शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

ताण – तणाव व्यवस्थापन कौशल्ये | stress management |
 ताण – तणाव व्यवस्थापन कौशल्ये

"जीवन ताणाशिवाय जगताच येत नाही; त्याचे नियंत्रण करता येण हे एक व्यवस्थापन आहे"

               मनुष्य जीवन हे जसे अडथळे, संघर्ष व समस्या यापासून मुक्त नाहीतसेच ते आनंदापासूनही दूर नाही, बाह्य घटनांच्या परिणामापासून दूर राहण्यासाठी स्वत:ला स्वतंत्र व सक्षम बनवले पाहिजे.-  हम्बोल्ट (२००७)

                मानवाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत, बालकापासून वृद्धापर्यंत जर कोणती गोष्ट त्यांची कायम साथ करीत असेल तर ती म्हणजे ‘ताण’ (Stress) होय. एकविसाव्या शतकात तर ‘ताण’ हा परवलीचा शब्द होऊन गेला आहे. एकविसावे शतक हे मानसिक विकारांचे शतक होण्याची संभाव्यता जाणवते  (WHO). 

        आपली प्रत्येक मानसिक क्रिया ही आपल्या शरीरातील स्वायत्त नससंस्थेकडून कार्यान्वित केलेल्या मनोशारीरिक प्रतिसादाशी संंबंधित असते. त्यामुळे आपणास मानसिक क्रिया किंवा ताण - तणाव समजावून घेताना स्वायत्त नससंस्था समजावून घेणे महत्वाचे वाटते. 

          जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरात काही विशिष्ट बदल होतात. आपल्या मेंदूतून संदेश मिळाल्यामुळे आपले शरीर या ताणाचा प्रतिकार किंवा ताणापासून पलायन करण्यासाठी सज्ज असते. आपल्या रक्तात अ‍ॅड्रिनलीन हे संप्रेरक ओतले जाते. या अ‍ॅड्रिलीनचे कार्य मुख्यत: प्रतिकार करण्यासाठी हृदयगती वाढवणे, रक्तदाब वाढवणे, रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढवणे, तसेच प्रतिकार / पलायन करण्यासाठी स्नायुंना रक्त पुरवठा वाढवणे हे असते. ही सर्व क्रिया सिम्पेथॅटिक स्वायत्त नससंस्था पार पाडते.  

           मानवी शरीर हे अब्जावधी नसपेशींचे बनलेले आहे. वेदनइंद्रिय आणि शरीराच्या विविध अवयवांकडून नसपेशीमार्फत माहिती मेंदूला मिळते. मेंदूत वेदनानुभवांचा अर्थ लावला अर्थ लावला जाऊन माहिती जतन केली जाते, निर्णय घेतले जातात आणि सर्व प्रकारच्या मनोशारीरिक क्रिया प्रतिक्रिया नियंत्रित केल्या जातात. भावभावना स्मृती आणि वर्तनाचे नियंत्रण करण्याचे कार्य नससंस्थेकडून केले जाते.

            ताण नेहमीच अपायकारक असतो का ? तर याचे उत्तर नाही; मानवी जीवन ताणाशिवाय जगताच येत नाही. परीक्षेचा ताण आहे म्हणून विद्यार्थी अभ्यास करतो आणि रोजीरोटीचा ताण आहे म्हणून माणूस काम करतो. कोणताही ताण नसेल तर माणूस थोड्याच वेळात निष्क्रिय बनेल. पण आयुष्यात ताणाचे प्रमाण मीठासारखे असते. मीठ नसेल तर जेवण आळणी होईल आणि फार वाढून गेले तर ते खारट होईल. एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माणूस क्षमतेपेक्षा/कुवतीपेक्षा अधिक ताण घेऊन  ताण - तणावाला सामोरे जात आहे. तेव्हा या ताण  - तणावाचे व्यवस्थापन करणे एकविसाव्या शतकाचे महत्वाचे कार्य होऊन बसले आहे.

ताण - तणावाची लक्षणे (शारीरिक परिणाम: M.K. Gupta, 2008)
            1) छातीत धडधडणे                                                2) नखे कुरतडणे                                                                3) डोके दुखणे                                                        4) स्नायुंची कार्यक्षमता कमी होणे                                          5) चिडचिड करणे                                                   6) झोप न येणे               
            7) एकाग्रतेचा अभाव                                                8) आत्मविश्वास कमी होणे                                                  9) घसा कोरडा पडणे                                             10) विसरभोळेपणा                             
            11) भूक न लागणे                                                   12) येरझार्‍या मारणे                                                          13) पचनक्रियेत बिघाड होणे                                   14) पाठ/मान दुखणे                 
            15) उच्च रक्तदाब                                                  16) मधुमेह  इत्यादी.

ü ताण - तणावाची कारणे  :

      *    मानसशास्त्रीय/मानसिक कारणे  :-  
जशी दृष्टी तशी सृष्टी या उक्तीप्रमाणे असे म्हणता येईल की एखाद्या घटनेकडे/व्यक्तीकडे नकारात्मक भावनेने (भीती, राग, द्वेष, मत्सर, काळजी, वैफल्य, चिंता, सूड, चिडणे) पाहिल्यास आपल्या मनावर तसेच परिणाम उमटून ताण निर्माण होतो. कारण शरीरातील संप्रेरके आपल्या शरीरावर दुष्पपरिणाम घडवून आणतात तसेच अव्यक्त इच्छा व अपयशामुळेही ताण निर्माण होतो.  
     
      *    परिस्थितीजन्य कारणे  :-
            वातावरणातील होणारे अचानक बदल उदा. खूप थंडी, खूप उष्णता, खूपच गोंधळ, खूपच दमटपणा व प्रदूषण ( धूर, धूळ, घातक द्रावके इ.) पाणी व हवेमधील आरोग्य, प्रकाशव्यवस्था आणि लोकांची गर्दी इ. मुळे मानवी शरीरावर व मानसिकतेवर परिणाम होऊन ताण निर्माण होतो. परिस्थितीजन्य कारणामध्ये आपल्या शरीराची ठेवण, क्षमता यावर ताणाचे प्रमाण अवलंबून असते. काही लोक वरील घटना, घटकांना बळी पडल्यामुळे ताणाला सामोरे जातात.

      *    शारीरिक कारणे  :- 
            शारीरिक कारणे ही आपल्या शरीराशी व आपल्या राहणीमानावर अवलंबून असतात. त्यामध्ये आहार, शारीरिक स्थिती, व्याधी व बोलणे यांचा अंतर्भाव होतो.

     अ)   अयोग्य आहार :-           
            काही घटक हे ताण - तणावाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत असतात. उदा. चहा, कॉफी, अल्कोहोल, मादक पदार्थ, तेलकट/तिखट पदार्थ, मटण, चिकन, तंबाखूजन्य पदार्थ इत्यादी पदार्थांमुळे सिम्पेथेटिक नससंस्था कार्यान्वित होत असते. 

     ब)   अयोग्य शारीरिक स्थिती  :-
आपल्या शारीरिक स्थितीच्या सवयीमुळे ताण-तणावाची पातळी वाढवण्यास मदत होते. उदा. आपले उभे राहणे, बसणे, चालणे, इ. आपल्या         शरीराची स्थिती जर ताठ असेल तर आपला आत्मविश्वास वाढवून कोणतेही कार्य व्यवस्थित पार पाडते. कारण पॅरासिम्पेथेटिक नससंस्था तेथे कार्यरत असते व अयोग्य शारीरिक स्थितीमुळे सिम्पोथिटेक नससंस्था कार्यरत होऊन ताणाची पातळी वाढू शकते.

     क)   शारीरिक व्याधी  :- 
            असे म्हटले जाते की, सदृढ शरीरात सदृढ मन वास करीत असते. त्यामुळे शारीरिक व्याधीमुळे व्यक्तीला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे मेंदूतील पेशी कमकुवत बनतात व थकवा, ग्लानी व फीट यासारखे मानसिक रोग जडून ताण - तणाव निर्माण होतो.

     ड)    बोलण्याचे प्रमाण  :-
            जास्त बोलण्यामुळे सिम्पेथिटेक नससंस्थेवर परिणाम होतो. एक तास बोलण्यामुळे पाच तास शारीरिक कामासाठी लागणारे रक्त व स्नायूंची शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे हे ताणास निमंत्रण देण्यासारखे असते. 


      ताण - तणाव व्यवस्थापनाची तंत्रे व पद्धती:

1. सहन होईल तेवढाच ताण घ्या  :-
            ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ या उक्तीप्रमाणे अनेक व्यक्ती एका वेळी अनेक कार्यात स्वत:ला गुतवून घेतात व त्यामुळे एकही काम व्यवस्थित करू शकत नाहीत व सर्व कामांचा ताण घेऊन दुसर्‍यालाही ताण देतात. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार व उक्तीनुसार कार्यक्षेत्राची निवड करून सहन करता येईल तेवढाच ताण घ्यावा म्हणजे निवडलेले काम सुव्यवस्थित पार पडेल.

2. जीवनमुल्यांशी विपरीत वागू नका  :-
            व्यक्ती लहानपणी आपल्या कुटूंबात वडीलधार्‍या व्यक्तींकडून अनुकरणाने त्यांच्यातील जीवनमुल्ये आत्मसात करते व ती जीवनमूल्ये जीवनाच्या अखेरपर्यंत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करते. उदा. प्रामाणिकपणा, नम्रता, सोज्वळपणा, सत्य, अहिंसा इ. त्यामुळे भ्रष्ट, पैसे खाणारा माणूस रात्री सुखाने झोपू शकत नाही.

3. आत्मविश्वास जागृत ठेवा  :-
            आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे. आत्मविश्वास असेल तरच व्यक्ती सर्व संकंटाना, ताण-तणावांना सहज तोंड देऊ शकेल.   उदा. वर्गात  विद्यार्थी एखाद्या मुद्यावर वाद घालत असतील अशा वेळी शिक्षकाकडे आत्मविश्वासाची पातळी उच्च असेल तरच तो यशस्वीरित्या मार्ग काढू शकेल. नाहीतर अपयश पदारी येण्याची शक्यता असते व त्यामुळे ताण - तणाव निर्माण होतो म्हणून व्यक्तीकडे आत्मविश्वासाची पातळी उच्च दर्जाची असावी.

4. आत्मटीका करू नका  :-
            ‘मी नालायक आहे, मला जमत नाही, मी करू शकत नाही’ अशी आत्मटीका टाळली पाहिजे. ही वाक्ये माणसाच्या मनात कोणतेही काम करताना वावरत असतील तर त्यांचा आत्मविश्वास खच्ची होऊन त्यांना कोणतेही यश मिळणे अशक्यच. स्वत:ला कमी लेखणार्‍या माणसाची स्थिती फार असहाय्य असते. सर्व शक्तींचे मूळच या आत्मटीकेमुळे नष्ट होऊ शकते.

5. अपयश सहजतेने घ्या  :-
            जीवनात यशापयश ऊनसावलीच्या खेळाप्रमाणे चालतच राहणार. मोठमोठ्या लोकांनाही अपयशाचा सामना करावा लागतो. उदा. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते पण  ते राष्ट्राध्यक्ष होण्याअगोदर 14 वेळा अपयशी झाले होते. तेव्हा अपयशाने ताण वाढवून घेऊ नका. यशासाठी प्रयत्न करा, पण ‘मा फलेषु कदाचन’ या वृत्तीनेच. अपयश आलेच तर स्वत:ला तीन सुचना द्या -

            1)  जे झाले त्यापेक्षाही वाईट होऊ शकले असते पण झाले नाही,       
             2) असेच अपयश वेळोवेळी इतरांना, तसेच आपणासही पूर्वी आले आहेत त्यात वाईट वाटून    घेण्यासारखे काहीच नाही
            3) जे झाले तो भूतकाळ; आता हे अपयश धुऊन काढण्यासाठी काय करता येेईल याचा विचार करा.

6. परिपूर्णतेचा अतिरेक टाळा  :-
            या उक्तीचा विचार एकविसाव्या शतकात कोणीही करत असलेला दिसत नाही. ‘मला अमूक परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळाले पाहिजेत. तेवढे मिळाले तरच मी योग्यतेचा नाहीतर पूर्ण आयुष्य  बेकार आहे.’ ही विचारसरणी फार घातक आहे. ‘इयत्ता 10 वी व 12 वी निकालानंतर अपयश आले, मनासारखे गुण मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या’ अशा मथळ्याची वर्तमानपत्रातील एखादी बातमी वाचली की थक्क होते. आयुष्यात लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट 100 टक्के जमलीच पाहिजे असे जरूरी नाही. लवचिक वृत्तीचे लोक परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात आणि अंतिमत: सुखी असतात.

7. नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या समुहात रहा  :-
            तुमच्या भोवतालचे लोक तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात, खच्चीही करू शकतात. एखादा विद्यार्थी परीक्षेला निघाला की, ‘बघ हं, नाहीतर ऐनवेळी उत्तर विसरशील , 2 - 3 पेन वगैरे घे, नाहीतर चालणारच नाहीत !वगैरे सांगून त्यास घाबरवून सोडतील. अगोदरच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके व परीक्षेतील ताणतणावांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांना धीर देणे सोडा, त्यास अधिकच घाबरवले जाते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा व प्रोत्साहन देणार्‍या लोकांच्या समूहात रहा.
  
8. विपरीत परिस्थितीतही आनंदी रहा : -
            आपण आहोत त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीत शेकडो लोक आनंदात जगत आहेत. आपल्याच पदरी जगातले सर्व दु:ख, कष्ट आहेत असा काही लोक ग्रह करून घेतात. पण आयुष्यात जे काही होते त्यापेक्षाही वाईट होऊ शकले असते हे लक्षात ठेवा. कवीवर्य मंगेश पाडगावकर लिहितात -

                 ‘पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं,
                  पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं.
              भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं
                        तुमचं तुम्हीच ठरवाकसं जगायच 
                          कण्हत कण्हत की गाणं म्हणत,
                                  तुमचं तुम्हीच ठरवा !

            जगात काही गोष्टी आपण बदलवू शकतो, काही बदलवू शकत नाही. आपले मित्र बदलवू शकतो, नातेवाईक नाही. तेव्हा प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची  तयारी हवी. पुढील प्रार्थना नेहमी करत जा.
      ‘या जगात जे मला बदलता येते ते बदलण्याची शक्ती दे,
         जे बदलता येत नाही ते सहन करण्याची ताकद दे 
          आणि या दोहोतला फरक ओळखण्याची बुद्धी दे.’ 

9. विनोदबुध्दी कायम जागृत ठेवा  :-
            ‘विनोदजीवनाकडे, जीवनातल्या विसंगतीकडे कारणरहीत पद्धतीने पाहायला शिकवतो, विनोदाने मनावरचा ताण हलका होतो. विशेषत: आयुष्यातल्या ताणतणावांच्या प्रसंगाकडे विनोदामुळे एक हसत खेळत पाहण्याची वृत्ती निर्माण होते. आदर्श व यशस्वी शिक्षकाकडे विनोदबुद्धी असणे गरजेचे आहे. नाहीतर वर्गात जाण्याअगोदर बर्‍याच वेळा शिक्षक तणावाखाली असतो व त्यामुळे वर्गातील विद्यार्थीही तणावाखाली येतात. त्यामुळे आनंदी राहणे, हसणे - हसविणे या क्रिया गरजेच्या आहेत. सर्व तणावाच्या दु:खांवर रामबाण उपाय म्हणजे हसणे होय आणि हे केवळ विनोदबुद्धीमुळेच घडू शकते.

10. व्यायाम व इतर पद्धती  :- 
            ताण - तणाव व्यवस्थापनात व्यायामाला फार महत्व आहे. व्यायाम फक्त शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. योगासनातून ताण कमी करण्याचे सामर्थ्य आहे, हे जगाने मान्य केले आहे. नियमित व्यायाम करणार्‍या व्यक्तीजवळ तणावाच्या प्रसंगाना तोंड देण्यास उपयुक्त असे शरीरही असते. त्याशिवाय व्यायामामुळे आपल्या शरीरात एडॉर्फिन्स नावाची मज्जारसायने निर्माण होतात. ही रसायने म्हणजे शरीरांतर्गत असलेली वेदनशामके आहेत. त्यांच्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असे संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आपल्याला फ्रेशवाटते, उत्साही वाटते.

ü  ताण तणाव कमी करण्याची तंत्रे   :-

v  ध्यान:- ध्यानाच्या द्वारे विविध तंत्रांच्या साहाय्याने आपण आपले मन शांत करत असतो. जेणेकरून शरीरातील पॅरासिम्पेथेटिक प्रणालीद्वारे शरीर शांत होते. पतंजली योगशास्त्रानुसार ध्यान म्हणजे मनाची एकाच विषयावर एकाग्रता साधणे होय. ध्यानाच्या साहाय्याने शारीरिक व मानसिक ताण कमी करता येतो.

v  तणावमुक्तीसाठी शारीरिक कसरती :- शरीरातील वेगवेगळ्या प्रकारचे जे स्नायू थकलेले व आखडलेले असतात, त्यांना योग्य प्रकारे ताणल्यास योग्य विश्रांती मिळते.

    1. अ‍ॅरोबिक्स   :-     अ‍ॅरोबिक्समध्ये शीघ्रगतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक हालचाली केल्या जातात व त्यांच्या आधारे स्नायूमध्ये स्फूर्ती येते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. अ‍ॅरोबिक्स हे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे.

    2. मसाज  :- मसाज थेरपीमध्ये शारीरिक विश्रांतीसाठी क्रमाक्रमाने शरीरातील ठराविक स्नायूंवर दाब दिले जातात. त्यामुळे आखडलेले स्नायू शिथिल होण्यास मदत होते आणि सर्व ताण नाहीसा होतो. शरीरावर हळूवारपणे हाताने दाब दिल्याने आणि त्याचबरोबर जलदगत थापटी मारल्याने थकलेल्या स्नायूंना विश्रांती मिळते.

    3. अ‍ॅक्युप्रेशर  :- अ‍ॅक्युप्रेशर थेरपीद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दाब दिल्यामुळे (हात, पाय, चेहरा, पाठीचा कणा इ.) त्या भागाला उत्साह मिळून शरीर संतुलित होते. शरीर संतुलीत झाल्यामुळे शरीरातील सर्व असंतुलित घटक जसे की स्नायूंमधील थकवा दूर होऊन शारीरिक विश्रांती मिळते.   
  

v  पाण्याचा व इतर नैसर्गिक गोष्टींचा विश्रांतीसाठी उपयोग  :-
           पाणी म्हणजे जीवन ! पाणी हे थकलेल्या शरीराचा व मनाचा थकवा दूर करून आराम देते. जलोपचाराची विविध तंत्रे आहेत. आपण हवामानानुसार गरम किंवा थंड पाण्याचा वापर अंघोळीसाठी करतो. पाणी हे एक असे नैसर्गिक द्रव्य आहे की ज्यामध्ये शरीराला नैसर्गिक ताजेपणा मिळवून देण्याची शक्ती आहे. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो तर थंड पाण्यामुळे थकलेल्या स्नायूंना चेतना, स्फूर्ती मिळते. उदा. एखाद्या दिवशी थकवा जाणवल्यानंतर स्विमिंग पूल किंवा तलावात तंरगल्यामुळे आपला उत्साह वाढतो, मन प्रसन्न होते व शरीर ताजेतवाने होते. हा शरीराचा हलका/मोकळेपणा आपल्या मनालासुद्धा हलका करून जातो. याच पद्धतीने शरीराला शांत करण्यासाठी किंवा विश्रांती मिळवून देण्यासाठी इतर नैसर्गिक पद्धतींचा वापर केला जातो, उदा. Air bath,Sun bath, Mud bath इत्यादी.

            योगनिद्रा  :-       व्यक्तीने चोवीस तासांपैकी किमान सात तासांची झोप घेतलीच पाहिजे. नाहीतर त्याचा दुसरा दिवस आळसात जातो. योगनिद्रेमध्ये      जाणीवपूर्वक क्रमाक्रमाने शरीरातील प्रत्येक भागाला सूचना देऊन शरीर शांत केले जाते. त्यामुळे सर्व शरीर एका विशिष्ट स्थितीत (शवासन, मकरासन) आणून त्यांना आराम/विश्रांती दिली जाते. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते व मनाचा असंतुलितपणा जाऊन मन शांत होते.

            श्वसनाचे व्यायाम  :-    श्वासोच्छ्वासाचा शरीर व मनाशी अतिसूक्ष्म व महत्त्वाचा संबंध आहे. कारण आपण जेव्हा तणावाखाली असतो त्यावेळी आपला श्वासोच्छवास जलद गतीने, उथळ, अव्यवस्थितपणे होतो. त्याचप्रमाणे जर आपले शरीर व मन स्वस्थ असेल तर श्वासोच्छवास हा संथ, खोलवर, व्यवस्थित व प्रमाणित होतो. आपण जाणीवपूर्वक काही श्वासोच्छवास तंत्रांचा वापर करून शरीर व मनावरील ताण कमी करू शकतो. उदा. प्राणायम, कपालभाती इ.

            हास्य    :- पृथ्वीतलावर असा एकमेव प्राणी आहे की जो हसू शकतो. तो म्हणजे मनुष्यप्राणीहोय. व्यक्तीचे चांगले हास्य हे चेहर्‍यावरील स्नायू व मेंदूसाठी एक नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे व्यक्तीला उत्साह व स्फूर्ती मिळते. तसेच हसण्यामुळे संपूर्ण शरीर व्हायब्रेट होऊन शरीराला आराम मिळतो.

आहार, पथ्ये व विषारीद्रव्यांचे उत्सर्जन  :- आहारपथ्ये यांना आपल्या जीवनात तितकेसे महत्व दिले जात नसले तरीही ते आपली शारीरिक पातळी ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही ठराविक प्रकारचे अन्न पदार्थ विषारी द्रव्ये निर्माण करतात. (मादक पदार्थ, अति मांसाहार) तसेच अन्न सेवन करण्याच्या चुकीच्या सवयी चयापचय बिघडवतात.  उदा. गरजेपेक्षा जास्त अन्न खाणे, वेळेवर न जेवणे, कोणताही पदार्थ कोणत्याही पदार्थाबरोबर खाणे, इ. सर्व आजार हे पोट साफ न झाल्यामुळे होतात असे संशोधन सांगते. शरीरातील विषारी द्रव्यांचे (toxin) उत्सर्जन न झाल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडून ताण निर्माण होतो. हा ताण कमी करण्यासाठी व ढेुळपश परिणाम कमी करण्यासाठी काही ठराविक दिवसांनी लंघन करावे. स्टिमबाथ, बस्ती यांसारखे उपचार करावेत. तसेच हटयोगइ. सारख्या तंत्रांचा (कुंजलनीती, त्राटक, कपालभाती इ.) वापर करून शरीर संतुलित करता येते. ढेुळपश चा परिणाम कमी करण्यासाठी मसाज, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅरोबिक्स, व्यायाम, श्वासोच्छ्वासाचे तंत्र इत्यादीची मदत घेता येते.

            नृत्य  :- शरीराच्या आरामासाठी नृत्याची मदत होते. शरीराचे विविध अवयव (हात, पाय, मान, कंबर इ.) एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीने हालचाल केल्यास स्नायूंना व शरीराला व्यायाम मिळून ताण व थकवा कमी होतो.

            झुलणे :- झुलणार्‍या खुर्चीवर बसल्याने शरीरातील स्नायूंना व संपूर्ण शरीराला आराम मिळतो. त्यामुळे शरीर व मनाचा ताण कमी होतो. झोपाळ्यावर झुलण्याने शरीराचे हेलकावे मिळून ते ताजेतवाने होते. या क्रिया केल्यामुळे शरीरात विशिष्ट तेज निर्माण होते. आनंदाचे भाव निर्माण होऊन आराम मिळतो.

            संगीत :- संगीत ही दैवी देणगी आहे. संगीतामुळे थकलेल्या व तणावग्रस्त मनाला शांती मिळते. आनंददायी संगीत व गाण्यांकडे गोंधळलेले मन ओढले जाते. सध्याच्या काळात शारीरिक व मानसिक विकृती दूर करण्यासाठी संगीत थेरपी ही स्वतंत्र शाखा म्हणून उदयास येत आहे. शास्त्रीय संगीत, जुने श्रवणीय संगीत, भक्ती संगीत व भजन इ. विविध संगीत प्रकार हे गोंधळलेल्या व थकलेल्या मनाला शांती व आनंद देतात.

            निसर्गाच्या सानिध्यात  :- थकलेल्या शरीराला, मनाला तुम्ही जेव्हा उद्याने, जंगल, पर्वत, नदी, नाले बाग - बगीचे यांच्या सान्निध्यात घेऊन जाता तेव्हा त्यांना आराम मिळतो. दिवसातून एकदातरी मोकळ्या हवेत, ताज्या वातावरणात (फक्त शहरवासीयांसाठी) फिरायला जावे तेथे पक्ष्यांचा चिवचिवाट, वार्‍यांची झुळुक, फुलांचा सुगंध, वनस्पतींचा हिरवेगारपणा अनुभवायला मिळतो. पहाटेच्या सूर्याची किरणे उघड्या शरीरावर घ्यावीत, मोकळ्या हवेत/वातावरणात लहान मुलांशी खेळावे त्यामुळे थकवा आणि ताण - तणाव दूर होतात.

ताण हा सायलंट किल्लर ऑफ मॉडर्न एज’ (silent killer of modern age) असे म्हटले जाते. त्यामुळे एकविसाव्या शतकात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमता, वेळ, वय इत्यादी लक्षात घेऊन वरील ताण-तणाव व्यवस्थापनाचा अवलंब करावा. प्रत्येक व्यक्तीला सर्वच तंत्राची आवश्यकता नसून जी तंत्रे लागू पडतील अशा तंत्रांचाच अवलंब करावा व आपले जीवन सुखी व समृद्ध करावे. सुख, आनंद, दु:ख व ताण इ. बाबी या आपल्या अंतर्गतच आहेत. त्यातील काय हवे ते तुम्हीच ठरवा. शेवटी जीवन कसे जगावे हे तुम्हीच ठरवा.

      😃😃😃😃😃😃😃😃😃
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

बार्नम प्रभाव | Barnum Effect

  बार्नम प्रभाव | Barnum Effect पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) ...