बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

संदिग्धता प्रभाव | Ambiguity effects

 

संदिग्धता प्रभाव | Ambiguity effects

आपण एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करत असताना योग्य निर्णय घेण्यास अधिक चांगल्या प्रकारे माहिती रेटिंगद्वारे मिळू शकते. एकाला सरासरी रेटिंग आहे, तर दुसर्‍याला अद्याप कोणतेही रेटिंग नाही, कारण ते प्रोडक्ट नुकतेच अड झाले आहे. या परिस्थितीत, अनेक लोक सरासरी रेटिंग असलेली वस्तू निवडतात. अद्याप कोणतेही पुनरावलोकन नसलेली वस्तू अधिक चांगली असू शकते, तरीही आपण माहित असलेली गोष्ट मिळवत आहोत हे जाणून घेणे आपणास चांगले वाटते. यालाच संदिग्धता प्रभाव म्हणतात.

संदिग्धता प्रभाव हा एक बोधनिक पूर्वग्रह आहे जिथे माहितीच्या अभावामुळे किंवा अस्पष्टतेमुळे निर्णय घेण्यावर परिणाम होतो. या प्रभावाचा अर्थ असा होतो की लोकांचा कल हा अनुकूल परिणामाची संभाव्यता ज्ञात आहे अशा पर्यायांची निवड करण्याकडे असतो ना की, ज्या पर्यायासाठी अनुकूल परिणामाची संभाव्यता अज्ञात असते. कारण आपण अनिश्चितता नापसंत करतो आणि म्हणून विशिष्ट अनुकूल परिणाम साध्य करण्याची संभाव्यता ज्ञात आहे असा निश्चित पर्याय निवडण्याकडे आपला अधिक कल असतो. डॅनियल एल्सबर्ग यांनी प्रथम 1961 मध्ये या प्रभावाचे वर्णन केले होते. एल्सबर्गने खालील प्रयोगाद्वारे हा प्रभाव दाखवला:

कल्पना करा की एका बादलीमध्ये 90 चेंडू आहेत, त्यापैकी 30 लाल आहेत आणि बाकीचे काळ्या आणि पिवळ्या चेंडूंचे अज्ञात प्रमाण आहे. आपणास 2 पर्यायांमधून निवडण्याची परवानगी आहे: जर A मधून त्याने लाल बॉल काढला तर तो $100 जिंकतो, पण जर त्याने काळा किंवा पिवळा काढला तर तो $0 जिंकतो. किंवा B मधून जर त्याने पिवळा चेंडू काढला तर तो $100 जिंकतो. जर त्याने लाल किंवा काळा काढला तर तो $0 जिंकतो.

आपण काय निवडाल? पर्याय A, कि पर्याय B?

 

जर तुम्ही A पर्याय निवडला असेल तर लाल बॉल काढण्याची शक्यता 1/3 आहे.

जर तुम्ही B पर्याय निवडला असेल तर पिवळा बॉल काढण्याची शक्यता देखील 1/3 आहे. याचे कारण असे की पिवळ्या बॉलची संख्या 0 ते 60 मधील सर्व शक्यतांमध्ये समान प्रमाणात वितरीत केलेली आहे.

येथे असे दिसून येते की बहुतेक लोक पर्याय B ऐवजी A पर्यायावर पैज लावण्यास प्राधान्य देतील, दोन्हीमधील फरक एवढाच आहे की A ला ज्ञात अनुकूल परिणाम आहे, तर पर्याय B मध्ये एक संदिग्ध, अज्ञात अनुकूल परिणाम आहे. लोक पर्याय A पसंत करतात कारण दोन्ही संभाव्यता समान असल्या तरीही तो अधिक निश्चित असल्याचे समजले जाते.

अगोदरच्या काळी घर खरेदी करताना, बरेच लोक एक निश्चित व्याज दर निवडत होते, जेथे व्याज दर एका विशिष्ट कालावधीसाठी (सामान्यत: अनेक वर्षांसाठी) निश्चित केला जात होता, बदलते व्याज दर ठेवण्याकडे लोकांचा कल नव्हता कारण येथे व्याज दरात बाजारानुसार चढ-उतार होण्याची शक्यता असते. धोका कमी असलेल्या पर्यायाची निवड अधिक प्रमाणात केली जात होती. काळ बदलला तशी लोकांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची प्रवृत्ती देखील बदललेली आढळते.

अधिक वास्तववादी उदाहरण म्हणजे लोक ज्या पद्धतीने पैसे गुंतवतात. जोखीम नको असलेले गुंतवणूकदार त्यांचे पैसे सरकारी रोखे, सोने, स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी यांसारख्या "सुरक्षित" गुंतवणुकीत ठेवतात, शेअर बाजार, स्टॉक आणि फंड यांसारख्या अधिक अस्थिर गुंतवणुकीच्या विरोधात ते लोक असतात. जरी शेअर बाजारातून कालांतराने लक्षणीयरीत्या जास्त परतावा मिळण्याची शक्यता असली तरीही, गुंतवणूकदार स्पष्टता नसलेल्या शेअर बाजाराऐवजी "सुरक्षित" गुंतवणुकीला प्राधान्य देतात कारण यामध्ये परतावा ज्ञात आहे. पण प्रत्यक्षात जर आपण विशिष्ट शेअर्सचा अभ्यास करून दीर्घकाल शेअर बाजारामध्ये पैसे गुंतविले तर त्याचे फायदे अगणित आहेत.

वैयक्तिक भिन्नता आणि संदिग्धता प्रभाव

संदिग्धतेचा प्रभाव आपणास दोन व्यवहार्य पर्यायांचा समान विचार करण्यापासून रोखू शकतो. परिणामी आपल्या निर्णय घेण्यावर परिणाम होतो. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप धोकादायक आहे असे आपणास वाटते या वस्तुस्थितीवर आधारित आपण आपोआपच एखाद्या गोष्टीविरुद्ध निर्णय घेऊ शकतो. या बोधात्मक पूर्वग्रहात गुंतल्याने आपले विचार  मर्यादित होतात, कारण आपणास हे धोकादायक निर्णयांचे दीर्घकालीन फायदे मिळविण्यापासून प्रतिबंधित करतात .

 संदिग्धतेच्या प्रभावामुळे जोखीम टाळणे याकडे जरी आपला कल असला तरी, निर्णय घेणार्‍याकडे किती माहिती आहे यावरून दोन पूर्वग्रहातील भेदभाव केले जातात. आपल्याकडे उपलब्ध पर्यायांपैकी फक्त एकासाठी विशिष्ट परिणामाची संभाव्यता माहित असते तेंव्हा संदिग्धता प्रभाव होतो. आपणास दोन्ही संभाव्यता माहित असतात आणि कमी मोबदला असलेल्या परंतु यशाची अधिक शक्यता असलेल्या पर्यायाकडे आकर्षण असते तेंव्हा जोखीम टाळण्याकडे कल असतो. दोन्ही प्रकरणांमध्ये, आपण धोकादायक मानत असलेले पर्याय निवडण्याची आपली नापसंती फलदायी निर्णय घेण्याची आपली क्षमता मर्यादित करू शकतात.

 

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

सुरक्षितता आणि असुरक्षितता

पद्धतशीर विचार हे आपल्या दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या निवडींवर प्रभाव टाकू शकतात, परंतु त्याचा निर्णय घेण्यावरही मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. यामुळे शाळा, कंपन्या आणि शासकिय यंत्रणा सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन धोरणे किंवा कार्यक्रम सादर करण्याऐवजी अपयशी प्रणालींला चिकटून राहतात. जरी हे बदल सिस्टीमला अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतील तरी, गोष्टी चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत याची शाश्वती नसणे आणि शेवटी नवीन काही सुरू करण्याने आहे ती स्थिती वाईट होईल या कारणाने जैसे थे नियम राबवविले जाते. जरी वर्तमान प्रणाली इष्टतम नसली तरीही, बदल लागू करण्यापेक्षा तिच्याशी चिकटून राहणे अधिक सुरक्षित वाटते, कारण ते ज्ञात आहे आणि त्याचा अधिक अंदाज लावता येतो. जोखीम न घेण्याचा निर्णय घेऊन या कृती करण्याकडे दुर्लक्ष केल्याने संस्थांना आणि ज्या लोकांना त्यांचा फायदा होणार आहे त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो.

असे का घडत असावे?

इतर बोधनिक पूर्वग्रहांप्रमाणे, संदिग्धता प्रभाव का होतो यामागे अनेक सिद्धांत आहेत. एक म्हणजे हा एक व्यावहारिक नियम (Rule of thumb) आहे जो जलद, सहज निर्णय घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे. आणखी एक म्हणजे संदिग्धता टाळण्याची उच्च पातळी, एक सामान्य वर्तन ज्यामध्ये आपल्यापैकी बरेच जण गुंतलेले असतात, ज्यामुळे लोकांना हा पूर्वग्रह घडण्याची अधिक शक्यता असते.

व्यावहारिक नियम (Rule of thumb)

व्यावहारिक नियम म्हणजे संदिग्धता प्रभाव निर्णय घेण्याच्या सोयीसाठी वापरला  जाणारा नवगामी परिणाम (प्रयत्न प्रमाद पद्धती) आहे. नवगामी विचाराप्रमाणे, हे समस्या सोडविण्याच्या सामान्य दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्य करते. ही रणनीती आपोआप आणि सहजतेने उद्भवते आणि आपल्याला लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते. नवगमी विचार तोपर्यंत टिकून राहतात जोपर्यंत ते बरोबर असतात. तथापि, त्यांचा वापर करून, आपण चुकीचा किंवा चुकीची माहिती असलेला निष्कर्ष काढण्याचा धोका पत्करतो, कारण आपण तर्क आणि अनुमान वापरण्यात अयशस्वी होतो.

एका मर्यादेपर्यंत, संदिग्धता प्रभाव हा एक अनुकूल प्रतिसाद आहे. अनेक लोक कल्पनेवर आधारित पर्यायांपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असलेल्या पर्यायांना प्राधान्य देतात. आपल्याकडे खरोखर खूप कमी माहिती आहे त्यावेळी हे पर्याय टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याहूनही चांगले, अस्पष्टता परिणाम आपल्याला अस्पष्ट पर्यायाबद्दल अधिक माहिती मिळविण्यास प्रवृत्त करू शकतो, जेणेकरून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल.

व्यावहारिक नियम काही प्रसंगी कार्य करतो. असे म्हटले जात आहे की, या नवगामी विचारावर जास्त अवलंबून राहणे आदर्श नाही. फ्रिश आणि बॅरन यांच्या संशोधनानुसार, संदिग्धता प्रभाव हा फ्रेमिंग प्रभावाचा एक प्रकार आहे, जसे की त्यातील काही अज्ञात घटकांकडे लक्ष वेधून किंवा दूर करून कोणताही पर्याय संदिग्ध किंवा अस्पष्ट वाटू शकतो. मूलत:, एखाद्याला दिलेल्या पर्यायाबद्दल सर्व काही माहित नसते. असा विश्वास ठेवणे हे फक्त "कोणती माहिती असू शकते याबद्दल कल्पनेच्या अभावाचा परिणाम असू शकतो." अशा प्रकारे, या नवगामी विचाराचा वापर करून निर्णय घेणे निश्चितच सोपे होते, परंतु ते जवळजवळ विश्वसनीय किंवा प्रभावी नाही.

आपल्या जीवनात याचे महत्व काय आहे?

इतर कोणत्याही बोधनिक पूर्वग्रहाप्रमाणे जेथे निर्णय घेण्याशी तडजोड केली जाते, संदिग्धतेचा प्रभाव काय आहे आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपण या पूर्वग्रहात गुंतलेले आहोत का हे ओळखण्याची क्षमता विकसित करण्याच्या दिशेने काम करू शकतो. ही जागरूकता आपणास हा पूर्वग्रह पूर्णपणे टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे आपणास तर्काच्या आधारे योग्य निर्णय घेणे शक्य होईल.

संदिग्धतेचा प्रभाव कसे टाळता येईल?

स्वतःला मर्यादित न ठेवण्यासाठी, संदिग्ध पर्याय आणि परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या सुरुवातीच्या प्रबळ इच्छा नजर अंदाज करायला शिकले पाहिजे. कोणत्याही नवगामी विचाराप्रमाणे, असे करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे अस्तित्व आणि आपल्या निर्णय क्षमतेवर त्याचा प्रभाव ओळखणे. 

नवगामी विचार आपणास सहजतेने आणि आपोआप निर्णय घेण्याची परवानगी देत असले तरीही, संदिग्धता प्रभाव टाळण्याचा एक प्रमुख भाग म्हणून निर्णय घेण्यास आवश्यक वेळ घेणे गरजेचे आहे. आपण एका दिवसात असंख्य माहिती आणि अनेक पर्यायांचा सामना करतो, त्यामुळे आपल्या मानसिक संसाधनांचे योग्य विल्हेवाट लावण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. तथापि, काही निर्णय घेण्यास अधिक मेहनत घ्यावी लागते. कमी अस्पष्ट पर्याय सुरुवातीला अधिक इष्ट वाटू शकतो, परंतु, फ्रिश आणि बॅरनने निदर्शनास आणल्याप्रमाणे, आपणास वाटते त्यापेक्षा कमी माहिती असू शकते. परिस्थितीचा पुन्हा नव्याने विचार केल्याने असे दिसून येईल की कमी अस्पष्ट पर्याय दिसत होता तितका तो श्रेष्ठ नाही. शिवाय, अधिक संदिग्ध पर्यायाचे मूल्यांकन करताना, केवळ काय चूक होऊ शकते यावरच नव्हे तर काय बरोबर असू शकते यावर देखील लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. जेव्हा संदिग्धतेचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करतो, हे विसरतो की हा परिणाम सर्वोत्तम परिस्थिती असू शकतो.

समारोप

संदिग्धता प्रभाव हे आपल्याकडे किती माहिती आहे याचा निर्णय घेण्यावर कसा प्रभाव पडतो यांचे वर्णन करतो. विशेषत:, आपल्याकडे माहितीची कमतरता असते त्या पर्यायांचा तिरस्कार असतो. संदिग्धता प्रभाव हे पर्याय टाळण्यासाठी नवगामी विचार असू शकतात ज्यासाठी आपणास वाटते की आपल्याकडे पुरेशी माहिती नाही. याव्यतिरिक्त, उच्च पातळीच्या संदिग्धता टाळणारे लोक हे वर्तन व्यक्त करण्याची अधिक शक्यता असते. संदिग्धता प्रभाव टाळण्यासाठी, आपण निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील, सक्रिय दृष्टीकोन घेतला पाहिजे. कमी अस्पष्ट पर्याय आपोआप निवडण्याऐवजी, त्या पर्यायाबद्दल आपल्याला काय माहित नाही ते माहिती करून घेतले पाहिजे, तसेच अधिक अस्पष्ट पर्याय निवडण्याचे संभाव्य फायदे देखील ओळखले पाहिजेत.

संदर्भ

Ellsberg, D. (1961). Risk, ambiguity, and the Savage axioms. The quarterly journal of economics, 75(4), 643-669.

Frisch, D., & Baron, J. (1988). Ambiguity and rationality. Journal of Behavioural Decision Making, 1(3), 149-157.

Howard, J. (2018). Ambiguity Effect. Cognitive Errors and Diagnostic Mistakes: A Case-Based Guide to Critical Thinking in Medicine. 15-19. doi: 10.1007/978-3-319-93224-8_2

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

मानवी मेंदूचे नियम | Brain Rules

 

मानवी मेंदूचे नियम | Brain Rules

मानवी मेंदू हा कसा काम करतो हे माहिती नसणे, नातेसंबंधाच्या दृष्टीने मोठी गैरसोय ठरू शकेल कारण बोधात्मक साक्षरतेमुळे एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारे का वागते हे शोधण्यास, तसेच इतरांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यास मदत होऊ शकते. मेंदू कसा काम करतो याबद्दल अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनातून काही सामान्य नियम निदर्शनास आलेले आहेत. ते मेंदूचे नियम म्हणजे आपला मेंदू कसा कार्य करतो आणि आपण ते ज्ञान व्यावहारिक उपयोगात कसे आणू शकतो यावर एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण चित्रण आहे.

जॉन मेडिना हे सिएटल वॉशिंग्टन येथील एक प्रतिथयश आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि संशोधन सल्लागार आहेत; तसेच वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये बायोइंजिनियरिंगचे प्राध्यापक आहेत आणि सिएटल पॅसिफिक विद्यापीठातील ब्रेन सेंटर फॉर अप्लाइड लर्निंग रिसर्चचे संचालक आहेत. तज्ज्ञ मंडळींनी पुनरावलोकन केलेल्या विविध प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासांवर आधारित आपला मेंदू कसा कार्य करतो याबद्दलचे सत्य मांडण्यासाठी मेडिना यांनी मेंदूच्या 12 नियमांची  एक सूची तयार केलेली आहे. त्याचेच पुस्तक म्हणजे मेंदूचे 12 नियम (Brain Rules) होय.

जॉन मेडिना हे चेताविज्ञान, शिक्षण आणि व्यवसाय या तीन क्षेत्रातील परस्पर संवाद सुलभ करण्यावर भर देतात. आपल्या वैयक्तिक विकासात आणि पाल्यांना घडविताना तसेच आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्यांना समजून घेण्यासाठी नियमांच्या स्वरूपात 12 तत्त्वे असलेले पुस्तक म्हणजे ब्रेन रुल्स होय.

मेंदूच्या नियमांमध्ये, बोधात्मक कार्यक्षमतेसाठी व्यायाम आणि झोप का महत्त्वाची आहे, एखाद्या घटकाची पुनरावृत्ती केल्याने स्मरणशक्ती का वाढते, तणाव कार्यक्षमतेवर कसा परिणाम करतो, दृश्य भावना गुंतवून ठेवण्यास का महत्त्वाची असते आणि प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे हे आपणास कळेल. मेंदूचे नियम वाचल्यानंतर, आपणास मानवी मनाचे (आणि शरीराचे) अंतर्गत कार्य चांगल्या प्रकारे समजेल जेणेकरून आपणास जाणीवपूर्वक स्वतःचे कार्यप्रदर्शन सुधारण्यास तसेच इतर लोकांसोबत अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होईल.

नियम क्र. 1 व्यायामामुळे मेंदूची शक्ती वाढते.

मानवी मेंदूचे वजन संपूर्ण शरीराच्या वजनाच्या अंदाजे 2 टक्के इतके असते आणि तरीही शरीरात वापरल्या जाणार्‍या ऊर्जेच्या 20 टक्के भाग मेंदूकडून वापरला जातो हे अपेक्षेहून दहापट अधिक आहे. मानवी मेंदू त्याच्याकडे असणार्‍या न्यूरन्सच्या 2 टक्याहून अधिक न्यूरन्स एका वेळेस कार्यान्वित करू शकत नाही आणि जर यदाकदाचित असे घडलेच तर ग्लुकोजचा पुरवठा आश्चर्यकारक रित्या संपुष्टात येईल आणि आपणास चक्कर येईल.  सामान्यपणे आपल्या मेंदूची रचना रोज 12 मैल चालण्यासाठी केली गेली होती, पण आज आपल्यामध्ये तंत्रज्ञान आणि भौतिक सुखसोयीमुळे शारीरिक आणि मानसिक साचलेपण आलेले आहे. विचार करण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी हालचाल करणे अपेक्षित आहे. मेंदूचा नियम आपणास हे सूचित करतो की आपण एका जागी एकाच अवस्थेत अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ बसू नये (यास काही लोक अपवाद असतील). व्यायाम आपल्या मेंदूस रक्त पुरवतो, ऊर्जेसाठी ग्लुकोज आणि उरलेले विषारी इलेक्ट्रॉन्स शोषून घेण्यासाठी प्राणवायू देतो. तो प्रथिनांना उत्तेजित करतो आणि त्यामुळे न्यूरॉन्स एकमेकांशी समन्वय साधतात. हृदयसंस्थेशी निगडित व्यायाम आठवड्यात फक्त दोनदा केल्यामुळे आपणास होऊ शकणाऱ्या सामान्य अवसादाचा (depression) धोका अर्ध्याने कमी होतो. आपणास अल्झायमर होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो. रात्री किमान 7 ते 8 स्वास्थपूर्ण झोप मिळणे मेंदूसाठी अत्यावश्यक असते कारण या कालावधीत मेंदूतील आधारपेशी (Glial Cell) चेतापेशींना एका जागी धरून ठेवतात, त्यांचा विकास घडवितात. तसेच काही आधारपेशी चेतापेशींचे पोषण करतात, काही मृत चेतापेशी शरि‍राबाहेर टाकून स्वच्छता करतात तर काही आधारपेशी चेतापेशींना आवरण पुरवतात.

नियम क्र. 2 मानवी मेंदूचा विकास ही उत्क्रांतीची देण आहे.

पर्यावरणातील क्रौर्यावर मात करण्यासाठी आपण समोरच्यापेक्षा बलवान तरी बनले पाहिजे किंवा हुशार तरी बनले पाहिजे हे दोनच मार्ग आढळतात. आपण दुसरा मार्ग निवडला, शारीरिक स्वरुपात अशक्त असणाऱ्या मानवी प्रजातीने आपल्या संगद्यातील स्नायू बळकट करण्याऐवजी आपल्या मेंदूतील न्यूरॉन्सची संख्या वाढवून संपूर्ण पृथ्वीवर ताबा मिळवला. आपल्या डोक्यात एकच मेंदू नाही; आपल्यामध्ये तीन मेंदू आहेत. आपले श्वसन टिकवण्यासाठी आपण पालीसारख्या मेंदूपासून सुरुवात केली. त्यानंतर त्याला मांजरासारख्या मेंदूची जोड दिली अन् या दोघांवर एका कॉर्टेक्स नावाचा पातळ जेलीसारखा तिसरा थर चढवला हा तो सर्वशक्तिमान “आधुनिक” मानवी मेंदू होय. मानवाची उत्क्रांती होत असताना अनेक परिवर्तन घडून येऊन मानवाने पृथ्वीवर आपले साम्राज्य उभे केले आणि त्यानंतर हवामानातील अनपेक्षित बदलामुळे गुहा आणि झाडावरून आपण गवताळ प्रदेशात आलो. गवताळ प्रदेशात चालण्यासाठी चार पायांऐवजी दोन पाय वापरू शकल्याने आपल्या गुंतागुंतीच्या मेंदूसाठी लागणारी ऊर्जा मुबलकपणे उपलब्ध झाली. सांकेतिक तर्क हे मानवी बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य असून ती उत्क्रांतीची देण आहे. एकमेकांच्या मनातील हेतू तसेच आपल्याला काय प्रोत्साहित करते हे जाणून घेण्याच्या गरजेपोटी याची उत्पत्ती झाली असावी. यामुळे आपल्याला आपल्या समूहात समन्वय साधता आला.  

नियम क्र. 3 प्रत्येक मेंदूची जुळणी (नेटवर्क) वेगवेगळी असते.

मानवी मेंदू सदैव काहीतरी शिकत असतो त्यामुळे मेंदू आपली वायरिंग सतत बदलत असतो. आपण आपल्या आयुष्यात जे करतो आणि शिकतो त्याप्रमाणे आपला मेंदू दिसतो कारण तो अक्षरशः त्याचे री-वायरिंग करतो. मेंदूतील वेगवेगळ्या जागा भिन्न भिन्न लोकांत वेगवेगळ्या वेगाने विकसित होतात. दोन वेगवेगळ्या लोकांचे मेंदू एकच माहिती एकाच पद्धतीने एकाच जागी साठवत नाहीत. बुद्धिमान होण्याचे आपल्याकडे अनेक मार्ग आहेत आणि यातील अनेक बुद्ध्यांक मापन चाचणीत त्या व्यक्तीचा म्हणून खरा IQ दिसतच नाहीत. कारण बोरिंग (1923) या मानसशास्त्रानी बुद्धिमत्तेची कार्यात्मक व्याख्या करताना म्हणतो की “बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे जे मापन केले जाते ती बुद्धिमत्ता”. म्हणजे प्रत्यक्षात जे आहे त्याचे मापन नसून विशिष्ट चाचणीमध्ये जे काही आहे ते आपण किती उन्नत पातळीपर्यंत व्यवस्थित सोडवितो त्यावर अवलंबून असते. यावरून आपली शिक्षण व्यवस्था ही शारीरिक वयानुसार आहे ती बदलून मानसिक वयाचा विचार प्रकर्षाने व्हायला हवा.

नियम क्र. 4 आपण कंटाळवाण्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.

मानवी मनाची एक सर्वसाधारण धारणा किंवा सत्य असे आहे की आपण कंटाळवाण्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपल्या मेंदूतील लक्ष केंद्रित करू शकणारा प्रकाशबिंदू एका वेळेस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपण एका वेळेस अनेक गोष्टी करू शकत नाही, आपण अष्टावधानी नाही. आपण ज्यांना अष्टावधानी म्हणतो ते सर्वजण एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करत असतात अन्य कामे यांत्रिकपणे घडत असतात कारण ती कामे मेंदूच्या सवयीचे किंवा अंगवळणी पडलेली असतात. मकडुगल यांचा एक मानसशास्त्रीय प्रयोग आहे अवधान विभाजन याद्वारे हे सिद्ध झालेले आहे.

एखाद्या घटनेच्या तपशीलवार माहितीची नोंद करण्यापेक्षा तिची रूपरेखा पाहणे व अमूर्त गोळाबेरीज करणे आपल्याला अधिक चांगले जमते, तसेच भावनात्मक उत्तेजना मेंदूला शिकण्यात मदत करते. एक वक्ता किंवा शिक्षक म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, श्रोते दर 10 ते 15 मिनिटांनी विचलित होतात म्हणून त्यांना मूळ विषयाकडे वळवण्यासाठी आपण काही चुटकुले, किस्से अथवा भावनिक/ आवेशपूर्ण अशा घटनांचे वर्णन करावे लागते.

नियम क्र. 5 लक्षात ठेवण्यासाठी उजळणी करणे गरजेचे असते.

मेंदूत अनेक प्रकारच्या स्मृती यंत्रणा आहेत. एका प्रकारात संकेतन (Encoding), साठवण (storage), पुनःप्राप्ती (retrieval) आणि विस्मृती (forgotten) या चार स्थिती आढळतात. आपल्या मेंदूकडे येणाऱ्या माहितीचे अनेक तुकड्यांमध्ये लगेच विघटन होते व ते कॉर्टेक्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रात साठवणीसाठी पाठवले जातात. शिकलेले काही तरी लक्षातदेखील राहील, असे वाटणाऱ्या बहुतेक घटना आपण शिकण्याच्या पहिल्या काही क्षणातच लक्षात ठेवतो. आपण स्मृतीचे सुरुवातीच्या काही क्षणातच जेवढ्या विस्तृतपणे संकेतन करतो, तेवढी ती चिरकाल लक्षात राहते. आपण ज्या वातावरणात काही गोष्टी केल्या त्याची पुनर्निर्मिती त्याच वातावरणात त्या गोष्टी लक्षात ठेवण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. म्हणून अभ्यास हा नेहमी विशिष्ट स्थितीत बसूनच करावा, शक्यतो बैठक स्थिती मदतगार ठरू शकते. मानसशास्त्रात प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती थर्नडाईक यांनी मांडली, त्यामध्ये त्यांनी सरावाचे महत्त्व विशद केलेले आहे. सराव हा अध्ययनाचा महत्त्वपूर्ण नियम आहे आणि अध्ययन आणि स्मृती या परस्परावलंबी  प्रक्रिया आहेत.

नियम क्र. 6 उजळणी करावयाचे असते हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते.

मेंदूमध्ये माहिती पाठवताना वेदक (sensory), अल्पकालीन (short term) आणि दीर्घकालीन (long term) स्मृती प्रक्रिया घडून येतात.  बहुतेक आठवणी काही क्षणातच विलय पावतात; पण अस्थिर वेळेत ज्या स्मृती तग धरतात त्या काळाबरोबर दृढ होतात. हिप्पोकँपस (हा विशेषतः अल्पकालीन स्मृतींचे परिवर्तन दीर्घकालीन रुपात करण्यात व्यग्र असतो.)  व कॉर्टेक्समधील उभयपक्षी संवादामुळे दीर्घकालीन स्मृती तयार होतात. हिप्पोकँपस ही स्मृतीच्या जुळणी तोडत नाही तोवर हे तसेच राहते. त्यानंतर स्मृती कॉर्टेक्समध्ये स्थिरावते, यास अनेक वर्षे लागू शकतात. आपला मेंदू नवीन माहिती आणि जुन्या आठवणी एकत्र करून साठवतो. जेंव्हा जुन्या आणि नवीन माहितीमध्ये साहचर्य प्रस्थापित होते तेंव्हाच ते चिरकाल टिकते. साहचर्य प्रस्थापित होत नाही तोपर्यंत वस्तुस्थितीचे केवळ ढोबळ चित्र आपल्यासमोर उभे राहते. दीर्घकालीन स्मृती अधिक विश्वासार्ह बनवण्याचा मार्ग म्हणजे त्यात हळूहळू नवीन माहिती जोडणे आणि निश्चित कालावधीच्या टप्प्यात उजळणी करणे, हा होय. त्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर उजळणी करणे अपेक्षित आहे, अन्यथा स्मृती दीर्घकाळ लक्षात राहणार नाही.

नियम क्र. 7 उत्तम विचारासाठी उत्तम झोप आवश्यक असते.

आपला मेंदू आपणास सतत जागे ठेवणाऱ्या आणि झोपायला लावणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या पेशी आणि रसायनांमधील तणावाच्या स्थितीचा सामना करतो. आपण झोपलेले असताना मेंदूतील न्यूरॉन्स तीव्र लयबद्ध हालचाल दर्शवतात, बहुधा आपण दिवसभरात जे काही शिकतो, ऐकतो किंवा बघतो त्याची ही उजळणी असते. वेगवेगळ्या लोकांची झोपेची गरज भिन्न असते आणि त्याचप्रमाणे त्याची वेळसुद्धा. दुपारच्या डुलकीसाठी शारीरिक प्रेरणा मात्र सार्वत्रिक आढळते पण काही भागात ती अनिवार्य असते. निद्रानाशाचा दुष्प्रभाव एकाग्रता, प्रशासकीय कार्यक्षमता, कार्यसंबद्ध स्मरणशक्ती, कल, आकडेमोड क्षमता, तर्कसंगत विचारशक्तीवर तसेच कारक लवचीकतेवरसुद्धा पडतो. आवश्यक झोप न मिळाल्याने व्यक्तींची एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमकुवत होते, त्यांच्या कामात चुका होतात आणि  अपघातही घडू शकतात. सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार उद्भवू शकतात.

नियम क्र. 8 तणावग्रस्त परिस्थितीतून मेंदू एकसारखेच शिकत नाही.

अॅड्रेनलिन (फाइट और फ्लाइट) आणि कॉर्टिसल (एलिट स्ट्राइक फोर्स) संप्रेरके ही आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा आहेत.  ही यंत्रणा अणकुचीदार दात असलेल्या वाघाचा गंभीर हल्ला असेल अथवा क्षणार्धात नष्ट होणार्‍या धोकादायक घटनेवर लगेच प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. पण ही यंत्रणा घरातील सतत त्रास देणारे शत्रुत्व, वैरभाव यासारखे जुनाट तणाव कमी करण्यासाठीचे प्रतिसाद देण्यास सिद्ध होत नाहीत. आपण जुनाट तणावाने ग्रासलेले असताना अॅड्रेनलिन आपल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या आवरणात ओरखडे निर्माण करते व यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ते कॉर्टिसल हिप्पोकँपसच्या पेशींना इजा पोहोचविते, आपल्या शिकण्याच्या आणि स्मृतीच्या क्षमतेस कमकुवत बनविते. वैयक्तिक पातळीवर, समस्येवर आपले मुळीच नियंत्रण नाही, ही भावना सर्वांत वाईट प्रकारचा तणाव आहे, अशाप्रकारे आपण हतबल होतो. संपूर्ण समाजावर, मुलांच्या शाळेत शिकण्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या कामातील कार्यक्षमतेवर भावनात्मक तणावाचे खूप प्रचंड दुष्परिणाम होतात. आपल्या शरीराला एवढ्या सर्व संकटातून का जावे लागते? याचे उत्तर खूपच सोपे आहे. लवचिक, लगेच उपलब्ध होणाऱ्या आणि अत्यंत काटेकोरपणे तणावास प्रतिसाद देणाऱ्या या यंत्रणेशिवाय आपण सर्वजण जगूच शकत नाही. लक्षात असू द्या की, मेंदू हे आपल्याला जिवंत ठेवण्यास मदत करणारे जगातील सर्वांत अत्याधुनिक इंद्रिय आहे.

नियम क्र. 9 मेंदूची शक्ती वाढविण्यास अधिकाधिक संवेदना उत्तेजित करावे लागते.

आपण कोणत्याही घटनेशी संबंधित माहिती आपल्या संवेदनांद्वारा शोषून घेतो, त्याचे विद्युतीय संकेतांमध्ये परिवर्तन करतो (यातील काही दृष्टी व इतर ध्वनीपासून इ.), ते संकेत मेंदूच्या वेगवेगळ्या भागात वितरीत करतो आणि त्यानंतर काय घडले याची पुनर्निर्मिती करतो. यानंतर शेवटी त्याची एक संपूर्ण घटना या नात्याने जाणीव करून घेतो. हे संकेत कशाप्रकारे जोडायचे यासाठी आपला मेंदू भूतकाळातील अनुभवांवर अवलंबून असतो आणि म्हणूनच दोन लोक एकाच घटनेची जाणीव खूप वेगळ्या प्रकारे करून घेऊ शकतात.

आपल्या संवेदना एकत्र काम करतात उदा. दृष्टीचा प्रभाव श्रवणावर पडतो म्हणजेच आपण अनेक संवेदना एकाच वेळेस उत्तेजित केल्या तर आपण सर्वोत्तम प्रकारे शिकू शकतो. गंधामध्ये गत आठवणींना उजाळा देण्याचे असामान्य सामर्थ्य आहे, याचे कारण गंधाचे संकेत थॅलॅमसला न जुमानत थेट आपल्या अपेक्षित स्थानांकडे जातात त्यामुळे हे घडते. यात भावनांवर देखरेख करणारे अमेग्डलासुद्धा समाविष्ट आहे.

नियम क्र. 10 दृष्टी इतर सर्व संवेदानावर मात करते.

दृष्टी ही सर्व प्रकारात आपली सर्वश्रेष्ठ संवेदना असून ती आपल्या मेंदूतील स्रोतांचा अर्धा भाग वापरते. आपण तेच पाहतो, जे आपला मेंदू आपल्याला पाहण्यास सांगतो आणि ते शंभर टक्के अचूक नसते (दृश्यम चित्रपट जरूर पहा). आपण करत असलेल्य दृक् विश्लेषणाच्या अनेक पायऱ्या आहेत. डोळ्यांचा पडदा, फोटॉन्सना चित्रपटासारख्या माहितीच्या मालिकेत जुळवतो. दृक् कॉर्टेक्स या मालिकांवर प्रक्रिया करतो, काही गतीची नोंद करतात, इतर रंग नोंदवतात इ. अखेरीस आपण ती सर्व माहिती पुन्हा एकत्र करतो आणि मग आपल्याला पाहता येते. आपण लिखित अथवा मौखिक शब्दांपेक्षा चित्रांतून खूपच चांगल्या प्रकारे शिकतो आणि ते लक्षात ठेवतो. कारण प्रख्यात मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट मेहराबियन यांनी उक्ला येथे भावना व्यक्त करताना अशाब्दिक संवादाच्या महत्त्वावर अभ्यास केला. या अभ्यासात शब्द - 7%, आवाजातील चढउतार - 38% आणि चेहऱ्यावरील हावभाव – 55% असे संवादाचे विश्लेषण आढळते. यावरून आवाजातील चढउतार आणि चेहर्‍यावरील हावभाव संभाषणात 93% योगदान देतात.

नियम क्र. 11 पुरुष आणि स्त्रियांचे मेंदू भिन्न असतात.

पुरुषांकडे एक आणि स्त्रियांकडे दोन असणारे एक्स क्रोमोझोम आणि त्यातील एक जरी पर्यायी असला तरीही तो बोधात्मक "हॉट स्पॉट" कळीची जागा असतो आणि त्यात मेंदूच्या निर्मितीत लागणारी जनुके खूप मोठ्या प्रमाणात असतात. जनुकीयदृष्ट्या स्त्रिया अधिक गुंतागुंतीच्या असतात; कारण त्यांच्या पेशीतील सक्रिय एक्स क्रोमोझोम आई आणि वडिलांच्या पेशींचे संमिश्रण असते. पुरुषांचे सर्व एक्स क्रोमोझोम आईकडून येतात आणि त्यांचे वाय क्रोमोझोम शंभरहून कमी जनुकांचे वहन करतात आणि एक्स क्रोमोझोम त्या तुलनेत 1500 जनुकांचे वहन करतात. रचना आणि जीवरसायनशास्त्रीयदृष्ट्या पुरुष आणि स्त्रियांचे मेंदू भिन्न असतात उदा. पुरुषांकडे अधिक मोठा अमिग्डेला असतो आणि तो सेरोटोनिन अधिक वेगाने तयार करतो; परंतु या भिन्नतेला काही अर्थ आहे का हे अजून पर्यंत उलगडलेले नाही. तरीही तीव्र तणावावर स्त्रिया आणि पुरुष भिन्न प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त का करतात? यांचे उत्तर म्हणजे स्त्रिया आपल्या डाव्या अर्धगोलाचा ॲमिग्डेला कार्यान्वित करतात आणि भावनात्मक तपशील लक्षात ठेवतात. पुरुष उजवा अमिग्डेला वापरतात आणि सारांश मिळवतात. अनेक संशोधनातून असे दिसून आलेले आहे की स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा भावनिकरीत्या अधिक सक्षम असतात.

नियम क्र. 12 आपण सामर्थ्यवान आणि नैसर्गिक संशोधक असतो.

आपण कशाप्रकारे शिकत असतो, यासाठी लहान मुले आदर्श उदाहरण आहे. आपण नुसतीच वातावरणावर निष्क्रिय प्रतिक्रिया व्यक्त करून नव्हे, तर सक्रिय निरीक्षण, गृहीतक निर्माण करून, प्रयोग करून आणि निष्कर्ष काढून आपण शिकत असतो. मेंदूतील विशिष्ट भाग या शास्त्रोक्त पद्धतीस अनुमती देतात. उजवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (मेंदूचा पुढील भाग) आपल्या गृहीतकात त्रुटी शोधतो (“तीक्ष्ण सुळ्यांचा बाघ निरुपद्रवी नसतो”), आणि त्याच्या बाजूचा भाग वर्तन बदलण्यास सांगतो ("पळा”). आपल्या मेंदूभर विखुरलेल्या “प्रतिकृती चेतापेशींमुळे” आपण वर्तन ओळखू शकतो आणि त्यांचे अनुकरण करू शकतो. आपल्या प्रौढ मेंदूचे काही भाग लहान मुलाच्या मेंदूएवढे मृदू राहतात आणि त्यामुळे आपण नवीन चेतापेशी निर्माण करू शकतो आणि आपल्या आयुष्यभर नवीन गोष्टी शिकू शकतो.

समारोप

मानवी मेंदूची क्षमता सर्वसाधारण आघात शोषण्याएवढी सक्षम  असते. पण डोक्याला इजा होणे, आघातामुळे मेंदूत झालेला रक्तस्राव, विषाणूजन्य आजार, मेंदू आवरण दाह, कर्करोग, आनुवंशिक विकार, चेतापेशींचे आजार, चेतापेशींचा परस्पराशी संपर्क खंडित होणे यामुळे मेंदूच्या कार्यांत गंभीर परिणाम होतात. मेंदूचा रक्तपुरवठा काही सेकंद जरी खंडित झाल्यास मेंदूचा काही भाग पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत होतो. तसेच त्या भागाच्या कार्यात अपरिवर्तनीय बदल होतात. पाण्यात बुडणे, गुदमरणे, हवाविरहीत खोलीत अधिक वेळ काढणे अशामुळे झालेले मृत्यू हे मेंदू मृत झाल्याने होतात.

मेंदूला चालना देण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात असं तज्ज्ञ सांगतात. बौद्धिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिवसभरातील कामाचे प्राधान्यक्रम ठरावा, कामातील एकाग्रता वाढवा, एकूणच सर्सवच कामात सक्रिय रहा, नेहमी उत्साही रहा, नवनवीन गोष्टी शिकत रहा, स्वतःला पुरेसा वेळ द्या, आणि दिवसाच्या शेवटी पुनरावलोकन आवश्य करा. तसेच न्युरोबिक्स सारखे मेंदूचे व्यायाम जरूर करा यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपणास मेंदूच्या नियमाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाल्यास खालील इंग्रजी आणि मराठी अनुवादीत पुस्तक जरूर वाचावे.

https://www.psychologywayofpositivelife.com/2021/04/neurobics.htmlसंदर्भ

मेडिना, जॉन (2016). ब्रेन रुल्स, औरंगाबाद: साकेत प्रकाशन (अनुवादक -व्यंकटेश उपाध्ये)

Medina, John (2020). Brain Rules, USA: Pear Press

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2

 

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. अरिस्टॉटल

रागावर नियंत्रण ठेवण्याची तंत्रे आणि पद्धती

शिथिलीकरण

साधीसोपी शिथिलीकरण तंत्रे, जसे की खोलवर श्वासोच्छवास आणि आरामदायक स्थिती, रागाची भावना शांत करण्यात मदत करू शकतात. अशी काही पुस्तके आणि कार्यक्रम आहेत जे आपणास शिथिलीकरणाची तंत्रे शिकवू शकतात आणि एकदा का आपण ही तंत्रे शिकलात की आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचा वापर करू शकतो. जर आपण अशा नात्यात गुंतलेले असाल जिथे तुम्ही आणि तुमचा पार्टनर उग्र स्वभावाचे असाल, तर ही तंत्रे शिकणे तुमच्या दोघांसाठी चांगली कल्पना असू शकते. पण निसर्ग अशा लोकांना कमीच एकत्र येऊ देतो कारण त्यालाही स्वतःची फिकीर असेल ना! आपण प्रयत्न करू शकतो अशा काही सोप्या टिप्स:

आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा, हळूहळू आपला श्वास आता घ्या त्याची अनुभूती आपणास झाली पाहिजे तसेच उच्छवास हा हळूहळू बाहेर कसा पडतो याचीही अनुभूती घ्या.

शांतता निर्माण करणारे शब्द किंवा वाक्यांश जसे की "रिलक्स," "कुल" खोलवर श्वास घेताना पुनःपुन्हा उच्चारा. (3 इडीएटस मधील वाक्यांश छातीवर हात ठेवून म्हणा ‘आल इज वेल’)

तुमची स्मृती किंवा तुमच्या कल्पनेतून, आरामदायी अनुभवाची कल्पना करा, (व्हिज्युअलायझेशन तंत्र) एखाद्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही अनवाणी‍ पायांनी फिरत आहात अशी कल्पना करा किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आहात याची कल्पना करा.

अधिक तान द्यावे लागणार नाहीत असे सौम्य योगासनासारखे व्यायाम आपल्या स्नायूंना आराम देऊ शकतात आणि आपणास अधिक शांत वाटू शकते.

या तंत्रांचा दररोज सराव केल्यास आपणास तणावपूर्ण परिस्थितीत त्यांची आपोआप मदत होते.

बोधात्मक पुनर्रचना

सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ आपली विचार करण्याची पद्धत बदलणे. रागावलेले लोक शिव्याशाप देतात, उद्विग्नता किंवा चमत्कारिक शब्द उच्चारतात जे की त्यांचे आंतरिक  प्रतिबिंबित दर्शविते. जेव्हा आपण रागावता तेव्हा तुमची विचारसरणी अतिशोक्तीपूर्ण आणि नाटकीय असू शकते. आपले विचार अधिक तर्कसंगत विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, "अरे, हे भयानक आहे, ते अत्यंत वाईट आहे, सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे," असे स्वतःला सांगण्याऐवजी "हे किती निराशाजनक आहे, आणि त्यामुळे मी नाराज आहे याची जाणीव होणे, यामुळे काही जगाचा अंत होणार नाही आणि मा‍झ्या रागवण्याने तो काही सुटणार नाही की दुरुस्त होणार नाही.” त्यामुळे स्वतःबद्दल किंवा इतर कोणाबद्दल बोलताना "कधीही नाही" किंवा "नेहमी" यासारख्या टोकाच्या शब्दांपासून सावध रहा आणि नेहमी हे लक्षात असू दे की रागाने काहीही ठीक होणार नाही, पण प्रत्यक्षात त्रास आणि पश्चाताप मात्र होतो.

उत्तम संवादाने प्रश्न सुटतात

रागावलेले लोक निष्कर्षापर्यंत पोहोचतात - आणि त्यावर कार्य करतात - आणि त्यातील काही निष्कर्ष खूप चुकीचे असू शकतात. आपण वादविवाद सारख्या चर्चेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे संथ गतीने आणि आपल्या प्रतिसादांचा विचार करा. आपल्या डोक्यात येणारा पहिला विचार बोलू नका, शांत व्हा आणि आपणास काय म्हणायचे आहे याचा काळजीपूर्वक विचार करा. त्याच वेळी, समोरची व्यक्ती काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर देण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्या.

जेव्हा आपल्यावर टीका केली जाते तेव्हा बचावात्मक होणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्याशी लढण्यापेक्षा, त्यांनी काय उच्चारले आहे ते शांतपणे ऐका आणि अशा व्यक्तींना सौम्य शब्दात चपखलपणे उत्तर द्या. एका अर्थाने पाहिल्यास शहाण्या माणसाने मूर्खाच्या नादाला लागूच नये, शांत राहिल्याने परिस्थिती आपत्तीजनक होण्यापासून रोखता येते.

सभोवतालचे वातावरण हलके फुलके ठेवणे

"हलके फुलके विनोद" विविध मार्गांनी राग कमी करण्यास मदत करू शकतात. जेव्हा आपणास राग येतो तेव्हा, हलके फुलके विनोद मूड हलका करू शकतात आणि हे आपणास अधिक संतुलित दृष्टीकोन मिळवण्यास मदत करू शकतात. खरे तर, हास्य ही रागाच्या विसंगत भावस्थिती मानली जाते कारण काहीतरी मजेदार शोधण्याची मानसिक स्थिती रागाच्या मानसिक स्थितीशी विसंगत आहे. अगदी थोड्या क्षणासाठी, जेव्हा आपणास काहीतरी मजेदार आढळते आणि आपण हसतो तेव्हा राग नाहीसा होतो. त्यामुळे समोरची व्यक्ती रागवल्यावर व्यक्तीमध्ये किंवा आणीबाणीच्या परिस्थितीतही स्वतःला तटस्थ ठेऊन त्यामध्ये गंमत पाहण्याचा प्रयत्न करा.

आरोग्यदायी जीवनशैली

आपले शरीर हे निसर्गातील सर्वोत्तम स्वयंचलित यंत्र असून त्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्याचा वापर आपण अशक्य कामासाठी देखील करू शकतो. आरोग्यदायी जीवनशैली आचरणात आणणं, हा शरीरावर इतर कोणत्याही पदार्थांचा, उत्पादनांचा मारा करण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. आरोग्यदायी जीवनशैली आचरण न केल्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, झोपेच्या तक्रारी अलिकडे सामान्य होऊन गेलेल्या आहेत. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, सकाळचा नाष्टा पोटभर घेणे, निश्चित दिनक्रम आणि प्राधान्य क्रम आखून घेणे, इतरांशी सौजन्याने व्यवहार करणे, सदृढ नातेसंबंध जोपासणे, दिवसातून एकवेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालविणे, दुपारचे जेवण सामान्य आणि रात्रीचे जेवण हलके फुलके असावे आणि रात्री दहाच्या आत झोपी जाणे यामुळे मेंदूचे घड्याळ व्यवस्थित कामा करण्यास मदत होते.

राग आलाच नाहीतर काय होईल

आपण आपली नैसर्गिक आणि स्वाभाविक रागाची भावना व्यक्त केलीच नाही तर काय होऊ शकते यासाठी एक साधू आणि साप यांची कथा पाहू या.

जंगलात एक विषारी साप राहत होता. तो जंगलाच्या एका कोपऱ्यात संचार करायचा आणि तिकडे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. एके दिवशी एक साधू तेथे तपश्चर्या करायला आला. सापाने साधूला सगळी हकीकत सांगितली की लोक त्याला घाबरून त्याच्याजवळ कोणी येतच नाही. साधूने सापाला समजावले की त्याने कोणालाही दंश करू नये. साधूने आपल्या आशीर्वादाने सापाचे विषही संपवले. काही दिवसांनी साधू जंगल सोडून गेला. त्यानंतर काही दिवसांनी तो परत आला तेव्हा त्याला अर्धमेल्या अवस्थेत साप दिसला. चिंतित होऊन साधूने सापाला याचे कारण विचारले. साप सांगू लागला, जेव्हा मी लोकांना चावणे बंद केले तेव्हा त्यांनी मला घाबरणे सोडले. त्यांनी माझ्यावर दगडफेक सुरू केली. एवढेच नाही तर त्यांनी मला दोरी म्हणून वापर केला अनेक तर्‍हेने माझे हालाहल केले. यावर साधू म्हणाले, जे तुमचे नुकसान करतात त्यांच्यापासून तुम्ही स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही अस्त्र दिलेले आहे त्यांचा वापर समोरच्या व्यक्तीला घाबरण्यासाठी करायला हवे. साधूने सापाला सांगीतले की तू केवळ स्वत:च्या रक्षणासाठी फणा काढ म्हणजे समोरचा समजून जाईल की थांबले पाहिजे. सापाने त्याचे पालन केले आणि आनंदी जीवन जगू लागला. त्यामुळे निसर्गाने बहाल केलेले रागाचे अस्त्र कोठे, केंव्हा, कसे, आणि किती प्रमाणात वापरायचे हेच व्यवस्थापन आहे.

रागाने आपल्यावर नियंत्रण मिळवण्याआधी आपण रागावर नियंत्रण मिळवू या!

एक आजोबा आपल्या नातवाला एक प्राचीन दंतकथा सांगतात “दोन प्रचंड लांडगे प्रत्येकाच्या हृदयात आरामात, एक पांढरा आणि काळा. पांढरा लांडगा चांगला, दयाळू आणि प्रेमळ आहे, त्याला सुसंवाद आवडतो आणि जेव्हा स्वतःचे संरक्षण करण्याची किंवा प्रियजनांची काळजी घेण्याची गरज असते तेव्हा तो ठामपणे अडचणीसमोर उभा राहतो. दुसरा काळा लांडगा हिंसक आणि संतापलेला असतो. अनावश्यक घटनांनी रागावतो आणि सतत विनाकारण भांडत राहतो. त्याचे विचार द्वेषाने भरलेले असल्याने त्याचा राग निरुपयोगी आहे आणि त्यामुळेच तो समस्या निर्माण करतो. हे दोन लांडगे माझ्या हृदयात नेहमी भांडत राहतात ”.

नातवाने विचारले: "शेवटी, दोन्ही लांडग्यापैकी कोण जिंकतो?"

अजोबाने उत्तर दिले: “दोघेही, कारण मी फक्त पांढऱ्याला लांडग्याला खायला घातले, तर काळा लांडगा अंधारात लपून बसेल आणि माझे लक्ष विचलित झाल्यावर, पांढऱ्या लांडग्यावर प्राणघातक हल्ला करेल. त्याउलट, जर मी दिले लक्ष दिले आणि तिचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मी तिची शक्ती करू शकतो."

नातू गोंधळून गेला: "हे दोघे जिंकणे कसे शक्य आहे?"

आजोबाने हसत हसत स्पष्ट केले की, “काळ्या लांडग्याचे काही गुण आपल्याला काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असू शकतात, कारण तो बिनधास्त व दृढनिश्चयी आहे, तो हुशार आहे आणि त्याच्या संवेदनाही तीव्र आहेत. अंधाराची सवय असलेले त्याची डोळे आपल्याला धोक्यासंबंधी इशारा देतात आणि आपला बचाव करू शकतात. जर मी त्या दोघांना खायला घातले तर मा‍झ्या मनावर विजय मिळवण्यासाठी त्यांना भांडण करावे लागणार नाही, म्हणून केव्हा कोणता लांडगा निवडायचा हे मी ठरवू शकतो."

ही कथा आपल्यासाठी एक अत्यंत मौल्यवान धडा देते, दडलेला राग हा भुकेल्या लांडग्यासारखा आहे, जो खूप धोकादायक आहे. आपणास हे कसे नियंत्रीत करावे हे न कळल्याने ते कोणत्याही क्षणी आपला ताबा घेतील. या कारणास्तव, आपण आपल्या नकारात्मक भावना न लपवता आणि न दाबता त्या बिनशर्त स्वीकारल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आणीबाणीच्या परिस्थितीत वापरल्या पाहिजेत. ‘वेनम’ हा हॉलीवूडपट 2018 मध्ये प्रसारित झाला होता त्यामध्ये एका पत्रकाराच्या शरीरात एलियन प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल होतात तो एकाच वेळी शांत आणि भयंकर रूप धारण करू शकला कारण तो त्या काळ्या एलियनला नियंत्रित करू शकत होता.

समारोप:

जेव्हा आपण रागवतो आणि त्या अवस्थेत बोलतो तेंव्हा ते आपले सर्वोत्तम भाषण ठरू शकेल पण त्याचा पश्चाताप नेहमी होईल. रागाला धरून ठेवणे म्हणजे दुसर्‍यावर फेकण्याच्या उद्देशाने गरम कोळसा पकडण्यासारखे आहे; त्यामुळे दुसर्‍याला काहीही इजा होणार नही पण आपण मात्र होरपळून निघू. तथागत बुद्ध म्हणतात की, रागाला धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीने मरावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. त्यामुळे रागवलेल्या अवस्थेतील प्रत्येक मिनिटामध्ये आपण आनंदाचे 60 सेकंद गमावतो हे लक्षात असू दे. आपला प्रत्येक सेकंद आरोग्यपूर्ण आणि आनंदाने व्यतीत होवो हीच प्रार्थना!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन | Cortisol Harmone

  कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन ताण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परीक्षा , कामाचा ताण , आर्थिक अडचणी , वैयक्तिक संबंधांमधील समस्...