लोक बघ्याच्या भूमिकेत का असतात?
रविवार
28 मे, 2023 रात्री नऊच्या आसपास एक मुलगा दिल्लीच्या शाहबाद डेअरीजवळ रस्त्यावर
उभा होता. अनेक लोक रस्त्यावरून ये-जा करत होते. साक्षी तयार होऊन मित्राच्या
मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडते. तेव्हा रस्त्यावर
उभा असलेला तो मुलगा साक्षीला थांबवतो. त्यानंतर त्याने एका हाताने साक्षीला पकडून
दुसऱ्या हातात चाकूने हल्ला करतो. साक्षी भिंतीजवळ पडून स्वतःला वाचवण्याचा
प्रयत्न करते. तो मुलगा पुढील दोन मिनिटात साक्षीवर चाकूने 40 हून अधिक हल्ले करतो. साक्षी रस्त्यावर पडल्यावर
तो मुलगा शेजारी पडलेल्या एका मोठ्या दगडाने तिच्यावर 6 वेळा हल्ला करतो. त्यानंतर तो साक्षीला लाथ
मारून तिथून निघून जातो. या दरम्यान विविध वयोगटातील किमान 17 लोक तेथून जातात. त्यांच्यामध्ये काही महिला होत्या, परंतु त्यापैकी कोणीही त्या मुलीला वाचवण्याचा
प्रयत्न केला नाही. फक्त सुरुवातीला एक मुलगा वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर तोही निघून जातो. सुमारे अर्धा तास
साक्षीचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.
काही
दिवसानंतर पुण्यातही अशीच घटना दिसून आली. वर्दळीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या सदाशिव
पेठेतील एका रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार
लागल्यामुळे जखमी झालेली तरुणी पळत सुटली. तरुणी धावत असल्याचे बघून तिचा पाठलाग करून
तो तरुण वारंवार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला अनेकांनी
बघ्याची भूमिका घेतली होती. पण एका तरुणाने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला
म्हणून मुलगी वाचली नाही तर भलतेच घडले असते. अशीच एक घटना पुन्हा पुण्यातील उच्चभ्रू
समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क या ठिकाणी संध्याकाळी सातच्या सुमारास बर्निग घाट
परिसरात घडली. तेथेही लोक केवळ बघ्याची भूमिकेत होते. लोक असे का वागतात? बहुसंख्य
लोक मदत न करता घटना मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्यात का गुंतलेले होते? लोकांचे नैतिक
वर्तन असे का असते? शेवटी असाही प्रश्न उपस्थित होतो की, माणुसकी संपत चालली आहे का? की यामागे मानसशास्त्रीय काही कारण असू
शकते. यास बायस्टँडर प्रभाव म्हणजे प्रेक्षक प्रभाव असे म्हणतात.