गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

 

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

ए‍कविसावे शतक हे तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे शतक आहे आणि येथे सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असून सहकार्याने काम करणे अपेक्षित आहे. ए‍कविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल.

प्रत्येकास यशस्वी होण्यासाठी ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच अनेक शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. ए‍कविसाव्या शतकात घडणार्‍या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षण पद्धती किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का हा कदाचित वादाचा मुद्दा असेलही पण आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शाळेतून शिकवली जातात का? हा विचार प्रवृत्त करणारा प्रश्न आहे. अशा कौशल्यांच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच ‘SKILLS FOR 21ST CENTURY‘.

आपणास एकाविशाव्या शतकातील कौशल्यांची गरज का आहे?

शिकणे तेव्हाच पूर्ण आणि सर्वांगीण होते जेव्हा एखादा विद्यार्थी स्वत:, शाळा, कुटुंब, समाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाप्रती असलेल्या त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम असतो. आजच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता ओळख आणि क्षमतांची चांगली जाणीव असणे तसेच एक चांगला नागरिक आणि एक जबाबदार माणूस बनण्यासाठी सक्षम करणे हे एकाविशाव्या शतकातील कौशल्यांचे ध्येय आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या आणि समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम बनविते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेले आढळते. अध्ययन कौशल्ये (Learning Skills): नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये. साक्षरता कौशल्ये (Literacy Skills): वाचन, माध्यम आणि डिजिटल संसाधनांद्वारे नवीन ज्ञान तयार करण्यात आणि प्राप्त करण्यात मदत करणारी कौशल्ये. जीवन कौशल्ये (Life Skills): दैनंदिन जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये.

अध्ययन कौशल्ये (शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी)

अध्ययन कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर कामाचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये. अध्ययन कौशल्ये ही खालील चार प्रकारात विभागलेली आहेत.

1. चिकित्सक विचार करणे (Critical Thinking)

चिकित्सक विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे होय. चिकित्सक विचारामध्ये प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील राहणे, प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असणे, स्वतंत्र वैचारिक बैठक असणे, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य असणे आणि मूल्ये, समवयस्कांचा दबाव आणि मीडियांचा प्रभाव ओळखणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

2. संप्रेषण (Communication)

संप्रेषण म्हणजे एखाद्याची मते, इच्छा, गरजा, शंका इत्यादी योग्यरित्या, शा‍ब्दिक  आणि अशाब्दिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता होय. आज संप्रेषणाची माध्यमे बदलली असली तरीही आभासी संप्रेषण करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणे ही कौशल्ये प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक आहेत.

3. सर्जनशीलता आणि नवोपक्रमशीलता (Creativity and Innovation)

विचार करण्याचे नवीन मार्ग शोधणे आणि तयार करणे यांचा समावेश सर्जनशील कौशल्यात होतो. सर्जनशीलता म्हणजे गोष्टीकडे पाहण्याचा किंवा गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचा नवीन मार्ग शोधणे होय यामध्ये प्रवाहीपणा (नवीन कल्पना निर्माण करणे), लवचिकता (दृष्टीकोन सहज बदलणे), मौलिकता (मूलभूत कल्पनांचा आविष्कार), आणि विस्तार (इतरांच्या कल्पनांवर आधारित) यांचा समावेश होतो.

नाविन्यपूर्ण कौशल्ये म्हणजे काहीतरी नवीन/अद्वितीय/सुधारित/विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यासाठी सर्जनशीलपणे विचार करण्याची कौशल्ये. नवनवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूंनी विचार करताना कोणत्याही विचाराशी चिकटून न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहजपणे विस्तार करता येणे इत्यादी कौशल्ये सर्जनशीलतेत येतात.

4. सहकार्य (Collaboration)

सहकार्य म्हणजे इतरांसोबत प्रभावीपणे काम करण्याची क्षमता तसेच इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता होय. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असतात त्यावेळी इतरांच्या मतांचा आदर ठेऊन, संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणे आवश्यक ठरते. सहकार्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रस आणि मनोरंजन विकसित होण्यास मदत होते. हे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय सीमा प्रभावीपणे विस्तृत करते आणि विद्यार्थ्यास सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.

साक्षरता कौशल्ये (माहिती-तंत्रज्ञान युगात यशस्वी होण्यासाठी)

साक्षरता या विभागात माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता यांचा समावेश होतो. या कौशल्यांमध्ये माहिती (पारंपारिक किंवा डिजिटल), माध्यम आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची क्षमता, सामग्री आणि माहितीचे विविध पैलू समजून घेणे, गंभीरपणे मूल्यांकन करणे, प्रभावीपणे तयार करणे आणि संप्रेषण करणे समाविष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने माहिती असलेली साक्षरता महत्वाची आहेच पण त्याच बरोबरीने एकविसाव्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहेत. या साक्षरतेचे तीन  प्रकारात विभागणी केलेली आहे.

1. माहिती साक्षरता (Information Literacy)

सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे (उदाहरणार्थ– इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास/विश्लेषण करणे), माहितीचा योग्य आणि सर्जनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी.

2. माध्यम साक्षरता (Media Literacy)

एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणे, एखाद्या मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणे, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूंची माहिती असणे इत्यादीचा समावेश यात होतो.

3. तंत्रज्ञान साक्षरता (Technology Literacy)

तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.

जीवन कौशल्ये (जीवनात यशस्वी होण्यासाठी)

नावाप्रमाणेच जीवन कौशल्ये म्हणजे वैयक्तिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये होत. बहुतांशी ही कौशल्ये वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात देखील होतो.

1. लवचिकता आणि अनुकूलता (Flexibility and Adaptability)

लवचिकता आणि अनुकूलता म्हणजे सतत आपल्या सभोवताल होणार्‍या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे आणि नवीन परिस्थितीनुसार त्याने उचललेली पावले आणि नैतिकता आणि मूल्यांशी तडजोड न करता कार्यक्षमतेने अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करणे होय.

नवीन वातावरणाला अनुकूल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणे म्हणजे  अनुकूलता होय. विद्यार्थ्यांसाठी, हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी लवचिक आणि अनुकूल होण्यासाठी आवश्यक कौशल्ये समजू शकतात आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य उपाय शोधू शकतात.

2. नेतृत्व आणि जबाबदारी (Leadership and Responsibility)

नेतृत्व म्हणजे संघाचे नेतृत्व करणे तसेच वेगवेगळ्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आणि वास्तविक जगाच्या आव्हानांच्या संदर्भात प्रभावी संघ व्यवस्थापन करण्यास सक्षम असणे होय. या कौशल्यामुळे मुलाला चिकाटी, वचनबद्धता आणि जबाबदार असणे, लवचिकता आणि आत्मविश्वास यासारख्या मुख्य वैयक्तिक गुणांच्या विकासास कसे समर्थन द्यावे आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वचनबद्धता कशी वाढवावी हे शिकविते.

जबाबदार असणे म्हणजे एक चांगला आणि प्रभावी/संवेदनशील नागरिक असणे. एक माणूस म्हणून आणि विद्यार्थी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता, भविष्यात परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता. माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून, आपली मूलभूत कर्तव्ये आणि हक्कांची जाणीव असणे आणि भारतातील मूलभूत लोकशाही मूल्ये अंतर्भूत करणे आणि त्यांच्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

3. पुढाकार घेणे आणि स्व-दिशा (Initiative and self-direction)

पुढाकार कौशल्यामध्ये स्वतंत्रपणे कार्य सुरू करण्याची क्षमता समाविष्ट असते यामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य आणि अंतःप्रेरणेतून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरु करण्याचे कौशल्य समाविष्ट आहेत. हे मुलाला स्वतःच्या विकासाचा मार्ग तयार करण्यास मदत करते. स्व-प्रेरणा आणि पुढाकार घेण्यावर प्रामाणिकपणे कार्य करणे हे स्व-दिशा कौशल्य आहे.

4. उत्पादकता आणि उत्तरदायित्व (Productivity and accountability)

ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले उत्पादक काम करता येणे तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य होय. विद्यार्थ्यामध्ये उत्पादकता विकसित करणे म्हणजे एका ठराविक कालावधीत कोणतेही कार्य पूर्ण करण्यास सक्षम बनविणे.

उत्तरदायित्व म्हणजे कोणत्याही कामासाठी जबाबदारीची भावना लक्षात येणे. विद्यार्थ्यामध्ये ही कौशल्ये विकसित केल्याने त्याला/तिला प्रभावीपणे काम करण्यास मदत होते आणि त्याच्या/तिच्या कृतींसाठी जबाबदार राहून तो/ती इतर समवयस्कांसाठी विश्वासार्ह बनवतो.

5. सामाजिक आणि आंतर-सांस्कृतिक संवाद (Social and cross cultural interaction)

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात संवाद साधण्याची, सहकार्याने आणि प्रभावीपणे काम करण्याची ही कौशल्ये आहेत. वेगवेगळ्या शहरांत, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतींमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी ठरतात.

समारोप:

सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ही कौशल्ये आत्मसात करता येतातच असे नाही त्यामुळे इतर ठिकाणाहून ही कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या येऊ घातलेले आणि आंमलात येत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) आपणास एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी अशा कौशल्यांची आवश्यकता अधोरेखित केलेले आढळते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात वयोगटानुसार आणि कौशल्यानुसार परिणाम कसा असावा हे उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ही कौशल्ये जर असतील तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यापासून आपणास कोणी थांबू शकणार नाही.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार )

संदर्भ:

CBSE (2020). 21st Century Skills: A Handbook, Delhi: Central Board of Secondary Education

Trilling, Bernie and Charles Fadel (2012). 21st Century Skills: Learning for Life in Our Times, New York: Jossey-Bass

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

बार्नम प्रभाव | Barnum Effect

  बार्नम प्रभाव | Barnum Effect पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) ...