अनुभववाद: ज्ञानप्राप्तीचा
अनुभवाधारित पाया | Empiricism
मानवजातीच्या
उत्क्रांतीमध्ये ज्ञान हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण ज्ञानामुळेच मानवाने साधनांची निर्मिती, सामाजिक
रचना, विज्ञान, आणि कला या सर्व
क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. परंतु ज्ञानाची निर्मिती कशी होते, याविषयी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अनेक विचारधारा मांडल्या गेल्या आहेत.
या विचारधारांपैकी अनुभववाद (Empiricism) ही एक प्रभावी व
महत्त्वाची विचारधारा मानली जाते. अनुभववादानुसार, ज्ञानाचे
मूळ स्रोत हे अनुभव, निरीक्षण, आणि
इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारी माहिती आहेत (Audi, 2011).
या दृष्टिकोनात प्रत्यक्ष अनुभवावर, निरीक्षणावर आणि
वेदनांवर (sensations) भर दिला जातो. त्यामुळेच अनुभववाद
आधुनिक विज्ञान, प्रयोगशील शिक्षण आणि संशोधन पद्धतींचा पाया
मानला जातो.
अनुभववाद
म्हणजे काय?
अनुभववाद
हा ज्ञानमीमांसेतील (Epistemology) एक
मूलभूत प्रवाह आहे, जो असा दावा करतो की सर्व किंवा बहुतेक
ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. या दृष्टिकोनानुसार माणूस जन्मतः
कोणतेही ज्ञान घेऊन येत नाही, तर त्याचे मन हे एक रिकामी
पाटी (Tabula Rasa) असते, ज्यावर
जीवनातील अनुभवांनी ज्ञानाचे अक्षर उमटते (Locke, 1690). या
अनुभवांची निर्मिती मुख्यतः दृश्य, श्राव्य, स्पर्श, स्वाद आणि वास यापाच इंद्रियांच्या
कार्यामुळे होते.
जॉन
लॉक, जॉर्ज बर्कले आणि डेव्हिड ह्यूम यांसारख्या तत्त्ववेत्त्यांनी
अनुभववादाच्या सिद्धांताला महत्त्वपूर्ण स्वरूप दिले. जॉन लॉकच्या मते, ज्ञानाची सुरुवात वेदना म्हणजे बाह्य जगातील संवेदनांमधून आणि रिफ्लेक्शन म्हणजे
स्वतःच्या विचारांवर मनन करण्यामधून होते (Locke, 1690).
अनुभववाद हा बुद्धिप्रामाण्यवाद (Rationalism) या
विचारधारेच्या विरोधात उभा आहे, कारण बुद्धिप्रामाण्यवाद
जन्मजात ज्ञानाच्या अस्तित्वावर भर देतो, तर अनुभववाद तो
नाकारतो.
अनुभववादाची प्रमुख वैशिष्ट्ये
1. ज्ञान हे अनुभवातूनच येते
अनुभववादाचा मूलभूत दावा असा आहे की
ज्ञानाची सुरुवात ही अनुभवांपासून होते आणि त्या अनुभवांचे प्राथमिक स्रोत आपली
इंद्रिये आहेत (Locke, 1690). दृश्य (Sight),
श्राव्य (Hearing), स्पर्श (Touch),
स्वाद (Taste)
आणि वास (Smell)
या पाच
इंद्रियांद्वारे आपण बाह्य जगाशी संपर्क साधतो आणि त्यातून माहिती गोळा करतो.
उदाहरणार्थ, एखाद्या फळाचा रंग आपण पाहून (दृश्य), त्याचा सुगंध
घेऊन (वास), चव घेऊन (स्वाद) आणि स्पर्श करून त्याची ओळख
पटवतो. अनुभववादानुसार, या इंद्रियानुभवाशिवाय आपल्याकडे
कोणत्याही प्रकारचे ज्ञान विकसित होऊ शकत नाही. डेव्हिड ह्यूम (Hume,
1748) यांनी
याच विचाराला पुढे नेऊन असे मांडले की आपले सर्व विचार (ideas)
हे
इंद्रियांच्या तात्काळ प्रभावांवर (impressions) आधारित असतात.
2. मन हे ‘रिकामी पाटी’ (Tabula
Rasa)
जॉन लॉक यांनी An
Essay Concerning Human Understanding (1690) या ग्रंथात असा युक्तिवाद केला की मानवी
मन हे जन्मतः पूर्णतः रिकामे असते, जणू कोऱ्या कागदासारखे. त्यांनी याला Tabula
Rasa असे
संबोधले. या रिकाम्या पाटीवर आयुष्यभर मिळणारे अनुभव, निरीक्षणे आणि
विचार हे सतत लिहिले जातात, ज्यामुळे आपली समज व ज्ञान आकार
घेतात. या दृष्टिकोनानुसार, कोणतेही जन्मजात (innate)
विचार, संकल्पना किंवा
तत्त्वे नसतात; सर्व काही अनुभवांद्वारेच प्राप्त होते. या
मतामुळे अनुभववादाने बुद्धीप्रामाण्यवादी संकल्पनांना थेट आव्हान दिले, जिथे माणसाकडे
काही प्रमाणात जन्मजात ज्ञान असल्याचे मानले जाते (Leibniz, 1704).
3. प्रयोग आणि
निरीक्षणाला महत्त्व
अनुभववाद हा विज्ञानाच्या पद्धतीशी घनिष्ठपणे जोडलेला आहे, कारण तो
ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेत प्रयोग आणि निरीक्षण यांना केंद्रस्थानी ठेवतो. वैज्ञानिक संशोधनात एखादा दावा किंवा
सिद्धांत फक्त तर्कावर नव्हे तर प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित असावा, हीच अनुभववादी
धारणा आहे (Francis Bacon, 1620). उदाहरणार्थ, एखादे औषध
कार्यक्षम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी केवळ सैद्धांतिक विचार पुरेसे नसतात; त्यासाठी
नियंत्रित प्रयोग, पुनरावृत्ती (Replication),
आणि परिणामांचे
निरीक्षण आवश्यक असते. अशा प्रकारे, अनुभववाद
ज्ञानाच्या सत्यतेसाठी अनुभवजन्य चाचणी हा अपरिहार्य
टप्पा मानतो.
४. वेदनात्मक (संवेदनात्मक) ज्ञानाचे महत्त्व
अनुभववाद हे बुद्धिप्रामाण्यवादाच्या विरोधात उभे राहते. बुद्धिप्रामाण्यवादानुसार काही
संकल्पना आणि सत्ये माणसाला जन्मतःच ज्ञात असतात, तर अनुभववाद ही
कल्पना नाकारतो आणि असे म्हणतो की इंद्रियांद्वारे मिळालेल्या वेदनात्मक (sensory)
अनुभवाशिवाय
ज्ञान शक्य नाही. जॉर्ज बर्कले यांनी तर वस्तूंचे अस्तित्वही केवळ त्यांना आपण
जाणतो म्हणूनच मान्य केले, "Esse est
percipi" (अस्तित्व म्हणजे जाणले जाणे). या दृष्टिकोनात वेदनात्मक माहितीला
प्राथमिक आणि मूलभूत भूमिका दिली जाते, तर तर्काला (Reason)
केवळ त्या
अनुभवांचे विश्लेषण करण्याचे साधन मानले जाते.
अनुभववादाचे प्रमुख पाश्चात्य
तत्त्वज्ञ
1. जॉन लॉक (John Locke)
जॉन लॉक (1632–1704) हा
अनुभववादाच्या विकासातील एक प्रमुख इंग्रजी तत्त्वज्ञ मानला जातो. त्याने आपल्या An
Essay Concerning Human Understanding (1690) या ग्रंथात Tabula
Rasa ही
संकल्पना मांडली (Locke, 1690). या संकल्पनेनुसार, मानवी मन
जन्मतः रिकाम्या पाटीप्रमाणे (blank slate) असते आणि सर्व ज्ञान हे अनुभवातूनच
तयार होते. लॉकच्या मते, मनुष्याला ज्ञान मिळवण्यासाठी
कोणतेही जन्मजात विचार नसतात. त्याने अनुभवाचे दोन प्रमुख
प्रकार सांगितले:
- वेदन (Sensation) – बाह्य जगातील गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी पाच इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारी माहिती, जसे की रंग, आवाज, वास, चव, व स्पर्श.
- प्रतिबिंब (Reflection) – मनाच्या अंतर्गत कार्यांचा अनुभव, जसे की विचार, शंका, विश्वास, इच्छा इत्यादी.
लॉकच्या मते, या दोन
अनुभवांच्या एकत्रीकरणातून सर्व कल्पना आणि संकल्पना
निर्माण होतात. त्यामुळे तो बुद्धिप्रामाण्यवादातील जन्मजात
ज्ञानाच्या संकल्पनेला नाकारतो आणि ज्ञानाच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष अनुभवाला
सर्वोच्च स्थान देतो.
2. जॉर्ज बर्कले (George
Berkeley)
जॉर्ज बर्कले (1685–1753) हा आयरिश
तत्त्वज्ञ अनुभववादाचा पुढचा महत्त्वाचा विचारवंत मानला जातो. त्याने आपल्या A
Treatise Concerning the Principles of Human Knowledge (1710) या ग्रंथात अस्तित्व म्हणजे
जाणले जाणे (Esse est percipi) ही संकल्पना मांडली. त्याच्या मते, वस्तूंचे
अस्तित्व हे केवळ आपल्या वेदनात्मक अनुभवावर अवलंबून असते. म्हणजेच, जर कोणती वस्तू
कोणाच्याही अनुभवात आली नाही, तर तिचे अस्तित्वही नसते.
बर्कलेने भौतिक पदार्थ (material
substance) या संकल्पनेला नाकारले आणि म्हटले की आपण प्रत्यक्ष अनुभव घेत असलेली
दुनिया ही आपल्या मनातील संकल्पना व प्रतिमा यांचे एकत्रीकरण आहे. त्याच्या मते, निसर्ग हा सर्व
अनुभवांचा अंतिम साक्षीदार असून, आपण न पाहिलेल्या किंवा न अनुभवल्या
जाणाऱ्या वस्तूंचे अस्तित्व टिकवून ठेवतो. बर्कलेचा हा दृष्टिकोन आदर्शवाद (Idealism)
आणि अनुभववाद
यांचा संगम दर्शवतो.
3. डेव्हिड ह्यूम
(David Hume)
डेव्हिड ह्यूम (1711–1776) हा
स्कॉटिश तत्त्वज्ञ आणि अत्यंत संशयवादी-अनुभववादी मानला जातो. त्याच्या An
Enquiry Concerning Human Understanding (1748) या ग्रंथात, ह्यूमने सर्व
ज्ञानाच्या मूळात अनुभवातून आलेल्या ‘Impressions’ (प्रत्यक्ष
संवेदन अनुभव) आणि त्यांच्यावर आधारित ‘Ideas’ (मनातील प्रतिमा
किंवा कल्पना) असतात, असे सांगितले. ‘Impressions’
म्हणजे थेट आणि
तीव्र वेदन अनुभव (जसे लाल रंग पाहणे, उष्णतेची जाणीव
होणे), तर ‘Ideas’ म्हणजे या अनुभवांचे स्मरण किंवा
मानसिक पुनर्रचना.
ह्यूमने कारण-परिणाम (Cause
and Effect) संबंधाबाबत संशय व्यक्त केला. त्याच्या मते, आपण वस्तूंमधील
कारणसंबंध ‘पाहत’ नाही, तर फक्त घटनांची सातत्याने
पुनरावृत्ती होताना पाहतो आणि त्यातून सवयीने कारणाचा निष्कर्ष काढतो. त्यामुळे
कारण आणि परिणाम यांच्यात कोणताही आवश्यक तात्त्विक संबंध नसतो – तो केवळ मानवी
सवयीचा परिणाम असतो. ह्यूमच्या या विचारांनी नंतरच्या संशयवाद (Skepticism)
आणि
विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावर मोठा प्रभाव टाकला.
अनुभववादाचे प्रमुख पूर्वेकडील
तत्त्वज्ञान
1. चार्वाक (लोकायत)
भारतीय तत्त्वज्ञानातील चार्वाक
किंवा लोकायत हे सर्वाधिक ठळक अनुभववादी तत्त्वज्ञान मानले जाते. चार्वाक
तत्त्वज्ञानानुसार, ज्ञानाचा एकमेव विश्वसनीय स्रोत
म्हणजे प्रत्यक्ष अनुभव (प्रत्यक्षप्रमाण) आणि इंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त
झालेली माहिती (Bhattacharya, 2011). त्यांनी अनुमान (Inference),
उपमान (Analogy)
किंवा
शब्दप्रमाण (Verbal testimony) यांना अविश्वसनीय मानले, कारण हे सर्व
थेट अनुभवावर आधारित नसतात आणि चुकीच्या निष्कर्षांना कारणीभूत ठरू शकतात.
चार्वाक विचारसरणी भौतिकवादी होती. त्यांनी इहवादी दृष्टिकोन मांडला म्हणजेच, इहलोकातील सुख
आणि दुःख हेच सत्य आहेत, परलोक किंवा आत्मा यांचे अस्तित्व
नाही. "यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हे वचन
त्यांच्या भोगवादी दृष्टिकोनाचे प्रतीक आहे (Radhakrishnan, 1929). यामध्ये
ते स्पष्टपणे सांगतात की, जीवनाचा आनंद घ्या, कारण
मृत्यूनंतर काहीच अस्तित्वात राहात नाही.
बुद्धांच्या समकालीन अजित केशकंबलि (लोकायतवादी) हे देखील स्पष्ट अनुभववादी व भौतिकवादी विचारवंत होते. त्यांनी आत्मा, परलोक आणि कर्मफल नाकारले आणि केवळ दृश्य, प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या जगालाच सत्य मानले (Dutt, 1962).
2. गौतम बुद्ध
गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे देखील
अनुभववादी स्वरूपाचे होते, परंतु ते चार्वाकांच्या भोगवादी
दृष्टिकोनापेक्षा भिन्न होते. बुद्धांनी प्रत्यक्ष अनुभव आणि वैयक्तिक तपासणी (personal
verification) यांना ज्ञानाचा मुख्य स्रोत मानले (Rahula, 1974). त्यांनी "एतं मम, एसोऽहमस्मि, एसो मे
आत्मा" अशा स्वरूपाच्या आत्मसत्तावादी संकल्पनांना नाकारले आणि अनात्मवाद व क्षणिकवाद या अनुभवातून सिद्ध होणाऱ्या
संकल्पना मांडल्या.
बुद्धांनी कलाम सूत्र (Kalama
Sutta, Aṅguttara Nikāya 3.65) मध्ये स्पष्टपणे सांगितले की,
"केवळ
परंपरा, केवळ गुरुचे वचन किंवा केवळ ग्रंथ यांवर विश्वास ठेवू नका; प्रत्यक्ष
अनुभव आणि विवेकावर आधारित करूनच सत्य स्वीकारा." हे विधान अनुभववादाच्या मूळ
गाभ्याशी सुसंगत आहे.
अभिधम्म तत्त्वज्ञ, विशेषतः थेरवाद
आणि योगाचार परंपरेतील विद्वान, अनुभवावर आधारित मानसिक घटकांचे (citta
आणि cetasika)
विश्लेषण
करतात. ते ध्यान, अंतर्मुख निरीक्षण आणि थेट अनुभव यांद्वारे मानसिक व भौतिक घटनांचे वर्गीकरण करतात.
3. भगवान महावीर
जैन तत्त्वज्ञान जरी अध्यात्मिक आणि
मुक्तीच्या ध्येयावर आधारित असले, तरी भगवान महावीर यांच्या
विचारांमध्ये अनुभववादाचा स्पष्ट अंश दिसतो. जैन तत्त्वज्ञानानुसार, ज्ञानाचे
प्रमुख तीन स्रोत आहेत – प्रत्यक्ष , अनुमान आणि आगम (Jaini, 1979). यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाला
सर्वोच्च स्थान आहे.
महावीरांनी अनेकान्तवाद आणि स्याद्वाद या
सिद्धांतांच्या माध्यमातून सत्याचा अनुभव विविध दृष्टीकोनातून घेण्याची गरज
सांगितली. हे दृष्टिकोन प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारलेले आहेत, कारण
महावीरांनी मानले की कोणतेही एकांगी दृष्टिकोन संपूर्ण सत्य उलगडू शकत नाही (Matilal,
1981).
त्यामुळे जैन तत्त्वज्ञानात अनुभववाद फक्त इंद्रियानुभवापुरता मर्यादित नसून, तो तर्कसंगत
विश्लेषण आणि विविध दृष्टिकोनांच्या अनुभवजन्य पडताळणीशी जोडलेला आहे.
4. न्याय-वैशेषिक
परंपरा
न्याय तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन्ही ज्ञानप्रमाणांना मान्यता
देते, परंतु प्रत्यक्षाला प्राथमिक स्थान देते. गौतम ऋषी यांच्या न्याय
सूत्रांमध्ये इंद्रिय व विषयांचा प्रत्यक्ष संपर्क हा ज्ञानाचा मूलस्त्रोत
असल्याचे सांगितले आहे (Chakrabarti, 1995).
या सर्व विचारसरणी एकत्रितपणे हे
दर्शवतात की, पूर्वेकडील परंपरेत अनुभववाद फक्त भौतिक
निरीक्षणापुरता मर्यादित नसून, तो नैतिकता, आध्यात्मिक
साधना, आणि बहुविध दृष्टिकोनांच्या अनुभवजन्य पडताळणीशी खोलवर जोडलेला आहे.
अनुभववादाचे शैक्षणिक व वैज्ञानिक
महत्त्व
अनुभववादाचा शैक्षणिक व
वैज्ञानिक क्षेत्रांवर खोलवर प्रभाव आहे, कारण तो
ज्ञानप्राप्तीचा पाया अनुभव व निरीक्षणात शोधतो. यामुळे शिक्षण, संशोधन आणि
मानसशास्त्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये अनुभववादी दृष्टिकोनाची मोलाची भर पडली आहे.
1. शिक्षणक्षेत्रात उपयोग
अनुभववादाच्या प्रभावामुळे
शिक्षणपद्धती केवळ पाठांतरावर आधारित न राहता अनुभवाधारित आणि
कृती-आधारित झाली. जॉन ड्यूई (John Dewey) याने प्रतिपादित केले की शिक्षण ही
"जीवनाची तयारी" नसून "स्वतः जीवनाचा भाग" आहे. त्यामुळे
शाळा-कॉलेजमध्ये प्रयोगशाळा कार्य, प्रकल्पाधारित
शिक्षण, फील्ड वर्क, आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित उपक्रम
यांना महत्त्व मिळाले. उदाहरणार्थ, विज्ञान विषय
शिकवताना केवळ सिद्धांत न शिकवता प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग
करण्याची संधी देणे ही अनुभववाद प्रेरित पद्धत आहे. Piaget
(1970)
च्या मते, विद्यार्थ्यांचा बोधात्मक विकास सक्रिय शोध व अनुभवातूनच होतो, त्यामुळे
शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये शोधमूलक व संवादात्मक उपक्रमांचा समावेश करण्याची
प्रवृत्ती वाढली.
2. वैज्ञानिक संशोधन
अनुभववादामुळे वैज्ञानिक संशोधनात
निरीक्षण, प्रयोग आणि प्रत्यक्ष चाचणी यांना महत्त्व प्राप्त झाले. वैज्ञानिक पद्धतीचा मूळ पाया हा
अनुभववादातच आहे, कोणत्याही सिद्धांताची सत्यता प्रत्यक्ष अनुभव व डेटा यावर
आधारित ठरवली जाते. उदाहरणार्थ, खगोलशास्त्रात आकाशीय घटनांचे
दीर्घकालीन निरीक्षण, भौतिकशास्त्रात नियंत्रित प्रयोग, किंवा
मानसशास्त्रात प्रायोगिक गट व नियंत्रक गटांचा वापर ही सर्व अनुभववादी
दृष्टिकोनाची फळे आहेत. ह्यूमच्या "Cause and
Effect" विचारसरणीने वैज्ञानिकांना निष्कर्ष काढताना केवळ तर्कावर नव्हे, तर अनुभवावर
आधारित पुरावे आवश्यक असल्याची जाणीव दिली.
3. बालमानसशास्त्रात उपयोग
बालमानसशास्त्रात अनुभववादाने
क्रांतिकारी बदल घडवून आणले. Jean Piaget (1970) च्या बोधात्मक विकास
सिद्धांतानुसार, मुलांचे ज्ञान हे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर
आधारित विकसित होते. लहान मुले वस्तूंशी संपर्क, खेळ, प्रयोग आणि
निरीक्षण यातून संकल्पना तयार करतात. John Dewey (1938) च्या
"Learning by Doing" या तत्त्वामुळे बाल्य शिक्षणात अनुभवाधारित उपक्रमांना
प्रोत्साहन मिळाले. उदा., गणितातील आकडेवारी शिकवण्यासाठी
खेळणी वापरणे किंवा विज्ञानातील धडे शिकवण्यासाठी बाह्य प्रयोग दाखवणे. यामुळे
विद्यार्थ्यांचा सहभाग, जिज्ञासा आणि टिकाऊ ज्ञानवृद्धी
वाढली.
अनुभववादावरील टीका
जरी अनुभववादाने शैक्षणिक व
वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असले, तरी त्याच्या
काही मर्यादा व त्रुटी आहेत, ज्यावर तत्त्वज्ञ व
मानसशास्त्रज्ञांनी टीका केली आहे.
- जन्मजात ज्ञान नाकारणे: अनुभववादाच्या मते, माणूस जन्मतः काहीही ज्ञान घेऊन येत नाही, हे विधान बुद्धिप्रामाण्यवाद्यांना आव्हान होते. रेने देकार्त (1641) सारख्या तत्त्वज्ञांच्या मते, काही ज्ञान व संकल्पना जन्मजात असतात, उदा. गणितातील तत्त्वे, तर्कशास्त्रीय क्षमता. अनुभववाद हा बुद्धीचे कार्य व तार्किक विचार यांच्या भूमिकेला कमी लेखतो.
- अपूर्ण ज्ञान: केवळ इंद्रियांच्या अनुभवांवर अवलंबून राहिल्यास ज्ञान भ्रमित करणारे ठरू शकते. उदाहरणार्थ, वाळवंटातील मृगजळ किंवा पाण्यात वाकलेली काठी दिसणे ही इंद्रियांची भ्रामक अनुभूती आहे. अनुभववादात अशा भ्रमांवर उपाययोजना करण्याची पद्धत मर्यादित आहे, कारण तो तर्कावर कमी भर देतो.
- सामान्यीकरणाची मर्यादा: अनुभव हे वैयक्तिक असतात आणि व्यक्तिनुसार बदलतात. त्यामुळे एकाच अनुभवावरून सर्वसामान्य सिद्धांत मांडणे कठीण होते. उदाहरणार्थ, एखाद्या औषधाचा परिणाम काही रुग्णांवर होतो, तर काहींवर होत नाही, यावरून सार्वत्रिक निष्कर्ष काढणे धोकादायक ठरू शकते. या मर्यादेमुळे वैज्ञानिक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती व नियंत्रित प्रयोगांची गरज भासते.
समारोप:
अनुभववादाने मानवाच्या ज्ञानप्राप्ती
प्रक्रियेत इंद्रिय, अनुभव, आणि निरीक्षण
यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आजचे वैज्ञानिक युग अनुभववादी दृष्टिकोनावरच
आधारित आहे. जरी अनुभववादाला काही मर्यादा असल्या, तरीही तो मानवी
बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. अनुभव व
निरीक्षणावर आधारित शिक्षणपद्धती आणि संशोधनपद्धती आजच्या आधुनिक समाजाच्या
आधारस्तंभ आहेत.
![]() |
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Audi,
R. (2011). Epistemology: A Contemporary Introduction to
the Theory of Knowledge (3rd ed.). Routledge.
Bacon,
F. (1620). Novum Organum.
Berkeley,
G. (1710). A Treatise Concerning the Principles of Human
Knowledge. Dublin: Jeremy Pepyat.
Bhattacharya,
R. (2011). Studies on the Cārvāka/Lokāyata. Anthem Press.
Dewey,
J. (1938). Experience and Education. New York: Macmillan.
Dutt,
N. (1962). Early Buddhist Monachism. Asian Publishing House.
Hume,
D. (1748). An Enquiry Concerning Human Understanding.
London: A. Millar.
Jaini,
P. S. (1979). The Jaina Path of Purification. University of California Press.
Leibniz,
G. W. (1704). Nouveaux Essais sur l'entendement humain.
Locke,
J. (1690). An Essay Concerning Human Understanding.
London: Thomas Basset.
Matilal,
B. K. (1981). The Central Philosophy of Jainism (Anekānta-vāda). L.D. Institute
of Indology.
Piaget,
J. (1970). Science of Education and the Psychology of the
Child.
Radhakrishnan,
S. (1929). Indian Philosophy (Vol. 1). George Allen & Unwin.
Rahula,
W. (1974). What the Buddha Taught. Grove Press.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions