अध्यापनशास्त्र, प्रौढशिक्षण
आणि स्वयं-अधिगम | Pedagogy, Andragogy, & Heutagogy
शिक्षण ही मानवी समाजाच्या प्रगतीची
मूलभूत गरज आहे. परंतु प्रत्येक वयाच्या टप्प्यावर शिकण्याच्या पद्धतीत फरक असतो.
बालक, प्रौढ आणि स्वयंप्रेरित शिकणारे व्यक्ती यांना शिकवण्याच्या प्रक्रिया
वेगळ्या असतात. या प्रक्रियांचे सैद्धांतिक अधिष्ठान म्हणजेच अध्यापनशास्त्र (Pedagogy),
प्रौढशिक्षण (Andragogy)
आणि
स्वयं-अधिगम (Heutagogy) होय. या संकल्पनांचा अभ्यास करणे
शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
अध्यापनशास्त्र
(Pedagogy): एक शास्त्रीय दृष्टिकोन
"Pedagogy"
ही संकल्पना ग्रीक भाषेतील दोन मूलभूत शब्दांपासून उद्भवली आहे,
"paid", म्हणजे बालक आणि "agogos",
म्हणजे मार्गदर्शक किंवा नेता. या दोन्ही शब्दांच्या संयोगातून तयार
झालेला "paidagogos" हा शब्द सुरुवातीला
ग्रीसमध्ये अशा दासासाठी वापरला जात असे जो बालकांना शाळेत नेत असे आणि त्यांच्या
शैक्षणिक वर्तनावर देखरेख ठेवत असे. कालांतराने याच शब्दातून Pedagogy ही संकल्पना विकसित झाली, जी आजच्या काळात
"बालकांना शिकवण्याची शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धत" या अर्थाने वापरली
जाते (Knowles, 1980). पारंपरिक अर्थाने पाहता,
Pedagogy म्हणजे शिक्षक-आधारित शिक्षणप्रक्रिया, जिथे विद्यार्थी हा शिकवण्याच्या प्रक्रियेत तुलनेने निष्क्रीय भूमिका
बजावतो आणि शिक्षक हा ज्ञानाचा एकमेव स्रोत असतो.
अ. मुख्य
वैशिष्ट्ये
1.
शिक्षककेंद्रित दृष्टिकोन (Teacher-Centered Approach)
Pedagogy
ही एक पारंपरिक शिक्षणपद्धती असून, त्यात
शिक्षक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. अभ्यासक्रमाची निवड, अध्यापनाची
शैली, मूल्यांकनाचे प्रकार हे सर्व निर्णय शिक्षकच ठरवतो.
विद्यार्थ्याला फक्त त्यानुसार शिकणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते (Pratt,
1988).
2.
विद्यार्थ्याचे शिक्षकावर पूर्ण अवलंबित्व
या
पद्धतीमध्ये विद्यार्थी हा शिक्षकावर आणि अभ्यासक्रमावर पूर्णपणे अवलंबून असतो.
विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची किंवा आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत
सक्रिय सहभाग घेण्याची संधी मर्यादित असते. ज्ञान हे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे
"सारखे-सारखे" पोहोचवले जाते (Freire, 1970).
3. परीक्षाभिमुख
आणि श्रवण-केंद्रित पद्धत
Pedagogical
शिक्षण हे बहुधा पाठांतर, श्रवण, आणि परीक्षा यांवर केंद्रित असते. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रामुख्याने
त्यांच्या पाठांतर क्षमतेवर आणि परीक्षांतील कामगिरीवर आधारित असते. त्यामुळे
विचारशक्ती, विश्लेषण किंवा समस्या सोडवण्याच्या
कौशल्यांपेक्षा माहितीच्या पाठांतराला जास्त महत्त्व दिले जाते.
4. अनुशासन, शिस्त आणि नियंत्रणावर भर
या
पद्धतीत शिस्त, शाळेतील नियमांचे पालन, वेळेचे व्यवस्थापन आणि शिक्षकाच्या आज्ञांचे पालन यांना उच्च प्राधान्य
दिले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ विषय शिकवत नाही, तर
त्यांचे वर्तनही नियंत्रित करतो. असे मानले जाते की चांगल्या शिक्षणासाठी कठोर
शिस्त आवश्यक असते (Skinner, 1954).
ब. शालेय
शिक्षणातील परंपरा
आपण
आपल्या रोजच्या अनुभवातून पाहतो की शालेय शिक्षण हे मुख्यतः Pedagogical
चौकटीत बसते. शिक्षक वर्गात येतो, शिकवतो,
विद्यार्थी ऐकतात, नोंदी करतात आणि नंतर तेच
विषय परीक्षेसाठी पाठ करतात. बहुतेक वेळा विद्यार्थ्यांनी "काय" शिकावे
हे ठरवले जाते, "का" शिकावे यावर फारसा विचार होत
नाही. उदाहरणार्थ, इयत्ता पाचवीतील इतिहास विषय शिकवताना
शिक्षक "शिवाजी महाराजांनी कोणकोणती किल्ले जिंकले?" हे सांगतो आणि विद्यार्थी ते पाठ करतो. यामध्ये विचारप्रवृत्ती, अनुभवाधारित शिक्षण किंवा संवादी शिक्षणाला फारसा वाव राहत नाही.
क. शैक्षणिक
पद्धती आणि अध्यापनशास्त्र
Pedagogy
ही शिक्षणतज्ञ आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे.
शिक्षणप्रक्रियेत तत्त्वे, पद्धती, शैक्षणिक
उद्दिष्टे, मूल्यांकन तंत्र यांचा समावेश करत, अध्यापनशास्त्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करते.
परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आजच्या बदलत्या सामाजिक-तांत्रिक पार्श्वभूमीवर ही
संकल्पना अधिक लवचिक, सहभागी आणि विद्यार्थीनिष्ठ व्हायला
हवी (Brookfield, 1995).
Pedagogy
ही शिक्षणाच्या पायाभूत टप्प्यावर मूलभूत भूमिका बजावते. शालेय
शिक्षणाची घडी बसवताना, विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पना
देताना, शिक्षक-केंद्रित अभ्यासक्रम रचना करताना तिचे
महत्त्व स्पष्ट होते. मात्र, आजच्या डिजिटल आणि संवादात्मक
शिक्षणपद्धतीच्या युगात, Pedagogy हे एकमेव समाधान नाही.
नव्या शिक्षणसंकल्पनांमध्ये, Pedagogy सोबतच Andragogy
आणि Heutagogy चा अभ्यास आणि वापर अनिवार्य
ठरत आहे.
प्रौढशिक्षण (Andragogy):
सैद्धांतिक आणि व्यवहार्य आकलन
"प्रौढशिक्षण" ही संकल्पना
"Andragogy" या ग्रीक शब्दावर आधारित आहे. "Andragogy"
हा शब्द aner
(अर्थ:
प्रौढ पुरुष/मानव) आणि agogos (अर्थ: मार्गदर्शक) या ग्रीक
शब्दांपासून बनलेला आहे. याचा थेट अर्थ "प्रौढांना मार्गदर्शन करणारी
शिक्षणपद्धती" असा होतो. ही संकल्पना १९२० च्या दशकात युरोपमध्ये वापरात येऊ
लागली असली तरी, अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ माल्कम नोल्स (Malcolm
S. Knowles) यांनी ती शास्त्रीय पातळीवर स्थापित केली. त्यांनी "Andragogy"
ही संज्ञा Pedagogy
(बालक-केंद्रित
शिक्षण) पासून वेगळी ओळख करून दिली आणि तिचे सैद्धांतिक अधिष्ठान विकसित केले.
नोल्स यांच्या मते, “Andragogy is the art and science
of helping adults learn” (Knowles, 1980).
वैशिष्ट्ये
प्रौढशिक्षण ही पारंपरिक
अध्यापनशास्त्रापेक्षा मूलत: वेगळी आहे. यामध्ये शिक्षक केंद्रस्थानी न राहता
शिकणारा व्यक्ती शिक्षणाच्या केंद्रस्थानी असतो. ही एक "Learner-Centered
Approach" आहे, जिथे शिकणाऱ्याचे अनुभव, गरजा आणि
निर्णयक्षमता यांना महत्त्व दिले जाते (Knowles et al.,
2005).
1. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू:
प्रौढ व्यक्तींना शिकवताना शिक्षक हे
एक मार्गदर्शक, सल्लागार किंवा सुविधा उपलब्ध करून देणारे असतात, आणि शिकणारे
स्वतःच्या शिकण्याचे उद्दिष्ट ठरवतात. यामध्ये शिकणाऱ्या व्यक्तीचे स्वातंत्र्य
आणि आत्मनिर्भरता केंद्रस्थानी असते.
2. अनुभवाचा शिक्षणात वापर:
प्रौढ व्यक्तींचा आयुष्यभराचा अनुभव
ही एक शिक्षणसंपत्ती असते. त्यामुळे शिकवताना त्यांच्या अनुभवांचा समावेश करणे
आवश्यक ठरते. चर्चासत्रे, केस स्टडी, अनुभवावर
आधारित शिक्षण (experiential learning) यांचा उपयोग
केला जातो.
3. आंतरिक प्रेरणा:
प्रौढ व्यक्ती बहुतांश वेळा वैयक्तिक, सामाजिक किंवा
व्यावसायिक गरजांमुळे शिकतात. त्यांना बाह्य बक्षिसांपेक्षा कौशल्यविकास, आत्मसन्मान
किंवा आत्मप्राप्ती यामुळे शिकण्याची प्रेरणा मिळते.
4. समस्याभिमुख
आणि व्यावहारिक दृष्टिकोन:
प्रौढ शिक्षण हे केवळ
सिद्धांतांपुरते मर्यादित नसते. त्याचे उद्दिष्ट आहे प्रत्यक्ष आयुष्यातील
समस्यांचे निराकरण करणे. त्यामुळे शिकवण्याचे स्वरूप समस्याभिमुख (problem-centered)
असते आणि
शिक्षणात थेट व्यवहार्यतेचा समावेश असतो.
5. निर्णयप्रक्रियेत
सक्रिय सहभाग:
प्रौढ शिक्षणात शिकणारे त्यांच्या
शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात, जसे की उद्दिष्ट ठरवणे, शिक्षणस्रोतांची
निवड, अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन यामध्ये त्यांचा सक्रिय
सहभाग असतो. त्यामुळे ते शिक्षणाशी अधिक जबाबदारपणे जोडले जातात.
उदाहरणार्थ,
प्रौढशिक्षणाच्या
विविध स्वरूपांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी राबवले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम
(In-service training), व्यावसायिक कार्यशाळा (Professional
workshops), कौशल्यविकास कार्यक्रम (Skill
development programs), ई-लर्निंग कोर्सेस यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, एखाद्या
औद्योगिक कामगाराला मशीन वापरण्याचे नवे तंत्र शिकवणे, शासकीय
कर्मचाऱ्यांना नवीन धोरणांबाबत प्रशिक्षण देणे किंवा शिक्षकांसाठी नव्या अध्यापन
तंत्रांचा अभ्यासक्रम, ही सगळी प्रौढशिक्षणाची उदाहरणे ठरतात. डिजिटल
शिक्षणव्यवस्थांमधून (MOOCs, LMS platforms) प्रौढ व्यक्ती
आपले शिक्षण स्वतः ठरवू शकतात, जे प्रौढशिक्षण आणि स्वयं-अधिगम
यामध्ये पूल निर्माण करते.
प्रौढशिक्षण ही आजच्या बदलत्या
सामाजिक, तांत्रिक आणि व्यावसायिक गरजांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
मानवी जीवन हे सतत शिकण्याची प्रक्रिया असल्याने "Lifelong
Learning" ही संकल्पना केवळ प्रौढशिक्षणामधून साकार होते. माल्कम नोल्स यांनी
मांडलेली प्रौढशिक्षण संकल्पना आजच्या शिक्षणव्यवस्थेत अत्यंत उपयुक्त ठरत आहे, विशेषतः
रोजगारकेंद्रित शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सामाजिक
परिवर्तनाच्या संदर्भात.
स्वयं-अधिगम (Heutagogy): सर्जनशील
आणि आत्मनिर्भर शिक्षणाची दिशा
Heutagogy ही संकल्पना
2000 साली स्टुअर्ट हॉसेल (Stewart Hase) आणि क्रिस केन (Chris
Kenyon) या ऑस्ट्रेलियन शिक्षणतज्ज्ञांनी मांडली. त्यांनी पारंपरिक Pedagogy
(बालक-केंद्रित शिक्षण) आणि Andragogy (प्रौढकेंद्रित
शिक्षण) यांच्याही पुढे जाऊन एक अशी शिक्षणपद्धती सुचवली, जिथे
शिकणारा व्यक्ती स्वतःच्या शिक्षणाचा पूर्ण मालक आणि नियोजक असतो. त्यांनी From
Andragogy to Heutagogy या निबंधात हे सिद्ध केले की 21व्या शतकातील
गतिशील, जटिल, आणि अनिश्चित जगात
शिक्षण हे फक्त माहिती घेणे नसून ती माहिती सर्जनशीलपणे वापरण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतः शिकण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया
असावी (Hase & Kenyon, 2000). म्हणूनच, Heutagogy
म्हणजे Self-determined Learning म्हणजेच
व्यक्ती स्वतःची शैक्षणिक दिशा, साधने, पद्धती आणि मूल्यांकन स्वतः ठरवते.
स्वतः शिकण्याचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू
स्वयं-अधिगम ही पद्धत पूर्णतः
शिकणाऱ्यावर केंद्रित असते. यात शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो; प्रत्यक्ष शिक्षणाची
जबाबदारी शिकणाऱ्यावर असते. ही प्रक्रिया स्व-चिंतनशील (reflective), लवचिक (flexible), आणि अनुभवाधारित (experiential)
असते. ही संकल्पना मानते की व्यक्तीला स्वतः शिकण्याची क्षमता
अंगभूत असते आणि ती क्षमता विकसित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. अधिगम म्हणजे
शिकणे, याचा अर्थ ज्ञान, कौशल्ये, अनुभव
किंवा दृष्टीकोन मिळवणे किंवा बदलणे. Heutagogy मध्ये
शिकणारा व्यक्ती स्वतःचे उद्दिष्टे ठरवतो, आवश्यक त्या
साधनांची निवड करतो, स्वतःचे मूल्यांकन पद्धती ठरवतो आणि
शिकलेले ज्ञान नव्या संदर्भात वापरतो (Blaschke, 2012).
या प्रक्रियेमध्ये कौशल्य, सर्जनशीलता, नवविचार, आणि मेटाकॉग्निशन यांचा गाभा असतो.
पारंपरिक शालेय शिक्षणात जिथे ठराविक अभ्यासक्रम आणि मूल्यांकन प्रणाली असते,
तिथे ही पद्धत खुली, मुक्त आणि जास्त वैयक्तिक
अनुभवांवर आधारित असते. त्यामुळे ही पद्धत खासकरून जग बदलवणाऱ्या समस्या
सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते (Canning, 2010).
तंत्रज्ञानाची भूमिका आणि लवचिकता
Heutagogy ही
शिक्षणपद्धती डिजिटल युगात विशेष प्रभावी ठरते. इंटरनेट, स्मार्टफोन,
शिक्षणविषयक प्लॅटफॉर्म्स, ओपन एज्युकेशनल
रिसोर्सेस (OERs), आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारखी साधने शिकणाऱ्याच्या हातात असताना, त्याला
कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, स्वतःच्या
गतीने शिकण्याची संधी मिळते. म्हणूनच ही पद्धत "anytime-anywhere
learning" चे मूर्त रूप आहे. MOOCs (Massive Open
Online Courses), YouTube tutorials, podcasts, ब्लॉग्स,
discussion forums, आणि e-learning platforms यांचा
वापर करून एखादी व्यक्ती स्वतःचा शिक्षण प्रवास स्वतंत्रपणे आखू शकते.
व्यवहारातील उपयोग
आज अनेक लोक स्वतःहून Python शिकतात,
व्यक्तिमत्त्व विकासाचे कोर्सेस करतात, मानसशास्त्राची
किंवा तंत्रज्ञानाची माहिती YouTube वरील व्याख्यानांद्वारे
घेतात, किंवा स्वतःचे career planning MOOCs द्वारे करतात ही सर्व उदाहरणे Heutagogy चे उत्तम
दर्शन घडवतात. विशेषतः उद्यमशीलता, स्टार्टअप्स, संशोधन, व नवोपक्रमात्मक क्षेत्रांमध्ये कार्य
करणाऱ्या लोकांमध्ये ही शिकण्याची पद्धत नैसर्गिकपणे दिसून येते.
शिक्षण धोरणातील वाढता प्रभाव
भारताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण 2020 (NEP
2020) मध्ये "उद्यमशीलता", "आजीवन
शिक्षण", आणि "अंतःप्रेरित शिक्षण" यांचा
उल्लेख आढळतो, जे Heutagogy च्या
संकल्पनेस पूरक आहेत. या धोरणात विद्यार्थ्याला flexibility,
interdisciplinarity, आणि critical thinking विकसित
करण्यावर भर दिला आहे, जो Heutagogy चा
केंद्रबिंदू आहे.
Heutagogy ही पारंपरिक
शिक्षणपद्धतींपेक्षा वेगळी, सर्जनशील आणि व्यक्तिकेंद्रित
शिक्षणसंधी प्रदान करणारी संकल्पना आहे. आजच्या गतिमान जगात, जिथे कौशल्ये झपाट्याने बदलतात आणि नव्या संकल्पनांची गरज असते, तिथे स्वयं-अधिगम हेच खरे शिक्षणाचे भविष्य आहे. ही संकल्पना
विद्यार्थ्याला फक्त ज्ञान देत नाही, तर त्याला 'कसे शिकायचे' आणि 'स्वतःवर
विश्वास ठेवून शिकण्याची क्षमता' निर्माण करून देते.
तंत्रज्ञानाच्या युगातील महत्त्व
21व्या शतकात माहिती आणि
तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे शिक्षणाची व्याख्या आणि पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल
झाला आहे. इंटरनेट, स्मार्टफोन, कृत्रिम
बुद्धिमत्ता, आणि डिजिटल शिक्षण मंचांनी (जसे की MOOCs,
Coursera, edX, SWAYAM) पारंपरिक वर्गखोल्यांमधील शिक्षक-केंद्रित अध्यापनशैली (Pedagogy)
याबाबत
प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आजच्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षकाच्या
मार्गदर्शनाची गरज नाही, तर त्यांना स्वतंत्र विचार, शोध, आणि
उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणारे अधिगम हवे असते.
या नवयुगात प्रौढशिक्षण आणि स्वयं-अधिगम
या संकल्पनांना प्राधान्य दिले जात आहे. प्रौढ व्यक्ती त्यांच्या जीवनानुभवावर
आधारित शिक्षणाची गरज अनुभवतात. त्यामुळे शिक्षण आता केवळ औपचारिक
शिक्षणसंस्थांपुरते मर्यादित न राहता, कार्यस्थळी
अधिगम, वैयक्तिक विकास, आणि सतत बदलणाऱ्या कौशल्यांची गरज
भागवण्यासाठी वापरले जात आहे. हे युग आजीवन शिक्षणाचे
युग ठरले आहे, जिथे व्यक्ती
केवळ पदवी मिळवून थांबत नाही, तर सतत शिकत राहतो.
NEP 2020 मध्येही
या बदलांचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते. या धोरणानुसार शिक्षण पद्धती ही अधिक लवचिक, समावेशक, आणि
कौशल्य-आधारित असावी असे म्हटले आहे (NEP, 2020). यामध्ये
“21व्या शतकातील कौशल्ये” (जसे की, विचारशक्ती, संवाद, सहकार्य, आणि डिजिटल
साक्षरता) यांना प्राधान्य देण्यात आले आहे. धोरणात "व्यक्ती केंद्रित"
आणि "स्व-नियंत्रित" शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनांचा स्पष्ट
उल्लेख आहे. यामुळे स्वयं-अधिगम हे शिक्षणाचे भवितव्य ठरत आहे.
समारोप:
शिक्षण ही एक गतिशील, परिवर्तनशील
आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हे केवळ एका विशिष्ट वयात किंवा पद्धतीत
मर्यादित न राहता, व्यक्तीच्या संपूर्ण जीवनकालात
त्याच्या गरजेनुसार विकसित होत जाते. अध्यापनशास्त्र (Pedagogy)
हे शिक्षणाचे
मूलभूत आणि पारंपरिक स्वरूप असले, तरीही ते प्रामुख्याने बालक किंवा
किशोरवयीन विद्यार्थ्यांपुरते मर्यादित आहे. त्यामध्ये शिक्षक केंद्रस्थानी असतो
आणि विद्यार्थी हे मुख्यतः ज्ञान प्राप्त करणारे असतात.
परंतु जसजशी व्यक्ती प्रौढ होत जाते, तसतसे तिच्या
शिक्षणाच्या गरजा, प्रेरणा आणि पद्धती बदलतात. येथे
प्रौढशिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रौढ व्यक्ती आपले
शिक्षण स्वतःच्या अनुभवांवर आधारित आखतात आणि ते समस्याभिमुख असते. पुढे जाऊन, आजच्या युगात
व्यक्ती केवळ शिकवले गेलेले ज्ञानच आत्मसात करत नाही, तर तो स्वतःचा
शिक्षणाचा मार्गही ठरवतो. यासाठी स्वयं-अधिगम ही संकल्पना
केवळ उपयुक्त नाही, तर अनिवार्य ठरते.
आजच्या डिजिटल, गतिशील आणि
आत्मकेंद्रित जगात हे तीनही दृष्टिकोन समन्वयाने वापरणे आवश्यक झाले आहे. बालपणात
अध्यापनशास्त्र, तरुणावस्थेत प्रौढशिक्षण आणि व्यावसायिक व
व्यक्तिगत प्रगतीसाठी स्वयं-अधिगम — या तीन टप्प्यांचा एकत्रित विचार केल्यासच
शिक्षणप्रक्रिया समृद्ध, अर्थपूर्ण आणि प्रभावी बनू शकते.
म्हणूनच, आजच्या शिक्षणव्यवस्थेला हे त्रिसूत्री दृष्टिकोन अंगीकारणे ही काळाची
गरज आहे.
![]() |
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Blaschke,
L. M. (2012). Heutagogy and lifelong learning: A review of
heutagogical practice and self-determined learning. The International Review of
Research in Open and Distributed Learning, 13(1), 56-71.
Brookfield,
S. D. (1995). Adult Learning: An Overview. In A. Tuinjman
(Ed.), International Encyclopedia of Education.
Canning,
N. (2010). Playing with heutagogy: Exploring strategies to
empower mature learners in higher education. Journal of Further and Higher
Education, 34(1), 59-71.
Freire,
P. (1970). Pedagogy of the Oppressed. Herder and Herder.
Government
of India (2020). National Education Policy 2020.
Ministry of Education.
Hase,
S., & Kenyon, C. (2000). From Andragogy to Heutagogy.
Ulti-BASE Articles.
Illeris,
K. (2003). Towards a contemporary and comprehensive theory
of learning. International Journal of Lifelong Education, 22(4),
396-406.
Knowles,
M. S. (1980). The Modern Practice of Adult Education: From
Pedagogy to Andragogy. Cambridge Adult Education.
Knowles,
M. S., Holton, E. F., & Swanson, R. A. (2005). The
Adult Learner: The Definitive Classic in Adult Education and Human Resource
Development. Elsevier.
Merriam,
S. B., & Bierema, L. L. (2014). Adult Learning:
Linking Theory and Practice. Jossey-Bass.
Pratt,
D. D. (1988). Five Perspectives on Teaching in Adult and
Higher Education. Malabar, FL: Krieger Publishing.
Skinner,
B. F. (1954). The Science of Learning and the Art of
Teaching. Harvard Educational Review.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions