स्टीव्हन
पिंकर (Steven Pinker): भाषा, मन आणि मानवी प्रगतीचा वैज्ञानिक प्रवास

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
आधुनिक
मानसशास्त्र, बोधनिक विज्ञान आणि भाषाशास्त्र या
क्षेत्रांमध्ये काही व्यक्तींनी मानवी विचारप्रक्रिया, भाषा
आणि वर्तन समजून घेण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणले. त्यापैकी एक
महत्त्वाचे नाव म्हणजे स्टीव्हन पिंकर. बोधनिक मानसशास्त्रज्ञ,
भाषातज्ज्ञ, विज्ञानलेखक आणि सार्वजनिक
बुद्धिजीवी म्हणून पिंकर यांनी भाषा, मानवी मन, उत्क्रांती मानसशास्त्र आणि मानवी प्रगती यांविषयी नवे बौद्धिक दृष्टिकोन
विकसित केले आहेत (Pinker, 1994; Pinker, 2002).
बालपण, कुटुंब आणि प्रारंभिक जीवन
स्टीव्हन
आर्थर पिंकर यांचा जन्म 18 सप्टेंबर 1954 रोजी कॅनडातील क्युबेक प्रांतातील मॉन्ट्रियल येथे एका मध्यमवर्गीय ज्यू
कुटुंबात झाला. त्यांचे बालपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि
शैक्षणिक मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात गेले. त्यांच्या कुटुंबाने
औपचारिक शिक्षण, बौद्धिक स्वातंत्र्य आणि चिकित्सक विचारसरणी
यांना विशेष महत्त्व दिले, ज्याचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण
व्यक्तिमत्त्वावर आणि बौद्धिक विकासावर पडला.
त्यांचे
वडील हॅरी पिंकर हे वकील आणि नंतर उद्योगक्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी म्हणून
कार्यरत होते, तर आई रोझालिन पिंकर या शैक्षणिक
सल्लागार आणि उपमुख्याध्यापिका होत्या (Pinker, 2018). त्यामुळे
घरामध्ये शिक्षण, वाचन आणि बौद्धिक चर्चा यांचे वातावरण
होते. बालपणीच पिंकर यांना पुस्तकवाचन, विज्ञान आणि मानवी
वर्तन समजून घेण्याची आवड निर्माण झाली.
मॉन्ट्रियल
हे द्विभाषिक शहर असल्यामुळे इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषांचा पिंकर यांच्या
मानसिक विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला. बहुभाषिक सामाजिक वातावरणात वाढल्याने
भाषा कशी शिकली जाते, मानवी मेंदू भाषेची
प्रक्रिया कशी करतो आणि संवादाची जैविक पायाभूत रचना काय असते, याविषयी त्यांच्यामध्ये बालपणापासूनच कुतूहल निर्माण झाले. पुढे याच
कुतूहलाने त्यांना भाषाविज्ञान आणि भाषामानसशास्त्र या क्षेत्राकडे आकर्षित केले (Pinker,
1994).
बालपणातच
त्यांच्यामध्ये प्रश्न विचारण्याची सवय आणि पारंपरिक गृहितकांवर चिकित्सक दृष्टीने
विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येत होती. विज्ञानकथा, इतिहास, मानसशास्त्र आणि लोकप्रिय विज्ञान साहित्य
यांचे वाचन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये नमूद
केले आहे की, बालवयात विज्ञान आणि तर्कशास्त्राविषयी असलेले
आकर्षण पुढे त्यांच्या शैक्षणिक संशोधनाचा पाया बनले (Pinker, 2018).
स्टीव्हन
पिंकर यांच्या बालपणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे 1960–70 च्या दशकातील सामाजिक आणि राजकीय बदलांचा त्यांच्यावर झालेला प्रभाव.
विज्ञानातील झपाट्याने होणारी प्रगती, मानवी हक्क चळवळी,
सामाजिक न्यायावरील चर्चा आणि विवेकनिष्ठ विचारसरणी यामुळे त्यांनी
वैज्ञानिक मानवतावाद स्वीकारला. पुढे Enlightenment Now (2018) मध्ये त्यांनी विज्ञान, तर्क आणि मानवतावाद यांचे
समर्थन करताना याच मूल्यांना अधोरेखित केले.
त्यांच्या
बालपणाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, स्टीव्हन पिंकर यांची बौद्धिक जिज्ञासा ही अचानक विकसित झालेली नव्हती;
ती कौटुंबिक वातावरण, बहुभाषिक संस्कृती,
वाचनाची आवड आणि प्रश्न विचारण्याच्या सवयीमधून क्रमशः विकसित झाली
होती. म्हणूनच, त्यांच्या जीवनाचा प्रारंभिक टप्पा हा पुढील
संशोधनकार्यासाठी मजबूत पाया मानला जाऊ शकतो.
शिक्षणप्रवास: मॉन्ट्रियल ते हार्वर्ड
स्टीव्हन पिंकर यांचा शैक्षणिक
प्रवास हा प्रतिभा, जिज्ञासा आणि कठोर बौद्धिक परिश्रम
यांचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. मॉन्ट्रियलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडातील प्रतिष्ठित McGill
University मध्ये प्रवेश घेतला. McGill
University ही त्या काळात मानसशास्त्र, न्यूरोसायन्स
आणि बोधात्मक संशोधनासाठी अग्रगण्य संस्था मानली जात होती. येथे त्यांनी 1976
मध्ये प्रायोगिक मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली (Pinker,
2018).
McGill
University मधील शिक्षणादरम्यान पिंकर यांची आवड विशेषतः मानवी भाषा, बोधन आणि
मेंदूच्या कार्यप्रणालीकडे वळली. या काळात अमेरिकन भाषातज्ज्ञ नॉम चॉम्स्की यांच्या Universal Grammar या सिद्धांताचा
त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. चॉम्स्की यांनी भाषा ही केवळ अनुकरणातून शिकली जात
नाही, तर तिच्यामागे जैविक आणि मानसिक संरचना कार्यरत असतात, हा विचार
मांडला होता. हा दृष्टिकोन पिंकर यांच्या पुढील संशोधनासाठी मूलभूत प्रेरणा ठरला (Chomsky,
1965).
उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील
प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठ मध्ये प्रवेश
घेतला. हार्वर्डमध्ये त्यांनी प्रायोगिक
मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट संशोधन केले. 1979 मध्ये त्यांनी Ph.D.
पूर्ण केली (Pinker,
2018). Harvard
मधील त्यांच्या
संशोधनाचा केंद्रबिंदू भाषा, मानसिक प्रतिमा, शब्दप्रक्रिया आणि बोधनिक विकास हा होता.
हार्वर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना पिंकर यांनी मानसशास्त्र, न्यूरोसायन्स, भाषाविज्ञान
आणि संगणकीय विज्ञान यांच्यातील आंतरविद्याशाखीय संबंधांचा सखोल अभ्यास केला. याच काळात बोधनिक
विज्ञान या नव्याने विकसित होत असलेल्या क्षेत्राकडे त्यांचे विशेष लक्ष गेले.
मानवी मन ही माहिती प्रक्रिया करणारी प्रणाली आहे, हा दृष्टिकोन
त्यांनी स्वीकारला आणि त्याचा पुढे त्यांच्या संशोधनात प्रभाव दिसून येतो (Pinker,
1997).
Ph.D.
नंतर त्यांनी हार्वर्ड, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि Massachusetts
Institute of Technology (MIT) येथे अध्यापन आणि संशोधनकार्य केले. विशेषतः MIT मध्ये त्यांनी
अनेक वर्षे बोधात्मक विज्ञान आणि भाषा मानसशास्त्रावर संशोधन केले, ज्यामुळे ते
जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त शास्त्रज्ञ बनले.
मॉन्ट्रियलमधील एका जिज्ञासू
विद्यार्थ्यापासून हार्वर्डमधील संशोधक आणि पुढे जागतिक ख्यातीचे मानसशास्त्रज्ञ
होण्यापर्यंतचा पिंकर यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा
प्रवास दाखवून देतो की, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्न
विचारण्याची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने सामान्य
पार्श्वभूमीतूनही जागतिक बौद्धिक नेतृत्वापर्यंत पोहोचता येते.
भाषाविज्ञान, बोधनिक मानसशास्त्र
आणि भाषा मानसशास्त्रामधील योगदान
स्टीव्हन पिंकर हे आधुनिक
काळातील बोधनिक मानसशास्त्र, भाषाविज्ञान आणि भाषा
मानसशास्त्र या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण
योगदान देणारे संशोधक मानले जातात. त्यांनी विशेषतः मानवी भाषा ही केवळ सामाजिक शिक्षणाचा परिणाम नसून, ती
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विकसित झालेली जैविक क्षमता आहे, हा विचार
प्रभावीपणे मांडला. त्यांच्या संशोधनामुळे भाषा, विचारप्रक्रिया, मानवी मेंदू
आणि उत्क्रांती यांच्यातील संबंध अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत झाली.
1. भाषाविज्ञानातील (Linguistics)
योगदान
पिंकर यांच्या भाषाविषयक संशोधनावर नॉम
चॉम्स्की यांच्या Universal Grammar सिद्धांताचा
मोठा प्रभाव दिसून येतो. चॉम्स्की यांनी असा युक्तिवाद केला की प्रत्येक मानवी
बालक जन्मतः भाषेच्या काही मूलभूत संरचनात्मक नियमांसह जन्माला येते आणि भाषेचे
अधिग्रहण हे केवळ अनुकरण
किंवा प्रबलनावर आधारित नसते. पिंकर यांनी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय आणि
उत्क्रांतिवादी दृष्टिकोनातून विस्तार केला (Pinker, 1994).
पिंकर यांच्या मते, भाषा ही केवळ
संवादाचे साधन नसून ती मानवी मेंदूतील विशिष्ट मानसिक रचनेचा भाग आहे.
त्यांनी भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत मुलांच्या नैसर्गिक क्षमतेवर भर दिला.
उदाहरणार्थ, लहान मुले औपचारिक शिक्षणाशिवाय व्याकरणाचे
गुंतागुंतीचे नियम आत्मसात करतात, हे दर्शविते की भाषेचे अधिगम
पूर्णपणे बाह्य वातावरणावर अवलंबून नाही (Pinker, 1994).
याशिवाय, त्यांनी irregular
verbs आणि
language processing संदर्भातील संशोधनातून भाषेतील नियम आणि
स्मरणशक्ती यांच्यातील संबंध स्पष्ट केला. त्यांनी दाखवून दिले की काही शब्द
मेंदूत नियमांद्वारे प्रक्रिया होतात, तर काही स्मरण पुनर्प्राप्ती
पद्धतीने वापरले जातात. उदाहरणार्थ,
“walk →
walked” हा नियमाधारित
बदल असतो; परंतु “go →
went” हा अपवादात्मक
बदल स्मरणशक्तीवर आधारित असतो (Pinker & Ullman, 2002).
2. बोधनिक मानसशास्त्रातील योगदान
बोधनिक मानसशास्त्राच्या क्षेत्रात
पिंकर यांनी “मन कसे कार्य करते?” या मूलभूत प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर
शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मत असे आहे की मानवी मन हे एक माहिती-प्रक्रिया
प्रणाली आहे, जी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निर्माण झाली आहे.
त्यांच्या How the Mind Works या ग्रंथात त्यांनी संवेदन, तर्क, भाषा, स्मरण, भावना आणि जाणीव यांचे उत्क्रांतिवादी विश्लेषण सादर केले (Pinker,
1997).
पिंकर यांनी मानवी मेंदूला “general-purpose
computer” मानण्याऐवजी त्याला “specialized
mental modules” असलेली प्रणाली मानले. म्हणजेच मानवी मेंदूत विविध मानसिक कार्यांसाठी
विशिष्ट cognitive mechanisms विकसित झाले आहेत. उदाहरणार्थ, चेहरा ओळखणे, भाषा समजणे, सामाजिक संकेत
समजून घेणे इत्यादींसाठी स्वतंत्र बोधात्मक यंत्रणा असतात. हा दृष्टिकोन उत्क्रांती
मानसशास्त्राशी संबंधित आहे (Pinker, 1997).
त्यांच्या मते, बोधन समजण्यासाठी जैविक उत्क्रांती आणि न्यूरोसायन्स यांचा आधार घेणे
आवश्यक आहे. त्यामुळे बोधनिक मानसशास्त्रात त्यांनी एक आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन विकसित केला, ज्यामध्ये मानसशास्त्र, भाषाविज्ञान, जीवशास्त्र आणि
संगणकीय विज्ञान यांचे एकत्रीकरण दिसते.
3. भाषा मानसशास्त्रातील (Psycholinguistics)
योगदान
Psycholinguistics
म्हणजे भाषा
आणि मानसिक प्रक्रिया यांच्यातील संबंधांचा अभ्यास. या क्षेत्रात पिंकर यांचे
योगदान विशेषतः भाषा संपादन, भाषा प्रक्रिया आणि मानसिक शब्दकोश यांसंदर्भात महत्त्वाचे आहे.
पिंकर यांनी मुलांमध्ये भाषा
शिकण्याची क्षमता ही “instinctive” असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी
दाखवून दिले की मुले मर्यादित भाषिक input मिळूनही अत्यंत
जटिल व्याकरण शिकतात. याला “poverty of the stimulus argument” असे म्हटले
जाते (Chomsky, 1980; Pinker, 1994).
तसेच त्यांनी “मानसिक
शब्दकोश” म्हणजे
मेंदूमध्ये शब्दांचे मानसिक संचयन कसे होते, याचे विश्लेषण
केले. भाषा वापरताना आपण शब्द फक्त लक्षात ठेवत नाही, तर मेंदू
व्याकरणात्मक नियम आणि संदर्भ यांचा वापर करून भाषिक अभिव्यक्ती निर्माण करतो.
त्यामुळे भाषा ही निष्क्रिय अध्ययन नसून सक्रीय मानसिक गणना आहे (Pinker, 1999).
पिंकर यांच्या संशोधनाने psycholinguistics
मध्ये connectionist
models आणि rule-based models यांच्यातील
वादाला नवी दिशा दिली. त्यांनी hybrid approach सुचवले ज्यामध्ये
काही भाषिक प्रक्रिया नियमांवर आधारित असतात, तर काही सहचर्यात्मक स्मृतीवर आधारित असतात (Pinker
& Prince, 1988).
भाषा ही मानवी जैविक क्षमता(The
Language Instinct )
The
Language Instinct हे पिंकर यांचे सर्वात प्रभावशाली पुस्तक मानले जाते. 1994 मध्ये
प्रकाशित झालेल्या या ग्रंथात त्यांनी असा मूलभूत दावा मांडला की “भाषा ही
सांस्कृतिक शोध नसून, मानवी जैविक उत्क्रांतीचा एक भाग
आहे.” (Pinker, 1994).
1. “Language
Instinct” म्हणजे काय?
पिंकर यांच्या मते, मानव भाषा शिकत
नाही, तर भाषा “विकसित” करतो. जसे कोळी जाळे विणण्याची क्षमता जन्मतः घेऊन
येतो, तसेच मानव भाषा आत्मसात करण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतो.
म्हणूनच त्यांनी भाषेला “instinct” असे संबोधले.
त्यांच्या मते, भाषेची क्षमता
मेंदूतील विशिष्ट neural mechanisms मुळे शक्य
होते. यामुळे जगभरातील मुलांमध्ये भाषेच्या अधिगमाची प्रक्रिया आश्चर्यकारकपणे
समान दिसते (Pinker, 1994).
2. भाषा: शिक्षण की जैविक क्षमता?
पूर्वीच्या वर्तनवादी
दृष्टिकोनानुसार, विशेषतः स्कीनर यांच्या मतानुसार भाषा अनुकरण आणि प्रबलनाद्वारे शिकली जाते. परंतु पिंकर यांनी या दृष्टिकोनाला विरोध केला. त्यांनी
असा युक्तिवाद केला की, लांना सर्व व्याकरण नियम स्पष्टपणे शिकवले जात नाहीत आणि तरीही
मुले योग्य वाक्यरचना तयार करतात.
मुले अनेकदा नवीन व्याकरणीय चुका
(उदा. “goed” instead of “went”) करतात, ज्यावरून ते
नियम तयार करत असल्याचे दिसते. यावरून भाषा केवळ अनुकरण
नसून मानसिक
नियम-निर्मिती प्रक्रिया असल्याचे स्पष्ट होते (Pinker,
1994).
3. Universal
Grammar आणि जैविक पाया
पिंकर यांनी चॉम्स्की यांच्या Universal
Grammar संकल्पनेला व्यापक लोकप्रियता दिली. त्यांच्या मते, सर्व
भाषांमध्ये काही मूलभूत संरचना समान असतात, कारण मानवी
मेंदूची भाषिक रचना सार्वत्रिक आहे.
उदाहरणार्थ: प्रत्येक भाषेत nouns
आणि verbs
सारख्या श्रेणी
असतात, वाक्यरचनेत श्रेणीबद्ध रचना दिसते, आणि भाषिक
अर्थनिर्मितीमध्ये नियमबद्धता आढळते. ही समानता केवळ सांस्कृतिक प्रसारामुळे नाही, तर जैविक
वारशामुळे निर्माण झाली आहे (Chomsky, 1980; Pinker, 1994).
4. “Poverty
of Stimulus” युक्तिवाद
पिंकर यांनी असा प्रश्न उपस्थित केला
की, जर मुलांना अपूर्ण, चुका असलेले आणि मर्यादित भाषिक input
मिळत असेल, तर ते इतकी
जटिल भाषा कशी शिकतात?
त्यांच्या मते, याचे उत्तर
म्हणजे मानवाच्या मेंदूमध्ये भाषेची अंतर्निहित क्षमता असते. ही संकल्पना “poverty
of stimulus” argument वर आधारित आहे (Pinker, 1994).
The
Language Instinct वर काही महत्त्वपूर्ण टीका झाल्या आहेत. काही संशोधकांनी असा
युक्तिवाद केला की भाषा ही सामाजिक आंतरक्रिया, सांस्कृतिक अध्ययन आणि सांख्यिकीय अध्ययन यांचा परिणाम
असू शकते.
उदाहरणार्थ,
usage-based linguistics चे समर्थक असे मानतात की भाषा ही interaction
मधून विकसित
होते, innate grammar मुळे नव्हे. तसेच connectionist
researchers यांनी neural network models वापरून काही
भाषिक नमुने शिकवता येतात, असे दाखवले आहे (Tomasello,
2003).
तरीसुद्धा,
The Language Instinct ने भाषाविज्ञान आणि बोधनिक विज्ञानामध्ये मोठा
बौद्धिक प्रभाव निर्माण केला आहे. आजही भाषा संपादन, भाषा प्रक्रिया आणि बोधनिक
न्यूरोसायन्समध्ये पिंकर यांच्या विचारांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होते.
मानवी मन समजून घेण्याचा प्रयत्न: How
the Mind Works
1997 मध्ये प्रकाशित झालेल्या How
the Mind Works या ग्रंथात पिंकर यांनी मानवी मनाच्या उत्क्रांतीशील आणि बोधनिक स्वरूपाचा सखोल अभ्यास मांडला आहे. या पुस्तकात त्यांनी
असा युक्तिवाद केला की मानवी मन हे “रिकामे पात्र” नसून नैसर्गिक निवडीच्या
प्रक्रियेतून विकसित झालेली जैविक माहिती-प्रक्रिया प्रणाली आहे. पिंकर यांच्या
मते, मनाचे कार्य समजून घेण्यासाठी मानसशास्त्र, न्यूरोसायन्स, उत्क्रांतीशास्त्र
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक
आहे.
पिंकर यांनी मनाची तुलना “Swiss
Army Knife” शी केली आहे म्हणजेच मन हे एकसंध घटक नसून अनेक विशिष्ट मानसिक
यंत्रणांचे संकलन आहे. उदाहरणार्थ, भाषा, स्मृती, चेहरा ओळखणे, सामाजिक संबंध
समजून घेणे, भय, प्रेम किंवा
नैतिक निर्णय यांसाठी वेगवेगळ्या जैविक आणि बोधात्मक प्रणाली विकसित झालेल्या
आहेत. ही भूमिका मोठ्या प्रमाणावर उत्क्रांती
मानसशास्त्रावर आधारित आहे, ज्यामध्ये असे मानले जाते की आजचे
मानवी मानसिक गुणधर्म हे आदिम मानवी परिस्थितींमध्ये जगण्यासाठी उपयुक्त ठरले
म्हणून उत्क्रांत झाले (Pinker, 1997).
या पुस्तकातील एक महत्त्वाचा मुद्दा
म्हणजे “मानवाचे मन समजण्यासाठी जीवशास्त्राकडे दुर्लक्ष करता येत नाही.” पिंकर
यांचा दावा आहे की संस्कृती आणि सामाजिक वातावरण महत्त्वाचे असले तरी त्यांचा
प्रभाव मानवी जैविक प्रवृत्तींसोबत संवादातून निर्माण होतो. त्यामुळे मन समजावून
सांगताना केवळ सामाजिक रचना पुरेशी नसते. हा दृष्टिकोन मानसशास्त्रात बोधनिक न्यूरोसायन्स आणि जैविक मानसशास्त्र
या क्षेत्रांना
बळ देणारा ठरला.
मानवी स्वभावावरील दृष्टिकोन: The
Blank Slate
2002 मध्ये प्रकाशित झालेल्या The
Blank Slate: The Modern Denial of Human Nature या पुस्तकात पिंकर यांनी मानवी
स्वभावाबद्दल प्रचलित असलेल्या “Blank Slate” (Tabula Rasa) या संकल्पनेवर
कठोर टीका केली. ही संकल्पना मुळात John Locke यांच्या
विचारांशी संबंधित आहे, ज्यात मानवी मन जन्मतः रिकामे असते
आणि अनुभवांमुळे ते घडते असे मानले जाते.
पिंकर यांनी या विचारसरणीला आव्हान
देत असा दावा केला की मानव जन्मतः काही जैविक प्रवृत्ती, भावनिक रचना, बोधात्मक
क्षमता आणि सामाजिक प्रवृत्ती घेऊन जन्माला येतो. त्यांच्यानुसार, भाषा शिकण्याची
क्षमता, नातेसंबंध निर्माण करण्याची प्रवृत्ती, स्पर्धात्मकता, सहकार्य, आक्रमकता आणि
नैतिक निर्णयक्षमता यांचा काही अंश जैविकदृष्ट्या पूर्वनियोजित असतो (Pinker,
2002).
या पुस्तकात त्यांनी तीन लोकप्रिय मिथकांना
आव्हान दिले:
- Blank Slate – मानव पूर्णपणे अनुभवांनी घडतो.
- Noble Savage – मानव नैसर्गिकरित्या पूर्णतः शांतताप्रिय असतो.
- Ghost in the Machine – मन हे शरीरापासून पूर्णतः वेगळे अस्तित्व आहे.
पिंकर यांच्या मते, मानवी
स्वभावाचे जैविक आधार मान्य करणे म्हणजे नियतवाद स्वीकारणे नव्हे. उलट, मानवी
प्रवृत्ती समजून घेतल्यास अधिक प्रभावी सामाजिक संस्था, शिक्षणपद्धती
आणि नैतिक धोरणे तयार करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर आक्रमकता ही
काही प्रमाणात नैसर्गिक असेल, तर समाजाने तिला नियंत्रित
करण्यासाठी कायदे आणि नैतिक मूल्यांची निर्मिती केली पाहिजे.
हिंसा, प्रगती आणि
मानवता: The Better Angels of Our Nature
2011 मध्ये प्रकाशित झालेल्या The
Better Angels of Our Nature: Why Violence Has Declined या पुस्तकात पिंकर यांनी
मानवजातीच्या इतिहासातील हिंसाचाराच्या प्रवाहाचा डेटा-आधारित अभ्यास मांडला. या
पुस्तकातील मुख्य दावा असा आहे की लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, दीर्घकालीन
दृष्टीने मानवी समाज अधिक शांततामय झाला आहे (Pinker, 2011).
पिंकर यांनी हत्या, युद्ध, गुलामगिरी, घरगुती हिंसा, बालहत्यांचे
प्रमाण, राज्यदंड आणि क्रौर्य यांसारख्या निर्देशकांचा ऐतिहासिक डेटा वापरून
दाखवण्याचा प्रयत्न केला की प्राचीन समाजांच्या तुलनेत आधुनिक समाजात हिंसा मोठ्या
प्रमाणात कमी झाली आहे.
त्यांच्या मते हिंसा कमी होण्यामागील पाच
महत्त्वाचे घटक आहेत:
- मजबूत शासनव्यवस्था (Leviathan
effect)
- व्यापार आणि आर्थिक परस्परावलंबन
- स्त्रियांचे वाढते सामाजिक स्थान
- साक्षरता व सहानुभूतीचा विस्तार
- तर्क आणि वैज्ञानिक विचारसरणी
या संदर्भात त्यांनी अब्राहम लिंकन यांच्या “better angels
of our nature” या प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ घेतला आहे म्हणजे मानवातील करुणा, नैतिकता आणि
विवेक यांची वाढ.
या पुस्तकाला प्रशंसा मिळाली असली
तरी काही विद्वानांनी यावर टीका केली की पिंकर यांनी संरचनात्मक हिंसा आणि नव्या
प्रकारच्या डिजिटल किंवा सांस्कृतिक हिंसेला पुरेसे स्थान दिले नाही. तरीही, हे पुस्तक
आधुनिक मानवतावादी विचारांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते.
तर्क, विज्ञान आणि
आशावाद: Enlightenment Now
Enlightenment
Now: The Case for Reason, Science, Humanism, and Progress (2018) मध्ये
पिंकर यांनी आधुनिक जगाबद्दलचा आशावादी दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या मते, माध्यमे आणि
सामाजिक चर्चांमध्ये सतत नकारात्मक घटनांवर भर दिल्यामुळे जग अधिक वाईट होत आहे
अशी धारणा तयार होते; परंतु वस्तुनिष्ठ आकडेवारी वेगळे
चित्र दाखवते (Pinker, 2018).
पिंकर यांच्या म्हणण्यानुसार, विज्ञान, तर्क, मानवतावाद आणि मुक्त विचार यांच्या
प्रभावामुळे मानवी जीवनात मोठी सुधारणा झाली आहे. उदाहरणार्थ: आयुर्मानात वाढ, दारिद्र्यात
घट, शिक्षणात वाढ, बालमृत्यू दरात घट, लोकशाही व मानवाधिकारांचा विस्तार. या
पुस्तकात त्यांनी Enlightenment युगातील विचारवंत जसे की व्हॉल्टेअर, इमॅन्युएल कांट
आणि ॲडम स्मिथ यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट
केला आहे. त्यांच्या मते, मानवी प्रगती ही स्वयंचलित नसून
तर्काधारित संस्था, विज्ञान आणि मानवी सहकार्यामुळे शक्य
झाली आहे.
समारोप:
स्टीव्हन
पिंकर यांचे
जीवन हे जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बौद्धिक
प्रामाणिकतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. भाषाविज्ञान, बोधनिक मानसशास्त्र आणि मानवी वर्तनाच्या अभ्यासात त्यांनी केलेले योगदान
आधुनिक मानसशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भाषा ही मानवी मेंदूची
जैविक क्षमता आहे, मानवी वर्तनावर उत्क्रांतीचा प्रभाव
आहे आणि तर्क, विज्ञान व मानवतावाद यांच्या आधारे समाज अधिक
प्रगत होऊ शकतो, हे त्यांनी प्रभावीपणे मांडले. पिंकर यांचे जीवन विद्यार्थ्यांना आणि
संशोधकांना चिकित्सक विचार, बौद्धिक जिज्ञासा आणि पुराव्यावर
आधारित ज्ञाननिर्मितीचे महत्त्व शिकवते. म्हणूनच, ते केवळ
मानसशास्त्रज्ञ किंवा लेखक नसून आधुनिक काळातील विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे प्रभावी
प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.
संदर्भ
Chomsky,
N. (1965). Aspects of the Theory of Syntax. MIT Press.
Chomsky,
N. (1980). Rules and Representations. Columbia University
Press.
Pinker,
S. (1994). The Language Instinct: How the Mind Creates
Language. William Morrow.
Pinker,
S. (1997). How the Mind Works. W. W. Norton.
Pinker,
S. (1999). Words and Rules: The Ingredients of Language.
Basic Books.
Pinker,
S. (2002). The Blank Slate: The Modern Denial of Human
Nature. New York: Viking.
Pinker,
S. (2011). The Better Angels of Our Nature: Why Violence
Has Declined. Viking.
Pinker,
S. (2018). Enlightenment Now: The Case for Reason,
Science, Humanism, and Progress. Viking.
Pinker,
S., & Prince, A. (1988). On language and
connectionism. Cognition, 28(1–2), 73–193.
Pinker,
S., & Ullman, M. T. (2002). The past and future of the
past tense. Trends in Cognitive Sciences, 6(11), 456–463.
Tomasello,
M. (2003). Constructing a Language: A Usage-Based Theory
of Language Acquisition. Harvard University Press.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions