गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी | Self Awareness |



स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी
ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याने त्याच्या काळात मानव जातीला केलेले आव्हान आजही खरे ठरते. तो म्हणतो कोणावरही रागावणे हे सहज शक्य आहे, परंतु योग्य माणसावर योग्य वेळी योग्य कारणाकरिता, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणे अवघड असते." मानवाला बुध्दी आहे त्याचप्रमाणे भावनादेखील आहेत. आपली सर्व विचारप्रक्रिया ही भावनेशी निगडीत असते.
उदा. मला अमुक एक गोष्ट आवडते.
मला अमुक एक गोष्ट आवडत नाही.
            वरील दोन्ही वाक्यात निम्नस्तरावर अनुक्रमे धन आणि ऋण भावना व्यक्त होतात. आपल्या मेंदूतील Cerebral Cortex विशेषतः Pre-frontal Lobes हे विचारांशी संबंधित असतात तर त्या खाली असलेली Limbic system  विशेषतः Amygdala complex हे भावनाशी निगडित असते. त्यामुळे आपल्याला तार्किक मेंदू  (Rational Brain) आणि भावनिक मेंदू (Emotional Brain) असे दोन मेंदू आहेत असे समजण्यात येते. या दोन्ही मेंदूतील प्रक्रिया परस्परांशी पूरक आहेत फक्त तार्किक मेंदू खूप चांगला असेल तर आपल्याला इतरांशी योग्य प्रकारे जवळिक साधता येणार नाही. याउलट फक्त भावनिक मेंदू खूप विकसित झाला असेल तर जीवनात चांगले विचार निर्माण होणार नाहीत. त्यामुळे दोन्हीमध्ये संतुलन असणे महत्त्वाचे असते.
1995 पर्यंत IQ ला अधिक महत्त्व दिले जात होते. पण डॅनिअल गोलमन यांनी IQ हा व्यक्तीच्या जीवनात यश प्राप्तीसाठी 20 टक्के कार्यरत असतो तर परिपूर्ण यशासाठी आणखी एका गोष्टीशी संतुलन आवश्यक असते. ती म्हणजे भावनिक बुध्दिमता (EQ), असे प्रतिपादन त्यांनी केलेले आढळते.
     विचार आणि भावना या हातात हात घालून जीवनाला प्रगतीपथावर नेतात. आपल्या भावनांचे विशिष्ट परिस्थितीत विश्लेषण करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा योग्य पध्दतीने आविष्कार करणे आणि इतरांच्या भावना समजावून घेणे. त्यामुळे आपल्या भावनांना योग्य प्रकारे वळण लागते आणि अशा भावना विचारप्रक्रियेशी चांगल्या पध्दतीने साथ देवू शकतात.
         जी व्यक्ती स्वतःला ओळखू शकते ती इतरांना सहजपणे ओळखू शकते. परंतु स्वतःला ओळखणे म्हणजे काय? हा खुप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आपल्याला   होणा-या जाणिवेतून मिळत असते. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःची शरीरसंपदा, क्षमता, जवळच्या वस्तू, व्यक्तीचे स्वत:चे कुटुंबसमूह, सामाजिक  मूल्ये, ध्येय धोरणे, सामाजिक संस्था या सर्वासंबंधी धारण केलेल्या अभिवृती म्हणजे स्व-संकल्पना होय (शेरीफ). पण स्व-संकल्पना जाणून घेण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता असते.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीची स्व-संकल्पनेचे मूल्यांकन होणार आहे. त्या व्यक्तीची स्व-जाणीव पातळी ही समाधानकारक असावी लागते. म्हणजे त्या व्यक्तीस स्व-जाणीव नसल्यास ती स्वतःला ओळखू शकणार नाही व स्वतःला योग्य प्रमाणात ओळखू न शकल्याने ते इतरांना कसे ओळखतील?
डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुध्दिमतेचे पाच घटक सांगितलेले आहेत. यातील पहिले तीन घटक हे स्व-जाणिवेशी निगडीत आहेत व शेवटचे दोन घटक सामाजिक-जाणिवेशी निगडीत आहेत. स्व-जाणीव असे म्हणत असताना केवळ मी काय बोललो एवढे लक्षात ठेवून भागत नाही तर ते मी कसे व का बोललो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्व-जाणीव असलेल्या व्यक्तीत खालील गुणवैशिष्टये आढळून येतात.
1.  अशा व्यक्तींना विशिष्ट वेळी ते कोणत्या भावना अनुभवत आहेत आणि त्या प्रकारच्या भावना कोणत्या कारणामुळे अनुभवत आहेत याची पूर्ण जाणीव असते.
2.  अशा व्यक्तींचे बोलणे त्याच्या भावना आणि त्यांचे विचार या तीनही गोष्टी परस्परांना पूरक असतात. त्यामुळे त्यांच्या मनात जर विचार आला की विशिष्ट वाक्य विशिष्ट ठिकाणी बोलू नये तर ते त्या वाक्यावर भावनिक नियत्रण सहज ठेवू शकतात.
3.  आपल्या भावनांमुळे आपल्या निष्पादनावर कशाप्रकारे परिणाम होत आहे हे त्यांच्या सहज लक्षात येते. इतरांशी बोलताना आपल्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होत आहे हे लक्षात आल्याबरोबर अशा व्यक्ती स्वतःचे बोलणे थांबवितात.
4.  अशा व्यक्तिंना स्वत:ची व्यक्तिगत मूल्ये व ध्येयांची पूर्ण जाणीव असते त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःचा वेळ व्यर्थ घालवीत नाहीत.
5.  अशा व्यक्तींना स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा माहित असतात. त्यामुळे ते ज्या गोष्टी करु शकतात त्यातच अधिक रस घेतात. काहीही करण्याकडे त्यांचा हव्यास नसतो.
6.  अशा व्यक्ती स्वतःच्या कार्याचे अधूनमधून मूल्यमापन करतात. आपण काय मिळविले, काय गमावले याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. त्या जीवनातील अनुभव विसरत नाहीत कारण अनुभवापासून आपण शिकू शकतो अशी त्यांची निश्चित धारणा असते.
7.  अशा व्यक्ती सतत काही नवीन शिकत असतात. जाणीवपूर्वक स्वतःचा विकास साधण्याकडे त्यांचा कल असतो.
8.  अशा व्यक्ती त्यांचे चुकले असल्यास ते लगेच मान्य करतात आणि नव्या दमाने पुन्हा कामाला लागतात.
9.  अशा व्यक्तींमध्ये थोडी विनोदबुध्दी असते. खेळकर वृत्तीमुळे ते इतरांना लवकर आपलेसे करु शकतात.
10. शक्य झाल्यास इतरांना मदत करण्याकडे त्यांचा कल असतो; स्वतःवर ठाम विश्वास असतो.
11. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याविषयी ते स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे ते कित्येकदा लोकांमध्ये एकाकी पडतात. परंतु त्यांचे त्यांना वाईट वाटत नाही.
12. अशा व्यक्ती खूप विचार करुन निर्णय घेतात आणि एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. त्यामुळे त्यांना काही वेळा त्रास देखील होतो.
वरील योग्यता किंवा गुणवैशिष्टये पाहिल्यानंतर काही अंशी आपणास स्थिर प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होवू लागते. स्व-जाणीव या दोन शब्दात अनेक गुण विशेष सामावलेले आहेत. तसेच हे गुणविशेष सामान्य बुध्दिमत्तेपेक्षा अगदी भिन्न आहेत. या गुण विशेषांचा जीवनात इतरांबरोबर वागण्यात, इतरांबरोबर काम करण्यात खूप फायदा होतो. हा गुण विशेषांचा समुच्चय म्हणजे भावनिक बुध्दिमतेचा अविभाज्य अंग होय. व्यक्तीस जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, स्व-जाणिवेचा स्तर हा उच्च असावा व त्याच बरोबर स्व-संकल्पनाही उच्च स्तराची असावी लागते. म्हणून स्व-संकल्पना व भावनिक बुध्दिमत्ता यांचा स्तर उच्च असणा-या व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यास पात्र आहेत. कारण अनेक महान पुरुषांनी असे नमूद केलेले आढळते की व्यक्ती ज्यावेळी स्वतःला ओळखते, स्वतःच्या क्षमता जाणते त्यावेळी जगातील इतर घटकाना ओळखण्यास, जाणण्यास पात्र होते.
स्व- जाणिव विकसित करण्यासाठी शाळेची भूमिका:
बरेच लोक स्वतःबद्दलचे सत्य स्वीकारण्यास तयार नसतात. उदाहरणार्थ, काही विद्यार्थी स्वतःची स्व-प्रतिम गंमतीशीर व्यक्ती म्हणून इतरासमोर सादर करतात त्यामुळे त्यास कोणीही अभ्यासाबाबत गंभीरपणे घेत नाहीत. पण प्रत्यक्षात, त्यास त्या गोष्टीचा फायदा अभ्यासात न होता तोटाच होतो कारण प्रत्यक्षात तो स्वतः कोण आहे याची जाणीव त्यास न झाल्याने व्यक्तिमत्वाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्व-जाणीवेसाठी स्वत:ची जागरुकता, प्रामाणिकपणा आणि धैर्य आवश्यक आहे. यासाठी शाळा महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.                                स्व-जाणिव विकसित करण्यासाठी शिक्षणाची भूमिका:
जर आपण स्व-जाणिव विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्थाबद्दल विचार केल्यास असे लक्षात येते की, आपण काय शिकत आहे आणि का शिकत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील तर आपला प्रवास न संपणाऱ्या मार्गाने सुरु आहे असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला काय हवे आहे? आपण हे समजू शकत नसेल तर आपण योग्य निर्णय आणि निवड कसे करु?  पुढे काय घडणार आहे याची जाणीव नसणे हा एक कठीण आणि गोंधळ निर्माण करणारा मार्ग आहे. त्यासाठी शिक्षण खुप महत्वाचे आहे. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी  प्रक्रिया आहे. व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्थाकडून औपचारिक आणि अनौपचारिक प्रकारचे शिक्षण घेत असते.                      स्व-जाणिव विकसित करण्यासाठी समवयस्कांची भूमिका:
स्व-जाणिव ही आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते, आपली बलस्थाने आणि कमकुवत बाजू, आपली आवड आणि नावड यांचा समावेश यामध्ये होतो. जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा दबावामध्ये असतो तेव्हा आपल्यात स्व-जाणिव विकसित होण्यास मदत होते. प्रभावी संभाषण आणि परस्परसंबंधांतून तसेच सहानुभूती विकसित करण्यासाठी देखील हे नेहमीच आवश्यक ठरते. आपली खरी ओळख हि आपले मित्रच असतात. त्यामुळे चांगल्या मित्रांची संगत करणे जीवनात खुप महत्वाचे असते.                     स्व-जाणीव विकसित करण्यासाठी कुटुंबाची भूमिका:
एखादी गोष्ट आपल्याबद्दल सत्य असू शकते हे स्वीकार करायला काही लोक तयार नसतात. म्हणून, आपण विशेषत: पालकांचे ऐकण्यासाठी तयार असले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कल्पित स्व-जाणिवेचे परीक्षण करण्यासाठी त्यांना परवानगी दिली पाहिजे. स्वतः कोणीही परिपूर्ण नाही आणि पालकही परिपूर्ण नाहीत. तरीसुद्धा, व्यावहारिक दृष्टिकोनातून, आपल्या पालकांचे ऐकले पाहिजे. कारण त्यांनी आपणास जन्मापासूनपासून खुप जवळून आणि चांगल्याप्रकारे पाहिलेले असते. इतर कोणाहीपेक्षा आपल्या वर्तनाची स्पष्ट अंतर्दृष्टी त्यांना अधिक असते. आपण त्यांचे सर्व विचार स्वीकारण्याची गरज नाही परंतु कमीतकमी त्यांचे म्हणणे ऐकले तरी पाहिजे. (लेविन, 2004) आपल्या जीवनात प्रथम कोण येतो, आपण कि आपले नातेसंबंध? नातेसंबंध याचे उत्तर असेल आणि प्रेम आणि प्रतिबद्धतेच्या खोल पातळीवर आधारलेले असले तर कुटुंबाशिवाय जगणे हे अस्वस्थ आणि विनाशकारी ठरेल. प्रेम हे एअर मास्कसारखेच असते (फेरारी, 2002). आपले स्वत:वर प्रेम नसल्यास आपण दुसऱ्यावर सर्वार्थाने प्रेम करू शकत नाही. त्यामुळे आपण प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यावर ते आपोआप येईल.
स्व-जाणिव असणे म्हणजे काय? यासाठी सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक मिश्चेरचे एक उदाहरण देता येईल. ते म्हणतात, ‘‘जर मी सलग तीन दिवस रियाज केला नाही तर माझ्या श्रोत्यांना ते माझ्या वादनातून कळते, मी सलग दोन दिवस रियाज केला नाही तर ते माझ्या समीक्षकांना कळते आणि मी एक दिवस जरी रियाज केला नाही तर कार्यक्रमावेळी ते मला कळते’’ स्व-जाणिव असलेली व्यक्तीच स्वत:शी प्रामाणिक राहू शकते आणि स्वतःशी प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीच इतरांशी प्रामाणिक असतात. त्यामुळे प्रथम स्वतःला ओळखा कारण ती यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
Ferrari, Michel & Robert J. (1998) “Self-awareness: its nature and development”New York: Cambridge University Press
Goleman, Danial (1996) “Emotional Intelligence”, New York: BantamBooks
Panisistala, Ramadevi (Editor) (Oct-2007) “University News” New Delhi: Association of Indian uniniversities. (Page no.12)
Rothman,J.C. (1998) “The Self-Awareness Workbook for Social Workers” New York: Harvard University Press
Singh, sutindar (Editor) (March-2000) “University News” New Delhi: Association of Indian Universities. (Page no.7)
संकपाळ, एस. पी. (जून,२०१२). स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी. भारतीय शिक्षण, अंक ६/६

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

यशस्वी जीवनासाठी सामाजिक बुद्धिमत्ता | Social Intelligence | Intelligence


सामाजिक बुद्धिमत्ता
दैनंदिन व्यवहारामध्ये आपण शालेय प्रगतीवरुन एखादा विद्यार्थी बुध्दिमान आहे किंवा नाही हे ठरवितो पंरतु तसे ठरविणे अशास्त्रीय होईल. उदा. एखाद्या ज्ञानी व्यक्तीला आपण बुध्दिमान संबोधतो, वास्तविक बुध्दिमान व ज्ञान यात फरक आहे. ज्ञान संपादन व बुध्दिमत्ता यांचा घनिष्ठ संबंध असला तरी; ज्याप्रमाणे ज्ञान मोजण्याचे परिमाण वेगळे तसेच बुध्दिमत्ता मोजण्याचे परिमाणही वेगळे आहेत. बुध्दिमत्तेची व्याख्या करण्याचा मानसशास्त्रातील विविध संप्रदायातील विविध अभ्यासकांनी प्रयत्न केलेला आहे व आपल्या परिने बुध्दिमत्तेच्या व्याख्या देखील केलेल्या आहेत.
“Intelligence is the tendency of thought to take and maintain definite direction, the capacity to make adaptations for the purpose of attain a desired end and the power of self criticism”.  -  Alfred Binet (1905)
एखादा प्रसंग पहात असताना आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण होतात, त्याचवेळी इतरांच्या मनात कोणत्या भावना निर्माण होतात.  आपल्या भावनांचे प्रकटीकरण करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे किंवा आपल्या भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने व कितपत करावे यासंबंधी आपणास स्वत:कडून मार्गदर्शन मिळत असते.  यासाठी उपलब्ध माहितीचा उपयोग केला जात असतो आणि ही जी क्षमता असते त्यालाच भावनिक बुध्दिमत्ता म्हटले आहे. भावनिक बुध्दिमत्ता ही संकल्पना डॅनिअल गोलमन यांनी सन 1995 मध्ये मांडली व ती जगमान्यही झाली. त्याचबरोबर डॅनिअल गोलमन यांनी ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ 2006 साली प्रकाश झोतात आली.
समाजात आपल्याला अनेक वेळा असे दिसून येते की, शालेय जीवनात जे विद्यार्थी बुध्दिवान व यशस्वी म्हणून गणले जातात ते प्रत्यक्ष जीवनात अयशस्वी ठरतात तसेच शालेय जीवनात अयशस्वी ठरलेले अनेक लोक प्रत्यक्ष जीवनात यशस्वी ठरतात इतकेच नव्हे तर समाजाला दिशा देण्याचे, समाजात क्रांती घडवून आणण्याचे महान कार्य त्यांच्याकडून घडते अनेक महान समाजसुधारकांची अशी उदाहरणे आहेत.  यावरुन असे लक्षात येते की, जीवनात व ज्या समाजात आपण जीवन जगतो तेथे यशस्वी होण्यासाठी उच्च शैक्षणिक संपादणूक, मुर्त बुध्दिमत्ता व गुणवत्ता यापेक्षा महत्वाची बुध्दिमत्ता आवश्यक असते ती म्हणजे सामाजिक बुध्दिमत्ता होय. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहणे महत्वाचे वाटते. काही महत्वाच्या व्याख्येमधून ते स्पष्ट करता येईल.
सामाजिक बुध्दीमत्ता म्हणजे दुस-यांना समजावून घेण्याची क्षमता आणि मानवी संबंधातील समजूतदारपणाची कृती होय. एडवर्ड थॉर्नडाईक (1920)
     व्यक्ती आहे तशी स्वीकारण्याची क्षमता, व्यक्तीबरोबर प्रभावीपणे राहण्याची योग्यता तसेच लोकांच्याबरोबर व्यवहार करण्याची योग्य पध्दत म्हणजे सामाजिक बुध्दिमत्ता होय. माथूर एस.एस. (2005)    
जीवनात यशस्वी होण्यासाठी सामाजिक बुध्दिमत्ता अत्यावश्यक आहे.  कारण मूर्त स्वरुपाची बुध्दिमत्ता ही व्यक्तीच्या दु:खास, अपयशास कारणीभूत ठरु शकते पण ज्यावेळी मूर्त स्वरुपाच्या बुध्दिमत्तेस सामाजिक बुध्दिमत्तेची जोड मिळते त्यावेळेस व्यक्ती यशस्वी व आनंदी होते.  व्यक्ती ही समाजाचा अविभाज्य घटक आहे.  तिने आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्ये यांचा वापर प्रत्यक्ष समाज जीवनातच करत असते. त्यामुळे समाजातील व्यक्तीमध्ये नितीनियम, चालीरिती, प्रथा यांचा विचार व समाजमान्य वर्तन करण्याची क्षमता असावी लागते. त्यातूनच व्यक्तीचा विकास होत असतो.
      सामाजिक बुध्दिमत्ता ही संकल्पना प्रथम एडवर्ड थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडली. 1920 साली त्यांनी या विषयावर  हार्पर्स मंथली मॅगेझीन (Harper’s Monthly Magazine) या मासिकात लेख लिहीला त्यांच्यामते यश मिळविण्याच्या मार्गामध्ये व्यक्तींअंतर्गत परिणामकारक संबंधांची खूप मोठी भूमिका आहे.
      परंतु 1950 च्या शेवटी शेवटी एक प्रभावी मानसशास्त्रज्ञ, बीने (ज्यांनी केलेल्या कार्याचा उपयोग अजुनही बुध्दिमत्ता मापनासाठी होतो) यांनी सामाजिक बुध्दिमत्ता ही संकल्पना धुडकावून लावली. सामाजिक बुध्दिमत्ता ही केवळ एक सामान्य बुध्दिमत्ता आहे जिचा उपयोग सामाजिक परिस्थिती मध्ये होतो असे मत त्यांनी मांडले.  त्यामुळे सामाजिक बुध्दिमत्तेचा अभ्यास काही काळ दुर्लक्षित राहिला त्यानंतर जवळजवळ अर्ध्या शतकानंतर मज्जातंतूचा शास्त्रीय अभ्यास करणा-या शास्त्रज्ञानी जेव्हा मेंदूच्या व्यक्तीतंर्गत संबंधाना नियंत्रण ठेवणा-या मेंदूच्या क्षेत्रांचे मापन केले तेव्हा सामाजिक बुध्दिमत्ता या संकल्पनेवर पुनश्च विचार केला गेला.
      सामाजिक बुध्दिमत्ता या संकल्पनेचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी अबोधात्मक अभिक्षमतांचा अभ्यास आवश्यक आहे. उदा. एखादे लहान मूल रडत असेल तर काय करणे योग्य ठरेल हा विचार करण्यापेक्षा नर्स त्याला मायेने जवळ घेते तेव्हा त्या स्पर्शाने ते मुल रडायचे थांबते.
      रिचर्ड डेविडसन (विस्कॉसीन विद्यापीठातील मज्जातंतु शास्त्रीय परीणाम या प्रयोगशाळेचे संचालक) यांच्या निरीक्षणावरुन मेंदूतील सामाजिक क्षेत्र आणि भावनिक क्षेत्र ही दोन कार्यक्षेत्रे एकमेकांत मिसळली आहेत. ते म्हणतात सर्व भावना या सामाजिक आहेत कारण नातेसंबंधाच्या जगामध्ये भावनांचे कारण वेगळे करता येत नाही. आपल्या सामाजिक आंतरक्रिया या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात.
सामाजिक बुध्दिमत्तेचे घटक : सामाजिक बुध्दिमत्तेच घटक दोन गटात विभागले आहेत
  अ)  सामाजिक जाणीव                  ब) सामाजिक कौशल्य
      प्रथम समानाभूती                      घडणारी घटना
      एकरुप होणे                           सादरीकरण
      परानुभूतिक अचूकता              इच्छित परिणाम घडवून आणणे
      सामाजिक ज्ञान                        काळजी     
सामाजिक जाणीव आणि सामाजिक कौशल्ये या दोन्ही कार्यक्षेत्रामध्ये सामान्य क्षमतेपासून जटील उच्च क्षमता असतात.  उदा. प्रथम परानुभूती व घडणारी घटना या अगदी सामान्य क्षमता आहेत तर परानुभूतीक अचूकता, काळजी या उच्च क्षमता आहेत. वरील घटकांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे
अ)  सामाजिक जाणीव (social awareness):
सामाजिक जाणीव म्हणजे दुस-याची अंर्तवस्था क्षणार्धात समजून घेणे, तिच्या भावना व विचार समजून घेणे. बिकट सामाजिक परिस्थितीतून बाहेर पडणे.  यामध्ये खालील घटकांचा अंतर्भाव होतो
  • ·   प्रथम परानुभूती (Primal Empathy):

      एक मनुष्य मंत्रालयामध्ये व्हिसा काढण्यासाठी आला.  जसा तो बोलू लागला तसे मुलाखत घेणा-या व्यक्तीस थोडे वेगळे वाटले. त्या व्यक्तीने व्हिसासाठी विचारल्यानंतर मुलाखत घेणा­या व्यक्तीने त्या मनुष्याकडे पाहिले. त्याला पाच मिनिटे थांबण्यास सांगून त्या व्यक्तीने पोलिसाशी संपर्क साधला.  तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा खूप मोठा गुन्हेगार आहे ज्याचा ब-याच देशातील पोलिस शोध करीत आहेत. यावरुन असे लक्षात येते की,  मुलाखत घेणा-या व्यक्तीला प्रथम परानुभूतीची देणगी लाभलेली होती.
      जरी आपण आपले बोलणे थांबविले तरीही आपल्या भावना दुस-यांपर्यंत पोहचण्यास आपण थांबवू शकत नाही. जरी एखाद्या व्यक्तीने आपल्या भावना लपविण्याचा प्रयत्न केला तरीही त्या अन्य मार्गाने व्यक्त होतातच.
      महिलांमध्ये प्रथम परानुभूतीची क्षमता ही पुरुषांपेक्षा 3% अधिक असते. ही क्षमता काळानुरुप आणि परिस्थितीनुरुप वाढते. अपत्य असलेल्या महिलेची प्रथम परानुभूती क्षमता ही अपत्य नसलेल्या महिलेपेक्षा अधिक असते.
      प्रथम परानुभूती मोजण्यासाठी एक चाचणी अस्तित्वात आहे.  ज्यामध्ये डोळयावरुन त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखावयाच्या असतात. ही चाचणी सायमन बॅरॉन-कोहेन (1995, केंम्ब्रीज विद्यापीठ) यांनी तयार केली आहे.  या चाचणीमध्ये एकूण 36 चेहरे आहेत.  ज्याचे गुण सर्वांत जास्त येतात त्यांच्याकडे प्रथम परानुभूती क्षमता अधिक असते.  अशा व्यक्तींची परराष्ट्र खाते, पोलिस खाते आणि मानसोपचार क्षेत्रात गरज असते. 
  • ·         एकरुप होणे ( Attunement ):

एकरुप होणे म्हणजे असे अवधान जे परानुभूतीच्या पलिकडे जाते. आपण पूर्ण अवधान देऊन दुस-याचे बोलणे ऐकत असतो. आपण आपला स्वत:चा मुद्दा मांडण्यापेक्षा दुस-या व्यक्तीस समजून घेण्याचा अधिक प्रयत्न करत असतो.
अशाप्रकारे काळजीपूर्वक ऐकणे ही एक नैसर्गिक अभिक्षमता आहे. सामाजिक  बुध्दिमत्तेच्या इतर सर्व घटकांप्रमाणेच एकरुप होणे हया घटकातही सुधारणा होवू शकते आणि आपण एखादयाकडे हेतुपूर्वक लक्ष पुरवून या क्षमतेमध्ये सुलभता आणू शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या शैली मधून तो किती चांगल्या प्रकारे दुस-याचे ऐकू शकतो हे समजते काही यथार्थ संबंधाच्या क्षणी दुस-याला काय वाटते, तो काय बोलतो, काय करतो यावर आपले बोलणे ठरते आणि वरवरच्या संबंधामध्ये भाषण बोलत असताना समोरच्या व्यक्तीबद्दल जास्त विचार करत नाही.  एखाद्या व्यक्तीचे ऐकून न घेता फक्त स्वत:च बोलतो यामुळे संभाषण कमी होऊन ते एकमार्गी भाषण होते.
लक्षपूर्वक ऐकणे ही वैशिष्टये  उत्तम व्यवस्थापक, शिक्षक आणि नेता यांच्यामध्ये दिसून येतात याशिवाय जे लोक त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर आहेत त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट तीन क्षमतामध्ये ही क्षमता मोडते.  हे लोक फक्त समोरच्याचे ऐकून त्यांच्याशी एकरुप होत नाही तर त्या व्यक्तीला जास्त समजावून घेण्यासाठी आणखी प्रश्न विचारतात. एखाद्या व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐकल्यामुळे त्याच्याशी जवळचे संबंध निर्माण होण्यास मदत होते.        
  • ·         परानुभूतीक अचूकता (Empathic Accuracy):

सामाजिक बुध्दिमत्तेसाठी परानुभूतीक अचूकता हा खूप महत्वाचा पैलू आहे. विल्यम आयकेस (2003, टेक्सास विद्यापीठ) हे मानसशास्त्रज्ञ या क्षेत्रातील उद्गाते आहेत त्यांच्या मते सर्वोत्कृष्ट परराष्ट्रमंत्री, सर्वोत्कृष्ट बोलणी करणारा, सर्वोत्कृष्ट राजकारणी, सर्वोत्कृष्ट विक्रेता, परिमाणकारक शिक्षक, सूक्ष्म दृष्टी असलेला रोगनिवारणतज्ज्ञ यांच्याकडे ही क्षमता अधिक असते.
परानुभूतीक अचूकता ही प्रथम परानुभूतीच्या पायावर उभी आहे. परंतु यामध्ये दुस­याच्या भावना, विचार हेतू स्पष्टपणे समजले जाते ही पुढील पायरी अधिक बौध्दिक आहे.
अचूक परानुभूतीचे मापन केले जाऊ शकते यासाठी छुपे कॅमेरेसमाजमिती तंत्र वापरले जातात. अचुक परानुभूती ही यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे. विशेषत: लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकमेकांना समजून घेण्यामध्ये अचूक परानुभूती अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते.
मिरर निरॉन्सच्या (Mirror Neurons) संशोधनावरुन असे दिसून आलेले आहे की, आपला मेंदू आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या हेतूबद्दल पुर्व सूचना देत असतो की, एखादी व्यक्ती काय करणार आहे त्याविषयीचा अंदाज आपण व्यक्त करु शकतो पंरतु हे कार्य सुप्तावस्थेत केले जाते.    
  • ·         सामाजिक ज्ञान (Social Cognition):

सामाजिक ज्ञान हा व्यक्तींतर्गत जाणीवेचा चवथा पैलू आहे, ज्यामध्ये सामाजिक जग प्रत्यक्षपणे कसे कार्य करते हे पाहिले जाते.
जे लोक या क्षमतेमध्ये निपुण असतात त्यांना कोणत्या परिस्थितीत काय केले पाहिजे याचे ज्ञान असते.  आपल्या नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळया वातावणात अपेक्षित वर्तन कसे आत्मसात करावे हे या क्षमतेमुळे व्यक्तीला समजते.
उदा. पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेल्यानंतर वागण्याची पध्दत या क्षमतेमुळे व्यक्ती आत्मसात करते. सामाजिक ज्ञानामुळे एखाद्या सामाजिक पेचप्रसंगात कसे वागावे याचे ज्ञान होते. उदा. आपल्या शत्रुबरोबर बसून जेवण घ्यावे लागले तर या क्षमतेमुळे व्यक्ती योग्य प्रकारचे वर्तन करते.
दीर्घकाळासाठी समाजापासून दूर राहील्यामुळे सामाजिक ज्ञान ग्रहणाची क्षमता कमी होते.  त्यामुळे सामाजिक परिस्थितीतील काही नातेसंबंधात धोका निर्माण होऊ शकतो आणि मानसशास्त्रीय क्षेत्रात हा एक जटील अभ्यास विषय आहे. ज्याचा परिणाम अवसाद (Depression) पासून छीन्नमनस्कता (Schizophrenia)  पर्यंत होऊ शकतो.
काही तज्ञाच्या मते सामाजिक ज्ञान ही एक सामान्य बुध्दिमत्ता आहे. ती सामाजिक जगात वापरली जाते आणि ती सामाजिक बुध्दिमत्तेचा एक घटक आहे.  परंतु या दृष्टीकोनात फक्त आपण व्यक्तीअंतर्गत संबंधाबद्दल काय जाणतो यावरच भर दिला गेला आहे, आपण व्यक्तीबरोबर कसे वागतो यावर नाही. त्यामुळे याच्या चाचणीमधून  आपल्याला सामाजिक परिस्थितीचे किती ज्ञान आहे हेच पाहिले जाते त्या परिस्थितीमध्ये आपण कसे वागले पाहिजे हे समजत नाही.  त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे जर सामाजिक ज्ञान अधिक असेल पण सामाजिक कौशल्यांची कमतरता असेल तर त्याला इतर व्यक्तींशी संवाद साधताना अडचणी येतात.
ब)  सामाजिक कौशल्ये (Social Skill):
दुस-यांना काय वाटते याची जाणीव होणे किंवा ते काय विचार करतात व त्यांचा हेतू काय आहे हे जाणून घेणे. हे सामाजिक कौशल्यामध्ये महत्चाचे आहे.  सामाजिक कौशल्य हे सामाजिक जाणीवेवर आधारीत आहे. त्यामुळे सामाजिक जाणीवेतील घटकाच्या विकासावर सामाजिक कौशल्ये आधारलेले आहेत.  यामध्ये खालील घटकांचा अंतर्भाव होतो.
  • ·         घडणा­या घटनांमधील सुसंवाद (Syncrony):

या कौशल्यामुळे आपण इतर व्यक्तींशी आकर्षकपणे व सहजपणे आत्मविश्वासपूर्ण संवाद साधु शकतो. या कौशल्याच्या अभावी सामाजिक क्षमतेचे नुकसान होते व सामाजिक आंतरक्रिया घडून येण्यामध्ये अडथळे निर्माण होतात.
जेव्हा एखादी व्यक्ती असभ्यपणे वागते त्यावेळी इतर व्यक्तींना अवघड वाटते.  त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते ज्या व्यक्तींमध्ये ही क्षमता कमी असते त्या व्यक्ती  अवमनस्कता (Dyssemia) ने पिडीत असतात- ज्यामध्ये वाचण्यात, अभिनय करण्यात, अशाब्दिक संभाषणात आणि सामाजिक क्षमतामध्ये कमतरता आढळते.
अवमनस्कता (Dyssemia) हा जास्त प्रमाणात मुलांमध्ये आढळतो.  हा रोग ब-याच जणांना सतावतो.  असे विद्यार्थी शाळेमध्ये सामाजिकदृष्टया योग्य वर्तन करीत नाहीत.  ज्या मुलांना हा त्रास असतो ती मुले जे लोक त्यांच्याबरोबर बोलत आहेत त्यांच्याकडे बघू शकत नाहीत.  त्यांच्या भावना त्यांच्या चेह-यावरील भावांमधून व्यक्त होत नाहीत आणि दुस­यांच्या भावना जाणून घेण्यास ते असमर्थ असतात.
या सामाजिक कमतरता आत्ममग्नता (Asper’s syndrome, Autism) यासारख्या मज्जातंतूसंदर्भातील परिस्थितीमुळे निर्माण होत नाहीत. या विद्याथ्र्यापैकी 85 टक्के विद्यार्थ्यांना ही समस्या जाणवते कारण ते दुस-यांच्या अशाब्दिक भावना ओळखण्यास असमर्थ ठरतात आणि त्यांना प्रतिक्रिया देण्यास असमर्थ ठरतात किंवा ते त्यांच्या समवयस्कांबरोबर जास्त आंतरक्रिया साधत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना योग्य वर्तन मिळत नाही. इतर 10 टक्के विद्यार्थी यामुळे पिडीत असतात कारण त्यांच्या मेंदुवर व मनावर काही जोरदार आघात झालेला असतो आणि फक्त 5 टक्के विद्यार्थ्यांचा हा आजार हा मज्जातंतु विकृती (Neurological Disorder) म्हणून निदान केला जातो.  
  • ·         स्व-सादरीकरण (Self - Presentation):

तेजोवलय/आकर्षण हा एक स्व-सादरीकरणाचा पैलू आहे.  एखाद्या सशक्त वक्ता, चांगला शिक्षक किंवा नेता यांचा हयामध्ये अंतरभाव होतो.  जो वक्ता श्रोत्यांना खिळवून ठेवू शकतो आणि त्यांच्या भावना योग्य प्रकारे गुंतवून ठेऊ शकतो त्याचे तेजोवलय सर्वोच्च बिंदूवर पोहचलेले असते.  मनोरंजन करणारे हे वेळ आणि लय यांचा वापर आपल्या बोलण्यामध्ये करतात आणि श्रोत्यांचे मनोरंजन करतात. ते स्वत: भावनांचे प्रेषक असतात आणि श्रोते हे त्यांचे ग्राहक असतात. ज्या व्यक्ती आपले ताणतणाव विसरण्याची क्षमता ठेवतात ते सामाजिक जाणीवेवर अवलंबून आपल्या कृती करतात.
  • ·         प्रभाव (Influence):

सामाजिक कौशल्यामध्ये एक महत्वाचे कौशल्य म्हणजे इतरांवर आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडणे व समोरच्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार वर्तन करण्यास भाग पाडणे. सामाजिक कौशल्यामध्ये सामाजिक आंतरक्रियासाठी हे एक अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे.
व्यापारी संकुलामध्ये ग्राहकांना वस्तु खरेदी करता यावी यासाठी काही मदतनीसाची  मदत देण्यात येते. हे मदतनीस वस्तूची गुणवैशिष्टये पटवून देऊन ती का घ्यावीत या विषयीचे स्पष्टीकरण देतात त्यामुळे त्या व्यापारी संकुलामध्ये वस्तुची विक्री अधिक प्रमाणात होते.  वरील उदाहरणामध्ये संभाषणामधून स्वत:चा प्रभाव पाडून व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन इच्छित परिणाम घडवून आणला जातो.  
सद्याच्या युगामध्ये एम.बी.ए. सारख्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून आंतरक्रिया कशा साधाव्यात व पुढच्या व्यक्तिवर व्यक्तीची अथवा एखाद्या वस्तूची परिणामकारकता ठसविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.  सामाजिक मानसशास्त्र व व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणा-या सर्व तज्ज्ञ व प्रशिक्षीत लोकामध्ये वरील घटक प्रभावीपणे कार्यरत असतो.
  • ·         काळजी (Concern):

दुस-याच्या भावना, गरजा समजल्यामुळे आपल्या मनाला टोचणी लागते. उदा. जेव्हा कांही महिलांनी एका लहान मुलाच्या रडण्याची चित्रफीत पाहिली.  त्यांना त्या मुलाच्या भावना उमगल्या व त्यांच्या चेह­यावर त्याची प्रतिक्रिया उमटली हे त्या महिलामधील परानुभूती दर्शविते. परंतु  काही महिलांनी फक्त त्या मुलाच्या रडण्यावरील प्रतिक्रिया शारीरिकरित्या प्रतिबिंबित केली नाही तर त्यांना त्या मुलाला उचलून घेण्याची तीव्र इच्छा झाली ही भावना म्हणजे काळजी होय.
जेव्हा एखाद्याकडे परानुभूतीची व दुस-याला गरज असेल तेव्हा मदत करण्याची क्षमता असते अशा व्यक्ती इतर लोकांना समस्येमध्ये मदत करण्यासाठी उद्युक्त होतात.  काळजी करणा­या लोकामध्ये दुस-याला वेळ देऊन त्याला मदत करण्यासाठी कष्ट घेण्याची प्रबळ इच्छा असते.  फक्त स्वत:च्या कामावर लक्ष देण्यापेक्षा ते गटाच्या सहकार्यासाठी व त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
जो शारीरिकदृष्टया यातनांमुळे त्रासलेला असतो तो जास्त भावनाप्रधान असतो आणि तोच इतरांना मदत करत असतो.  ज्यांच्याकडे परानुभूतांची क्षमता नसते ते दुस­याच्या दु:खाची उपेक्षा करतात.  संशोधनानुसार असे सिध्द झाले आहे की तरुण मुलांना गरजू लोकांकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेण्यास उत्तेजन दिले तर त्या तरुण मुलांचे नंतरचे वाईट वर्तन टाळण्यासाठी ही चांगली कार्यनिती ठरते. 
फक्त दुस-यांबद्दल काळजी वाटणे हे नेहमीच पुरेसे नसते त्यानुसार परिणामकारक कृती करणे आवश्यक असते. वैद्यकीय काम आणि समाजकार्य यासारख्या सेवा व्यवसायामध्ये काळजी घेणे ही एक प्रेरणा असते.  ज्या व्यवसायामध्ये इतरांना मदत करणे अपेक्षीत असते त्या व्यवसायातील ज्या व्यक्तीकडे ही क्षमता अधिक असते त्यांची भरभराट होते परंतु जेव्हा ही क्षमता कमी होते तेव्हा त्यांचा ­हास होतो.
सामाजिक बुध्दिमत्तेमधील प्रत्येक घटकाचा विचार केल्यावर असे लक्षात येते की, व्यक्ती समाजात आपले जीवन व्यतीत करीत असताना सामाजिक बुध्दिमत्तेतील प्रत्येक घटकाची कमाल जाणीव-जागृती तिच्यामध्ये असणे आवश्यक आहे. शिक्षकामध्ये सामाजिक बुध्दिमत्ता ही उच्च पातळीची असावी कारण शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकास याची जाणीव होणे गरजेचे आहे.  सामाजिक बुध्दिमत्तेची कमतरता ही केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांत शारीरिक असमर्थतेमुळे दिसून येते इतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बुध्दिमत्ता अध्ययन अनुभवातून विकसित करता येते म्हणून पालकांनी व शिक्षकांनी दैनंदिन उपक्रमातून सामाजिक बुध्दिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:      
Goleman, D. (1996). Emotional Intelligence. New York: Bantam Books.

Goleman, D. (1996). Social Intelligence: The New Science of Human Relationships. New York: Bantam Books. 

Mathur, S. S. (2010). Educational Psychology. Delhi: Vinod Pustak Mandir
Thorndike, E.L. (1920). Intelligence and its uses. Harper's Magazine, vol. 140, pp. 227-235.  
संकपाळ, एस. पी. (2010). सामाजिक बुद्धिमत्ता. मैत्रीच्या पलीकडे मासिक, अंक 6/4   
                                                                                                                                                                                                           

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

  समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution - Focused Brief Therapy गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांन...