रविवार, ७ एप्रिल, २०२४

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

 

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

     एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक भारतीय अभियंते बेरोजगार आहेत.  तर अभियांत्रिकी केलेल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर नोकरी मिळते.  एस्पायरिंग माइंड्सचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल म्हणतात की, देशभरातील शैक्षणिक संस्था लाखो तरुणांना प्रशिक्षण देतात परंतु या संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी तयार नसतात आणि कंपनीनुसार रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते.

आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वसाधारपणे बौद्धिक आणि तांत्रिक असे दोन प्रकारचे शिक्षण दिले जाते. कला, वाणिज्य, आणि शास्त्र हे बौद्धिक प्रकारचे तर इंजिनियर, मेडिसीन, टर्नर, फिटर, वेल्डर इत्यादी हे तांत्रिक. बेरोजगारी वाढू नये म्हणून तांत्रिक शिक्षण अधिक प्रमाणात द्यावे असे म्हटले जाते. परंतु सध्या तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्येसुद्धा बेरोजगारी दिसून येते. शिवाय जे स्वयंरोजगार आहेत त्यांना पुरेसे काम मिळत नाही अशीही तक्रार आहे. पुरेसे काम न मिळणे म्हणजे एक प्रकारची बेरोजगारीच ना.. तेव्हा तांत्रिक शिक्षणाने बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, हे दिसून येते. शेवटी हा प्रश्न निर्माण होतो की नेमकी कोणती कौशल्ये किंवा क्षमता आवश्यक आहेत. आज 21 व्या शतकात रोजगारक्षम कौशल्यांची मागणी वाढलेली आहे. CBSE च्या नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमासाठी NCERT कडून रोजगारक्षम कौशल्यांवर आधारित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

आज प्रत्येक उद्योगातील नियोक्ते कर्मचाऱ्यांच्या काही मूलभूत कौशल्यांचा ठामपणे  पुरस्कार करताना दिसतात. यामध्ये वाचन आणि गणित यांच्यावर आधारित  शैक्षणिक गुणवत्ता, तसेच संघकार्य, समस्या सोडविणे, कामातील नैतिकता आणि प्रामाणिकपणा यासारख्या वैयक्तिक क्षमतांचा समावेश आहे. नियोक्ते कर्मचाऱ्यांकडून समान मूलभूत कौशल्ये असण्याची अपेक्षा करतात, परंतु ते नेहमीच त्याबद्दल स्पष्ट भाषेत बोलत नाहीत किंवा त्यास विशिष्ट नाव देत नाहीत. यामुळे इच्छुक कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना कोणत्याही उद्योगात अगर करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे हे जाणणे कठीण बनते.

राष्ट्रीय नेटवर्क यांनी प्रमुख आर्थिक क्षेत्रांमधील कर्मचारी निवडणारे (नियोक्ते) याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था एकत्र केल्या आणि त्यांनी कार्यस्थळात काम करताना कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या मूलभूत कौशल्यांची आणि त्यांची स्पष्टपणे नोंद घेण्यासाठी एक सामान्य कौशल्यांची यादी केलेली आहे. हे मॉडेल सर्व उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये आणि करिअरमध्ये जोडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकते. या आधारे शिक्षक आणि शिक्षण संस्था देखील कोणती मूलभूत कौशल्ये शिकवायचे याचे उद्योगाशी निगडीत निश्चित रोडमॅप तयार करू शकतात. तांत्रिक शिक्षण, कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि सामुदायिक सेवा तसेच पारंपारिक शिक्षण यासह अनेक प्रकारांनी रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त केली जाऊ शकतात. नॅशनल नेटवर्कने सर्व नोकऱ्यांसाठी कॉमन एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ओळखले आहेत, ज्याचा फायदा खालील बाबीसाठी होतो:

  • यामुळे नियोक्ते यांना सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक समान कौशल्यांची ओळख पटणार आहे.
  • संभाव्य कर्मचारी, ज्यांना माहित आहे की कोणत्या मूलभूत कौशल्यांची अपेक्षा नियोक्ते त्यांच्याकडून कोणत्याही नोकरीसाठी करतात आणि ते आपल्या कौशल्य पातळीबद्दल नियोक्त्यांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील.
  • शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था यांना माहित होईल की कोणत्या मूलभूत कौशल्यांवर भर द्यायचा आहे.

सदर लेखात आपण वैयक्तिक कौशल्ये (Personal Skills) लोकांशी व्यवहार करण्याची कौशल्ये (People Skills) आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर (Applied Knowledge) कामाच्या ठिकाणाची कौशल्ये (Workplace Skills) याविषयी चर्चा करणार आहोत.

वैयक्तिक कौशल्ये (Personal Skills)

1. सचोटी (Integrity): इतरांशी प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे आणि आदराने वागणे. कंपनीचा वेळ आणि मालमत्तेचा आदर करणे. आपल्या निर्णयांची आणि कृतींची जबाबदारी स्वीकारणे.

2. पुढाकार (Initiative): काम करण्याची आणि नवीन आव्हानांचा शोध घेण्याची तयारी दाखवणे,

नवीन जबाबदाऱ्या आणि कामगिरी शोधण्यात पुढाकार घेणे, त्यामुळे त्यांच्या कामाची विविधता आणि व्याप्ती वाढवणे. कार्ये पार पाडण्यासाठी ऊर्जा, गती आणि प्रयत्नांसह काम करणे. व्यक्तिगत आव्हानात्मक, पण वास्तववादी ध्येये निश्चित करणे आणि टिकवून ठेवणे. मानके आणि अपेक्षा यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे.  

3. आत्मनिर्भरता आणि विश्वसनीयता (Dependability and Reliability): कामावरील जबाबदारपूर्ण वर्तन, सातत्यपूर्ण, जबाबदार आणि विश्‍वासार्ह वर्तन, सर्व कर्तव्य पूर्ण करणे, नियत कालावधीत दिलेले काम पूर्ण करणे. लेखी आणि तोंडी सूचनांचे पालन करणे, संस्थेच्या नियमांचे, धोरणांचे आणि प्रक्रियांचे पालन करणे. नियमित आणि वेळेवर उपस्थिती दाखविणे.

4. अनुकूलता (Adaptability): नवीन किंवा बदलत्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता दाखवणे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि कामे करण्याच्या नवीन पद्धती विचारात घेण्यासाठी खुले असणे. कामासाठी नवीन दृष्टिकोनांची फायदे लक्षात घेऊन त्यांचा सक्रियपणे शोध घेणे आणि त्यासाठी काळजीपूर्वक विचार करणे. योग्य असलेल्या नवीन दृष्टिकोनांचे स्वीकार आणि काम न करणाऱ्या दृष्टिकोनांचा त्याग करणे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योजना, ध्येये, कृती यांचे प्राधान्यक्रम प्रभावीपणे बदलणे.

5. व्यावसायिकता (Professionalism): कामाच्या ठिकाणी व्यावसायिक वर्तन राखणे. कठीण परिस्थितीतही समतोल राखून आणि भावनांवर नियंत्रण ठेवून स्व-नियंत्रण दाखविणे. कामासाठी योग्य कपडे घालून आणि वैयक्तिक स्वच्छता राखून व्यावसायिकता सांभाळणे. पर्यवेक्षकांशी, सहकारी कर्मचाऱ्यांशी आणि ग्राहकांशी बोलताना व्यावसायिक भाषा वापरणे. सकारात्मक दृष्टिकोन राखणे आणि आपल्या कामाची जबाबदारी घेणे.

लोकांशी व्यवहार करण्याची कौशल्ये (People Skills)

1. संघकार्य (Teamwork): इतरांसह प्रभावीपणे काम करण्याची क्षमता दाखवणे. इतर लोकांबरोबर विश्वास आणि प्रतिष्ठा निर्माण करणे. पर्यवेक्षकांशी आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी व्यावसायिक आणि आदरपूर्वक वागणे. समग्र कामकाज सुलभ होण्यासाठी वादविवाद आणि मतभेदांवर मात करण्यासाठी योग्य रणनीती आणि उपाय योजना आखणे.

2. परस्पर संवाद (Communication): इतरांसोबतचा संवाद मनमोकळा ठेवणे. संवेदनशीलता आणि सहानुभूती दाखविणे. इतर लोकांचे मत ऐकणे आणि त्यांचे विचार समजून घेणे. इतर लोकांचे भाषिक आणि अभाषिक वर्तन ओळखणे आणि त्याचा अर्थ लावणे. स्पष्ट, अचूक शब्दांत आणि तार्किक, संघटित आणि सुसूत्रपणे बोलणे.

3. इतरांचा आदर (Respect): विविध पार्श्वभूमी असलेल्यांच्यासोबत प्रभावीपणे कार्य करणे. इतरांची मते, दृष्टिकोन, चालीरीती आणि वैयक्तिक भिन्नतेंबद्दल संवेदनशीलता आणि आदर दाखविणे. विविध लोकांशी व्यवहार करताना लवचिकता आणि खुलेपणा असावा. विविध दृष्टिकोन आणि कल्पनांचा आदर करणे.

आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर (Applied Knowledge)

1. वाचन (Reading): कामाशी संबंधित कागदपत्रांमधील वाक्ये आणि परिच्छेद समजणे. कामाशी संबंधित सूचना आणि धोरण, मेमो, नोटिस, पत्र, धोरण नियमावली आणि शासकीय नियमावली वाचणे आणि समजून घेणे. सोपे आणि सरळ, ते अधिक जटिल आणि तपशीलवार वाचनसामग्री वाचणे आणि समजून घेणे. लिहिलेल्या सामग्रीमधून अर्थ आणि मुख्य कल्पना समजून घेणे. पूर्व ज्ञानाच्या आधारे लिहिलेल्या सामग्रीतून माहिती एकत्रित करणे. लिखित सामग्रीपासून समजलेले ज्ञान प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी लागू करणे.

2. लेखन (Writing): प्रमाणित इंग्रजी वापरून विचार, कल्पना आणि माहिती स्पष्टपणे लिखित स्वरूपात संवाद साधणे. योग्य शब्द वापरून समजण्यास सुलभ असलेली लेखी सामग्री तयार करणे. विचार, कल्पना, माहिती, संदेश आणि इतर लेखी माहिती आधारे तर्कशुद्ध, सुव्यवस्थित आणि सुसंगतपणे संवाद साधणे. योग्य व्याकरण, शब्द, विरामचिन्हे आणि वाक्ये वापरणे. विविध स्वरूपांमध्ये विशिष्ट प्रेक्षकांसाठी योग्य रीतीने वस्तुस्थितीपूर्ण पद्धतीने लिहणे.

3. गणित (Mathematics): समस्या सोडवण्यासाठी गणिताचा वापर करणे. पूर्ण संख्या, अपूर्णांक, दशांश आणि टक्केवारी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करता येणे. दशांश अपूर्णांकात रूपांतरित करणे; अपूर्णांक टक्केवारीमध्ये रूपांतरित करणे. सरासरी, गुणोत्तर, प्रमाण आणि मूल्य यांची आकडेमोड करता येणे. वेळ, तापमान, अंतर, लांबी, रुंदी, उंची आणि वजन यांचे एकक घेणे, एक मापन दुसर्‍यामध्ये रूपांतरित करता येणे. व्यवहार्य समस्या उपयुक्त गणितीय अभिव्यक्तींमध्ये रूपांतरित करता येणे.

4. विज्ञान (Science): समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक तत्त्वे आणि पद्धती जाणून आणि लागू करणे. मूलभूत वैज्ञानिक तत्त्वे समजून घेणे. यात जगाचे स्वरूप, त्याची कार्यप्रणाली आणि त्यातील नैसर्गिक घटना यांच्याशी संबंधित मूलभूत संकल्पनांचा समावेश होतो. वैज्ञानिक पद्धती समजून घेणे. हे म्हणजे समस्या ओळखणे, त्यावर माहिती गोळा करणे, त्या माहितीवर आधारित मत तयार करणे आणि शेवटी निष्कर्ष काढणे ही पद्धती समजून घेणे. समस्या सोडवण्यासाठी आणि कार्य पूर्ण करण्यासाठी ही मूलभूत वैज्ञानिक तत्त्वे आणि पद्धती लागू करणे. हे म्हणजे आपल्या ज्ञानाचा वापर करून नवीन गोष्टी शोधून काढणे, समस्या सोडवणे आणि आपल्या दैनंदिन जीवनातील कामे अधिक चांगल्या प्रकारे करणे होय.

5. तंत्रज्ञान (Technology): माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि त्याशी संबंधित अॅप्लिकेशन्स वापरता येणे.

नेव्हिगेशन आणि फाइल व्यवस्थापन: संगणकीय क्षेत्रातील सामान्य शब्दसमूह समजणे. संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कार्य करण्यासाठी स्क्रोल बार, माउस आणि डायलॉग बॉक्स वापरता येणे. गरजेच्या ऍप्लिकेशन आणि फाइल्समध्ये प्रवेश करणे आणि त्यामध्ये बदल करणे. गौप्यता आणि सुरक्षा राखण्यासाठी प्रमाणित रूढींचे पालन करणे.

इंटरनेट आणि ई-मेल: माहिती शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे. प्रमाणित ब्राउझर्स उघडणे आणि त्याच्यावर काम करता येणे. शोध घेणे, हायपरटेक्स्ट संदर्भ आणि हस्तांतरण प्रोटोकॉल (URL प्रविष्ट करणे) वापरता येणे. इलेक्ट्रॉनिक मेल (ई-मेल) पाठवणे आणि प्राप्त करणे.

6. चिकित्सक विचार (Critical Thinking): घटनांचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढण्यासाठी तर्कशुद्ध विचार प्रक्रियेचा वापर करणे. विसंगत किंवा गहाळ माहिती ओळखणे. माहितीचे चिकित्सात्मक पुनरावलोकन, विश्लेषण, संश्लेषण, तुलना आणि अर्थ लावणे. प्रासंगिक किंवा गहाळ माहितीवरून निष्कर्ष काढणे. समस्येचे योग्यरित्या निदान होऊन सर्वोत्तम उपाय सापडला आहे याची खात्री करण्यासाठी सिद्धांतकल्पना परीक्षण (Hypothesis testing) करणे.

कामाच्या ठिकाणाची कौशल्ये (Workplace Skills)

1. नियोजन आणि संघटन (Planning & Organizing): वेळेचे प्रभावी व्यवस्थापन आणि सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी कामाचे नियोजन आणि प्राथमिकता देता येणे. कामे नियोजन आणि वेळापत्रक तयार करण्याची क्षमता जेणेकरून काम वेळेत पूर्ण होईल. विविध स्पर्धात्मक कामांना प्राथमिकता देण्याची क्षमता. वेळ आणि संसाधनांचे प्रभावी वाटप प्रभावीपणे करता येणे. प्रकल्प मार्गापासून भरकटल्यास आवश्यक सुधारणात्मक कारवाई करता येणे.

2. समस्या परिहार (Problem Solving): समस्या सोडवण्यासाठी निर्माण, मूल्यांकन आणि अंमलबजावणी करून चिकित्सक विचार कौशल्ये अंमलात आणण्याची क्षमता प्रदर्शित करणे. समस्या ओळखणे आणि सांगता येणे. संबंधित कर्मचार्‍यांना समस्या सांगता येणे. आवश्यक उपाय निर्माण करण्यास सक्षम असणे. उपाय निवडणे आणि अंमलबजावणी करण्याची क्षमता.

3. निर्णय प्रक्रिया (Decision Making): कार्यस्थळावर आढळणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चिकित्सक विचार कौशल्यांचा वापर करणे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी मुख्य मुद्द्यांची ओळख करून त्यांना प्राथमिकता देणे. निर्णयांच्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेणे. निर्णयामुळे ज्यांच्यावर परिणाम होऊ शकतो त्या लोकांना योग्य प्रकारे निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे. एखादा निर्णय चुकला तर त्वरित पर्यायी योजना तयार करता येणे.

4. व्यवसायाची मूलभूत तत्त्वे (Business Fundamentals): संस्था आणि उद्योगाचे मूलभूत ज्ञान असणे: तुमच्या कंपनी आणि संबंधित उद्योगाबद्दल चांगली समज असणे गरजेचे आहे. त्यांचे ध्येय, कार्यप्रणाली, बाजारपेठ आणि आव्हाने समजून घेणे.

  • कंपनीच्या यशामध्ये तुमच्या भूमिकेचे महत्त्व समजून घेणे: तुमचे काम कंपनीच्या यशामध्ये कशी भूमिका बजावते ते समजून घेणे.  तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीला कसा फायदा होतो आणि तुमच्या चुकांचा काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करणे
  • गोपनीयतेचे आणि गुप्ततेचे महत्त्व ओळखणे: कंपनीची माहिती, ग्राहकांची माहिती आणि सहकाऱ्यांची माहिती गोपनीय असते. ही माहिती कोणालाही देऊ नये आणि बौद्धिक संपदा कायद्यांचे पालन करणे.
  • आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण राखण्याचे महत्त्व: तुमच्या कार्यस्थळी आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला एखादी धोकादायक परिस्थिती दिसली तर संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे.

5. ग्राहक केंद्रितता (Customer Focus): बाजारपेठेची मागणी ओळखणे आणि डीलर किंवा ग्राहक सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे मार्ग शोधणे. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे. ग्राहकांच्या अपेक्षा, विनंत्या आणि समस्या त्वरित आणि कार्यक्षमपणे सोडवण्यासाठी वैयक्तिककृत सेवा प्रदान करणे. अंतर्गत आणि बाह्य ग्राहकांशी व्यवहार करताना आनंददायक, शिष्टाचारी आणि व्यावसायिक असणे. डीलर किंवा ग्राहक समाधानतेचे मूल्यांकन करणे.

6. उपकरणे आणि तंत्रज्ञानासोबत कार्य करणे (Working with Tools and Technology): कामाच्या सोयीनुसार उपकरण आणि तंत्रज्ञान निवडणे, वापरणे आणि निगा राखणे. वारंवार येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी योग्य उपकरणे आणि तंत्रज्ञान निवडून त्याचा वापर करणे. कोणती उपकरणे किंवा तंत्रज्ञान उपयुक्त आहेत ते काळजीपूर्वक विचार करणे आणि दैनंदिन  समस्येसाठी सर्वोत्तम साधन किंवा तंत्रज्ञान निवडणे. स्थापित कार्यप्रणाली आणि सुरक्षा मानकांचे पालन करून साधने आणि उपकरणे चालविणे. काम सुलभ करण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकतील अशा उपकरणांचा आणि तंत्रज्ञानांचा ज्ञान सुधारण्यासाठी शोध घेणे.

NEP-2020 च्या सहाय्याने शिक्षण आणि प्रशिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यास 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनविणे. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमासाठी स्वत:ची क्षमता ओळखण्यास मदत करणे. यशस्वी भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देणे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासातून स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे. सदर उद्दिष्ट्ये साध्य करण्यास आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे.


(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Gupta, M. S. (2017). Skills for Employability: A Handbook, IP Innovative Publication Pvt. Ltd.

NCERT (2020). employability skills - textbook for class-X, National Council of Educational Research and Training (NCERT)

सिंपी, एम. सी. (2017). रोजगार-क्षमता कौशल्ये, नीलम प्रकाशन   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...