गुरुवार, ३ जुलै, २०२५

PERMA मॉडेल: सकारात्मक मानसशास्त्राची ओळख

 

PERMA मॉडेल: सकारात्मक मानसशास्त्राची ओळख

      सकारात्मक मानसिक आरोग्य हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. जीवनातील केवळ समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, व्यक्तीच्या उत्क्रांतीकडे, सकारात्मक अनुभवांकडे आणि वैयक्तिक समृद्धीकडे लक्ष देणाऱ्या दृष्टिकोनाला "सकारात्मक मानसशास्त्र" (Positive Psychology) म्हणतात. याच प्रवाहात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ज्यांना सकारात्मक मानसशास्त्राचे जनक म्हणतात असे डॉ. मार्टिन सेलिगमन (Martin Seligman) यांनी एक अत्यंत प्रभावशाली सिद्धांत मांडला त्यास PERMA मॉडेल म्हणतात. PERMA हे पाच मूलभूत घटकांचे एक संक्षिप्तरूप आहे, जे व्यक्तीच्या जीवन-कल्याणाची (well-being) मांडणी करते.

Positive Emotion (सकारात्मक भावना)

सकारात्मक भावना म्हणजे अशा भावनिक अवस्था ज्यामुळे व्यक्तीला अंत:प्रेरणा, ऊर्जा, आत्मिक समाधान आणि सामाजिक आधार मिळतो. यात आनंद (joy), समाधान (contentment), कृतज्ञता (gratitude), प्रेम (love), अभिमान (pride), उत्साह (excitement), आशा (hope) यांसारख्या भावना अंतर्भूत असतात. या भावना जीवनातील चांगल्या अनुभवांचे प्रतिबिंब असतात आणि त्या व्यक्तीच्या संपूर्ण मन:स्वास्थ्यावर खोलवर प्रभाव टाकतात.

डॉ. मार्टिन सेलिगमन यांच्या PERMA मॉडेलमध्ये सकारात्मक भावना हा पहिला आणि मूलभूत घटक आहे. सेलिगमन (2011) यांनी स्पष्टपणे सांगितले की, केवळ "आनंदी" असणं म्हणजे जीवन-कल्याण (well-being) नव्हे; परंतु सकारात्मक भावना ही संपूर्ण मानसिक आरोग्याची एक अत्यावश्यक पूर्वअट आहे, कारण ती व्यक्तीच्या जगण्याच्या दृष्टीकोनावर परिणाम करते. सकारात्मक भावना व्यक्तीच्या आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते ज्यामुळे, संकटांच्या वेळीही व्यक्तीला आशावाद टिकवता येतो.

या भावनांचे फायदे केवळ मानसिक पातळीवर मर्यादित नसतात, तर त्या जैविक व सामाजिक पातळीवरही परिणाम करतात. उदाहरणार्थ, Barbara Fredrickson यांच्या Broaden-and-Build Theory of Positive Emotions (2001) नुसार, अशा भावना व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेला आकार देतात. त्या व्यक्तीला अधिक कल्पक, लवचिक आणि जुळवून घेणारा बनवतात. नकारात्मक भावनांमध्ये व्यक्ती 'लढा की पळा' या संकुचित मानसिकतेमध्ये अडकते, तर सकारात्मक भावना मोकळ्या आणि नवीन शक्यता उघडणाऱ्या असतात. यामुळे व्यक्ती दीर्घकालीन सामाजिक, बौद्धिक व भावनिक संसाधने निर्माण करते.

उदाहरणार्थ, दररोज कृतज्ञतेची नोंद ठेवणे (Gratitude Journal) हा एक प्रभावी मानसिक सराव मानला जातो. Emmons & McCullough (2003) यांच्या संशोधनानुसार, जे लोक दररोजच्या जीवनातील चांगल्या गोष्टींची नोंद घेतात, त्यांची आनंदाची पातळी जास्त असते, झोप चांगली लागते, आणि त्यांना सामाजिकदृष्ट्या अधिक समाधान मिळते. यामुळे त्यांच्या शरीरातील कॉर्टिसॉलसारखे तणावदायक हार्मोन्स कमी होतात आणि प्रतिकारशक्ती वाढते.

याशिवाय, सकारात्मक भावना सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता वाढवतात. Isen et al. (1987) यांच्या प्रयोगांमध्ये आढळले की, जेव्हा व्यक्ती आनंदी किंवा सकारात्मक भावनिक स्थितीत असते, तेव्हा ती अधिक प्रभावीपणे समस्या सोडवते, वेगवेगळे पर्याय शोधते आणि धोरणात्मक निर्णय घेते. हे व्यवसाय, शिक्षण आणि नातेसंबंधांच्या दृष्टीनेही अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच, सकारात्मक भावना दीर्घायुष्यासही प्रोत्साहन देतात. Danner, Snowdon & Friesen (2001) यांनी केलेल्या Longitudinal संशोधनात असे आढळले की, ज्या व्यक्तींनी त्यांच्या तरुण वयात जास्त सकारात्मक भावना दर्शवल्या होत्या, त्या इतरांपेक्षा सरासरी 7 ते 10 वर्षांनी जास्त जगल्या.

सकारात्मक भावना या केवळ "भावनिक" नसून, त्या मानसिक, सामाजिक व शारीरिक आरोग्याला पोषक असतात. PERMA मॉडेलमधील हा घटक व्यक्तीला आतून सशक्त करतो आणि तिच्या जीवनाचा दर्जा वाढवतो. अशा भावना जाणूनबुजून विकसित करता येतात, जसे की कृतज्ञतेची नोंद ठेवणे, चांगल्या आठवणी पुन्हा अनुभवणे, आणि आपल्या आयुष्यातील शुभ गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे.

Engagement (तल्लीनता)

Engagement (तल्लीनता) PERMA मॉडेलमधील दुसरा घटक म्हणजे असा अनुभव जिथे व्यक्ती स्वतःला एखाद्या कृतीत पूर्णपणे गुंतते, तल्लीन होते, आणि तिचे संपूर्ण लक्ष त्या क्षणी चालू असलेल्या कृतीवर केंद्रित असते. ही संलग्नता इतकी तीव्र असते की व्यक्तीला वेळ, थकवा, उपद्रव किंवा स्वतःचे अस्तित्व यांचीही जाणीव राहत नाही. या अवस्थेला मानसशास्त्रीय परिभाषेत “Flow” असं म्हणतात (Csikszentmihalyi, 1990).

'Flow' ही संकल्पना प्रसिद्ध हंगेरी-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ मिहाय चिक्सेंटमिहाय (Mihaly Csikszentmihalyi) यांनी 1975 मध्ये मांडली. त्यांच्या मते, Flow ही अशी मानसिक अवस्था आहे जिथे व्यक्ती आव्हान आणि स्वतःच्या कौशल्यांची पातळी यामध्ये योग्य संतुलन साधते. जिथे हे संतुलन साधले जाते, तिथे तल्लीनता निर्माण होते.

Flow अवस्थेतील व्यक्ती खालील लक्षणे अनुभवते (Csikszentmihalyi, 1990):

  • स्पष्ट उद्दिष्टे (clear goals) असतात
  • तात्काळ अभिप्राय (immediate feedback) मिळत असतो
  • कृती व चेतना यांचे विलीनीकरण होते (merging of action and awareness)
  • वेळेचं भान हरवतं (distorted sense of time)
  • स्वतःचं भान नाहीस होतं (loss of self-consciousness)
  • कृती स्वतःसाठीच प्रेरणादायक वाटते (intrinsic motivation)

डॉ. मार्टिन सेलिगमन यांच्या मते, सकारात्मक भावना क्षणिक असू शकतात, पण Engagement ही दीर्घकालीन समाधानाचा पाया असते. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात गुंतते; जसे की संगीत, कला, खेळ, संशोधन, अध्यापन किंवा सामाजिक कार्य तेव्हा ती आपल्या 'श्रेष्ठ अनुभवाच्या' स्थितीकडे वाटचाल करते. ही स्थिती व्यक्तीला अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक मानसिक पोषण पुरवते (Seligman, 2011). तसेच, Engagement हे व्यक्तीचे स्व-भान कमी करते (self-transcendence), स्व-सामर्थ्य वाढवते (self-efficacy) आणि चिंता व नैराश्य कमी करते (Fredrickson, 2001). खालील काही उदाहरण आपणास सखोल माहिती पुरवतात.

  • चित्रकाराची तल्लीनता: एक चित्रकार जेव्हा रंग, रचना, आणि कल्पनेच्या बिंदूंना जोडून चित्र काढत असतो, तेव्हा त्याचं लक्ष बाह्य जगावरून पूर्णपणे त्या कलेत गुंतलेलं असतं. त्याला वेळेचं भान राहत नाही आणि चित्र पूर्ण होईपर्यंत तो “flow” मध्ये असतो.
  • खेळाडूचा अनुभव: एखादा क्रिकेटपटू जेव्हा चेंडूवर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करतो, त्याची हालचाल, प्रतिसाद आणि निर्णय अत्यंत नैसर्गिक आणि सहज वाटतात. या क्षणी तो खेळाडू, प्रतिस्पर्धी आणि स्वतःच्या हालचालींमध्ये तल्लीन असतो.
  • वाचन किंवा लेखन प्रक्रिया: संशोधक किंवा लेखक जेव्हा त्यांच्या विषयात इतके गुंततात की त्यांना तहान-भूक, थकवा किंवा वेळ याची जाणीव राहत नाही, तो अनुभव देखील Flow चा भाग आहे.

Engagement किंवा संपूर्ण तल्लीनता म्हणजे केवळ वेळ घालवणे नव्हे, तर जीवनाशी प्रामाणिक नातं तयार करणे आहे. Flow ही केवळ कलात्मक किंवा खेळांशी संबंधित संकल्पना नसून, ती शैक्षणिक, व्यवसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील प्रत्येक घटकास लागू होते. PERMA मॉडेलमध्ये Engagement हे एक असे केंद्रबिंदू आहे जे व्यक्तीच्या अंतर्गत प्रेरणा, समाधान आणि दीर्घकालीन आनंदाची गुरुकिल्ली ठरते.

Relationships (सकारात्मक नातेसंबंध):

PERMA मॉडेलमधील Relationships म्हणजे सकारात्मक, आधारभूत नातेसंबंध. डॉ. मार्टिन सेलिगमन यांच्या मते, कोणतेही खरे व दीर्घकालीन जीवन-कल्याण (well-being) हे एकट्याने साध्य होणारे नसते. माणसाचे मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य त्याच्या इतर व्यक्तींशी असलेल्या परस्परसंबंधांवर अवलंबून असते (Seligman, 2011). आपण जसे सकारात्मक भावना अनुभवतो तसेच, प्रेम, आपुलकी, सहानुभूती, सहकार्य, विश्वास आणि मैत्री या गुणांनी युक्त नातेसंबंध आपल्याला मानसिक स्थैर्य प्रदान करतात.

मानवाच्या जैविक रचनेपासूनच सामाजिकतेची मुळे खोलवर रोवलेली आहेत. Aristotle पासून ते Abraham Maslow पर्यंत अनेक तज्ज्ञांनी सामाजिक गरजेला मूलभूत मानले आहे. Maslow च्या 'Hierarchy of Needs' मध्येही सामाजिक नातेसंबंध (belongingness and love needs) या दुसऱ्या स्तरावर येतात, जे स्व-सन्मान आणि स्व-साक्षात्काराकडे नेणारे महत्त्वाचे टप्पे आहेत (Maslow, 1943). सामाजिक नातेसंबंध नसणे, किंवा नकारात्मक नातेसंबंध असणे, हे मानसिक आजारांचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. संशोधनातून हे दिसून आले आहे की एकाकीपणाची भावना (loneliness) ही अवसाद, चिंता आणि cognitive decline यांसारख्या स्थितींशी संबंधित असते (Hawkley & Cacioppo, 2010).

सकारात्मक नातेसंबंधांचा अनुभव घेताना व्यक्तीला सामाजिक आधार मिळतो, जो तणावाचे व्यवस्थापन, स्व-मूल्यवृद्धी, आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेषतः दीर्घकालीन मैत्री, भावनिक संवाद, कुटुंबातील निकटता, आणि सहकाऱ्यांशी व्यावसायिक परंतु माणुसकीने भरलेले संबंध हे व्यक्तीच्या वैयक्तिक विकासाला चालना देतात (Reis & Gable, 2003).

उदाहरणार्थ, कुटुंबासोबत एकत्र जेवण घेणे, सुटीच्या दिवशी पालकांसोबत गप्पा मारणे, मैत्रिणीशी मनमोकळेपणाने बोलून मानसिक भार हलका करणे किंवा सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे ही सर्व कृती परस्परविश्वास आणि सामर्थ्याचे वातावरण तयार करतात. ही सकारात्मकता पुढे जाऊन टीमवर्क, परानुभूती (empathy), आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याचे कार्य करते.

PERMA मॉडेलच्या दृष्टिकोनातून पाहता, नातेसंबंध ही केवळ भावना नव्हे तर ती एक समृद्ध अनुभव आहे जो व्यक्तीच्या मानसिक उत्क्रांतीला दिशा देतो. म्हणूनच, शाळा, कॉलेज, कार्यक्षेत्र, किंवा वैयक्तिक आयुष्य असो सकारात्मक संबंध जाणीवपूर्वक निर्माण व जोपासणे ही मानसिक आरोग्य जपण्याची गुरुकिल्ली आहे.

Meaning (अर्थपूर्णता):

PERMA मॉडेलमधील चौथा घटक अर्थपूर्णता ही मानवी अनुभवाची एक अत्यंत मुलभूत भावना आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन सेलिगमन (Seligman, 2011) यांच्या मते, मनुष्याच्या दीर्घकालीन आनंदात केवळ क्षणिक भावनांचाच नव्हे, तर त्या व्यक्तीने स्वतःला कोणत्यातरी व्यापक, स्वतःहून मोठ्या उद्दिष्टाशी जोडल्याची भावना असणेही तितकेच महत्त्वाचे असते. हे उद्दिष्ट धार्मिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक किंवा आध्यात्मिक रूपात असू शकते.

अर्थपूर्णता म्हणजे केवळ "आहे" त्यात समाधान मानणे नाही, तर "का" आपण हे करतो, या प्रश्नाचं उत्तर शोधणं होय. जबाबदारीची जाणीव, इतरांकरिता काहीतरी उपयोगी असणं, भविष्यात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा हे सर्व घटक "अर्थ" या संकल्पनेचे अंगभूत भाग आहेत (Frankl, 1985). उदाहरणार्थ, एखाद्या सामाजिक संस्थेत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारा स्वयंसेवक, केवळ वेळ घालवत नसतो, तर तो एका व्यापक सामाजिक परिवर्तनाचा भाग बनतो त्यातून त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा एक घनिष्ट अर्थ गवसतो.

विक्टर फ्रँकल (Frankl, 1985), ज्यांनी Logotherapy नावाची अर्थ-आधारित मानसोपचार पद्धत विकसित केली, त्यांचं म्हणणं होतं की, "मानवाचा प्रमुख उद्देश सुख नव्हे, तर अर्थ आहे." त्यांनी नाझी छळछावण्यांतील अनुभवातून हे अधोरेखित केलं की, ज्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात कोणताही अर्थ सापडत नाही, त्यांची मानसिक खच्चीकरणाची शक्यता अधिक असते, तर अर्थ शोधणाऱ्यांमध्ये आशा आणि जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा टिकून राहते.

अर्थपूर्णता अनेक मार्गांनी सापडू शकते:

  • सामाजिक कार्यामधून — इतरांसाठी काम करण्यातून स्व-अस्तित्वाच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन योगदान देण्याची भावना निर्माण होते.
  • कौटुंबिक जबाबदाऱ्या — आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून आपण जो सकारात्मक परिणाम घडवतो, त्यातून अर्थाची भावना निर्माण होते.
  • निसर्गप्रेम वा विज्ञान — जेव्हा आपण एखाद्या मोठ्या सत्याच्या शोधात असतो, तेव्हा ते आपल्याला एका उच्च हेतूशी जोडतं.

एक महत्त्वाचा अभ्यास म्हणजे Baumeister आणि Vohs (2002) यांनी दाखवले की, “अर्थपूर्ण जीवन” हे अनेकदा “आनंदी जीवना”पेक्षा वेगळं असतं. एखादी व्यक्ती आयुष्यातून अर्थ घेत असते, जरी त्या प्रवासात संघर्ष, वेदना किंवा त्याग असेल तरीही. उदाहरणार्थ, एक सामाजिक कार्यकर्ता दैनंदिन संघर्षांतून जात असतो, पण त्याला त्याच्या कामात अर्थ वाटतो त्यामुळे त्याचं मानसिक आरोग्य आणि जीवनाचं समाधान टिकून राहतं.

शैक्षणिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक संदर्भातही अर्थपूर्णतेचं महत्त्व वाढलं आहे. Steger et al. (2006) च्या संशोधनातून हे दिसून आलं की, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात अर्थ सापडतो, ते अधिक प्रेरित असतात, त्यांची उपस्थिती सुधारते आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते.

Accomplishment (साध्य / प्राप्ती):

PERMA मॉडेलमधील ‘Accomplishment’ म्हणजेच "साध्य" हा घटक व्यक्तीच्या मानसिक समृद्धीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. डॉ. मार्टिन सेलिगमन (Seligman, 2011) यांच्या मते, मानवाला केवळ आनंद किंवा अर्थपूर्ण अनुभवच नव्हे, तर काही गोष्टी ‘पूर्णत्वास नेणे’ याचाही तितकाच मानसिक फायदा होतो. आपल्यासाठी महत्त्वाची वाटणारी उद्दिष्टे गाठण्याच्या प्रक्रियेमुळे एक सकारात्मक प्रेरणा निर्माण होते, जी मन:स्वास्थ्य, स्व-सन्मान आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करते.

साध्याची भावना ही प्रामुख्याने अंतर्गत प्रेरणेवर आधारित असते. हे उद्दिष्ट केवळ बाह्य बक्षिसांसाठी गाठले जात नाहीत, तर त्या उद्दिष्टांमध्ये एक प्रकारचा ‘स्वतःसाठी महत्त्व’ असतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः ठरवलेल्या उद्दिष्टांवर सातत्याने काम करते आणि अखेर त्यात यश मिळवते, तेव्हा तिच्या मनात एक "पूर्णत्व" (fulfillment) आणि "स्वीकृती" (self-acceptance) यांची अनुभूती होते. हेच दीर्घकालीन मानसिक समाधानासाठी अत्यंत महत्त्वाचे असते (Ryan & Deci, 2000).

Accomplishment मुळे व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास बसतो. एखादे कार्य पूर्ण केल्यावर ‘मी हे करू शकलो’ अशी भावना स्व-सामर्थ्य वाढवते (Bandura, 1997). ही स्व-सामर्थ्याची भावना पुढील उद्दिष्टांच्या दिशेने काम करण्यासाठी प्रेरणा देते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जर शैक्षणिक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करतो, तर त्याला पुढील वर्ष अधिक आत्मविश्वासाने पार पाडण्याची ऊर्जा मिळते.

याशिवाय, साध्य केलेल्या गोष्टींमुळे व्यक्ती सामाजिक स्तरावरही सकारात्मक प्रतिमा निर्माण करते. लोक त्याच्या प्रयत्नांना आणि सातत्याला ओळखू लागतात. यामुळे समाजातील स्थान बळकट होते, जे मानसिक आरोग्याला बळकटी देते (Lyubomirsky, Sheldon & Schkade, 2005).

Accomplishment हा घटक जीवनात प्रगती, मूल्यनिर्मिती आणि वैयक्तिक समाधानासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ अंतिम यश मिळवण्याबद्दल नसते, तर त्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाबद्दल असते. PERMA मॉडेलमध्ये Accomplishment या घटकाच्या समावेशामुळे सकारात्मक मानसशास्त्र फक्त भावनिक किंवा सामाजिक घटकांवर केंद्रित राहत नाही, तर व्यक्तीच्या उद्दिष्टप्रधान प्रेरणा आणि स्व-घटकांवरही भर देते.

समारोप:

PERMA मॉडेल हे केवळ मानसिक आरोग्य सुधारण्याचे साधन नाही, तर एक जीवनदृष्टी आहे. डॉ. मार्टिन सेलिगमन यांनी हे मॉडेल जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करून, व्यक्तीला यथार्थ जीवनाकडे नेणारा आराखडा दिला आहे. आजच्या धावपळीच्या आणि अनिश्चिततेच्या युगात PERMA मॉडेलमधील प्रत्येक घटक अधिक अर्थपूर्ण आणि आवश्यक वाटतो.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Bandura, A. (1997). Self-efficacy: The exercise of control. W.H. Freeman.

Baumeister, R. F., & Vohs, K. D. (2002). The pursuit of meaningfulness in life. Psychological Inquiry, 13(4), 80–83.

Csikszentmihalyi, M. (1990). Flow: The Psychology of Optimal Experience. Harper & Row.

Danner, D. D., Snowdon, D. A., & Friesen, W. V. (2001). Positive emotions in early life and longevity: Findings from the nun study. Journal of Personality and Social Psychology, 80(5), 804–813.

Dhar, N., & Jain, S. (2020). Spiritual well-being, meaning in life and psychological health. Indian Journal of Health and Wellbeing, 11(2), 165–170.

Emmons, R. A., & McCullough, M. E. (2003). Counting blessings versus burdens: An experimental investigation of gratitude and subjective well-being. Journal of Personality and Social Psychology, 84(2), 377–389.

Frankl, V. E. (1985). Man’s Search for Meaning. Washington Square Press.

Fredrickson, B. L. (2001). The role of positive emotions in positive psychology: The broaden-and-build theory of positive emotions. American Psychologist, 56(3), 218–226.

Hawkley, L. C., & Cacioppo, J. T. (2010). Loneliness matters: A theoretical and empirical review of consequences and mechanisms. Annals of Behavioral Medicine, 40(2), 218–227.

Isen, A. M., Daubman, K. A., & Nowicki, G. P. (1987). Positive affect facilitates creative problem solving. Journal of Personality and Social Psychology, 52(6), 1122–1131.

Lyubomirsky, S., Sheldon, K. M., & Schkade, D. (2005). Pursuing happiness: The architecture of sustainable change. Review of General Psychology, 9(2), 111–131.

Maslow, A. H. (1943). A Theory of Human Motivation. Psychological Review, 50(4), 370–396.

Reis, H. T., & Gable, S. L. (2003). Toward a positive psychology of relationships. In Keyes, C. L. M. & Haidt, J. (Eds.), Flourishing: Positive Psychology and the Life Well-Lived (pp. 129–159). American Psychological Association.

Ryan, R. M., & Deci, E. L. (2000). Self-determination theory and the facilitation of intrinsic motivation, social development, and well-being. American Psychologist, 55(1), 68–78.

Seligman, M. E. P. (2011). Flourish: A Visionary New Understanding of Happiness and Well-being. Free Press.

Steger, M. F., Frazier, P., Oishi, S., & Kaler, M. (2006). The meaning in life questionnaire: Assessing the presence of and search for meaning in life. Journal of Counseling Psychology, 53(1), 80–93.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

सत्य हे नेहमीच विरोधाभासी असते

  सत्य हे नेहमीच विरोधाभासी असते | The truth is always contradictory जर एखादं तथाकथित ' सत्य ' संपूर्ण सुसंगत , स्पष्ट आणि विसंवाद...