रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मेंदूतील रासायनिक जोडणी | Neurotransmitter

मेंदूतील रासायनिक जोडणी (Neurotransmitter)

मेंदू हा शरीरातील इतर सर्व अवयावाप्रमाणे एक अवयव आहे व तो उतींचा (Tissue) बनला आहे. समान गुणवैशिष्ट्यांनीयुक्त, समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती होय. जे नियम शरीरातील अन्य पेशींना लागू पडतात तेच नियम मेंदू या ऊतीतील पेशींना लागू पडतात. या पेशींना मज्जापेशी अथवा चेतापेशी (Neuron) असे म्हणतात. मज्जापेशी या मेंदूबरोबरच संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात. वेदनेंद्रियांकडून आलेली माहिती मेरुरज्जूमार्फत (Spinal Cord) मेंदूकडे पाठवणे हे वेदक चेतापेशींचे कार्य असते. या प्रकारच्या पेशी वेदनेद्रियांजवळ आढळतात. मेंदूकडून आलेली माहिती मेरुरज्जूमार्फत स्नायू व ग्रंथींकडे (Glands) पाठवणे हे कारक मज्जापेशींचे कार्य असते. या पेशी स्नायू व ग्रंथीजवळ आढळतात. वेदक व कारक चेतापेशींमध्ये संपर्क स्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य सहयोजक पेशी करतात. उच्च प्रकारच्या मनोव्यापारांमध्ये यांचे कार्य महत्त्वपूर्ण असते. या पेशी मेंदू व मेरुरज्जूत आढळतात.

मज्जापेशी निर्माण करत असलेले विद्युत व रासायनिक संदेश ओळखता येतात, मोजता येतात. मेंदू अभ्यासाच्या  आधारे रासायनिक संदेश निर्माण करणारी रसायने ओळखता आली आहेत. मज्जापेशींची जोडणी व रचना कशी असते, त्यांचे जाळे कसे असते याची कल्पना आली आहे. थोडक्यात, इतर अवयवांसारखाच मेंदूही अभ्यासता येतो आणि त्याचा अभ्यास अजूनही चालूच आहे असे मेंदूच्या अभ्यासाबद्दल म्हणता येईल. मेंदूतील अनेक विभाग, उपविभाग यांची संख्या अगणित नसली तरी बरीच आहे. त्यामुळे एकेक भाग घेऊन त्यांचे कार्य, रचना हे अभ्यासणे जितके गरजेचे आहे तितकेच किंवा त्याहून महत्त्वाचे आहे ते त्या भागांमधील सुसंवाद, त्यांच्यामधील जोडणी, रचना समजणे! पुन्हा सर्व विभाग एकत्रितपणे कसे कार्य करतात ते म्हणजेच मेंदू पूर्णपणे समजणे गरजेचे आहे.


(माज्जापेशीची रचना)

माणसाच्या मेंदू नावाच्या 1.3 किलो ग्रॅम वजनाच्या गोळ्यात सुमारे 100 महापद्म मज्जापेशी असतात. मेंदू हा पूर्णपणे मज्जापेशींनी बनलेला असतो हा एक गैरसमज आहे. मेंदूमध्ये मज्जापेशींचे प्रमाण 10% च असते.  मेंदूचा 90% भाग हा आधार पेशींनी (Glial Cells) बनलेला आहे. मज्जापेशींना आधार देणे, त्यांचा विकास करणे, पोषण करणे, मृत चेतापेशींना बाहेर टाकणे, मज्जापेशींना आवरण पुरवणे इत्यादी कामे आधार पेशी करत असतात. अशा रीतीने आधार पेशींची आपल्या शरीराला आवश्यकता असते. मज्जापेशी एकमेकींना खऱ्या अर्थाने जोडलेल्या नसतात. त्या जेथे जोडल्या गेल्यासारखे वाटते, तेथे खरं तर मोकळी जागा असते, त्यास चेतासंधी (Synapse) म्हणतात. एका मज्जापेशीतून तयार होऊन वाहाणारा विद्युत संदेश याच चेतासंधीद्वारे दुसऱ्या मज्जापेशीत, दुसरीतून तिसरीत असा वाहून नेला जातो. अशा चेतासंधी हजारोंच्या संख्येने असतात, म्हणजे एकूण चेतासंधीची संख्या किती मोठी असेल याची कल्पनाच केलेली बरी.

चेतासंधीच्या जागेत विद्युत संदेशांचे रुपांतर रासायनिक संदेशात होते. प्रक्षेपक पेशींकडून जी रसायने या जागेत सोडली जातात त्यांना चेतापारेषक (Neurotransmitter) असे म्हणतात. ज्या पेशी हे संदेश ग्रहण करतात त्या पेशीत दोन प्रकारचे परिणाम घडून येतात. काही चेतापारेषक ग्राहक पेशीस उत्तेजित करतात, त्यामुळे त्या ग्राहक पेशीतही विद्युत - संदेश तयार होतो. जो चेतासंधी असा उत्तेजित करणारा असतो त्यास 'उत्तेजक चेतासंधी' (Excitatory Synapse) म्हणतात. दुसऱ्या परिणामात ग्राहक पेशीत विद्युत - संदेश तयार होत नाही किंवा ग्राहक पेशीला विद्युत संदेश तयार करण्यापासून परावृत्त केले जाते. अशा वेळी त्या चेतासंधीला ‘अनुत्तेजक चेतासंधी’ (Inhibitory Synapse) म्हणतात. यामुळे एका पेशीकडे येणाऱ्या अनेक संदेशांपैकी काही उत्तेजित करणारे व काही अनुत्तेजित करणारे असतात. अर्थात ग्राहक पेशीने विद्युत - संदेश तयार करायचा किंवा नाही हे त्या चेतापारेषक रसायनावरही अवलंबून असते. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की प्रक्षेपक पेशीने पाठवलेला संदेश ग्राहक पेशीत 'व्यक्त' तरी होतो अथवा 'अव्यक्त' तरी राहतो.

एक पेशी दुसऱ्या शंभर किंवा प्रसंगी हजारो पेशींकडून संदेश ग्रहण करू शकते अथवा दुसऱ्या हजारो पेशींना तिने तयार केलेला संदेश पाठवू शकते. एका पेशीने तयार केलेला विद्युत - संदेश हा तिला आलेल्या किंवा मिळालेल्या व्यक्त (उत्तेजित) व अव्यक्त (अनुत्तेजित) संदेशाच्या एकत्रित परिणामातून तयार केला गेलेला असतो. मेंदूतील कोणतीही पेशी संदेश केवळ इकडून तिकडे पाठवण्याचेच कार्य करत नसून तिला प्राप्त झालेल्या अनेक उत्तेजक व अनुत्तेजक संदेशांवर प्रक्रिया करून त्यावर अवलंबून असणारा स्वत:चा असा संदेश निर्माण करण्याचे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे काम सतत करत असते. मज्जापेशीत होणारे सर्व संदेशवहन दुहेरी म्हणजे विद्युत व रासायनिक असते. पेशीमधील विद्युत संदेशातील सलगता चेतासंधीमधील रासायनिक रेणूमुळे राखली जाते असे जरी असले तरी काही भागातील काही चेतासंधी हे केवळ विद्युत - संदेशाद्वारेच काम करतात असा शोध 1950 मध्येच लावला गेला आहे.


(मज्जापेशीशी निगडीत घटक)

न्यूरोट्रांसमीटरची निष्क्रियता

चेतापारेषकचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याचे काय होते? एकदा का चेतापारेषकने तयार केलेला प्रभाव पडला की, त्याची क्रिया तीन यंत्रणेद्वारे थांबवता येते:

1. डिग्रेडेशन: विकर (Enzyme) हा चेतापारेषकच्या संरचनेत बदल करतो म्हणून ते ग्राहक पेशीद्वारे ओळखले जात नाही.

2. डीफुजन: चेतापारेषक ग्राहक पेशीपासून दूर जातो.

3. रीअपटेक: ज्या मज्जापेशीने सोडला आहे तो संपूर्ण चेतापारेषक मज्जापेशीच्या अक्षतंतुद्वारे (axon) परत घेतला जातो.

चेतापारेषकची वास्तविक ओळख पटणे हे प्रत्यक्षात खूप कठीण असू शकते. शास्त्रज्ञ चेतापारेषक असलेल्या पुटिकाचे (vesicle) निरीक्षण करू शकतात, परंतु पुटिकामध्ये कोणती रसायने साठवली जातात हे शोधणे इतके सोपे नाही. यामुळे, चेतापारेषक म्हणून जी रासायनिक व्याख्या केली जाते ती करावी की नाही हे निर्धारित करण्यासाठी चेताशास्त्रज्ञांनी अनेक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत:

पेशीमध्ये रसायनाची उपस्थिती: रसायन एकतर मज्जापेशीमध्ये संश्लेषित केले जाते किंवा त्या पेशीमध्ये आढळते.

उद्दीपकाशी निगडीत रसायने: ते उत्तेजित झाल्यावर मज्जापेशीद्वारे योग्य प्रमाणात सोडले जाते.

चेतासंधीनंतर पेशीवर प्रक्रिया: रसायन संपर्कस्थानपूर्व मज्जापेशीद्वारे सोडले जाणे आवश्यक आहे आणि संपर्कस्थानोत्तर मज्जापेशीमध्ये रसायन चपखल ग्रहण केले जाणे आवश्यक आहे.  

काढून टाकण्याची यंत्रणा: रासायनिक कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सक्रियतेच्या ठिकाणाहून काढून टाकण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा अस्तित्वात असते.

चेतापारेशाकाचे वर्गीकरण

चेतापारेषक दैनंदिन जीवनात आणि कामकाजात मोठी भूमिका बजावतात. शास्त्रज्ञांना अद्याप नेमके किती चेतापारेषक अस्तित्वात आहेत हे माहित नाही, तथापि, आजतागायत किमान 100 एक चेतापारेषकांची माहीत मिळालेली आहे. माणसास वाटणाऱ्या साध्या खिन्नतेपासून ते अजून असाध्य अशा पार्किन्सन रोगाचे मूळ कारण म्हणजे या चेतासंधीमधील संदेश प्रक्षेपण ग्रहण प्रक्रिया व तिच्यात निर्माण होणाऱ्या त्रुटीमुळे घडून येते. चेतापारेषकाचे वर्गीकरण हे त्यांच्या कार्यानुसार केले जाऊ शकते:

उत्तेजक चेतापारेषक: या प्रकारचे चेतापारेषक मज्जापेशीवर उत्तेजक प्रभाव पाडतात, म्हणजे ते मज्जापेशीची क्रियाविभव प्रक्रिया घडून येण्याची शक्यता वाढवतात. काही प्रमुख उत्तेजक चेतापारेषकामध्ये एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन यांचा समावेश होतो.

अवरोधक चेतापारेषक: या प्रकारच्या चेतापारेषकचा मज्जापेशीवर अवरोधक प्रभाव असतो; यामध्ये मज्जापेशीवर क्रियाविभव सक्रिय होण्याची शक्यता कमी करतात. काही प्रमुख अवरोधक चेतापारेषकामध्ये सेरोटोनिन आणि गॅमा-अमीनोब्युटीरिक ऍसिड (GABA) यांचा समावेश होतो.

मॉड्युलेटरी चेतापारेषक: हे चेतापारेषक, ज्यांना अनेकदा मज्जापेशी नियामक (neuromodulators) म्हणून संबोधले जाते, ते एकाच वेळी मोठ्या संख्येने मज्जापेशीवर परिणाम करण्यास सक्षम असतात. हे मज्जापेशी नियामक इतर रासायनिक संदेशवाहकांच्या प्रभावावर देखील प्रभाव पाडतात. इतर ग्राहक मज्जापेशीवर जलद-सक्रियता प्रभाव पाडण्यासाठी अक्षतंतू बोंडद्वारे (Axon terminals) चेतासंधी चेतापारेषक सोडले जातात, तेव्हा मज्जापेशी नियामक मोठ्या क्षेत्रामध्ये पसरतात आणि खूपच धीम्या गतीने सक्रियता दाखवतात.  

काही चेतापारेषक, जसे की सिटीलकोलीन आणि डोपामाइन, उपस्थित असलेल्या ग्राहक पेशीवर अवलंबून उत्तेजक आणि अवरोधक दोन्ही प्रभाव निर्माण करू शकतात.

चेतापारेषकाचे प्रकार

अब्जावधी चेतापारेषक रेणू आपल्या मेंदूचे कार्य  व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी सतत कार्यरत असतात, आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत आपल्या अध्ययन आणि एकाग्रता पातळीपर्यंत सर्वकाही नियंत्रित करतात. ते भय, भावस्थिती, सुख आणि आनंद यासारख्या विविध मानसिक कार्यांवर देखील परिणाम करू शकतात. चेतापारेषकाचे वर्गवारी आणि वर्गीकरण करण्याचे विविध मार्ग आहेत. अभ्यासासाठी म्हणून मोनोमाइन्स, एमिनो अॅसिड आणि पेप्टाइड्समध्ये विभागले जातात, तथापी सर्व चेतापारेषक हे एकूण सहा प्रकारामध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात:

1. अमिनो आम्ल :

अमीनो आम्ल चेतापारेषक मज्जासंस्थेमध्ये बहुतेक उत्तेजक आणि अवरोधक चेतापारेषक प्रदान करतात. पाठीच्या कण्यातील वेदक-कारक मज्जापेशी (मेरुरज्जू) जोडणीसंबंधीत असतात.  अमीनो आम्ल चेतापारेषक हे मध्यवर्ती मज्जासंस्थेतील सामान्य चेतापारेषक आहेत.

गॅमा-अमीनोब्युटीरिक ऍसिड (GABA): हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे अमिनो आम्ल शरीराचे मुख्य अवरोधक रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करते. GABA दृष्टी, कारक नियंत्रणामध्ये योगदान देते आणि चिंतेच्या नियमनात महत्त्वाची भूमिका बजावते. बेंझोडायझेपाइन्स, ज्याचा उपयोग चिंतेवर उपचार करण्यासाठी केला जातो, GABA चेतापारेषकची कार्यक्षमता वाढवण्याचे कार्य करते, ज्यामुळे विश्रांती आणि शांततेची भावना वाढू शकते.

ग्लूटामेट: मज्जासंस्थेमध्ये सर्वात भरपूर प्रमाणात आढळणारा  चेतापारेषक, ग्लूटामेट स्मृती आणि अध्ययन यासारख्या बोधनिक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ग्लूटामेटच्या अतिप्रमाणात स्त्रवण्यामुळे पेशींचा मृत्यू होतो. ग्लूटामेटच्या अतिप्रमाणात स्त्रवण्याचे  कारण म्हणजे अल्झायमर, स्ट्रोक आणि अपस्मार झटक्यांसारखे काही रोग आणि मेंदूच्या दुखापतींशी संबंधित आहे.

2. पेप्टाइड्स :

पेप्टाइड्स हे अमिनो आम्लशी संबधित असून ते सामान्यत: अमीनो आम्ल चेतापारेषकपेक्षा लांब परंतु संप्रेरक (Hormones) किंवा प्रथिनांपेक्षा लहान असतात. पेप्टाइड्स संकेत हे माहिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात जे पारंपारिक चेतापारेषकापेक्षा वेगळे असतात.

ऑक्सिटोसिन: हा शक्तिशाली संप्रेरक मेंदूमध्ये चेतापारेषक म्हणून कार्य करतो. हे अधश्चेतकाद्वारे (Hypothalamus) तयार केले जाते आणि सामाजिक ओळख, बंधन आणि लैंगिक पुनरुत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते. पिटोसिन सारख्या कृत्रिम ऑक्सिटोसिनचा वापर प्रसूतिकळा आणि प्रसूतीमध्ये मदत म्हणून केला जातो. ऑक्सिटोसिन आणि पिटोसिन या दोन्हींमुळे प्रसूतीदरम्यान गर्भाशय आकुंचन पावते.

एंडोर्फिन: हे चेतापारेषक वेदनात्मक संकेत प्रवाहित करण्यास अवरोध करतात आणि उत्साहाच्या भावनांना प्रोत्साहन देतात. हे रासायनिक संदेशवाहक वेदनांच्या प्रतिसादात शरीराद्वारे नैसर्गिकरित्या तयार केले जातात, परंतु ते एरोबिक व्यायामासारख्या इतर उपक्रमाद्वारे देखील कार्यान्वित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, "मानसिक आराम" अनुभवणे हे एंडॉर्फिनच्या उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या आनंददायी भावनांचे उदाहरण आहे.

3. मोनोमाइन्स :

मोनोमाइन्स हा रेणूंचा एक वर्ग आहे जो विशिष्ट रासायनिक रचना सामायिक करतो: एक अमीनो गट दोन कार्बन साखळीद्वारे सुगंधी रिंगशी जोडलेला असतो. मोनोमाइन्स असंतृप्त अमीनो आम्लपासून प्राप्त होतात आणि विशिष्ट पूर्वसूरीने असतात, त्यांना कॅटेकोलामाइन्स (डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन) आणि इंडोलामाइन्स (सेरोटोनिन) या दोन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते.

एपिनेफ्रिन: हे अधिवृक्क (Adrenal) म्हणूनही ओळखले जाते, एपिनेफ्रिन हा संप्रेरक आणि चेतापारेषक दोन्ही समजले जाते. साधारणपणे, एपिनेफ्रिन हा एक ताण-तणाव संप्रेरक आहे जो अधिवृक्क प्रणालीद्वारे सोडला जातो. तथापि, ते मेंदूमध्ये चेतापारेषक म्हणूनही कार्य करते.

नॉरपेनेफ्रिन: हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे रसायन एक चेतापारेषक आहे जे सतर्कतेमध्ये महत्वाची भूमिका बजावते आणि शरीराच्या लढ्यात किंवा पळा  (Fight or Flight) प्रतिसादात गुंतलेले असते. धोक्याच्या किंवा तणावाच्या वेळी कृती करण्यासाठी शरीर आणि मेंदूमध्ये समन्वय साधणे ही त्याची भूमिका आहे. या चेतापारेषकची पातळी सामान्यत: झोपेच्या वेळी सर्वात कमी असते आणि तणावाच्या वेळी सर्वात जास्त असते.

हिस्टामाइन: हे सेंद्रिय संयुग मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये चेतापारेषक म्हणून कार्य करते. हे ऍलर्जीक प्रतिक्रियांमध्ये भूमिका बजावते आणि रोग संक्रामकास रोगप्रतिकार शक्ती प्रणालीच्या प्रतिसादाचा भाग म्हणून तयार केले जाते.

डोपामाईन: सामान्यतः छान अनुभूती चेतापारेषक म्हणून ओळखले जाते, डोपामाइन हे बक्षीस, प्रेरणा, भावनिक उत्तेजना, अध्ययन आणि ऐच्छिक हालचाली यांच्याशी संबंधित कार्य हे चेतापारेषक करते. अनेक प्रकारची व्यसनाधीन औषधे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वाढवतात. हा रासायनिक संदेशवाहक शरीराच्या हालचालींच्या समन्वयातही महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदूच्या विशिष्ट क्षेत्रात याची निर्मिती कमी झाल्यास पार्किन्सनचा आजार होतो. तसेच मेंदूच्या दुसऱ्या क्षेत्रात याचे प्रमाण जास्त झाल्यास छिन्नमनस्कता हा आजार होतो.  

सेरोटोनिन: हे एक संप्रेरक आणि चेतापारेषक, सेरोटोनिन भावस्थिती, झोप, चिंता, लैंगिकता आणि भूक नियंत्रित आणि सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (SSRIs) हे उदासीनता, चिंता, पॅनीक डिसऑर्डर आणि पॅनीक अटॅकवर उपचार करण्यासाठी सामान्यतः लिहून दिलेली एक प्रकारची एन्टीडिप्रेसंट औषधे आहेत. SSRIs मेंदूतील सेरोटोनिनचे पुनरुत्पादन रोखून सेरोटोनिन पातळी संतुलित करण्यासाठी कार्य करतात, जे भावस्थिती सुधारण्यास आणि चिंताग्रस्त भावना कमी करण्यास मदत करतात. मेंदूच्या क्षेत्रातील त्याच्या स्थानानुसार हे द्रव्य उत्तेजक म्हणून काम करेल का निरोधक म्हणून काम करेल ते अवलंबून असते. याचे प्रमाण अधिक झाल्यास निद्रानाश, अपस्मार, चिंता विकृती, उन्मादावस्था निर्माण होते. हे चेतापारेषक कमी प्रमाणात निर्माण झाल्यास औदासीन्य निर्माण होते.

4. प्युरीन्स

प्युरिन हे कार्बन आणि नायट्रोजन अणूंनी बनलेले रेणू आहेत आणि हे रेणू पेशींच्या डीएनए आणि आरएनएमध्ये आढळतात. मानवी शरीरात, प्युरीन्स एंडोजेनस आणि एक्सोजेनसमध्ये विभागली जाऊ शकतात.

      एडेनोसिन: हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे रसायन मेंदूमध्ये मज्जापेशी नियामक म्हणून कार्य करते आणि उत्तेजना कमी करणारे आणि झोप सुधारण्यात गुंतलेले असते.

एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट (एटीपी): जीवनाचे ऊर्जा चलन मानले जाते, एटीपी मध्यवर्ती आणि परिसिमीय मज्जासंस्थेमध्ये चेतापारेषक म्हणून कार्य करते. ते स्वायत्त नियंत्रण, वेदनिक  पारगमन आणि आधार पेशींसोबत संप्रेषणामध्ये भूमिका बजावते. संशोधन असे सूचित करते की वेदना, आघात आणि न्यूरोडीजेनेरेटिव्ह विकाराबरोबर काही माज्जाशास्त्रीय समस्यांमध्ये देखील त्याचा भाग असू शकतो.

5. गॅसोट्रांसमीटर

गॅसोट्रांसमीटर कोणत्याही संकेत प्रक्रियेत सामील असलेल्या वायू मेसेंजर रेणूचा संदर्भाने दर्शविले जाते. ही एक अणु आणि रेणूची यंत्रणा असून रासायनिक रीतीने इंट्रासेल्युलर प्रथिने सुधारित करून त्वरित चयापचय यंत्रणा प्रभावित करतात, हे गॅसोट्रांसमीटरचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.

नायट्रिक ऑक्साईड: हे संयुग संवेदनशील स्नायूंवर परिणाम करते, त्यांना शिथिल करते ज्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि शरीराच्या विशिष्ट भागात रक्त प्रवाह वाढतो.

कार्बन मोनॉक्साईड: या रंगहीन, गंधहीन वायूचे विषारी आणि संभाव्य घातक परिणाम होऊ शकतात जेव्हा लोक या पदार्थाच्या उच्च पातळीच्या संपर्कात येतात. तथापि, हे शरीराद्वारे नैसर्गिकरित्या देखील तयार केले जाते जेथे ते एक चेतापारेषक म्हणून कार्य करते जे शरीराच्या दाहक प्रतिक्रिया सुधारण्यास मदत करते.

6. सेटीलकोलीन

सेटीलकोलीन: हे या वर्गातील एकमेव चेतापारेषक आहे. मध्यवर्ती आणि परिसिमीय मज्जासंस्थेमध्ये आढळणारे, हे एक कारक मज्जापेशीशी संबंधित प्राथमिक चेतापारेषक आहे. कारक चेतापेशींच्या टोकाकडील भागात हे रसायन आढळते. मेंदूत उत्तेजक म्हणून, तर हृदयामध्ये अवरोधक म्हणून हे चेतापारेषक कार्य करते. स्नायूंचे आकुंचन, अध्ययन प्रक्रिया व स्मृती या कार्यासाठी हे रसायन जबाबदार असते. याची निर्मिती जरुरीपेक्षा जास्त झाल्यास शरीराला आचके बसून मृत्यू ओढवू शकतो.

जेव्हा चेतापारेषक योग्य प्रमाणात कार्य करत नाही?

शरीराच्या अनेक प्रक्रियांप्रमाणेच, काहीवेळा गोष्टी विस्कळीत होऊ शकतात. मानवी मज्जासंस्थेइतकी विशाल आणि गुंतागुंतीची प्रणाली समस्यांना बळी पडते हे कदाचित आश्चर्य करण्यासारखे नाही. यामध्ये काही चुकीच्या गोष्टींचा समावेश होतो:

  • मज्जापेशी एखाद्या विशिष्ट चेतापारेषकचे पुरेसे उत्पादन करू शकत नसेल
  • चेतापारेषक खूप लवकर पुन्हा शोषले गेल्यास
  • विकरद्वारे बरेच चेतापारेषक निष्क्रिय केले जाऊ शकतात
  • विशिष्ट चेतापारेषक जास्त प्रमाणात सोडला जाऊ शकतो
  • जेव्हा रोग किंवा औषधांमुळे चेतापारेषकचे प्रभावित होतात, तेव्हा शरीरावर विविध प्रकारचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. अल्झायमर, अपस्मार आणि पार्किन्सन्स यांसारखे आजार विशिष्ट चेतापारेषकच्या कमतरतेशी संबंधित आहेत.

मानसिक आरोग्याच्या स्थितीत चेतापारेषक महत्त्वाची भूमिका निभावू शकते असे  आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ मंडळीना वाटते, म्हणूनच शरीराच्या रासायनिक संदेशवाहकांच्या कृतींवर प्रभाव टाकणारी औषधे अनेकदा विविध मानसिक स्थितींवर उपचार करण्यासाठी लिहून दिली जातात.

उदाहरणार्थ, डोपामाइन हे व्यसन आणि स्किझोफ्रेनियासारख्या गोष्टींशी संबंधित आहे. उदासीनता आणि ओसीडीबरोबर भावस्थिती विकारांमध्ये सेरोटोनिनची भूमिका असते. SSRi सारखी औषधे, नैराश्य किंवा चिंतेच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांद्वारे लिहून दिली जाऊ शकतात.

चेतापारेषकवर प्रभाव पाडणारी औषधे

रासायनिक वाहकावर परिणाम करणाऱ्या औषधांचा विकास म्हणजे चेतापारेषक कसे कार्य करतात याचा शोध आणि तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी कदाचित सर्वात मोठा व्यावहारिक उपयोजन ठरेल. ही औषधे चेतापारेषकचे प्रभाव बदलण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे काही रोगांची लक्षणे दूर होऊ शकतात.

परिणाम वाढविणारे विरुध्द परिणाम कमी करणारे: काही औषधे परिणाम वाढविणारे म्हणून ओळखली जातात आणि विशिष्ट चेतापारेषकचे प्रभाव वाढवून कार्य करतात. इतर औषधे ही विरोधी म्हणून आणि चेतापारेषकच्या प्रभावांना अवरोधित करण्यासाठी कार्य करतात.

प्रत्यक्ष विरुध्द अप्रत्यक्ष प्रभाव: या मज्जापेशी सक्रियता औषधांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव आहे की नाही यावर आधारित ते आणखी वर्गीकृत केले जाऊ शकतात. ज्यांचा थेट परिणाम होतो ते चेतापारेषकची नक्कल करून कार्य करतात कारण ते रासायनिक संरचनेबाबत तंतोतंत जुळणारे असतात. ज्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव असतो ते चेतासंधी ग्राहकपेशीवर प्रत्यक्ष कार्य करतात.

चेतापारेषकवर प्रभाव टाकणाऱ्या औषधांमध्ये नैराश्य आणि चिंता यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश होतो, जसे की SSRi, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स आणि बेंझोडायझेपाइन्स. हेरॉईन, कोकेन आणि मारिजुआना यांसारख्या बेकायदेशीर औषधांचाही चेतापारेषकावर परिणाम होतो. हेरॉइन हे प्रत्यक्ष-सक्रियता परिणाम वाढविणारे म्हणून कार्य करते, मेंदूच्या नैसर्गिक नशेची नक्कल करून त्यांच्या संबंधित ग्राहक पेशीला उत्तेजित करते. कोकेन हे अप्रत्यक्ष-सक्रियता औषधाचे उदाहरण असून ते डोपामाइनच्या प्रसारावर परिणाम करते.

समारोप

मानवी शरीरातील जवळजवळ प्रत्येक कार्यामध्ये चेतापारेषकची भूमिका महत्त्वाची असते. नैराश्य, चिंता, अल्झायमर रोग आणि पार्किन्सन रोग यासारख्या विशिष्ट आरोग्य परिस्थिती टाळण्यासाठी चेतापारेषकचे संतुलन आवश्यक आहे.

संप्रेरक असंतुलन, जुनाट जळजळ, थायरॉईड रोग आणि रक्तातील साखरेचे विकार यासारख्या अंतर्निहित आरोग्य परिस्थितीमुळे देखील न्यूरोट्रांसमीटर असंतुलन होऊ शकते. पण चेतापारेषक संतुलित आणि सुयोग्य कार्य करत आहेत याची खात्री करण्याचा कोणताही ठोस मार्ग नाही. तथापि, निरोगी जीवनशैली, नियमित साजेसा व्यायाम, संतुलित आहार, छंद जोपासणे आणि ताण-तणाव व्यवस्थापन हे काहीप्रमाणात मदत करू शकते.

पूरक औषधे वापरण्यापूर्वी, आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. पूरक औषधे ही सर्वच लोकांना एकसारखा परिणाम देतीलच असे नाही आणि बऱ्याचदा ते असुरक्षित असू शकतात, विशेषत: विशिष्ट आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी. चेतापारेषकच्या असंतुलनामुळे उद्भवलेल्या आरोग्याच्या स्थितीत अनेकदा तज्ञ  डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक असतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीची स्थिती जाणून घेण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांना भेटावे.

 (सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ

जोशी आणि जवडेकर (2016). मेंदूतला माणूसपुणे: राजहंस प्रकाशन

पलसानेम. न. (2006). मानसशास्त्रपुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन    

फोंडकेबा. (2016). अंगदेशाचा राजा मेंदूपुणे: मनोविकस प्रकाशन

मेडिनाजे. (अनुवादक – उपाध्ये) (2016). ब्रेनरूल्सऔरंगाबाद: संकेत प्रकाशन

मॉरर, आर. (अनुवाद- लाड, सं. 2014). एक छोटेसे पाऊल बदलू शकते आयुष्य, भोपाळ: मंजुळ पब्लिशिंग हाऊस

Chery, Kendra (2021). The role of Neurotransmitter, Verywellmind, online article

Eagleman, D. (2016). The Brain - The Story of You, Delhi: Canongate Books Ltd

Greene, R. (2018). The Laws of Human Nature, London: Profile Books

Kring, Johnson, Davison and Neale (2010). Abnormal Psychology. Hoboken, NJ: John Wiley & Sons

Noback, Strominger, Ruggiero and Demarest (2005). The Human Nervous System: Structure and Function, New York: Humana Press Inc

  

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...