फिअर ऑफ मिसिंग आऊट | गमावण्याची भीती
आपल्यासोबत असे कधी घडले आहे का, की ऑफिसमधील काही तातडीच्या कामामुळे तुम्ही पार्टीला जाऊ शकला नाही
किंवा तुम्हाला मित्रांसोबतची सहल काही वैयक्तिक कारणास्तव चुकवावी लागली आहे. अशा
परिस्थितीत, ऑफिसचे काम सांभाळताना तुम्हाला वारंवार एक
विचित्र अस्वस्थता जाणवली आहे का? या अस्वस्थतेवर मात
करण्यासाठी तुम्ही तुमचे सोशल मीडियाचे खाते वारंवार स्क्रोल करून त्या पार्टीच्या
किंवा सहलीच्या पोस्ट तपासल्या आहेत का? तुमचे मित्र काय खात
आहेत आणि कोठे फिरत आहेत? तुमच्याकडून काय मिस झाले? तुम्ही ज्या
परिस्थितीमध्ये आहात याची तुलना त्यांच्या आनंदाशी करता का?
जर याचे उत्तर होय असेल, तर काळजी करण्यासारखे काहीही नाही. हे बहुसंख्य लोकांसोबत घडत असते आणि यास
Fear of Missing Out म्हणजे FoMO असे
म्हणतात. म्हणजेच काहीतरी गमावण्याची किंवा काहीतरी मिस करण्याची भीती. फोमो अर्थात
'फिअर ऑफ मिसिंग आऊट' सरळ शब्दात
सांगायचं तर, आयुष्याच्या शर्यतीत इतरांच्या मागे पडण्याची
भीती. आपणास ही भीती सतावत असेल तर आपण मानसिक अस्वस्थतेचे शिकार तर नाहीत ना याचा
विचार करायला हवा. साधरणतः अधिकतर लोकांच्या मानसिक अस्थैर्यासाठी सोशल मीडिया
जबाबदार असल्याचे अलिकडील संशोधनातून समोर आले आहे.
फोमो ही भावना किंवा समज असे दर्शवते
की इतर लोक अधिक मजा करत आहेत, चांगले जीवन जगत आहेत
किंवा आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टींचा अनुभव घेत आहेत. यात तीव्र मत्सराची भावना असू
शकते आणि त्याचा स्व-आदर आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो. आपण कितीही चांगल्या
गोष्टी किंवा क्षण अनुभवत असू पण त्याहून भिन्न काही गोष्टी किंवा क्षण इतर लोक
अनुभवत असतील आणि त्यामुळे आपण ती मूलभूतपणे महत्त्वाची गोष्ट गमावत आहोत ही भावना
निर्माण होणे म्हणजेच 'फिअर ऑफ मिसिंग आऊट’.
फोमो संकल्पनेचा उदय
आपण कदाचित चांगला वेळ गमावत असाल ही
कल्पना आपल्या युगासाठी नवीन नाही. तथापि, हे बहुधा अनेक पिढ्यानुपिढ्या चालत आलेले आहे, अनेक युद्ध, हत्त्या, मारामारी आणि कटकारस्थान ही त्याचीच उदाहरणे आहेत. फोमोचा अभ्यास
गेल्या काही दशकांमध्येच केला गेला आहे, ज्याची सुरुवात
मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट, डॉ. डॅन हर्मन यांच्या 1996 च्या
शोधनिबंधापासून झाली आहे. सोशल मीडियाच्या आगमनापासून, फोमो अधिक
प्रकर्षाने जाणवत आहे आणि त्याचा अधिक अभ्यास केला गेला आहे. सोशल मीडियाने फोमो घटनेला
अनेक प्रकारे गती दिली आहे. फोमोमुळे अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये आपण
आपल्या दैनंदिन जीवनाची तुलना इतरांच्या जीवनातील ठळक गोष्टींशी करत राहतो. त्यामुळे,
आपली सामान्यत्वाची भावना विस्कळीत होते आणि आपण आपल्या समवयस्कांपेक्षा
अप्रगत आहोत असे वाटू लागते. आपल्या मित्रमैत्रिणींचे मजेशीर क्षणांचा आनंद
लुटणारे तपशीलवार प्रसंग किंवा क्षण आपणास सोशल मीडियामुळे कदाचित दिसू शकतात,
पण मागील पिढ्यांमध्ये इतकी सहज माहिती उपलब्ध होत नव्हती.
सोशल मीडियामुळे फुशारकी मारण्याचे
व्यासपीठ निर्माण होते; येथेच गोष्टी,
घटना आणि अगदी आनंद यांची जणू स्पर्धाच लागली आहे असे वाटते. लोक
त्यांच्या उत्कृष्ट चित्रांची, परिपूर्ण अनुभवांची तुलना करत
आहेत (ते खरं असतं का?), ज्यामुळे आपणास
आश्चर्य वाटेल की आपण काहीतरी मिस करत आहोत याची भावना निर्माण होत आहे. कपिल शर्माच्या
शोमध्ये गौर गोपाल दास यांनी छान मेसेज दिला आहे, ते म्हणतात ‘When people smile, it doesn't mean
that they are doing good; it just means they are chosen to smile’.
फोमोशी संबंधित इतर संज्ञा
FOMO द्वारे प्रेरित,
इतर अनेक संबंधित संकल्पना देखील उदयास आलेल्या आहेत:
FOBO (उत्तम पर्यायांची
भीती): याचा संदर्भ असा आहे की आपण संभाव्यत: चांगले पर्याय गमावत आहोत.
MOMO (मिसिंग आउटचे रहस्य):
याचा संदर्भ असा आहे की आपण काहीतरी गमावत आहात ही भीती परंतु आपण काय गमावत आहोतत
याबद्दल कोणतेही संकेत नाहीत.
ROMO: (मिसिंग आउटची वास्तविकता): याचा
अर्थ आपण काहीही गमावत नाही हे जाणून घेणे होय.
FOJI (जॉईन होण्याची भीती):
सोशल मीडियावर गोष्टी शेअर केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही याची भीती.
JOMO (जॉय ऑफ मिसिंग आउट):
हे FOMO च्या विरुद्ध संकल्पना आणि सोशल मीडियापासून दूर
गेल्याबद्दल किंवा डिस्कनेक्ट होण्याबद्दलच्या सकारात्मक भावनांना सूचित करते.
आनंद किंवा यश हे प्रदर्शन करण्याची
गोष्ट नसून तो एक वैयक्तिक अनुभव असतो आणि प्रत्येकाचे असे स्वतःचे मार्ग आसतात
ज्याद्वारे ते व्यक्त होतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लाईक्स आणि कमेंटसाठी
भलतसलत चालू आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपणही इतरांच्यासारखेच व्यक्त झाले
पाहिजे किंवा आपले आनंद किंवा यश प्रसारित केले पाहिजे. अलिकडे सोशल मीडियामुळे
याला भरभराटी आलेली आहे. सोशल मीडियाचा वापर कशासाठी, का आणि केंव्हा करावे यांचे
भानच काही लोकांना राहिलेले नाही. एकंदर जीवनातील या बाबी लक्षात घेता फोमो
निर्माण होण्यामागची करणे काय असतील याची चर्चा करू या.
इतरांशी तुलना
आपण सर्वजण नेहमी स्वतःची तुलना
इतरांसोबत करत असतो. इतरांकडे आपल्या पेक्षा चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचं आयुष्य
आपल्याहून अधिक सुखकर आहे, त्यांच्याकडे अनेक सोई-सुविधा आहेत असा विचार केल्याने
आपण स्वतःला कमी लेखायला सुरूवात करतो आणि हळूहळू हा विचार फोमोचं भयानक रूप धारण
करतो. थ्री इडियेट्स मधील फरहान त्याचा वडिलांना तो फोटोग्राफी करणार हे सांगायला
जातो त्यावेळी वडीलांशी झालेला संवाद
फरहानचे वडील : 5 वर्षांनंतर, जेव्हा तु तुझ्या मित्राना कार खरेदी करताना, स्वतःचे
घर बांधताना बघशील, तेव्हा तुला पश्चाताप होईल.
फरहान : इंजिनिअर झाल्यानंतर मी निराश झालो तर आयुष्यभर तुम्हाला शिव्याशाप
देईन.
फरहानचे वडील: लोक हसतील, फायनल इयरला आल्यावर इंजिनिअरींग सोडून दिल, कपूर सर
म्हणत होते की तुमचा मुलगा ICE मध्ये शिकतोय हे भाग्याची
गोष्ट आहे, त्यांना काय वाटेल?
लोक काय म्हणतील या विचारातच आपले
निम्याहून अधिक जीवन संपते पण प्रत्यक्षात लोकांना काहीही पडलेले नसते, आपणच तयार
केलेले ते भ्रम असते. आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नका लोक
तयारच आहेत ऑपरेट करायला, तर आपल्या भावनांवर आणि विचारांवर स्वतःचेच नियंत्रण
हवे तर आणि तरच आपण आनंदी राहू.
माझ्याच बाबतीत असं का घडत?
फोमोग्रस्त लोकांना नेहमी लहान अडचणी
सुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या भल्यामोठ्या समस्या वाटू लागतात. जगभरातल्या सर्व
समस्या त्यांच्याच वाट्याला आली असल्याचा त्यांचा समज असतो. त्यांना समस्यांमध्ये
संधी दिसत नाहीच उलट ते संधीला सुद्धा समस्याच मानतात. अशा लोकांना सेंटर ऑफ
अट्रॅक्सन व्हायला आवडते. आपण नेमके चुकतो कुठे हे जर माणसाला कळले असते, तर प्रत्येक वेळी त्याने यशाची नवीन रेसिपी तयार करून प्रत्येक क्षेत्र
पादाक्रांत केले असते, पण असे होत नाही. आपल्या प्रत्येकाला जीवनात विजय हवा असतो,
हार कुणालाही नको असते. पण हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू
आहेत हे सांगायला कुण्या विद्वानाची गरज नाही, पण प्रत्येकाने काही ऊन पावसाळे
अनुभवायला हवेत हे नक्की!
कम्पलसिव डिझायर (अनिवार्य इच्छा)
इतरांच्या आयुष्यातलं स्वतःचं महत्व
कमी होण्याची आणि इतरांच्या आयुष्यातून बाहेर फेकले जाण्याची भीती सतत अशा
व्यक्तींच्या मनात असते. मानसशास्त्रामध्ये फोमोची व्याख्या 'कम्पलसिव डिझायर' अशी केली जाते. इतरांच्या आयुष्यात
स्वतःची जागा कायमस्वरूपी टिकून राहावी असं त्यांना वाटतं. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम
आदी सोशल मीडिया साइटवरून इतरांच्या आयुष्यात स्वतःचे महत्व किती आहे, हे तपासण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. या प्रवृत्तीमुळे ते
नैराश्यतेच्या गर्तेत सापडतात.
लाइक्स आणि रिअॅक्शन्सचा खेळ
फोमोग्रस्त लोक दिवसभर सोशल मीडियावर
सक्रिय असतात. इतरांच्या आयुष्यात काय नवं घडतं आहे. स्वतःच्या पोस्टवर लोकं कसे
रिअॅक्ट होत आहेत. एखाद्या पोस्टला किती लाइक्स आणि रिअॅक्शन्स आल्या आहेत, हे दर दुसऱ्या मिनिटाला ते चेक करतात. यामुळे त्यांच्या नकारात्मक
विचारांना चालना मिळते. त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांब रहा!
सोशल मिडिया आणि मानसिक आजार
सोशल मीडियावर जास्त सक्रिय असणाऱ्या
तरूण-तरूणी विविध प्रकारच्या मानसिक आजारांना बळी पडत असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट
झालेले आहे. कमी आत्मविश्वास, असुरक्षिततेची भावना,
वाढती नकारात्मकता, आणि डिप्रेशन सारख्या
मानसिक विकारांचा सामना त्यांना करावा
लागत आहे. सोशल मीडियाचा प्रमाणापेक्षा जास्त वापर या त्रासाचे प्रमुख कारण आहे.
FoMO आणि मार्केटिंग
सध्या सहज उपलब्ध नसलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधणे म्हणजे फोमोचा वापर मार्केटिंगमध्ये करणे. एखादे उत्पादन किंवा सेवा विकताना, विशिष्ट कालावधीसाठी ग्राहकांना सेवा मिळण्याची शक्यता किती कमी आहे यावर ते जोर देत असतात. संभाव्य ग्राहक त्यांच्या ऑफरकडे आकर्षित होतील कारण ते संधी गमावण्याच्या भीतीने आणि कंपनी या संधीचा फायदा घेते. अशाप्रकारे FoMO विपणन टंचाईची भावना निर्माण करेल आणि विक्री वाढविण्यास मदत होईल. शेवटची एकच गाडी, मोबाईल, सायकल, तसेच हॉटेल्समध्येही लिमिटेड रूम्स उपलब्ध, पिक्चर थेटरमध्ये लिमिटेड सीट्स उपलब्ध इत्यादी............
फोमोमुळे बर्याच वेळा लोकांना खूप
एकटेपणा, मत्सर आणि दुःखी वाटत असते. टाईम्स ऑफ इंडियावर
प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आपण खालील पद्धतींचा अवलंब
करून फोमोपासून मुक्त होऊ शकतो.
1. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींची यादी तयार करा. हे आपणास
अनेक प्रकारे मदत करते आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणते. आपल्यासोबत
घडलेल्या सर्व चांगल्या किंवा सकारात्मक गोष्टी लिहून काढा. हे आपणास आठवण करून
देईल की अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे. हे आपणास
सकारात्मक विचार करण्यास आणि आपली चिंता कमी करण्यास मदत करेल. हे करण्यासाठी आपणास
केवळ 5 मिनिटे लागतील त्यामुळे दिवसाच्या शेवटी आपण अनुभवलेल्या सर्व सकारात्मक
गोष्टींवर लक्ष केंद्रित करून एखादी डायरी घालावी आणि अशा अनुभवांची शिदोरी एकत्र
करावी.
2. प्रत्येकजण भिन्न आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या
जीवनात भिन्न आव्हाने आणि ध्येये आहेत. स्वतःची इतरांशी, विशेषतः सेलिब्रिटींशी तुलना करणे थांबवले पाहिजे. सोशल मीडियावर
एखाद्याचा आनंदी किंवा उत्साहवर्धक फोटो पोस्ट केल्याने तो खरोखर आनंदी आणि परिपूर्ण
झाला आहे याची हमी देत नाही. प्रत्येकाच्या स्वतःच्या म्हणून अशा वेगळ्या समस्या
आहेत.
3. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आम्हाला जगाशी, आमचे मित्र आणि परदेशात राहणार्या कुटुंबाशी कनेक्ट होण्यास मदत करतात,
परंतु प्रत्येक गोष्टीप्रमाणेच, त्याचे
नकारात्मक बाजू देखील आहेत. सोशल मीडिया आपणास एका अवास्तव जगात घेऊन जातो,
जिथे आपण आपल्या आयुष्याची त्या आभासी जगाशी तुलना करू लागतो. या
भावनेपासून मुक्तता करून घेण्यासाठी, सोशल मीडियावर कमीतकमी
वेळ घालवा.
4. डिजिटल डिटॉक्स वापरून पहा, आपला फोन किंवा सोशल मीडिया अॅप्सवर जास्त वेळ घालवल्याने FOMO वाढू शकतो. आपला वापर कमी करणे, किंवा डिजिटल डिटॉक्स देखील करणे जिथे आपण डिजिटल उपकरणांपासून ब्रेक घेतो, त्यामुळे आपणास सतत तुलना न करता आपल्या जीवनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत होऊ शकते. संपूर्ण डिजिटल डिटॉक्स करणे शक्य नसल्यास, काही सोशल मीडिया अॅप्सचा वापर मर्यादित करण्याचा विचार करा. कपिल शर्माच्या शोमध्ये गौर गोपाल दास यांनी छान मेसेज दिला आहे, आपण अनेक उपवास करतो जसे एकादशी, महाशिवरात्री, रोजा किंवा इतर उपवास पण कधी आपण आपल्या स्मार्टफोन शिवाय तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंकडेन, स्नॅपचॅट आदी सोशल मिडियाशिवाय एक घालवणे म्हणजे आजच्या काळात खरा उपवास, करून तर बघा छान वाटेल!
5. व्यस्त जीवनातून विश्रांती घेऊन गुणवत्ता पूर्ण वेळ घालवा. निसर्गाच्या जवळ राहिल्याने आपले मन शांत होते आणि आपली चिंता कमी होण्यास मदत होते. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा, स्वत:च्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे धैर्य दाखविले असते तर, मला असे वाटते की मी इतके कठोर परिश्रम केले नसते तर, मला माझ्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळाले असते तर, मी माझ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर आणि मला असे वाटते की मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिले असते तर.... ब्रॉनी वेअर यांनी इन्स्पिरेशन आणि चाई नावाच्या ब्लॉगवर रुग्णांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांच्याकडून ऐकलेला दिव्यत्वाचा किंवा अलौकिक अस्तित्वाचा साक्षात्कार प्रकट केला, या लेखन प्रपंचाने इतके लक्ष वेधले की तिने तिची निरीक्षणे द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग (2012) नावाच्या पुस्तकात नोंदविलेली आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा! https://www.psychologywayofpositivelife.com/2022/09/top-five-regrets-of-dying.html
फोमोमुळे गेल्या काही
वर्षापासून 'अॅंटीडिप्रेशन' औषधांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. यावरून फोमोची गंभीरता लक्षात
येते. या रोगापासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियापासून जास्ती जास्त दूर राहायला
हवं. सोशल मीडियाच्या अभासी जगात आपलं अस्तित्व निर्माण करण्यापेक्षा वास्तविक जगात
आपली ओळख बनवावी. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यास समुपदेशक आणि सायकॅट्रिस्टची मदत घ्यायला हवी.
संदर्भ
Gupta, M. and Sharma, A. (2021).
Fear of missing out: A brief overview of origin, theoretical underpinnings,
and relationship with mental health. World J Clin Cases. 9(19), 4881-4889
Herman, D. (2000). Introducing short-term brands:
A new branding tool for a new consumer reality. Journal of Brand Management. J
Brand Manag 7, 330–340
McGinnis, P. J. (2020).
Fear of Missing
Out: Practical Decision-making in a World of Overwhelming Choice. Sourcebooks.
Przybylski,
Andrew, K.; Murayama, Kou; DeHaan, Cody R. and Gladwell, Valerie. (2013). Motivational, emotional, and behavioural correlates of
fear of missing out. Computers in Human Behavior. 29(4),1841-1848
Wolniewicz, C.A.; Tiamiyu, M.F.; Weeks, J.W. and Elhai, J. D. (2018).
Problematic smartphone uses and relations with negative affect, fear of missing
out, and fear of negative and positive evaluation. Psychiatry Res. 262, 618-623