रविवार, १२ एप्रिल, २०२०

प्रत्यक्ष प्रमाण | perception |

प्रत्यक्ष प्रमाण |Perception 
ज्ञान प्राप्तीच्या दृष्टीने पाहता चार्वाक हे प्रत्यक्षवादी आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान यांसारख्या प्रमाणापैकी त्यांना केवळ प्रत्यक्ष हेच प्रमाण मान्य आहे. पंचज्ञानेद्रिये व कर्मेन्द्रिये यांनी मिळणारे ज्ञान हेच त्यांना सत्य व विश्वसनीय साधन वाटते. डोळयांना जे दिसते कानांना जे ऐकायला येते, जिभेला जी रूची कळते, नाकाला जे वास कळतात आणि त्वचेला जे स्पर्ष कळतात तेवढेच खरे असतात. त्याच्या पलीकडे जे काही असते ते खरे की खोटे हे समजण्यास वाव नसते. चार्वाक हे अस्सल अनुभववादी आहेत. ते केवळ प्रत्यक्षावर भरवसा ठेवतात.
प्रत्यक्षमेव प्रमाणम।असे जे चार्वाक म्हणतात त्याचा अर्थ कोणत्याही ज्ञानाची सत्यता ठरविण्यासाठी ते पडताळून पाहिले पाहिजे किंवा प्रत्यंतर घेतले पाहिजे म्हणजे प्रत्यंतरक्षमता हा सत्याचा महत्वाचा निकश आहे आणि तोच निकश आपणास अधिकाधिक प्रमाणात सत्य प्राप्त करून देतो.
सांख्य तत्वज्ञानात ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द किंवा आप्तवाचन ही तीन प्रमाणे मानली आहेत. ज्ञानाचा उगम ज्ञानेंद्रियांच्या कार्यातून होत असतो. पुरूषाला अनुभव देण्यासाठी बुध्दीची व आंतर विषयांची निर्मिती झालेली आहे. वाचस्पतीच्या मतानुसार जेव्हा कोणाचाही बाहय जगाषी इंद्रियांच्या मार्फत संबंध येतो तेव्हा बुध्दी बाहय विषयाचा आकार घेते. प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन टप्पे असतात व ते म्हणजे निर्विकल्पक आणि सविकल्पक प्रत्यक्ष वाचस्पतीच्यामते प्रत्यक्ष ज्ञानासाठी मनाच्या कार्याची आवश्यकता असते. मन संवेदांची मांडणी करते; त्याचे विश्लेषण व संश्लेषण करून त्याची योग्य रीतीने मांडणी करून मग त्याचे स्वरूप ठरविते. परंतु विज्ञान भूक्षूच्या मते मात्र तसे होत नाही. त्यांच्यामते मन इंद्रिय संवेदनांना जोडणे किंवा त्यांचे संश्लेषण करणे वगैरे करीत नाही. तर बुद्धीचा इंद्रीयाव्दारा ज्ञेय विषयाशी सरळ प्रत्यक्ष संबंध येतो, आणि मनाच्या मार्फत फक्त इच्छा, संशय, कल्पना यांची जाणीव होते. परंतु इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान हे कॅमेऱ्यातून जसे वस्तूंचे छायाचित्र घेतले जाते तसे अगदीच कृत्रिम, यांत्रिक व्यक्तिनिरपेक्ष नसते. कारण जेंव्हा अनुभव घेतला जातो. तेव्हा तो कोणीतरी व्यक्ती म्हणजे तिचा अहंकार किंवा आत्मा घेत असतो. याबाबतीत प्रत्येक व्यक्तीचा अनुभव स्वतंत्र व वेगळा असतो. बाह्य परिस्थिती जरी तीच असली तरी अनुभव घेण्याच्या क्रियेत व्यक्तिसापेक्षता व व्यक्तिभेद आल्याशिवाय राहत नाहीत.
प्रत्यक्षज्ञान, पूर्णपणे व्यक्तिनिरपेक्ष व वस्तुनिश्ठ होऊ शकत नाही. पण व्यक्तिसापेक्षतेचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते. पण प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर जर एखादी कृती करण्याची आवश्यकता निर्माण होत असेल तर तेव्हा मात्र बुध्दी मध्यस्थी करते, आणि कर्मेद्रियांना अनुकूल किंवा प्रतिकूल क्रिया करण्यास किंवा कांही न करता तटस्थ राहण्यास आदेश देते. म्हणजे बुध्दी ही निश्चयात्मक किंवा संकल्पनात्मक कार्य करते. या तिघांना जर आपण अंतःकरण हा शब्द वापरला तर त्यात या सर्व कार्यांचा समावेष होतो.
अक्ष्णोः प्रति प्रत्यक्षम!असा प्रत्यक्षाचा सरळ अर्थ आहे. डोळयांना म्हणजेच प्रत्येकाच्या ज्ञानेंद्रियाना जे दिसते किंवा कळते ते प्रत्यक्ष होय. ज्ञानाचा उदय इंद्रियांचा त्यांच्या विशयांशी (वस्तूषी) संबंध येतो त्यातून होतो. त्यावेळी नांवे, शब्द यांच्याशी त्याचा संबंध आलेला नसतो. यात यौगिक प्रत्यक्षाचा अंतर्भाव होत नाही म्हणून विश्वनाथाने प्रत्यक्ष ज्ञानाची अधिक अचूक व्याख्या करताना म्हंटले आहे की, प्रत्यक्ष ज्ञान हे असे असते की जे दुस-या कोणत्याही ज्ञानसाधनाकडून निर्माण होत नाही. इंग्रजीत प्रत्यक्षाला (Direct knowledge) किंवा संवेदन (Perception) म्हंटले आहे. प्रत्यक्षाचे लौकिक व अलौकिक असे दोन प्रकार आहेत. लौकिक प्रत्यक्षात पंचज्ञानेंद्रियांचे कार्य अभिप्रेत असते. चर्मचक्षूसारखी जे शरीराची पंचज्ञानेंद्रिये आहेत. त्यांच्याच मार्फत बाहय जगातील वस्तू व त्यांचे गुणधर्म यांचे ज्ञान प्रत्यक्षात अंतर्भूत असते. लौकिंक प्रत्यक्ष ज्ञानेंद्रिये, ज्ञेयवस्तू, मन, आत्मा व त्यांचे परस्परसंबंध ही सर्व गृहीत धरते.
तत्वचिंतामणीत म्हंटले आहे, ‘प्रत्यक्षस्य साक्षात्कारित्वं लक्षणम!’ केवळ इंद्रियवेदन (Sensetion) म्हणजे ज्ञान नसते. परंतु इंद्रियांच्या कार्याशिवायही मनाचा बाहय जगाशी संबंध येऊ शकत नाही. इंद्रियांच्याव्दारा जे जाणते ते मन असते, आणि मनाला जी जाणीव होत असते ती आत्म्यामुळे होत असते, कारण आत्मा हेच अंतिम चित्तत्व असते. ज्ञानप्रक्रियेची शृंखला अर्थ (प्रमेय विषयद्) ज्ञानेंद्रिये, मन व आत्मा अशी असते.
जैनांच्या मते प्रत्यक्ष ज्ञान बाहय विषय त्यांचे विविध गुणधर्म, रंग, आकार, रुप वगैरे सर्व उघड करुन दाखविते आणि ते ज्ञान आत्म्यावरील आवरण दूर सारुन होत असल्यामुळे ते आतून होते. ज्ञेय विषय (वस्तू) विज्ञानवादी बौध्द समजतात तसे नुसते ज्ञानाचे आकार नसतात. बाहय विषयांचे ज्ञान, चक्षुरादी इंद्रियाव्दारा जरी होत असले तरी खरे ज्ञान चर्मचक्षूना किंवा चर्म कर्मांना होत नसून आत्म्याच्या ठिकाणी अदृश्य दृष्टिशक्ती असते, व त्या पंचशक्ती आत्म्याच्या ठिकाणी असतात. पण खरे ज्ञान आत्म्याला त्यांच्याशी संबंध येऊन त्यांच्यामार्फत होत असते.
ज्ञानेंद्रिये ही खिडंक्यासारखी असतात व त्यांच्यामधून बाहय वस्तूंचे ज्ञान आत्म्याला होते. मनाचा आपणास अनुभव येत नसलयामुळे जैन मनाचे एक इंद्रिय म्हणून अस्तित्व नाकारतात आणि त्यांचे अस्तित्व मानण्याच्या अभ्युपगमाची आपणास आवश्यकता राहत नाही, कारण मनाचे कार्य आत्मा करीतच असतो. वस्तूंचे संवेदन होणे म्हणजे वस्तुविषयांच्या अज्ञानाचा पडदा दूर होणे आंतरिकदृष्टया पाहिल्यास अज्ञानावरण दूर होणे हे संवेद्य वस्तूची उपस्थिती, प्रकाश, ज्ञानेंद्रियांची क्षमता आणि यांसारख्या इतर गोष्टींकडून ठरविले जाते.
स्वतंत्र विज्ञानवादानुसार (बौद्ध) ज्ञानाची खरी प्रमाणे दोनच होत व ती म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यापैकी प्रत्यक्ष हे शुध्द इंद्रियवेदन असते व भ्रमविहीन असते. त्यांच्यामते विचाराच्या बाहेर अशा बाहय वस्तू नसतातच. दिङ्नागाने प्रत्यक्षाची व्याख्या करताना म्हंटले आहे की, नाम, संज्ञान, सामान्य यासारख्या विचारनिर्धाणापासून जे मुक्त असते असे इंद्रियवेदन म्हणजेच प्रत्यक्ष होय. प्रत्यक्ष (प्रमाण समुच्चय) हे आलोचनमात्र असते आणि ते सामान्य, विशेष, संबंध, गुण व कर्म यापैकी कशानेही बध्द व निर्धारित होत नाही. अशा विचार निर्धारकांची निर्मिती दिङ्नागाच्या मते बुध्दीकडून होत असते. प्रत्यक्ष हे शुध्द वेदन असते. अशा प्रत्यक्षाला नैयायिक ‘निर्विकल्प प्रत्यक्षम्हणतात व निचारनिर्धारकांनी होणाऱ्या ज्ञानाला ‘सविकल्प ज्ञान’ म्हणतात.
शबराच्या (मीमांसक) मते, जेव्हा इंद्रियांचा प्रमेयाशी किंवा ज्ञेयविषयाशी सन्निकर्ष होतो, जेव्हा साक्षात प्रतीती येते तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाची उत्पत्ती होते. जेव्हा वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव येतो किंवा इंद्रिय संवेदन हाते. तेव्हा होणारे ज्ञान युक्त किंवा प्रमाण असते आणि जेव्हा संवेदित विषयापेक्षा ज्ञेयविषय वेगळा आहे असे जाणवते किंवा दिसते तेव्हा ते ज्ञान प्रमाण नसते.

प्रभाकराच्या मते, प्रत्यक्ष ज्ञान ही ‘साक्षात प्रतीति’ असते. ज्ञानाच्या प्रक्रियेत ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे तीन घटक असतात. त्यास ‘त्रिकूट प्रत्यक्षवाद’ म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञानाला आवश्यक असणारी सहा इंद्रिये असतात. शोत्र, घ्राण, रसना, त्वक आणि चक्षू ही पाच आणि सहावे मन हे अंतरिंद्रिय असते. 

संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

  आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness जीवनात आनंदी राहायचे असेल तर खूप सोपे आहे, पण आनंदी आहे हे दाखवायचे असेल तर ते महाग आहे. कारण...