शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र : एक समग्र दृष्टीकोन

 

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र : एक समग्र दृष्टीकोन

सकारात्मक मानसशास्त्र ही शाखा मानवी शक्ती, सद्गुण, आनंद, समाधान आणि अर्थपूर्ण जीवन यांचा अभ्यास करते. पाश्चिमात्य जगात याचा औपचारिक विकास Martin Seligman आणि Mihaly Csikszentmihalyi यांनी 1998 नंतर केला. परंतु भारतीय परंपरेत आनंद, आत्मज्ञान, समाधी, करुणा, कर्तव्य आणि धर्म या संकल्पनांवर हजारो वर्षांपासून सखोल चिंतन झालेले आहे. त्यामुळे भारतीय सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ आयात केलेले तत्त्वज्ञान नसून आपल्या सांस्कृतिक वारशाशी सुसंगत अशी समृद्ध परंपरा आहे.

भारतीय तत्त्वज्ञान आणि सकारात्मक मानसशास्त्र

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मानसिक आरोग्य, स्व-नियमन, करुणा, समत्व आणि आत्मबोध या संकल्पना अत्यंत केंद्रस्थानी आहेत. पाश्चिमात्य सकारात्मक मानसशास्त्राचा औपचारिक विकास 20व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असला, तरी भारतीय ग्रंथ आणि साधना परंपरेत मानवी उत्कर्ष (flourishing) याविषयी सखोल विचार हजारो वर्षांपासून आढळतो. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रामधील स्थितीस्थापकत्त्व, भावनिक नियमन, अर्थपूर्ण जीवन, परहितवादी वर्तन आणि सहजगता या संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानाशी खोलवर सुसंगत दिसतात.

(अ) भगवद्गीता आणि मानसिक स्थैर्य

भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून एक गहन मानसशास्त्रीय संवाद आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला आलेली नैतिक गोंधळाची आणि भावनिक अस्थैर्याची अवस्था ही आधुनिक भाषेत अस्तित्व संघर्ष किंवा तीव्र ताण विकार म्हणून समजली जाऊ शकते. या अवस्थेत श्रीकृष्ण अर्जुनाला “स्थितप्रज्ञ” व्यक्तीचे स्वरूप सांगतात (अध्याय २). स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जी सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय या द्वंद्वात समत्व राखते आणि आसक्तीविरहित कर्तव्यकर्म करते.

समत्वं योग उच्यते” (२.४८) या श्लोकात समत्वाला योगाची व्याख्या दिली आहे. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रात हेच तत्त्व भावनिक नियमन आणि स्थितीस्थापकत्त्व म्हणून मांडले जाते. Martin Seligman यांच्या मते, प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची क्षमता (resilience) ही मानसिक आरोग्याची किल्ली आहे (Seligman, 2011). गीतेतील समत्व ही केवळ भावनांचे दमन नसून, सजग स्वीकार आणि अंतर्गत स्थैर्य आहे.

तसेच “निष्काम कर्मयोग” (२.४७) ही संकल्पना परिणामांपेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचे तत्त्व शिकवते. आधुनिक मानसशास्त्रात याचा संबंध प्रक्रिया अभिमुखता आणि आंतरिक प्रेरणेशी लावला जातो. Mihaly Csikszentmihalyi यांच्या Flow सिद्धांतानुसार, जेव्हा व्यक्ती परिणामाची चिंता न करता कार्यात पूर्ण तन्मयतेने गुंतते, तेव्हा तिला उच्च स्तराचा आनंद आणि समाधान मिळते (Csikszentmihalyi, 1990). गीतेतील कर्मयोग हीच अवस्था सूचित करतो.

याशिवाय, गीतेतील स्वधर्म ही संकल्पना जीवनातील अर्थपूर्णतेशी संबंधित आहे. आधुनिक संशोधनानुसार जीवनात अर्थ असणे हे मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन समाधानासाठी अत्यावश्यक आहे (Steger, 2009). गीतेतील धर्मपालन ही वैयक्तिक ओळख आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणारी संकल्पना आहे.

(ब) गौतम बुद्ध आणि बौद्ध मानसशास्त्र

बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवी दुःखाच्या विश्लेषणावर आधारित आहे. चार आर्यसत्यांद्वारे बुद्धांनी दुःख, त्याचे कारण (तृष्णा), त्याचा निरोध आणि अष्टांगिक मार्ग यांची मांडणी केली. ही प्रक्रिया मानसोपचारात्मक स्वरूपाची आहे. बुद्धांनी सांगितलेली “अनित्यता” आणि “अनात्म” ही संकल्पना भावनिक लवचिकता विकसित करण्यास मदत करतात.

सम्यक स्मृती (Mindfulness) ही अष्टांगिक मार्गातील एक प्रमुख कडी आहे. वर्तमान क्षणात सजगपणे आणि मूल्यनिरपेक्ष पद्धतीने लक्ष ठेवणे म्हणजे सजगता. आधुनिक काळात Jon Kabat-Zinn यांनी सजगता आधारित ताण व्यवस्थापन (MBSR) विकसित केले, तर Zindel Segal, Mark Williams आणि John Teasdale यांनी सजगता आधारित बोधनिक उपचार (MBCT) विकसित केली. संशोधनानुसार सजगता सरावामुळे तणाव, नैराश्य आणि चिंताजन्य लक्षणांमध्ये लक्षणीय घट दिसून येते (Kabat-Zinn, 2003).

बौद्ध परंपरेतील करुणा ही संकल्पना परहितवादी वर्तनाशी संबंधित आहे. करुणा-ध्यान पद्धतीमुळे सहानुभूती, सामाजिक जोडणी आणि सकारात्मक भावनांमध्ये वाढ होते (Davidson & Lutz, 2008). सकारात्मक मानसशास्त्रातील परोपकार आणि परहितवादी प्रेरणा या संकल्पनांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा मजबूत पाया आहे.

(क) पतंजली योगसूत्र आणि मानसिक आरोग्य

पतंजलींच्या योगसूत्रांची सुरुवात “योगश्चित्तवृत्ती निरोधः” या सूत्राने होते (१.२). म्हणजेच मनाच्या चंचल वृत्तींचा निरोध हा योगाचा उद्देश आहे. आधुनिक मानसशास्त्रीय भाषेत हे बोधनिक नियंत्रण आणि लक्ष केंद्रीकरणातील नियमन यांच्याशी संबंधित आहे.

अष्टांग योग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा एक समग्र व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग आहे.

  • यम-नियम: नैतिक आणि वैयक्तिक शिस्त (स्व-नियमन).
  • आसन-प्राणायाम: शारीरिक-मानसिक संतुलन (मनो-सामाजिक नियमन).
  • धारणा-ध्यान: लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता टिकवून ठेवणे.
  • समाधी: उच्चतम एकात्म अनुभव (सर्वोच्च अनुभूती).

आधुनिक संशोधनानुसार योगाभ्यासामुळे तणाव हार्मोन्स कमी होतात, पराअनुकंपी प्रणाली सक्रिय होते आणि भावनिक संतुलन सुधारते (Brown & Gerbarg, 2005). सकारात्मक मानसशास्त्रामध्ये स्व-नियमन, जीवन-कल्याण आणि उत्कर्ष या संकल्पनांशी योग थेट जोडलेला आहे.

भारतीय तत्त्वज्ञान आणि सकारात्मक मानसशास्त्र यांच्यात खोलवर तात्त्विक आणि व्यावहारिक साम्य आढळते. भगवद्गीतेमधील समत्व आणि कर्मयोग, गौतम बुद्ध यांची सजगता आणि करुणा, तसेच पतंजली यांचे चित्तवृत्ती निरोध आणि अष्टांग योग हे सर्व मानवी उत्कर्ष, आंतरिक शांती आणि सामाजिक कल्याण साधण्याचे मार्ग आहेत. सकारात्मक मानसशास्त्राच्या आधुनिक चौकटीत या भारतीय संकल्पनांचा अभ्यास केल्यास सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत, अधिक समग्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध मानसिक आरोग्य मॉडेल विकसित होऊ शकते.

PERMA मॉडेल आणि भारतीय संदर्भ

सकारात्मक मानसशास्त्राचे प्रमुख प्रवर्तक Martin Seligman यांनी 2011 मध्ये Flourish या ग्रंथात PERMA मॉडेल मांडले. या मॉडेलनुसार मानवी उत्कर्ष (flourishing) पाच घटकांवर आधारित असतो सकारात्मक भावना, Engagement, Relationships, Meaning आणि Accomplishment (Seligman, 2011). भारतीय सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानपर संदर्भात पाहता, या प्रत्येक घटकाचे मूळ भारतीय आध्यात्मिक व सामाजिक परंपरेत सापडते.

P – Positive Emotions (सकारात्मक भावना) आणि भारतीय ‘आनंद’ संकल्पना

PERMA मधील Positive Emotions म्हणजे आनंद, कृतज्ञता, प्रेम, आशा, समाधान इत्यादी भावना. सकारात्मक भावनांमुळे व्यक्तीची विचारक्षमता आणि सर्जनशीलता वाढते, असे Barbara Fredrickson यांच्या Broaden-and-Build Theory मध्ये नमूद केले आहे (Fredrickson, 2001).

भारतीय तत्त्वज्ञानात ‘आनंद’ ही संकल्पना केवळ क्षणिक सुख नसून अस्तित्वाचा गाभा मानली जाते. त्रेतरीय उपनिषदमध्ये ‘आनंदमय कोश’ ही पाच कोशांपैकी सर्वोच्च पातळी सांगितली आहे जिथे स्व-नुभवातून खरा आनंद प्राप्त होतो. भक्ती परंपरेत (उदा. वारकरी संप्रदाय) ‘भक्तीमधील आनंद’ हा सकारात्मक भावनांचा स्रोत मानला जातो. त्यामुळे भारतीय संदर्भात Positive Emotions या केवळ भावनिक प्रतिक्रियाच नसून आध्यात्मिक परिपक्वतेचे द्योतक ठरतात.

E – Engagement (संपूर्ण तन्मयता) आणि ‘Flow’ अनुभव

PERMA मधील Engagement म्हणजे एखाद्या कृतीत पूर्ण तन्मय होणे. Mihaly Csikszentmihalyi यांनी ‘Flow’ ही संकल्पना मांडली, ज्यात व्यक्ती वेळेचे भान विसरून पूर्णपणे कार्यात मग्न होते (Csikszentmihalyi, 1990).

भारतीय संदर्भात ध्यान, जप, कीर्तन, योगसाधना किंवा शास्त्रीय संगीत सादरीकरण यामध्ये Flow अनुभव सहज दिसतो. पतंजली यांच्या योगसूत्रांमध्ये ‘धारणा–ध्यान–समाधी’ ही एकाग्रतेची टप्प्याटप्प्याने वाढणारी प्रक्रिया वर्णिली आहे. ‘चित्तवृत्ती निरोध’ ही स्थिती म्हणजेच Flow शी साधर्म्य दाखवते, जिथे मन विचलित होत नाही आणि व्यक्ती पूर्णतः वर्तमानात असते. त्यामुळे भारतीय आध्यात्मिक साधना ही Engagement चा सखोल मानसशास्त्रीय अनुभव देणारी प्रक्रिया ठरते.

R – Relationships (नातेसंबंध) आणि सामूहिकता

PERMA मॉडेलनुसार अर्थपूर्ण आणि समर्थक नातेसंबंध हे उत्कर्षासाठी आवश्यक आहेत. सामाजिक आधार हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा घटक मानला जातो (Seligman, 2011).

भारतीय संस्कृतीत संयुक्त कुटुंब व्यवस्था, गुरु-शिष्य परंपरा आणि समुदायाधारित जीवनशैली यांमुळे संबंधांना केंद्रस्थानी स्थान मिळते. भगवतगीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे संवाद हे केवळ तत्त्वज्ञान नसून समर्थक मार्गदर्शनाचे उदाहरण आहे. गुरु-शिष्य नाते हे केवळ ज्ञानप्रदानाचे नसून भावनिक आणि नैतिक आधार देणारे असते. भारतीय मानसशास्त्रीय दृष्टिकोनात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना सर्व मानवजातीला एक कुटुंब मानते जी सामाजिक एकात्मतेला बळ देते.

M – Meaning (अर्थपूर्णता) आणि ‘धर्म’

Meaning म्हणजे जीवनात अर्थ आणि उद्दिष्ट असणे. सकारात्मक मानसशास्त्रात अर्थपूर्णता ही आनंदापेक्षा अधिक दीर्घकालीन समाधान देणारी घटक मानली जाते (Seligman, 2011).

भारतीय संदर्भात ‘धर्म’ ही संकल्पना व्यक्तीच्या सामाजिक आणि नैतिक कर्तव्याशी जोडलेली आहे. भगवतगीतेमध्ये ‘स्वधर्म’ पालन करण्यावर भर दिला आहे, ज्यात वैयक्तिक लाभापेक्षा व्यापक सामाजिक हिताला प्राधान्य दिले जाते. बौद्ध तत्त्वज्ञानात ‘अष्टांगिक मार्ग’ आणि करुणा हे अर्थपूर्ण जीवनाचे आधार आहेत. त्यामुळे भारतीय परंपरेत Meaning ही संकल्पना केवळ वैयक्तिक ध्येय नसून समाजहिताशी निगडित असते.

A – Accomplishment (सिद्धी), स्व-उत्कर्ष आणि मोक्ष

PERMA मधील Accomplishment म्हणजे ध्येयपूर्ती आणि वैयक्तिक प्रगती. पाश्चिमात्य मानसशास्त्रात याचा संबंध self-efficacy (Bandura, 1997) आणि achievement motivation शी जोडला जातो.

      भारतीय तत्त्वज्ञानात अंतिम सिद्धी म्हणजे ‘मोक्ष’ म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. ही केवळ बाह्य यशाची गोष्ट नसून आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया आहे. Abraham Maslow यांनी आत्म-वास्तविकीकरणाची संकल्पना मांडली; त्यांच्या नंतरच्या लिखाणात त्यांनी स्वत्त्वाच्या पलिकडे (self-transcendence) ही उच्च पातळी सुचवली. भारतीय परंपरेतील मोक्ष ही self-transcendence शी साम्य दर्शवते जिथे व्यक्ती स्वतःच्या सीमांपलीकडे जाऊन व्यापक अस्तित्वाशी एकरूप होते.

PERMA मॉडेलचे पाच घटक भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत खोलवर रुजलेले आहेत. Positive Emotions मध्ये ‘आनंद’, Engagement मध्ये ‘ध्यान–समाधी’, Relationships मध्ये ‘सामूहिकता’, Meaning मध्ये ‘धर्म’, आणि Accomplishment मध्ये ‘मोक्ष’ या संकल्पना आढळतात. त्यामुळे भारतीय संदर्भात सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ वैयक्तिक आनंदाचा अभ्यास नसून वैयक्तिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कर्षाचा समन्वय साधणारे व्यापक तत्त्वज्ञान ठरते.

भारतीय संस्कृतीतील सकारात्मक गुण

भारतीय संस्कृतीत सकारात्मक गुणांची संकल्पना केवळ नैतिक शिकवण म्हणून नाही, तर व्यक्तीच्या मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कर्षाचा मूलाधार म्हणून मांडली गेली आहे. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्र मानवी शक्ती, सद्गुण आणि अर्थपूर्ण जीवन यांचा अभ्यास करते; परंतु भारतीय तत्त्वज्ञानात हे विचार हजारो वर्षांपासून आचरणात आहेत. करुणा, संयम, श्रद्धा आणि कृतज्ञता हे चार गुण भारतीय संदर्भ आणि आधुनिक मानसशास्त्रीय अर्थ सविस्तर पाहू.

1. करुणा (Compassion) : बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञान

करुणा ही भारतीय तत्त्वज्ञानातील अत्यंत मूलभूत संकल्पना आहे. गौतम बुद्ध यांनी ‘करुणा’ आणि ‘मैत्री’ यांना आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक गुण मानले. बौद्ध तत्त्वज्ञानात करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव करून त्याच्या निवारणासाठी सक्रिय प्रयत्न करणे. ‘सम्यक स्मृती’ आणि ‘सम्यक संकल्प’ यांच्या साहाय्याने व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाशी संवेदनशील होते. जैन तत्त्वज्ञानात महावीर यांनी ‘अहिंसा परमो धर्मः’ या तत्त्वावर भर दिला. करुणा ही केवळ मानवी संबंधापुरती मर्यादित नसून सर्व सजीवांप्रती अहिंसक दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण दिली आहे.

आधुनिक मानसशास्त्रात करुणा ही परानुभूती आणि परहितवादी वर्तन यांच्याशी संबंधित आहे. संशोधनानुसार (Goetz, Keltner & Simon-Thomas, 2010), करुणा व्यक्तीमध्ये सामाजिक बांधिलकी वाढवते, तणाव कमी करते आणि भावनिक आरोग्य सुधारते. करुणा-आधारित उपचारपद्धती आज नैराश्य आणि अपराधभाव कमी करण्यासाठी वापरल्या जातात (Gilbert, 2009). त्यामुळे भारतीय परंपरेतील करुणा ही केवळ आध्यात्मिक संकल्पना नसून मानसिक आरोग्य वृद्धिंगत करणारा एक वैज्ञानिक घटक आहे.

2. संयम (Self-Regulation) : योग आणि तप

संयम म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांवर सजग नियंत्रण ठेवण्याची क्षमता. पतंजली यांच्या योगसूत्रांमध्ये “चित्तवृत्ती निरोध” ही संकल्पना संयमाचे सर्वोच्च रूप मानली जाते. अष्टांग योगातील यम आणि नियम हे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या नैतिक शिस्तीचे आधारस्तंभ आहेत. हे गुण आत्मसंयम विकसित करतात. ‘तप’ म्हणजे स्वेच्छेने शारीरिक किंवा मानसिक शिस्त पाळणे. भारतीय ऋषीपरंपरेत तप ही आत्मशुद्धीची प्रक्रिया मानली गेली आहे.

आधुनिक मानसशास्त्रात संयमाला Self-Regulation किंवा Executive Control म्हणतात. Baumeister (2007) यांच्या संशोधनानुसार आत्मसंयम ही जीवनातील यश, आरोग्य आणि समाधान यांची भविष्यवाणी करणारी महत्त्वाची क्षमता आहे. ध्यान आणि योगाभ्यासामुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची कार्यक्षमता वाढते (Tang, Hölzel & Posner, 2015), ज्यामुळे भावनांवर नियंत्रण आणि निर्णयक्षमता सुधारते. यामुळे भारतीय योगपरंपरेतील संयम ही आधुनिक न्यूरोसायन्सशी सुसंगत ठरते.

3. श्रद्धा (Hope & Optimism) : भक्ती परंपरा

भारतीय भक्तीपरंपरेत श्रद्धा हा केवळ धार्मिक विश्वास नसून जीवनातील संकटांवर मात करण्याची अंतर्गत शक्ती आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मीराबाई यांसारख्या संतांनी भक्तीमार्फत आशावाद आणि समर्पण यांचा संदेश दिला. श्रद्धा व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य देते.

मानसशास्त्रात श्रद्धा ही Hope (Snyder, 2002) आणि Optimism (Scheier & Carver, 1985) यांच्याशी संबंधित आहे. आशावादी व्यक्ती संकटांवर उपाय शोधण्यास अधिक सक्षम असतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक श्रद्धेमुळे तणाव कमी होतो आणि जीवनात अर्थाची अनुभूती वाढते (Pargament, 1997). सकारात्मक मानसशास्त्रात श्रद्धेला coping mechanism म्हणून पाहिले जाते. भारतीय संदर्भात ही श्रद्धा वैयक्तिक नव्हे तर सामूहिक असते जसे कीर्तन, भजन, वारकरी परंपरा यांमधून सामाजिक एकात्मता आणि मानसिक स्थैर्य निर्माण होते.

4. कृतज्ञता (Gratitude) : प्रार्थना आणि नमस्कार

भारतीय संस्कृतीत ‘नमस्ते’ किंवा ‘प्रणाम’ ही कृती कृतज्ञतेचे प्रतीक आहे. गुरु, पालक, निसर्ग आणि देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही दैनंदिन संस्कारप्रक्रियेचा भाग आहे. प्रार्थनेत “जे मिळाले त्याबद्दल आभार” हा भाव असतो.

आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रात कृतज्ञतेवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. Robert Emmons आणि McCullough (2003) यांच्या अभ्यासानुसार कृतज्ञता सराव केल्याने आनंद, समाधान आणि शारीरिक आरोग्य सुधारते. कृतज्ञता नैराश्याची लक्षणे कमी करते आणि सामाजिक संबंध दृढ करते. भारतीय परंपरेतील कृतज्ञता ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून जीवनशैली आहे, ‘ऋणानुबंध’ ही संकल्पना सांगते की प्रत्येक नातेसंबंधात परस्पर देणं-घेणं असतं.

भारतीय संदर्भातील सकारात्मक गुणांची वैशिष्ट्ये अशी की ते वैयक्तिक उत्कर्षाबरोबरच सामूहिक कल्याणावर भर देतात. त्यामुळे भारतीय सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ वैयक्तिक आनंदाचा अभ्यास नसून व्यक्ती, समाज आणि आध्यात्मिक मूल्यांचा समन्वय साधणारा समग्र दृष्टिकोन आहे.

भारतीय सकारात्मक मानसशास्त्राचे व्यावहारिक उपयोग

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ सैद्धांतिक चिंतन नसून ते जीवनपद्धती, शिक्षण, उपचारपद्धती आणि कार्यसंस्कृतीमध्ये प्रत्यक्ष वापरता येणारे तत्त्वज्ञान आहे. भारतीय परंपरेतील योग, ध्यान, धर्म, कर्तव्य, करुणा आणि कृतज्ञता या संकल्पना आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रातील जीवन-कल्याण, स्थितीस्थापकत्त्व, अर्थपूर्ण जीवन, संपूर्ण तन्मयता आणि नैतिक प्रगल्भता यांच्याशी सुसंगत आहेत (Seligman, 2011).

(अ) विद्यार्थ्यांमध्ये ध्यान, योग आणि कृतज्ञता लेखन

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर योग व ध्यानाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत, भावनिक संतुलनात आणि तणाव व्यवस्थापनात सकारात्मक बदल दिसून येतात. Patanjali यांच्या योगसूत्रांमध्ये ‘चित्तवृत्ती निरोध’ ही संकल्पना सांगितली आहे, जी आधुनिक मानसशास्त्रात अवधान नियमन आणि भावनिक नियंत्रणाशी संबंधित आहे. संशोधनानुसार mindfulness-आधारित हस्तक्षेप विद्यार्थ्यांच्या चिंता आणि अवसादाच्या लक्षणांमध्ये घट घडवतात (Kabat-Zinn, 2003; Davidson et al., 2003).

कृतज्ञता लेखन ही सकारात्मक मानसशास्त्रातील प्रभावी पद्धत आहे. विद्यार्थ्यांनी दररोज तीन कृतज्ञतेच्या गोष्टी लिहिल्यास त्यांच्या आशावादात आणि जीवन-समाधानात वाढ होते (Emmons & McCullough, 2003). भारतीय संस्कृतीतील “प्रार्थना”, “नमस्कार” आणि “ऋणानुबंध” या संकल्पना कृतज्ञतेचे सामाजिक-आध्यात्मिक रूप दर्शवतात.

(ब) नैतिक शिक्षण आणि मूल्याधारित अभ्यासक्रम

भारतीय शिक्षणपद्धतीत ‘सद्गुण’ आणि ‘धर्म’ यांना महत्त्व आहे. भगवतगीतेमध्ये वर्णिलेली ‘स्थितप्रज्ञ’ व्यक्ती म्हणजे भावनिक स्थैर्य आणि नैतिक प्रगल्भता असलेली व्यक्ती. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रात Peterson & Seligman (2004) यांनी नैतिक प्रगल्भता आणि सद्गुण यांचा अभ्यास केला आहे. भारतीय मूल्यशिक्षणात करुणा, सत्य, अहिंसा, संयम आणि सेवा या सद्गुणांचा विकास केला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परहीताय वर्तन आणि सामाजिक जबाबदारी वाढते.

(क) Mindfulness आधारित उपचार

MBSR आणि MBCT या उपचारपद्धतींची मुळे बौद्ध तत्त्वज्ञानात आहेत. गौतम बुद्ध यांनी ‘सम्यक स्मृती’ ही संकल्पना मांडली. आज mindfulness उपचार चिंता, अवसाद आणि दीर्घकालीन ताणामध्ये प्रभावी ठरतात (Segal, Williams & Teasdale, 2002).

भारतीय सकारात्मक मानसशास्त्रात mindfulness म्हणजे वर्तमानात सजगपणे आणि निरपेक्षपणे अनुभव स्वीकारणे. हे व्यक्तीच्या आत्मजागरूकतेत (self-awareness) वाढ करते आणि भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.

(ड) आध्यात्मिक समुपदेशन (Spiritual Counselling)

भारतीय समाजात अध्यात्म ही मानसिक आरोग्याशी निगडित संकल्पना आहे. आध्यात्मिक समुपदेशनात व्यक्तीच्या अस्तित्वविषयक प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. Viktor Frankl यांच्या Logotherapy प्रमाणेच भारतीय तत्त्वज्ञानात जीवनातील अर्थ हा मानसिक आरोग्याचा मुख्य आधार मानला जातो.

Anand Paranjpe यांनी भारतीय मानसशास्त्रात ‘आत्मा’ आणि ‘सामूहिक ओळख’ यांचा अभ्यास करून दाखवले की भारतीय व्यक्तिमत्त्व अधिक उचित आणि संदर्भाधिन संवेदनशीलता असते (Paranjpe, 1998). त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेत आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक मूल्ये समाविष्ट करणे उपयुक्त ठरते.

(इ) कर्मयोगाची संकल्पना

भगवतगीतेमध्ये परिणामांवर आसक्ती न ठेवता कर्तव्य पार पाडणे असा ‘निष्काम कर्मयोग’ सांगितला. कार्यक्षेत्रात ही संकल्पना intrinsic motivation शी संबंधित आहे (Deci & Ryan, 2000). कर्मयोगामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कमी होतो आणि कार्यसंतोष वाढतो, कारण अवधान प्रक्रियेवर आणि गुणवत्तेवर केंद्रित राहते.

(फ) ताण-तणाव व्यवस्थापनासाठी योग आणि ध्यान

आधुनिक कॉर्पोरेट जगात burnout ही मोठी समस्या आहे. योग आणि ध्यान कार्यक्रमांमुळे कर्टीसोल पातळी कमी होते आणि भावनिक स्थैर्य वाढते (Brown & Ryan, 2003). भारतीय सकारात्मक मानसशास्त्रात काम आणि अध्यात्म यांचे संतुलन साधण्यावर भर दिला जातो यामुळे नोकरी-जीवन सुधारतो.

संशोधन आणि आधुनिक भारतीय मानसशास्त्रज्ञ

भारतात सकारात्मक मानसशास्त्र आणि सांस्कृतिक मानसशास्त्र यावर काम करणारे काही महत्त्वाचे अभ्यासक पुढीलप्रमाणे आहेत:

Giridhar Prasad Thakur – भारतीय मानसशास्त्राच्या संकल्पनांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक संदर्भातील व्यक्तिमत्त्व विकासावर प्रकाश टाकला आहे.

Anand Paranjpe – त्यांच्या Self and Identity in Modern Psychology and Indian Thought या ग्रंथात पाश्चिमात्य ‘individual self’ आणि भारतीय ‘relational self’ यातील फरक स्पष्ट केला आहे (Paranjpe, 1998).

K. Ramakrishna Rao – चेतना, योग आणि भारतीय मानसशास्त्र यांचा संगम साधणारे संशोधक. त्यांनी भारतीय मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

भारतीय आणि पाश्चिमात्य सकारात्मक मानसशास्त्रातील फरक

पाश्चिमात्य सकारात्मक मानसशास्त्रात self-esteem आणि personal achievement यांना महत्त्व दिले जाते (Seligman, 2011). भारतीय दृष्टीकोनात मात्र ‘आत्मा’ आणि ‘समत्व’ यावर भर दिला जातो. Mihaly Csikszentmihalyi यांनी मांडलेली Flow संकल्पना भारतीय ध्यान-समाधी अनुभवाशी साधर्म्य दाखवते.

भारतीय विचारसरणीत आनंद हा केवळ सुखाचा (hedonia) अनुभव नसून आत्मज्ञान (moksha) आणि अंतःशांतीचा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय सकारात्मक मानसशास्त्र अधिक आध्यात्मिक, सामूहिक आणि नैतिक परिमाणांवर आधारित आहे.

समारोप

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ आनंद वाढवण्याचे तंत्र नाही, तर जीवनाला अर्थ, समत्व आणि आध्यात्मिक परिपूर्णता देणारी समग्र प्रक्रिया आहे. पाश्चिमात्य PERMA मॉडेल आणि भारतीय योग-धर्म परंपरा यांचा संगम केल्यास मानसिक आरोग्याचा अधिक व्यापक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत आराखडा तयार होऊ शकतो. आजच्या तणावग्रस्त, स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात भारतीय सकारात्मक मानसशास्त्र आपल्याला सांगते-

“आनंद हा बाहेर शोधण्याचा विषय नाही; तो अंतर्मनाच्या शिस्तीत आणि समत्वात सापडतो.”

संदर्भ

Bandura, A. (1997). Self-efficacy: The exercise of control. W. H. Freeman.

Baumeister, R. F. (2007). Self-regulation and ego depletion. In R. F. Baumeister & K. D. Vohs (Eds.), Handbook of self-regulation: Research, theory, and applications (pp. 42–61). Guilford Press.

Brown, K. W., & Ryan, R. M. (2003). The benefits of being present: Mindfulness and its role in psychological well-being. Journal of Personality and Social Psychology, 84(4), 822–848.

Brown, R. P., & Gerbarg, P. L. (2005). Sudarshan Kriya yogic breathing in the treatment of stress, anxiety, and depression: Part I Neurophysiologic model. Journal of Alternative and Complementary Medicine, 11(1), 189–201.

Csikszentmihalyi, M. (1990). Flow: The psychology of optimal experience. Harper & Row.

Davidson, R. J., & Lutz, A. (2008). Buddha’s brain: Neuroplasticity and meditation. IEEE Signal Processing Magazine, 25(1), 176–174.

Davidson, R. J., Kabat-Zinn, J., Schumacher, J., et al. (2003). Alterations in brain and immune function produced by mindfulness meditation. Psychosomatic Medicine, 65(4), 564–570.

Deci, E. L., & Ryan, R. M. (2000). The “what” and “why” of goal pursuits: Human needs and the self-determination of behavior. Psychological Inquiry, 11(4), 227–268.

Emmons, R. A., & McCullough, M. E. (2003). Counting blessings versus burdens: An experimental investigation of gratitude and subjective well-being in daily life. Journal of Personality and Social Psychology, 84(2), 377–389.

Fredrickson, B. L. (2001). The role of positive emotions in positive psychology: The broaden-and-build theory of positive emotions. American Psychologist, 56(3), 218–226.

Gilbert, P. (2009). The compassionate mind. New Harbinger Publications.

Goetz, J. L., Keltner, D., & Simon-Thomas, E. (2010). Compassion: An evolutionary analysis and empirical review. Psychological Bulletin, 136(3), 351–374.

Kabat-Zinn, J. (2003). Mindfulness-based interventions in context: Past, present, and future. Clinical Psychology: Science and Practice, 10(2), 144–156.

Maslow, A. H. (1971). The farther reaches of human nature. Viking Press.

Paranjpe, A. C. (1998). Self and identity in modern psychology and Indian thought. Springer.

Pargament, K. I. (1997). The psychology of religion and coping: Theory, research, practice. Guilford Press.

Peterson, C., & Seligman, M. E. P. (2004). Character strengths and virtues: A handbook and classification. Oxford University Press.

Segal, Z. V., Williams, J. M. G., & Teasdale, J. D. (2002). Mindfulness-based cognitive therapy for depression: A new approach to preventing relapse. Guilford Press.

Seligman, M. E. P. (2011). Flourish: A visionary new understanding of happiness and well-being. Free Press.

Snyder, C. R. (2002). Hope theory: Rainbows in the mind. Psychological Inquiry, 13(4), 249–275.

Steger, M. F. (2009). Meaning in life. Journal of Positive Psychology, 4(5), 381–383.

Tang, Y. Y., Hölzel, B. K., & Posner, M. I. (2015). The neuroscience of mindfulness meditation. Nature Reviews Neuroscience, 16(4), 213–225.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

NEP-2020 आणि मूल्यमापन

  NEP- 2020 आणि मूल्यमापन (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) भारत सरकारने जाहीर केलेली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ( NEP- 2020) ही ...