रविवार, १२ एप्रिल, २०२०

प्रमाणशास्त्र | Pramanas |


प्रमाणशास्त्र (ज्ञानमीमांसा)
तत्त्वज्ञान म्हणजे काय ?
तत्त्वज्ञानाचा उगम हा प्राचीन भारतीय व पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या चिंतनातून झालेला आहे. प्राचीन काळी तत्त्वज्ञानाचे मूळ हे मानवी कुतुहलात दिसून येते. आपल्या अनुभवाला येणाऱ्या विश्वातील अनेक घटकांचा शोध घेऊन बुद्धीच्या सहाय्याने त्यांचे विश्लेषण त्यांनी केलेले आढळते. तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाकडे व विश्वाकडे पाहण्याचा मुलगामी दृष्टीकोन निर्माण करते. भारतीय व प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान हे कुतुहलातून उदयास पावलेले आहे.
'तत्त्वज्ञान' हा शब्द अतिशय संदिग्ध असल्यामुळे तो व्यापकही बनलेला आहे. विश्वाविषयींचे मूलगामी चिंतन म्हणजे तत्त्वज्ञान असा त्यांचा सर्वांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे. म्हणून तत्त्वज्ञानाला सदवस्तुशास्त्र, सत्ताशास्त्र (मेटॅफिजिक्स) असे म्हटले जाते. कोणत्याही विषयाचे मूलगामी व तर्कशुद्ध विवेचन म्हणजे तत्त्वज्ञान मानले जाते. या शब्दाच्या अशा अनिश्चित व विशाल व्याप्तीमुळे तो संदिग्ध राहिल्यास आश्चर्य नाही.
तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वासंबंधीचे ज्ञान होय. तत् म्हणजे ते जे काही आहे ते, ते सर्व एकूण एक या ‘तत्’चा ‘तत्’पणा म्हणजे तत्त्व होय. यालाच तत् चे सार असे म्हणतात. तत्त्वज्ञान या संयुक्त शब्दात तत्त्व आणि ज्ञान असे दोन शब्द असून तत्त्व या शब्दाचा अर्थ सत्य किंवा यथार्थ असाही आहे. यावरुन तत्त्वज्ञान म्हणजे सत्य किंवा यथार्थ स्वरुपाचे ज्ञान होय. तत्वज्ञान म्हणजे सत्यासाठी बौद्धिक शोध ह्या तत्वज्ञानाच्या व्युत्पत्ती विषयक अर्थाशी पाश्चिमात्य तत्वज्ञान जवळपास प्रामाणिक राहिले आहे. मानवाचे स्वरुप आणि आपण वास्तव्य करीत असलेल्या वास्तवाचे स्वरुप यांच्याशी निगडित कल्पनांची सर्वकष प्रणाली म्हणजे तत्वज्ञान. यावरून आपण असे म्हणू शकतो की मानवी जीवनाचे सर्व पैलू तत्वज्ञान विषयक विचारांनी प्रभावित व नियंत्रित आहेत. अभ्यासाचे एक क्षेत्र म्हणून तत्वज्ञान ही सर्वात जुनी शाखा आहे. तिला सर्व शास्त्रांची जननी मानले जाते. खरं तर सर्व ज्ञानाच्या मूळाशी तीच आहे.
तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वमिमांसा, मुल्यमिमांसा व ज्ञानमिमांसा अशा तीन शाखा आहेत. वस्तूंच्या स्वरूपाचा अभ्यास म्हणजे तत्त्वमिमांसा, कला आणि सौंदर्याबद्दलच्या तत्त्वज्ञान विषयक प्रश्नांचा अभ्यास मुल्यमिमांसेत होतो तर ज्ञानाचे स्त्रोत आणि पद्धतीचा अभ्यास ज्ञानमिमांसेत केला जातो ज्यामध्ये प्रमा, प्रमाण आणि पद्धती यांचा समावेश होतो. 

प्रमा (युक्त ज्ञान):
न्याय दर्शनाच्या मते प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान होय. तसेच प्रमा जी वस्तू जशा प्रकारची असते त्याच रूपात ती समजणे म्हणजे प्रमा होय. जेव्हा सत्त्याचे यथार्थ ज्ञान होते तेव्हा त्यास प्रमा म्हणतात.
प्रमाण :
1. ज्ञानप्राप्तीचे मार्ग, पध्दती म्हणजे प्रमाण होय.
2. ज्ञानाची चिकित्सा म्हणजे प्रमाण होय.
3. ज्ञान यथार्थ असणे/ तपासणे म्हणजेच प्रमाण होय.
4. ज्याने ज्ञेय पदार्थांचे ज्ञान होते त्यास प्रमाण म्हणतात.
5. प्रमाण ज्ञान म्हणजे वस्तू स्वतः असते तशा तिच्या स्वरूपाचे ज्ञान होणे होय.

प्रमाणाचे स्वरूप –
सर्वच भारतीय दर्शनानी प्रमाण चिकित्सा ही फार मोलाची मानलेली आहे.
1. प्रत्यक्ष (क्वचित प्रत्यक्षाधारित अनुमान) हे एकच प्रमाण चार्वाकांनी स्वीकारले आहे.
2. बौध्द, जैन आणि वैषेशिक या दर्शनानी प्रत्यक्ष आणि अनुमान अशी दोन प्रमाणे स्वीकारलेली आहेत.
3. सांख्य, योग, माध्व व विशिष्टाव्दैती हे तिघेही प्रत्यक्ष, अनुमान व शब्द ही तीन प्रमाणे मानतात.
4. वरील तीन व शिवाय उपमान अशा चार प्रमाणांचा स्विकार न्यायदर्शनाने केलेला आहे.
5. वरील चार व शिवाय अर्थापत्ति हे पाचवे अशी पाच प्रमाणे प्रभाकर मीमांसक मानतात.
6. वरील पाच म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान व अर्थापत्ति आणि शिवाय अनुपलब्धि अशी सहा प्रमाणे भाट्ट मीमांसक आणि अव्दैतवेदांती यानी मानलेली आहेत. मात्र उपमान-प्रमाण याचा मीमांसकांनी केलेला अर्थ व नैययिकांनी केलेला अर्थ मात्र भिन्न आहे.

एकूण प्रमाणांचे सहा प्रकार भारतीय दर्शनांनमधून दिसून येतात.
1. प्रत्यक्षः चार्वाक, (केवळ प्रत्यक्ष)
2. अनुमानः बौध्द, जैन व वैशेषिक, (प्रत्यक्ष व अनुमान)
3. शब्द किंवा आप्तवचन: सांख्य, योग, माध्व व विशिष्टाव्दैती (वरील दोन व शब्द)
4. उपमानः न्याय दर्शन (वरील तीन व उपमान)
5. अर्थापत्तिः प्रभाकर मीमांसक (वरील चार व अर्थापत्ति)
6. अनुपलब्धिः भाट्ट मीमांसक व अव्दैतवेदांती (वरील सर्व)
     प्रत्येक प्रमाणाचे स्पष्टीकरण आपण पुढील लेखामधून पाहणार आहोत.

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह 
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

बार्नम प्रभाव | Barnum Effect

  बार्नम प्रभाव | Barnum Effect पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) ...