सोमवार, १० मे, २०२१

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे | बुद्धिमत्ता म्हणजे काय | Intelligent People

 

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे

बुद्धी हा शब्द आपण सामान्यपणे आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये अनेकवेळा वापरतो. आपण दैनंदिन जीवनात 'बुद्धिमत्ता' हा शब्द वेगवान गतीने शिकणे आणि समजून घेण्यासाठी, प्रखर स्मरणशक्ती आणि तार्किक विचारांसाठी वापरतो. 'बुद्धी' हा शब्द सामान्य अर्थाने वेगळा असल्याने मानसशास्त्रज्ञानी तो विशिष्ट अर्थाने वापरला आहे. सुरवातीपासूनच अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम, बोरिंग (1923) यांनी बुद्धिमत्तेची कार्यात्मक व्याख्या सांगितली की “बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे जे मापन केले जाते ती बुद्धिमत्ता”. परंतु या व्याख्यातून बुद्धिमत्तेच्या स्वरूपाबद्दल निश्चित अर्थ प्राप्त होत नाही. कारण बुद्धिमत्ता मापण्यासाठी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत, यापैकी कोणत्या चाचणीद्वारे केले गेलेले मापन बुद्धिमत्ता असे म्हणता येईल?. बोरिंगनंतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्याख्या तीन मूलभूत प्रकारात विभागल्या जाऊ शकतात -

1. प्रथम श्रेणीमध्ये अशा व्याख्या समाविष्ट होऊ शकतात ज्यामध्ये वातावरणाबरोबर  समायोजन साधण्याच्या क्षमतेद्वारे बुद्धिमत्तेची व्याख्या केली जाते. एखादी व्यक्ती वातावरणाशी जितक्या लवकर जुळवून घेईल तितका तो प्रखर बुद्धिमत्तेचा समजला जाईल.

2. द्वितीय श्रेणीत अशा व्याख्यांचा समावेश आहे ज्यामध्ये बुद्धिमत्ता शिकण्याची क्षमता म्हणून व्याख्या केली जाते. ही क्षमता जितकी जास्त असेल तितकी त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता असेल.

3. तिसर्‍या प्रकारात अशा व्याख्यांचा समावेश आहे ज्यामध्ये बुद्धिमत्तेला अमूर्त तर्क करण्याची क्षमता म्हणून व्याख्या केली जाते. एखाद्या व्यक्तीची जितकी ही क्षमता अधिक तितकी त्या व्यक्तीमधील बुद्धिमत्ता जास्त असेल.

परंतु नंतर अनेक मानसशास्त्रज्ञांना असे वाटले की या तिन्ही श्रेणींच्या व्याख्यांमध्ये एक सामान्य दोष आहे आणि प्रत्येक श्रेणीमध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या केवळ बुद्धिमत्तेच्या एका पैलूवर किंवा भागावर आधारित आहे. खरं तर, बुद्धिमत्तेत फक्त एक प्रकारची क्षमता (किंवा पैलू) समाविष्ट नाही, तर त्यात अनेक प्रकारच्या क्षमतांचा समावेश आहे, ज्यास सामान्य क्षमता म्हणतात. सदर उद्दिष्ट लक्षात घेऊन काही मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची वेगळी व्याख्या केली आहे.

बुद्धिमत्तेच्या व्याख्या:

वेश्लरच्या (1939) मते, "बुद्धीमत्ता ही एक समुच्चय किंवा वैश्विक क्षमता आहे. ज्याद्वारे एखादी व्यक्ती हेतुपूर्ण कृती, तर्कशुद्ध विचार आणि वातावरणाशी प्रभावीपणे समायोजन करते."

रॉबिन्सन व रॉबिन्सन (1965) यांच्या मते, "नवीन परिस्थितींमध्ये जुळवून घेऊन समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि अनुभवांद्वारे शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता जो बोधात्मक वर्तनाचा एकूण समुच्चय दर्शवितो."

स्टॉडार्डच्या (1971) मते, "बुद्धीमत्ता म्हणजे अशी वैशिष्ट्ये जी क्रिया समजून घेण्याची क्षमता आहे काठिण्यता, गुंतागुंत, अमूर्तता, अर्थव्यवस्था, ध्येयशी जुळवून घेण्याची क्षमता, सामाजिक मूल्य, कल्पकता आणि मौलिकता तसेच काही परिस्थितींमध्ये भावनिक घटकांवर सामर्थ्य आणि प्रतिरोध दर्शविणार्‍या क्रियांना प्रवृत्त करते."

या सर्व व्याख्यामध्ये एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिमत्ता ही अनेक क्षमतांची गोळा बेरीज मानली जाते. म्हणूनच अशा व्याख्या प्रचलित आणि लोकप्रिय आहेत. या व्याख्यांचे सामान्य विश्लेषण करून आपण पुढील निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो:

i) बुद्धिमत्ता म्हणजे विविध क्षमतांचा समुच्चय होय. याचा अर्थ असा आहे की बुद्धीमत्ता ही एकच प्रकारची क्षमता नसून त्यात अनेक प्रकारच्या क्षमता समाविष्ट आहेत या सर्व क्षमतांची गोळाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता होय.

ii) बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एखादी व्यक्ती समस्या सोडवण्यासाठी अंतर्दृष्टीची मदत घेते. इतकेच नाही तर केवळ या बुद्धिमत्तेमुळेच ती एखाद्या समस्येच्या निराकरणात भूतकाळातील अनुभवांचा लाभ घेण्यास सक्षम बनते.

iii) बुद्धीच्या मदतीने व्यक्ती हेतूपूर्ण क्रिया करते. एखादी व्यक्ती जितकी अधिक हेतूपूर्ण आणि अर्थपूर्ण कृती करते तितकीच त्यास अधिक बुद्धिमान समजले जाते. निरर्थक आणि हेतू नसलेली कामे करणारी व्यक्ती कमी बुद्धिमत्तेची मानली जाते. म्हणूनच, बुद्धीचे स्वरूप सहाय्याने एखादी व्यक्ती उद्देशपूर्ण कृती करते.

iv) बुद्धिमत्ता एखाद्यास पर्यावरणाशी प्रभावीपणे जुळवून घेण्यास किंवा प्रतियोजन (adaptation) करण्यास मदत करते. उच्च बुद्धिमत्ता असलेले लोक कोणत्याही वातावरणात स्वत:ला योग्यरित्या समायोजित करतात. या व्यक्तींच्या समायोजन क्षमतेमुळे इतरांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. निम्न बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीमध्ये समायोजन क्षमता कमी असते आणि पर्यावरणाशी प्रभावीपणे जुळवून घेण्यास समस्या उद्भवतात.

v) बुद्धिमत्ता एखाद्या व्यक्तीस तर्कसंगत आणि अमूर्त विचार करण्यास मदत होते. याचा अर्थ असा की जी व्यक्ती हुशार आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वास्तविक आणि तर्कसंगत असते. अशा व्यक्तींमध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता देखील अधिक असते. निम्न बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींचे विचार हे अवास्तविक आणि तर्कहीन असतात. अशा व्यक्तीमध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता देखील कमी असते. अशा व्यक्तींमध्ये विचार आणि कार्य करण्यात विसंगती अधिक आढळते.

vi) हुशार लोकांना अनेकदा कठीण आणि गुंतागुंतीची कामे करायला आवडतात. त्यांच्या कामात मौलिकता अधिक असते. अशा व्यक्ती प्रत्येकवेळी वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.

वरील स्पष्टीकरणातून हे स्पष्ट होते की बुद्धिमत्तेचे स्वरूप हे कोणत्याही एका घटकाच्या किंवा क्षमतेच्या आधारे समजू शकत नाही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत. थर्स्टन (1938) यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे सांगितले आहे की बुद्धीमध्ये अशा एकूण 7 क्षमता आहेत ज्यास प्राथमिक मानसिक क्षमता म्हणतात. गिल्फोर्ड (1967) यांनी त्रिमिती बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये एकूण 150 (5x5x6) क्षमता नोंदवलेल्या आहेत. हार्वर्ड गार्डनर (1983) यांनी तर बहुविध बुद्धिमत्तेच्या 9 प्रकारांचे वर्णन त्यांच्या “frames of mind” पुस्तकात केलेले आढळते.

बुद्धिमत्तेचा अर्थ:

पी.ई. वर्नान (1969) यांनी बुद्धिमत्ता सिद्धांताचे तीन अर्थ सांगितलेले आहेत जे लोकप्रिय तसेच आकर्षकही आहेत. त्यांनी वर्णन केलेल्या बुद्धिमत्तेचे तीन अर्थ पुढीलप्रमाणे-

i) बुद्धिमत्ता म्हणजे अनुवांशिक क्षमता - या अर्थाने बुद्धिमत्तेस पूर्णपणे अनुवंशिक आधार मिळतो. हेब (1988) यांनी त्यास A प्रकारची बुद्धिमत्ता म्हटले आहे, जी स्पष्टपणे एक अनुवंशिक प्रकारची बुद्धिमत्ता आहे आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचे अनुवांशिक गुणधर्म समाविष्ट असतात.

ii) बुद्धिमत्ता एक निरीक्षित वर्तन - या अर्थाने, बुद्धिमत्ता एखाद्याच्या अनुवंश आणि वातावरणाच्या परस्परसंवादाचा परिणाम असते आणि एखाद्या व्यक्तीने किती प्रभावीपणे वर्तन केले त्यावरून त्याला बुद्धिमान मानले जाते. बुद्धिमत्तेचा हा अर्थ जीन्स संतुलन (Phenotypic) स्वरूपाचे आहे. हेब्बने त्यास B प्रकारची बुद्धिमत्ता म्हटले आहे.

iii) बुद्धिमत्ता म्हणजे चाचणी गुणांक - या अर्थाने बुद्धिमत्तेची एक कार्यात्मक व्याख्या केली गेली आहे. या अर्थाने, बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीद्वारे मापन केलेले गुणांक. हेब्बने त्यास C प्रकारची बुद्धिमत्ता म्हटले आहे.

मानसशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञ मंडळी अनेक मार्गांने मानवी बुद्धिमत्ता तपासण्याचे काम करत आलेले आहेत. आपण कदाचित कधीतरी आपली IQ (बुद्ध्यांक) चाचणी करून घेतली असेल. हे मूल्यांकन विशेषतः योग्यता आणि क्षमता मापन करण्यासाठी डिझाइन केलेले असते. पण बुद्धिमत्ता आपण जे IQ चाचण्याद्वारे मापन करतो ते असते (बोरिंग). त्यामुळे पारंपरिक IQ चाचण्यांच्या काही मर्यादा आहेत. 

IQ चाचण्या, तर्क, स्मृती आणि समस्या-निराकरण यासारख्या विशिष्ट कौशल्यांचे मापन करतात, पण आपल्या क्षमतांचे विस्तृत चित्र तयार करू शकत नाहीत. तसेच IQ चाचण्या सर्जनशीलता किंवा भावनिक कौशल्ये या महत्वाच्या गुणांचे मूल्यांकन करत नाहीत. वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना चाचणी संकल्पना आणि संरचना याबाबत भिन्नता आढळते. त्यामुळे कमी स्कोअर नेहमी वास्तविक बौद्धिक क्षमता दर्शवू शकत नाही.

2016 मधील संशोधन आढावा सूचित करतो की आत्मकेन्द्रित (autism) व्यक्तीची बुद्धिमत्ता प्रमाणित IQ चाचणीमध्ये अधोरेखित केलेल्यापेक्षा अधिक असते. ही बुद्धिमत्ता केवळ अशा प्रकारे असंतुलित आहे जी सामाजिक आंतरक्रिया आणि कार्यप्रदर्शनावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की केवळ एक चाचणी बुद्धिमत्तेचे स्पष्ट चित्रण करू शकत नाही कारण त्या चाचणीत समाविष्ट घटकापुरते बुद्धिमत्ता मर्यादित असते.

हॉवर्ड गार्डनर यांनी सादर केलेल्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता अस्तित्वात असल्याचे सूचित करते. त्यामुळेच अलीकडील अनेक संशोधन पेपरचा आढावा घेऊन प्रतिभावान असण्याचे बुद्धिमत्तेचे गुणवैशिष्टे पुढीलप्रमाणे-  

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे:

१. एखाद्या विशिष्ट विषयातील माहिती आपणास हुशार बनत नाही तर हुशार व्यक्तीस प्रत्येक विषयातील ज्ञान असते आणि त्यांचा बहुतेक वेळ काहीतरी नवीन शिकण्यात आणि अभ्यास करण्यात घालवला जातो.

२. एका ऑनलाइन सर्वेक्षणानुसार, तीन पैकी दोन लोकांचा असा विश्वास आहे की इंटरनेट लोकांना स्मार्ट बनवते. इंटरनेटमुळे बुद्धिमान लोकांची लेखन आणि वाचनाची शैली सुधारते.

3. नुकत्याच झालेलेल्या एका सर्वेक्षणानुसार बुद्धिमान लोक आपली सर्व कामे निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन करतात आणि निम्न बुद्ध्यांक असलेले लोक दिलेली वेळ कसेबसे ढकलतात.

४. Hewlett Packard यांच्या संशोधनानुसार, इन्फोमेनियाची लक्षणे आजकाल लोकांमध्ये दिसून येत आहेत. म्हणजेच कोणत्याही मेल, मेसेज त्वरित जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे बुद्धिमान लोक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर कमी प्रमाणात करतात.  

५. PsychCentral यांच्या अहवालानुसार कला व संगीत यांची जाण असणाऱ्या लोकांची बुद्धिमत्ता ही इतर लोकांच्या तुलनेत अधिक प्रखर असते. त्यामुळे कलाकार आणि संगीतकार लोकांचा मेंदू अधिक सक्रिय असतो.

६. Encyclopaedia Britannica यांच्या मते बुद्धिमान लोक सर्व प्रकारच्या परिस्थितीत पटकन जुळवून घेतात आणि त्यांच्या विचारांची शैली देखील लवचिक असते.

७. बुद्धिमान लोकांची अशीही एक ओळख आहे की त्यांचा तथ्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. त्यामुळे असे लोक स्वत:ही तथ्याशिवाय बोलत नाहीत.

८. बुद्धिमान लोक कोणतीही नवीन गोष्टी पाहताना किंवा वाचताना पूर्ण रस घेतात. त्यांना वरवरचे पाहणे किंवा वाचन करणे आवडत नाही.

९. बुद्धिमान लोकांना कोणतीही माहिती किंवा परिस्थिती चटकन लक्षात येते त्यामुळे त्यांना त्वरित त्यावर प्रश्न विचारण्याची किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे देण्याची क्षमता असते.

१०. बुद्धिमान लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातून फारच कमी चुका होतात आणि चूक झालीच तर त्या प्रत्येक चुकांमधून काहीतरी शिकवण घेतात.

११. बुद्धिमान लोक जुगाड करण्यात पटाईत असतात. कोणतेही कार्य सहज करण्याची, ते समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.

१२. बुद्धिमान लोक विषयांतर करत नाहीत ते कोणत्याही विषयाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात तसेच एखाद्या विषयातील आपली अज्ञानता देखील स्वीकारतात.

१३. सहानुभूती हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे. बुद्धिमान लोकांकडे अधिक सहानुभूती जाणिव असते त्यामुळे इतरांच्या भावना केवल समजून घेत नाहीत तर शक्य त्या  मार्गांने मदत देखील करतात.

१४. बुद्धिमान लोकांकडे स्वत:च्या प्रत्येक कृतीचे समर्थन असते. कोणताही निर्णय सारासार विचार करूनच घेतात आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात.

 १५. बुद्धिमान लोकांचा मित्रपरिवार सर्व स्तरातील असतो आणि हा मित्रपरिवार निवडक आणि कायमस्वरूपी असतो.

बुद्धिमान परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून स्वत:ला अपडेट ठेवतात. तसेच बुद्धिमान लोक आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात बुद्धिमान असतेच. आपणास भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि इतरही घटकांचा विचार करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखकर होण्यासाठी मदत होईल. प्रत्येकाची अंगभूत क्षमता उजेडात येईलच असे सांगत येत नाही त्यामुळे भिन्न भिन्न परिस्थितीला सामोरे गेलेले लोकच बुद्धिमान असतात. काही लोक ठेच लागल्यावरच शहाणे होतात तर काही काहीही झाले तरी जसेच्या तसेच असतात. सर्वांना आपल्या अंगभूत क्षमता बुद्धिमत्तेमध्ये रूपांतरित करण्यास संधी मिळो हीच प्रार्थना.

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

अधिक वाचनासाठी पुस्तके:

पलसाने, म. न. (संपादक)(2006). “मानसशास्त्र” पुणेः कॉन्टिनेन्टल प्रकाशन

ओकअभ्यंकर व गोळविलकर (2008). “मानसशास्त्र दक्षिण आशिया आवृत्ती” सिंगापोर: पिअरसन एज्युकेशन

अभ्यंकरओक व गोळविलकर (2014). “मानसशास्त्र वर्तनाचे शास्ञ” दिल्ली: पिअरसन एज्युकेशन

बोरूडे, रा. रा. (2002). “बोधनिक मानसशास्त्र” औरंगाबद: छाया पब्लिशिंग हाऊस

Bracey, R. (2013). IQ Power Up: 101 Ways to Sharpen Your Mind, New York: Duncan Baird Publishers

Lungu, M. (2020). Increase Your Intelligence: Be Amazing, online Publishing House

Sternberg, R. (2000). Handbook of Intelligence, UK: Cambridge University Press  

२ टिप्पण्या:

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...