रविवार, १२ एप्रिल, २०२०

अर्थापत्ति व अनुपलब्धि प्रमाण | Implication and Non-apprehension |

अर्थापत्ति व अनुपलब्धि प्रमाण | Implication and Non-apprehension
अर्थापत्ति:
पूर्व मीमांसक अर्थापत्तिहे ज्ञानाचे एक स्वतंत्र प्रमाण मानतात, कारण अर्थापत्तीने जे ज्ञान प्राप्त होते ते इतर कोणत्याही ज्ञान प्रमाणाने प्राप्त होत नाही म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द व अभाव या पाच प्रमाणांनी हे ज्ञान प्राप्त होत नाही ते ज्या प्रमाणाने प्राप्त होते त्यास अर्थापत्ति असे मीमांसक म्हणतात. अर्थापत्तीला Postulation, Presumption and Implication असे इंग्रजी शब्द वापरण्यात येतात.
उदा. देवदत्त नावाचा माणूस घरी नाही, म्हणून तो बाहेर कुठेतरी गेला असला पाहिजे. अर्थात देवदत्त हा जीवंत आहे हे त्यात गृहीत धरलेलेच असते. म्हणजे देवदत्त जिवंत असून आता घरी नाही. यावरुन तो बाहेर कोठेतरी गेला असला पाहिजे असे अनुमान काढणे बरोबर ठरते किंवा देवदत्त जिवंत असून बाहेर गेलेला नाही यावरुन तो घरातच असला पाहिजे असे अनुमान काढणे युक्त ठरेल. पण देवदत्त जिवंत नसलेच तर तो घरी किंवा घराबाहेर अन्यत्र कोठेतरी असण्याचा सुतरां संभव असणार नाही.
खरे पाहात अर्थापत्ति हा एक प्रकारचा अभ्युपगम असतो. आपल्यासमोर घडणाऱ्या घटनांचे तर्कशुध्द रीतीने स्पष्टीकरण करण्यासाठी अर्थापत्ति या ज्ञानप्रकाराचा चांगल्यारीतीने उपयोग होऊ शकतो. जेव्हा काही घटना वरकरनी परस्परांशी विसंगत दिसतात आणि त्यांच्यामध्ये संगती लावता येत नाही तेव्हा एखादा विकल्प किंवा पर्याय गृहीत धरुन परस्परविसंगत किंवा परस्परविरुध्द अशा पर्यायामध्ये संगती ज्याच्या सहाय्याने लावता येते अशा गृहीतकास किंवा पर्यायास अर्थापत्ति म्हणतात. अर्थापत्ति या शब्दाचा विग्रह ‘अर्थ + आपत्तिअसा केला जातो. अर्थ म्हणजे ‘वास्तव घटनाआणि ‘आपत्तिम्हणजे ‘स्पष्ट करण्यासाठी करावयाची कल्पनाम्हणजे जेव्हा एखादी घटना विशद करणे अवघड ठरते तेव्हा ती विशद करण्यासाठी एखादी कल्पना किंवा अभ्युपगम पर्याय म्हणून गृहीत धरावा लागतो, तेव्हा ती अर्थापत्तिबनते. वरील उदाहरणात देवदत्त जिवंत आहे (म्हणजे मृत नाही), शिवाय तो घरातही नाही या परस्परांशी विसंगत असणाऱ्या घटनांमध्ये संगती लावण्यासाठी व समन्वय घडवून आणण्यासाठी तो बाहेर गेला असला पाहिजे असे समजणे योग्य व सहाय्यक ठरते.
अनुपलब्धि:
पूर्व मीमांसक अनुपलब्धिहे ज्ञानाचे स्वतंत्र प्रमाण मानतात. अनुपलब्धीसाठी इंग्रजीत Apprehension, Non-perception असे अनेक पर्यायी शब्द वापरलेले आहेत. ज्याच्या अस्तित्वाच्या ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानाची पहिली पाच प्रमाणे लागू पडत नाहीत व उपयोगी ठरत नाहीत अशाचे ज्ञान अभावाने होते असे मीमांसक मानतात. कुमारिल अनुपलब्धि हे ज्ञानाचे स्वतंत्र व सहावे प्रमाण आहे असे मानतो. नैयायीक व प्रभाकर मात्र अभाव हे ज्ञानाचे स्वतंत्र प्रमाण मानीत नाहीत. वैशैषिक अभाव हा एक स्वतंत्र पदार्थ मानतात. पण त्यास ज्ञान-प्रमाण मात्र समजत नाहीत. अनुपलब्धियाचा अर्थ आधीच्या पाच प्रमाणांच्या सहाय्याने मिळणाऱ्या ज्ञानाचा अभाव असा आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान व अर्थापत्ति यांच्याव्दारा जे ज्ञान मिळते ते भावरुप वस्तूंचे असते; असे ज्यांचे ज्ञान नसते ते इतर सर्व परिस्थिती न बदलता जर तशीच कायम राहिली तर अभाव दर्शविण्यासाठी त्या वस्तूचे अस्तित्व मात्र असता कामा नये. कुमारिलाच्या मते अभाव हा त्याच्या प्रतियोगिच्या प्रत्यक्ष दिसण्याने किंवा अनुमानाने समजतो. जे ज्ञानेंद्रिये एखादी वस्तू पाहते तेच त्याचा अभावही पाहते, आणि जे अनुमान एखाद्या वस्तूचे अस्तित्व जाणते ते त्याचा अभावही जाणते. म्हणून न्याय-वैशेषिकाच्या मते ‘अभावहा जरी स्वतंत्र पदार्थ असला तरी तो जाणण्यासाठी अभाव किंवा अनुपलब्धि नावाच्या स्वतंत्र ज्ञानप्रमाणाची आवश्यकता राहत नाही. न्याय अनुपलब्धीचे रुपांतर प्रत्यक्षात किंवा अनुमानात करते.
कुमारिल म्हणतो की, अभाव उदा. घटाचा अभाव हे ज्ञानेद्रिंयाला प्रतीत होत नाही, कारण ज्ञानेंद्रियाचा म्हणजे चक्षूचा ज्याच्याशी संबंध यावा असे तेथे काही नसतेच. काही लोक अभाव हा अनुमानाने जाणाला जातो असे मानतात. जेथे जेथे दृश्य वस्तू असते तेथे तेथे ती डोळयांना दिसते. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी डोळयांना काही दिसत नाही तेव्हा तेथे त्याचा अभाव जाणवतो/ कळतो. पण असे म्हणतात दृष्टीचा अभाव, अस्तित्वाचा अभाव हे गृहित धरलेले असतात. पण दृष्टीचा अभाव आणि वस्तूचा अस्तित्वाचा अभाव कसा समजू शकेल? अभाव जाणण्यासाठी वेगळेच ज्ञान प्रमाण असले पाहिजे असे यासाठी मानले जाते.
उदा:  घटाभाव व डोक्यावर टोपीचा अभाव इत्यादी.
प्रत्येक दर्शनशास्त्राची स्वतःची अशी वेगळी तत्त्वे आणि ध्येये असतात त्यानुसार त्या तत्त्वांचा विचार आणि पूर्तीसाठी प्रमाणशास्त्राची आवश्यकता असते. यातूनच प्रत्येक दर्शनशास्त्रांनी आपल्या तात्त्विक उद्दिष्टानुसार ज्ञानमिमांसा अवलंबिली आहे. ज्ञानमिमांसेविषयी शोध घेण्याची जागा म्हणजे तत्त्वमीमांसा आणि तत्त्वमीमांसेच्या तपासणीसाठी ज्ञानमीमांसा काम करते. हे दोन्ही परस्परावलंबी आहेत.

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन

जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...