validation of inferences from persons’ responses and performances as scientific inquiry. American Psychologist, 50(9), 741–749.

Ministry of Education. (2020). National education policy 2020. Government of India.

Nussbaum, M. C. (2010). Not for profit: Why democracy needs the humanities. Princeton University Press.

OECD. (2018). The future of education and skills 2030. OECD Publishing.

OECD. (2019). PISA 2018 results (Volume I): What students know and can do. OECD Publishing.

Paulson, F. L., Paulson, P. R., & Meyer, C. A. (1991). What makes a portfolio a portfolio? Educational Leadership, 48(5), 60–63.

Piaget, J. (1970). Science of education and the psychology of the child. Viking Press.

Rao, P. (2024). Beyond Macaulay: Education in India, 1780–1860. Routledge.

Siemens, G. (2013). Learning analytics: The emergence of a discipline. American Behavioral Scientist, 57(10), 1380–1400.

Thomas, J. W. (2000). A review of research on project-based learning. Autodesk Foundation.

Torrance, E. P. (1974). Torrance tests of creative thinking. Personnel Press.

Vygotsky, L. S. (1978). Mind in society: The development of higher psychological processes. Harvard University Press.

Wiggins, G., & McTighe, J. (2005). Understanding by design (Expanded 2nd ed.). ASCD.

World Economic Forum. (2020). The future of jobs report 2020. World Economic Forum.

World Health Organization. (1999). Partners in life skills education: Conclusions from a United Nations inter-agency meeting. WHO.

Zimmerman, B. J. (2002). Becoming a self-regulated learner: An overview. Theory Into Practice, 41(2), 64–70.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions