अवसाद किंवा औदासीन्य (Depression)
एकविसाव्या शतकात प्रत्येकजण ताण-तणावाशी झगडत आहे. अशी मानसिक स्थिती
कमिअधिकपणे आपण प्रत्येकजण अनुभवतो. आपली मानसिक स्थिती आणि बाह्य परिस्थितीमध्ये संतुलन
आणि सुसंवाद निर्माण न झाल्याने तणाव निर्माण होतो. तणावामुळे आपल्या जीवनात अनेक मनोविकार
उद्भवत असतात. सामान्यपने दैनंदिन जीवनात थोड्या प्रमाणात ताण-तणाव असणे समस्या नसून
आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी असा ताण घेणे आवश्यक आहे, परंतु जर ते
आपल्या भावनिक आणि शारीरिक जीवनाचा भाग बनले तर ते धोकादायक सिद्ध होऊ शकतात. आपल्या जीवनात केंव्हातरी आपण निरुत्साह आणि निराश यासारख्या नकारात्मक
भावनांचा अनुभव घेतलेला आहे. अपयश, संघर्ष आणि नातेसंबंधातील दुराव्यामुळे दु:खी होणे सामान्य आहे. परंतु जर निरुत्साह,
दुःख, असहायता, निराशा
यासारख्या भावना काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकून राहत असतील आणि
एखाद्या व्यक्तीला आपली दैनंदिन कामे करण्यात अडथळा निर्माण होत असेल तर ते औदासीन्य/
अवसाद (depression) या
मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात.
WHO (2018) च्या मते, जगभरात 30 करोडपेक्षा अधिक लोक या
समस्येने ग्रस्त आहेत, भारतात ही संख्या 5 कोटींपेक्षा जास्त
आहे जी सद्यपरिस्थितीमध्ये एक अतिशय गंभीर समस्या आहे. अवसाद साधारणपणे किशोरावस्था
किंवा 30 ते 40 वयोगटात सुरू होते, पण हे कोणत्याही वयात
उद्भवू शकते. पुरुषांपेक्षा महिला अवसादग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. मानसिक
घटकांव्यतिरिक्त, हार्मोन्सचे असंतुलन, गर्भधारणा आणि अनुवांशिक विकार देखील अवसादास कारणीभूत ठरू शकतात.
अवसादाची कारणे:
- आयुष्यात होणारे मोठे बदल जसे की दुर्घटना, नोकरी-व्यवसायातील बदल किंवा जीवनातील संघर्ष, कुटुंबातील सदस्याचा किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक समस्या किंवा तत्सम गंभीर बदल.
- रजोनिवृत्ती, थायरॉईड इत्यादी हार्मोन्समधील बदलांमुळे येणाऱ्या समस्या.
- कधीकधी हवामानातील बदलामुळे अवसाद उद्भवते. हिवाळ्यात जेव्हा दिवस छोटा असतो किंवा सूर्य दिसत नाही तेव्हा बर्याच लोकांना दररोजच्या कामांमध्ये सुस्तपणा, थकवा आणि कंटाळा जाणवते. परंतु हिवाळा संपल्यावर ही स्थिती बरी होते.
- आपल्या मेंदूत डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडोर्फिन सारखे न्यूरोट्रांसमीटर आनंदाची भावना निर्माण करतात परंतु अवसादाच्या बाबतीत यामध्ये असमतोल असू शकते. या न्यूरोट्रांसमीटरच्या असंतुलनामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये अवसाद येऊ शकते.
- काही अवसाद प्रकरणांमध्ये अनुवंश हा घटक कारणभूत असू शकतो. जर ही समस्या कुटुंबात घडली असेल तर पुढील पिढीमध्ये होण्याची शक्यता वाढते, परंतु त्यामध्ये कोणत्या जीनचा सहभाग आहे, हे अद्याप ज्ञात नाही.
अवसादाची
लक्षणे:
अवसादाच्या लक्षणांची संख्या आणि तीव्रतेवर अवलंबून त्याचे अनेक प्रकार पडतात. निम्न, मध्यम ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे अवसाद असू शकतात, त्यामुळे यशस्वी उपचार होण्यासाठी चिकित्सक तपासणी आवश्यक आहे. वेगवेगळ्या लोकांमध्ये अवसादाची वेगवेगळे लक्षणे असतात.
- दिवसभर आणि विशेषत: सकाळी निरुत्साह वाटणे.
- दररोज थकवा आणि कमजोर वाटत राहणे.
- स्वत:ला अयोग्य किंवा दोष देणे.
- लक्ष केंद्रित करण्यात आणि निर्णय घेण्यात अडचणी.
- नेहमी खूप जास्त किंवा कमी झोप असणे.
- कोणत्याही कामात उत्साह नसणे त्यामुळे कामातील निरसाता.
- बेचैनी किंवा आळशीपणाची भावना.
- अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे.
- मृत्यू किंवा आत्महत्येचे विचार वारंवार येणे.
एखाद्या व्यक्तीस 2 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ यापैकी 5 किंवा
त्यापेक्षा जास्त लक्षणे असल्यास, डीएसएम -5 (चाचणी तंत्र) नुसार, त्या व्यक्तीस अवसादाचा
त्रास असू शकतो. अवसाद ही एक मानसिक समस्या आहे परंतु यामुळे रुग्णाला शारीरिक
त्रासदेखील होतो जसे की थकवा, अशक्तपणा किंवा लठ्ठपणा, हृदयरोग, डोकेदुखी, अपचन इ. या
कारणास्तव, अनेकवेळा रुग्ण या शारीरिक लक्षणांवर उपचार
करण्यासाठी कल असतो, परंतु या लक्षणांच्या मुळात लपलेले अवसाद
दिसून येत नाही. अवसादाची चाचणी करून घेणे ही अवसादाची कारणे शोधण्यासाठी फार
महत्वाचे आहे. आपण जितका वेळ शारीरिक उपचारासाठी घालवू तितके अधिक तीव्र स्वरूप अवसाद
धारण करते त्यामुळे सुरुवातीलाच सपुदेशक, मानसोपचारतज्ज्ञ व मनोचिकित्सक यांची भेट
घेणे खूपच गराजचे असते.
आपणास ऑनलाइन अवसाद चाचणी करून घेणेसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.psycom.net/depression-test/
आजकाल अवसादासाठी बरेच वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. एक मनोचिकित्सक अवसादाचे
प्रकार आणि तीव्रतेवर आधारित समुपदेशन, मानसोपचार पद्धती, औषधे किंवा
मिश्रित पद्धती यासारखे योग्य उपाय निवडतात. योग्य उपचारानंतर, बहुतेक अवसादग्रस्त
रुग्ण पूर्णपणे बरे होतात आणि सर्वसामान्य जिवन जगण्यास सक्षम बनतात. एखाद्या जवळच्या
व्यक्तीस किंवा आपणास अवसाद असल्यास, आपण त्या व्यक्तीस आणि स्वत:ला पुढील प्रमाणे मदत करू शकतो.
अवसादावरील
उपचार आणि मदत:
- ही समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- अवसादावर मात करण्यासाठी चांगल्या मनोचिकित्सकाचा मदत घ्यावी.
- एकटे राहू देऊ नका, मित्रांबरोबर बाहेर जा, लोकांमध्ये मिसळा, गप्पा मारणे.
- मित्र, सहकारी यांच्यासोबत हसणे आरोग्यासाठी चांगले असते.
- या काळात असाध्य किंवा अधिक अवघड ध्येय ठेवू नये.
- सकाळी आणि संध्याकाळी कुटुंब किंवा मित्रांबरोबर फिरायला जा.
- स्वत:ला कामात व्यस्त ठेवा.
- उत्साहवर्धक गाणी ऐका किंवा कार्यक्रमांना हजेरी लावा.
- आपले विचार दाबून टाकण्याऐवजी आपल्या विश्वासू डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञांना सांगा.
- काम करण्याचे नवीन मार्ग शोधा आणि नवीन मार्गांनी जावे.
- जरी आपण दु:खी असला तरीही आपण खरोखर आनंदी आहात असे वागावे.
- सकारात्मक गोष्टींचे वाचन करणे आणि बोलणे.
- सकारात्मक जीवनाची कला याचा अनुभव घ्यावे.
- योगाचा आधार घ्या आणि अनुलोम-विलोम, प्राणायाम, ध्यान-धारणा जाणून घ्या आणि त्यांचा अवलंब करावे.
- आपल्याकडे इंटरनेट असल्यास झोपण्यापूर्वी सकारात्मक कथा, विचार आणि व्याख्याने पहाणे.
सर्वात महत्त्वाची बाब:
अवसाद ही एक अतिशय सामान्य परंतु गंभीर समस्या आहे यातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. अवसाद हा वेडेपणा नाही आणि अवसादग्रस्त बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. अवसादाच्या उपचारांसाठी योग्य माहिती खूप महत्वाची आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सपुदेशक, मानसोपचारतज्ज्ञ व मनोचिकित्सक आणि रुग्ण तसेच त्यांचे कुटुंब आणि मित्र यांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. आपल्या मदतीचा एक हात अवसादग्रस्त व्यक्तीस पुन्हा नव्याने उभे रहाण्यास सक्षम बनवितो. चला तर मग बोलून मोकळे होऊ या आणि सदृढ आणि निरोगी कुटुंब, समाज घडवू या!
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ
पुस्तके:
American
Psychiatric Association (2018). Diagnostic and Statistical Manual of Mental
Disorders (DSM–5), Washington DC: American Psychiatric Publishing
Brinton, D. G. (2018). The Pursuit of Happiness: A Book of Studies and
Strowings. New Delhi: Fingerprint publishing
Tripathi,
Amrita and Anand Arpita (2019). Real Stories of Dealing with Depression. New Delhi:
Simon & Schuster India
Massey,
Alexandra (2013). Beat Depression Fast: 10 Steps to a Happier You Using
Positive Psychology. London: Watkins’s publishing
गोडबोले आणि जोशी (2019). मनकल्लोळ:
मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचारानं आनंदी व्हा! भाग 1 व 2, पुणे: मनोविकास
प्रकाशन
घाटे, नि. (2017). मन :
मनोविकारांची रंजक आणि शास्त्रीय माहिती, पुणे: मनोविकास
प्रकाशन
चाफेकर, हिमानी (2015). विकार मनाचे, पुणे: उषा अनिल प्रकाशन
जोशी, श्री. (2016). मनोविकरांचा मागोवा, पुणे: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पोतदार, मि. (2018). मनाच्या अंतरंगात, पुणे: मनोविकास प्रकाशन