गुरुवार, २१ मार्च, २०२४

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

 

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

दोन बौध्द भिक्खू नदी ओलांडत होते तेव्हा वृद्ध भिक्खूने पाहिले की एक तरुणी नदी पार करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी खोल असल्याने ती मुलगी म्हणेल, माझा हात धर या विचाराने तो घाबरला होता. ती एक 18 वर्षाची सुंदर मुलगी होती, तो तिच्याजवळून जात असताना त्या मुलीने विचारले की, "मला नदी पार करण्यास मला मदत कराल का?"

तो वृद्ध भिक्खू म्हणाला, मला माफ करा, मी एक भिक्खू आहे आणि मी महिलांना हात लावत नाही. त्याचे हात पाय थरथर कापू लागले आणि तो घाबरून धावत धावत नदी पार गेला. निसर्गाचे आभार मानले की आपण वाचलो, एक संकट सांगून उभे होते, खड्ड्यात पडण्यापासून वाचलो. नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर मागे वळून पाहिलं तर त्यास मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आश्चर्यामध्ये थोडा मत्सर आणि थोडी ईर्ष्या देखील होती.

मागून येणारा तरुण भिक्खू त्या मुलीला चक्क खांद्यावर घेऊन नदी पार करत होता. हात धरणे ही गोष्ट मान्य नाही, स्पर्श करणे निषिद्ध आहे, आणि तो तरुण आहे, आणि त्याला नुकतीच दीक्षा मिळाली आहे. तो वृद्ध भिक्खू म्हणाला आणि हे काय अघटित घडत आहे?

दोघेही एक शब्दही न बोलता दोन मैल चालत राहिले. आश्रमात पोहोचेपर्यंत तो वृद्ध भिक्खू काहीही बोलला नाही, तो खूप संतापला होता. रागात क्रोध आणि संतापही होता, स्वत:ला श्रेष्ठ आणि धार्मिक समजण्याचा अभिमानही होता आणि त्या तरुण भिक्खूला कनिष्ठ आणि अधार्मिक समजण्याची भावनाही होती.

जेव्हा ते आश्रमाच्या पायऱ्या चढू लागला, तेव्हा वृद्ध भिक्खू स्वतःला शांत न करू शकल्याने; तो म्हणाला, मला गुरूंना जाऊन सांगावे लागेल, कारण हे नियमांचे उल्लंघन आहे, आणि तू तरूण आहेस, आणि तू एका स्त्रीला आपल्या खांद्यावर वाहून नेलेस, ती स्त्री सुंदर देखील होती. तो तरुण भिक्खू म्हणाला, आपण काहीही बोलत आहात. मी त्या स्त्रीला नदीकाठावर सोडून दोन तास झाले, पण आपण मात्र तिला अजूनही खांद्यावर घेऊन चालला आहात?  

आजूबाजूला असे अनेक लोक विनाकारण अनेक गोष्टींचे ओझे आपल्या खांद्यावर वाहत असतात. कधीकधी आपण भूतकाळातील खेद आणि दु:ख यांना उगाळत बसतो त्यामुळे आपण जुन्या आठवणी आणि अनुभवांचे पुन्हा पुनरावलोकन करतो, पूर्वीच्या अनुभवांना कवटाळतो आणि हे सर्व सोपे असते. आपण कदाचित भविष्यापासूनही फारकत घेतो. भविष्याबद्दल चिंता आणि भीती बाळगणारी एखादी व्यक्ती भूतकाळाच्या बंधनात अडकते. भविष्यातील घटनांबद्दल चिंता, भीती आणि अनिश्चितता आपणास वर्तमान काळात जगण्यापासून दूर सारते. त्यामुळे भविष्य हेदेखील एक प्रकारचे कारागृह बनते. यावर उपाय एकच तो म्हणजे आपण जगण्याविषयी सजग असणे, प्रत्येक गोष्टीत पूर्णभान असणे, कोणतेही काम करत असताना साक्षीभाव ठेवणे म्हणजेच माइंडफुलनेस असणे होय.

माइंडफुलनेस:

माइंडफुलनेस म्हणजे आपली मनःस्थिती, विचार आणि भावनांवर लक्ष केंद्रित करण्याची कला. वर्तमान क्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं, आपले विचार, भावना आणि शारीरिक संवेदना यांचा स्वीकार करणं आणि त्यात न अडकता त्यांचे त्रयस्थपणे निरीक्षण करणे. ही एकाग्रतेची कला आहे, ज्यामुळे आपण आपल्या जीवनाचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेऊ शकतो. यात आपल्या आसपासच्या वातावरणाची जाणीव आणि बिनशर्त स्वतःला स्वीकारणे समाविष्ट आहे. माइंडफुलनेस आपल्याला वर्तमान क्षणात जगण्यास आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत करते.

माइंडफुलनेसचा इतिहास:

माइंडफुलनेसची मुळे प्राचीन भारतातील बौद्ध धम्मात आहेत. भगवान बुद्ध यांनी 2500  वर्षांपूर्वी "सति" नावाची शिकवण दिली, जी वर्तमान क्षणामध्ये जागरूक राहण्यावर भर देते. सति शिकवण बौद्ध धर्मातून जगभरात पसरली आणि 20 व्या शतकात पाश्चिमात्य जगात लोकप्रिय झाली. पालीभाषेतील सतीपठणम या शब्दाचे जॉन कोबाट-झिन यांनी माइंडफुलनेस असे भाषांतर केले आहे. सतीपठणमचा अर्थ focusing attention within म्हणजे आंतरिक मनात डोकावणे. माइंडफुलनेस संकल्पनेत awareness and acceptance अंतर्बाह्य स्थितिभान (सजगता) व बिनशर्त स्वीकार्य या संकल्पनाचा अंर्तभाव होतो. माइंडफुलनेसचा पाश्चिमात्य जगात परिचय करून देण्यात अनेक लोकांनी योगदान दिले, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

जॉन कोबाट-झिन: यांनी "माइंडफुलनेस-बेस्ड स्ट्रेस रिडक्शन" (MBSR) नावाचा कार्यक्रम विकसित केला, जो तणाव आणि वेदना व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे.

थिक नाट हान: हे एक व्हिएतनामी बौद्ध भिक्षु आणि शांतता कार्यकर्ते आहेत ज्यांनी माइंडफुलनेसवर अनेक पुस्तके आणि लेख लिहिलेले आहेत.

माइंडफुलनेसचा सराव करण्याचे फायदे:

माइंडफुलनेसचा सराव करण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणे, एकाग्रता आणि सजगता वाढवणे आणि आपल्या भावना आणि विचारांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडणे समाविष्ट आहे.

1. मानसिक आरोग्यात सुधार:

माइंडफुलनेस तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे आपल्या विचारांवर आणि भावनांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे आपण नकारात्मक विचारांच्या आहारी न जाता त्यांचे तटस्थपणे निरीक्षण करण्यास शिकवते.

2. शारीरिक आरोग्यात सुधार:

माइंडफुलनेसमुळे आपला रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाची गती योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते, वेदना कमी करते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. हे आपल्याला आपल्या शरीराशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास आणि आपल्या शारीरिक संवेदनांशी अधिक जागरूक राहण्यास मदत करते.

3. एकाग्रता आणि सजगता वाढविते:

माइंडफुलनेस आपणास वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्यास आणि विचलित होण्यापासून रोखण्यास मदत करते. हे आपली एकाग्रता आणि अवधान सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे आपण आपल्या कामात आणि अभ्यासात अधिक चांगली कामगिरी करू शकतो.

4. भावना आणि विचारांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडणे:

माइंडफुलनेस आपल्याला आपल्या भावना आणि विचारांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. हे आपल्याला आपल्या भावनांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यास आणि अधिक स्वीकारार्ह आणि दयाळू बनण्यास मदत करते.

माइंडफुलनेसचा सराव करण्याचे काही मार्ग:

ध्यान: ध्यान हा माइंडफुलनेसचा सराव करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. ध्यान करताना, आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या विचार आणि भावना याविषयी तटस्थ राहून श्वासोच्छवासाचे निरीक्षण. यामुळे आपण स्थिर आणि तटस्थ राहू शकतो.

योगासने: योग हा माइंडफुलनेसचा सराव करण्याचा आणखी एक लोकप्रिय मार्ग आहे. योगासने करताना, आपण आपल्या श्वासावर आणि आपल्या शरीराच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे फोकस्ड राहून विशिष्ट घटकावरच लक्ष केंद्रित करून स्थिर राहू शकतो. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक उन्नती घडून येते.

माइंडफुल वॉकिंग: माइंडफुल वॉकिंग करताना, आपणास आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव असणे आणि आपल्या पाऊलांवर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करणे. त्यामुळे पूर्ण ऊर्जा चालण्यावर खर्ची होते आणि त्याचा फायदा आपल्या शरीरावर दिसून लागतो.

माइंडफुल ईटिंग: माइंडफुल ईटिंग करताना, आपण आपल्या अन्नाचा स्वाद, वास आणि पोत यावर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या भूक आणि तृप्तीच्या भावनांशी जागरूक राहणे. आजकाल स्मार्टफोन, टीव्ही आणि सोसिअल मिडिया यामुळे जेवणावरचे लक्षच उडून गेले आहे. आज अनेक मुले स्मार्टफोन किंवा टीव्हीवर कार्टून लावल्याशिवाय जेवतच नाहीत. त्यामुळे ओबेसिटी आणि पचनसंस्था विषयी इतर आजार उद्भवत आहेत.

माइंडफुलनेस विद्यार्थ्यांसाठी कसे फायदेशीर आहे?

  • तणाव आणि चिंता कमी करते: माइंडफुलनेस विद्यार्थ्यांना तणाव आणि चिंता व्यवस्थापित करण्यास शिकवते, ज्यामुळे त्यांना शाळा आणि अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येते.
  • एकाग्रता आणि अवधान सुधारते: माइंडफुलनेस विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि अवधान सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांना वर्गात अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास आणि अभ्यासात अधिक चांगले कामगिरी करण्यास मदत होते.
  • भावनिक लवचिकता वाढवते: माइंडफुलनेस विद्यार्थ्यांना भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि नकारात्मक भावनांशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्यास शिकवते.
  • बिनशर्त स्वीकृती वाढवते: माइंडफुलनेस विद्यार्थ्यांना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारण्यास आणि स्वतःबद्दल अधिक दयाळू होण्यास मदत करते.
  • नातेसंबंध सुधारते: माइंडफुलनेस विद्यार्थ्यांना इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यास आणि अधिक मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करते.

माइंडफुलनेसचा सराव आपल्या जीवनात लहान लहान बदलांसह सुरू करता येतो. आपण दिवसातून काही मिनिटे ध्यान किंवा योगासने करून सुरुवात करू शकतो. आपण आपल्या दैनंदिन कृतीमध्ये माइंडफुलनेसचा सराव करण्याचा प्रयत्न करू शकतो, जसे की चालणे, खाणे किंवा आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे. आज अनेक ऑफिसेसमध्ये बैठे बैठे योगासने करण्यास प्रवृत्त केलेलं जात आहे. माइंडफुलनेस हे एक कौशल्य आहे ज्याला सराव आणि धैर्य आवश्यक आहे. नियमित सराव केल्याने, आपण आपल्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणू शकतो.


 (सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Daniel, Tracy (2018). Mindfulness for children. New Delhi: Adams Media

Kabat-Zinn, J. (1994). Wherever You Go, There You Are: Mindfulness Meditation in Everyday Life. Hachette Books.

Kabat-Zinn, J. (2005). Coming to Our Senses: Healing Ourselves and the World Through Mindfulness. Hyperion.

Moore, Adam, and Peter Malinowski. (2009). Meditation, Mindfulness and Cognitive Flexibility. Conscious Cognition, 18/1, 176-186.

Nhat Hanh, T. (1992). Peace Is Every Step: The Path of Mindfulness in Everyday Life. Bantam Books.

Nhat Hanh, T. (1999). The Miracle of Mindfulness: An Introduction to the Practice of Meditation. Beacon Press.

Nhat Hanh, T. (2012). The Art of Mindful Living: How to Bring Love, Compassion, and Inner Peace into Your Daily Life. HarperOne.

२ टिप्पण्या:

Thank you for your comments and suggestions

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

  रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills      एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहू...