लहान मुलांना मोबाईलपासून लांब कसे
ठेवावे?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा
आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलेही मोबाईलच्या
आहारी जात आहेत. शिक्षण, करमणूक, संवाद या सर्व
गोष्टी मोबाईलद्वारे होत असल्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे पालकांसाठी आज
एक मोठे आव्हान बनले आहे. सतत मोबाईल वापरामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर, आरोग्यावर, भावनिक
समतोलावर आणि सामाजिक वर्तनावरही नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. म्हणूनच, पालकांनी योग्य
पद्धतीने आणि संयमाने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक
आहे.
स्वतः
आदर्श वस्तुपाठ घालून देणे
पालक
हे मुलांचे पहिले आणि सर्वांत प्रभावी शिक्षक असतात. बालमानसशास्त्रातील
संशोधनानुसार, लहान मुलं ही निरीक्षणाद्वारे
शिकतात. अल्बर्ट बांड्युराच्या Social Learning Theory नुसार, मुले त्यांच्या आजूबाजूच्यांना पाहून वर्तन
आत्मसात करतात. त्यामुळे जर पालक सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, तर त्यांची मुलेही मोबाईलचा अतिरेकी वापर करायला लागतात. किशोरावस्थेपर्यंत
मुले बिघडण्यात आणि सुधारण्यात बहुतांश प्रमाणात पालकच जबाबदार असतात.
उदाहरणार्थ, जर वडील जेवताना मोबाईल वापरत असतील तर मूलही तेच करू लागते. हा Modelling
behavior चा प्रकार असून मुलं हळूहळू त्या वर्तनाला ‘नियमित’
किंवा ‘स्वाभाविक’ मानू लागतात. म्हणूनच, पालकांनी सर्वप्रथम
स्वतःच्या मोबाईल वापराच्या सवयी तपासाव्यात. मोबाईलचा वापर आवश्यक मर्यादित
ठिकाणी, विशिष्ट वेळेत आणि स्पष्ट हेतूसह करावा. कुटुंबाच्या
एकत्रित वेळेत, जेवणाच्या वेळी किंवा झोपण्याआधी मोबाईल न
वापरण्याचे आदर्श उदाहरण पालकांनी घालून दिल्यास, त्याचा
सकारात्मक प्रभाव मुलांवर निश्चितच पडतो.
याशिवाय, एका अभ्यासात (Radesky, et al., 2015) असे आढळले की जे पालक सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात, ते मुलांशी कमी संवाद साधतात, त्यामुळे मुलांच्या
भावनिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मोबाईलचे अंधाधुंद वापर टाळून,
मुलांसमवेत संवाद साधण्यावर भर द्यावा.
मोबाईलच्या
वापरासाठी नियम ठरवा
लहान
वयातील मुलांना स्वयंशिस्तीचे शिक्षण देण्यासाठी, विशिष्ट नियम आणि वेळा ठरवणे अत्यंत आवश्यक असते. मोबाईलच्या बाबतीतही हे
तंतोतंत लागू होते. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) नुसार,
2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन
टाईम टाळावा, आणि तोही गुणवत्तापूर्ण, पालकांच्या
मार्गदर्शनात असावा (AAP, 2016).
त्यानुसार, मोबाईलचा वापर शैक्षणिक किंवा अत्यावश्यक कारणासाठीच करण्याचे नियम
पालकांनी घालावेत. उदाहरणार्थ, शैक्षणिक व्हिडीओ, भाषाशिकवणारे अॅप्स, किंवा वाचनविषयक साधने, हीच
त्यांच्यासाठी वापरण्याची कारणे असावीत. गेम्स, सोशल मीडिया
किंवा मनोरंजनासाठी मोबाईलचा नियमित वापर बालवयातील मेंदूच्या विकासावर प्रतिकूल
परिणाम करतो (Christakis, 2009).
तसेच, भोजनाच्या वेळी, झोपेच्या अगोदर आणि कुटुंबासोबत
असताना मोबाईल पूर्णपणे दूर ठेवावा. कारण ही वेळ मुलांच्या सामाजिक आणि भावनिक बंध
वाढवण्याची संधी असते. एका अभ्यासात (Lauricella, et al., 2015) दिसून आले की जेव्हा पालक आणि मुले भोजनवेळी मोबाईल वापरतात,
तेव्हा परस्पर संवाद लक्षणीयरीत्या कमी होतो. अशावेळी मुलांच्या
भाषा-विकासावरही परिणाम होतो.
अशा
नियमांची अंमलबजावणी करताना पालकांनी कठोर किंवा हुकूमशाही भूमिका घेण्याऐवजी, समजावून सांगणारी आणि समतोल साधणारी भूमिका घ्यावी. उदाहरणार्थ, नियम ठरवताना मुलांशी चर्चा करणे, त्यांचा सहभाग
घेणे हे त्या नियमांची अंमलबजावणी सोपी करते.
पर्यायी आणि रंजक उपक्रम
मोबाईलचा पर्याय शोधताना सर्वात
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या वयाला, जिज्ञासेला आणि
आवडी-निवडीला साजेसे पर्यायी उपक्रम निवडणे. बालमानसशास्त्रानुसार, मुलांच्या
मेंदूचा विकास आणि त्यांचे लक्ष केंद्रीकरण विविध क्रिएटिव्ह, संवेदनात्मक व
अनुभवात्मक उपक्रमातून अधिक परिणामकारकपणे घडतो. या दृष्टीने चित्रकला, हस्तकला, मातीचे खेळ, वाचन, संगीत, नृत्य, कविता, आणि निसर्गभेटी
यांसारखे उपक्रम फारच प्रभावी ठरतात.
उदाहरणार्थ, चित्रकला किंवा
हस्तकला केवळ त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देत नाही, तर सूक्ष्म
हालचाली (fine motor skills) विकसनातही मदत करतात. वाचनाचा सराव
मुलांमध्ये कल्पनाशक्ती, भाषिक कौशल्ये आणि सहानुभूती निर्माण
करतो. National Literacy Trust (UK) च्या 2021 च्या अहवालानुसार, नियमित वाचन
करणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रता अधिक आणि डिजिटल मीडियावर अवलंबित्व कमी असते.
तसेच, मुलांना कथा
सांगणे, पझल्स सोडवणे, फॅमिली बोर्ड गेम्स, किंवा बुक
रीडिंग यासारख्या गोष्टीत पालकांनी वेळ द्यावा, यामुळे पालक-पाल्य संबंध दृढ होते
आणि मुलांना मोबाईलऐवजी मानवी संवादाकडे ओढ वाटते. Harvard
University’s Center on the Developing Child ने नमूद केले
आहे की, पालकांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवल्याने मुलांमध्ये सुरक्षिततेची
भावना निर्माण होते आणि ती स्क्रीनच्या मागे लपण्याऐवजी संवाद साधू लागतात.
निसर्गभेटी हे देखील एक उत्तम पर्याय
आहे. मुलांना जवळच्या बागेत नेणे, झाडे, फुले ओळखणे, पक्ष्यांचे
निरीक्षण करणे हे सर्व उपक्रम त्यांची संवेदनशीलता आणि जागरुकता वाढवतात. हे
उपक्रम त्यांना वास्तविक जीवनातील गोष्टीशी जोडतात आणि आभासी जगात अडकू देत नाहीत.
Louv (2005) यांच्या “Last Child in the Woods” या पुस्तकात
निसर्गापासून विभक्त झालेल्या पिढीमध्ये भावनिक आणि शारीरिक अडचणी अधिक आढळतात, असा इशारा दिला
आहे.
सामाजिक संवाद वाढवा
लहान मुलांच्या विकासात सामाजिक
संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. Lev Vygotsky (1978) याच्या
सामाजिक विकास सिद्धांतानुसार, मुलांचे बोधनिक व भावनिक विकास हा
सामाजिक परस्परसंवादातूनच होत असतो. मोबाईल हे संवादाला आडवे जाणारे माध्यम ठरते, कारण ते एकाकी
आणि यांत्रिक संवाद निर्माण करते. त्यामुळे मुलांनी शेजारी, नातेवाईक, शाळेतील मित्र, खेळातील संवगडी
यांच्यासोबत अधिक वेळ घालवावा.
मुलांना सामाजिक परस्परसंवादासाठी
प्रोत्साहित करताना त्यांना खेळाच्या माध्यमातून संवाद साधायला शिकवणे उपयोगी
ठरते. मैदानी खेळ, समूह खेळ (उदा. कबड्डी, लंगडी, खो-खो), किंवा सांघिक कार्य हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त नसून, टीमवर्क, नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य, समस्या
सोडवण्याचे कौशल्य, आणि भावनिक समतोल यांचे शिक्षणही
देतात. AAP च्या 2013 च्या अहवालानुसार, मैदानी खेळात
सहभाग असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो आणि सोशल मीडिया किंवा
गेमिंगच्या आहारी गेलेली मुले जास्त एकाकीपण अनुभवतात.
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं
असेल तर त्यांना सृजनशील व सामाजिकदृष्ट्या सक्रिय ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्या
ऊर्जा आणि उत्साहाला मोबाईलच्या बाहेर वाट मिळू द्या मग ते हस्तकलेतून असो की
मैदानी खेळातून, हीच दीर्घकालीन आरोग्यपूर्ण विकासाची गुरुकिल्ली आहे.
शिकवण्यासाठी मोबाईल नव्हे तर कृतीचा
वापर
आज शैक्षणिक तंत्रज्ञानामुळे मोबाईल
अॅप्सचा वापर शिक्षणात मोठ्या प्रमाणात होऊ लागला असला, तरी लहान
मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्यक्ष कृती आणि अनुभवाधारित शिक्षण
अधिक परिणामकारक ठरते. Jean Piaget यांच्या बोधनिक विकासाच्या
सिद्धांतानुसार, मुलं त्यांच्या वयाच्या विकास टप्प्यानुसार
स्पर्श, हालचाल, आणि कृतीद्वारेच शिकायला अधिक
प्रवृत्त असतात (Piaget, 1952). त्यामुळे, केवळ मोबाईल
स्क्रीनवर बघणे किंवा बटण दाबणे यामुळे त्यांचा सक्रिय सहभाग मर्यादित राहतो, तर प्रत्यक्ष
क्रियाशीलतेच्या शिक्षणपद्धतीत (hands-on learning), मुलं गोष्टी
हाताळतात, रंगवतात, आणि प्रक्रिया समजून घेतात.
उदाहरणार्थ, अक्रोड फोडणे
ही क्रिया शिकवताना केवळ मोबाईलवरचा व्हिडिओ दाखवण्याऐवजी मुलांना अक्रोड देऊन
स्वतः हाताने फोडण्याचा अनुभव दिल्यास, त्यांना त्याचे
वजन, कडकपणा, हालचाल याची प्रत्यक्ष जाणीव होते.
अशा अनुभवातून मुलांच्या सामर्थ्यविकास (motor skills), समस्या
सोडवण्याच्या क्षमतेत आणि जिज्ञासेच्या विकासात वाढ होते (Montessori,
1967).
हस्तनिर्मित साहित्य, ब्लॉक्स, चित्रे, फ्लॅशकार्ड्स, व्हाइटबोर्ड, आणि पुस्तके
यांचा उपयोग केल्यास मुलांची दृश्य, स्पर्श आणि
श्राव्य क्षमता अधिकाधिक सक्रिय होते. यामुळे त्यांचे multisensory
learning सक्षम होतात, जे मोबाईल अॅप्सच्या मर्यादित
माध्यमांपेक्षा प्रभावी आहे. अशा प्रकारचे शिक्षण मुलांना केवळ माहितीच देत नाही, तर तेच ज्ञान
स्वतःच्या पद्धतीने आत्मसात करण्यास मदत करते.
तसेच, अशा कृतीप्रधान
पद्धतीमुळे मुलांचं लक्ष मोबाईलच्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे कमी जाऊन, प्रत्यक्ष
वस्तूंशी खेळण्यात आणि शिकण्यात गुंतते, ज्याचा
दीर्घकालीन फायदा त्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकासावर होतो.
डिजिटल डिटॉक्स दिवस
‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजेच ठराविक
काळासाठी सर्व डिजिटल उपकरणांपासून विशेषतः मोबाईल फोन, टॅब्लेट, संगणक यांपासून
दूर राहणे, हे मुलांसोबतच पालकांसाठीही अत्यावश्यक आहे. सतत
स्क्रीनच्या संपर्कात राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण, झोपेची अडचण, चिडचिड, एकाग्रतेचा
अभाव अशा समस्या वाढतात (AAP, 2016). म्हणून, आठवड्यातून एक
दिवस ‘नो मोबाईल डे’ म्हणून साजरा करणे ही उपयुक्त सवय ठरू शकते.
या दिवशी मोबाईल आणि इतर स्क्रीन
उपकरणे पूर्णपणे बाजूला ठेवून, कुटुंबाने एकत्र वेळ घालवणे, मैदानी खेळ
खेळणे, शैक्षणिक किंवा निसर्गभेटीला जाणे, हस्तकला करणे, पुस्तके वाचणे
किंवा गोष्टी सांगणे यांसारख्या क्रियाकलापांवर भर द्यावा. अशा वेळेचा उपयोग
केल्यास मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये, भावनिक बंध, संवाद क्षमता
आणि सहानुभूती विकसित होते. विशेषतः जेव्हा मुलं पालकांबरोबर परस्परसंवाद करतात
आणि प्रत्यक्ष क्रियेत सामील होतात, तेव्हा
तेवढ्याच वेळेसाठी मोबाईलचा विसरही पडतो.
डिजिटल डिटॉक्स केवळ एक तात्पुरता
ब्रेक नसून, मुलांमध्ये डिजिटल मर्यादा निश्चित करण्याची एक
नैतिक आणि शारीरिक गरज बनली आहे. यामुळे त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीचा विकास
होतो, कारण त्यांना सतत उपलब्ध असलेल्या करमणुकीपासून ब्रेक मिळतो आणि
निर्मितीक्षम उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
मोबाईलवरील अॅप्स आणि कंटेंटवर
नियंत्रण
आजकाल मोबाईलचा शिक्षणासाठी, करमणुकीसाठी व
संवादासाठी उपयोग होतो. त्यामुळे मोबाईलचा संपूर्ण टाळणे शक्य नसते. मात्र, त्यावर योग्य
नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते, विशेषतः लहान
मुलांच्या बाबतीत. यासाठी Parental Control ही एक उपयुक्त
सुविधा आहे. यामध्ये मोबाईलमध्ये कोणते अॅप्स वापरले जावेत, इंटरनेटवर
कोणती माहिती पाहिली जावी, अॅप्स किती वेळ वापरावेत इत्यादी
गोष्टींवर पालक मर्यादा घालू शकतात. Google Family Link, Apple
Screen Time, Norton Family, Qustodio, आणि
Bark सारखी अॅप्स
पालकांना ही मदत पुरवतात.
शोध सांगतात की, पालकांचा
सक्रिय सहभाग आणि तांत्रिक नियंत्रण यांचा संयोग मुलांच्या डिजिटल सवयींवर अधिक
सकारात्मक प्रभाव टाकतो (Lauricella, et al., 2015).
शैक्षणिक अॅप्स निवडताना अशा अॅप्सना प्राधान्य द्यावे जे बालविकासाशी सुसंगत
असतात, जसे की Khan Academy Kids, PBS Kids, Duolingo ABC इत्यादी. हे अॅप्स
शिक्षणाला खेळासारखे बनवतात व मुलांना शिस्तबद्ध डिजिटल सवयी लावतात.
यासोबतच मुलांचा मोबाईल वापर (त्यांच्या
संमतीने) वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. मुलं नेमकं काय पाहत आहेत, त्यांची ऑनलाईन
सक्रियता काय आहे, ते कोणासोबत संवाद साधत आहेत याचे
बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे. यामुळे ना फक्त अपायकारक अॅप्सचा वापर
थांबवता येतो, तर मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्याचेही
संरक्षण होते.
संवादातून जागृती
मुलांना मोबाईलपासून लांब
ठेवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ बंदी घालून
काही उपयोग होत नाही, तर मोबाईलच्या वापराचे फायदे आणि
तोटे याविषयी खुला संवाद घडवून आणणे आवश्यक असते. यामुळे मुलांमध्ये स्वप्रेरणा (intrinsic
motivation) निर्माण होते आणि ते स्वतःहून मोबाईल वापरावर मर्यादा घालण्याचा विचार
करू लागतात.
मुलांना मोबाईलचा योग्य उपयोग, अतिरेकी
वापराचे दुष्परिणाम, आणि त्याचे त्यांच्या शारीरिक-मानसिक
आरोग्यावर होणारे परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दीर्घकाळ
स्क्रीनकडे बघितल्यास डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे
डोळ्यांत कोरडेपणा, डोळे लाल होणे, आणि अस्पष्टता
निर्माण होते. मोबाईलच्या सतत वापरामुळे झोपेवरही परिणाम होतो. स्क्रीनमधून येणारा
ब्लू लाईट मेंदूमधील मेलाटोनिन हॉर्मोनची निर्मिती कमी करतो, जो झोपेसाठी
अत्यावश्यक आहे (Hale & Guan, 2015). परिणामी, झोपेची
गुणवत्ता कमी होते, आणि मुलं चिडचिडी, अस्वस्थ, व असंतुलित
बनतात.
या गोष्टी मुलांना त्यांच्या भाषेत, उदाहरणांसह
समजावून सांगितल्या गेल्यास त्यांचा प्रभाव अधिक होतो. तसेच पालकांनी मोबाईल
वापराच्या संदर्भात आपल्या भावनाही व्यक्त कराव्यात. उदा. "मला वाटतं की तू
खूप वेळ मोबाईल वापरत असल्यामुळे तुझ्या डोळ्यांना त्रास होतोय, आणि त्यामुळे
तू चिडचिडा झालायस." अशा संवादातून मुलांमध्ये समज आणि जबाबदारीची भावना
विकसित होते.
मोबाईल हे बक्षीस नसावे
पालक अनेक वेळा चांगल्या वागणुकीच्या
बदल्यात मुलांना मोबाईल वापरण्याची परवानगी देतात. उदाहरणार्थ,
"जर
तू गृहपाठ वेळेवर पूर्ण केलास तर तुला अर्धा तास मोबाईल वापरता येईल" असे
म्हणतात. ही पद्धत थोडक्यात 'मोबाईल' या वस्तूला
पुरस्कार किंवा बक्षीस म्हणून समोर आणते. मानसशास्त्रातील साधक
अभिसंधान या तत्त्वानुसार (Skinner, 1953), एखाद्या
वागणुकीनंतर जर त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट मिळाली, तर ती वागणूक
पुन्हा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांचा हेतू चांगल्या वर्तनासाठी
प्रोत्साहन देण्याचा असला, तरी त्याचा दुष्परिणाम असा होतो की
मुलांच्या मनात मोबाईल एक आकर्षक, स्पेशल, विशेष
महत्त्वाची गोष्ट म्हणून रूजते.
यामुळे मोबाईल वापर ही मुलांसाठी केवळ बक्षीसवजा गोष्ट न राहता, एक 'हक्काची' अपेक्षित गोष्ट
बनते. पुढे जाऊन ते ही विचार करू शकतात की, "मोबाईल मिळणं
म्हणजे मी चांगलं वागतोय" आणि त्यामुळे मोबाईल मिळणं हेच त्यांच्या वर्तनाचं
मोजमाप ठरतं. हे दीर्घकालीन दृष्टिकोनातून घातक ठरू शकते (Kardaras,
2016).
त्याऐवजी, मुलांना
बौद्धिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध करणाऱ्या पर्यायांची निवड केली पाहिजे.
उदाहरणार्थ, वाचनासाठी पुस्तक देणे, हाताच्या
वापरातून कल्पनाशक्ती विकसित करणारे खेळ (जसे की LEGO, पझल्स), किंवा
मुलांच्या भावनिक गरजांना उत्तम प्रतिसाद देणारा पालकांसोबत फेरफटका मारणे, हे
सर्व पर्याय मोबाईलपेक्षा अधिक उपयुक्त ठरतात. एका अभ्यासातून दिसून आलं आहे की
मुलांना अनुभवातून शिकायला आणि भावनिक नातेसंबंध वाढवायला अशा थेट कृती अधिक
प्रभावी ठरतात (Hirsh-Pasek et al., 2015).
व्यवस्थित दिनक्रम आखा
मुलांच्या दैनंदिन जीवनात निश्चित
दिनक्रम असणे हे त्यांच्यासाठी संरचनात्मक सुरक्षिततेचे आणि मानसिक स्थैर्याचे
आधार बनते. एका अभ्यासानुसार, ज्या मुलांना ठराविक वेळा झोपायला
जाणे, जेवण, अभ्यास व खेळ यासाठी दिलेल्या
वेळांची सवय असते, त्यांची एकाग्रता, शिस्त आणि
सामाजिक वर्तन अधिक सकारात्मक असते.
मोबाईलचे आकर्षण हे बहुतांश वेळा
रिकाम्या वेळेत, कंटाळा किंवा उद्देशहीनतेच्या काळात होते. जर
मुलाच्या दिनक्रमात खेळ, मैदानी क्रिया, अभ्यास, सर्जनशील
उपक्रम, विश्रांती आणि कुटुंबातील सहवास यांचा समावेश असेल, तर त्यांना
मोबाईल वापरण्याची वेळ किंवा गरज फारशी भासत नाही. “Boredom
is the playground of the screen” असं म्हणतात, कारण रिकाम्या
वेळातच मोबाईलचं आकर्षण अधिक तीव्रतेने जाणवतं.
यामध्ये पालकांनी 'स्क्रीन-फ्री
टाइम' जाणीवपूर्वक आखून त्यात मुलांसोबत संवाद, खेळ, किंवा कौटुंबिक
उपक्रम घालणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, संध्याकाळी 7
ते 8 या वेळेत पूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण करणे, दिवसभराच्या
घडामोडी शेअर करणे, किंवा घरातच बोर्ड गेम खेळणे हे
मोबाईलचा पर्याय म्हणून उत्तम ठरू शकतात. व्यवस्थित दिनक्रम ही फक्त वेळेची आखणी
नाही, तर ती मूलभूत सवयी घडविण्याची आणि जबाबदारी शिकवण्याची प्रक्रिया आहे.
अशा रचनेत मुलं मोबाईलपासून नैसर्गिकपणे दूर राहतात आणि त्यांचा एकूण विकास
सुसंगतपणे होतो.
समारोप:
लहान मुलांना मोबाईलपासून लांब
ठेवण्यासाठी कडक शिस्तीपेक्षा जास्त गरज आहे ती प्रेमळ मार्गदर्शनाची, संवादाची आणि
पर्याय देण्याची. मोबाईल हा आज जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, पण तो संपूर्ण
जीवन बनू नये, याची जबाबदारी पालकांनी पार पाडावी. योग्य
मार्गदर्शन, आकर्षक पर्याय आणि स्वयंशिस्त यांद्वारे आपण
मुलांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून रोखू शकतो.
American
Academy of Pediatrics (AAP). (2016). Media and Young
Minds. Pediatrics, 138(5), e20162591.
American
Academy of Pediatrics. (2013). The Importance of Play in
Promoting Healthy Child Development and Maintaining Strong Parent-Child Bonds.
Christakis,
D. A. (2009). The effects of infant media usage: what do
we know and what should we learn? Acta Paediatrica, 98(1),
8–16.
Hale,
L., & Guan, S. (2015). Screen time and sleep among
school-aged children and adolescents: a systematic literature review. Sleep
Health, 1(4), 223–230.
Harvard
University Center on the Developing Child. (2020). “Serve
and Return Interaction Shapes Brain Architecture.”
Hirsh-Pasek,
K., Golinkoff, R. M., Berk, L. E., & Singer, D. G. (2015). A
Mandate for Playful Learning in Preschool: Applying the Scientific Evidence.
Oxford University Press.
Kardaras,
N. (2016). Glow Kids: How Screen Addiction Is Hijacking
Our Kids. St. Martin's Press.
Lauricella,
A. R., Wartella, E., & Rideout, V. J. (2015). Young
children’s screen time: The complex role of parent and child factors. Journal
of Applied Developmental Psychology, 36, 11-17.
Louv,
R. (2005). Last Child in the Woods: Saving Our Children
from Nature-Deficit Disorder. Algonquin Books.
Montessori,
M. (1967). The Absorbent Mind. New York: Holt, Rinehart
and Winston.
National
Literacy Trust (2021). Children and Young People's Reading
Engagement in the Digital Age.
Piaget,
J. (1952). The origins of intelligence in children. New
York: International Universities Press.
Radesky,
J. S., Schumacher, J., & Zuckerman, B. (2015). Mobile
and interactive media use by young children: The good, the bad, and the
unknown. Pediatrics, 135(1), 1-3.
Skinner,
B. F. (1953). Science and Human Behavior. New York:
Macmillan.
Vygotsky, L. S. (1978). Mind in Society: The Development of Higher Psychological Processes. Harvard University Press.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions