शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

मानसिक विकृतीचे निदान आणि संख्याशास्त्रीय वर्गीकरण | DSM

 डीएसएम | DSM

मानसिक विकृतीचे निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय वर्गीकरण / सूची माहितीपुस्तिका

DSM-5 ही मानसिक आजारांचे निदान आणि सांख्यिकी पुस्तिका ही मानसिक आरोग्य आणि मेंदूशी संबंधित परिस्थितींवरील अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या व्यावसायिक संदर्भ पुस्तिकेची अलिकडची आवृत्ती आहे. याची नवीनतम आवृत्ती, DSM-5-TR, मार्च, 2022 मध्ये प्रकाशित झालेली आहे.

डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स (DSM) ही एक नियम पुस्तिका आहे जी चिकित्सा मानसशास्त्र आणि मनोचिकित्सकांद्वारे मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. DSM मध्ये प्रौढ आणि मुलांसाठी मानसिक आरोग्य विकारांच्या सर्व श्रेणींचा समावेश आहे जे अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन (APA) द्वारे प्रकाशित केले जाते.

DSM मध्ये मानसिक आरोग्य विकारांचे निदान करण्यासाठी आवश्यक वर्णन, लक्षणे आणि इतर निकष आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या आजारांमुळे कोणाला सर्वात अधिक त्रास होईल, विकार सुरू होण्याचे विशिष्ट वय, विकाराची गती आणि विकास, जोखीम आणि रोगनिदानविषयक घटक आणि इतर संबंधित निदान समस्यांबद्दलची आकडेवारी देखील समाविष्ट आहे.

वैद्यकीय कारणासाठी तसेच काही सरकारी संस्था आणि अनेक विमा कंपनीना मानसिक आरोग्य स्थितींच्या समर्थनासाठी किंवा उपचारांची देयके मंजूर करण्यासाठी विशिष्ट निदानाची आवश्यकता असते. म्हणून, मानसोपचार निदान आणि उपचार शिफारशींसाठी याचा वापर होतोच शिवाय मानसिक आरोग्य व्यावसायिक उपचाराच्या अनुषंगाने रूग्णांचे वर्गीकरण करण्यासाठी DSM चा वापर करतात.

मानसिक विकृतीचे निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय वर्गीकरण / सूची माहितीपुस्तिकेचा विकास

DSM च्या सहाय्याने मानसिक आजाराची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या आजाराचे प्रचलित उपप्रकार आणि प्रत्येक प्रकाराच्या व्याख्येसाठी निकष ठरविण्याचे कार्य केलेले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ व्यक्ति या निकषांचा प्रमाणित निकष म्हणून वापर करतात. या निकषांमध्ये लक्षणे आणि चेतावणी यांचा समावेश आहे. मानसिक आजारांच्या निदानाकरिता विकसित करण्यात आलेली DSM ही सर्वात पहिली रितसर औपचारिक वर्गीकरण प्रणाली आहे.

मानसिक आजारांचे स्वरुप बदलत असल्याने व त्यात वाढ होत गेल्याने अमेरिकन सायकॅट्रीक असोसीएशनने DSM च्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत. DSM-I मध्ये, निदानाच्या 102 श्रेणी होत्या, DSM-II मध्ये 182, DSM-III मध्ये 265 आणि DSM-IV मध्ये 297 पर्यंत वाढलेल्या आहेत.

DSM I ची पहिली आवृत्ती 1952 मध्ये प्रकाशीत झाली. यात सैद्धांतिक दृष्टीकोनाचा अवलंब करण्यात आला होता व मानसिक विकृती ही व्यक्तीने समस्यायुक्त परिस्थितीला दिलेली भावनिक प्रतिक्रीया आहे असे मत प्रतिपादित करण्यात आले होते.

DSM II च्या आवृत्तीचे प्रकाशन 1968 मध्ये झाली. यात विकृतीची सविस्तर व्याख्या व निदानात्मक संकल्पना देण्यात आलेल्या आहेत.

APA ने 1974 मध्ये एक तज्ञ मंडळींच्या समितीची नेमणूक केली. ज्यांनी निरक्षणात्मक लक्षणांच्या आधारे DSM III चे प्रकाशन 1980 मध्ये करण्यात आले. जरी ही आवृत्ती सुधारित असली तरी निदान निकषाच्या बाबतीत काही गोष्टी स्पष्ट नव्हत्या याच कारणास्तव DSM III-R चे प्रकाशन 1987 मध्ये अंतिम सूची म्हणून पुढील सर्वांगीण व परिपूर्ण आवृत्ती म्हणून स्वीकारली.

याच दरम्यानच APA ने पुन्हा एकदा DSM ची विश्वसनीयता व यथार्थता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पहिल्या टप्प्यात यातील सदस्यांनी योग्य संशोधन अभ्यासाच्या आधारे काळजीपूर्वक पृथ:करण केले. यापुढील टप्प्यात क्षेत्रीय निरिक्षण करुन मानसिक आजाराचे निदान झालेल्या हजारो व्यक्तिंची मुलाखत घेतली. अनेक चिकित्सा तज्ञांकडून निदानातील सुसंगतता पडताळली गेली व या मुलाखतींची ध्वनीफीत तयार करण्यात आली. निदानाची यथार्थता ही व्यक्तिच्या विशिष्ट मानसशास्त्रीय विकृतीच्या लक्षणाधारे मूल्यमापन करुन ठरविण्यात आले. या क्षेत्रिय अभ्यासामुळे निदान करण्यासाठी आवश्यक ते निकष आणि लक्षणे ठरविण्यात अनुभवजन्य माहितीच्या आधारे निश्चित करण्यास मदत झाली. 1994 मध्ये DSM IV चे प्रकाशन झाले.

DSM – 5 मधील बदल  

      DSM ची पाचवी आवृती ही 2013 मध्ये अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन द्वारे प्रकाशित मानसिक विकारांचे निदान आणि सांख्यिकी मॅन्युअल आहे. नवीन आवृत्तीचे स्वरूप अधिक व्यावहारिक आहे. DSM-5 हे त्याच्या शीर्षकात रोमन अंकाऐवजी अरेबिक अंक वापरणारे एकमेव माहितीपुस्तिका आहे.

DSM-5 ही DSM-IV-TR ची सुधारित आवृत्ती नसून त्यात लक्षणीय बदल केलेले आहेत. DSM-5 मधील बदलांमध्ये अनावश्यक निकष आणि वर्गीकरण काढून टाकण्यात्त आले तर आवश्यक निकष आणि वर्गीकरण जोडलेले आहेत.  बहुअक्षीय प्रणाली काढून टाकण्यात आली,  आणि इतर निर्दिष्ट विकार आणि अनिर्दिष्ट विकारांमध्ये निर्दिष्ट नसलेल्या विकारांचे विभाजन करण्यात आले. तसेच काही विकार काढून टाकले गेले किंवा बदलले गेले, तर अनेक नवीन निदानात्मक परिस्थिती जोडलेल्या आहेत.

कोणत्याही आरोग्य स्थितीवर उपचार करण्याची पहिली पायरी, शारीरिक किंवा मानसिक स्थितीचे अचूक निदान करण्यासाठी DSM-5 मुख्य भूमिका बजावते. DSM-5 हे मानसिक आरोग्य आणि मेंदू-संबंधित परिस्थितींच्या स्पष्ट, अत्यंत तपशीलवार व्याख्या करते. हे त्या स्थितींच्या चिन्हे आणि लक्षणांचे तपशील आणि उदाहरणे देखील प्रदान करते. DSM-5 मुळे मानसिक आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत तज्ञांना परिस्थितीचे अचूक निदान करणे आणि समान चिन्हे आणि लक्षणे असलेल्या परिस्थितींपासून वेगळे करण्यास सोपे जाते.

DSM-5 मधील समाविष्ट आशय

DSM-5 प्रामुख्याने मानसिक आरोग्य स्थितींवर लक्ष केंद्रित करते. तथापि, मानसिक आरोग्य आणि मेंदूचे कार्य अविभाज्य असल्यामुळे, DSM-5 मध्ये मेंदू कसे कार्य करते याच्याशी संबंधित परिस्थिती आणि चिंता यांचादेखील समावेश आहे. DSM-5 माहितीपुस्तिकेत डायग्नोस्टिक कोड देखील आहेत, जे आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत तज्ञांना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण आणि संबंधित आरोग्य समस्या, 10 वी आवृत्ती (ICD-10) संदर्भात लक्षण आणि चिन्हे समजण्यास सुलभता येते. DSM-5 मध्ये खालील तीन विभागांचा समावेश आहे:

विभाग I: DSM-5 मूलभूत: वैद्यकीय व्यावसायिकांनी ही माहितीपुस्तिका त्यांच्या कामात कशी वापरावी हे या विभागात समाविष्ट आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित कायदेशीर, व्यावसायिक, न्यायालयीन प्रकरणे इ. समस्यामध्ये DSM-5 वापरण्याबाबत मार्गदर्शन देखील आहे.

विभाग II: निदान निकष आणि कोड: हा विभाग माहितीपुस्तिकेतील सर्वात मोठा भाग आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये विशिष्ट अटींच्या व्याख्या आणि तिचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

विभाग III: उदयोन्मुख उपाय आणि प्रतिमान: या विभागात विशिष्ट मूल्यमापन साधनांविषयी माहिती आहे, ज्याचा वापर आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत तज्ञ काही परिस्थितींचे निदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून करतात. सांस्कृतिक फरक निदानावर कसा परिणाम करू शकतात याबद्दल माहिती आणि डीएसएमच्या नंतरच्या आवृत्तीत संभाव्य सुधारणा यांचा समावेश यात आहे.

DSM-5-TR मधील बदल

DSM-5 च्या आवृत्तीची टेक्स्ट रीविजन (DSM-5-TR) मध्ये 70 पेक्षा अधिक विकारांसाठी सुधारित निकष आहेत. DSM-5-TR मध्ये prolonged grief disorder नावाच्या नवीन निदानाचा समावेश आहे.

DSM-5-TR मध्ये वाचकांचा गोंधळ टाळण्यासाठी सुस्पष्ट भाषा वापरलेली आहे. उदाहरणार्थ, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमधील निकष A चे शब्दांकन “as manifested by the following" वरून "as manifested by all of the following" असे सुधारित केले गेले आहे हे सूचित करण्यासाठी की निदान करण्यासाठी सर्व लक्षणे उपस्थित असणे आवश्यक आहे.

सामाजिक चिंता विकाराच्या पुढील पॅरेंथेटिकल "(सामाजिक फोबिया)" काढून टाकण्यात आली आहे. "बौद्धिक अपंगत्व" हा शब्द बौद्धिक विकास विकारासाठी सुधारित करण्यात आला आहे. DSM-5-TR मध्ये जेन्डर डिसफोरियाच्या सभोवतालच्या अटींमध्ये देखील महत्त्वपूर्ण सुधारणा केलेली आहे. सदर लेखामध्ये केवळ ठळक मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची तोंडओळख व्हावी हा एकमेव हेतू यामागे आहे.

समारोप

एखाद्या मानसिक विकाराचे निदान करताना, लक्षणांचे स्वरूप आणि त्यांचा व्यक्तीवर कसा परिणाम होत आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर मुलाखती, स्क्रीनिंग साधने, मानसशास्त्रीय मूल्यांकन, प्रयोगशाळा चाचण्या आणि शारीरिक चाचण्यांसह विविध माहिती स्रोतांवर अवलंबून राहतात. आरोग्य सेवा तज्ञ किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिक DSM निकषांवर आधारित निदान करण्यासाठी त्यांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करतील. जेणेकरून नेमकेपणाने विकाराचे निदान होऊन योग्य उपचार आणि शिफारशी करता येतील.


Source of image : https://amzn.to/3IxHcDFsource of image

संदर्भ

American Psychiatric Association (2013). Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, 5th ed. Washington, DC: APA

American Psychiatric Association (2013). Highlights of changes from DSM-IV-TR to DSM-5. American Psychiatric Publishing

American Psychiatric Association (2022). Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders. 5th ed, text revision. Washington, D.C.: APA

Kawa S, Giordano J. (2012). A brief historicity of the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders: Issues and implications for the future of psychiatric canon and practice. philosophy ethics and humanities in medicine

कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन | Cortisol Harmone

  कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन ताण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परीक्षा , कामाचा ताण , आर्थिक अडचणी , वैयक्तिक संबंधांमधील समस्...