सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

जगणं मात्र राहून गेलं | Top five regrets of the dying

 

जगणं मात्र राहून गेलं | Top five regrets of the dying

मरण्यापूर्वी व्यक्तीचा जीवन प्रवास हा फ्लॅशबॅक सारखा निघून जातो. जरा विचार करा की हा फ्लॅशबॅक जर पश्चातापाने भरलेला असेल तर तो किती वेदनादायी असेल. काश मी काही बदल करू शकलो असतो तर......... प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात. त्यापैकी काही लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, तर काही लोकांच्या इच्छा या अपूर्णच राहतात. पण बहुतांश व्यक्तीची मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा काय आहे हे विचारले जाते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार ती गोष्ट आपल्या जवळच्या लोकांना सांगत असते. पण एका परिचारिकेने मृत्यूबद्दल सर्वसामान्य असे पश्चात्ताप नोंदविलेले आहेत. ब्रॉनी वेअर ही एक ऑस्ट्रेलियन परिचारिका आहे जिने अनेक वर्षे उपशामक काळजी विभागामध्ये रुग्णांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये त्यांची काळजी घेण्याचे काम केले. उपशामक काळजी विभागात रोगाची तीव्रता किंवा वेदना कमी करण्याचे काम केले जाते. तिने इन्स्पिरेशन आणि चाई नावाच्या ब्लॉगवर रुग्णांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांच्याकडून ऐकलेला दिव्यत्वाचा किंवा अलौकिक अस्तित्वाचा साक्षात्कार प्रकट केला, या लेखन प्रपंचाने इतके लक्ष वेधले की तिने तिची निरीक्षणे द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग (2012) नावाच्या पुस्तकात नोंदविलेली आहेत.

      ब्रॉनी वेअर यांनी रुग्णांच्या शेवटच्या आयुष्यातील प्राप्त झालेली दृष्टी अभूतपूर्व स्पष्ट केल्याबद्दल आणि त्यांच्या शहाणपणापासून आपण काय आणि कसे शिकू शकतो याबद्दल लिहिलेले आहे. जेव्हा रुग्णांना कोणत्याही पश्चात्तापाबद्दल किंवा आपले जीवन वेगळ्या पद्धतीने जगण्याबद्दल विचारले असता, त्यांनी दिलेल्या माहितीमधून काही सर्वसामान्य कल्पना पुन्हा पुन्हा समोर आल्या. सदर निरीक्षणे नोंदवत असताना प्रत्येक रुग्ण वेगळा होता पण त्यांच्या पश्चातापामध्ये एकसमानता दिसून आली त्यातूनच ब्रॉनी वेअरने, मृत्यूशय्येवरील रुग्णांच्या प्रमुख पाच पश्चात्ताप पुढील प्रमाणे सांगितलेल्या आहेत:

1. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा, स्वत:च्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे धैर्य दाखविले असते तर...........

लोक काय म्हणतील या एका वाक्याने अनेक लोकांचे जीवन खराब केलेले आढळते. अनेक लोकामध्ये ही सर्वसामान्य खंत होती. जेव्हा लोकांना समजते की त्यांचे आयुष्य जवळजवळ संपले आहे आणि ते स्पष्टपणे मागे वळून पाहतात, तेव्हा किती स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत हे सहज लक्षात येते. बहुतेक लोकांनी त्यांच्या अर्धवट स्वप्नांचाही सन्मान केला नव्हता आणि ते त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या निवडीमुळे घडत आहे हे जाणून मरण पत्करावे लागले. असले कपडे घालून नकोस लोक काय म्हणतील... ही शाखा निवडू नकोस लोक काय म्हणतील... हा जोडीदार निवडू नकोस लोक काय म्हणतील... हे करू नकोस, ते करू नकोस लोक काय म्हणतील... यातच अनेक लोकांचे खरे जगणे राहून जाते. पण 3 इडीयटस मधील फरहान सारखी हिम्मत करून एकदा बोलून तर बघा; आपलं मन हलक होईल. चांगल्या आरोग्यामुळे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळते हे फार कमी लोकांना जाणवले होते,  हे जेंव्हा कळले तोपर्यंत त्यांचे आरोग्य त्यांच्या हातून निसटून गेलेलं होत. यावरून खालील चार ओळी अलगद ओठावर येतात.

आज उद्या म्हणता म्हणता

खूप काही करायचं राहून गेलं

आयुष्य निसटलं हातून

मात्र जगायचं राहून गेलं......

2. मला असे वाटते की मी इतके कठोर परिश्रम केले नसते तर........

ब्रॉनी वेअरने देखभाल केलेल्या प्रत्येक पुरुष रुग्णाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे. जीवनातील कठोर परिश्रमामुळे त्यांनी त्यांच्या मुलांचे बालपण, तारुण्य आणि त्यांच्या जोडीदाराचा सहवास गमावला आहे. याचा अर्थ आपण कठोर परिश्रम करू नका असे लेखिकेला म्हणायचे नाही. उलट आपल्या जीवनातील अमूल्य क्षणांना मुकावे लागेल असा करंटेपणा करू नका. महिलांही या खेदाबद्दल बोलल्या, परंतु त्या बहुतेक जुन्या पिढीतील असल्याने, बऱ्याच महिला रुग्णांना पैशाची कमतरता होती. ज्या पुरुषांची मी काळजी घेतली त्या सर्व पुरुषांना त्यांचे संपूर्ण आयुष्य काम आणि अस्तित्वाच्या ट्रेडमिलवर घालवल्याबद्दल अंत्यतिक पश्चाताप वाटत होते. जर त्यांची ही खंत शब्दबद्ध केल्यास खालील ओळी उमटतील.......

दूर गेलेल्या सा-यांनाच एकत्र गोळा करायचं राहून गेलं

हरवलेल्या आठवणींची छान मैफिल जमवायच राहून गेलं

दु:ख सारी विसरून आनंदाने नाचायचं राहून गेलं

स्वप्न सारी एकत्र करून जीवन जगायचं राहून गेलं.........

3. मला मा‍झ्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळाले असते तर............

अनेक रुग्णांनी इतरांसोबत शांततापूर्वक जीवन जगण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून टाकल्या. परिणामी, ते इतरांच्या अस्तित्वासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले आणि ते जे बनण्यास सक्षम होते ते कधीही बनले नाहीत. जे आहे ते रोखठोक पण इतरांना न दुखावता व्यक्त केले असते तर बरे झाले असते अशी खंत राहून गेली. परिणामी त्यांच्यामध्ये कटुता आणि रागाशी संबंधित अनेक आजार जडले. राग तुम्हाला लढा-किंवा-पळा स्थितीमध्ये आणतो, ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादात असंख्य बदल होतात. ते बदल नंतर नैराश्य, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढवतात. त्यामुळे योग्य शब्दात, योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला शिका नाहीतर जीवनाच्या शेवटी  आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खालील ओळी गुनगुनाव्या लागतील............

सगेसोयरे सांभाळताना

मनातील आस विरून गेले 

आयुष्याच्या अंती मागे पाहताना

आपले खरे जगणेच राहून गेले….........

4. मी मा‍झ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर..........

खरा मित्र अडचणीत योग्य वाट दाखवतो, सुखात आनंदी होतो, दुःखात गहिवरून जातो, वेळ प्रसंगी खंबीर होऊन साथ देतो, ढासळताना तोल सावरतो, अडखळताना पावलांना बळ देतो, आपल्या आनंदाच्या क्षणात हाच भारावून जातो. अनेकांना खऱ्या मित्रांचे फायदे त्यांच्या मृत्यूच्या आठवड्यांपर्यंत कळले नाहीत आणि त्यांचा मागोवा घेणे नेहमीच शक्य नव्हते. अनेकजण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके अडकले होते की त्यांनी मैत्रीचे सोनेरी क्षण वर्षानुवर्षे निसटू दिली होती. मैत्रीला त्यांनी योग्य वेळ आणि मेहनत न केल्याने खूप खेद वाटत होता. प्रत्येकजण मरत असताना आपल्या मित्रांना खूप मिस करत होते. जर त्या रुग्णांना आपल्या मित्रा बद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली असती तर............

जो आपल्या प्रत्येक क्षणाचा सोबती असतो,

आपल्या प्रत्येक भल्याबुऱ्या कर्माचा साथी असतो

आयुष्यातील सगळे गुण दुर्गुण निभावुन नेईल

अशा खऱ्या मित्रासोबत जगायचे राहून गेले ...........

5. मला असे वाटते की मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिले असते तर..........

हे सर्वसामान्यपणे सर्व रुग्णांमध्ये आश्चर्यकारकपणे आढळून आलेले सत्य आहे. अनेकांना शेवटपर्यंत कळले नाही की आनंद ही एक निवड आहे. अनेकजण जुन्या रूढी परंपरा आणि सवयींमध्ये अडकलेले होते. नेहमीचा तथाकथित 'आराम' त्यांच्या भावनांमध्ये, तसेच त्यांच्या भौतिक जीवनात ओसंडून वाहत होता. बदलाच्या भीतीने ते इतरांसमोर आणि स्वतःशीदेखील असे ढोंग करत होते की ते समाधानी आहेत, जेव्हा त्यांनी स्वतःशी सुसंवाद साधला तेंव्हा त्यांना असे लक्षात आले की आपण मनमुराद कधी हसलो होतो? एखादा उनाड दिवस स्वतःसाठी जगलो होतो? आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं फारच अवघड झालंय. तरीही दिवसभर काम केल्यावर थोडासा विरंगुळा म्हणून आपण आपले छंद जोपासायचे प्रयत्न करतोच ना. मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून जर आणखी एखादा बंगला बांधला असता, जमीन जुमला घेतला असता, नवीन दागिने घेतले असते असे शब्द आपण ऐकलेत का? तर याचे उत्तर शक्यतो नाही असेच असेल. कारण मृत्युसमयी भौतिक गोष्टीपेक्षा आपल्या आसपास असणाऱ्या, आपण करू शकलो नाही अशाच गोष्टींचा पश्चाताप केला जातो.    आनंदाची व्याख्या करण तसं जिकिरीच काम आहे, पण एका कवीने आपला जीवनपट खालील काही ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

डोळ्यात दाटून भावना सारे मलाच पाहत होते

कितीतरी ओळखी अनोळखी चेहरे त्यात होते

कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेल

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

आयुष्यात नागमोडी वळणाना मी खुपदा पाहील होत

जे क्षण होते निसटले त्यांना पुन्हा जगायचं होत

शेवटच्या श्वासात डोळ्यांसमोरून जीवन सार धावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम चूर झाली

कोणी तरी म्हणाला नियती इतकी क्रूर का झाली

माझं त्यांच्यातून जान घरच्यांना घोर लावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

खोटा मान सन्मान यांना मी माझा म्हणालो

आयुष्यभर अपेक्षांचे केवळ ओझेच वाहत आलो

शेवटी खांदे पालटत लोकांनी प्रेत स्मशानापर्यंत वाहून नेलं

जळता जळता परत आठवलं जगणं आपलं राहून गेल.....

जीवन सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. अशा जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केलेल्या आहेत. आपले जीवन ही एक अनुभव सरिता आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून असतात कारण जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे. खरे म्हणजे जगण्याइतक आनंददायक असे जीवनात काहीच नाही. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की कितीही आणि कसेही जगलो  तरीही जीवन अजून जगायचे राहिले कारण खर जगण मात्र राहून गेलं...........

जीवन हा न संपणारा प्रवास आहे!

त्यामुळे जीवनात काहीही कमवा पण पश्चाताप मात्र कमवू नका.


References

Ware, Bronnie (2012). Top five regrets of the dying: A Life Transformed by the Dearly Departing, California: Hay House

वेअर, ब्रॉनी (2022). द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग (अनुवादक: नंदापुरकर-फडके, सुचिता) भोपाळ: मंजुळ पब्लीशिंग हाउस 

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...