झायगार्निक
प्रभाव | Zeigarnik effect
अपूर्ण कामांबद्दलच्या विचारांमुळे तुम्हाला
कधी त्याचा त्रास झाला आहे का? कदाचित पूर्ण न झालेल्या कामाच्या प्रकल्पाबद्दल किंवा अर्धवट
वाचलेल्या कादंबरीच्या कथानकाबद्दलचे विचारचक्र आपणास झोपू देत नाहीत. अपूर्ण आणि अडथळा
असलेल्या कार्यांबद्दलचे विचारचक्र थांबवणे इतके कठीण का आहे तर याचे एक कारण आहे.
मानसशास्त्रज्ञ याला झायगार्निक प्रभाव म्हणतात, किंवा पूर्ण केलेल्या कामांपेक्षा अपूर्ण कार्ये अधिक लक्षात
ठेवण्याची प्रवृत्ती असे म्हणतात.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम सुरू करतो पण
ते पूर्ण करत नाही, तेव्हा आपण इतर गोष्टींकडे वळलो तरीही अपूर्ण कामासंबंधीचे विचार आपल्या
मनात येत राहतात. असे विचार आपणास मागे जाण्याची आणि आपण अगोदर सुरू केलेली गोष्ट
पूर्ण करण्यास उद्युक्त करतात. म्हणूनच अनेक रोमांचक व उत्सुकता वाढविणाऱ्या
कांदबऱ्या अधिक का वाचल्या जातात? किंवा रोमांचक व उत्सुकता वाढविणारे चित्रपट का
अधिक बघितले जातात?. तसेच आपणास जिंकेपर्यंत व्हिडिओ गेम का खेळावेसे वाटते. कारण आपण
इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरीही अपूर्ण कामाचा प्रभाव पडत राहतो.
साधारण २०१६ मध्ये बाहुबली हा चित्रपट आला आणि
सगळ्यांच्या डोक्यात एक विचार घोळत राहिला तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे खरे उत्तर बाहुबली 2 ची कथा समोर
आल्यावरच कळली. तसेच डेलीसोप आणि टीव्ही मालिका या प्रभावाचा फायदा घेतात. कारण एपिसोड
संपेल, पण
कथा अपूर्ण असते. अलिकडे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्शकांना खिळवून ठेवतात आणि पुढे
काय होते हे जाणून घेण्यासाठी ते पुढील वेळी ट्यून करणे लक्षात ठेवतील यासाठी झायगार्निक प्रभाव काम करतो.
झायगार्निक
प्रभावाची सुरुवात
मानसशास्त्रामध्ये असा एक मानसिक प्रभाव आहे
त्यास त्याच्या शोधकर्त्याच्या नावावरून ओळखले जाते. या सिद्धांताची सुरुवात
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, सोव्हिएत
मानसशास्त्रज्ञ ब्लूमा झायगार्निक आणि तिचे मार्गदर्शक कर्ट लेविन यांच्याबरोबर व्हिएन्नामधील
एका व्यस्त रेस्टॉरंटमध्ये बसले असताना लेविनने तिचे लक्ष एका विचित्र नियमिततेकडे
वेधले. वेटरने नोट्सचा अवलंब न करता ऑर्डरचे सर्व तपशील उत्तम प्रकारे लक्षात
ठेवले. पण ते पूर्ण केल्यावर, आधीच्या पाहुण्यांनी नेमके काय ऑर्डर दिली हिती ते त्याला आठवत नव्हते.
तिने नोंदवले की वेटर्सना न चुकता ऑर्डर
चांगल्याप्रकारे आठवत होत्या. एकदा बिल भरल्यानंतर मात्र, वेटरना ऑर्डर्सची नेमकी माहिती लक्षात
ठेवण्यात अडचण आली. वेटरशी बोलल्यानंतर, त्यांना
असे कळले की त्यास सर्व ऑर्डर आठवणीत होत्या, परंतु
त्याने नुकतीच कोणती कामे पूर्ण केली आहेत हे आठवत नव्हते. यावरून एखादी व्यक्ती स्वत:साठी
त्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्ण आणि अपूर्ण कामे लक्षात ठेवते असे मत झायगार्निक यांनी मांडले. आपल्या प्रबंधात स्मरणशक्तीचे
एक महत्त्वाचे वैशिष्ट्य प्रस्थापित केले आणि त्याचे वर्णन केले: आपण पूर्ण
केलेल्या क्रियांपेक्षा अपूर्ण क्रिया अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो.
झायगार्निक
प्रयोग
प्रयोगांच्या अनेक मालिका तिने घेतल्या,
त्यामध्ये सहभागींना स्ट्रिंगवर मणी ठेवणे, कोडी सोडविणे किंवा गणिताच्या समस्या सोडवणे
यासारखी सोपी 15 ते 20 कार्ये पूर्ण करण्यास सांगितले गेले. एक तासाच्या
विलंबानंतर, झायगार्निकने सहभागींना ते कशावर काम करत होते याचे
वर्णन करण्यास सांगितले. तिला असे दिसून आले की ज्यांच्या कामात व्यत्यय आणला होता
त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता ज्यांनी प्रत्यक्षात पूर्ण
केली होती त्यापेक्षा दुप्पट होती.
प्रयोगाच्या दुसर्या आवृत्तीत, तिला आढळले की प्रौढ सहभागी पूर्ण झालेल्या
कामांपेक्षा 90 टक्के जास्त वेळा अपूर्ण कार्ये लक्षात ठेवण्यास सक्षम होते.
"On Finished and Unfinished Tasks" असे शीर्षक असलेल्या पेपरमध्ये झायगार्निकच्या सुरुवातीच्या अभ्यासाचे वर्णन 1927
मध्ये प्रकाशित झालेले आहे. प्रयोगांमध्ये प्रयुक्तांना अनेक बौद्धिक समस्या
सोडवाव्या लागतात. समस्येचे निराकरण यादृच्छिकपणे करण्यासाठी निश्चित वेळ सेट न
करता वेळ कालबाह्य झाली आहे असे कोणत्याही वेळी ती घोषित करत असे जेणेकरून समस्या
अपूर्ण राहतील. काही दिवसांनंतर, प्रयुक्तांना
देण्यात आलेल्या कार्यांची यादी करण्यास सांगितले असता, असे आढळून आले की समस्येच्या
निराकरणात व्यत्यय आणल्यास त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता
प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या कार्यापेक्षा दुप्पट होती, या वैशिष्ट्यास झायगार्निक प्रभाव म्हणतात. झायगार्निकला
असेही आढळले की एखाद्या कार्याची
सुरूवात स्मृतीत एक व्होल्टेज तयार करते, जे
कार्य पूर्ण होईपर्यंत डिस्चार्ज होत नाही. ते पूर्ण होण्यासाठी, कार्य साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. जर
कार्य सेट केले गेले आणि पूर्ण झाले नाही, तर आपला मेंदू आपल्याला याची आठवण करून देत
राहतो आणि आपण त्या विचारांसह अनैच्छिकपणे त्याकडे परत जातो. हा प्रभाव आपल्या
जीवनात प्रत्येक टप्प्यावर दिसून येतो. बहुदा, प्रत्येक
व्यक्तीस त्याची कार्ये पार पाडायची असतात आणि पूर्णतेचा अनुभव घ्यायचं असतो.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने झायगार्निक प्रभाव
तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर परीक्षेच्या आदल्या रात्रभर अभ्यास
करण्यापेक्षा तुमचे अभ्यासाचे सत्र खंडित स्वरूपाचे असावे. सलग अभ्यास न करता
ठराविक अंतराने विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमाने अभ्यास केल्यास लक्षात राहण्यास
मदत होते. त्यामुळे अधिक विषयांचा अभ्यास करून, तुम्हाला चाचणीच्या दिवसापर्यंत लक्षात
राहण्याची शक्यता जास्त असेल.
जर तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी
अवघड जात असेल, तर
क्षणिक व्यत्यय तुमच्या फायद्यासाठी कार्य करू शकतो. माहितीची पुन्हा पुन्हा
पुनरावृत्ती करण्याऐवजी, त्याचे काही वेळा पुनरावलोकन करा आणि नंतर विश्रांती घ्या. तुम्ही
इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असताना, तुम्ही अभ्यास करत असलेल्या माहितीकडे
मानसिकदृष्ट्या परत येत असता.
दिरंगाईवर मात करण्यासाठी
बर्याचदा, आपण अंतिम क्षण येत नाही तोपर्यंत काम हाती घेत
नाही, अंतिम
मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी केवळ धावपळीत पूर्ण करतो.
दुर्दैवाने, या
प्रवृत्तीमुळे केवळ मोठ्या प्रमाणावर ताणच येतो असे नाही, तर यामुळे कामगिरीदेखील खराब होऊ शकते.
दिरंगाईवर मात करण्याचा एक मार्ग म्हणून झायगार्निक प्रभाव कार्य करतो. कोणतेही काम कितीही
लहान असले तरीही पहिले पाऊल उचलून सुरुवात करा. एकदा तुम्ही तुमचे काम सुरू
केल्यावर—परंतु पूर्ण झाले नाही—तर, शेवटी, तुम्ही ते पूर्ण करेपर्यंत स्वतः त्या कार्याचा
विचार कराल. आपण हे सर्व एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही, परंतु आपण उचललेले प्रत्येक लहान पाऊल
आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाच्या जवळ घेऊन जाते.
हा दृष्टीकोन केवळ तुम्हाला कार्य पूर्ण
करण्यास प्रवृत्त करत नाही, तर एखादे काम पूर्ण केल्यानंतर आणि आपली मानसिक शक्ती इतरत्र लागू
करण्यास सक्षम झाल्यावर काहीतरी प्राप्त केल्याची भावना देखील निर्माण करू शकते.
आवड आणि लक्ष वेधून घेणे
ग्राहकांना उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित
करण्यासाठी जाहिरातदार आणि विक्रेता देखील झायगार्निक प्रभावचा वापर करतात. चित्रपट
निर्माते, गंभीर
तपशील सोडून लक्ष वेधण्यासाठी डिझाइन केलेले चित्रपटाचे ट्रेलर तयार करतात. ते
दर्शकांचे लक्ष वेधून घेतात आणि लोकांच्यामध्ये
उत्सुकता वाढवतात. यांचे एक छान उदाहरण पाहू या...
व्ही शांताराम यांनी त्याकाळी पिंजरा
चित्रपटाचे प्रमोशन हटके अंदाजात केलेले पाहायला मिळाले होते. वेळेची कमतरता आणि
अपुरा पैसा ह्यामुळे चित्रपटाच्या जाहिराती करणे देखील कठीण होत होते. अश्यातच नवी
युक्ती सुचली आणि इतिहास घडला. पुण्यातील रिक्षांवर कुठलाही फोटो न छापता केवळ
‘पिंजरा’ लिहूनच प्रमोशन केले होते. त्यामुळे हा पिंजरा नक्की आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला
होता. अखेर ३१ मार्च १९७२ चा तो दिवस उजाडला आणि प्रेक्षकांनी पिंजरा चित्रपट
पाहण्यासाठी चित्रपट गृहाबाहेर तुडुंब गर्दी केलेली पाहायला मिळाली.
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम देखील या धोरणाचा
वापर करतात. मालिकांचा भाग बर्याचदा उत्कंठा वाढवून संपवतात किंवा पुढील भागात
नेमके काय होणार हे दाखविण्याचा प्रयत्न केलें जातो जेणेकरून उत्सुकता निर्माण
करतात. असा सस्पेन्स आणि तणाव वाढवून तसेच काय होते हे जाणून घेण्यासाठी दर्शकांना
पुढील भागासाठी ट्यून इन करण्यास प्रवृत्त केले जाते.
समारोप
झागार्निक प्रभाव सांगते की पूर्ण झालेल्या
कामांपेक्षा अपूर्ण कामे लोकांच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. या
सिद्धांताचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यत्यय
आलेले काम, अपूर्ण
प्रकल्प आपले लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देण्याची त्यांची
प्रवृत्ती असते. सतत उद्दिष्ट निश्चित केल्यामुळे आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण
होण्यासाठी आवश्यक असलेल्या विचारांमुळे नकारात्मक परिणाम, तणाव आणि चिंता निर्माण
होऊ शकते. तथापि, हे सिद्धी आणि सुधारित स्व-मूल्याची उत्तम भावना देखील देऊ शकते. एकूणच, झागार्निक परिणाम आपल्या वैयक्तिक
मानसिक आरोग्यावर अवलंबून असतो. कोणतेही काम पूर्णत्त्वास नेत असताना थोडासा ताण
अपेक्षित आहे पण त्याचे फलित उत्तमच असेल. तसे पाहिल्यास जीवनाचा प्रवास हा
अपूर्णच असतो तो कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे अपूर्णतेकडून पूर्णत्त्वाकडे जाणारा
हा प्रवास आनंदमयी होवो हीच प्रार्थना!
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ
Nickerson,
C. (2021). What Is the Zeigarnik Effect? Definition and
Examples. Simply Psychology. retrieved from www.simplypsychology.org/zeigarnik-effect.html
Mazur,
Elena (1996). The Zeigarnik Effect and the Concept of Unfinished Business in
Gestalt Therapy, British Gestalt Journal, Vol.5/1, pp.18-23.
Savitsky,
K., Medvec, V. H. and Gilovich,
T., (1997) Remembering and Regretting: The Zeigarnik
Effect and the Cognitive Availability of Regrettable Actions and Inactions, Personality
and Social Psychology Bulletin, Vol.23/3, pp.248-257