मंगळवार, २० एप्रिल, २०२१

न्यूरोबिक्स : मेंदूचा व्यायाम | Neurobics

 न्यूरोबिक्स : मेंदूचा व्यायाम

बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग असला तरीही कोणताही बदल भीतिदायक असतो. बदल मानवी जीवनातील एक न टाळता येण्याजोगी गोष्ट आहे, मग तो बदल अगदीच क्षुल्लक असो किंवा आयुष्य बदलवून टाकणारा असो. बदलाविषयीची भीती मानवी मेंदूच्या रचनेमध्येच असते आणि जेव्हा अशी भीती निर्माण होते, तेव्हा ती सर्जनशीलता, बदल आणि यशाला अटकाव करते.

उत्क्रांतीच्या काळापासूनच मेंदू हा मानवी शरीरातील सर्वांत विलक्षण अवयव आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये पाठीचा कणा, हृदय, यकृत, आतड्यांसारखे इतर अवयव योग्यरीत्या विकसित झाले आणि त्याच अवस्थेत टिकून राहिले. मानवी मेंदू मात्र गेली चार ते पाच कोटी वर्षे विकसित होत आहे आणि त्यामध्ये बदलही घडत आहे. सुमारे एक ते दोन कोटी वर्षांपूर्वी विकसित झालेल्या रचनेनुसार सध्या मानवी शरीरात तीन स्वतंत्र मेंदू आढळतात. शारीरिक आणि मानसिक आजार टाळण्यासाठी या तीन मेंदूंमध्ये योग्य समन्वय राखणे हे आज मानवासमोरील एक प्रमुख आव्हान आहे.

मेंदूच्या तळाशी मेंदूचे मूळ आहे. हा भाग सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी विकसित झाला असून त्याला रॅप्टिलियन ब्रेन म्हणतात (प्रत्यक्षात तो सुसरीच्या मेंदूप्रमाणेच दिसतो). रेप्टिलियन मेंदूमुळेच आपणास सकाळी जाग येते, रात्री झोप येते, आणि हृदयाला धडधडण्याचे स्मरणही हा मेंदू करून देतो. मेंदूच्या तळाच्या वरच्या बाजूला असलेल्या भागाला मध्यमेंदू (मिडब्रेन) किंवा मॅमालियन ब्रेन म्हणतात. हा भाग सुमारे तीन कोटी वर्षांपूर्वी विकसित झाला असून तो या ना त्या प्रकारे सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो. मध्यमेंदू आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतो, आपल्या भावनांना योग्य स्थान देतो आणि धोकादायक स्थितीत जिवंत राहण्यासाठी लढावे की पळ काढावा याबाबतचा निर्णय घेतो. मेंदूचा तिसरा भाग हा कॉर्टेक्स या नावाने ओळखला जातो. हा भाग विकसित होण्यास सुमारे एक कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मेंदूच्या उर्वरित भागांना कॉर्टेक्सने आच्छादलेले असते. मानवी उत्क्रांतीदरम्यान जी काही आश्चर्ये निर्माण झाली आहेत, त्याला कारणही हाच कॉर्टेक्स आहे. नागरीकरण, कला, विज्ञान, संगीत या सर्व गोष्टी मेंदूच्या या भागातून निर्माण होतात.

मानवी मेंदू खूपच विशाल आहे त्याचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके आहे. मानवी मेंदू हा जगातील सर्वात मोठा मेंदू नसला तरी नक्कीच त्यापैकी एक आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा मेंदू हा स्पर्म व्हेलचा असतो, परंतु जेव्हा आपण मानवी मेंदूच्या आकाराची तुलना आपल्या शरीराच्या आकाराशी करतो तेव्हा खरं तर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आहे. मानवी मेंदू एक जटिल अवयव आहे जो नियंत्रक म्हणून कार्य करतो जिथे माहितीची देवाण-घेवाण होत असते. आपले अवयव आपल्या मेंदूला संदेश पाठवतात आणि आपला मेंदू आपल्या शरीराला प्रतिसाद कसा द्यावा यासाठी माहिती पुरवितो.

मेंदूचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे चेतापेशी (न्यूरॉन), यांची एकूण संख्या शंभर अब्ज इतकी असते. पण प्रत्येक पेशी इतर अनेक पेशींशी 'सिनॅप्स' नावाच्या विशिष्ट उपांगाच्या मदतीने  जोडलेली असतात. त्यामुळे अशा लक्षावधी अब्ज जोडण्या मेंदूला कार्यरत ठेवतात. प्रत्येक जोडणीला विशिष्ट अर्थ असतो. काही जोडण्या जन्मापासूनच तयार झालेल्या असतात आणि जन्मभर त्या तशाच राहतात. आपली जसजशी वाढ होते तसतशा इतर जोडण्या तयार होतात. यापैकी काही पुढे आयुष्यभर टिकतात; तर इतर काही लवचीक असतात, त्या तुटतात आणि नव्यानं जोडल्याही जातात. चेतापेशी व्यतिरिक्त त्यांना आधार देणाऱ्या, त्यांच्यामधली वाहतूक सांभाळणाऱ्या, त्यांना ऊर्जा पुरवणाऱ्या साध्यासाध्या कामकरी चेतापेशीही असतात. त्यांना ‘आधार पेशी' (ग्लायल) म्हणतात.

आपल्या मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजे सेरेब्रम (मोठा मेंदू), जो उजव्या आणि डाव्या गोलार्धांनी बनलेला असतो. आपल्या सेरेब्रमची बाह्य थर सेरेब्रल कॉर्टेक्स आहे, जो मेंदूचा एक भाग मानला जातो जो आपल्याला मनुष्य बनवितो: भाषा आणि जटिल कल्पना येथूनच विकसित होतात. मानवी मेंदू खूपच स्मार्ट असूनही त्याचा आकार आणि गुंतागुंत यामुळे अनेक प्रकारच्या विकारांना बळी पडतो.

न्यूरोबिक्स व्यायाम:

तंदुरुस्त राहणेसाठी व्यायाम आवश्यक आहे त्याचप्रमाणे मेंदू सक्रिय राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मेंदूच्या व्यायामावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वास्तविक, मेंदूच्या व्यायामामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता देखील वाढते. त्याच वेळी, आपण सर्व प्रकारच्या परिस्थितींचा सामना करण्यास सक्षम बनतो. असे काही मेंदूचे व्यायाम आहेत, जे आपण कधीही सहजपणे करू शकतो आणि स्मार्ट मेंदू घडवू शकतो त्यास न्यूरोबिक्स म्हणतात.

रोजचे जीवन हे न्यूरोबिक ब्रेन जिम आहे. आपले उठणे, प्रवास करणे, काम करणे, खाणे-पिणे, खरेदी करणे किंवा विश्रांती घेताना ते कुठेही, कधीही रिकाम्या वेळी, मजेदार आणि सोप्या मार्गांनी केले जाऊ शकतात. मेंदूच्या पेशींना बळकटी, संवर्धन आणि वाढवणारी तसेच मेंदूला स्वतःची पोषकद्रव्ये तयार करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. मेंदूचा व्यायाम किंवा न्यूरोबिक्स हे मानसिक व्यायाम प्रकार आहेत जी मेंदूची क्षमता वाढवण्याचा दावा करतात. या व्यायामाचे वर्णन लॉरेन्स कॅट्झ आणि मॅनिंग रुबिन यांनी त्यांच्या ‘कीप यूअर ब्रेनलाइव्ह’ या पुस्तकात केले आहे, आजही न्यूरोबिक्सवर संशोधन सुरू आहे. लॉरेन्स कॅट्झ यांनी 1999 मध्ये 'न्यूरोबिक्स' हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला होता.

असे मानले जाते की अशा मानसिक क्रिया केल्या पाहिजेत ज्याची आपणास सवय नसते, मेंदूमध्ये नवीन न्यूरॉन्स आणि डेन्ड्राइट्स विकसित होण्यास त्यामुळे मदत होते. याचे कारण असे आहे की नेहमीची किंवा ओळखीची कार्ये केल्याने त्या क्रिया बहुधा यांत्रिकपणे केल्या जातात, ज्यामुळे मेंदूला फारच कमी श्रम करावे लागतात. परंतु न्यूरोबिक्स व्यायामाची पद्धत अवलंबिण्याने मेंदूचा व्यायाम होतो.

न्यूरोबिक्स व्यायामाची काही प्रकार:

न्यूरोबिक्स व्यायामासाठी प्रत्येक काम सवयीच्या उलट्या दिशेने (नॉन-रुटीन) केले जाणे आवश्यक आहे.

  • ब्रश करणे, मोबाइल हाताळणे, लेखन करणे इ. डाव्या हाताने करणे. (आपण जर डावखुरे असाल तर उजव्या हाताचा वापर कराव)
  • घर, शाळा, कार्यालयाचा नेहमीचा मार्ग बदलणे.
  • डोळे बंड करून कपडे घालणे किंवा बदलणे.
  • वेगवेगळ्या गोष्टी खाणे, वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखणे. 
  • उलट्या पावलाने चालणे आणि सरावाने पळणे. 
  • आरशामध्ये घड्याळ पाहून वेळ सांगणे.
  • यापूर्वी कधीही न खेळलेले असे खेळ खेळण्याचा प्रयत्न करणे.
  • डोळे बंद करून गल्लीतला रस्ता ओलंडण्याचा प्रयत्न करा (मुख्य रस्ता ओलंडण्याची चेष्टा करू नका)
  • डाव्या हाताऐवजी उजव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधणे. (आपण घडयाळ नेहमी उजव्या हाताच्या मनगटावर बांधत असाल तर डाव्या हातात बांधा.)
  • साध्या गुणाकार – भागाकारसाठी कॅल्क्युलेटर ऐवजी पेपर-पेनच्या वापर करणे.
  • फोटो, पिक्चर उलटे पाहणे, पुस्तके उलट्या बाजूने वाचण्याचा प्रयत्न करणे तसेच लोकांची नावे उलट दिशेने बोलण्याचा प्रयत्न करणे जसे पूनम झाली मनपु, सीता झाली तासी, मोहन झाला नहमो इ.
  • एका मासिकातील चांगला फोटो पहा, आता या छायाचित्रातील वैशिष्ट्यांचा विचार करून 25 विशेषणे नोंदवा. 
  • रेस्टॉरंटमध्ये जेवताना, अन्नपदार्थामध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तू ओळखण्याचा प्रयत्न करा. शेवटी, विचारून रेस्टॉरंटमध्ये आपल्या चव ओळखण्याची क्षमता तपासा.
  • गजबजलेल्या घरात प्रवेश करत असताना, आपल्या उजवीकडे किती आणि डावीकडे किती लोक आहेत आहेत याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करणे.
  • पुस्तकातून एखादा वाक्प्रचार निवडा आणि तेच शब्द वापरुन नवीन वाक्प्रचार तयार करण्याचा प्रयत्न करणे.
  • एखादे कोडे सोडवताना त्याचे विविध भाग शीघ्रपणे जोडण्याचा प्रयत्न करणे. असे अनेक प्रयत्न केल्यावर आपणास पूर्वीपेक्षा कमी वेळात हे काम जमू लागेल.
  • सुपरमार्केटमध्ये खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी बनवण्याऐवजी ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. निमोनिक्स (स्मृती सुधार तंत्रे) वापरा किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारात विभागून लक्षात ठेवणे.
  • शब्दकोषातून दररोज एक शब्द लक्षात ठेवा आणि आपल्या संभाषणात तो वापरण्याचा प्रयत्न करणे.
  • सकाळी उठल्यावर रेडिओ किंवा टेलिव्हिजनवरील बातम्या ऐका. दिवसा त्या बातम्यांचे मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

न्यूरोबिक्सचे फायदे:

अनेक वर्षापासून शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की मेंदूमध्ये केवल बालपणात न्यूरल कनेक्शन्स तयार होऊ शकतात. परंतु लॉरेन्स कॅट्झ यांच्या मते मेंदू कोणत्याही आवश्यक वेदनिक नोंदी घेतो आणि त्यावर प्रक्रिया करतोवेगवेगळ्या वयोगटात नवीन संरचना आणि जोडणी तयार करतो. त्यामुळे न्यूरोबिक्समुळे होणारे फायदे अगणिक आहेत.

  • दैनंदिन जीवनातील नवीन क्रियांच्या प्रयोगातून मेंदूतील नवीन जोडणी (synapses) तयार होतात.
  • वेदनिक नेटवर्कद्वारे मज्जासंस्था प्रणालीs उत्पादन किंवा उत्तेजना मिळते.
  • न्यूरॉन्सच्या अस्तित्वाची अनुकूलता असलेल्या न्यूरोट्रोफिन किंवा विशिष्ट रेणूंचे उत्पादन करण्यास प्रवृत्त करते.
  • न्यूरोबिक्स व्यायाम करणे महत्वाचे आहे कारण ते संपूर्ण मेंदू आणि शरीराचा वापर करण्यास मदत करतात.
  • एकाग्रतासंतुलनविचारस्मरणशक्तीसर्जनशीलता आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतात.
  • न्यूरोप्लास्टीसिटी (सिनॅप्टिक जोडणी तयार करण्याची आणि पुनर्रचना करण्याची मेंदूची क्षमता) सुधारण्यास मदत होते.
  • कार्यरत स्मृती (working memory) आणि तरल बुद्धिमत्ता अधिक सक्षम होते.

न्यूरोबिक्सचा सराव सातत्याने करत राहिल्यास काही दिवसांत आपणास फरक जाणवेल. लक्ष देण्याची प्रक्रिया सुधारेल, स्मरण शक्ती वेगवान होईलमेंदूची क्षमता वाढेल. मेंदूची शक्ती कमालीची वाढलेली असेल आणि आपले प्रत्येक काम फ्रेश मूडमध्ये पार पडेल. कामाचा कंटाळा न येता प्रत्येक काम आनंदाने कराल आणि मेंदूच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. तसेचन्यूरोबिक्स तंत्राच्या सहाय्याने आपण अल्झाइमरनैराश्य आणि पार्किन्सन यासारख्या विविध न्युरोडिजनेरेटिव डिसऑर्डरचे (मेंदुमधील चेतपेशींना इज होऊन निर्माण होणारे आजार) लक्षणे रोखण्यास मदत करतात.

न्यूरोबिक्सवरील संशोधन:

बाळगावकर ए. के. (2013) यांचे यूरोपियन सायक्याट्री मध्ये प्रसिद्ध झालेले विद्यार्थ्यांच्या बोधनिक कार्यक्षमतेवर न्यूरोबिक्सचा परिणाम या संशोधनातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे:  न्यूरोबिक्स विद्यार्थ्यांच्या बोधनिक आणि कार्यात्मक कौशल्यांवर सकारात्मक परिणाम घडवून आणतात. न्युरोबिक व्यायामाद्वारे बोधनिक क्षमता अबाधित राखल्या किंवा सुधारल्या जाऊ शकतात.

धानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (2021) केलेल्या संशोधनात न्यूरोबिक्स म्हणजे मेंदूस्मरण आणि मन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी आणि श्वासोच्छ्वासहातवारे आणि रंगद्रव्य पद्धतींच्या सहाय्याने आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यासाठी माइंड कंट्रोल व्यायाम आहेत. अशाच प्रकारचे निष्कर्ष कुमार आणि शेखर (2020) यांच्या संशोधनातही आढळून आलेले आहेत.

न्यूरोबिक्सवरील पुस्तके:

सक्षम उद्दीपक आपल्या मनास बळकट करते अशा वैज्ञानिक आधारावर न्यूरोबिक्स हे आपल्या वैयक्तिक सामर्थ्य आणि कमकुवतपणाकडे लक्ष देण्यासाठी तयार केलेला मेंदू प्रशिक्षण कार्यक्रम आहे. आहार आणि व्यायाम आणि 100 हून अधिक कोडयाद्वारे वैकल्पिक विचारांची रणनीती असलेले क्रिस मासलंका आणि डेव्हिड ओवेन यांचे Neurobics: Build a Better Brain हे कार्यपुस्तक मानसिक क्षमता आणि सर्जनशीलता वाढवते. या पुस्तकात दररोजच्या जीवनात सहजपणे समाविष्‍ट केले जाऊ शकणार्‍या आणि मेंदूचे व्यायाम कृतिकार्यक्रम दिलेले आहेत. तसेच कार्टझ्, रुबिन आणि स्मॉल यांच्या Keep Your Brain Alive: 83 Neurobic Exercises to Help Prevent Memory Loss and Increase Mental Fitness या पुस्तकातही विचारांच्या अनेक रणनीती आणि ट्रिक्स दिलेले आहेत.

सदर पुस्तक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

सदर पुस्तक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

संदर्भ:

Balgaonkar, A.V. (2013). Effect of neurobics on cognition of student, European Psychiatry, Vol. 28, Supplement 1, https://doi.org/10.1016/S0924-9338(13)75810-3.

Dhankhar, D.; Kumariya, R. and Chopade, Y. (2021). Psycho neurobics practices for self-healing for individual seafarer: Wellness at sea. Medico research chronicles [Internet]. Vol. 7(2), pp. 87-101.

Kumar, S. and Shekhar, C. (2020). effect of psychoneurobics on the memory of school children. Medico research chronicles [Internet]. Vol. 5(6), pp. 508-11.

Owen, D. and Maslanka, Chris (2010). Neurobics: Build a Better Brain, Manhattan: Readers Digest

Kartz, L.; Rubin, M. and Small, G. (2014). Keep Your Brain Alive: 83 Neurobic Exercises to Help Prevent Memory Loss and Increase Mental Fitness, Chapel Hill: Algonquin Books

जोशी आणि जवडेकर (2016). मेंदूतला माणूस, पुणे: राजहंस प्रकाशन

पलसाने, म. न. (2006). मानसशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन    

फोंडके, बा. (2016). अंगदेशाचा राजा मेंदू, पुणे: मनोविकस प्रकाशन

मेडिना, जे. (अनुवादक – उपाध्ये) (2016). ब्रेनरूल्स, औरंगाबाद: संकेत प्रकाशन

मॉरर, आर. (अनुवाद- लाड, सं. 2014). एक छोटेसे पाऊल बदलू शकते आयुष्य, भोपाळ: मंजुळ पब्लिशिंग हाऊस

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

अभ्यास सवयी | Study Habit

 

अभ्यास सवयी | study habit

माझा अभ्यास का होत नाही? अभ्यासात माझे मन का लागतं नाही? पाठांतर केलेले माझ्या डोक्यात का बसत नाही? इ. अनेक प्रश्न आपल्या पाल्याला पडत असतात. हे सर्व प्रश्न सुटले की पालक म्हणून आपण जिंकलो. बऱ्याचदा असं दिसून येत की विद्यार्थी महत्त्वाच्या परीक्षामध्ये त्यांना हवे तसे गुण मिळवण्यात यशस्वी होत नाहीत. असं ऐकायला मिळत की मी खुप अभ्यास केला होता. पण माहित नाही मला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. माझे नशीबच ख़राब आहे. शेवटच्या क्षणी मी सगळं विसरलो. अशा तक्रारी विद्यार्थी करताना आढळतात, इतर मुलांशी तुलना करून माझ्याच मुलाला एवढे कमी गुण का मिळाले? आणि मग ही संपूर्ण चर्चा शैक्षणिक पद्धतीवर येउन संपते. परिक्षांचा प्रकार, अभ्यासक्रम प्रारूप, शाळा- महाविद्यालय, शिक्षक बरोबर शिकवतच नाहीत इ. काही मुद्दे बरोबर ही असतील, परंतु कुठेतरी विद्यार्थ्याची जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. खरं म्हणजे या सर्वांचा मूळ मुद्दा अभ्यास करणं म्हणजेच नुसती घोकंपट्टी किंवा अतिपरिश्रम न करताही योग्य पथ्दती, तत्त्वे आणि कृती कार्यक्रमांचा वापर करणे होय. हा एक नियोजनबध्द, संघटित आणि उद्देशप्रणित प्रवास असला पाहिजे.

      सुरुवात आपण अशी करुया की आपण काय वाचलं, त्यातलं किती समजलं आणि आता किती लक्षात आहे? नेपोलियन म्हणत असे की, कुठलंही युद्ध जिंकाण्याआधी मी ते माझ्या डोक्यात जिंकलेलो असतो.

गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत अशी काही टॉपर्स मिळाली आहेत, त्यांना मिळालेले गुण पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. असे बरेच विद्यार्थी आढळले ज्यांना उच्च माध्यमिक परीक्षेत जवळजवळ 100% गुण मिळाले, जे आश्चर्य वाटण्यासारखेच  आहे. जणू काही या विद्यार्थ्यांना निसर्गाकडून काही वेगळी ब्रेन पॉवर मिळाली आहे. पण प्रत्यक्षात असे काही नाही. टॉपर्स जादूगार नसतात, हा फरक केवळ आपल्यात आणि त्यांच्या अभ्यासाच्या सवयींमध्ये आहे. तासानतास अभ्यास करूनही आपणास सामान्य गुण मिळतात, आणि हे यशस्वी विद्यार्थी योग्य रणनीतीनुसार प्रभावीपणे अभ्यास करून कमी वेळात आपल्यापेक्षा अधिक गुण मिळविण्यास सक्षम असतात.

या लेखात आपणास काही अभ्यास सवयी माहित होतील, ज्या सर्वसामान्य विद्यार्थ्यानी अवलंब करून टॉपर्स झालेले आहेत. या अभ्यासाच्या सवयी आपणास प्रभावीपणे अभ्यास करण्यास मदत करतील, जेणेकरून आपण टॉपर्सच्या यादीत आपले नाव समाविष्ट करू शकाल. या लेखात, अशा कोणत्या विशेष सवयीमुळे हे विद्यार्थी यशाच्या उंचावर गेले याचा शोध घेऊ या. तर आपणही या टॉपर्सच्या यादीमध्ये सामील होऊ इच्छित असल्यास, कठोर परिश्रमाबरोबरच टॉपर्सच्या या खास सवयी अवलंबल्या पाहिजेत. सर्वप्रथम आपल्या अध्ययन शैली दृश्यात्मक, श्राव्यात्मक की कृतिशील आहेत यांची ओळख करून घेणे त्यानुसार अध्ययन प्रक्रियांचा अवलंब करणे. खालील सवयी 10 वी 12 वीला जायच्या अगोदरच आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजेत. कारण सवयी काही एका दिवसात किंवा महिन्यात तयार होत नाहीत तर त्यासाठी अनेक वर्षाचे कठीण परिश्रम घ्यावे लागतात. चला तर मग पाहूया अभ्यासाच्या सवयी:

1. नेहमी नियोजबद्ध पद्धतीने अभ्यास करावे

सर्व यशस्वी विद्यार्थी भविष्यातील कार्यासाठी आगाऊ योजना तयार करतात. सर्व दैनंदिन कामकाजासाठी त्यांनी विशिष्ट वेळ निश्चित केलेली असते जेणेकरून ते कधीही मागे पडणार  नाहीत. वास्तविक, योग्य रीतीने तयार केलेले अभ्यासाचे वेळापत्रक आपल्याला यशस्वी करण्यात सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले आहे. हे आपल्याला संतुलित मार्गाने अनेक दैनंदिन कामे करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक अवलंब केल्याने आपल्यामध्ये स्थिरता येते, जेणेकरून आपण प्रत्येक अभ्यास सत्रासाठी अगोदरच शारीरिक आणि मानसिक तयारी करतो. तसेच नियोजबद्ध पद्धतीने तयार केलेले अभ्यासाचे वेळापत्रक आपणास करमणुकीच्या कामांसाठी आणि आपले छंद पूर्ण करण्यासाठीही पुरेसा वेळ देते. बेंजामिन फ्रॅंकलिन यांनी असे म्हटलेले आहे की, “जर तुम्ही योजना आखण्यात अपयशी ठरलात तर तुम्ही अपयशी ठरण्याची योजना आखत आहात.”

2. एकाच वेळी सर्व काही पाठांतर करण्याची चूक करू नका

बहुतेक यशस्वी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचा कालावधी छोट्या सत्रांमध्ये विभागतात. बोर्डाच्या टॉपर्सनी आपल्या अभ्यासाची रणनीती सांगताना सांगितले की, “मी नेहमीच माझ्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेनुसार अभ्यास करतो. जेव्हा जेव्हा मला थकवा जाणवतो तेव्हा मी अभ्यासापासून ब्रेक घेतो, ज्यामध्ये मी विश्रांती घेतो जेणेकरून माझे मन ताजेतवाने होईल आणि रीचार्ज होईल आणि मला गोष्टी चांगल्या प्रकारे आठवतील. " हे पटण्यासारखे आहे की बरेच दिवस आपण एकच काम केल्यावर आपणास कंटाळा येतो, त्यानंतर आपली कार्यक्षमता देखील कमी होते आणि त्यामुळे कितीही जोरदारपणे काम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणून नियमित अभ्यास करणे महत्वाचे आहे पण त्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक छोट्या छोट्या सत्रांमध्ये विभागून अभ्यासाचे नियोजन करावे. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत होईल.

3. अभ्यासाच्या नोट्स बनविणे विसरू नका

बरेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या नोट्स हे त्यांच्या यशामागील एक प्रमुख कारण मानतात. बोर्डाच्या एका टॉपर्सने आपली यशोगाथा सांगताना सांगितले की नोट्सच्या माध्यमातून आपण संक्षिप्त स्वरुपात आणि सोप्या भाषेत तपशीलवार अभ्यास करू शकतो, जे परीक्षेच्या तयारीत खूप मदतगार ठरते. याव्यतिरिक्त, अभ्यासाच्या नोट्स आपल्याला वर्गात शिकवल्या गेलेल्या सर्व महत्त्वाच्या विषयांची आठवण ठेवण्यास मदतगार ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या नोट्स चुकूनसुद्धा वापरू नका. कारण प्रत्येकाची वेगळी शैली असते आणि ती ज्याची त्यालाच माहीत असते.

  • अभ्यासाच्या नोट्स संक्षिप्त आणि महत्त्वाच्या मुद्याना अनुसरून असावे.
  • प्रत्येक महत्त्वाचा घटक अनुक्रमिक पद्धतीने लक्षात घेणे महत्वाचे आहे.
  • पुस्तकात दिलेली प्रत्येक महत्वाची माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • नोट्स काढताना चार्ट, चित्रे किंवा सारण्या वापरा आणि किमान मजकूर लिहा.
  • नोट्समध्ये सोप्या भाषेचा वापर करा आणि एकाच नोटबुकमध्ये नोट्स तयार करा.
  • नोट्स अधिक स्वारस्यपूर्ण बनविण्यासाठी त्यास थोडा आकर्षकपणा आणा. 

4. रात्री पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे

बहुतेक यशस्वी विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे टाळतात कारण रात्रीच्यावेळी अभ्यासाऐवजी जागे राहण्यासाठी अधिक प्रयत्न करावा लागतो, त्यामुळे बर्‍याच प्रमाणात गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून डोळे उघडे ठेवून आपण सर्व कष्ट घेण्याऐवजी रात्री आरामशीर झोप घेतलेली तर बरे असते. रात्रीची सुखकर झोप आपल्या मेंदूला दिवसा अभ्यासलेल्या गोष्टींची खात्री करण्यास मदत करेल आणि त्याच वेळी योग्य झोप घेतल्यानंतर आपला मेंदू पुन्हा नवीन गोष्टी समजून घेण्यास आणि लक्षात ठेवण्यास तयार होईल. त्यामुळे रात्री शक्यतो 10 च्या आत झोपून सकाळी 5 पर्यंत उठण्याचा सराव करावा.

5. नियोजित अभ्यासाचे वेळापत्रक शक्यतो पुढे ढकलू नका

काही विद्यार्थी आजचे उद्यावर ढकलतात आणि हे सामान्य आहे, परंतु टॉपर्स हे असे विद्यार्थी आहेत जे या वस्तुस्थितीच्या विरोधात काम करतात. विविध बोर्डातील टॉपर्सकडून त्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेत असताना असे लक्षात आले की हे प्रभावी विद्यार्थी त्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक कधीच पुढे ढकलत नाहीत. याचे मोठे कारण असे आहे की त्यामुळे बरेच काम साचून राहते, जे नंतर क्रमवारी लावून यशस्वीरित्या पूर्ण करणे फार कठीण बनते. याशिवाय, अनेक गोष्टी एकत्र घेऊन काम करताना आपण बर्‍याचदा घाई करतो, जेणेकरून नैसर्गिकरित्या काही चुक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कधीच आजचे काम उद्यावर ढकलू नका. हिंदीतील एक म्हण असे सांगते की, “कल करे सो आज कर, आज करे सो अब”

6. प्रत्येक अभ्यास सत्रासाठी निश्चित ध्येय ठेवा

यशस्वी विद्यार्थ्यांनी अंगिकारलेली ही एक महत्वाची पद्धत आहे जी अगदी प्रभावी ठरली आहे. सर्वसामान्य जीवनात जसे लक्ष्य निश्चित केल्याशिवाय आपण यश मिळवू शकत नाही, त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनातही ध्येय महत्त्वाची भूमिका बजावते. बर्‍याच यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रत्येक अभ्यासा सत्रासाठी एक विशिष्ट लक्ष्य निश्चित करून कमी वेलेलत अधिकचा अभ्यासअ करतात. आपणास हे स्पष्ट माहीत असले पाहिजे की आपण किती वेळात एखादा घटक यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ, जर आपण गणिताच्या विषयाची तयारी करीत असू तर आपण एका तासात किती प्रश्न सोडवू शकतो याची माहिती असावी त्यामुळे वेळेचे नियोजन व्यवस्थित आणि काटेकोर करता येते. निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी निश्चित ध्येय आवश्यक आहे.

7. आठवड्याभरात केलेल्या अभ्यासाचे पुनरावलोकन करावे

सर्व यशस्वी विद्यार्थी हे आठवड्याभराच्या अभ्यासाचे पुनरावलोकन करण्यास विसरत नाहीत.  आपण आठवड्याभरात केलेले परिश्रम लक्षात घेऊन मागील आठवड्याभरात आपण काय वाचले किंवा किती लक्षात राहिले तपासून त्यामध्ये सुधारणा करू शकतो. ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे सर्व यशस्वी विद्यार्थी नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यास तयार होतात आणि जुन्या माहितीशी सांगड घालून ती दृढ करतात. थोडी विश्रांती ही पुढील कार्य जोमाने करण्यास मदत करते.

8. अभ्यास आणि छंद दोघांनाही सोबत घ्या

संपूर्ण भारतामध्ये 2017 मध्ये सीबीएसई इयत्ता बारावीत अव्वल स्थान प्राप्त करणार्‍या रक्षा गोपाळबद्दल माहिती मिळविली तेव्हा असे कळले की रक्षा एक उत्कृष्ट पियानो वादक आहे तिला लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून पाचव्या स्तराचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ती उत्साही वाचक आणि ब्लॉगर देखील आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई इयत्ता बारावीत 93% गुण मिळविणाऱ्या 17-वर्षीय मिन्नतुल्ला, झी.टी.व्ही. वरील "सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स" या प्रसिद्ध टॅलेंट शोमध्ये सहभागी होता. हे टॉपर्स अभ्यासाचे आणि त्यांच्या आवडीचे संतुलन साधून पुढे कसे जातात यावरून प्रभावी विद्यार्थ्यांमधील यशोगाथा स्पष्ट होते. खरं तर, आपली आवड आणि उत्कटता मेंदूवरील दबाव काढून टाकण्यात सर्वात महत्वाची भूमिका निभावतात, जेणेकरून आपले मन सतर्क आणि ताजेतवाने राहते.

म्हणून प्रिय विद्यार्थ्यांनो, आपणसही या टॉपर्सच्या यादीमध्ये आपले नाव नोंदवायचे असेल तर आपण कधीही हार न मानण्याचा दृष्टिकोन अंगी बाळगला पाहिजे आणि वरील सवयी या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवल्या पाहिजेत. आपल्या कामगिरीमध्ये निश्चितच सुधारणा दिसेल.

अनेकदा समुपदेशन प्रक्रियेदरम्यान असा अनुभव आलेला आहे की, दिवसा अभ्यास करत असताना झोप येते तर झोप कशी टाळावी. त्यासाठी कमी प्रकाशात कधीही वाचू नये, पलंगावर पडून वाचन करणे टाळावे, भरपेट खाल्ल्याने आणि मांसाहार केल्याने नुकसान होऊ शकते, भरपूर पाणी पिल्याने फायदा होईल, लवकर झोपने आणि लवकर उठण्याच्या नियमाचे अनुसरण करावे, आणि दुपारची वामकुक्षी आपणास ताजेतवाने ठेवण्यास मदत करेल. अशाप्रकारे दिवसा अभ्यासात झोप आडवी येऊ नये आणि त्यातून बाहेर पडण्यास या सवयी मदत करतील आणि अभ्यास सवयीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून आपण दीर्घकाळ अधिक प्रभावीपणे अभ्यास करू शकतो. चला आपल्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

अधिक वाचनासाठी पुस्तके आणि साहित्य :

पसारकर, आरती (2014). एक हात मदतीचा, उल्हासनगर: इ साहित्य प्रतिष्ठान, pdf फॉरमॅट मध्ये उपलब्ध http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ek_haat_madaticha.pdf

गादिया, एन. जे. (2016). मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात? शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर मुक्तचिंतन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म

कडू, अ. (2013) अभ्यास करावा नेटका, मुंबई: नवता बुक वर्ल्ड

विकासपेडिया (ऑनलाइन पोर्टल). अभ्यास कसा करावा? सदर माहिती खालील लिंकवर उपलब्ध https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/93893e92e93e92894d92f-91c94d91e93e928/90592d94d92f93e938-91593893e-91593093e93593e

इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program

  इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढवण्यासाठ...