शनिवार, २७ एप्रिल, २०२४

मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments

 

मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments

मानवी वर्तन अभ्यासत असताना अनेक प्रसिद्ध प्रयोगांनी मानसशास्त्राच्या मूलभूत समजुतीवर प्रभाव पाडलेला आहे. काही प्रयोगांनी आजच्या नैतिक सीमा ओलांडल्यामुळे ते पुन्हा केले जाऊ शकत नाहीत, तरीही त्यामुळे मानसशास्त्रीय अभ्यासाचे महत्व कमी झालेले नाही. मानसशास्त्राच्या क्षेत्रावर आणि मानवी वर्तनाच्या आपल्या समजुतीवर मोठा प्रभाव पाडणारे सात प्रसिद्ध मानसशास्त्रीय प्रयोग पाहू या.

लिटल अल्बर्टवरील प्रयोग (1920)

जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापक, डॉ. जॉन बी. वॉटसन आणि पदवीधर विद्यार्थी यांनी अभिजात अभिसंधान (क्लासिकल कंडिशनिंग) या अध्ययन प्रक्रियेची चाचणी घेऊ इच्छित होते. अभिजात अभिसंधान म्हणजे सहवासाने शिकणे जेथे अनैच्छिक किंवा स्वयंचलित वर्तन आत्मसात केले जाते, आणि डॉ. वॉटसन यांना असे वाटले की ते मानवी प्रवृत्तीचा पाया आहे.

नऊ महिन्यांच्या तान्ह्या मुलाला, ज्याला "अल्बर्ट बी" असे म्हणत होते, त्याला डॉ. वॉटसन आणि रोझाली रेयनर यांच्या प्रयोगासाठी स्वेच्छेने देण्यात आले. अल्बर्ट पांढऱ्या रंगाच्या खेळण्याशी खेळत होता आणि सुरुवातीला, त्याने आनंद आणि उत्साह दाखविला. कालांतराने, तो या खेळण्याबरोबर खेळताना, डॉ. वॉटसन यांनी मुलाच्या मागे मोठा आवाज करून त्याला घाबरवत असत. अनेक चाचण्यांनंतर, अल्बर्टला पांढऱ्या रंगाच्या खेळण्याकडे पाहिल्यावर भीती वाटावी यासाठी प्रेरित केले जात होते.

हा अभ्यास असे सिद्ध करतो की मानवांस एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी किंवा भीती वाटण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते, यावरून अनेक मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास झाली की लोकांना अतार्किक भिती का असते आणि त्यांचा विकास लहानपणी कसा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण देता येईल. हा प्रायोगिक अभ्यास मानसशास्त्रात यासाठी एक उत्तम उदाहरण आहे.

अॅश अनुरूपता अभ्यास (1951)

सोलोमन अॅश हा एक पोलिश-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, व्यक्ती चुकीची आहे हे माहीत असूनही एखादी व्यक्ती एखाद्या गटाच्या निर्णयाशी जुळवून घेते हे जाणून घेण्यास उत्सुक होते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार, अनुरूपता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मतांमध्ये किंवा विचारांमध्ये समायोजन करणे जेणेकरून ते इतर लोकांच्या किंवा एखाद्या सामाजिक गटाच्या किंवा परिस्थितीच्या आदर्शांशी सुसंगत असतील.

त्याच्या प्रयोगामध्ये अॅशने "दृष्टी चाचणी" मध्ये सहभागी होण्यासाठी 50 महाविद्यालयीन पुरुष विद्यार्थ्यांची निवड केली. सहभागींना कार्डवरील कोणती रेषा जास्त लांब आहे ते सांगावे लागणार होते. तथापि, प्रयोगाच्या केंद्रस्थानी असलेल्या सहभागींना हे माहित नव्हते की चाचणी घेत असलेले इतर लोक स्क्रिप्टनुसार काम करणारे अभिनेते होते आणि कधीकधी जाणूनबुजून चुकीचे उत्तर निवडत होते. अॅश यांना असे आढळले की सरासरी 12 चाचण्यांमध्ये, जवळपास एक तृतीयांश वेळा सरळमार्गी सहभागी विद्यार्थ्यांनी चुकीच्या बहुमताशी जुळवून घेतले आणि केवळ 25 टक्के सहभागी कधीही चुकीच्या बहुमताशी जुळवून घेतले नाही. ज्या नियंत्रित गटात फक्त सहभागी होते आणि अभिनेते नव्हते, अशा गटात केवळ एक टक्क्यापेक्षा कमी सहभागींनी चुकीचे उत्तर निवडले.

अॅश यांच्या प्रयोगाने असे दाखवून दिले की लोक गटात सामावून जाण्यासाठी जुळवून घेतात (आदर्शांचा प्रभाव) कारण गटाला एका व्यक्तीपेक्षा अधिक माहिती असल्याचा त्यांचा विश्वास असतो. यावरुन हे स्पष्ट होते की काही लोक नवीन गटात किंवा सामाजिक परिस्थितीत असताना त्यांचे वर्तन किंवा श्रद्धा बदलतात, अगदी ते त्यांच्या पूर्वीच्या वर्तनावर किंवा श्रद्धेविरुद्ध असले तरीही.

बोबो डॉल प्रयोग (1961, 1963)

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अल्बर्ट बंडुरा हे सामाजिक अध्ययन सिद्धांताची तपासणी करत होते. सामाजिक अध्ययन सिद्धांत असे सुचवितो की, लोकांना नवीन वर्तन " प्रत्यक्ष अनुभवातून किंवा इतरांचे वर्तन पाहून" शिकत असतात. बोबो डॉल  (खालील बाजूस स्थिर असलेली मोठ्या आकाराची फुगवलेली बाहुली) वापरून, बंडुरा आणि त्यांच्या टीमने मुले आक्रमक कृत्ये पाहून त्यांचे अनुकरण कसे करतात ते तपासले.

बंडुरा आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी (रॉस बहिणी) स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या नर्सरीमधून 3 ते 6 वयोगटातील 36 मुले आणि 36 मुली निवडल्या आणि त्यांची 24 प्रमाणे तीन गटात विभागणी केली. पहिल्या गटानी बोबो डॉलशी आक्रमकपणे वागणार्‍या पुरुष किंवा स्त्री मॉडेलकडे पाहिले. त्या प्रौढांनी बोबो डॉलवर वेगळ्या पद्धतीने हल्ला केला - त्यांनी काही वेळा हातोडा वापरला आणि काही वेळा बाहुली हवेत फेकून विविध आवाज केला. दुसऱ्या गटांस अहिंसक मॉडेल दाखवण्यात आले जे 10 मिनिटांसाठी शांत आणि सुस्त पद्धतीने खेळले आणि बोबो डॉलकडे दुर्लक्ष केले. तिसरा नियंत्रित गट म्हणून वापरण्यात आला आणि त्यांच्यासमोर कोणतेही मॉडेल उभे केले नाही.

प्रत्येक सत्रानंतर, मुलांना खेळण्याच्या खोलीत नेण्यात आले आणि त्यांची बोबो डॉल सोबत खेळण्याची पध्दत बदलली आहे का ते तपासले. आक्रमक खेळणी (मूस, डार्ट गन आणि बोबो डॉल) आणि अहिंसक खेळणी (चाहाचा कप, क्रेयॉन आणि प्लास्टिकची शेती औजारे) असलेल्या खोलीत, बंडुरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे लक्षात आले की, आक्रमक प्रौढांचे निरीक्षण करणारे मुले आक्रमक प्रतिसाद देत होते. अगदी अपेक्षेप्रमाणे, बंडुरा यांना असे आढळले की, एखाद्या पुरुष मॉडेलला पाहिल्यानंतर मुली अधिक शारीरिक आक्रमकपणा आणि एखाद्या स्त्री मॉडेलला पाहिल्यानंतर अधिक शा‍ब्दिक आक्रमकपणा दाखवतात. अभ्यासाचा निकाल अधोरेखित करतो की, मुले इतरांचे निरीक्षण करून शिकत असतात.

संपादित असहाय्यता प्रयोग (1965)

डॉ. वॉट्सनच्या अभिजात अभिसंधान अभ्यासाशी संबंधित एक वेगळा पैलू शोधून काढण्याचा मार्टिन सेलिगमनचा उद्देश होता. कुत्र्‍यांवरील अभिसंधानाचा अभ्यास करताना, सेलिगमन यांनी सूक्ष्म निरीक्षण केले, ज्यांना आधीच असे अभिसंधीत करण्यात आले होते की घंटा ऐकली तर त्यांना हलका विद्युतधक्का लागेल, ते सकारात्मक परिणामाची शोधाशोध करण्याऐवजी, कधीकधी दुसऱ्या नकारात्मक परिणामांनंतर हार मानत असत. एक मोठा हत्ती छोट्याश्या दोरखंडाने बांधलेला असतो, कारण तो लहानपणी वेगवेगळे दोरखंड तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून धकलेला असतो त्यामुळे मोठेपणी तो छोटेसे दोरखंडही तोडू शकत नाही.   

साधारण परिस्थितींमध्ये, प्राणी नेहमीच नकारात्मक परिणामांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. सेलिगमन यांनी जेव्हा त्यांचा प्रयोग आधीपासून अभिसंधान न केलेल्या प्राण्यांवर केला, तेव्हा प्राण्यांनी सकारात्मक परिणाम शोधण्याचा प्रयत्न केला. उलट, ज्या कुत्र्यांना आधीपासूनच नकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करण्यात आली होती त्यांना वाटलं की वेगळ्या परिस्थितीतही त्यांची वाट बघत असलेला आणखी एक नकारात्मक प्रतिसाद असेल. 

अभिसंधान केलेल्या कुत्र्यांच्या वर्तनाला संपादित असहाय्यता असे म्हणतात. हा सिद्धांत असा आहे की काही प्रयुक्त नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाहीत कारण पूर्वी आलेल्या अनुभवांमुळे त्यांना ते असहाय्य आहेत असा विश्वास बसतो. या अभ्यासाच्या निष्कर्षांमुळे मानवांमधील नैराश्य आणि त्यांची लक्षणे यांच्यावर प्रकाश पडलेला आहे.

मिलग्राम प्रयोग (1963)

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने केलेल्या भयानक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, स्टॅनली मिलग्राम यांना वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्याच्या पातळीची चाचणी घ्यायची होती. येल विद्यापीठाचे प्राध्यापक मिलग्राम यांनी लोक आदेशाचे पालन कसे करतात ते पहायचे होते, अगदी त्या व्यक्तीच्या अंतःकरणाच्या विरोधात असले तरीही.

अभ्यासासाठी सहभागी म्हणून 20 ते 50 वर्षे वयोगातील 40 पुरुष, विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन गटात विभाजित करण्यात आले. ते यादृच्छिकपणे निवडलेले असले तरी विद्यार्थ्यांना प्रयोगाचा हेतू माहित होता अनभिज्ञ सहभागी नेहमीच शिक्षक असायचे. एका खोलीत इलेक्ट्रोडसह खुर्चीवर एका विद्यार्थ्याला बांधलेले असायचे तर दुसऱ्या खोलीत प्रयोगकर्ता (दुसरा अभिनेता) आणि एक शिक्षक असायचे.

शिक्षक विद्यार्थ्यासाठी शब्दांची एक वाचत असत जी विद्यार्थ्याला लक्षात ठेवायचे होते. जेव्हा एखादा शब्दसमूह चूकीचा सांगितला जायचा, तेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला शॉकचा धक्का देत होता. शॉकचे धक्के हलक्यापासून (15w) ते जीवघेण्यापर्यंतच्या (450w) श्रेणीत होते. प्रत्यक्षात, मुद्दामहून चुका करणारा विद्यार्थी, याला शॉक लागत नव्हता.

शॉकचे वोल्टेज वाढत गेले आणि शिक्षकांना त्यांच्यामुळे होणार्‍या वेदनांची जाणीव झाली की, काहींनी प्रयोग सुरू ठेवण्यास नकार दिला. प्रयोगकर्त्याने प्रोत्साहन दिल्यानंतर, ६५ टक्के लोकांनी पुन्हा सुरु ठेवला. या अभ्यासातून, मिलग्राम यांनी 'एजन्सी थिअरी' मांडली, जी सांगते की, लोक इतर लोकांना त्यांची कृत्ये करण्यास भाग पडतात कारण ते असे मानतात की, अधिकारी व्यक्ती ही पात्र असून परिणामांची जबाबदारी घेईल. मिलग्राम यांच्या निष्कर्षांवरून लोकांना युद्ध किंवा नरसंहारासारख्या कृत्यांमध्ये भाग घेताना आपल्या अंतःकरणाच्या विरुद्ध निर्णय कसे घेतात याचे स्पष्टीकरण देता आले.

स्टॅनफोर्ड तुरुंगातील प्रयोग (1971)

स्टॅनफोर्डचे प्राध्यापक फिलिप झिंबार्डो यांना लोकांवर सामाजिक भूमिकांचा कसा प्रभाव पडतो हे जाणून घ्यायचे होते. उदाहरणार्थ, तुरुंगात तुरुंग रक्षक आणि कैद्यांमधील तणावाचे नाते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अधिक अवलंबून असते की वातावरणावर हे त्यांना जाणून घ्यायचे होते.

झिंबार्डो यांच्या प्रयोगात 24 महाविद्यालयीन पुरुष विद्यार्थ्यांना कैदी किंवा तुरुंग रक्षक अशी भूमिका दिली गेली. कैद्यांना स्टॅनफोर्डच्या मानसशास्त्र विभागाच्या भुयारामध्ये तयार केलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वांतत्र्य हिरावून घेण्यासाठी आणि त्यांना अनामिक भीती वाटावे म्हणून त्यांच्यावर बुल्लिंगची प्रक्रिया करण्यात आली. रक्षकांना आठ तासांच्या शिफ्टवर ठेवण्यात आले होते आणि त्यांना कैद्यांशी वास्तविक जीवनात वागल्याप्रमाणे वागण्याची सूचना देण्यात आली होती.

झिंबार्डो यांना लवकरच असे लक्षात आले की, रक्षक आणि कैदी दोघेही त्यांच्या भूमिकांमध्ये पूर्णपणे शिरलेले आहेत; याचा परिणाम असा झाला की, प्रयोग अतिशय धोकादायक झाल्यामुळे त्यांना सहा दिवसांनी तो बंद करावा लागला. झिंबार्डो यांनीही असे कबूल केले की, प्रयोगातील विद्यार्थी स्वत:ला मानसशास्त्रज्ञ नसून पोलीस अधीक्षक म्हणून विचार करू लागले होते. या अभ्यासातून असे सिद्ध झाले की, लोकांना अपेक्षित असलेल्या सामाजिक भूमिकांनुसार लोक वागत असतात. यावरून “सरासरी लोक सहजतेने चांगले नागरिक ते गुन्हेगार कसे बनतात याचा पुरावा मिळाला” असे झिंबार्डो यांनी लिहिले आहे.

हॅलो इफेक्ट प्रयोग (1977)

मिचिगन विद्यापीठातील प्राध्यापक रिचर्ड निस्बेत आणि तिमोथी विल्सन यांनी 50 वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासानंतर 'हॅलो इफेक्ट' नावाजलेल्या संकल्पनेवर पुढील संशोधन करण्यास इच्छुक होते. 1920 च्या दशकात, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थर्नडाईक यांनी अमेरिकन सैन्यात आढळलेल्या एका घटनेचा अभ्यास केला होता ज्यामध्ये बोधनिक पूर्वग्रह दिसून आला होता. ही आपण विचार करण्यामधील एक प्रकारची त्रुटी आहे ज्याचा परिणाम आपण लोकांना कसे पाहतो आणि त्यांच्याबद्दल कशी धारणा बनवतो आणि त्या धारणांवर आधारित निर्णय घेतो यावर होतो.

1977 मध्ये, निस्बेत आणि विल्सन यांनी 118 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (62 पुरुष, 56 महिला) वर हॅलो इफेक्टची चाचणी घेतली. विद्यार्थ्यांना दोन गटात विभाजित करण्यात आले आणि त्यांना इंग्रजीमध्ये योग्य उच्चार (accent) असलेल्या बेल्जियन शिक्षकाचे मूल्यांकन करण्यास सांगण्यात आले. सहभागींना टेलिव्हिजन मॉनिटरवर शिक्षकाच्या दोन पैकी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेली मुलाखत दाखवण्यात आली. पहिल्या मुलाखतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांशी सभ्यपणे संवाद साधताना दिसत होता तर दुसऱ्या मुलाखतीमध्ये तो असभ्यपणे वागत होता. त्यानंतर सहभागींना शिक्षकाच्या शारीरिक स्वरुपाचे, सवयींचे आणि उच्चाराचे आकर्षक ते कटू अनुभव अशा आठ गुणांच्या मापदंडावर मूल्यांकन करण्यास सांगितले गेले.

निस्बेत आणि विल्सन यांना असे आढळले की केवळ शारीरिक स्वरुप याच्या आधारे 70 टक्के सहभागींनी आदराने वागले असताना शिक्षकाचे मूल्यांकन आकर्षक केले तर असभ्यपणे वागले असताना कटू अनुभव म्हणून केले. शिक्षक रूड असताना त्याच्या उच्चाराचे मूल्यांकन 80 टक्के सहभागींनी कटू अनुभव म्हणून केले तर सभ्यपणे असताना जवळपास 50 टक्के सहभागींनी केले.

हॅलो इफेक्टवर केलेल्या या अद्ययावत अभ्यासातून असे दिसून येते की बोधनिक पूर्वग्रह फक्त सैनिकी वातावरणापुरता मर्यादित नाही. एखाद्याची नोकरीची मुलाखत असो किंवा आपण ज्या सेलिब्रिटीची प्रशंसा करतो त्यांनी एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली आहे ते खरेदी करायचे की नाही हे ठरवत असो, बोधनिक पूर्वग्रह योग्य निर्णय घेण्यास अडथळा ठरू शकतो.

मानसशास्त्रावर प्रयोगांचा झालेला परिणाम

वरील अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित समकालीन मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तन, मानसिक आजार आणि मन आणि शरीर यांच्यातील संबंध यांना चांगले समजू शकलेले आहेत. मानसशास्त्रातील योगदानासाठी वॉटसन, बंडुरा, निस्बेत आणि झिंबार्डो या सर्वांना अमेरिकन सायकोलॉजिकल फाउंडेशनकडून जीवनगौरव पदकाने गौरविण्यात आले आहे. या संशोधनाचा आधार घेऊन मानसशास्त्रात अनेक महत्त्वाची संशोधने झालेली आहेत.


(सर्व चित्रे इमेजेस google वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...