रविवार, १२ एप्रिल, २०२०

अर्थापत्ति व अनुपलब्धि प्रमाण | Implication and Non-apprehension |

अर्थापत्ति व अनुपलब्धि प्रमाण | Implication and Non-apprehension
अर्थापत्ति:
पूर्व मीमांसक अर्थापत्तिहे ज्ञानाचे एक स्वतंत्र प्रमाण मानतात, कारण अर्थापत्तीने जे ज्ञान प्राप्त होते ते इतर कोणत्याही ज्ञान प्रमाणाने प्राप्त होत नाही म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द व अभाव या पाच प्रमाणांनी हे ज्ञान प्राप्त होत नाही ते ज्या प्रमाणाने प्राप्त होते त्यास अर्थापत्ति असे मीमांसक म्हणतात. अर्थापत्तीला Postulation, Presumption and Implication असे इंग्रजी शब्द वापरण्यात येतात.
उदा. देवदत्त नावाचा माणूस घरी नाही, म्हणून तो बाहेर कुठेतरी गेला असला पाहिजे. अर्थात देवदत्त हा जीवंत आहे हे त्यात गृहीत धरलेलेच असते. म्हणजे देवदत्त जिवंत असून आता घरी नाही. यावरुन तो बाहेर कोठेतरी गेला असला पाहिजे असे अनुमान काढणे बरोबर ठरते किंवा देवदत्त जिवंत असून बाहेर गेलेला नाही यावरुन तो घरातच असला पाहिजे असे अनुमान काढणे युक्त ठरेल. पण देवदत्त जिवंत नसलेच तर तो घरी किंवा घराबाहेर अन्यत्र कोठेतरी असण्याचा सुतरां संभव असणार नाही.
खरे पाहात अर्थापत्ति हा एक प्रकारचा अभ्युपगम असतो. आपल्यासमोर घडणाऱ्या घटनांचे तर्कशुध्द रीतीने स्पष्टीकरण करण्यासाठी अर्थापत्ति या ज्ञानप्रकाराचा चांगल्यारीतीने उपयोग होऊ शकतो. जेव्हा काही घटना वरकरनी परस्परांशी विसंगत दिसतात आणि त्यांच्यामध्ये संगती लावता येत नाही तेव्हा एखादा विकल्प किंवा पर्याय गृहीत धरुन परस्परविसंगत किंवा परस्परविरुध्द अशा पर्यायामध्ये संगती ज्याच्या सहाय्याने लावता येते अशा गृहीतकास किंवा पर्यायास अर्थापत्ति म्हणतात. अर्थापत्ति या शब्दाचा विग्रह ‘अर्थ + आपत्तिअसा केला जातो. अर्थ म्हणजे ‘वास्तव घटनाआणि ‘आपत्तिम्हणजे ‘स्पष्ट करण्यासाठी करावयाची कल्पनाम्हणजे जेव्हा एखादी घटना विशद करणे अवघड ठरते तेव्हा ती विशद करण्यासाठी एखादी कल्पना किंवा अभ्युपगम पर्याय म्हणून गृहीत धरावा लागतो, तेव्हा ती अर्थापत्तिबनते. वरील उदाहरणात देवदत्त जिवंत आहे (म्हणजे मृत नाही), शिवाय तो घरातही नाही या परस्परांशी विसंगत असणाऱ्या घटनांमध्ये संगती लावण्यासाठी व समन्वय घडवून आणण्यासाठी तो बाहेर गेला असला पाहिजे असे समजणे योग्य व सहाय्यक ठरते.
अनुपलब्धि:
पूर्व मीमांसक अनुपलब्धिहे ज्ञानाचे स्वतंत्र प्रमाण मानतात. अनुपलब्धीसाठी इंग्रजीत Apprehension, Non-perception असे अनेक पर्यायी शब्द वापरलेले आहेत. ज्याच्या अस्तित्वाच्या ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानाची पहिली पाच प्रमाणे लागू पडत नाहीत व उपयोगी ठरत नाहीत अशाचे ज्ञान अभावाने होते असे मीमांसक मानतात. कुमारिल अनुपलब्धि हे ज्ञानाचे स्वतंत्र व सहावे प्रमाण आहे असे मानतो. नैयायीक व प्रभाकर मात्र अभाव हे ज्ञानाचे स्वतंत्र प्रमाण मानीत नाहीत. वैशैषिक अभाव हा एक स्वतंत्र पदार्थ मानतात. पण त्यास ज्ञान-प्रमाण मात्र समजत नाहीत. अनुपलब्धियाचा अर्थ आधीच्या पाच प्रमाणांच्या सहाय्याने मिळणाऱ्या ज्ञानाचा अभाव असा आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान व अर्थापत्ति यांच्याव्दारा जे ज्ञान मिळते ते भावरुप वस्तूंचे असते; असे ज्यांचे ज्ञान नसते ते इतर सर्व परिस्थिती न बदलता जर तशीच कायम राहिली तर अभाव दर्शविण्यासाठी त्या वस्तूचे अस्तित्व मात्र असता कामा नये. कुमारिलाच्या मते अभाव हा त्याच्या प्रतियोगिच्या प्रत्यक्ष दिसण्याने किंवा अनुमानाने समजतो. जे ज्ञानेंद्रिये एखादी वस्तू पाहते तेच त्याचा अभावही पाहते, आणि जे अनुमान एखाद्या वस्तूचे अस्तित्व जाणते ते त्याचा अभावही जाणते. म्हणून न्याय-वैशेषिकाच्या मते ‘अभावहा जरी स्वतंत्र पदार्थ असला तरी तो जाणण्यासाठी अभाव किंवा अनुपलब्धि नावाच्या स्वतंत्र ज्ञानप्रमाणाची आवश्यकता राहत नाही. न्याय अनुपलब्धीचे रुपांतर प्रत्यक्षात किंवा अनुमानात करते.
कुमारिल म्हणतो की, अभाव उदा. घटाचा अभाव हे ज्ञानेद्रिंयाला प्रतीत होत नाही, कारण ज्ञानेंद्रियाचा म्हणजे चक्षूचा ज्याच्याशी संबंध यावा असे तेथे काही नसतेच. काही लोक अभाव हा अनुमानाने जाणाला जातो असे मानतात. जेथे जेथे दृश्य वस्तू असते तेथे तेथे ती डोळयांना दिसते. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी डोळयांना काही दिसत नाही तेव्हा तेथे त्याचा अभाव जाणवतो/ कळतो. पण असे म्हणतात दृष्टीचा अभाव, अस्तित्वाचा अभाव हे गृहित धरलेले असतात. पण दृष्टीचा अभाव आणि वस्तूचा अस्तित्वाचा अभाव कसा समजू शकेल? अभाव जाणण्यासाठी वेगळेच ज्ञान प्रमाण असले पाहिजे असे यासाठी मानले जाते.
उदा:  घटाभाव व डोक्यावर टोपीचा अभाव इत्यादी.
प्रत्येक दर्शनशास्त्राची स्वतःची अशी वेगळी तत्त्वे आणि ध्येये असतात त्यानुसार त्या तत्त्वांचा विचार आणि पूर्तीसाठी प्रमाणशास्त्राची आवश्यकता असते. यातूनच प्रत्येक दर्शनशास्त्रांनी आपल्या तात्त्विक उद्दिष्टानुसार ज्ञानमिमांसा अवलंबिली आहे. ज्ञानमिमांसेविषयी शोध घेण्याची जागा म्हणजे तत्त्वमीमांसा आणि तत्त्वमीमांसेच्या तपासणीसाठी ज्ञानमीमांसा काम करते. हे दोन्ही परस्परावलंबी आहेत.

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन

जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

शब्द प्रमाण व उपमान | verbal testimony and comparison |

शब्द प्रमाण व उपमान  | verbal testimony and comparison
शब्द किंवा आप्तवचन:
सांख्याना ज्ञानाचे एक प्रमाण म्हणून हे मान्य आहे. आप्तवचनापासून मिळणारे ज्ञान हे युक्त असते. विश्वनीय व्यक्ती किंवा ग्रंथ यापासून मिळणारे ज्ञान सत्य समजावयास पाहिजे असे सांख्य मानतात. सांख्यमतानुसार वेद हे कोळी मानवांनी रचले नसून ते अपौरुषेय असल्यामुळे ते नित्य किंवा अविनाशी आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. कारण उगवलेल्या अंकुराला जरी कोणी व्यक्तीने उगवलेले नसले तरी तो केव्हातरी नष्ट होतोच. वेद हे अपौरुषेय असल्यामुळे त्यांच्याविषयी संशय व विपर्यय असत नाही व ते स्वतः प्रमाण आहेत, आणि त्यांचे प्रामाण्य स्वतः व्यतिरिक्त इतर कशावर जर असलंबून असले तर त्यांचा अधिकार अबाधित राहणार नाही असे सांख्याचे मत आहे.
प्रत्यक्ष व अनुमान ही जरी अत्यंत महत्वाची व व्यापक ज्ञानप्रमाणे व साधने असली तरी मानवास सर्वच ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांच्या सहाय्याने मिळू शकत नाही. शब्दप्रमाणाला, आप्तवचन किंवा आप्तवाक्य असाही शब्दप्रयोग केला जातो. आप्त याचा अर्थ विश्वासार्ह व्यक्ती आप्तवाक्य याचा अर्थ विश्वासार्ह व्यक्तीने सांगितलेले किंवा दिलेले ज्ञान आपण साधारणपणे वयोवृध्द, ज्ञानवृध्द, विचारी, अनुभवी, विवेकी आणि सत्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना आप्त समजतो. आप्तोपदेश असा शब्द न्यायसूत्रात वापरलेला आहे. आप्ताने सांगितलेले ज्ञान केवळ सत्यच नसते तर हितकारकही असते. आप्त कोणाचे अहित किंवा अकल्याण करणारा नसतो.

उपमान (सादृशानुमान/ साम्यानुमान):
उपमानहे न्यायाना मान्य असलेले चौथे ज्ञानप्रमाण आहे. सर्वच ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान व शब्द यांनी प्राप्त होते असे नाही. खरे म्हणजे पूर्वमीमांसक न्यायाची एकूण सहा प्रमाणे व साधने मान्य करतात. उपमान म्हणजे सादृश्यानुमानकिंवा साम्यानुमानहे एक स्वतंत्र प्रमाण मानावे की नाही हा वादचा विषय आहे. परंतू न्याय व मीमांसक उपमानाला स्वतंत्र प्रमाण मानतात.
काही ज्ञान हे साम्यगुणांनी किंवा सादृश्यगुणांनी होत असते. ज्ञानप्रक्रियेत परिचिताकडून अपरिचिताकडेजाण्याची प्रक्रिया असते. अगदीच अपरिचित वस्तू व घटना असेल तर ती आपणास परिचित किंवा माहिती असलेल्या व्यक्तीसारखी (निदान काही प्रमाणात) आहे असे सांगितले, तरी नवीन, अनोळखी/ अपरिचीत वस्तू किंवा घटना ओळखण्यास मदत होते. न्यायात यासंदर्भात दिलेले उदाहरण महत्वाचे आहे. ते असे की, एका वनवासी माणसाने अनभिज्ञ मुलांना सांगितले की तुम्ही रानात जाल तेव्हा तुम्हाला गवय (रानगाय) नावाचा गाईसारखा प्राणी पाहावयास मिळेलम्हणजे गवय व गाय यांच्यात गुणसादृश्य असते. गाय हा सर्वांच्या परिचयाचा प्राणी आहे. त्याच्या सारखे (सदृश्य) गुण ज्या प्राण्याच्या ठिकाणी दिसतील त्यास गवयम्हणावयाचे अशा तऱ्हेने परिचीत वस्तूपासून अपरिचित वस्तूचे (प्राण्याचे, वनस्पतीचे, फळाचे, फुलाचे वगैरे कशाचेही) अनुमान करता येते व केले जाते त्यास सादृश्यानुमान म्हणजे उपमानम्हणतात. कोणतीही नवी वस्तू ओळखण्यासाठी तिचा वर्ग किंवा जाती ठरविण्यासाठी व तिला नाव किंवा संज्ञा देण्यासाठी ‘उपमानया प्रमाणाचा उपयोग होतो.
पूर्व मीमांसक उपमानहे ज्ञानाचे एक स्वतंत्र प्रमाण आहे असे मानतात. न्यायदर्शनही उपमानाला एक स्वतंत्र प्रमाण मानते. पण त्या दोघात फरक आहे. न्यायानुसार उपमान हे शब्द आणि त्या शब्दाने दर्शविली जाणारी वस्तू यांच्यातील संबंध आहे. उपमान हे गवयासारख्या अज्ञात जनावराचे गायींसारख्या ज्ञात प्राण्याशी असणाऱ्या सादृश्याचे ज्ञान होय. ते ज्ञान असे आहे दिसणारा हा गवय (रानगाय) आठवणाऱ्या गायीसारखा आहे, मीमांसेला अभिप्रेत असलेले उपमान असे नाही. मीमांसक म्हणतात की, शब्द आणि त्या शब्दाने दर्शविली जाणारी वस्तू (गवय) यांच्यातील संबंधाचे ज्ञान हे आप्तवचनावरुन (जो मनुष्य गवय हा गायीसारख्या असतो असे सांगतो त्यांच्या म्हणण्यापासून) होते, उपमानाने किंवा तुलनेने होत नाही. मीमांसेच्या मते ज्या व्यक्तीने असे सांगितलेले असते त्या तिच्या वचनाच्या स्मरणावरुन असे सादृश्यज्ञान होते. गवयाचे किंवा वनगायीचे ज्ञान हे तिला प्रत्यक्ष पाहण्याने होते, उपमानाने किंवा तुलनेने होत नाही. म्हणून मीमांसेच्या मते उपमानाने आठवणाऱ्या गायीचे सादृश्य प्रत्यक्ष दिसलेल्या गवयाशी समजते. मीमांसेनुसार उपमानाने होणारे ज्ञान असे असते. ‘आठवलेली गाय ही दिसलेल्या गवयाप्रमाणे असते, प्रत्यक्ष दिसलेल्या गवयासदृश (पूर्वी पाहिलेली व आता आठवलेली) गाय आहे असे ज्ञान उपमानाच्या मार्फत होते. ज्या कोणाही व्यक्तीने गाय पाहिलेली असेल आणि तिच्या दृष्टीस एखादा गवय पडला तर तिला स्वतःलाच गवय पाहात असताना त्यांच्यासारखी गाय असते असे आठवते. असे दोघांमधील सादृश्याचे ज्ञान म्हणजेच ‘उपमानहोय. हे उपमानज्ञान अनुमानज्ञानाहून भिन्न अतसे कारण तेथे व्याप्तिज्ञानाची गरज असते.

प्रभाकराच्या मतानुसार उपमान याचा अर्थ असा होतो की, जेव्हा एखाद्याला सादृश्य दिसते आणि ते सादृश्यदर्शन हे न दिसणाऱ्या वस्तूशी तिच्या असणाऱ्या सादृश्याचे ज्ञान घडविते तेव्हा त्यास ‘उपमानम्हणतात. 

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

अनुमान प्रमाण | Inference |

अनुमान प्रमाण
      अनुमानाने होणारे ज्ञान हे ज्ञानेंद्रियांच्या बाहय वस्तूंशी सन्निकर्ष न होता निर्माण होते. सांख्यकारिकेत अनुमानाची व्याख्या, ’लिंगलिंगीपूर्वकम ज्ञानमनुभानम!अशी केली आहे. सांख्यमतानुसार अनुमान ज्ञान हे व्याप्त-व्यापाक आणि पक्षधर्मता यांच्या ज्ञानावर आधारलेले असते. म्हणजेच अनुमान हे व्याप्तीवर आधारलेले असते. सांख्याना न्यायाचे पंचावयवी (प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय व निगमन) वाक्य मान्य आहे. सांख्यमतानुसार व्याप्ती ही अनौपाधिक असली पाहिजे. औपाधिक व्याप्तीवर अनुमान आधारता येत नाही.
तर्कशास्त्रामध्ये अनुमानाच्या दोन प्रकाराबाबत चर्चा केलेली आढळते. तर्कशास्त्र हे युक्त अनुमानासंबंधीचे सामान्य नियम शोधून काढते व त्यांची पद्धतशीर व्यवस्था लावते. यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार.
अ. निगामी अनुमान (Deductive): निगामी अनुमानास  निगमनात्मक अनुमान असेही म्हणतात. 'दिलेल्या सामान्य विधानाच्या सहाय्याने विशिष्ट गोष्टीविषयी निष्कर्ष अनुमानित करण्याच्या प्रक्रियेस निगामी अनुमान असे म्हणतात.
उदा.१. सर्व माता प्रेमळ असतात.
      माधुरी ही माता आहे.
      म्हणून माधुरी ही प्रेमळ आहे.
उदा. २. जेथे जेथे धूर आहे तेथे अग्नि आहे.
या पर्वतावर धूर आहे.
म्हणून या पर्वतावर अग्नि आहे.
वरील दोन्ही उदाहरणमध्ये आपण सामान्य नियमापासून विशिष्ट गोष्टीविषयी निष्कर्ष काढला आहे. त्यामूळे ती निगामी अनुमाने ठरतात.
ब. विगामी अनुमान (Inductive) : विगामी अनुमानास विगमनात्मक अनुमान असेही म्हणतात. 'दिलेल्या विशिष्ट विधानांच्या सहाय्याने सामान्य विधाने (नियम) अनुमानित करण्याच्या प्रक्रियेस विगामी अनुमान असे म्हणतात.
उदा.१. रामाने विस्तवास हात लावला त्याला भाजले
शामने विस्तवास हात लावला त्याला भाजले
कृष्ण, गोविंदा, गोपाळ इत्यादीनी विस्तवास हात लावला त्यामूळे त्यानाही भाजले.
म्हणून, विस्तवास हात लावल्यास सर्वांना भाजते.
उदा.२. अ' मनुष्य मृत्यू पावला
ब मनुष्य मृत्यू पावला
', '', '', '' इत्यादी अनेक माणसे मृत्यू पावली
म्हणून सर्व माणसे मृत्यू पावतात.
वरील दोन्ही उदाहरणामध्ये आपण विशिष्ट विधानापासून, विस्तवास हात लावल्यास भाजले व सर्व माणसे मृत्यू पावतात. असा सामान्य नियम निष्कर्षित केलेला आहे. त्यामूळे ती विगामी अनुमाने ठरतात.
सर्वसामान्यपणे अनुमानाचे वरील दोन प्रकार सर्वत्र अभ्यासले जातात. त्यामुळे यासंबंधीची माहिती आपणास तर्कशास्त्रात अधिक पाहायला मिळेल.
अनुमानाचे प्रकार: सांख्य
      वीत आणि अवीत असे अनुमानाचे दोन प्रकार आहेत. ‘वीत’ अनुमानात व्याप्ती ही प्रामुख्याने हेतू व साध्यपद यांच्यातील भावसाहचर्यांने प्राप्त होत असते.
उदा:- जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी असतो हे वाक्य वीत अनुमानाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. वीतानुमानात अन्वय व व्यतिरेक या दोन्ही पध्दतींची व्याप्ती तयार होते. वीतानुमानाचे पूर्ववत (कारणापासून संभाव्य कार्य होणे जसे ढग आणि पाऊस) आणि सामान्यतोदृष्टी (शिंगे असलेला प्राणी दिसला तर सामान्यत: त्यास शेपूट असते) असे दोन उपप्रकार आहेत.
      ‘अवीत’ अनुमान हे शेषवत (सापाची कात दिसल्यास साप येऊन गेला) अनुमान असते व ते केवळ व्यतिरेकी व्याप्तीवर म्हणजे अभाव साहचर्चावर आधारलेले असते. सांख्याचे अनुमान विषयक मत न्याय-वैशेषिक मताशी जवळजवळ पूर्णपणे जुळणारे आहे.
न्यायानी मान्य केलेल्या ज्ञानाच्या चार प्रमाणात अनुमान या प्रमाणाला फार उच्च स्थान आहे. किंबहुना अनुमानाचा इतका खोल विचार व अभ्यास भारतात प्रथम न्यायशास्त्रानेच केलेला आहे. अनुमान हा तर्कशास्त्राचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. किंबहुना रुढ भाषेत तर्क करणे हे अनुमान करण्याशी समानार्थक समजले जाते. अनुमानाविषयी न्यायाची कामगिरी अत्यंत भरीव व चिरस्थायी ठरली आहे.
अनुमान हा शब्द अनु + मान म्हणजे दुसऱ्या एका ज्ञानानंतर येते असे ज्ञान. अनुमान हे आधी झालेले एक ज्ञान गृहीत धरते. पूर्वानुभव असल्याशिवाय अनुमान करता येत नाही. अनुमान म्हणजे तर्कानी जगणे होय. तो एक प्रकारचा अंदाज असतो. अनुमानात ज्याच्यापासून अनुमान केले जाते ते दृश्य किंवा प्रत्यक्ष असते व जे जाणले जाते ते अदृश्य किंवा अदृष्ट असते. अनुमानापूर्वी प्रत्यक्ष ज्ञान घडलेले असावे लागते. वात्स्यायनाच्या मते प्रत्यक्षाशिवाय अनुमान शक्य होत नाही. उद्योतकाराने प्रत्यक्ष व अनुमानात्मक ज्ञानातील फरक खालील रीतीने केलेला आहे.
1. योगजज्ञान वगळता सर्व ज्ञान एकाच प्रकारचे असते, तर अनुमानाचे मात्र विविध प्रकार असतात.
2. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानकाळात घडू शकते व ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जेवढे येते तेवढेच प्रत्यक्षाने समजू शकते, तर अनुमान हे भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांना लागू पडते.
3. अनुमानाला व्याप्ती व स्मरणाची गरज असते, तर प्रत्यक्षाला तशी काही गरज लागत नाही. जेथे प्रत्यक्ष उपलब्ध होते तेथे अनुामनाची गरज पडत नाही. शिवाय ज्यांचे ज्ञान निश्चित झालेले असते किंवा जे पूर्णपणे अज्ञात असते अशांच्या बाबतीत अनुमानाचा काहीही उपयोग होत नाही. फक्त ज्याच्याविषयी संदेह असतो अशांच्या बाबतीतच अनुमानाचा उपयोग होत असतो. दृष्य वस्तुपासुन अदृश्य वस्तूचे ज्ञान होण्यास अनुमान मदत करते. अनुमानाचे वर्णन करताना न्यायसारांत म्हंटले आहे की, ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचे त्यांच्या इंद्रियग्राहय वस्तूशी असणाऱ्या व्याप्तिसंबंधाच्या मदतीने जे ज्ञान होते ते अनुमान ज्ञान होय.
अनुमान हे अप्रत्यक्ष प्रकारचे ज्ञान असते ते कोणत्या तरी माध्यमाच्या मार्फत असते. कोणत्यातरी चिन्हाच्या (लिंगाच्या) मदतीने जे अदृश्य असते त्यांचे ज्ञान जेव्हा केले जाते तेव्हा ते अनुमान होते.
उदा - धूर दिसला म्हणजे त्यांच्या जवळपास अग्नी असला पाहिजे, असा जेव्हा आपण अंदाज करतो त्याला अनुमान म्हणतात. ज्यांच्या मार्फत किंवा ज्यांच्या दर्शनावरुन अदतदृश्य वस्तूचे अनुमान केले जाते त्याला लिंग किंवा हेतू म्हणतात.
उदा- धूर हे अग्नीचे लिंग आहे व अग्नी हे साध्य आहे. ज्याचे अनुमान केले जाते त्यास साध्यपद म्हणतात व ज्याच्या बाबतीत अनुमान करावयाचे असते त्यास पक्ष म्हणतात.
उदा - या पर्वतावर अग्नी आहे. या विधानात हा पर्वत पक्षपद आहे. अग्नी साध्यपद आहे व धूर हे मध्यपद/ लिंग आहे. मध्यपदाची पक्षपदात उपस्थिती असावी लागते, तिला ‘पक्षधर्मता’ असे म्हणतात आणि लिंगाचा साध्याशी जो नित्यनिरपवाद संबंध असतो त्यास ‘व्याप्ति’ म्हणतात. पक्षधर्मतेने सीमित झाालेल्या व्याप्तिला परामर्श म्हणतात म्हणून ‘परामर्शनन्यं ज्ञानं अनुमितीः’ अशी अनुमानाची व्याख्या केली जाते आणि व्याप्तिविशिष्ट पक्षधर्मताज्ञानं परामर्श:! अशी परामर्शाची व्याख्या केलेली आहे. धूर व अग्नी याचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो.
या पर्वतावर धूर आहे.
 \या पर्वतावर अग्नी आहे असे संविधान मांडले जाते.
दिङ्नागाच्या व त्याच्या मताचा इतरांच्या दृष्टीने अनुमान हे फक्त संवेद्य सत्तेच्या पातळीवरच युक्त असते. अंतिम सत्ता अनिर्वचनीय व अव्याख्येय असल्यामुळे आणि  ती सर्व कल्पना व विचार यांना अगम्य असल्यामुळे तिच्याशी अनुमानाचा कोणताही संबंध येत नाही. त्यांच्या मते अनुमानाची निर्मिती विचार व बुध्दी ही करीत असतात, आणि व्यावहारिक सृष्टीत अनुमानाचे स्थान महत्वाचे असते हे नाकारता येणार नाही. देश, काल, परिस्थिती यांच्या भेदांमुळे अनुमानाची सत्यता संशयास्पद ठरु शकते हे भर्तुहरीचे म्हणणे शांतरक्षित व धर्मकिर्ती यांना मान्य नाही. त्यांच्या मते पुरापासून अग्नीचे अस्तित्व अनुमानित होणे हे टाळता येणारच नाही.

पूर्व मीमांसक अनुमान हे ज्ञानाचे दुसरे महत्वाचे प्रमाण मानतात. सर्वच ज्ञान प्रत्यक्ष पध्दतीने प्राप्त होत नाही ही गोष्ट सर्वमान्य आहे. प्रत्यक्ष ज्ञानाला गंभीर मर्यादा पडतात. प्रत्यक्षज्ञान हे प्रत्येक व्यक्तिला वेगळे होत असते आणि त्यात इंद्रिये व विषय यांचा प्रत्यक्ष सन्निकर्ष होणे अत्यावश्यक असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक विषयाशी प्रत्येक वेळी सन्निकर्ष होईलच तशी शक्यता फार थोडी असते. जगात अनंत वस्तू व घटना असतात व त्या प्रतिक्षणी बदलत असतात. त्या सर्वांशी सर्वच व्यक्तींना स्वतः वैयक्तिक संबंध प्रस्थापित करुन त्या जाणणे केवळ अशक्य असते म्हणून ‘अनुमान’ हे ज्ञानप्राप्तीचे अप्रत्यक्ष साधन म्हणून महत्वाचे असते, आणि फार मोठया प्रमाणात मानवास ज्ञान अनुमानाच्या मार्गे मिळत असते. 

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रत्यक्ष प्रमाण | perception |

प्रत्यक्ष प्रमाण |Perception 
ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने पाहता चार्वाक हे प्रत्यक्षवादी आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान यांसारख्या प्रमाणापैकी त्यांना केवळ प्रत्यक्ष हेच प्रमाण मान्य आहे. पंचज्ञानेद्रिये व कर्मेन्द्रिये यांनी मिळणारे ज्ञान हेच त्यांना सत्य व विश्वसनीय साधन वाटते. डोळयांना जे दिसते कानांना जे ऐकायला येते, जिभेला जी रूची कळते, नाकाला जे वास कळतात आणि त्वचेला जे स्पर्ष कळतात तेवढेच खरे असतात. त्याच्या पलीकडे जे काही असते ते खरे की खोटे हे समजण्यास वाव नसते. चार्वाक हे अस्सल अनुभववादी आहेत. ते केवळ प्रत्यक्षावर भरवसा ठेवतात.
प्रत्यक्षमेव प्रमाणम।असे जे चार्वाक म्हणतात त्याचा अर्थ कोणत्याही ज्ञानाची सत्यता ठरविण्यासाठी ते पडताळून पाहिले पाहिजे किंवा प्रत्यंतर घेतले पाहिजे म्हणजे प्रत्यंतरक्षमता हा सत्याचा महत्वाचा निकश आहे आणि तोच निकश आपणास अधिकाधिक प्रमाणात सत्य प्राप्त करून देतो.
सांख्य तत्वज्ञानात ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द किंवा आप्तवाचन ही तीन प्रमाणे मानली आहेत. ज्ञानाचा उगम ज्ञानेंद्रियांच्या कार्यातून होत असतो. पुरूषाला अनुभव देण्यासाठी बुध्दीची व आंतर विषयांची निर्मिती झालेली आहे. वाचस्पतीच्या मतानुसार जेव्हा कोणाचाही बाहय जगाषी इंद्रियांच्या मार्फत संबंध येतो तेव्हा बुध्दी बाहय विषयाचा आकार घेते. प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन टप्पे असतात व ते म्हणजे निर्विकल्पक आणि सविकल्पक प्रत्यक्ष वाचस्पतीच्यामते प्रत्यक्ष ज्ञानासाठी मनाच्या कार्याची आवश्यकता असते. मन संवेदांची मांडणी करते; त्याचे विश्लेषण व संश्लेषण करून त्याची योग्य रीतीने मांडणी करून मग त्याचे स्वरूप ठरविते. परंतु विज्ञान भूक्षूच्या मते मात्र तसे होत नाही. त्यांच्यामते मन इंद्रिय संवेदनांना जोडणे किंवा त्यांचे संश्लेषण करणे वगैरे करीत नाही. तर बुद्धीचा इंद्रीयाव्दारा ज्ञेय विषयाशी सरळ प्रत्यक्ष संबंध येतो, आणि मनाच्या मार्फत फक्त इच्छा, संशय, कल्पना यांची जाणीव होते. परंतु इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान हे कॅमेऱ्यातून जसे वस्तूंचे छायाचित्र घेतले जाते तसे अगदीच कृत्रिम, यांत्रिक व्यक्तिनिरपेक्ष नसते. कारण जेंव्हा अनुभव घेतला जातो. तेव्हा तो कोणीतरी व्यक्ती म्हणजे तिचा अहंकार किंवा आत्मा घेत असतो. याबाबतीत प्रत्येक व्यक्तीचा अनुभव स्वतंत्र व वेगळा असतो. बाह्य परिस्थिती जरी तीच असली तरी अनुभव घेण्याच्या क्रियेत व्यक्तिसापेक्षता व व्यक्तिभेद आल्याशिवाय राहत नाहीत.
प्रत्यक्षज्ञान, पूर्णपणे व्यक्तिनिरपेक्ष व वस्तुनिश्ठ होऊ शकत नाही. पण व्यक्तिसापेक्षतेचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते. पण प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर जर एखादी कृती करण्याची आवश्यकता निर्माण होत असेल तर तेव्हा मात्र बुध्दी मध्यस्थी करते, आणि कर्मेद्रियांना अनुकूल किंवा प्रतिकूल क्रिया करण्यास किंवा कांही न करता तटस्थ राहण्यास आदेश देते. म्हणजे बुध्दी ही निश्चयात्मक किंवा संकल्पनात्मक कार्य करते. या तिघांना जर आपण अंतःकरण हा शब्द वापरला तर त्यात या सर्व कार्यांचा समावेष होतो.
अक्ष्णोः प्रति प्रत्यक्षम!असा प्रत्यक्षाचा सरळ अर्थ आहे. डोळयांना म्हणजेच प्रत्येकाच्या ज्ञानेंद्रियाना जे दिसते किंवा कळते ते प्रत्यक्ष होय. ज्ञानाचा उदय इंद्रियांचा त्यांच्या विशयांशी (वस्तूषी) संबंध येतो त्यातून होतो. त्यावेळी नांवे, शब्द यांच्याशी त्याचा संबंध आलेला नसतो. यात यौगिक प्रत्यक्षाचा अंतर्भाव होत नाही म्हणून विश्वनाथाने प्रत्यक्ष ज्ञानाची अधिक अचूक व्याख्या करताना म्हंटले आहे की, प्रत्यक्ष ज्ञान हे असे असते की जे दुस-या कोणत्याही ज्ञानसाधनाकडून निर्माण होत नाही. इंग्रजीत प्रत्यक्षाला (Direct knowledge) किंवा संवेदन (Perception) म्हंटले आहे. प्रत्यक्षाचे लौकिक व अलौकिक असे दोन प्रकार आहेत. लौकिक प्रत्यक्षात पंचज्ञानेंद्रियांचे कार्य अभिप्रेत असते. चर्मचक्षूसारखी जे शरीराची पंचज्ञानेंद्रिये आहेत. त्यांच्याच मार्फत बाहय जगातील वस्तू व त्यांचे गुणधर्म यांचे ज्ञान प्रत्यक्षात अंतर्भूत असते. लौकिंक प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिये, ज्ञेयवस्तू, मन, आत्मा व त्यांचे परस्परसंबंध ही सर्व गृहीत धरते.
तत्वचिंतामणीत म्हंटले आहे, ‘प्रत्यक्षस्य साक्षात्कारित्वं लक्षणम!’ केवळ इंद्रियवेदन (Sensetion) म्हणजे ज्ञान नसते. परंतु इंद्रियांच्या कार्याशिवायही मनाचा बाहय जगाशी संबंध येऊ शकत नाही. इंद्रियांच्याव्दारा जे जाणते ते मन असते, आणि मनाला जी जाणीव होत असते ती आत्म्यामुळे होत असते, कारण आत्मा हेच अंतिम चित्तत्व असते. ज्ञानप्रक्रियेची शृंखला अर्थ (प्रमेय विषयद्) ज्ञानेंद्रिये, मन व आत्मा अशी असते.
जैनांच्या मते प्रत्यक्ष ज्ञान बाहय विषय त्यांचे विविध गुणधर्म, रंग, आकार, रुप वगैरे सर्व उघड करुन दाखविते आणि ते ज्ञान आत्म्यावरील आवरण दूर सारुन होत असल्यामुळे ते आतून होते. ज्ञेय विषय (वस्तू) विज्ञानवादी बौध्द समजतात तसे नुसते ज्ञानाचे आकार नसतात. बाहय विषयांचे ज्ञान, चक्षुरादी इंद्रियाव्दारा जरी होत असले तरी खरे ज्ञान चर्मचक्षूना किंवा चर्म कर्मांना होत नसून आत्म्याच्या ठिकाणी अदृश्य दृष्टिशक्ती असते, व त्या पंचशक्ती आत्म्याच्या ठिकाणी असतात. पण खरे ज्ञान आत्म्याला त्यांच्याशी संबंध येऊन त्यांच्यामार्फत होत असते.
ज्ञानेंद्रिये ही खिडंक्यासारखी असतात व त्यांच्यामधून बाहय वस्तूंचे ज्ञान आत्म्याला होते. मनाचा आपणास अनुभव येत नसलयामुळे जैन मनाचे एक इंद्रिय म्हणून अस्तित्व नाकारतात आणि त्यांचे अस्तित्व मानण्याच्या अभ्युपगमाची आपणास आवश्यकता राहत नाही, कारण मनाचे कार्य आत्मा करीतच असतो. वस्तूंचे संवेदन होणे म्हणजे वस्तुविषयांच्या अज्ञानाचा पडदा दूर होणे आंतरिकदृष्टया पाहिल्यास अज्ञानावरण दूर होणे हे संवेद्य वस्तूची उपस्थिती, प्रकाश, ज्ञानेंद्रियांची क्षमता आणि यांसारख्या इतर गोष्टींकडून ठरविले जाते.
स्वतंत्र विज्ञानवादानुसार (बौद्ध) ज्ञानाची खरी प्रमाणे दोनच होत व ती म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यापैकी प्रत्यक्ष हे शुध्द इंद्रियवेदन असते व भ्रमविहीन असते. त्यांच्यामते विचाराच्या बाहेर अशा बाहय वस्तू नसतातच. दिङ्नागाने प्रत्यक्षाची व्याख्या करताना म्हंटले आहे की, नाम, संज्ञान, सामान्य यासारख्या विचारनिर्धाणापासून जे मुक्त असते असे इंद्रियवेदन म्हणजेच प्रत्यक्ष होय. प्रत्यक्ष (प्रमाण समुच्चय) हे आलोचनमात्र असते आणि ते सामान्य, विशेष, संबंध, गुण व कर्म यापैकी कशानेही बध्द व निर्धारित होत नाही. अशा विचार निर्धारकांची निर्मिती दिङ्नागाच्या मते बुध्दीकडून होत असते. प्रत्यक्ष हे शुध्द वेदन असते. अशा प्रत्यक्षाला नैयायिक ‘निर्विकल्प प्रत्यक्षम्हणतात व निचारनिर्धारकांनी होणाऱ्या ज्ञानाला ‘सविकल्प ज्ञान’ म्हणतात.
शबराच्या (मीमांसक) मते, जेव्हा इंद्रियांचा प्रमेयाशी किंवा ज्ञेयविषयाशी सन्निकर्ष होतो, जेव्हा साक्षात प्रतीती येते तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाची उत्पत्ती होते. जेव्हा वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येतो किंवा इंद्रिय संवेदन हाते. तेव्हा होणारे ज्ञान युक्त किंवा प्रमाण असते आणि जेव्हा संवेदित विषयापेक्षा ज्ञेयविषय वेगळा आहे असे जाणवते किंवा दिसते तेव्हा ते ज्ञान प्रमाण नसते.

प्रभाकराच्या मते, प्रत्यक्ष ज्ञान ही ‘साक्षात प्रतीति’ असते. ज्ञानाच्या प्रक्रियेत ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे तीन घटक असतात. त्यास ‘त्रिकूट प्रत्यक्षवाद’ म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञानाला आवश्यक असणारी सहा इंद्रिये असतात. शोत्र, घ्राण, रसना, त्वक आणि चक्षू ही पाच आणि सहावे मन हे अंतरिंद्रिय असते. 

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रमाणशास्त्र | Pramanas |


प्रमाणशास्त्र (ज्ञानमीमांसा)
तत्त्वज्ञान म्हणजे काय ?
तत्त्वज्ञानाचा उगम हा प्राचीन भारतीय व पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या चिंतनातून झालेला आहे. प्राचीन काळी तत्त्वज्ञानाचे मूळ हे मानवी कुतुहलात दिसून येते. आपल्या अनुभवाला येणाऱ्या विश्वातील अनेक घटकांचा शोध घेऊन बुद्धीच्या सहाय्याने त्यांचे विश्लेषण त्यांनी केलेले आढळते. तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाकडे व विश्वाकडे पाहण्याचा मुलगामी दृष्टीकोन निर्माण करते. भारतीय व प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान हे कुतुहलातून उदयास पावलेले आहे.
'तत्त्वज्ञान' हा शब्द अतिशय संदिग्ध असल्यामुळे तो व्यापकही बनलेला आहे. विश्वाविषयींचे मूलगामी चिंतन म्हणजे तत्त्वज्ञान असा त्यांचा सर्वांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे. म्हणून तत्त्वज्ञानाला सदवस्तुशास्त्र, सत्ताशास्त्र (मेटॅफिजिक्स) असे म्हटले जाते. कोणत्याही विषयाचे मूलगामी व तर्कशुद्ध विवेचन म्हणजे तत्त्वज्ञान मानले जाते. या शब्दाच्या अशा अनिश्चित व विशाल व्याप्तीमुळे तो संदिग्ध राहिल्यास आश्चर्य नाही.
तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वासंबंधीचे ज्ञान होय. तत् म्हणजे ते जे काही आहे ते, ते सर्व एकूण एक या ‘तत्’चा ‘तत्’पणा म्हणजे तत्त्व होय. यालाच तत् चे सार असे म्हणतात. तत्त्वज्ञान या संयुक्त शब्दात तत्त्व आणि ज्ञान असे दोन शब्द असून तत्त्व या शब्दाचा अर्थ सत्य किंवा यथार्थ असाही आहे. यावरुन तत्त्वज्ञान म्हणजे सत्य किंवा यथार्थ स्वरुपाचे ज्ञान होय. तत्वज्ञान म्हणजे सत्यासाठी बौद्धिक शोध ह्या तत्वज्ञानाच्या व्युत्पत्ती विषयक अर्थाशी पाश्चिमात्य तत्वज्ञान जवळपास प्रामाणिक राहिले आहे. मानवाचे स्वरुप आणि आपण वास्तव्य करीत असलेल्या वास्तवाचे स्वरुप यांच्याशी निगडित कल्पनांची सर्वकष प्रणाली म्हणजे तत्वज्ञान. यावरून आपण असे म्हणू शकतो की मानवी जीवनाचे सर्व पैलू तत्वज्ञान विषयक विचारांनी प्रभावित व नियंत्रित आहेत. अभ्यासाचे एक क्षेत्र म्हणून तत्वज्ञान ही सर्वात जुनी शाखा आहे. तिला सर्व शास्त्रांची जननी मानले जाते. खरं तर सर्व ज्ञानाच्या मूळाशी तीच आहे.
तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वमिमांसा, मुल्यमिमांसा व ज्ञानमिमांसा अशा तीन शाखा आहेत. वस्तूंच्या स्वरूपाचा अभ्यास म्हणजे तत्त्वमिमांसा, कला आणि सौंदर्याबद्दलच्या तत्त्वज्ञान विषयक प्रश्नांचा अभ्यास मुल्यमिमांसेत होतो तर ज्ञानाचे स्त्रोत आणि पद्धतीचा अभ्यास ज्ञानमिमांसेत केला जातो ज्यामध्ये प्रमा, प्रमाण आणि पद्धती यांचा समावेश होतो. 

प्रमा (युक्त ज्ञान):
न्याय दर्शनाच्या मते प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान होय. तसेच प्रमा जी वस्तू जशा प्रकारची असते त्याच रूपात ती समजणे म्हणजे प्रमा होय. जेव्हा सत्त्याचे यथार्थ ज्ञान होते तेव्हा त्यास प्रमा म्हणतात.
प्रमाण :
1. ज्ञानप्राप्तीचे मार्ग, पध्दती म्हणजे प्रमाण होय.
2. ज्ञानाची चिकित्सा म्हणजे प्रमाण होय.
3. ज्ञान यथार्थ असणे/ तपासणे म्हणजेच प्रमाण होय.
4. ज्याने ज्ञेय पदार्थांचे ज्ञान होते त्यास प्रमाण म्हणतात.
5. प्रमाण ज्ञान म्हणजे वस्तू स्वतः असते तशा तिच्या स्वरूपाचे ज्ञान होणे होय.

प्रमाणाचे स्वरूप –
सर्वच भारतीय दर्शनानी प्रमाण चिकित्सा ही फार मोलाची मानलेली आहे.
1. प्रत्यक्ष (क्वचित प्रत्यक्षाधारित अनुमान) हे एकच प्रमाण चार्वाकांनी स्वीकारले आहे.
2. बौध्द, जैन आणि वैषेशिक या दर्शनानी प्रत्यक्ष आणि अनुमान अशी दोन प्रमाणे स्वीकारलेली आहेत.
3. सांख्य, योग, माध्व व विशिष्टाव्दैती हे तिघेही प्रत्यक्ष, अनुमान व शब्द ही तीन प्रमाणे मानतात.
4. वरील तीन व शिवाय उपमान अशा चार प्रमाणांचा स्विकार न्यायदर्शनाने केलेला आहे.
5. वरील चार व शिवाय अर्थापत्ति हे पाचवे अशी पाच प्रमाणे प्रभाकर मीमांसक मानतात.
6. वरील पाच म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान व अर्थापत्ति आणि शिवाय अनुपलब्धि अशी सहा प्रमाणे भाट्ट मीमांसक आणि अव्दैतवेदांती यानी मानलेली आहेत. मात्र उपमान-प्रमाण याचा मीमांसकांनी केलेला अर्थ व नैययिकांनी केलेला अर्थ मात्र भिन्न आहे.

एकूण प्रमाणांचे सहा प्रकार भारतीय दर्शनांनमधून दिसून येतात.
1. प्रत्यक्षः चार्वाक, (केवळ प्रत्यक्ष)
2. अनुमानः बौध्द, जैन व वैशेषिक, (प्रत्यक्ष व अनुमान)
3. शब्द किंवा आप्तवचन: सांख्य, योग, माध्व व विशिष्टाव्दैती (वरील दोन व शब्द)
4. उपमानः न्याय दर्शन (वरील तीन व उपमान)
5. अर्थापत्तिः प्रभाकर मीमांसक (वरील चार व अर्थापत्ति)
6. अनुपलब्धिः भाट्ट मीमांसक व अव्दैतवेदांती (वरील सर्व)
     प्रत्येक प्रमाणाचे स्पष्टीकरण आपण पुढील लेखामधून पाहणार आहोत.

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...