शुक्रवार, ५ जून, २०२६

हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner): बहुविध बुद्धिमत्तेचा जनक

 

हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner): बहुविध बुद्धिमत्तेचा जनक

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

मानवी बुद्धिमत्तेबद्दलची पारंपरिक समज बदलणाऱ्या व्यक्तींमध्ये हॉवर्ड गार्डनर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. “हुशार” असणे म्हणजे फक्त गणितात किंवा भाषेत चांगले असणे नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, ही क्रांतिकारी कल्पना त्यांनी जगासमोर मांडली. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा केवळ शैक्षणिक यशाचा इतिहास नाही, तर जिज्ञासा, सातत्य, कठोर परिश्रम आणि मानवी क्षमतांवरील अढळ विश्वासाचा प्रेरणादायी आदर्श आहे.

बालपण: संकटातून उभा राहिलेला प्रवास

हॉवर्ड गार्डनर यांचा जन्म 11 जुलै 1943 रोजी अमेरिकेतील Scranton येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव हॉवर्ड इर्ल गार्डनर असे आहे. त्यांचे वडील राल्फ गार्डनर आणि आई हिल्डे वाईलहायमर गार्डनर हे जर्मन-यहुदी स्थलांतरित होते. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, जर्मनीत वाढत असलेल्या नाझीवादामुळे आणि यहुदी लोकांवरील अमानुष अत्याचारांच्या भीतीमुळे त्यांनी 1938 मध्ये अमेरिका गाठली. त्यामुळे गार्डनर यांचे बालपण हे केवळ एका सामान्य अमेरिकन कुटुंबातील वाढ नव्हते, तर विस्थापन, सांस्कृतिक संक्रमण आणि ऐतिहासिक वेदना यांचा अप्रत्यक्ष वारसा घेऊन विकसित झालेले होते. त्यांच्या पालकांनी स्वतः अनुभवलेल्या भीती, असुरक्षितता आणि ओळख-संकटाचा प्रभाव घरातील वातावरणावर पडला होता. परिणामी, लहानपणापासूनच हॉवर्ड यांच्या मनात मानवी संघर्ष, सांस्कृतिक ओळख, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक परिस्थिती व्यक्तीच्या जीवनाला कशा प्रकारे आकार देतात याविषयी संवेदनशीलता निर्माण झाली.

गार्डनर यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या कुटुंबावर एक मोठी वैयक्तिक शोकांतिका कोसळली होती. त्यांच्या मोठ्या भावाचा (एरिक) सातव्या वर्षी स्लेजिंग अपघातात मृत्यू झाला होता. हा प्रसंग हॉवर्ड यांच्या जन्माआधी घडला असला तरी त्या दुःखाची छाया कुटुंबावर कायम होती. गार्डनर यांनी नंतर अनेक ठिकाणी नमूद केले आहे की, ज्या भावाला ते कधी भेटू शकले नाहीत, त्या भावाच्या अनुपस्थितीने त्यांच्या आत्मचिंतनशील स्वभावावर परिणाम झाला. या अनुभवामुळे मानवी जीवनातील गमावलेपण, भावनिक जखमा आणि वैयक्तिक ओळख या संकल्पनांविषयी त्यांच्यात खोल जिज्ञासा निर्माण झाली. हेच पुढे त्यांच्या विकासात्मक मानसशास्त्रातील रुचीचे एक अप्रत्यक्ष कारण ठरले.

गार्डनर यांच्या कुटुंबात शिक्षणाला अत्यंत उच्च स्थान होते. त्यांच्या पालकांचा विश्वास होता की ज्ञान आणि शिक्षण हेच सामाजिक सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान मिळवून देणारे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यामुळे घरात वाचन, बौद्धिक चर्चा आणि कलात्मक अभिरुचीला प्रोत्साहन दिले जात असे. हॉवर्ड स्वतःला “studious child” म्हणजेच अभ्यासू आणि आत्ममग्न मूल म्हणून वर्णन करतात. लहान वयातच त्यांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. त्याचबरोबर संगीताने त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासात मोठी भूमिका बजावली. विशेषतः पियानो वादनात त्यांची विशेष रुची होती आणि ते अत्यंत गंभीरतेने संगीत शिकत होते. काही काळ त्यांनी व्यावसायिक संगीतकार किंवा संगीत रचनाकार होण्याचाही गंभीर विचार केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी किशोरवयात इतरांना पियानो शिकवण्याचे कामही केले.

मात्र जसजसे ते मोठे होत गेले, तसतशी त्यांची जिज्ञासा मानवी मन, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व आणि मानवी क्षमता यांकडे वळू लागली. संगीताने त्यांना संरचना, सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती यांचे महत्त्व शिकवले; परंतु त्यांना एक मोठा प्रश्न सतत आकर्षित करत होता—“लोक एकमेकांपेक्षा इतके वेगळे का असतात? आणि बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय?” हा प्रश्न पुढे त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक जीवनाचा केंद्रबिंदू ठरला. अशा प्रकारे, संगीताची आवड कायम ठेवूनही त्यांनी मानवी संज्ञान, विकास आणि शिक्षण या क्षेत्रांकडे आपला अभ्यासक प्रवास वळवला.

शिक्षणाचा प्रवास: जिज्ञासेने घडवलेले व्यक्तिमत्त्व

हॉवर्ड गार्डनर यांनी उच्च शिक्षणासाठी Harvard University मध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला त्यांची रुची इतिहास आणि सामाजिक विज्ञान यामध्ये होती. खरंतर, त्यांनी सुरुवातीला कायद्याचे शिक्षण घेण्याचाही विचार केला होता; परंतु शिक्षणादरम्यान त्यांचा परिचय मानवी विकास, ज्ञानप्रक्रिया आणि बोधात्मक मानसशास्त्राशी झाला. विशेषतः जिन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांताने त्यांना प्रचंड प्रभावित केले. पियाजे यांच्या कार्यामुळे गार्डनर यांना मुलांच्या विचारप्रक्रिया आणि बौद्धिक विकास समजून घेण्याची प्रेरणा मिळाली. परिणामी, त्यांची शैक्षणिक दिशा इतिहासापासून मानसशास्त्राकडे वळली.

हार्वर्डमधील त्यांचा काळ हा केवळ पदवी मिळवण्याचा प्रवास नव्हता, तर वैचारिक घडणीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. येथे त्यांना अनेक नामवंत विचारवंत आणि मानसशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः इरिक एरिक्सन यांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. एरिक्सन हे गार्डनर यांचे हार्वर्डमधील ट्यूटर होते आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या मनो-सामाजिक टप्प्यांविषयी त्यांची विचारपद्धती गार्डनर यांच्या विकासात्मक मानसशास्त्राच्या समजाला आकार देणारी ठरली. मानवी ओळख, विकासातील व्दंद, आणि सामाजिक-सांस्कृतिक घटकांचा व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव या संकल्पनांनी गार्डनर यांच्या विचारविश्वाला व्यापकता दिली.

त्याचप्रमाणे, जेरॉम ब्रुनर यांच्या कार्याचाही गार्डनर यांच्यावर निर्णायक प्रभाव पडला. ब्रुनर हे बोधनिक मानसशास्त्र आणि शिक्षण सिद्धांतातील अग्रगण्य विचारवंत होते. हार्वर्डमधील MACOS (Man: A Course of Study) प्रकल्पामध्ये गार्डनर यांनी ब्रुनर यांच्यासोबत काम केले. या अनुभवामुळे शिक्षण ही फक्त माहिती पाठांतर करण्याची प्रक्रिया नसून ती विचार, समस्या-निराकरण, अर्थनिर्मिती आणि अनुभवाधारित समज विकसित करण्याची प्रक्रिया आहे, हा दृष्टिकोन त्यांच्यात विकसित झाला. पुढे बहुविध बुद्धिमत्ता (Multiple Intelligences) सिद्धांत मांडताना या विचारांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.

पदव्युत्तर आणि संशोधनाच्या काळात गार्डनर यांनी मानवी मेंदू, बोधनिक प्रक्रिया, बालविकास, कला, सर्जनशीलता आणि शिक्षणशास्त्र यांवर सखोल संशोधन सुरू केले. हार्वर्डच्या Project Zero या संशोधन प्रकल्पाशी जोडले गेल्यानंतर त्यांनी कला आणि मानवी विचारप्रक्रिया यांतील संबंधांचा अभ्यास केला. हळूहळू त्यांच्यात एक मूलभूत विश्वास दृढ झाला की प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी विशेष क्षमता असते; समस्या व्यक्तीमध्ये नसते, तर शिक्षणव्यवस्था त्या क्षमतांना योग्य प्रकारे ओळखण्यात अपयशी ठरते. याच विचारातून पुढे त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताची बीजे रुजली, ज्याने शिक्षण आणि मानसशास्त्र क्षेत्रात नवी क्रांती घडवली.

बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत: जग बदलणारी कल्पना

1983 साली गार्डनर यांनी Frames of Mind हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले आणि त्यातून बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. या सिद्धांताने मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि बालविकासाच्या क्षेत्रात मोठी वैचारिक क्रांती घडवून आणली. गार्डनर यांच्या मते, बुद्धिमत्ता ही एकसंध किंवा एकाच प्रकारची क्षमता नसून ती अनेक परस्पर भिन्न पण परस्परपूरक मानसिक क्षमतांचा समूह आहे. यापूर्वी बुद्धिमत्तेचा विचार मुख्यतः IQ या संकल्पनेभोवती केंद्रित होता, ज्यामध्ये भाषिक आणि तार्किक-गणितीय कौशल्यांना अधिक महत्त्व दिले जात असे. परंतु गार्डनर यांनी या संकल्पनेला आव्हान दिले आणि सांगितले की मानवी क्षमता अधिक व्यापक, विविध आणि सांस्कृतिकदृष्ट्या संदर्भित असते (Gardner, 1983; Gardner, 1999).

गार्डनर यांच्या मते पारंपरिक IQ चाचण्या मानवी बुद्धिमत्तेचे अपूर्ण चित्र देतात. या चाचण्या सामान्यतः गणितीय तर्क, शब्दसंपत्ती, स्मरणशक्ती किंवा विश्लेषणात्मक विचार यांच्यावर भर देतात; पण संगीत, कला, शारीरिक कौशल्य, सामाजिक जाणीव, स्व-जाणीव किंवा निसर्गाशी संबंध यांसारख्या क्षमता दुर्लक्षित करतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी गणितात कमजोर असला तरी तो उत्कृष्ट संगीतकार, कलाकार, नेता किंवा निसर्ग निरीक्षक असू शकतो. त्यामुळे फक्त परीक्षेतील गुण किंवा IQ च्या आधारावर व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करणे हे अन्यायकारक ठरते. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या अशी केली की, “समस्या सोडविण्याची किंवा सांस्कृतिकदृष्ट्या मूल्यवान उत्पादन निर्माण करण्याची क्षमता” (Gardner, 1983). यामुळे बुद्धिमत्ता ही शालेय यशापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवन, संस्कृती आणि सर्जनशीलतेशी जोडली गेली.

1. भाषिक बुद्धिमत्ता (Linguistic Intelligence)

भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे भाषेचा प्रभावी आणि सर्जनशील वापर करण्याची क्षमता होय. यात शब्दांची निवड, लेखन, वक्तृत्व, कथाकथन, कविता, भाषिक अभिव्यक्ती आणि भाषेच्या सूक्ष्म अर्थांचे आकलन यांचा समावेश होतो. ज्यांच्यात ही बुद्धिमत्ता अधिक असते ते व्यक्ती लेखक, कवी, पत्रकार, वकील, शिक्षक किंवा प्रभावी वक्ते म्हणून यशस्वी होऊ शकतात. उदाहरणार्थ, साहित्यिक किंवा वक्तृत्व कलेत पारंगत असलेल्या व्यक्तींमध्ये भाषिक बुद्धिमत्ता अधिक विकसित असते. शाळांमध्ये निबंधलेखन, वादविवाद, कथाकथन आणि वाचन यांसारख्या कृतींमधून ही बुद्धिमत्ता विकसित केली जाऊ शकते (Gardner, 1983; Armstrong, 2009).

2. तार्किक-गणितीय बुद्धिमत्ता (Logical-Mathematical Intelligence)

ही बुद्धिमत्ता तर्कशक्ती, समस्या सोडविणे, गणितीय विश्लेषण, वैज्ञानिक विचार आणि कारण-परिणाम संबंध समजून घेण्याशी संबंधित आहे. वैज्ञानिक, अभियंते, गणितज्ञ आणि संशोधकांमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक दिसून येते. पारंपरिक IQ चाचण्यांमध्ये प्रामुख्याने याच बुद्धिमत्तेला महत्त्व दिले जाते. गार्डनर यांनी मान्य केले की ही बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची आहे; मात्र ती बुद्धिमत्तेचा एकमेव प्रकार नाही. उदाहरणार्थ, गणितीय समीकरणे सोडविणे किंवा वैज्ञानिक प्रयोगांचे विश्लेषण करणे ही तार्किक-गणितीय बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत (Gardner, 1993).

2. संगीतात्मक बुद्धिमत्ता (Musical Intelligence)

संगीतात्मक बुद्धिमत्ता म्हणजे सूर, ताल, लय, ध्वनी आणि संगीताची संरचना ओळखण्याची व निर्माण करण्याची क्षमता होय. संगीतकार, गायक, वादक आणि संगीत रचनाकारांमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक प्रमाणात आढळते. गार्डनर यांना स्वतःला संगीताची विशेष आवड होती, त्यामुळे त्यांनी या बुद्धिमत्तेला विशेष स्थान दिले. संशोधन असे सूचित करते की काही व्यक्तींना संगीताचे स्वर आणि ताल सहज लक्षात राहतात, जे पारंपरिक बुद्धिमत्ता चाचण्यांत मोजले जात नाही (Gardner, 1983).

4. अवकाशीय बुद्धिमत्ता (Spatial Intelligence)

अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणजे वस्तू, आकार, अंतर आणि दृश्य प्रतिमांचे मानसिक आकलन करण्याची क्षमता. वास्तुविशारद, चित्रकार, शिल्पकार, नकाशाकार, डिझायनर आणि वैमानिकांमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक आढळते. एखादी वस्तू मनात कल्पना करून तिची रचना समजून घेणे किंवा नकाशा वाचणे ही या बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चार्ट, चित्र, व्हिज्युअल मॅप्स आणि मॉडेल्सचा वापर करून ही बुद्धिमत्ता विकसित केली जाऊ शकते (Armstrong, 2009).

5. शारीरिक-गतिशील बुद्धिमत्ता (Bodily-Kinesthetic Intelligence)

ही बुद्धिमत्ता शरीराचा अचूक, समन्वयपूर्ण आणि कौशल्यपूर्ण वापर करण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. खेळाडू, नर्तक, शल्यचिकित्सक, कारागीर आणि अभिनेते यांच्यात ही बुद्धिमत्ता अधिक विकसित असते. एखादे कौशल्य शरीराच्या हालचालींद्वारे प्रभावीपणे व्यक्त करणे किंवा शारीरिक समन्वय साधणे हे या बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य आहे. गार्डनर यांच्या मते, शरीर हीसुद्धा ज्ञान व्यक्त करण्याची एक पद्धत आहे, ज्याकडे पारंपरिक शिक्षणात कमी लक्ष दिले जाते (Gardner, 1983).

6. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence)

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांच्या भावना, प्रेरणा, हेतू आणि भावनिक अवस्थांचे आकलन करून प्रभावी सामाजिक संबंध निर्माण करण्याची क्षमता होय. चांगले शिक्षक, नेते, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते किंवा व्यवस्थापक यांच्यात ही बुद्धिमत्ता अधिक असते. ही बुद्धिमत्ता व्यक्तीला सहकार्य, नेतृत्व, संवाद आणि संघर्षनिवारण यामध्ये मदत करते. आजच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात या बुद्धिमत्तेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे (Gardner, 1999). थॉर्नडाइक यांनी सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना  मांडलेली होती.

७. व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता (Intrapersonal Intelligence)

व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना, प्रेरणा, मर्यादा, सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्वाचे आत्मभान असणे. आत्मचिंतन, स्व-समज आणि भावनिक जागरूकता ही याची वैशिष्ट्ये आहेत. तत्त्वज्ञ, लेखक, मानसशास्त्रज्ञ किंवा ध्यान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक विकसित असते. एखाद्या व्यक्तीला स्वतःची उद्दिष्टे स्पष्टपणे समजणे आणि स्वतःच्या भावनांचे नियमन करणे हे या बुद्धिमत्तेचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत (Gardner, 1983). पुढे जाऊन डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी याचा उपयोग झाला.

8. नैसर्गिक बुद्धिमत्ता (Naturalistic Intelligence)

 

नंतर गार्डनर यांनी नैसर्गिक बुद्धिमत्ता या आठव्या बुद्धिमत्तेचा समावेश केला. ही बुद्धिमत्ता निसर्गातील वनस्पती, प्राणी, हवामान, पर्यावरणीय नमुने आणि जैवविविधतेचे निरीक्षण व वर्गीकरण करण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. शेतकरी, पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक, जीवशास्त्रज्ञ किंवा निसर्ग निरीक्षकांमध्ये ही बुद्धिमत्ता अधिक आढळते. उदाहरणार्थ, विविध पक्ष्यांच्या प्रजाती ओळखणे किंवा पर्यावरणातील सूक्ष्म बदल समजून घेणे ही नैसर्गिक बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत (Gardner, 1999).

शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी बदल

गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताने शिक्षणशास्त्रात मोठा बदल घडवून आणला. या सिद्धांतामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे फक्त “हुशार” किंवा “कमकुवत” अशा द्वैत चौकटीत पाहण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्षमता असते, ही भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी पाठांतरात कमी असू शकतो; परंतु तो उत्कृष्ट चित्रकार, नेता किंवा क्रीडापटू असू शकतो. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत प्रकल्पाधारित शिक्षण, समूहकार्य, नाट्यीकरण, संगीत, दृश्य माध्यमे आणि अनुभवाधारित शिक्षण अशा विविध अध्यापन पद्धतीना प्रोत्साहन मिळाले (Armstrong, 2009; Gardner, 1983).

विशेषतः सर्वसमावेशक शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन यांना या सिद्धांताने मोठा आधार दिला. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिकण्याच्या शैली समजून घेण्यास मदत झाली. परिणामी, “सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शिकवणे” या पारंपरिक दृष्टिकोनाऐवजी “प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या प्रकारे शिकतो” हा दृष्टिकोन विकसित झाला. त्यामुळे शिक्षण केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाकडे वळले (Brualdi, 1996).

समारोप:

हॉवर्ड गार्डनर यांचे जीवन आपल्याला शिकवते की, जग बदलण्यासाठी नेहमी मोठी सत्ता किंवा संपत्ती लागतेच असे नाही; कधी कधी एक वेगळा विचारही संपूर्ण समाजाची दृष्टी बदलू शकतो. त्यांनी शिक्षण आणि बुद्धिमत्तेबद्दलची जगाची समज बदलली आणि लाखो विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली. आजच्या स्पर्धात्मक युगात, जिथे यशाचे मोजमाप अनेकदा फक्त गुणांवर होते, तिथे हॉवर्ड गार्डनर यांचे विचार आपल्याला आठवण करून देतात की “प्रत्येकामध्ये काहीतरी विलक्षण असते; फक्त ते ओळखण्याची दृष्टी हवी.”

संदर्भ

Armstrong, T. (2009). Multiple Intelligences in the Classroom (3rd ed.). ASCD.

Brualdi, A. C. (1996). Multiple Intelligences: Gardner’s Theory. ERIC Digest.

Gardner, H. (1983). Frames of Mind: The Theory of Multiple Intelligences. Basic Books.

Gardner, H. (1993). Multiple Intelligences: The Theory in Practice. Basic Books.

Gardner, H. (1999). Intelligence Reframed: Multiple Intelligences for the 21st Century. Basic Books.

Gardner, H. (2020). A Synthesizing Mind. MIT Press.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner): बहुविध बुद्धिमत्तेचा जनक

  हॉवर्ड गार्डनर ( Howard Gardner): बहुविध बुद्धिमत्तेचा जनक (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) मानवी बुद्धिमत्तेबद्दलची पारंपरिक ...