बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

बहुविध बुद्धिमत्ता | Multiple Intelligence |

 बहुविध बुद्धिमत्ता (Multiple Intelligence)

‘‘तो काय हुशार आहे, त्याला अभ्यास करायची काय गरज?’’

‘‘ती काय तशी लहानपणापासून हुशार बिशार नव्हतीच. त्यामुळे ती पुढे शिकेल असं वाटलंच नव्हतं. कलाकुसर इकडेच ओढा होता तिचा.’’

‘‘नववीत आला तरी अभ्यासाचं मनावर घेत नाही; मठ्ठ कुठला. रविवारी तरी अभ्यास करायचा, तर हा चालला आपल्या मित्राकडे.’’

अशी वाक्ये आपण अगदी आपल्या घरी किंवा आसपास ऐकत असतो. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, शाळेत हुशार असलेली मूले तीच केवळ बुद्धिमान. जी मुलं अभ्यासात हुशार नसतात, ज्यांना भरपूर मार्क्‍स मिळत नाहीत, अशी मुले कमी बुद्धिमान! त्यांना आयुष्यात काहीच जमणार नाही असा शिक्का मारून रिकामे होणारे असे अनेक पालक अवतीभवती भेटतात. पालक जेव्हा स्वत:च्या मुला-मुलींबद्दल अस काही बोलतात तेव्हा मुलेही  ‘आपण असेच आहोत’ असा ग्रह करून घेतात. पटकन आठवणे, खुप छान लेखन-वाचन, गणित उत्तम प्रकारे सोडवता येणं किंवा पटापट उत्तर देणे म्हणजे बुद्धिमत्ता, असा बुद्धिमत्ता या शब्दाचा अर्थ लावला जातो.  बुद्धिमत्तेचा अर्थ हा आपल्याकडे जी अभ्यास पद्धत, परीक्षापद्धत आहे त्यावरून असा लावला जातो. 

बुद्धिमत्ता या संकल्पनेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. केवळ औपचारिक शिक्षण झाले असेल तर फार "बुद्धिमान' असे अजिबात नसते, शिक्षण झाले नसले तरीही बुद्धीचे, बुद्धिचातुर्याचे अफाट आविष्कार घडविणारे अनेक अवलिया, शास्त्रज्ञ, समाजसुधारक होऊन गेले आहेत. म्हणजे केवळ औपचारिक शिक्षणातले घवघवीत यश म्हणजे बुद्धिमान, ही जुनाट, कालबाह्य संकल्पना म्हणावी लागेल.

अमेरिकेतील संशोधक डॉ. हॉवर्ड गार्डनर यांना मात्र काही वेगळंच म्हणायचं होतं. त्यांनी बुद्धिमत्तासंबंधी  मेंदूंवर सखोल संशोधन केलेले आहेत. अनेकांच्या मेंदूच्या संशोधनावरून ‘फ्रेम्स ऑफ माइन्ड’ (1983) या पुस्तकातून बुद्धिमत्ता एक नसून त्या अनेक प्रकारच्या असतात,’ असं त्यांनी जगासमोर मांडलेल आहे.

प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे झालेली असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो. जन्मलेल्या प्रत्येक मुलात विशिष्ट क्षमता असतात. त्याच्या नैसर्गिक क्षमतांना संधी मिळाली की त्या खुलतात. पण त्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या विरोधात काही करायला सांगितलं की त्याच्यावर ताण येतो. त्यामुळे गरज असते ती आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता ओळखण्याची.

डॉ. गार्डनर यांच्या ‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’ या सिद्धांतास मराठीत ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ म्हटलेल आहे. बहुविध बुद्धीमत्ता हा हॉवर्ड गार्डनर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या क्षमतेबद्दल (तार्किक, दृश्य, संगीत इत्यादी) मांडलेला मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रबळ कौशल्ये असू शकतात आणि काही लोक असे असतात ज्यांच्याकडे नऊच्या नऊ बुद्धिमत्ता संतुलित स्वरूपात असतात.

हॉवर्ड गार्डनरने सुरुवातीला सात व नंतर दोन कौशल्यांची मांडणी केलेली आहे. त्यांच्या या यादीतील पहिल्या तीन क्षमतांना शाळांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते, पुढील तीन सामान्यत: कलेशी संबंधित असतात आणि शेवटच्या तीन हॉवर्ड गार्डनरला 'वैयक्तिक क्षमता’ वाटतात बहुविध बुद्धीमत्तेचे प्रकार पुढीलप्रमाणे:

दृश्यात्मक/ अवकाशीय बुद्धिमत्ता: (Visual Intelligence)

दृश्य उद्दीपक/ गोष्टी समजून घेण्याची बुद्धिमत्ता. याआधारे शिकणारे विद्यार्थी चित्रांच्या रूपात विचार करतात आणि त्यांना माहिती साठविण्यासाठी स्पष्ट मानसिक प्रतिमांची आवश्यकता असते. या गटातील विद्यार्थ्याना नकाशे, चार्ट, चित्रे, व्हिडिओ आणि चित्रपट पाहण्याने आनंद मिळतो. असे विद्यार्थी वाचन, लेखन, चार्ट आणि आलेख समजून घेणे, प्रतिमा हाताळणे, बनविणे, पुनर्संचयित करणे, वास्तविक वस्तू तयार करणे, दृष्टी संबंधित प्रतिमांचे अर्थ लावणे इ. कौशल्ये आत्मसात करतात. त्यांना रेखांकन करणं, नकाशे वाचणं- समजून घेणं, त्रिमिती रचना यामध्ये रुची असते. चार्ट, फोटो, ड्रॉईंग्ज, मल्टिमिडीया या माध्यमांचा वापर ज्ञानप्राप्तीसाठी त्यांना सोयीचे असतात.

असे विद्यार्थी शिकण्यासाठी शक्यतो दृश्य, अवकाशीय माध्यम स्वीकारतात. प्रत्यक्ष हाताळणी करून शिकणं, ज्ञानप्राप्ती करणं त्यांना जास्त आवडतं. मेंदूतल्या कल्पनाचित्रावर काम करतात आणि त्याचा परिणामकारक वापर करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. या प्रकारची बुद्धिमत्ता प्रगल्भ असणाऱ्या विद्यार्थ्याना ‘पिक्चर स्मार्ट’ असे म्हणतात. अशा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती ही ‘फोटोग्राफीक स्मृती’ या प्रकारची असते. बऱ्याचदा हे भरभर बोलतात; रंगांविषयी जिव्हाळा, ओढ असते. त्यांना शिल्पकला, चित्रकला या माध्यमांची आवड असते आणि चित्रकाराने काढलेल्या चित्रांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. दृश्य बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्याना फोटोग्राफीची अधिक आवड असते.

या प्रकारची प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे लोक खूप वेगवेगळ्या क्षेत्रात असतात. जसे पायलट, रेसकार ड्रायव्हर्स, अवकाशवीर, शहर रचनाकार, फिल्म्स बनवणारे, बुद्धिबळपटू, युद्ध रूपरेषा निश्चित करणारे, चित्रकारसुद्धा या वर्गात येतात. या प्रकारची विकसित बुद्धिमत्ता असलेल्या काही सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्ग, पाब्लो पिकासो, व्हॅन गॉग सारखे जगप्रसिद्ध चित्रकार!

करिअरचे संभाव्य मार्गः शिल्पकार, चित्रकार, अन्वेषक, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझाइनर, यंत्रज्ञ, अभियंते इ.

शाब्दिक / भाषिक बुद्धिमत्ता: (Linguistic Intelligence)

शब्द आणि भाषा वापरण्याची बुद्धिमत्ता. अशा विद्यार्थ्याना ‘वर्ड स्मार्ट’ म्हणून ओळखले जाते. अशा विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कौशल्यांचे प्रमाण अत्याधिक विकसित झालेले असते आणि ते बहुतांशवेळा एक उत्तम वाक्कपटू असतात. ते चित्रांऐवजी शब्दांच्या माध्यमातून विचार करतात. या गटातील विद्यार्थ्याना ऐकणे, बोलणे, लिहिणे, कथा सांगणे, तपशीलवार स्पष्टीकरण देणे, शिकविणे, विनोदाचा वापर करणे, शब्दांची संरचना व अर्थ समजणे, माहिती लक्षात ठेवणे, एखाद्या गोष्टीवर सखोल विचार करणे, भाषेच्या वापराचे विश्लेषण करणे अशा कौशल्यांचा समावेश होतो.

भाषिक बुद्धिमत्ता ही प्रभावी व्यक्तिमत्त्वाची देण आहे. भाषिक बुद्धिमत्ता सुयोग्यरित्या विकसित झालेली असेल तर असे विद्यार्थी ‘प्रभाव टाकणारे' असतात. विविध भाषा चटकन आत्मसात करतात. वाचन, काव्य, साहित्य यात त्यांना विशेष रस असतो. त्यामुळे त्यांची साहित्याची जाणीव व जागरुकता वाढलेली असते. शब्दाचा चपखल वापर, संयमी वक्तृत्वशैली, कोणत्याही लहान-सहान गोष्टीवर प्रतिक्रिया न देणं, ही भाषिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या विद्यार्थ्याची लक्षणे होत.

भाषिक बुद्धिमत्ता विकसित झालेले किंवा प्रगल्भ असलेले लोक उत्कृष्ट राजदूत, सांस्कृतिक दूत तसेच तडजोड घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असते. असेच लोक पराष्ट्रसंबंधासारख्या प्रांतात यशस्वी होतात. भाषिक बुद्धिमत्ता प्रत्येकाला उपजत असते. कमी-अधिक प्रमाणात पण ती विकसितही करणे गरजेचे असते. त्यासाठी लहान वयापासून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत.

करिअरचे संभाव्य मार्गः कवी, पत्रकार, लेखक, शिक्षक, वकील, राजकारणी, अनुवादक इ.

तार्किक / गणिती बुद्धिमत्ता: (Logical-Mathematical intelligence)

अनुमान, तर्क आणि संख्या वापरण्याची बुद्धिमत्ता. अशा विद्यार्थ्यांमध्ये तार्किक आणि संख्यात्मक मार्गाने संकल्पना तयार करण्याची क्षमता असते. तसेच असे विद्यार्थी हे भिन्न माहिती दरम्यान संबंध लावून स्मृती तयार करतात. असे विद्यार्थी बरेच प्रश्न विचारतात आणि प्रयोग करण्यास पुढाकार घेतात.

या गटातील विद्यार्थ्याना समस्या सोडवणे, माहितीचे वर्गवारी आणि श्रेणींमध्ये विभागणी करणे, परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी अनुमनात्मक तत्त्वांवर कार्य करणे, कार्य-कारणतेचे, अनुक्रमांचे दीर्घ क्रम तयार करणे, नियंत्रित प्रयोग, नैसर्गिक घटनेबद्दलचे प्रश्न आणि आश्चर्यचकित करणारे जटिल गणितीय समस्या सोडविणे, भूमितीय रचनेवर कार्य करणे आवडते.

बुद्ध्यांक आणि गणितीय बुद्धिमत्ता यात धन सहसंबंध आहे. अशा प्रकारची बुद्धिमत्ता  असलेल्या विद्यार्थ्याना ‘नंबर स्मार्ट’ असे म्हणतात. पण अशी बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याचे गणित चांगले असतेच असे नाही. या विद्यार्थ्याना गणिती कूटप्रश्न सोडविणे, कोडी सोडविणे सहज जमतात. आकड्यांशी, समीकरणांशी त्यांची दोस्ती असते. अशा विद्यार्थ्याना सभोवतालच्या जगाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते त्यामुळे ते प्रयोगशील असतात.

अल्बर्ट आईनस्टाईन यांना गणिती बुद्धिमत्तेचे एक उत्तम उदाहरण म्हटले जाते. अफाट गणिती बुद्धिमत्ता असलेला हा शास्त्रज्ञ. अशी गणिती बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींना आकडेमोड आवडते. त्यांना शास्त्रीय कारणमीमांसेची ओढ असते. त्याच्या क्षेत्रासंबंधी नेमकेपणा आणि सुव्यवस्थितपणा असतो.

गणिती बुद्धिमत्ता आणि तार्किक बुद्धिमत्ता या साम्य/ साधर्म्य असलेल्या बुद्धिमत्ता आहेत पण तरीही त्यात सूक्ष्म फरक असतो. याचे एक गंमतीदार उदाहरण म्हणजे न्यूटनचं! आयझँक न्यूटन या अफाट गणिती बुद्धिमत्ता लाभलेल्या शास्त्रज्ञाकडे दोन मांजरी होत्या. एक आई आणि एक तिचं पिल्लू, त्या दोघींना त्याच्या खोलीत येता यावं म्हणून न्यूटनने दरवाजाला दोन छिद्रं करून ठेवली होती. मोठे आई मांजरीणीला आणि छोटं पिल्लाला आत येण्यासाठी- असा काही त्यानी सरळ साधा तर्क केला होता. मोठ्या छिद्रातून लहान मांजर येऊ शकेले असते, हे त्यास कळले नाही. हाच गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेतला सूक्ष्म फरक होय. गणिती आणि तार्किक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स, शास्त्रज्ञ, स्टॅटिस्टिशीयन्स, विश्लेषक इत्यादी.

करिअरचे संभाव्य मार्गः वैज्ञानिक, अभियंता, संगणक प्रोग्रामर, संशोधक, लेखाकार, गणितज्ञ इ.

शारीरिक किंवा कायिक बुद्धिमत्ता (Bodily-Kinesthetic Intelligence)

शारीरिक हालचाल आणि वस्तू कार्यक्षमतेने हाताळण्याची बुद्धिमत्ता. असे विद्यार्थी देहबोलीच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करतात. त्यांना संतुलन आणि शारीरिक समन्वय राखण्याची कौशल्य चांगले जमते (उदा. टेबल टेनिस, बॅलन्सिंग बीम). ते आपल्या आसपासच्या गोष्टी/ घटकावरून माहिती लक्षात ठेवण्यास आणि प्रक्रिया करण्यास सक्षम असतात. या गटातील विद्यार्थ्याना नृत्य, शारीरिक समन्वय, खेळ, पुढाकार घेणे, देहबोलीचा  अधिक वापर, कला, अभिनय, हाताच्या सहाय्याने रचना, योग्य भावनिक अभिव्यक्ती इ.

शारीरिक किंवा कायिक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याना ‘बॉडी स्मार्ट’ म्हणतात. अशा विद्यार्थ्याना शरीराबद्दल एक जागरूकता असते त्यास शारीरिक जाणिव-जागृती असे म्हणतात. शारीरिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या व्यक्तींचे उदाहरणं म्हणजे नर्तक, अभिनेता, शल्यविशारद, खेळाडू इ. ‘देहबोली' ही अलीकडची एक सर्वश्रुत संकल्पना आहे. ही देहबोली शारीरिक बुद्धिमत्तेशी संलग्न आहे. देहबोलीचा वापर, सकारात्मक आणि सुसंवादासाठी नक्की करता येऊ शकतो. कायिक बुद्धिमत्ता आणि सांगितिक बुद्धिमत्ता हे एकमेकाशी संबंधित असणारी बुद्धिमत्ता आहे. शारीरिक बुद्धिमत्ता प्रगल्भ असलेल्या व्यक्तींचे वेळेचे गणित  जबरदस्त असते, शरीर मनाचे संतुलन त्यांना साधता येते. शारीरिक बुद्धिमत्तेचा वापर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी असतो. खेळाडू, कलाकार यांच्याकडे जनमानसाला आकृष्ट करण्याची एक क्षमता असते. म्हणजेच समाज कल्याण, मानव कल्याण हा विषय शारीरिक बुद्धिमत्तेला जोडलेला आहे.

करिअरचे संभाव्य मार्ग: खेळाडू, शारीरिक-शिक्षण शिक्षक, नर्तक, अभिनेते, अग्निशमन दल इ.

संगीतविषयक बुद्धिमत्ता (Musical, Rhythmic Harmonic Intelligence)

संगीत निर्मिती आणि कौतुक करण्याची बुद्धिमत्ता. संगीतविषयक बुद्धिमत्ता प्रगल्भ असलेल्या विद्यार्थ्याना ‘साऊंड स्मार्ट’ म्हणतात. अशा व्यक्ती ऐकून शिकतात तर काही व्यक्ती अशा असतात की त्यांना संगीताची लहानपणापासूनच आवड असते. सूर, ताल, चटकन समजतो, गाण्याचे राग ओळखता येतात, वाद्यांविषयी विशेष आत्मियता असते. अगदी लहान मुलंसुद्धा उत्कृष्ट गाताना, वाजवताना आपण पाहतो- ऐकतो. पण ही बुद्धिमत्ता कमी-अधिक उपजत असू शकते.

संगीतविषयक बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थी म्हणजे संगीतकार, गीतरचनाकार, वादक, गायक इ. असे विद्यार्थी सूरांसाठी वेडे असतात. आपण "तानसेन' असायलाच हवं असं नाही; "कानसेन' तरी असणं महत्त्वाचं आहे. संगीताचा परिणाम नेहमीच सकारात्मक असतो. साऊंड थेरपीद्वारे आपण अनेक मनोकायिक आजार बरे होऊ शकतात. आपल्या जगण्यातसुद्धा एक सूर, लय, ताल असतोच. यालाच आपण जीवनसंगीत असे म्हणतो. हे जीवनसंगीत गवसणं, जगण्याचा सूर सापडणं महत्त्वाचं कारण यातूनच व्यक्तीचा आत्मविष्कार होतो.

संगीतामध्ये आवड असलेले, असे विद्यार्थी आवाज, लय आणि पॅटर्नच्या बाबतीत विचार करतात. ते संगीतात जे ऐकतात त्यावर लगेच प्रतिक्रिया देतात, मग त्याची स्तुती असो वा टीका. यापैकी बरेच विद्यार्थी निसर्गातील आवाजाबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. गाणे, शिटी वाजवणे, वाद्य वाजवणे, गायन ओळखणे, संगीत तयार करणे, संस्कारांचे स्मरण करणे, ताल स्मरणात ठेवणे आणि संगीत रचना करणे इ. वैशिष्टे अशा विद्यार्थ्यामद्धे  आढळतात.

करिअरचे संभाव्य मार्ग: गीतकार, डिस्क जॉकी, गायक, संगीतकार इत्यादी.

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता: (Interpersonal Intelligence)

इतरांना समजून घेण्यासाठी आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची बुद्धिमत्ता. असे विद्यार्थी इतरांच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहतात. दुसरे काय विचार करतात आणि त्यांचे आकलनही त्यांना समजते. त्यांच्याकडे भावना, हेतू आणि प्रेरणा अनुभवण्याची अलौकिक शक्ती असते. ते खूप चांगले समन्वयक असतात, सहसा ते गटात शांतता राखण्यासाठी आणि सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. ते इतरांशी संप्रेषण करण्यासाठी भाषा आणि देहबोली या  दोन्हींचा वापर करतात.

असे विद्यार्थी इतर लोकांच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहणे, ऐकणे, सहानुभूती दाखविणे, इतर लोकांची मनःस्थिती आणि भावना समजून घेणे, समुपदेशन करणे, गटांमध्ये कार्य करणे. इतरांना  शाब्दिक आणि अशाब्दिक प्रोत्साहन देणे, संप्रेषण साधणे, विश्वास निर्माण करणे, शांततेने संघर्ष सोडवणे, इतर लोकांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित करतात. डनियल गोलमन यांनी ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ म्हणून यावर पुस्तक लिहिले आहे.

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी सामाजिक संवादाने भारावून टाकतात.   अनोळखी लोकांशी संबंध स्थापित करण्यास नेहमी तयार असतात आणि सहज मित्र बनवतात.  ते इतरांना वाचण्यात, सहानुभूती दर्शविण्यास आणि समजून घेण्यात पारंगत असतात. त्यामुळे यांना बरेच मित्र असतात. ते उत्साही आणि चैतन्यशील असतात.  बहिर्मुखी,  सामाजिक कार्यक्रमांचा आनंद घेतात, सांघिक खेळांचा आनंद घेतात, नवीन लोकांना भेटायला आवडते अशा वैशिष्ट्यांचा समावेश यात होतो.

करिअरचे संभाव्य मार्ग: सल्लागार, समुपदेशक, विक्रेते, राजकारणी, उद्योगपती

व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता: (Intrapersonal Intelligence)

उच्च व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी स्वत:च्या जीवनानुभवातून शिकतात.  स्वत:चे अनुभव जीवनात लागू करण्यासाठी प्रवृत्त असतात.  असे विद्यार्थी सहसा त्यांची उद्दीष्टे गाठण्यासाठी खूप दृढनिश्चयी असतात. व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी हे शिकलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात सहजपणे लागू करू शकतात. ते स्वतःला ओळखण्याबरोबर इतरांनाही ओळखतात. त्यांना एकटे राहण्यात आणि एकट्याने काम करण्यात आनंद मिळतो. त्यांची अंतर्ज्ञाणनी वृत्ती कणखर असते. जरी त्यांना त्यांच्या सामर्थ्याबद्दल माहिती असली तरीही बऱ्याचदा त्याबद्दल अभिमान बाळगत नाहीत. स्वतंत्र विचार आणि त्यांचा उच्च आत्मविश्वास त्यांना इंतरापासून वेगळा बनवतो. डनियल गोलमन यांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता’ म्हणून यावर पुस्तक लिहिले आहे.

स्वत:ची विचार करण्याची आणि एखाद्याची आंतरिक क्षमता समजून घेण्याच्या  बुद्धिमत्तेमुळे असे विद्यार्थी इतरांशी असलेले नाते आणि सामर्थ्य व कमकुवतपणा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या भावना आणि विचार सर्जनशील मार्गाने व्यक्त करतात. ते सतत नवीन जीवन तत्वज्ञान आणि स्वत:ला सुधारण्याचे मार्ग शोधत असतात.

स्वतःची शक्ती आणि कमतरता ओळखणे, स्वतःचे विचार प्रकट करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे, अंतर्गत भावना, इच्छा आणि स्वप्नांची जाणीव, विचार प्रक्रियेचे मूल्यांकन, स्वतर्क करणे, अंतर्ज्ञानी, इतरांबरोबर स्वत:ची भूमिका समजून घेणे अशा कौशल्यांचा समावेश अशा विद्यार्थ्यामध्ये असतो.

करिअरचे संभाव्य मार्ग: संशोधक, नेते, तत्वज्ञ इ.

निसर्गवादी बुद्धिमत्ता (Naturalistic Intelligence)

गार्डनरच्या मतानुसार, निसर्गवादी बुद्धिमत्ता ही वातावरण, वस्तू, प्राणी किंवा वनस्पतींची ओळख, त्यांचे वर्गीकरण करण्याची आणि त्यांच्यातील बदल ओळखण्याची क्षमता होय. यांना 'नेचर स्मार्ट' म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या बुद्धिमत्तेमुळे विविध प्रजाती, लोकांचे गट किंवा वस्तू यांच्यातील फरक ओळखण्यास आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे समजून घेण्यास सक्षम असतात.

असे मानले जाते की मानवाच्या सुरुवातीच्या काळापासून नैसर्गिक बुद्धिमत्ता विकसित झालेली आहे. ही बुद्धिमत्ता अस्तित्वास उपयुक्त आणि धोकादायक प्रजाती ओळखण्यावर अवलंबून होती. हवामानाचे निरीक्षण करणे, उपयुक्त व अनुपयुक्त जमीन ओळखणे आणि अन्नासाठी उपलब्ध स्त्रोतांच्या विस्तृत श्रेणी विकसित केलेली आहे.

असे विद्यार्थी हे गोष्टी कशा कार्य करतात हे समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यांना पर्यावरणाची काळजी असते आणि निसर्गाशी संपर्क साधण्यास आवडते. प्राणी आणि वनस्पती यांची ओळख चांगली असते. त्यांना नवीन प्रजाती आणि त्यांचे वर्तनाचा शोध घ्यायला आवडते. निरीक्षणास उपयुक्त साधने जसे मायक्रोस्कोप, दुर्बीण इ. वापरण्यात त्यांना रस असतो.  

करिअरचे संभाव्य मार्ग: जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र इ.

अस्तित्त्वविषयक बुद्धिमत्ता (Existential Intelligence)

अस्तित्त्वविषयक बुद्धिमत्ता हा बुद्धिमत्तेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. अशी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींना ‘लाइफ स्मार्ट’ म्हणतात. काही लोकांना प्रश्न पडतात की आपण जन्माला का येतो? मरण म्हणजे काय? मरणानंतर काय होतं? त्यांचा हा विचार, शोध स्वतःशी सतत चालू असतो. पण काही लोक विचार करत नाहीत किंवा अशा प्रश्नात ते गुंतून पडत नाहीत. म्हणजेच या प्रकारची बुद्धिमत्ता कमी, जास्त असण्याचाच हा प्रकार, या प्रकारची बुद्धिमत्ता ज्या व्यक्तीमध्ये विकसीत झालेली असते, प्रगल्भ असते, त्या व्यक्ती म्हणजे, तत्त्ववेत्ते, योगी, धर्मगुरू वगैरे. अशा व्यक्तींकडे ‘स्व'चे सखोल मूल्यमापन करण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती विविध अंगाने विचार करू शकतात.

मनुष्याचे जीवन संपूर्ण विश्व असणाऱ्याच्या दृष्टीने अस्तित्व, किती नगण्य आहे याचे आकलन, जाणीव त्यांना पुरेपूर असते. ‘स्व'ला किती महत्त्व द्यायचं याच्या मर्यादा अशा व्यक्ती जाणून असतात. स्वत:ची किंवा माणूस म्हणून असणारे कमकुवतपणा, किंवा बलस्थाने यांची पूरेपूर जाणीव असते. असे विद्यार्थी सुयोग्य आत्मपरीक्षण करतात. व्यक्ती म्हणूनही आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि ते वेगळे का आहोत, हेही त्यांना माहीत असते. असे विद्यार्थी स्वयंप्रेरित असतात. असे लोक मॅस्लोच्या गरजा अधि श्रेणी मधील आत्मवास्तविकीकरण या टप्प्यावर पोहचलेले असतात.  

करिअरचे संभाव्य मार्ग: तत्त्वेते, योगी, धर्मगुरू, आदर्श शिक्षक इ.

बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचे शिक्षणातील उपयोग:

परंपरागत अनेक शाळांनी तार्किक प्रतिभा आणि भाषिक प्रतिभा (मुख्यतः वाचन आणि लेखन) यांच्या विकासावर जोर दिलेला आहे. बरेच विद्यार्थी या वातावरणात चांगले असतात, तर काहीजण हे आत्मसात करू शकत नाहीत. गार्डनरचा सिद्धांत असा आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यापक दृष्टीकोनातून अधिक फायदा होईल, ज्यामध्ये भाषिक आणि तार्किक कौशल्य असलेलेच नाही तर सर्वांना समान संवाद साधण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धती, प्रयत्न आणि कृतींचा उपयोग करतात.

बहुविध सिद्धांताची प्रासंगिकता अनेक प्रकारे बदलते. प्रत्येक विद्यार्थी जसा भिन्न आहे, तसा शिक्षकही;  त्यामुळे विद्यार्थ्यास येणाऱ्या अडचणी आणि  अध्यापनाची भिन्न पद्धत यांचा विचार करून बहुविध बुद्धिमत्ता फ्रेमवर्क वापरुन शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि खेळीमेळीचे ठेवू शकतो. सर्वसाधारणपणे, जे लोक या सिद्धांतावर विश्वास ठेवतात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिभांचा उपयोग करण्याची आणि विकसित करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जातो.

शाळेत बहुविध सिद्धांत अवलंबल्यामुळे होणारे फायदे:

आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा, आवडी आणि कौशल्य यावर आधारित शिकण्याची विश्वासार्ह संधी उपलब्ध करून देऊ शकतो. "वास्तविक" जगात बहुविध बुद्धिमत्ता असलेले  वर्ग कार्य करू शकतो. त्यासाठी पुस्तकांचे लेखक आणि अनुवादक यांचे तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्रिय, समर्पित होऊन शिकणारे बनतात. आजकाल अनेक शाळेतील पुस्तके गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्तेवर आधारित असलेले पहायला मिळतात.   

आपल्या शाळेत पालक आणि समुदायाचे हिस्सेदारी वाढू शकते. विद्यार्थ्याना अधिक सक्रिय बनवून त्यांचे कार्य वर्गासामोर आणि प्रेक्षकांसमोर सादर करतील. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये समुदायातील सदस्यांना सामील केले जाते. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे सामर्थ्य प्रदर्शित करण्यास आणि ते इतरासमोर सामायिक करण्यास सक्षम बनतात. अशी व्यवस्था बहुविध सामर्थ्यशाली विद्यार्थ्याला "तज्ञ" होण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यामुळे शेवटी स्वाभिमान जागृत होऊन विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडून येतो.

विद्यार्थ्यांना बहुविध सिद्धांताचा होणारा फायदा:

बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामुळे विद्यार्थ्यांना त्यांची विशिष्ट बुद्धीमत्ता समजते. गार्डनरच्या मते, शिकणे ही एक सामाजिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक कौशल्यांचा समतोल समजण्यास सुरुवात होते तेव्हा ते खऱ्या अर्थाने शिकण्यास सुरूवात करतात. स्वत:ची अध्ययन शैली, बोधनिक आणि विचार प्रक्रिया ओळखणे, आपल्या वैयक्तिक सामर्थ्याचा आदर करणे याद्वारे आपण काय आणि कसे शिकण्यास पात्र आहोत याची जाणिव होते.

शिक्षकाना आपला विद्यार्थी कोणत्या बुद्धिमत्ता गटातील आहे, तो स्वत: किती छान प्रकारे शिकू शकेल हे समजते. कोणत्या विद्यार्थ्यांकडे कोणती प्रतिभा आहे हे जाणून घेतल्याने शिक्षकाचे काम सुलभ होईल. प्रत्येकास एकाच पद्धतीने सुचना न देता त्याच्या कलाने सुचना देता येतील. प्रकल्प, असाइनमेंट, होम वर्क करून घेताना त्यांच्या या प्रतीभांचा वापर करता येईल. त्यांच्या बुद्धी चातुर्यनुसार भाषा, कला, क्रीडा, सामाजिकशस्त्रे, विज्ञान, गणित यासारखे विषय आकलनातील समस्या कमी होतील. प्रत्येकाच्या बुद्धी चातुर्यनुसार वेळ कमी-अधिक करता येईल. वैज्ञानिक, काव्यात्मक, कला संबंधित, वाद्य आणि भौगोलिक दृष्टीकोन असल्याने विद्यार्थी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून शिकण्याचा अवलंब करतील. त्यामुळे विविध कला गुणांना वाव देऊन अद्वितीयत्व  टिकविण्यास मदत होते. अल्बर्ट आईनस्टाईन याने प्रत्येकाकडे एक अलौकिक बुद्धिमत्ता असते असे म्हंटले असून जर का आपण पाण्यातील माशाला झाडावर चढण्यास, वाघाला पोहण्यास आणि पक्षांना चालण्यास प्रवृत्त केले तर ते आयुष्य भर मूर्ख आणि बावळट ठरतील असा सूचक व मार्मिक सल्ला दिलेला आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या अलौकिकत्वाचा विकास करू या.


(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

अधिक वाचनासाठी संदर्भ:

Armstrong, T. (2009). Multiple intelligences in the classroom. USA: ASCD.

Darling-Hammond, L. (2010). Performance Counts: Assessment Systems That Support High-Quality Learning. Council of Chief State School Officers.

Edutopia. (2013, March 8). Multiple Intelligences: What Does the Research Say? https://www.edutopia.org/multiple-intelligences-research

Gardner, H. (2011a). Frames of mind: The theory of multiple intelligences. New York: Basic Books

Gardner, H. (2011b). The theory of multiple intelligences: As psychology, as education, as social science. Address delivered at José Cela University on October, 29, 2011.

Gardner, H. E. (2000). Intelligence reframed: Multiple intelligences for the 21st century. New York: Basic Books

Gottfredson, L. S. (2004). Schools and the g factor. The Wilson Quarterly, 28(3), 35-45.

Marenus, M. (2020, June 09). Gardner's theory of multiple intelligence. Simply Psychology. https://www.simplypsychology.org/multiple-intelligences.html

Visser, B. A., Ashton, M. C., & Vernon, P. A. (2006). Beyond g: Putting multiple intelligences theory to the test. Intelligence, 34(5), 487-502.


१२ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर विश्लेषण सर उदाहरणासहित

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर विश्लेषण केले आहे सर अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार सर मी ओंकार आगळे औरंगाबाद 22 वर्षे वय आहे मला आपल्याकडुन व्यक्ती अंतर्गत बुद्धीमत्ता बाबत मार्गदर्शन घ्यायचे आहे कृपया आपला नंबर द्या प्लीज

    उत्तर द्याहटवा
  4. फारच सुंदर विश्लेषण!एक शिक्षक म्हणून फार उपयोगी!!🙏🏻🙏🏻


    उत्तर द्याहटवा
  5. मराठी मध्ये माहिती उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...