शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

प्रेम एक अजब रसायन | Psychology of Love

 

प्रेम एक अजब रसायन 

"प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं" ही ओळ कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील आहे. या ओळींमागे कवीचा असा दृष्टिकोन आहे की, प्रेम ही एक Universal भावना आहे, जी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तीसाठी सारखीच असते. प्रेम ही मानवी भावविश्वातील सर्वात सूक्ष्म आणि त्याचवेळी सर्वात सामर्थ्यशाली भावना आहे. हे एक असं भावनिक ऊर्जाकेंद्र आहे जे माणसाला केवळ स्वतःपुरतंच मर्यादित ठेवत नाही, तर ते इतरांच्या वेदना, आनंद, गरजा आणि अस्तित्व यांच्याशी जोडते. जेव्हा माणूस प्रेम अनुभवतो, तेव्हा त्याचं आत्मकेंद्रित जग थोडं खोलवर हलतं आणि तो ‘स्व’च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत. प्रेमामुळे माणसात करुणा (compassion), परानुभूती (empathy), समर्पण (devotion) आणि दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते.

मानसशास्त्रात प्रेमाला केवळ भावना म्हणून न पाहता, एक मूलगामी जीवनदृष्टी (way of being) म्हणूनही समजलं जातं (Fromm, 1956). जर्मन मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यांनी The Art of Loving या ग्रंथात प्रेमाला कला मानलं आहे जिचं प्रशिक्षण, शिस्त, ज्ञान आणि संयम आवश्यक आहे. त्यांच्यानुसार प्रेम म्हणजे एक सक्रिय, क्रियाशील वृत्ती असून, केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही. ही एक समर्पणशील, जबाबदारीने युक्त, आणि दुसऱ्याला सन्मान देणारी वृत्ती आहे.

प्रेम ही अशी वृत्ती आहे जिच्या अस्तित्वामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो. Victor Frankl यांच्या Man’s Search for Meaning या पुस्तकातही सांगितलं आहे की, अत्यंत क्लेशदायक परिस्थितीतसुद्धा प्रेम हेच माणसाच्या अस्तित्वाला अर्थ देऊ शकतं. त्यामुळे प्रेम केवळ वैयक्तिक समाधानाचं साधन नसून, ते मानवी अस्तित्वाच मूलमंत्र आहे.

प्रेमाची व्याख्या

प्रेमाची एक सार्वत्रिक व्याख्या करणं कठीण आहे, कारण ते वेगवेगळ्या संस्कृती, व्यक्तिमत्व आणि अनुभवांनुसार भिन्न स्वरूप धारण करतं. तरीही मूलत: प्रेम म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती, गोष्टी, संकल्पना किंवा मूल्याप्रती अनुभवणारी तीव्र आत्मीयता, ओढ, समर्पण आणि जोडलेपणाची भावना (Hatfield & Rapson, 1993). ही भावना केवळ भावनिक नाही तर ती शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक स्तरावरही अनुभवली जाते.

प्रेम ही भावना "स्वतःच्या पलीकडे जाण्याची क्षमता" देते, याचा अर्थ असा की, माणूस आपल्या अहंभावाच्या मर्यादा ओलांडून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो, त्याच्या गरजा आणि भावना समजून घेतो, आणि त्याच्या भल्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतो. हे प्रेमाचं त्यागी रूप Agape या ग्रीक संकल्पनेतूनही स्पष्ट होतं (Lee, 1973). मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, प्रेमामध्ये खालील मूलभूत घटक आढळतात:

  • आकर्षण (attraction) – जैविक पातळीवरची ओढ
  • परानुभूती (empathy) – दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता
  • काळजी (care) – दुसऱ्याच्या हितासाठी कृती करण्याची भावना
  • एकात्मता (intimacy) – मानसिक आणि भावनिक जवळीक
  • बांधिलकी (commitment) – नात्यात दीर्घकालीन गुंतवणूक

प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीशी संबंधित भावना नसून, ती attitude of goodwill असते, जी व्यक्तीच्या वर्तनात, निर्णयांमध्ये आणि परस्पर संबंधांमध्ये प्रतिबिंबित होते. प्रेम ही अशी जीवनशैली आहे जी स्वतःपेक्षा मोठ्या मूल्यांशी माणसाला जोडते जसे की कुटुंब, समाज, धर्म, तत्त्वज्ञान, किंवा मानवतेची सार्वत्रिक भावना.

प्रेमाचे प्रकार

      मानसशास्त्रज्ञ जॉन अ‍ॅलन ली (John Alan Lee) यांनी प्रेमाच्या विविध स्वरूपांचा अभ्यास करून त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण छाननी केली आणि "Colors of Love" (1973) या प्रसिद्ध ग्रंथामध्ये प्रेमाचे सहा प्रमुख प्रकार मांडले. या प्रकारांमध्ये प्रत्येक प्रकाराची स्वतःची अनोखी वैशिष्ट्यं, भावनिक खोली आणि सामाजिक परिप्रेक्ष्य असतो. Lee यांच्या मते, प्रेम हे केवळ एका प्रकाराचं नसून विविध भावनिक छटा असलेलं एक बहुपरिमिती संकल्पनात्मक रसायन आहे.

1. Eros (एरोस) शारीरिक आकर्षण व सौंदर्यप्रधान प्रेम

Eros हा प्रकार प्राचीन ग्रीक संकल्पनेवर आधारित आहे आणि तो शारीरिक आकर्षणावर आधारित उत्कट प्रेमाचे प्रतिनिधित्व करतो. हे प्रेम सौंदर्य, आकर्षण, आणि कामुकतेवर आधारित असते. या प्रकारच्या प्रेमात प्रेमी आपल्या जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक सौंदर्यावर भाळलेले असतात. या प्रेमात सहज आकर्षण, प्रणयाची तीव्र भावना, आणि जवळीक साधण्याची प्रबळ इच्छा असते (Lee, 1973). या प्रेम प्रकारात लवकर प्रेमात पडणे आणि उत्कटतेने व्यक्त होणे आढळते. मात्र, हे प्रेम जर केवळ शारीरिक आकर्षणावर आधारित असेल, तर ते तितक्याच लवकर विरूनही जाऊ शकते.

2. Ludus (लुडस) खेळकर आणि हलक्याफुलकं प्रेम

Ludus म्हणजे खेळ, या प्रकारात प्रेम म्हणजे एक खेळ, मजा, किंवा करमणूक असते. Ludic प्रेमी हे बहुधा गंभीर बांधिलकीपासून दूर राहतात आणि प्रेमाच्या विविध शक्यतांचा अनुभव घेण्याची मानसिकता ठेवतात. यामध्ये बहुधा एकाच वेळी अनेक जोडीदारांसोबत संबंध ठेवण्याची प्रवृत्ती दिसते. या प्रकारात प्रेम अधिकतर अल्पकालीन, सामाजिक मान्यता नसलेले किंवा प्रेमात स्थैर्य नसलेले असते. मात्र, हे प्रेम आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने नसते, तर 'मजा' या तत्त्वावर आधारित असते (Hendrick & Hendrick, 1986).

3. Storge (स्टॉर्ग) मैत्रीवर आधारित प्रेम

Storge म्हणजे स्नेहपूर्ण, स्थिर आणि सखोल मैत्रीवर आधारित प्रेम. हे प्रेम कुटुंब किंवा जिवलग मित्रांमधून हळूहळू विकसित होतं. या प्रकारात शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक सखोलता, विश्वास, आणि परस्पर समज अधिक महत्त्वाचे असतात. Storgic प्रेम अत्यंत स्थिर असते आणि या प्रेमात दोन व्यक्तींमधील सुसंवाद, सवयी, आणि सहजीवन फार महत्त्वाचे ठरतात. विवाहपूर्व मैत्रीवर आधारित नातेसंबंध हे बहुतांश वेळा याच प्रकारांत मोडतात (Lee, 1973; Fehr, 1993).

4. Pragma (प्रॅग्मा) व्यवहारिक प्रेम

Pragma हे प्रेमाचं रूप अत्यंत यथार्थवादी आणि व्यवहारिक असतं. या प्रेमात भावनांच्या जोडीला जीवनशैली, सामाजिक स्थिती, धर्म, शिक्षण, आर्थिक क्षमता, कौटुंबिक मूल्यं अशा घटकांचा विचार केला जातो. Pragmatic प्रेमी आपल्या भावनांपेक्षा भविष्याचा, स्थैर्याचा, आणि सामाजिक अनुकूलतेचा अधिक विचार करतात. अनेकदा अरेंज्ड मॅरेज (विवाह जिथे प्रेमाचा उगम विवाहानंतर होतो) याच प्रकारात मोडतो. (Sprecher & Regan, 2002).

5. Mania (मेनिया) अतिशय उत्कट व अस्थिर प्रेम

Mania हा प्रकार अत्यंत उत्कट, स्वामित्वप्रधान आणि असुरक्षित प्रेमाचे रूप आहे. या प्रेमात प्रेमी प्रचंड हळवे, अस्थिर आणि संवेदनशील असतात. त्यांना आपल्या जोडीदाराची तीव्र गरज वाटते, आणि त्यांच्यावर ताबा मिळवण्याची इच्छा असते. या प्रेमात भीती, ईर्षा, आणि तणावाचे प्रमाण जास्त असते. या प्रकारातील व्यक्ती त्यांच्या जोडीदारावर भावनिकदृष्ट्या अवलंबून असतात, आणि नकार किंवा फसवणूक झाल्यास त्यांना मानसिक धक्का बसतो. (Lee, 1973; Hendrick & Hendrick, 1986).

6. Agape (अगापे) निस्वार्थ, त्यागी प्रेम

Agape म्हणजे पवित्र, त्यागी आणि निस्वार्थ प्रेम. या प्रकारात प्रेम केवळ दुसऱ्याच्या कल्याणासाठी केले जाते. यात कोणतीही अपेक्षा नसते. हे प्रेम दैवी, आध्यात्मिक आणि अतीव परानुभूतीवर आधारित असते. Agapic प्रेम हे आई-वडिलांचं मुलांप्रती प्रेम, मानवतेप्रती असलेली सेवा वृत्ती, किंवा ईश्वरभक्ती अशा स्वरूपात दिसू शकते. हा प्रकार अत्यंत विरळ असतो आणि पूर्णतः "स्वतःला विसरून" दुसऱ्याच्या हितासाठी झटणं हे त्याचं मुख्य लक्षण असतं (Lee, 1973; Fehr & Russell, 1991).

जॉन अ‍ॅलन ली यांची ही "प्रेमाच्या रंगांची" संकल्पना (Colours of Love Theory) आपल्याला प्रेमाच्या विविध छटांचा मानसशास्त्रीय आणि सामाजिक पातळीवर सखोल अभ्यास करण्याची संधी देते. प्रत्येक प्रेमप्रकारात एक विशिष्ट मानसिक वृत्ती, व्यवहारशैली, आणि नात्याची जडणघडण अंतर्भूत असते. हे प्रकार परस्परविलग नसून अनेक वेळा एकमेकांमध्ये मिसळूनही दिसतात, आणि त्यामुळे प्रत्येक नातं अनोखं व गुंतागुंतीचं ठरतं.

प्रेमाचे मानसशास्त्र (Psychology of Love)

प्रेम ही मानवी भावना जितकी खोल, गुंतागुंतीची आणि बहुआयामी आहे, तितकीच ती मेंदूतील विशिष्ट न्यूरोकेमिकल्स आणि जैविक प्रक्रियांच्या प्रभावामुळे घडते. प्रेमाचा अनुभव हा मेंदूत विविध रासायनिक संदेशवाहकांच्या (neurotransmitters and hormones) समन्वयातून निर्माण होतो. हे रसायने प्रेमाच्या विविध अवस्थांमध्ये विशिष्ट प्रकारे कार्य करतात, ज्यामुळे भावनिक, शारीरिक आणि सामाजिक पातळीवरील प्रेमाचा अनुभव जन्म घेतो.

1. डोपामिन (Dopamine): आनंद आणि प्रेरणेचा आधार

डोपामिन हे मेंदूत "अहं-पुरस्कृत बक्षीस प्रणाली" (reward system) मध्ये महत्त्वाचे न्यूरोट्रांसमीटर आहे. जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवते, तिच्या विचारात रमते, तेंव्हा मेंदू डोपामिनचे स्रवण करते. यामुळे आनंद, प्रेरणा, ऊर्जा आणि उत्साह यांचा अनुभव येतो (Aron et al., 2005). डोपामिनचं अधिक प्रमाण आपल्याला प्रेमाच्या अवस्थेत उत्साही आणि प्रेरित ठेवतं, आणि अशा व्यक्तीशी सतत संपर्कात राहण्याची इच्छा निर्माण करते.

2. ऑक्सीटोसिन (Oxytocin): विश्वास आणि भावनिक जडणघडण

ऑक्सीटोसिनला "बाँडिंग हॉर्मोन" किंवा "कडल केमिकल" (cuddle chemical) असंही म्हणतात. हे हार्मोन स्पर्श, आलिंगन, लैंगिक संबंध किंवा बाळंतपणानंतर स्तनपानादरम्यान स्रवते. ऑक्सीटोसिन माणसामधील विश्वास, सहानुभूती आणि सामाजिक संबंध (social bonding) यांना बळकट करतं (Kosfeld et al., 2005). दीर्घकालीन नात्यांमध्ये, ऑक्सीटोसिन हे दोघांमधील समजुती आणि स्नेह वाढवण्याचं काम करतं.

3. सेरोटोनिन (Serotonin): मानसिक स्थैर्य आणि प्रेमातील विचारमग्नता

सेरोटोनिन मेंदूतील मूड नियमन करणारे महत्त्वाचे न्यूरोट्रांसमीटर आहे. प्रेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अनेक संशोधनांनी असं दर्शवलं आहे की व्यक्तींच्या मेंदूत सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे त्या व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल सतत विचार करत राहतात, हे "obsessive love" या संज्ञेत सामावलेल आहे (Marazziti et al., 1999). मात्र, दीर्घकालीन नात्यांमध्ये सेरोटोनिनचं संतुलन मानसिक स्थैर्य आणि शांतता प्रदान करतं.

4. वॅसोप्रेसिन (Vasopressin): निष्ठा आणि दीर्घकालीन जोडीदाराशी जोडणी

वॅसोप्रेसिन हे आणखी एक महत्त्वाचं हार्मोन असून, ते दीर्घकालीन प्रेमसंबंधांतील निष्ठा, मालकीची भावना आणि रक्षणात्मक वृत्ती याच्याशी संबंधित आहे (Young & Wang, 2004). काही प्राण्यांवरील संशोधनांनी दाखवलं की वॅसोप्रेसिनच्या अधिक प्रमाणामुळे जोडीदाराशी दीर्घकालीन जोडलं जातं आणि त्या नात्याला सुरक्षितता लाभते. मानवी नात्यांमध्येही वॅसोप्रेसिन हे नात्याच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचं मानलं जातं.

प्रेम आणि मेंदूतील ‘रिवार्ड सिस्टम’

प्रेम अनुभवताना मेंदूतील ‘mesolimbic reward pathway’ सक्रिय होते. ही प्रणाली, विशेषतः ventral tegmental area (VTA) आणि nucleus accumbens या भागांमध्ये कार्य करते. हीच प्रणाली ड्रग अ‍ॅडिक्शन किंवा जिंकण्यासारख्या आनंददायक अनुभवांमध्येही कार्यरत असते (Fisher et al., 2006). त्यामुळे प्रेम ही एक नैसर्गिक, सृजनशील "अ‍ॅडिक्शन" असल्यासारखी भावना असते, पण ती मानवी उत्क्रांतीसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरते.

रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचा प्रेमाचा त्रिकोणी सिद्धांत (Triangular Theory of Love)

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्टर्नबर्ग (1986) यांनी प्रेमाचे एक त्रिकोणी सिद्धांत मांडले. त्यांच्या मते, कोणत्याही प्रेमाच्या नात्याचे तीन प्रमुख घटक असतात:

अ. Intimacy (एकात्मता) – ही भावनिक जवळीक, विश्वास, आणि परस्पर समजुतीची भावना असते. यामध्ये भावनिक उघडपणा (emotional disclosure) आणि जोडलेपणा (connectedness) यांचा समावेश होतो.

ब. Passion (आकर्षण/उत्कटता) – ही प्रेमातील उत्कटता, आकर्षण, शारीरिक ओढ, आणि लैंगिक ऊर्जेशी संबंधित असते. ही सहसा प्रेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तीव्रतेने अनुभवली जाते.

क. Commitment (बांधिलकी) – हा घटक नात दीर्घकाळ टिकण्यासाठी महत्त्वाच असतो. यात दोन स्तर असतात: एक निर्णय की आपण एखाद्यावर प्रेम करतो, आणि दुसरी कृती त्या नात्यात राहण्याची बांधिलकी.

स्टर्नबर्गच्या सिद्धांतानुसार या तिघांमध्ये संतुलन असेल, तर पूर्ण प्रेम (Consummate Love) निर्माण होतं, जे दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि समाधानी नात्याचं प्रतीक मानलं जातं (Sternberg, 1986).

प्रेमाच्या अभिव्यक्तीचे विविध स्तर

1. आई-वडिलांचं प्रेम – निस्वार्थ आणि रक्षणात्मक

आई-वडिलांचं प्रेम हे सर्वात आद्य व सहज (instinctive) प्रकाराचं प्रेम मानलं जातं. बालमानसशास्त्रज्ञ John Bowlby यांच्या Attachment Theory नुसार, बालकाचा आई-वडिलांशी असलेला भावनिक बंध हे त्याच्या भविष्याच्या नात्यांसाठी पाया असतो. हे प्रेम अत्यंत रक्षणात्मक, निस्वार्थ आणि सुरक्षिततेच्या भावनेने युक्त असते. आईचं प्रेम विशेषतः unconditional positive regard (Carl Rogers, 1959) चं प्रतीक मानलं जातं, जे मूल मनोवैज्ञानिकदृष्ट्या स्थिर, आत्मविश्वासी आणि भावनिकदृष्ट्या समर्थ बनवण्यास मदत करतं.

2. मैत्रीतील प्रेम – विश्वास आणि परस्पर समजुतीवर आधारित

मैत्रीमध्ये दिसणारं प्रेम हे दीर्घकालीन, स्थिर आणि पारस्परिक असतं. यात कोणताही स्वार्थ नसतो, पण भावनिक पाठिंबा, विश्वास, आणि सुसंवाद या गोष्टी अधिक असतात. Robert Sternberg यांच्या त्रिकोणी प्रेम सिद्धांतानुसार (Triangular Theory of Love), मैत्रीतील प्रेम प्रामुख्याने intimacy या घटकावर आधारित असते (Sternberg, 1986). यात शारीरिक आकर्षण नसले तरी भावनिक जवळीक आणि समजूत हे महत्त्वाचे घटक असतात.

3. रोमँटिक प्रेम – उत्कटता, आकर्षण, आणि भावनिक एकात्मता

रोमँटिक प्रेम म्हणजे उत्कट आकर्षण, भावनिक उर्मी, आणि दोघांमधील जिव्हाळा. Helen Fisher यांच्यानुसार, रोमँटिक प्रेमामागे मेंदूतील डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन यासारखी न्यूरोकेमिकल्स कार्यरत असतात, जे व्यक्तीला प्रेमात “जोडून घेणे” वाटण्याचा अनुभव देतात (Fisher et al., 2005). यामध्ये शारीरिक आकर्षणासोबत, एकमेकांशी मनःपूर्वक जोडले जाण्याची ओढही असते.

4. वैवाहिक प्रेम – काळाच्या कसोटीवर टिकणारी बांधिलकी

विवाह म्हणजे केवळ सामाजिक करार नसून, त्यामागे मानसिक, भावनिक आणि सामाजिक बांधिलकीची भावना असते. वैवाहिक प्रेम हे सुरुवातीला रोमँटिक स्वरूपाचं असू शकतं, पण नंतर ते जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर आधारित companionate love मध्ये रूपांतरित होतं. Sternberg च्या मते, यामध्ये intimacy (सखोलता) आणि commitment (बांधिलकी) हे घटक केंद्रस्थानी असतात (Sternberg, 1986). दीर्घकाळ टिकणारं नातं विश्वास, सहनशीलता, संवाद आणि सहकार्यावर आधारित असतं.

5. स्वतःवरील प्रेम – मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे अहंकार वाढवणे नव्हे, तर स्वतःला स्वीकारणे, समजून घेणे आणि मानसिकदृष्ट्या समर्थ ठेवणे. Self-compassion चा सिद्धांत मांडणाऱ्या Kristin Neff नुसार, स्वतःवर प्रेम केल्यामुळे आत्म-मूल्य वृद्धिंगत होतं, मानसिक आरोग्य सुधारतं, आणि ताण कमी होतो (Neff, 2003). अनेक मानसिक आजार — जसे की anxiety, depression — हे कमी आत्ममूल्याशी संबंधित असतात, जे स्वतःवरील प्रेम वाढवल्याने कमी होऊ शकतात.

6. मानवतेप्रती प्रेम – सामाजिक न्याय, सहानुभूती आणि सेवा यांचा मूळ

मानवतेप्रती असलेलं प्रेम म्हणजे केवळ भावनिक नव्हे तर कृतीशील प्रेम. Erich Fromm यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे की “माणसाला समजून घेण्याची, त्याची सेवा करण्याची आणि त्याच्या हक्कांसाठी लढण्याची वृत्ती हीच खरी प्रेमाची अभिव्यक्ती आहे” (Fromm, 1956). सामाजिक कार्यकर्ते, थेरपिस्ट, आणि सेवाभावी संस्था यामध्ये हे प्रेम दिसून येतं.

प्रेमातील अडचणी

  • चुकीच्या अपेक्षा: अनेकदा लोक प्रेमामध्ये अति आदर्श किंवा अवास्तव अपेक्षा ठेवतात. या अपेक्षा पूर्ण न झाल्यास निराशा, दुःख किंवा क्रोध उत्पन्न होतो. Albert Ellis यांच्या REBT नुसार, अवास्तव विश्वास प्रणाली हे अनेक मानसिक समस्यांचं मूळ असतं.
  • असुरक्षितता आणि अधिकार गाजवण्याची वृत्ती: काही नात्यांमध्ये एक भागीदार दुसऱ्यावर वर्चस्व गाजवतो, त्याचा स्वाभिमान कमी करतो, किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर बंधने टाकतो. अशा नात्यांमध्ये असुरक्षितता, संशय आणि आत्मसन्मानाच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे हे नातं toxic स्वरूपाचं होतं.
  • गैरसमज व संवादाचा अभाव: नात्यांमध्ये संवाद म्हणजे फक्त बोलणं नव्हे, तर ऐकणं, समजून घेणं, आणि प्रामाणिक असणं. संवाद नसेल, तर गैरसमज वाढतात. Marshall Rosenberg यांच्या Nonviolent Communication सिद्धांतानुसार, नात्यांतील अनेक समस्या अशा संवादाच्या अभावामुळे उद्भवतात.
  • प्रेमाच्या नावाखाली आत्मसमर्पण करणे: काही वेळा व्यक्ती प्रेमाच्या नावाखाली स्वतःचे निर्णय, गरजा आणि ओळख गमावते. हे मानसिक दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. Co-dependency हा अशा संबंधाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्ती दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःचे अस्तित्व विसरते.

प्रेमाचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू

प्रेमाच्या संकल्पना, स्वीकार, आणि अभिव्यक्ती ही संस्कृतीनुसार बदलते. भारतात प्रेम हे वैयक्तिक भावनांपेक्षा सामाजिक जबाबदाऱ्यांशी जोडलेलं असतं. पारंपरिक व्यवस्था जसे की वधू-वर सूचक (arranged marriage) किंवा जाती-धर्मानुसार नाते हे प्रेमाच्या सार्वत्रिक स्वातंत्र्यावर बंधन आणतात. या पार्श्वभूमीवर, प्रेमविवाह किंवा आंतरजातीय प्रेम अजूनही संघर्षाचे केंद्र आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीत प्रेम ही व्यक्तिस्वातंत्र्याची बाब मानली जाते, जिथे विवाहपूर्व संबंध, समलैंगिकता, आणि सहजीवन अधिक स्वीकारलेले आहेत. भारतीय समाजात अजूनही LGBTQ+ प्रेमाच्या बाबतीत सामाजिक कलंक, विरोध, आणि हिंसेच्या घटना दिसून येतात (Narrain, 2004).

समारोप:

प्रेम म्हणजे केवळ हृदयाची भावना नाही, तर ती माणूस म्हणून आपली संपूर्ण वाढ घडवणारी शक्ती आहे. प्रेम हे स्वार्थाचा त्याग करून, दुसऱ्याला स्वीकारणं शिकवतं. जिथे प्रेम आहे तिथे करुणा आहे, समजूत आहे, आणि मनुष्यत्व आहे. प्रेम एक असा दीप आहे, जो स्वतः जळूनही इतरांना उजेड देतो. म्हणूनच "प्रेम म्हणजेच जीवन" असं म्हणणं चुकीचं ठरत नाही.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Aron, A., Fisher, H., Mashek, D. J., Strong, G., Li, H., & Brown, L. L. (2005). Reward, motivation, and emotion systems associated with early-stage intense romantic love. Journal of Neurophysiology, 94(1), 327–337.

Bowlby, J. (1969). Attachment and Loss. London: Hogarth Press.

Ellis, A. (1962). Reason and Emotion in Psychotherapy.

Fehr, B. (1993). Friendship processes. Sage Publications.

Fehr, B., & Russell, J. A. (1991). The concept of love viewed from a prototype perspective. Journal of Personality and Social Psychology, 60(3), 425–438.

Fisher, H., Aron, A., & Brown, L. L. (2005). Romantic love: An fMRI study of a neural mechanism for mate choice. Journal of Comparative Neurology, 493(1), 58–62.

Frankl, V. E. (1946). Man’s Search for Meaning. Beacon Press.

Fromm, E. (1956). The Art of Loving. Harper & Row.

Gottman, J. (1994). Why Marriages Succeed or Fail.

Hatfield, E., & Rapson, R. L. (1993). Love, Sex, and Intimacy: Their Psychology, Biology, and History. HarperCollins.

Hendrick, C., & Hendrick, S. S. (1986). A theory and method of love. Journal of Personality and Social Psychology, 50(2), 392–402.

Johnson, S. M. (2004). The Practice of Emotionally Focused Couple Therapy.

Kosfeld, M., Heinrichs, M., Zak, P. J., Fischbacher, U., & Fehr, E. (2005). Oxytocin increases trust in humans. Nature, 435(7042), 673–676.

Lee, J. A. (1973). The Colors of Love: An Exploration of the Ways of Loving. New Press.

Marazziti, D., Akiskal, H. S., Rossi, A., & Cassano, G. B. (1999). Alteration of the platelet serotonin transporter in romantic love. Psychological Medicine, 29(3), 741–745.

Narrain, A. (2004). Being a Minority: Queer Citizens in India.

Neff, K. D. (2003). The development and validation of a scale to measure self-compassion. Self and Identity, 2(3), 223–250.

Rogers, C. (1959). A Theory of Therapy, Personality, and Interpersonal Relationships.

Rosenberg, M. B. (2003). Nonviolent Communication: A Language of Life.

Sprecher, S., & Regan, P. C. (2002). Liking some things (and some people) more than others: Partner preferences in romantic relationships and friendships. Journal of Social and Personal Relationships, 19(4), 463–481.

Sternberg, R. J. (1986). A triangular theory of love. Psychological Review, 93(2), 119–135.

Young, L. J., & Wang, Z. (2004). The neurobiology of pair bonding. Nature Neuroscience, 7(10), 1048–1054.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions