ज्ञानरचनावाद: एक निरंतर प्रवास
! जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवटपर्यंत टिकत ते सहज मिळत नाही !
विद्यार्थी केद्रिंत शिक्षण पद्धती असावी यावर प्रत्येक शिक्षण
आयोगाने जोर दिला आहे. आजची शिक्षण पद्धती खरीच विद्यार्थी केंद्रित आहे का? असेल
तर बहुंताश विद्यार्थी केवळ मार्कांच्याच
मागे का धावत आहेत (मार्क्ससाठी विद्यार्थ्यापेक्षा पालकांचाच जोर अधिक असतो). 90%
पेक्षा अधिक गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षा (CET, NEET
सारख्या) किंवा स्पर्धा परीक्षेत अपयशी का ठरतात? एखादा विषय आवडतो तर दुसरा एखादा
विषय का आवडत नाही? विशिष्ट विद्याशाखा (उदा. शास्त्र) घेतली म्हणजे प्रतिभाशाली;
इतर विद्याशाखा कनिष्ठ असतात का? अशी अनेक मुद्दे सर्वत्र चर्चिले जात आहेत. याची
सुरुवात कुटुंबापासून होते कारण घरातील मंडळी आपल्या पाल्यास कोणकोणती लेबले लावत
असतात त्यावर त्याचे यशापयश अवलंबून असते.
तु मूर्ख आहेस! तुला काही जमतच नाही; ते बघ तुझे मोठे/ छोटे भावंडे
कशी प्रगती करत आहेत आणि तु मठ्ठ काय करतो आहेस. ही एक बाजू आहे आणि आजकाल मुलांना
विनासायास सर्व गोष्टी मिळत आहेत त्यामुळे त्यासाठी लागणारे वैयक्तिक प्रयत्न न
झाल्याने त्याचे रुपांतर ज्ञानात न होता केवळ माहितीमध्येच राहून जाते. मेंदूमध्ये
त्या विषयीचे अनुभवाचे ठसे (schema) वरवरचे राहतात. त्यासाठी ज्ञानरचनावादी
विचारप्रवाह समजावून घेणे गरजेचे वाटते. त्याची सुरुवात आकृतिबंध समजावून घेऊन करू
या.
आकृतिबंध (Schemas): आपल्या जीवनात
तसेच शैक्षणिक वातावरणात आपणास अनेकविध अनुभव नित्य येत असतात. अशा अनुभवातून
मानसिक ठसे किंवा मानसिक रचना तयार होतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या पुर्वानुभावावर
आधारित एक बोधात्मक आकृतिबंध तयार करते. असा आकृतिबंध पूर्वीच अस्तित्वात असलेल्या
पुर्वानुभावावर आधारित असतो. अशा आकृतिबंधाचा उपयोग नवीन अनुभवांचा अर्थ लावताना
केला जातो. बार्टलेट यांनी “विशिष्ट परिस्थिती किंवा प्रसंगाचे स्पष्टीकरण
देण्यासाठी किंवा त्या प्रसंगी काय घडेल याचा अंदाज बांधताना उपयोगी पडणाऱ्या व
त्या प्रसंगाशी संबंधीत माहिती अंतर्भूत असणाऱ्या मानसिक रचना म्हणजे आकृतिबंध”
अशी आकृतिबंधाची व्याख्या दिलेली आहे. थोडक्यात आकृतिबंध म्हणजे स्मृतीत
साठवलेल्या व व्यवस्थित जुळणी केलेल्या माहितीचा संचय होय. व्यक्ती असे विविध
आकृतिबंध आयुष्यभर तयार करत असते.
व्यक्तीचा स्वत:विषयीचा बोध समाविष्ट असलेल्या आणि अशा बोधामुळे
स्वत:विषयीच्या माहितीचे संस्करण करण्यामध्ये मदत करते त्यास स्व-आकृतिबंध असे
म्हणतात. यामध्ये व्यक्तिच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व अनुभव
समाविष्ट असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा समूहाविषयी तयार होणाऱ्या
आकृतिबंधास व्यक्तीविषयक आकृतिबंध असे म्हणतात. उदा. शिक्षक म्हटले की तो नेहमी
पुस्तकांच्या आणि ग्रंथाच्या सानिध्यात असणारी मानसिक रचना तयार होते. ठराविक
भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तीकडून कोणत्या वर्तनाची अपेक्षा असते यांचा समावेश
भूमिका आकृतिबंधात होतो. उदा. कुटुंबप्रमुख, गृहिणी, मुख्याध्यापक, महापौर इ.
ठराविक प्रसंगी लोकांनी, व्यक्तींनी कसे वागावयास हवे, त्याप्रसंगी कोणत्या घटना
घडावयास हव्या, याविषयी कांही निश्चित विचार हे घटना आकृतीबंधामध्ये असतात.
लग्नसमारंभ आणि अंत्ययात्रा या दोन भिन्न घटनांमध्ये जे वातावरण आढळायला पाहिजे
(PK चित्रपटातील दृश्य आठवून पहा) हे सर्व घटना आकृतिबंधामध्ये मोडते. यावरून
स्व-आकृतिबंध, व्यक्ती आकृतिबंध, भूमिका आकृतिबंध आणि घटना आकृतिबंधाव्दारे आपण
माहिती मेंदूमध्ये साठवत असतो.
Good आणि Brophy यांनी Bartlett (1932) ला ज्ञानरचनावादी
दृष्टिकोनाचा प्रवर्तक मानले आहे. ज्ञानरचनावादी सिध्दांतामध्ये “अध्ययन म्हणजे बाहय जगताशी अर्थपूर्ण आंतरक्रिया साधून स्वत:च
स्वत: ज्ञानाची रचना करण्याची प्रक्रिया होय.” यामध्ये पूर्वज्ञानाच्या आधारे सक्रीय अनुभवाच्या सहाय्याने नवीन ज्ञानाची बांधणी
करतात. पियाजे, ब्रुनर, डयुई, आणि व्यगास्की
या मानसशास्त्रज्ञानी आणि शिक्षण तज्ज्ञाच्या लेखनातून ज्ञानरचनावादामधील आशय
निदर्शनात आलेला आहे.
ज्ञानरचनावादी दृष्टीकोन:
ज्ञानरचनावाद ही अशी तत्वज्ञानात्मक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे की, जी ज्ञान सक्रिय रचनात्मक प्रक्रियेद्वारे निर्माण होते.
(मस्कॉलॉल आणि फिशर २००५)
अध्ययन-अध्यापनात अनुभवात्मक / विश्लेषणवादी दृष्टीकोन हा शिक्षणातील
पायाभूत पद्धतीशास्त्र मानला जातो. दुसरीकडे या दोन दृष्टीकोनांचा सामायिक
पद्धतीशास्त्र आधार म्हणजे स्पष्टीकरण आहे, जिथे अनुकरण किंवा पुनरावृत्तीऐवजी अर्थासहित सहभागाद्वारे ज्ञान प्राप्ती
करणे यावर विश्वास असतो. (क्रोल आणि लॅबोस्की, 1996)
कोणतेही ज्ञान परिपूर्ण नसते, आपण केवळ त्याबद्दलचे स्पष्टीकरण देऊ शकतो. ज्ञानाच्या संपादनासाठी
व्यक्तीला भूतकाळातील अनुभव, वैयक्तिक दृष्टीकोन आणि
सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित माहितीचा विचार करणे आवश्यक असते.
पूर्वज्ञान आणि सद्य अनुभवाच्या आधारे विद्यार्थी विशिष्ट गोष्टींचा
अर्थ तयार करतात. विद्यमान ज्ञानाच्या विरोधात नवीन कल्पना आणि अनुभवांची सांगड
आणि परीस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी अध्यानार्थी नवीन किंवा अनुकूल नियम तयार
करतात. प्रत्येकाचे वास्तविकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असेल आणि
विद्यार्थी जगाच्या स्वतःच्या रचनानवर आधीपासून शिकत असतील तर अशा वातावरणात
शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. उपदेशात्मक, स्मृतीवर आधारित अशा पारंपारिक अध्यापनाच्या शैलीवरून
अधिक विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाकडे जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला
पाहिजे.
जॉन डुई (१९३३) यांचा ज्ञानरचनादी दृष्टिकोनाचा तत्त्वज्ञानात्मक
संस्थापक म्हणून वारंवार उल्लेख केला जातो. ब्रूनर (1990) आणि पियाजे (1972) यांचे
सिद्धांत हे प्रमुख बोधत्मक ज्ञानरचनावादी
म्हणून मानले जातात, तर सामाजिक ज्ञानरचनावादामध्ये व्यागॉस्की (1978) हे महत्त्वाचे मानले जातात.
जॉन डुईचा शैक्षणिक विचार:
शाळांनी पुनरावृत्ती, पोपटपंच्छी, घोकंपट्टी यावर लक्ष केंद्रित
केले पाहिजे ही धारणा जॉन डुई यांनी
नाकारली याऐवजी अध्यनार्थ्याच्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत प्रत्यक्ष अनुभव,
प्रात्यक्षिक कार्ये याद्वारे त्यांच्या सर्जनशील आणि सहकार्य
वृत्तीला चालना मिळेल अशा पद्धतीचा अवलंब करावा यावर भर दिला. विद्यार्थ्यांना
स्वतःहून विचार करण्याची आणि त्यांचे विचार प्रकट करण्याची संधी दिली पाहिजे. यावरून जॉन डुई यांनी शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला महत्त्व दिले
आहे. त्यांनी पुढे "शिकण्याची प्रक्रिया कशी होते याबद्दल आपल्याला शंका असल्यास, सतत चौकशी करण्यात गुंतून रहा: अभ्यास, विचार आणि पर्यायी शक्यतांचा विचार करा आणि
पुराव्याच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचा" असे म्हटले आहे.
जीन पियाजे:
बोधात्मक ज्ञानरचनावाद
ज्ञान
निष्क्रीयपणे आत्मसात करणे ही कल्पना पियाजे यांनी नाकारली. त्याऐवजी शिकणे ही
वास्तविकतेशी जुळवून घेण्याच्या सलग टप्प्यांचा समावेश असलेली गतिशील प्रक्रिया
आहे असे मत त्यांनी मांडले आहे. या प्रक्रियेदरम्यान जगाविषयी स्वतःचे सिद्धांत तयार
करून आणि त्याचे परीक्षण करून शिकणारे सक्रियपणे ज्ञान निर्मिती करत असतात असे
त्यांनी सुचवलेले आहे.
शोधात्मक
अध्ययन, मुलांच्या तयारीसाठी संवेदनशीलता, व्यक्तीभिन्नतेचा स्वीकार आणि शिकणाऱ्यांना जबरदस्तीने
ज्ञान देता येत नसते – ते स्वतःच स्वतःसाठी निर्माण करतात अशी समकालीन, प्रभावी आणि
महत्त्वपूर्ण शैक्षणिक तत्त्वे पियाजे यांनी मांडलेली आहेत.
ज्ञानरचनावादाबद्दल
सामान्य गैरसमज म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काही न सांगता त्याऐवजी
नेहमीच विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वत:साठी ज्ञान निर्माती करण्याची परवानगी दिली
पाहिजे. हे प्रत्यक्षात आकलन करून घेणे याबरोबर अध्यापनशास्त्राबाबत गोंधळ निर्माण
करणारे आहे. एखाद्याने कसे शिकवावे याची पर्वा न करता, ज्ञानरचनावादाचे असे गृहीतक आहे की सर्व ज्ञान शिकवणाऱ्याच्या पूर्व
ज्ञानाशी सांगड घालून तयार होत असते. अशा प्रकारे, व्याख्यानाद्वारेही
नवीन ज्ञान निर्मितीमध्ये विद्यार्थी सक्रिय राहातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पियाजेची बोधात्मक
विकास उपपत्ती:
पियाजे (1970)
यांनी मुलांच्या बोधात्मक क्षमतेमधील गुणात्मक फरक गृहित धरुन मुलांची चार
टप्प्यात विभागणी केलेली आहे. विद्यार्थी विकासाच्या विशिष्ट टप्प्यात पोहोचलेला
नसल्यास अगर त्यांना मुख्य वेगवेगळ्या विकासाच्या अवस्थेतील तार्किक रचनामध्ये
मर्यादा असतील तर बोधात्मक कामे शिकविली जाऊ शकत नाहीत.
पियाजेनी 1985 नंतर
अध्यानार्थ्याच्या विद्यमान ज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी नवीन माहिती कशी आकार घेते
याच्या स्पष्टकरणासाठी या सिद्धांताचा विस्तार केला आणि विद्यमान ज्ञान स्वतःच
नवीन माहिती सामावून घेण्यासाठी बदल करते हे स्पष्ट केले. व्यक्तीच्या वर्तमान
पुर्वरचनेमध्ये नवीन, बाह्य घटकांचा अंतर्भाव करणे म्हणजे सात्मीकरण तर नवीन
घटकाशी जुळवून घेण्यासाठी वर्तमान रचनेतच बदल करणे म्हणजे समावेशन होय. सात्मीकरण
व समावेशन या संकल्पना आपल्या संपूर्ण आयुष्यभर कार्यरत असतात आणि या दोन्हीमध्ये
समतोल साधने हेच बोधात्मक विकासाचे मूळ उद्देश आहे.
जेरोम ब्रूनर:
संकल्पना निर्मिती
ब्रूनरवर व्यगॉस्कीचा प्रभाव
होता. ब्रूनर यांनी शिक्षणात शिक्षक, भाषा आणि सूचना यांच्या
भूमिकेवर जोर दिले. त्यांना असे वाटायचे की समस्येचे निराकरण करण्यासाठी
शिकणा-यांनी वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या पाहिजेत, त्यामध्ये
व्यक्तीपरत्वे भिन्नता असू शकेल आणि सामाजिक संवाद चांगल्या शिक्षणाचे मूळ असते
असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहे.
ब्रूनरला सॉक्रेटीसच्या
व्दंव्दविकासी पद्धतीचा अवलंब आपल्या अध्ययन प्रक्रियेत असावे आणि शिक्षणात स्वतःच्या
ज्ञानाचे प्रतिबिंब स्वत:ला ज्ञान मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित करतील असे प्रयत्न
व्हावेत असे वाटत होते. अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून एक
क्षेत्र दुसर्या क्षेत्राशी निगडीत असावे (आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन). स्वतःच्या
ज्ञानाची निर्मिती करताना शिक्षकाशी सक्रिय सुसंवाद साधून अध्यानार्थ्यानी शिकणे
ही शोधांची प्रक्रिया बनविणे आवश्यक आहे.
शिक्षण ही एक
सक्रिय, सामाजिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या सध्याच्या ज्ञानावर
आधारित नवीन कल्पना किंवा संकल्पना तयार करतात या कल्पनेवर आधारित अभ्यासक्रमात
बदल व्हावा असे ब्रूनरला अपेक्षित होते. जो ज्ञानरचनात्मक शिक्षणाची खालील तत्त्वे
प्रदान करतो:
- सूचना या अनुभव आणि संदर्भांशी संबंधित असल्या पाहिजेत जे विद्यार्थ्यांना शिकण्यास आणि तयार राहण्यास (तत्परता) सक्षम बनवतात.
- सूचना ह्या विद्यार्थ्याद्वारे सहजपणे आकलन होऊ शकेल अशा रचनात्मक असणे आवश्यक आहे.
- प्राप्त माहितीचे विश्लेषण सुलभ करण्यासाठी आणि त्यातील रिक्त जागा (दिलेल्या माहितीच्या पलीकडे जाऊन) भरण्यासाठी सूचना तयार केल्या पाहिजेत.
शोधात्मक
अध्ययन प्रतिमान:
शोधात्मक
अध्ययनात, विद्यार्थ्यांना समस्या परिहार परिस्थितीत ठेवले जाते जिथे त्यांना तथ्ये,
नातेसंबंध आणि नवीन माहिती शोधण्यासाठी पुर्वानुभव आणि विद्यमान
ज्ञान यावर भर देणे आवश्यक असते.
पारंपारिक
अध्यापन पद्धतींपेक्षा वास्तविक परिस्थिती आणि प्रसंगानुरूप समस्येचे
निराकरनाव्दारे विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती चांगल्या प्रकारे स्मरणात
राहण्याची शक्यता अधिक असते.
सुव्यवस्थित
शोध, समस्या आधारित अध्ययन, अभिरूप अध्ययन, व्यक्ती केद्रित अध्ययन आणि प्रसंगानुरूप अध्ययन अशा प्रतीमानाचा समावेश
शोधात्मक अध्ययन प्रतिमानामध्ये आढळतो.
लेव्ह व्यागॉस्की:
सामाजिक ज्ञानरचनावाद
सामाजिक ज्ञानरचनावाद
व्यागॉस्कीने विकसित केले. पियाजे यांनी मांडलेल्या गृहितकांना नाकारून, शिक्षणातून सामाजिक संदर्भ वेगळे करणे शक्य नाही असे प्रतिपादन त्यांनी केलेले
आढळते.
मुलाच्या
सांस्कृतिक विकासाचे प्रत्येक कार्य दोनदा दिसून येतेः प्रथम, सामाजिक पातळीवर आणि नंतर वैयक्तिक पातळीवर; प्रथम,
सभोवतालच्या लोकांमध्ये (inter psychological)
आणि नंतर मुलाच्या आतमध्ये (intra psychological).
हे ऐच्छिक अवधान, तार्किक स्मरणशक्ती आणि
संकल्पना निर्मितीसाठी देखील तितकेच लागू होते. सर्व उच्च कार्ये
व्यक्तिव्यक्तींमधील वास्तविक संबंधामधून उद्भवतात असे व्यगॉस्कीने नमूद केलेले
आहे. तसेच व्यगॉस्की यानी समीपस्थ वैकासिक अवस्था (zone of Proximal development) ही संकल्पना मांडली. यामध्ये एखादा नवीन विद्यार्थी कोणत्याही मदतीशिवाय
काय करू शकतो आणि कुशल जोडीदाराकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास काय साध्य
करू शकतो यामधील फरक यामध्ये सांगितलेला आहे.
1934 मध्ये
वयाच्या 38 व्या वर्षी व्यगॉस्की यांचे निधन झाले असले तरी त्यांची बहुतेक
प्रकाशने 1960 नंतर इंग्रजीत दिसून आली आहेत. तथापि, याकाळात शैक्षणिक
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सामाजिक ज्ञानरचनावादाचे योगदान दिसून येते.
1980 च्या
दशकात डयुई आणि व्यागॉस्कीच्या संशोधनात पियाजेच्या विकासात्मक मानसशास्त्रातील कार्य
एकत्र करून ज्ञानरचनावादाचा व्यापक दृष्टिकोन विकसित केला. ज्ञानरचनावादाचा मूलभूत
हेतू म्हणजे विद्यार्थी निरीक्षणाऐवजी कृतीद्वारे शिकतात हा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या
पूर्वीच्या ज्ञानाचे एखाद्या नवीन अध्ययन परिस्थितीत परीक्षण आणि पुर्न-मूल्यांकन
केले पाहिजे असे याव्दारे निष्पन्न होते.
विद्यार्थी
जोपर्यंत त्यांच्या विषयावर प्रभुत्व मिळवत नाहीत तोपर्यंत अर्थनिर्वचन, उच्चारण आणि पुनर्मूल्यांकनाची ही प्रक्रिया वारंवार घडत राहिली पाहिजे.
त्यामुळे विद्यार्थी नेहमी माहिती संकलन करीत असताना ती छोट्या छोट्या भागात
रुपांतरीत करतो, काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतो, छोट्या छोट्या भागातील
माहितीचे एकत्रीकरण करतो, त्या माहितीचे घटकानुसार वर्गीकरण करतो आणि शेवटी त्याची
पुनर्मांडणी करून ज्ञान निर्मिती करतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने कटाक्षाने अवलंबावीत असे काही
मुद्दे खालीलप्रमाणे:
- आयत्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घालण्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी कशा प्रकारे मानसिक प्रक्रिया करून आत्मसात करावी हे शिकविणे गरजेचे वाटते.
- शिक्षकाने शिकविण्याऐवजी त्यांना शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची मते (दृष्टीकोन) मांडण्यास मुभा दिली पाहिजे.
- मेंदुआधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अवलंबिली पाहिजे.
- मुलानवर माहितीचे ओझे लादण्यापेक्षा त्यांच्यामध्ये नवनिर्माण क्षमता विकसित केली पाहिजे.
बऱ्याचदा अनेक पालक आणि शिक्षकसुद्धा मुलांच्यावर माहितीचा धो-धो पाऊस
पाडतात पण प्रत्यक्षात तो/ती त्या पावसात कितपत भिजतात हे पहिलेच जात नाही. एकदा
एका शिक्षकाला विचारण्यात आले की, शिकवून झाले का? तेंव्हा त्याने असे सांगितले
की, माझे शिकवून झाले पण त्यांना कितपत समजले आणि त्यांच्यापर्यंत कितीपत पोहचले हे
माहित नाही. आपण आपली तयारी करून आलेली माहितीची घागर त्यांच्यावर रिकामी करतो पण
प्रत्यक्षात त्यांच्या (वेदनेन्द्रिये) भांड्याचे तोंड उघडे होते का? हा आजचा खूप
मोठा आणि गहन प्रश्न आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय संपादन सर्वेनुसार (NAS)
अर्थबोध न होता वाचणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आलेले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भाषा विषयक प्रगती ही गणितीय क्षमतेपेक्षा अधिक
आढळते पण शहरी मुले ही क्षमताबाबत ग्रामीण मुलांच्या तुलनेत मागे असलेले आढळतात
आणि त्यांचे हे गुणांक भारतीय सरासरी गुणांकाच्या जवळ जाणारे आहे. त्यामुळे आपण
सर्वांनी मिळून बदल घडविण्यासाठी ज्ञानरचनावादाचा निरंतर प्रवास सुरु ठेऊ या.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
संकपाळ, एस. पी. (जुलै, 2017). ज्ञानरचनावाद आणि मूल्यमापन, भारतीय शिक्षण-17-24
Agrawal, m. (may,2007) “Constructivism and
pupil evaluation” in journal of Indian education, New Delhi:NCERT
Anderson, (2003) “The next enlightment” New
York: Martin’s Press
Brooks, j. and Brooks, m. (1999) “In search of
understanding: the case of constructvist Classroom” Alexadria: Association for
supervision and curruculumdevelopment
Bruner, J. (1966) Toward a Theory
of Instruction. Cambridge, MA: Harvard University Press.
Bruner, J. (1973) Going Beyond the
Information Given. New York: Norton.
Bruner, J. (1983) “Education as social
invention,” Journal of Social Issues 39: 129–141.
Dewey,
J. (1909). How we think. New
York: D. C. Health and Co.
Dewey,
J.
(1938). Experience & Education. New York: Kappa Delta Pi
Good,
t. and Brophy, j. (1990) “Educational Psychology: A realistic approach” New York” Longman, white
plains
Mahoney, m.j. (2004) “What is Constructivism
and why is it ngrowing? In
Constructive psychotherapy” New York: Guilford
Merrill, M. D. (1991) “Constructivism and Instructional
Design in Educational Technology”
NCERT (2005) “National Curriculum Framwork-
2005” New Delhi” NCERT
Piaget,
J. (1970) Structuralism. New York: Harper & Row.
Piaget,
J. (1972) The Psychology of the Child. New York: Basic Books.
Pritchard, A. and Woollard, J.
(2010). Psychology for the Classroom: Constructivism and Social Learning, New
York: Taylor & Francis e-Library
Sharma, s. (2006) “Constructivism in
Constructivist Approaches to teaching and learning” New Delhi: NCERT
Von, Glaserfeld (1989) “An Exposition of Constructivism:
why some like it radical” Massachusetts University, Amherst:
Scientific reasoning research institute
Vygotsky,
L. (1978) Mind in Society. Cambridge, MA: Harvard University Press.