सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

ज्ञानरचनावाद आणि मूल्यमापन | Constructivism | ज्ञानरचनावादी वर्ग |


ज्ञानरचनावाद आणि मूल्यमापन
एन. सी. ई. आर. टी. ने २००५ चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) तयार केला. त्याच्याआधारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रतिमानात्मक बदल सुचविले. तो बदल म्हणजे ज्ञानरचनावाद होय. मुले स्वत: ज्ञानाची रचना स्वत: करु शकतात यावर ज्ञानरचनावादी विश्वास ठेवतात. या अगोदरच्या वर्तनवादी विचारसरणीनुसार प्रयत्न व सरावाच्या सहाय्याने विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे असा विचार होता पण ज्ञानरचनावादी शास्त्रज्ञ हे अमूर्त कौशल्ये जसे तर्क, सर्जनशील विचार, ज्ञानाचे उपयोजन, अर्थनिर्वचन व अनुमान इत्यादीच्या सहाय्याने विद्यार्थ्याने स्वत: विचार करुन समस्या निकारणास प्रोत्साहीत करणे व त्यास स्वतंत्र विचार करण्यास प्रवृत्त करतात. याच्या आधारे ते स्वत: शिकण्यास व जगाविषयीच्या आपल्या ज्ञानाविषयी मत प्रकट करण्यास सक्षम होतील.  असा उदात्त हेतू समोर ठेवून 2005 चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा राबविण्यात येत आहे.
परंतु ज्या घटकाकडून हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. तो घटक म्हणजे सद्या कार्यरत असलेला शिक्षक या संकल्पनेपासून अजूनही अलिप्त आहे. तसेच उद्याचा शिक्षक जिथे शिक्षकशिक्षण कार्यक्रमाद्वारे ज्ञानरचनावाद व त्यासबंधित असणा­या विविध संज्ञा, संकल्पना बिंबवून त्यानंतर अभ्यासक्रमाची रचना होणे गरजेचे वाटते. पण तिथेही अद्याप कांही झालेले दिसून येत नाही. 
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
     जलदगतीने बदलत जाणारी मानसशास्त्र ही एकमेव ज्ञानशाखा आहे. मानसशास्त्राची सुरुवातीला बोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली,  त्यानंतर 20 व्या शतकाच्या मध्यावर वर्तनाचे शास्त्र झाले.  हे सगळे परिवर्तन वॅटसनच्या प्रस्थापित केलेल्या सिध्दांतावर व स्किनरनी केलेल्या सिध्दांतातील विस्ताराने शक्य झाले.  त्यांनी नवीन वर्तनविषयक पध्दतीचा अवलंब करुन लोकांना नेहमी उपयोगी पडेल अशा सिध्दांताचा, नियमांचा विचार केला.
     विसाव्या शतकाच्या मध्यावर बोधात्मक क्रांती घडून आली आणि मानसशास्त्राच्या व्याख्येत खालील घटकांचा समावेश झाला.  बोधात्मक, वर्तनीक, भावनिक पण यामध्ये सामाजिक व अध्यात्मिक घटकाचा समावेश नव्हता या क्रांतीमध्ये जिन पियाजे व ब्रुनर यांच्या उपपत्तींचा महत्वाचा वाटा आहे. बोधात्मकता म्हणजे वर्तनाच्या पलिकडील विचार प्रक्रिया होय.
बोधनिक सिध्दांतामध्ये अध्ययन म्हणजे मानवी प्रक्रिया व साठविलेल्या माहितीच्या सहाय्याने बोधात्मक रचनेचे पूर्नसंघटन करणे होय”. (Good & Brophy, 1990)
      Good आणि Brophy यांनी Bartlett (1932) ला ज्ञानरचनावादी दृष्टिकोनाचा प्रवर्तक मानले आहे. ज्ञानरचनावादी सिध्दांतामध्ये अध्ययन म्हणजे बाहय जगताशी अर्थपूर्ण आंतरक्रिया साधून स्वत:च स्वत: ज्ञानाची रचना करण्याची प्रक्रिया होय.यामध्ये  पूर्वज्ञानाच्या आधारे सक्रीय अनुभवाच्या सहाय्याने नवीन ज्ञानाची बांधणी करतात.  पियाजे, ब्रुनर, डयुई, कहन् आणि कांट या अमेरिकेतील शिक्षण तज्ज्ञाच्या लेखनातून ज्ञानरचनावादामधील आशय निदर्शनात आला.
ज्ञानरचनावादावर सर्वात मोठा परिणाम जिन पियाजेच्या कार्याचा झाला. त्यांचे कार्य असे सुचविते की, विद्यार्थी स्वत:च स्वत:च्या ज्ञानाची रचना करतात. व्यगॉस्की (Vygotsky) यांनी सामाजिक आंतरक्रिया ही ज्ञान रचनेसाठी सर्वात अधिक महत्वाची मानली. त्यांचा असा विश्वास होता की ज्ञानाची रचना करणारा मनुष्य हा समाजाभिमूख असल्यामुळे त्याचे अध्ययन हे इतरांशी आंतरक्रिया घडून येऊनच होते. हा दृष्टिकोन पियाजेच्या संकल्पनेच्या विरोधात असलेला दिसून येतो.
ज्ञानरचनावाद हा पूर्वी अस्तित्वात असला तरी त्याचा खरा विकास 20 व्या शतकाच्या शेवटी झाला याचा अर्थ ज्ञानरचनावाद ही आधुनिक सर्वसामान्य सकंल्पना आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल.  पण या ज्ञानरचनावादाची पाळेमुळे खूप आधीपासून असलेले दिसून येतात. गौतम बुध्द (इ.स.पू.560 ते 477) हेरिक्लीटस् (इ.स.पू.540 ते 475) या तत्ववेत्याच्या विचारातून कधी न संपणारे तत्वज्ञान मानवास मिळाले. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये Giambattisa Vico (1668-1744), Immanual Kant (1724-1804) आणि Arthere Schopenhaur (1788-1860) हे ज्ञान रचनावादाचे अलिकडचे प्रवर्तक होत. विकोनी 1710 मध्ये ज्ञानाची रचना हा विवेचनात्मक निबंध प्रसिध्द केला. सदरच्या विवेचनात्मक निबंधात विकोनी सर्वप्रथम अशी कल्पना मांडली की, ज्ञान म्हणजे व्यक्तीकडून केली जाणारी विशिष्ट प्रकारची त्याची रचना होय आणि ज्ञानरचनावादही संज्ञा विकोच्या या लिखाणात उदयास आली. विकोची संकल्पना Von, glasersfeld (1989) यांनी केवळ मानवी मनच हे जाणू शकते की, त्याच्या मनात काय आहे व ते काय करु शकतेअशी मांडली .  
      कांट (Kant) यांनी व्यक्तीच्या विचारप्रक्रियेच्या रचनाशक्तीचा व व्यक्तीच्या अनुभवातील कल्पना या नियामक तत्वाकडे लक्ष वेधले.  त्यांची ही कल्पना सध्या रचना किंवा मानसिक आराखडा म्हणून ओळखली जाते (Moheny, 2004). 
मानवी मेंदूतील संरचना आणि प्रक्रिया याबद्दल कांही महत्वपूर्ण कल्पना अलीकडच्या काळात मांडलेल्या आहेत.  माहिती प्रक्रियाकरण प्रक्रियेत व्यक्ती नवीन माहिती कशी आत्मसात करते, माहितीचा संचय कसा केला जातो, लक्षात ठेवलेली माहिती पुन्हा कशी आठवते आणि पूर्वज्ञानाचा नवीन ज्ञान संपादनाशी कोणता संबंध असतो हे जे. आर. अँडरसन, बॉवर, अॅट्किनसन व शिफ्रिन, रुमेलाहार्ट आणि लिंडसे व नॉमन या तज्ज्ञानी अभ्यासलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ज्ञानरचनावद समजावून घेऊया.
ज्ञानरचनावाद :
      लॅटीन भाषेतील “Con struere” यापासून “to construct”  हे क्रियापद आलेले आहे.  याचा अर्थ रचना करणे किंवा रचनेची मांडणी करणे असा आहे. निरंतर चालणारी रचनेची (संघटन) प्रक्रिया हा ज्ञानरचनावादाचा संकल्पनात्मक आत्मा आहे.  ज्ञान कसे निर्माण होते या सक्रिय गुंतवणूकीच्या प्रक्रियेतून नवीन ज्ञानरचनेची बांधणी होते यावर ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे.  विद्यार्थी स्वत:ची वास्तव रचना किंवा अनुभवाच्या अवबोधनातून किमान त्याचे अर्थनिर्वचन तरी करतो म्हणून व्यक्तीचे ज्ञान हे त्याच्या आद्य अनुभवाचे कार्य होय, मानसिक रचना, वस्तु किंवा घटनांच्या अर्थनिर्वचनासाठी उपयोगी पडणारी श्रध्दा यावर ज्ञानरचनावाद्याचा विश्वास आहे. (Jonassen,1991) ज्ञानरचनावादी वास्तवतेचे स्वरुप हे बहुविध, रचनात्मक, पूर्णांश व प्रमाणबद्ध असते असे गृहीत धरतात.  ज्ञानरचनावादी सामान्यीकरण शक्य व इष्ट नाही असे म्हणतात. ज्ञानरचनावादी सिध्दांत म्हणून विविध गृहितकांच्या संचावर अवलंबून आहेत ते अध्ययनार्थी व प्रशिक्षक या दोघावरही परिणाम करतात त्यामुळे परंपरावादी प्रणालीला चिकटतात.
ज्ञानरचनावादाची गृहितके :
      ज्ञानरचनावाद व अनुदेशन आराखडा या लेखात मेरील (Merill,1991) यांनी ज्ञानरचनावादी सिध्दांताची अध्ययना संदर्भात गृहितके खालीलप्रमाणे सांगितलेली आहेत.
1)  अनुभवातून ज्ञानाची रचना होते.
2)  अध्ययन म्हणजे बाहय जगाविषयी वैयक्तिक अर्थनिर्वचन होय.
3)  अध्ययन ही सक्रिय प्रक्रिया असून त्यास अनुभवाच्या आधारे अर्थ प्राप्त होतो.
4)  अर्थपूर्ण आंतरक्रियेतून संकल्पनात्मक विकास होतो. विविध दृष्टिकोनातील देवाणघेवाणीतून व सहयोगी अध्ययनातून आपल्या आंतरिक सादरीकरणामध्ये बदल होतो.
5)  अध्ययन हे वास्तव परिस्थितीत घडले पाहिजे व त्याचे परीक्षण कृतीयुक्त असावे, त्यापासून फारकत असणाऱ्या उपक्रमातून अध्ययन नसावे.
एकूण ज्ञानरचनावादी सिध्दांतामधून आढळून येणारा आशय:
महोनी (Mahony,1999) यांच्या What is constructivism and why is it growing या लेखात नमुद केलेला एकूण ज्ञानरचनावादी सिध्दांतामधून आढळून येणारा आशय खालील प्रमाणे.
1)  मानवी अनुभवात सातत्यपूर्ण क्रियाशील कृत्यांचा/साधनांचा समावेश होत असतो.
2)  मानवी क्रिया/कृती या अनुभवाचे संघटन, त्या अनुभवांना अर्थ लावणे, श्रेणी तयार करणे यावर आधारलेल्या असतात.
3)  अनुभवांचे संघटन हे प्रामुख्याने स्वशी संबंधीत असते.  हा स्व व्यक्तीच्या शरीराला अनुभवांचे आधार बनविते व स्वत्वाची जाणीव किंवा स्व ओळख ते खोलवर रुजविते.
4)  जरी स्वहे अनुभवाचे केंद्रबिंदू असले तरी सामाजिक आंतरक्रिया महत्वाची आहे.  व्यक्तीचे अस्तित्व व विकास हा आंतर संबंधावर अवलंबून असतो आणि ते सामाजिक व प्रतिकात्मक प्रणालीच्या अस्तित्वाशिवाय कळू शकत नाही.
5)  मानवी विकास हा आजन्म आहे म्हणून प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या अनुभवाच्या आधारे सातत्याने नवीन ज्ञानाची रचना करीत असते.
ज्ञानरचनावाद आणि अध्ययन :
      सक्रिय अनुभवाच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे नवीन ज्ञान विकसीत होत असते अशी ज्ञान रचनावाद्यांची श्रध्दा आहे.  विद्यार्थी केवळ शिक्षक किंवा शैक्षणिक साहित्य/साधनाच्या माध्यमातून माहिती ग्रहण करीत नसून ते त्यांना अगोदर काय माहिती आहे याच्या सहाय्याने नवीन ज्ञान प्रस्थापित करतात. विद्यार्थी त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे नवीन ज्ञान निर्माण करुन त्याचे संघटन करतात. ज्ञानरचनेसाठी शाळेमध्ये शिक्षकानी ही दक्षता घ्यावी की नवीन ज्ञानांबरोबर जून्या ज्ञानाची सांगड घालावी म्हणजे त्यांना नवीन ज्ञानाबाबत आठवणे व ओळखणे सोपे जाईल. (Bludau, Maddax & Pounds,1998)  ज्ञानरचनावादी अध्ययनाची मुलभूत वैशिष्टे :
1)  अध्ययन म्हणजे निश्क्रिय ग्रहण प्रक्रिया नसून ती सक्रिय अर्थपूर्ण प्रक्रिया जी की अर्थपूर्ण समस्या सोडविण्यास उपयुक्त ठरते.
2)  नवीन अध्ययन हे अध्ययनकत्र्याच्या पूर्वज्ञानावर अवलंबून असते जे ब­याचवेळा नवीन माहिती आकलनास मदत करते.
3)  अध्ययन हे प्रमुख संकल्पनात्मक आकृतीच्या पूर्नसंघटनेवर भर देते.
4)  अध्ययन हे सामाजिक आंतरक्रियेतून घडते.
5)  अर्थपूर्ण अध्ययन हे विश्वसनीय अध्ययन कार्यातून घडते.
      ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातील अध्ययन वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनेस व वैविध्यपूर्ण दृष्टिकोन विकासास मदत मिळते. विद्यार्थी समस्या निराकरणास अनेक मार्गांचा शोध घेतात. त्यामुळे शिक्षकही विद्यार्थ्यांच्या विविध दृष्टिकोनांचा स्विकार करुन अध्ययन अध्यापनात लवचिकता आणतात.  ज्ञानरचनावादी वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांचे अध्ययन त्याच्या स्वत:च्या मार्गाने होण्यासाठी मार्गदर्शन करताना मदतनीसाची व महत्वाची असते. तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकांनी लवचिक असणे गरजेचे असते.
ज्ञानरचनावादी वर्ग कसा असावा :
     Brooks आणि Brooks (1999) यांच्या मते ज्ञानरचनावादी वर्ग खालीलप्रमाणे असावा.
अ) विद्यार्थ्यांना स्वत:च्या अध्ययनाचे स्वामित्व व पुढाकार घेण्यास प्रोत्साहन द्यावे ज्यामुळे त्याचा बौध्दिक विकास होईल.
1)  विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा आदर करावा.
2)  विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारप्रक्रियेस प्रोत्साहन द्यावे.
3)  विद्यार्थ्यांनी प्रश्नविकसित करावेत आणि अडचणी ओळखाव्यात त्यानंतर माहिती गोळा करुन तिचे विश्लेषण करावे व प्रश्नांची उत्तरे स्वत:च शोधावी. या प्रकारे विद्यार्थी स्वत: समस्या परिहारकर्ता बनेल.
ब) शिक्षकांनी मुक्त प्रश्न विचारावेत.
1)  विद्यार्थ्यांना विचारप्रक्रियेस आवश्यक वेळ द्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना निर्मितीस व विचारास वाव मिळतो.
2)  उच्चपातळीच्या विचारप्रक्रियेस प्रोत्साहन द्यावे.
क) विद्यार्थ्यांना वस्तुस्थितीच्या पलिकडील उत्तरापर्यंत पोहचण्यास आव्हान द्यावे.
1)  विद्यार्थ्यांना स्वत:च्या कल्पनांचे विश्लेषण, भाकीत, योग्य पुरावा व बचाव याद्वारे संकल्पनाची जोडणी व एकत्रिकरण करावे यासाठी प्रोत्साहन द्यावे.
ड) शिक्षकाबरोबर व इतर विद्यार्थ्यांवर संवाद घडवून आणणे.
1)  वर्गातील चर्चेमुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या कल्पनांचे वास्तव स्वरुप दिसून येते व त्यामध्ये बदल सुचतात किंवा त्या दृढ होतात.
2)  आपल्या कल्पना इतरासमोर मांडणे व इतरांच्या कल्पना ऐकल्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करतो.
3)  वर्गात अर्थपूर्ण संवाद घडून येण्यासाठी वर्गातील वातावरण आरामदायी व धाकरहीत असावे.

इ) विद्यार्थ्यांच्या परीकल्पना तपासण्यास संधी उपलब्ध करुन द्यावी.
1)  मुर्त अनुभवाच्या चर्चेला प्रोत्साहन द्यावे.
2)  चर्चेतील प्रोत्साहन व परीकल्पनेचे आव्हान के ल्यामुळे विद्यार्थी अनुभवात गुंतून राहतो.
फ) विद्यार्थी वास्तव जगाच्या परिस्थितीत गुंततात ज्यामुळे मुर्त संकल्पना उत्पन्न होऊ शकतील.
1)  विद्यार्थी कच्ची सामग्री व प्राथमिक स्त्रोताचा वापर करतात.
2)  विद्यार्थी साहित्य/साधने कौशल्यपूर्ण हाताळणे व आंतरक्रिया साधणे अवगत करतात.
ज्ञानरचनावादी मूल्यमापन :
    Scriven (1981) च्या मते मूल्यमापन म्हणजे एखाद्या वस्तूची/घटकाची पात्रता किंवा योग्यता किंवा मूल्य निश्चित करण्याची प्रक्रिया होयही एखाद्या घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर अंदाज व्यक्त करण्याची प्रकिया आहे.  मूल्यमापन म्हणजे शिक्षकांनी अभ्यासक्र मामध्ये ठरविलेल्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज करणे होय. अभ्यासक्रम रचनेमध्ये अनेक ध्येये व उद्दिष्टांचा समावेश असतो. त्याचबरोबर त्यामध्ये त्यांच्या पूर्ततेसाठी/साध्यतेसाठी मूल्यमापन प्रक्रियाही समाविष्ठ असते.
    ज्ञानरचनावादाने अध्ययन-अध्यापनाचा नवीन नमूना सुचविलेला आहे. त्यामुळे मूल्यमापनाचाही नवीन नमूना आवश्यक आहे. जर अध्ययनार्थ्यांने संबंधित व अर्थपूर्ण ज्ञानरचनेमध्ये गुंतून राहण्यासाठी ज्ञानरचनावादी वातावरण निर्मिती करते तर आपणास मूल्यमापनाची पर्यायी पध्दती देणे बंधकारक आहे.  वस्तुनिष्ठ मूल्यमापन पध्दती जशी निकष संदर्भीय यासारख्या पध्दतीने ज्ञानरचनावादी वातावरणातून घडलेल्या अध्ययनाचे मूल्यमापन केल्यास ते अव्यवहार्य ठरेल. (Jonassen,1992)
      मूल्यमापनाचा ज्ञानरचनावादी दृष्टिकोन हा परंपरागत दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे. परंपरागत दृष्टिकोनामध्ये अध्ययनार्थ्यांच्या प्रभूत्वाची वस्तुस्थिती मापन केली जाते व निश्चित केलेल्या विशिष्ट उद्दिष्टांसंबंधी त्याचे ज्ञान व कौशल्ये तपासून विद्याथ्यांची बलस्थाने व कमतरता याविषयी चर्चा केली जाते यामध्ये अगोदर निश्चित केलेल्या निकषावर अध्ययनार्थ्यांविषयी अंदाज बांधला जातो.  मूल्यमापनामध्ये मानक संदर्भीय व निकष संदर्भीय चाचण्यांचा समावेश होतो.  पण या चाचण्या विद्यार्थ्यांच्या उच्च श्रेणीच्या विचारप्रक्रियेच्या सत्य स्वरुपाचे मूल्यमापन करु शकत नाहीत. (Norton and Wilber,1998)
     ज्ञानरचनावादामध्ये मूल्यमापनासंबंधी खूप व्यापक दृष्टिकोन प्रस्थापित झाला पाहिजे ज्यामध्ये पूर्वनिश्चित निकष अजिबात असू नयेत.  अध्ययनार्थी बाहय जगाचे विश्लेषण हे वैयक्तिक जीवनात मिळालेल्या अनुभवाच्या आधारे करण्याची अपेक्षा ठेवतो.  म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती ही वेगळी असेल. त्यामुळे जॉनसेन(Jonssen,1996) च्या मते प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार मांडलेली उद्दिष्टे वेगळी असतील. उद्दिष्टांचा वापर त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी करुन नये तर मार्गदर्शन म्हणून करावा.
     ज्ञानरचनावादी अध्ययन वातावरणामध्ये विद्यार्थी स्वत: ध्येय निश्चिती करतो आणि शिक्षकाचे व वर्गमित्राचे प्रत्याभरण आणि सूत्रबध्द स्व-मूल्यांकनाचा वापर करुन ध्येय किती चांगल्या प्रकारे संपादीत करु शकेल हे निश्चित करतो. अध्ययन अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्यांस विश्वसनिय कार्य दिले जाते.
    विद्यार्थ्यांस दिले जाणारे कार्य हे वास्तव जगाशी संबंधित व उपयुक्त असावे,  अभ्यासक्रमाशी  मेळ घालणारे असावे, त्यामध्ये योग्य प्रकारची गुंतागुंत पुरवलेली असावी,  तसेच विद्यार्थ्यांस अनुसरुन योग्य काठीण्य पातळीची निवड केलेली असावी. (Jonssen,1996) म्हणून कृत्रिम कार्य करुन पाटया टाकण्यापेक्षा वास्तव जगामध्ये उपयुक्त कार्याला महत्व द्यावे.
ज्ञानरचनावादी मूल्यमापनाचे निकष :
      जॉनसेन (Jonassen,1992) यांनी सुचविले ज्ञानरचनावादी मूल्यमापनाचे दहा निकष पुढीलप्रमाणे.
1)  ध्येयमूक्त असावे : अध्ययनार्थ्यांनी स्वत:ची ध्येये स्वत: निश्चित करावीत आणि अध्ययनाच्या ध्येयांचे मूल्यमापन सावधपणे झाले पाहिजे.
2)  विश्वसनीय कार्यावर आधारीत असावे : अध्ययनार्थ्यांने वास्तव परिस्थितीत करत असलेल्या कार्याविषयी विचारणा करावी. उदा. काही लोक नेहमीच्या कार्याच्या मूल्यमापनासाठी बहूपर्यायी चाचणीचा वापर करतात.  तर त्यांना विचारावे की, अध्ययनाच्या मूल्यमापनाचा बहुपर्यायी या चाचणीचाच का वापर करता.
3)  आशयातून असावे : जर कार्य विश्वसनीय असेल तर वास्तव जगातील परिस्थितीस चांगल्या प्रकारे सामोरे जाता येते.
4)  ज्ञानरचनेचे निश्चित मूल्य ठरविणे : हा ज्ञान रचनावादाचा महत्वाचा पैलू आहे.  मूल्यमापनात उच्च श्रेणीतील विचाराचे मूल्य निश्चित करणे, कारण अध्ययनार्थी अध्ययनासाठी नवीन ध्येये व पध्दती निर्माण करतो, आणि अध्ययनार्थ्यांस संबंधित समस्या सोडविण्यास विचारणा करणे.
5) अनुभवाधिष्ठित रचनांचे मूल्य निश्चित करणे (प्रक्रिया विरुध्द निष्पती) : अध्ययन हे अध्ययनार्थ्यांने प्राप्त केलेल्या निष्पत्ती एवढेच महत्वाचे आहे. ज्ञानरचनावादी मूल्यमापन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असून ती वर्षाच्या शेवटी घेतली जात नाही.
6) आशयावर अवलंबून असावे :  प्रगत ज्ञान संपादनास ज्ञानरचनावादी अध्ययन वातावरण योग्य नाही.  कारण अध्ययनार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट नसतात व एखादा घटक अवघड असतो व पूर्वग्रहदूषीत ज्ञानाच्या सूचनामुळेही घडते. तसेच ज्ञानातील प्राविण्यासाठी व जुजबी ज्ञानासाठी हे वातावरण योग्य नाही.
7)  वैविध्यपूर्ण दृष्टिकोनाचा अंतर्भाव : ज्ञानरचनावादी मूल्यमापन हे एखाद्या वर्तनासाठी किंवा वर्तनाच्या संचासाठी बांधिल नाही. त्याऐवजी, ते वर्तनाच्या अधिकाअधिक पैलूसाठी बांधिल आहे, जे अध्ययनाचे लक्षण स्वीकाहार्य पूरावा म्हणून मानले जाते.  ज्ञानरचनावादी मूल्यमापनाच्या परीक्षक पथकामध्ये नवशिखा उमेदवार व तज्ज्ञ या दोघांचाही समावेश असतो.
8)  विविध नमुन्यात असावे : मूल्यमापन करणा­यांनी अध्ययनाचा एक भागाच्या निष्पत्तीचे मूल्यांकन न करता एकूण निष्पत्तीचा विचार करावा, कारण प्रत्येक निष्पत्ती ही वेगवेगळया माध्यमातून किंवा मार्गाने बनलेली असते.  त्यामुळे प्रत्येक निष्पत्तीचे मूल्यमापन वेगवेगळे होणे गरजेचे आहे.
9)  सामाजिक रचनेनुसार अर्थ अपेक्षित : अध्ययनार्थ्यांची स्वत:ची रचना तयार होत असतानाच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रमातून मिळणा­या अध्ययनातील अर्थ विषयी चर्चा व वादविवाद घडवून आणावा.
10) मूल्यमापनाच्या वास्तव ध्येयावर लक्ष द्यावे : अध्ययनात अंदाजाला कमी महत्व देऊन अध्ययन प्रक्रिया मूल्याधिष्ठित व दिशादर्शक बनवावी, कारण अध्ययनार्थीच जाणतो की, तो काय आत्मसात केलेला आहे.  म्हणून ज्ञानरचनावादी मूल्यमापनात स्व-विश्लेषण व अमूर्त साधनांचा वापर करावा.
ज्ञानरचनावादी मूल्यमापनाच्या कार्यनिती :
      ज्ञानरचनावादी मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी होत नसून ते वर्षभर निरंतर चालू असते.  अध्ययनाच्या विविध पैलूचे मूल्यमापन करण्यासाठी विविध मूल्यमापन कार्यनितीचा अवलंब करावा लागेल.
1) संकलित नोंदी: (Anecdotal Records)
      वर्गातील विद्यार्थ्यांचे निरीक्षणाच्या आधारे निरंतर मूल्यांकन म्हणजे संकलित नोंदी होय.  या संकलित शिक्षकांना विविध प्रकारे मदत करतात जसे विद्यार्थी  माहिती प्रक्रिया करण कसे करतो, इतर विद्यार्थ्यांशी कसा वागतो, त्याची अध्ययन शैली, अभिवृत्ती व एकूण वर्तन त्याबाबत या संकलित नोंदी निरंतर मूल्यांकनासाठी खूपच उपयुक्त ठरतात.
2) अध्ययनाचा आनंदोत्सव : (Celebration of Learning)
      विद्यार्थ्यांची विविध विषयातील कुशलता इतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षकासमोर व पालकासमोर सादर करण्यास संधी द्यावी.  यासाठी विद्यार्थी केंद्रित परिषदा, उपकृम राबवावेत.
3) एग्झिट कार्डस् : (Exit Cards)
      एखाद्या घटकाची किंवा अध्यापन पूर्व, आंतरक्रियात्मक व पश्चात विद्यार्थ्यांची ज्ञान पडताळणी करण्यासाठी पाच मिनिटात निबंध लेखनाची कृती होय.  याद्वारे विद्यार्थी खालील तीन प्रश्नाची उत्तरे देतात.
1. हा घटक आत्मसात करताना कशाची मदत झाली
2. या घटकाविषयी सर्वांत चांगली बाब
3. हा घटक मी चांगल्याप्रकारे आत्मसात करु शकेन यासाठी सूचना
शिक्षक विद्यार्थ्यांनी दिलेल्या वरील प्रश्नांच्या उत्तरावरुन आवश्यक सुचनांचे नियोजन करतात.
4) संघटीत आलेख : (Graphic Organizing)
      संघटीत आलेख यांना मानसिक चित्र असेही म्हणतात.  मूलभूत ज्ञान दर्शविण्यासाठी अनुदेशन साधन म्हणून उपयुक्त ठरते.  यामध्ये एखाद्या संज्ञा, संकल्पनेसंदर्भात वृक्षसंरचना, आलेखाद्वारे इंतभूत माहिती दिली जाते.
5) मौखिक सादरीकरण : (Oral Presentation)
      विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान शाब्दिक सादरीकरणाद्वारे करण्यास मंजूरी द्यावी. त्यासाठी विद्यार्थी परिषद, परिसंवाद यांचे आयोजन करुन त्याच्या सादरीकरणाचे मूल्यमापन शिक्षकांच्या पथकाद्वारे करावे.
6) समवयस्क मूल्यांकन : (Peer Assessment)
      एका अध्ययनार्थ्यांने किंवा अध्ययनार्थ्यांचे समूहाने एकमेकांच्या कार्याचे, वर्तनाचे, सहभागाचे इ. संदर्भात मौखिक किंवा लिखीत प्रत्याभरण देणे.  हे ज्ञानरचनावादी वर्गामध्ये वापरले जाणारे महत्वाचे मूल्यमापन कार्यनिती आहे.
7) सारसंग्राहक माहिती : (Portfolios)
      विद्यार्थ्यांच्या कार्याचे ते प्रातिनिधीक संग्रह आहे.  सामान्यपणे सारसंग्राहक माहितीमध्ये अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या व अभिवृत्तीच्या प्रदर्शनासाठी सारसंग्राहक माहितीमध्ये निबंधलेखन, चित्रकला, छायाचित्र, कार्ड्स, लिखीत कार्य इत्यादीचा अंतर्भात करावा. विद्यार्थ्यांच्या कार्याच्या सारसंग्राहक माहितीचा वापर निष्पत्ती म्हणून विद्यार्थी करतील.
8) प्रकल्प : (Project)
      विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वास्तव जगातील संशोधनास प्रोत्साहन द्यावे.  सखोल अध्ययनासाठी प्रकल्प कार्य संधी उपलब्ध करुन देते.  तपास व शोधनाद्वारे प्रकल्प तयार करुन शिक्षकाद्वारे त्याचे मूल्यमापन करुन घ्यावे.
9) अभिरुपता : (Simulation)
      ज्ञानरचनावादी, मूल्यमापनासाठी वापरली जाणारी एक महत्वाची कार्यनिती म्हणून भूमिका पालनाचा उपयोग दिलेल्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना भूमिका वटवायच्या असतात.
10) विद्यार्थी निर्मित आराखडयानुसार मूल्यांकन: (Student designed assessment)
यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेला मूल्यमापन कृती आराखडयाचा वापर करतात.
विद्यार्थ्यांच्या कृतीचे गुंणाकन :
      Norton आणि Wilberg,  (1998) यांच्या मते प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नियम किंवा मार्गदशक तत्वे विकसित करावेत हे नियम किंवा मार्गदर्शक तत्वे शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी अंदाज बांधण्यास मदत करतात त्यामुळे चाचणीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या गुणांकनासाठी लिखित स्वरुपाचा व प्रस्थापित असा निकष हवा. उदा. प्रातिनिधीक स्वरुपाची लिखित सारसंग्रहक माहिती, सादरीकरण, निष्पत्ती किंवा इतर प्रगतीदर्शक कार्य.
      निकष आवश्यक असतात कारण ते मानवी प्रगतीच्या गुंगागुंतीच्या मत प्रक्रियेस विश्वसनीय, अनुकूल व यथार्थ पध्दतीने मदत करतात.  हे निकष मत तयार होण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि ही मते तयार होण्यास आधार असणारे विद्यार्थी, पालक व इतरांना सर्वसामान्य बनविले जाते.  चूक की बरोबर हे पारंपारिक मूल्यांवर चालत नाही, व्यापक प्रमाणातील प्रतिसादासाठी पर्यायी मूल्यांकनास आमंत्रण आणि परिणामाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन व मूल्यांकन प्रक्रियेची यथार्थता ब­याचवेळा वरील प्रकारच्या प्रतिसादाच्या स्पष्ट व दृष्य प्रमाणकावर अवलंबून असते. परिणामाच्या स्पष्टतेसाठी निकषांचा विकास हा चांगला मार्ग आहे. (Norton and Wilberg,1998)
      ज्ञान व अर्थाच्या वैविध्यपूर्ण अर्थनिर्वचनास ज्ञानरचनावादात मान्यता आहे म्हणून शिक्षकांनी त्याच्या विद्यार्थ्यांच्या बहुविध यथार्थ दर्शनाच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनास महत्व द्यावे. जे विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन प्रक्रियेत प्रतिबिबींत व स्वीकारलेले असते.” (Jonassen,1996)
      विद्यार्थ्यांच्या कार्याचे मूल्यांकन शिक्षकांच्या पथकाकडून झाल्यास चांगले होईल.  हे पथक विद्यार्थ्यांच्या विविध घटकांचे यथार्थदर्शन व विविध समस्यावर उपाययोजना सुचवण्यास जबाबदार असेल. हा वाद ज्ञानरचनावादामध्ये समाविष्ठ आहे. ज्ञानरचनावादी मूल्यमापनात विद्यार्थ्यांची सार संग्रहाक माहिती महत्वाची असून ती विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेस अर्थपूर्ण दृष्टिकोन पुरविते. विद्यार्थ्यांच्या कार्य सादरीकरणाच्या विशिष्ट प्रगतीचा संग्रह म्हणजे सारसंग्रहक माहिती (Portfolio) होय. कलाकृती, लिखित कार्य, निबंध, छायाचित्र सद्याच्या काळात ध्वनीमुद्रिका, दृष्यमुद्रिका या विद्यार्थ्यांची निष्पतीवरील सारणी वैशिष्टयपूर्ण कार्यातून दिसून येते.
परीक्षेतील प्रश्न प्रकारात बदल :
    ज्ञानरचनावादी मूल्यमापनात अध्ययन प्रक्रिया अध्ययनातील प्रगती व अध्ययन निष्पत्तीच्या मूल्यमापनावर भर दिला जातो.  हे सर्व मूल्यमापन एकूण सत्रादरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या कार्यावरुन केले जाते.
    विद्यार्थ्यांकडे विस्तृतपणे ज्ञानाचे संघटन करण्याची क्षमता आहे, समस्या निराकरण, सृजनात्मक विचार आणि विद्यार्थी स्वत:च स्वत:ची ज्ञान रचना कशी करतो याचे मूल्यांकन भारतीय मूल्यमापन संदर्भानुसार महत्वाचे आहे.  त्यामुळे परीक्षेमध्ये अशाप्रकारचे प्रश्न विचारणे आवश्यक वाटते. पूर्वापार चालत आलेल्या परीक्षेतील प्रश्न पाठयपुस्तकावर आधारीत व अधिकतर स्मरणाधीष्टीत असतात.  तर्क, सृजनात्मक विचार, नवीन परिस्थितीत ज्ञानाचे उपयोजन, अर्थनिर्वचन व अनुमान काढणे इत्यादी अमूर्त कौशल्याचा विचार केला जात नाही.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये परीक्षेतील प्रश्न प्रकारात बदल करण्यावर अधिक जोर देण्यात आला असून मूल्यमापनासाठी स्मरणावर आधारीत प्रश्नाऐवजी  तर्क व सृजनात्मक क्षमता हा आधार महत्वाचा मानला आहे. त्यासाठी मूक्त व आव्हानात्मक प्रश्न उपयोगी पडतील.  म्हणून प्रश्न प्रकारातील बदल हा केवळ बहूपर्यायी, लघू व दिर्घोत्तरी बाबतीत बदल नसून तो प्रश्नाचे उत्तर लिहिण्याच्या शैलीबाबतही आहे.  नवीन प्रकारचे प्रश्न हे लघू व दिर्घोत्तरी स्वरुपाचे असले तरी त्याचे उत्तर एकच एक न राहता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनावर आधारीत असावा. अशाप्रकारे नवीन प्रश्नांची रचना ही मूक्त स्वरुपाची असावी. चांगल्या चाचणी विधानांची व प्रश्नांची रचना करणे ही कला आहे आणि प्रश्नांच्या वेगळेपणासाठी शिक्षकाने अधिक विचार करावा( NCF - 2005).
उत्तराचे मूल्यमापन :
    सद्याच्या परीक्षा पध्दतीमध्ये उत्तराचे मूल्यमापन हे आशयाच्या चूक की बरोबर सादरीकरणाच्या आधारावर होते. पण नवीन मूल्यमापन प्रक्रियेत एखाद्या प्रश्नाच्या उत्तरातील विद्यार्थ्यांच्या वैशिष्टयपूर्ण दृष्टिकोन, समर्पक तर्क व स्वत:चे विचार यास प्राधान्य द्यावे. अशा परिस्थितीमध्ये गुणांकनाचा निकष खालीलप्रमाणे असावा.
1)    विद्यार्थ्यांनी ज्ञानाची रचना कशा प्रकारे केली आहे ?
2)    विद्यार्थ्यांचे मत व विचार समर्पक आहेत का ?
3)    विद्यार्थ्यांने स्वत:चा दृष्टिकोन कशाप्रकारे सादर केला आहे?
      त्यामुळे उत्तराच्या गुणांकनासाठी वेगळा निकष असायला हवा. अध्ययनार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनाचे अर्थनिर्वचन व त्याची अध्ययन निष्पत्ती ही इतराहून वेगळी असते याची जाण ज्ञानरचनावादी दृष्टिकोनात असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी पर्यायी पध्दतीचा अवलंब करण्यास शिकावे.(Bludau, Maddox, Pounds, 1998)
      मूल्यमापनाचा ज्ञानरचनावादी दृष्टिकोन हा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनावर आधारीत आहे.  तसेच वैयक्तिक कृतीच्या आधारे गुणात्मक पध्दतीमानूनही निदर्शनास आलेले आहे.  अध्ययन निष्पत्ती ही वैयक्तिक रचना असते.  म्हणून वास्तव म्हणजे व्यक्तिनिष्ठ रचना होय.  उदा. वास्तव काय आहे व काय नाही याविषयी स्वत:चे अर्थनिर्वचनाची रचना विद्यार्थी करीत असतो. येथे विश्वसनीयता व यथार्थता महत्वाची नाही कारण सांख्यिकीय भाषेत अध्ययन निष्पत्तीचे मापन करणे हा मूल्यमापनाचा हेतू नाही. ज्ञानरचनावादी मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनामुळे एकवाक्यता मान्य नाही. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कृतीच्या मूल्यांकनासाठी मूल्यमापन पथकास समर्थन देतात.
      सद्या 2005 चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा लागू झाला असून यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी अध्ययन करण्यास मदत होईल. यासाठी शिक्षकांनी व शिक्षक-शिक्षण कार्यक्रमातील सर्व घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन ज्ञानरचनावादी संकल्पना, सिध्दांत व त्यानुसार मूल्यमापनाविषयी जागृत व्हावे लागेल तरच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयानूसार अभ्यासक्रम व मूल्यमापन यथार्थ व विश्वसनीय होईल व खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण जागतिक पातळीचे ठरू शकेल.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
Agrawal, m. (may,2007) “Constructivism and pupil evaluation” in journal of Indian education, New Delhi:NCERT
Anderson, (2003) “The next enlightment” New York: Martin’s Press
Bludau, Maddox and Pounds (1998) “Constructivist evaluation in telecommunition learning environment, Telecommunication online reader
Brooks, j. and Brooks, m. (1999) “In search of understanding: the case of constructvist Classroom” Alexadria: Association for supervision and curruculumdevelopment
Duffy, t. and Jonassen, d. h. (1992) “Evaluating constructivist learning” (online)
Good, t. and Brophy, j. (1990) “Educational Psychology: A realistic approach” New York
            Longman, white plains
Jonassen, d. h. (1996) “Thinking Technology: Toward a constructivist model” (online)
Jonassen, d. h. (1996) “Computers in the Classroom: Mindtestnfor critical thinking”          Englewood cliffs,NJ: Prentice Hall
Kuhn, t. s. (1952) “The road since structure” Chicago: University of Chicago Press
Mahoney, m.j. (2004) “What is Constructivism and why is it growing? In Constructive    psychotherapy” New York: Guilford
Mahoney, m.j. (2004) “Scientist as Subject: The psychological imperative” New York:       Percheron Press
Merrill, m. d. (1991) “Constructivism and Insructural Design in Educational Technology”
Norton, p. and Wilberg, k. (1998) “Teaching with Technology” Orlando: Harcourt Brace
NCERT (2005) “National Curriculum Framwork- 2005” New Delhi” NCERT
Scriven, m. (1981) “Evaluation Thesaurus” Iverness Australia: Edgepress
Sharma, s. (2006) “Constructivism in Constructivist Approaches to teaching and learning”            New Delhi: NCERT
Von, Glaserfeld (1989) “An Exposition of Constructivism: why some like it radical”
 Massachusetts University, Amherst: Scientific reasoning research institute

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...