व्यक्तिमत्त्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तिमत्त्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

महाविद्यालय व विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रिया | Assistant, Associate Professor Selection Process

 

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रिया

11 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील नियमित अध्यापक भरती प्रक्रियेबाबत सुधारित कार्यपद्धती जाहीर केली. या शासन निर्णयाचा संकेतांक 202602111259334708 असा असून तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या निर्णयामागील मूलभूत हेतू म्हणजे अध्यापक निवड प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ, न्याय्य आणि संतुलित स्वरूप देणे हा आहे.

उच्च शिक्षण व्यवस्थेत अध्यापक हे केवळ ज्ञानप्रदाता नसून संशोधन, नवोपक्रम, शैक्षणिक नेतृत्व आणि मूल्यसंस्कार यांचे प्रमुख वाहक असतात. त्यामुळे त्यांच्या निवडीतील प्रक्रिया जितकी शास्त्रीय आणि पारदर्शक असेल तितकी संपूर्ण शिक्षणव्यवस्था गुणवत्तापूर्ण होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली सुधारित कार्यपद्धती ही केवळ प्रशासकीय सुधारणा नसून उच्च शिक्षणाच्या दीर्घकालीन गुणवत्तावृद्धीच्या दृष्टीने एक धोरणात्मक हस्तक्षेप मानला जाऊ शकतो.

बुधवार, १२ मार्च, २०२५

उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल | Holistic Teacher Appraisal Norms

 

उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल

भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे मूल्यमापन हा शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. पारंपरिक मूल्यमापन पद्धतीत केवळ संशोधन व प्रकाशनांवर भर दिला जात होता. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने नव्या Holistic Teacher Appraisal Norms मध्ये शिक्षकांच्या कार्यक्षेत्राचा NEP-2020 च्या धरतीवर व्यापक विचार केला असून, अध्यापन, संशोधन, सामाजिक सहभाग, व्यावसायिक विकास आणि विद्यार्थी-पालक अभिप्राय यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि केवळ संशोधन व प्रकाशनांवर आधारित मूल्यमापनाची पारंपरिक प्रणाली बदलली जाईल असे त्यात नमूद केलेले आहे.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

खरा धर्म: आत्मज्ञानाचा शोध आणि आंतरिक जागरूकता

 

खरा धर्म: आत्मज्ञानाचा शोध आणि आंतरिक जागरूकता

धर्म हा केवळ विशिष्ट संप्रदाय, परंपरा किंवा धार्मिक विधी पाळण्याचा विषय नसून, तो व्यक्तीच्या आत्मज्ञानाचा आणि सत्यशोधनाचा मार्ग आहे. धर्माची खरी संकल्पना म्हणजे आपल्या अस्तित्वाचा, उद्दीष्टाचा आणि नैतिक जबाबदारीचा शोध घेणे. आधुनिक समाजात धर्म हा मुख्यतः सामाजिक ओळख म्हणून पाहिला जातो, परंतु तो मूळतः व्यक्तीच्या आंतरिक शोधाशी आणि आत्मसाक्षात्काराशी संबंधित आहे.

‘धर्म’ ही संकल्पना जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घालत आलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे धर्म या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान दिसून येते. सखोल धर्माचा अभ्यास करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दिसून येतात. कुणीतरी एखाद्या माणसाने देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगावे व त्यावर डोळे मिटून विश्‍वास ठेवावा, असाच प्रकार सर्वत्र चाललेला दिसून येतो. सांगणारा किती ज्ञानी आहे, त्याचा हेतु विवेकी आहे की अविवेकी, स्वार्थ बुध्दीने सांगतो आहे की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, याचा विचार सर्वसाधारणपणे लोक करताना दिसत नाहीत. कोणावर तरी विश्‍वास ठेवला जातो त्याची परिणती प्रथम श्रध्देत होते व नंतर अंधश्रध्देत होते. थोडक्यात. धर्माबद्दलच्या अज्ञानातून अहंकार, अभिमान, अंधश्रध्दा, अविचार, असूया व द्वेष निर्माण होऊन अखिल मानवजात अधोगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही आज मोठी खेदाची गोष्ट आहे.

धर्म हा संस्कृत शब्द ‘धृ’ धातूपासून बनला असून त्याचा अर्थ आहे - धरून ठेवणे, आधार देणे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार धर्म हा स्व‍त्वाचा आणि विश्वाच्या सत्याचा शोध घेण्याचा मार्ग आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात, “धर्म हा केवळ विधी आणि प्रथा नव्हे, तर तो स्व-ज्ञान आणि मानवकल्याणाचा मार्ग आहे.”

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

मूल्य प्रवाह 2.0: मूल्याधारित शिक्षणासाठी आराखडा | Mulya Pravah 2.0

 

मूल्य प्रवाह 2.0: मूल्याधारित शिक्षणासाठी आराखडा

उच्च शिक्षणात नैतिक मूल्यांना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मूल्य प्रवाह 2.0 ची सुरुवात केली आहे. हा नवीन मार्गदर्शक तत्त्व संच विविध शैक्षणिक संस्थांमधील पक्षपात, लैंगिक शोषण आणि लिंगभेद यांसारख्या अनैतिक प्रथांच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्वेक्षणांवर आधारित आहे.

मूल्य प्रवाह 2.0 हे 2019 मध्ये UGC द्वारे सादर केलेल्या मूळ मूल्य प्रवाह मार्गदर्शक तत्त्वांचे सुधारित संस्करण आहे. याचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्ये आणि व्यावसायिक नैतिकता वाढवणे हा आहे. तसेच, हे तत्त्वज्ञान संस्थांमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता यांची संस्कृती निर्माण करणे आहे.

शिक्षण हे केवळ बौद्धिक क्षमतांचे विकसन करण्यापुरते मर्यादित नसून त्याच्या माध्यमातून नैतिक व नैतिक संकल्पनांचा समावेश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मूल्य शिक्षणाच्या गरज अधोरेखित करत, मूल्य प्रवाह 2.0 हा एक व्यापक आराखडा म्हणून पुढे आला आहे. हा दस्तऐवज शिक्षक, धोरणकर्ते आणि संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार केला आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता, राष्ट्रीय अभिमान आणि सामाजिक जबाबदारी रुजवली जाईल.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

अत्यंत मोकळ्या मनाने विचार | Radical Open-Mindedness


अत्यंत मोकळ्या मनाने विचार करण्याचा सराव

एका विद्वान प्राध्यापकाला प्राचीन तत्त्वज्ञान शिकायचे होते. त्यामुळे तो एका महान गुरुंकडे गेला. गुरुंचे ज्ञान सर्वदूर प्रसिद्ध होते, आणि प्राध्यापक अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याकडे ज्ञान मिळवायला गेले. "गुरुजी, मला तुमच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. मी आधी खूप ग्रंथ वाचले आहेत आणि मी बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आहेत. मला वाटतं की मी आधीच बरंच काही जाणतो, पण मला तुमच्या दृष्टिकोनातून अधिक शिकायचं आहे." प्राध्यापक उत्साहाने म्हणाला.

गुरुंनी मंदस्मित केले आणि त्यांनी प्राध्यापकाला चहा घेण्याची विनंती केली. त्यांनी कप घेतला आणि त्यात ते गुरु चहा ओतू लागले. कप भरला, पण गुरु अजूनही चहा ओततच राहिले. चहा कपातून बाहेर वाहू लागला आणि खाली सांडू लागला. तसा प्राध्यापक चकित झाला आणि म्हणाला, "गुरुजी, थांबा! कप आधीच भरला आहे, त्यात आणखी चहा मावत नाही!"

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

जेनी | Genie – A case of Language Development

 जेनी | Genie A case of Language Development  

जेनी (Genie) ही 1970 मध्ये उपेक्षित, एकाकी आणि दुर्लक्षित अवस्थेत सापडलेल्या 13 वर्षाच्या एका लहान मुलीची केस, जी तिच्या बालपणाचा बहुतांश काळ गंभीरपणे उपेक्षित आणि एकाकी घालविल्यामुळे भाषा आणि मानवी विकासाच्या महत्त्वाच्या काळाविषयी अमूल्य माहिती मिळाली आहे. जेनीला 13 व्या वर्षी शोधण्यात आले, तिला आयुष्यभर एका छोट्या खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते, त्यादरम्यान मानवी संवाद फारच कमी होता त्यामुळे तिच्या कानावर कोणतीच भाषा पडली नाही. जेनीला या परिस्थितीतून वाचवण्यात आले तेव्हा तिला भाषा बोलता येत नव्हती आणि तिने तिच्या वयाला न शोभणारे सामाजिक, भावनिक आणि बोधनिक वर्तन दर्शवले होते. संशोधक आणि मानसशास्त्रज्ञांनी जेनीचा व्यापक अभ्यास केला, ज्यामुळे अत्यंत एकाकीपणाचा भाषा आणि बोधनिक विकासावर होणारा परिणाम समजून घेण्यात यशस्वी झाले. ही केस प्रारंभिक भाषा संपर्काचे महत्त्व दर्शविते, तसेच यामुळे जेनीच्या उपचारदरम्यान  आणि दीर्घकालीन काळजीबाबत महत्त्वाचे नैतिक प्रश्न देखील उपस्थित झाले.

शुक्रवार, १४ जून, २०२४

LGBTQ+ आणि त्यांचे मानसिक आरोग्य

                                                 LGBTQ+ आणि त्यांचे मानसिक आरोग्य

LGBTQ+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर (किंवा कधीकधी प्रश्नार्थी चिन्ह)आणि इतर. "+" हे लिंग नॉन-बायनरी ओळख दर्शवते, ज्यात पॅनसेक्सुअल आणि टू-स्पिरिट समाविष्ट आहे. संक्षिप्त रूपाची पहिली चार अक्षरे 1990 पासून वापरली जात आहेत, परंतु सर्वोत्तम प्रतिनिधित्व प्रदान करण्यासाठी इतर लिंग ओळख समाविष्ट करण्याची गरज वाढलेली आहे. हे संक्षेप शब्द विविध लैंगिकता आणि लिंग ओळख दर्शवण्यासाठी वापरले जातात. ट्रान्सजेंडर आणि/किंवा समलैंगिक /समान लिंगाकडे आकर्षित असलेल्या कोणालाही संदर्भित करते.

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program

 

इंटर्नशिप / आंतरवासिता कार्यक्रम | Internship Program

विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढवण्यासाठी आणि संशोधनाचे महत्व समजून घेण्यासाठी, सोबतच त्यांना क्रेडिट मिळवून देण्याच्या उद्देशाने सक्तीचे इंटर्नशिप करण्याची शिफारस करणारे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. Guidelines for Internship/Research Internship for Under Graduate Students.” याचा मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या सुसंगाने जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवात्मक शिक्षणासाठी, सक्रिय सहभागासाठी संधी प्रदान करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमात संशोधन आणि इंटर्नशिपचा समावेश करण्यावर भर दिला जातो.

रविवार, ७ एप्रिल, २०२४

21व्या शतकातील रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

 

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

     एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक भारतीय अभियंते बेरोजगार आहेत.  तर अभियांत्रिकी केलेल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर नोकरी मिळते.  एस्पायरिंग माइंड्सचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल म्हणतात की, देशभरातील शैक्षणिक संस्था लाखो तरुणांना प्रशिक्षण देतात परंतु या संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी तयार नसतात आणि कंपनीनुसार रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते.

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी | Maslow’s Needs of Hierarchy

 

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी (Maslow’s Needs of Hierarchy)

एखाद्या परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो कारण कोणत्याही यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मतः प्रत्येक मुलांसाठी आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी हातभार लावतात. त्यामुळे अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे. परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे. मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रिणी, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, समाज कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात.

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

भारतीय ज्ञान प्रणाली | Indian Knowledge System I इंडियन नॉलेज सिस्टम

 

भारतीय ज्ञान प्रणाली | Indian Knowledge System

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ाचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या आराखडय़ात ३ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा, अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, शिक्षणाचे विविध टप्पे यांचा समावेश आहे. प्राचीन भारतातील तत्त्वज्ञानाची बैठक हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा खरा स्रोत असल्याचे नमूद करून सहा प्रमाणांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. तसेच पंचकोश विकासाच्या माध्यमातून मुलांच्या मनोविकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. देशातील समृद्ध, सांस्कृतिक वारसा आणि परंपरांच्या माध्यमातून भारतीयत्व समजून घेण्यावर, आयुर्वेद आणि योग शिकण्यावर भर देण्यात आला आहे.

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

SOAR Analysis | SOAR विश्लेषण

 SOAR Analysis | SOAR विश्लेषण

SOAR Analysis हे एक स्व-विश्लेषण तंत्र असून ते आपल्या विद्यमान सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भविष्यकालीन उद्दिष्टांसाठी नवी दृष्टी विकसित करण्यासाठी वापरू शकतो. हे मुळात एक धोरणात्मक नियोजन करण्याचे साधन आहे ज्याद्वारे आपण आपल्या महत्वाकांक्षा सुस्पष्ट करू शकतो.

SOAR विश्लेषण हे प्रामुख्याने आपण कोण आहोत आणि भविष्यात आपण स्वतःला कुठे पाहतो आणि इतरांबरोबर कसे काम करत आहात हे समजून घेण्यास मदत करते. आपण SWOT विश्लेषण बद्दलचा लेख वाचला असाल तर त्याच्याशी हे साम्य असेल. SWOT विश्लेषण हे आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे तर SOAR विश्लेषण हे व्यक्तिमत्वाबरोबरच ध्येय धोरणे निश्चितीसाठी आवश्यक आहे. आपण हे लक्षात  ठेवावे की आपल्या विचारांची किंवा धोरणात्मक प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही सर्व फ्रेमवर्क आहेत. म्हणूनच, या सर्वांचे अगदी नवीन तंत्रात विलीन करून दुसरी रचना शोधणे देखील शक्य आहे. जर आपला विश्वास असेल तरच त्यांना मर्यादा आहे अन्यथा आपल्या महत्वाकांक्षेला आकाश ठेंगणे असते. आपण SOAR विश्लेषणाच्या घटकांचे एक-एक करून परिक्षण करणार आहोत आणि प्रत्येक शीर्षकाच्या खाली SOAR विश्लेषण प्रश्न सापडतील.

शनिवार, ८ जुलै, २०२३

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

 

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

एका शहरात सागर आणि प्रीती कुटुंबापासून दूर दोघेच रहात होते. त्यांना पाच वर्षाचा रोहन नावाचा मुलगा होता. दोघेही कामावर जात असल्याने तो गुंतून राहावा म्हणून त्याला मोबाईल दिलेला होता. रोहन कोणतीही गोष्ट करायची असेल तर मोबाईलशिवाय करू शकत नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मोबाईल लागायचा, जेवण करताना तर पहिली अटच ती असायची. त्याचे आई-वडील सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही.........

आज जवळपास सर्वच घरात वरील प्रसंग घडताना दिसत असेल. मुले काय खात आहेत, पीत आहेत याचे भानच राहिलेले नाही. हे भान किंवा अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे काय तर माइंडफुलनेस किंवा सजगता होय. आपण माइंडफुलनेस ही एक मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो,  मानवाला कोणत्याही प्रसंगी पूर्णपणे सचेतन राहण्याची, जागरूक राहण्याची, मन शांत ठेवून सारासार विचार करण्याची, आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव असणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर माइंडफुलनेस म्हणजे सद्य स्थितीत जगणे होय, दोन श्वासामधील जगणं होय. काही लोक आपल्या भूतकाळात जगतात, तर काही लोक आपल्या भविष्यकाळात विहार करत असतात. परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि सद्य स्थितीतला क्षण जगता आला पाहिजे. आपणास जर कायमस्वरूपी आनंदी राहायचे असेल तर आपण माइंडफुलनेसच्या मदतीने आनंदी राहू शकतो. काही लोकांचा स्वभावच असा असतो की, ते तुरूंगामध्ये जरी असले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो की त्यांना राज महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.

माइंडफुलनेस हा नेहमी आनंदी राहण्याचा एक राजमार्ग आहे. आपण विचार करत असाल की हे काय आणि कसे असते? खरं तर माइंडफुलनेस ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे आपण आपल्या आत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करतो. हे एक प्रकारचे ध्यानच आहे, फरक एवढाच आहे की, एका विशिष्ट वेळी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, माइंडफुलनेसमध्ये, आपण आपले लक्ष त्या क्षणावर केंद्रित केले पाहिजे, आपण जिथे आहोत, त्याच स्थितीत तो क्षण अनुभवणे आणि जगणे आवश्यक आहे.

असे मानले जाते की माइंडफुलनेस तंत्राच्या नियमित सरावाने आपण आनंदी राहू शकतो. वास्तविक, याद्वारे आपण वर्तमान क्षणाशी जोडतो आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारतो. आपण परिस्थिती बदलू शकत नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकतो आणि परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलू शकतो. यामुळे आपण हळूहळू प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला आणि त्यात आनंदी राहायला शिकतो. कारण आपण त्याची निवड केलेली असते “मी आनंदी आहे कारण मी आनंदी राहण्याची निवड केलेली आहे”.

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

आत्मनिर्भर आणि स्व-मदत पुस्तके आणि व्हिडीओ यांचे वास्तव | Fact of Self-help books and videos

 

आत्मनिर्भर आणि स्व-मदत पुस्तके आणि व्हिडीओ | Self-help books and videos

गौतम बुद्ध एकदा देशाटन करत एका नदीच्या काठी थांबले. तेथे जीवनातील विविध पैलूंवर दररोज बुद्ध धम्मदेसना देण्यास सुरुवात केली, लोकांना बोधकथा सांगत होते. ते ऐकण्यासाठी दुर्गम भागातील दूरदूरवरुन लोक येवू लागले. बुद्धांच्या धम्मदेसनांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा होता, तत्त्वज्ञान होते आणि त्या धम्मदेसनांमध्ये जीवनाचे सार लपलेले होते. असे म्हणतात की त्यांच्या वाणीने श्रावक मंत्रमुग्ध व्हायचे. जवळच्या गावातून एक श्रावक दररोज येत होता. तो मन एकाग्र करून धम्मदेसनांमध्ये सहभागी होत असे. हा दिनक्रम पूर्ण महिना सुरू राहिला. पण इतका वेळ लोटल्यानंतरही त्याला स्वत:मध्ये कोणताही बदल दिसला नाही, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला.

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

 

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

ए‍कविसावे शतक हे तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे शतक आहे आणि येथे सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असून सहकार्याने काम करणे अपेक्षित आहे. ए‍कविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल.

प्रत्येकास यशस्वी होण्यासाठी ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच अनेक शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. ए‍कविसाव्या शतकात घडणार्‍या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षण पद्धती किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का हा कदाचित वादाचा मुद्दा असेलही पण आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शाळेतून शिकवली जातात का? हा विचार प्रवृत्त करणारा प्रश्न आहे. अशा कौशल्यांच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच ‘SKILLS FOR 21ST CENTURY‘.

आपणास एकाविशाव्या शतकातील कौशल्यांची गरज का आहे?

शिकणे तेव्हाच पूर्ण आणि सर्वांगीण होते जेव्हा एखादा विद्यार्थी स्वत:, शाळा, कुटुंब, समाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाप्रती असलेल्या त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम असतो. आजच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता ओळख आणि क्षमतांची चांगली जाणीव असणे तसेच एक चांगला नागरिक आणि एक जबाबदार माणूस बनण्यासाठी सक्षम करणे हे एकाविशाव्या शतकातील कौशल्यांचे ध्येय आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या आणि समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम बनविते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेले आढळते. अध्ययन कौशल्ये (Learning Skills): नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये. साक्षरता कौशल्ये (Literacy Skills): वाचन, माध्यम आणि डिजिटल संसाधनांद्वारे नवीन ज्ञान तयार करण्यात आणि प्राप्त करण्यात मदत करणारी कौशल्ये. जीवन कौशल्ये (Life Skills): दैनंदिन जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये.

अध्ययन कौशल्ये (शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी)

अध्ययन कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर कामाचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये. अध्ययन कौशल्ये ही खालील चार प्रकारात विभागलेली आहेत.

1. चिकित्सक विचार करणे (Critical Thinking)

चिकित्सक विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे होय. चिकित्सक विचारामध्ये प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील राहणे, प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असणे, स्वतंत्र वैचारिक बैठक असणे, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य असणे आणि मूल्ये, समवयस्कांचा दबाव आणि मीडियांचा प्रभाव ओळखणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

2. संप्रेषण (Communication)

संप्रेषण म्हणजे एखाद्याची मते, इच्छा, गरजा, शंका इत्यादी योग्यरित्या, शा‍ब्दिक  आणि अशाब्दिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता होय. आज संप्रेषणाची माध्यमे बदलली असली तरीही आभासी संप्रेषण करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणे ही कौशल्ये प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक आहेत.

3. सर्जनशीलता आणि नवोपक्रमशीलता (Creativity and Innovation)

विचार करण्याचे नवीन मार्ग शोधणे आणि तयार करणे यांचा समावेश सर्जनशील कौशल्यात होतो. सर्जनशीलता म्हणजे गोष्टीकडे पाहण्याचा किंवा गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचा नवीन मार्ग शोधणे होय यामध्ये प्रवाहीपणा (नवीन कल्पना निर्माण करणे), लवचिकता (दृष्टीकोन सहज बदलणे), मौलिकता (मूलभूत कल्पनांचा आविष्कार), आणि विस्तार (इतरांच्या कल्पनांवर आधारित) यांचा समावेश होतो.

नाविन्यपूर्ण कौशल्ये म्हणजे काहीतरी नवीन/अद्वितीय/सुधारित/विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यासाठी सर्जनशीलपणे विचार करण्याची कौशल्ये. नवनवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूंनी विचार करताना कोणत्याही विचाराशी चिकटून न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहजपणे विस्तार करता येणे इत्यादी कौशल्ये सर्जनशीलतेत येतात.

4. सहकार्य (Collaboration)

सहकार्य म्हणजे इतरांसोबत प्रभावीपणे काम करण्याची क्षमता तसेच इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता होय. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असतात त्यावेळी इतरांच्या मतांचा आदर ठेऊन, संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणे आवश्यक ठरते. सहकार्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रस आणि मनोरंजन विकसित होण्यास मदत होते. हे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय सीमा प्रभावीपणे विस्तृत करते आणि विद्यार्थ्यास सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.

साक्षरता कौशल्ये (माहिती-तंत्रज्ञान युगात यशस्वी होण्यासाठी)

साक्षरता या विभागात माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता यांचा समावेश होतो. या कौशल्यांमध्ये माहिती (पारंपारिक किंवा डिजिटल), माध्यम आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची क्षमता, सामग्री आणि माहितीचे विविध पैलू समजून घेणे, गंभीरपणे मूल्यांकन करणे, प्रभावीपणे तयार करणे आणि संप्रेषण करणे समाविष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने माहिती असलेली साक्षरता महत्वाची आहेच पण त्याच बरोबरीने एकविसाव्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहेत. या साक्षरतेचे तीन  प्रकारात विभागणी केलेली आहे.

1. माहिती साक्षरता (Information Literacy)

सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे (उदाहरणार्थ– इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास/विश्लेषण करणे), माहितीचा योग्य आणि सर्जनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी.

2. माध्यम साक्षरता (Media Literacy)

एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणे, एखाद्या मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणे, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूंची माहिती असणे इत्यादीचा समावेश यात होतो.

3. तंत्रज्ञान साक्षरता (Technology Literacy)

तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.

जीवन कौशल्ये (जीवनात यशस्वी होण्यासाठी)

नावाप्रमाणेच जीवन कौशल्ये म्हणजे वैयक्तिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये होत. बहुतांशी ही कौशल्ये वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात देखील होतो.

1. लवचिकता आणि अनुकूलता (Flexibility and Adaptability)

लवचिकता आणि अनुकूलता म्हणजे सतत आपल्या सभोवताल होणार्‍या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे आणि नवीन परिस्थितीनुसार त्याने उचललेली पावले आणि नैतिकता आणि मूल्यांशी तडजोड न करता कार्यक्षमतेने अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करणे होय.

नवीन वातावरणाला अनुकूल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणे म्हणजे  अनुकूलता होय. विद्यार्थ्यांसाठी, हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी लवचिक आणि अनुकूल होण्यासाठी आवश्यक कौशल्ये समजू शकतात आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य उपाय शोधू शकतात.

2. नेतृत्व आणि जबाबदारी (Leadership and Responsibility)

नेतृत्व म्हणजे संघाचे नेतृत्व करणे तसेच वेगवेगळ्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आणि वास्तविक जगाच्या आव्हानांच्या संदर्भात प्रभावी संघ व्यवस्थापन करण्यास सक्षम असणे होय. या कौशल्यामुळे मुलाला चिकाटी, वचनबद्धता आणि जबाबदार असणे, लवचिकता आणि आत्मविश्वास यासारख्या मुख्य वैयक्तिक गुणांच्या विकासास कसे समर्थन द्यावे आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वचनबद्धता कशी वाढवावी हे शिकविते.

जबाबदार असणे म्हणजे एक चांगला आणि प्रभावी/संवेदनशील नागरिक असणे. एक माणूस म्हणून आणि विद्यार्थी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता, भविष्यात परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता. माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून, आपली मूलभूत कर्तव्ये आणि हक्कांची जाणीव असणे आणि भारतातील मूलभूत लोकशाही मूल्ये अंतर्भूत करणे आणि त्यांच्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

3. पुढाकार घेणे आणि स्व-दिशा (Initiative and self-direction)

पुढाकार कौशल्यामध्ये स्वतंत्रपणे कार्य सुरू करण्याची क्षमता समाविष्ट असते यामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य आणि अंतःप्रेरणेतून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरु करण्याचे कौशल्य समाविष्ट आहेत. हे मुलाला स्वतःच्या विकासाचा मार्ग तयार करण्यास मदत करते. स्व-प्रेरणा आणि पुढाकार घेण्यावर प्रामाणिकपणे कार्य करणे हे स्व-दिशा कौशल्य आहे.

4. उत्पादकता आणि उत्तरदायित्व (Productivity and accountability)

ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले उत्पादक काम करता येणे तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य होय. विद्यार्थ्यामध्ये उत्पादकता विकसित करणे म्हणजे एका ठराविक कालावधीत कोणतेही कार्य पूर्ण करण्यास सक्षम बनविणे.

उत्तरदायित्व म्हणजे कोणत्याही कामासाठी जबाबदारीची भावना लक्षात येणे. विद्यार्थ्यामध्ये ही कौशल्ये विकसित केल्याने त्याला/तिला प्रभावीपणे काम करण्यास मदत होते आणि त्याच्या/तिच्या कृतींसाठी जबाबदार राहून तो/ती इतर समवयस्कांसाठी विश्वासार्ह बनवतो.

5. सामाजिक आणि आंतर-सांस्कृतिक संवाद (Social and cross cultural interaction)

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात संवाद साधण्याची, सहकार्याने आणि प्रभावीपणे काम करण्याची ही कौशल्ये आहेत. वेगवेगळ्या शहरांत, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतींमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी ठरतात.

समारोप:

सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ही कौशल्ये आत्मसात करता येतातच असे नाही त्यामुळे इतर ठिकाणाहून ही कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या येऊ घातलेले आणि आंमलात येत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) आपणास एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी अशा कौशल्यांची आवश्यकता अधोरेखित केलेले आढळते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात वयोगटानुसार आणि कौशल्यानुसार परिणाम कसा असावा हे उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ही कौशल्ये जर असतील तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यापासून आपणास कोणी थांबू शकणार नाही.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार )

संदर्भ:

CBSE (2020). 21st Century Skills: A Handbook, Delhi: Central Board of Secondary Education

Trilling, Bernie and Charles Fadel (2012). 21st Century Skills: Learning for Life in Our Times, New York: Jossey-Bass

रजोनिवृत्ती (Menopause): स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक संक्रमण

  रजोनिवृत्ती ( Menopause): स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक संक्रमण स्त्रीच्या जीवनात बाल्यावस्था , किशोरावस्था , प्रौढावस्था आणि वृद्धत...