गुरुवार, ७ मार्च, २०२४

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

 

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution-Focused Brief Therapy

गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांना महत्त्वाचे संदेश देत असत. एके दिवशी सर्व शिष्य बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. बुद्धांनी आपल्याकडे असलेली दोरी हातात घेऊन एकामागून एक तीन गाठी बांधल्या. दोरीकडे इशारा करून बुद्धांनी शिष्यांना विचारले की ही तीच दोरी आहे का जी तीन गाठी बांधण्यापूर्वी होती?

एका शिष्याने सांगितले की, गाठ पडल्यानंतरही दोरी तीच आहे. दुसऱ्या शिष्याने सांगितले की, आता या दोरीला तीन गाठी बांधण्यात आल्या आहेत, त्यामुळे दोरीचा आकार बदलला आहे. इतर शिष्यांनी सांगितले की दोरीचे स्वरूप बदलले आहे, परंतु त्याचे मूळ तेच आहे. बुद्ध म्हणाले तुम्ही सर्वजण बरोबर आहात. यानंतर बुद्धांनी गाठ उघडण्यासाठी दोरीची दोन्ही टोके पकडून जोरात खेचण्यास सुरुवात केली. बुद्धाने विचारले की दोरीच्या तीनही गाठी अशा प्रकारे उघडल्या जातील का?

असे केल्याने गाठ मजबूत होतील असे शिष्यांनी सांगितले. बुद्ध म्हणाले या गाठी उघडण्यासाठी काय करावे लागेल? एक शिष्य म्हणाला आधी हे बघावे लागेल की या गाठी कशा पडल्या होतात? गाठी कशा सोडवता येतील? गाठी कशा पडल्या आहेत हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपण त्या सहजपणे उघडू शकतो.

बुद्ध म्हणाले की, समस्यांचाही आपण तसाच विचार केला पाहिजे. समस्यांचे कारण जाणून न घेता त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण आणखी बिघडू शकते. म्हणूनच जर आपण प्रथम समस्यांचे कारण समजून घेतले तर त्यांचे निराकरण सहज शोधता येईल.

आज आपण समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार (SFBT) ही समस्या निवारण करण्याऐवजी उपाययोजना निर्माण करण्यावर आधारित मनोचिकित्सा पद्धती विषयी जाणून घेणार आहोत. सद्याच्या समस्या सोडविताना भूतकालीन कारणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इतर मनोचिकित्सा स्वरूपांपेक्षा, SFBT आपल्या सद्य परिस्थिती आणि भविष्यातील आशा यावर कसे लक्ष केंद्रित करावे यावर भर देते. SFBT 1970 आणि 1980 च्या दशकांमध्ये स्टीव्ह डी शेजर आणि इन्सू किम बर्ग या पती-पत्नींनी विस्कॉन्सिन येथील कुटुंब उपचार केंद्रात विकसित केले.

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार (SFBT)

SFBT हा ज्ञानरचनावाद चिकित्सा पद्धतींच्या गटात मोडणारा दृष्टिकोन आहे. ज्ञानरचनावाद असे सांगते की लोक स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करतात आणि शेवटी त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे निर्माते असतात. SFBT चिकित्सक असे मानतात की जीवनातील बदल अपरिहार्य आहे. कारण एखादी व्यक्ती स्वतःच्या जीवनाची मार्गदर्शक असते, म्हणून ती चांगल्यासाठी बदलू शकते.

SFBT मध्ये, थेरपिस्ट हा संवाद सुलभ करण्यात कुशल असतो. तो स्वतःला तज्ज्ञ म्हणून सादर करत नाहीत तर "अनभिज्ञ" या दृष्टीकोनातून सामोरे जातो. सल्लार्थीच्या  स्वतःमधील कौशल्यावर आधारीत थेरपिस्ट त्यांची ताकद, संसाधने आणि इच्छा यांचा वापर करून विविध तंत्रे विकसित करून प्रश्न विचारतो. सल्लार्थीच्या आयुष्यात आधीच काय चांगले चालू आहे आणि जेव्हा ते अशा चांगल्या परिस्थितीत होते तेव्हा गोष्टी कशा होत्या यावर लक्ष केंद्रित केल्याने, उपाय शोधण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. 

चमत्कारिक प्रश्न (Miracle Questions)

चमत्कारिक प्रश्न हे एक असे तंत्र आहे जे SFBT उपचार तज्ञ वापरतात, जेणेकरून सल्लार्थीला "परंपरागत पद्धतीबाहेर" विचार करण्यास मदत होते. हे प्रश्न सल्लार्थीस समस्या नसलेल्या आयुष्याचा विचार करण्यास सांगते, जिथे रात्री चमत्कार घडतो आणि समस्या नष्ट होते. परिस्थितीनुसार शब्द बदलत असले तरीही, मूलभूत शब्दरचना पुढीलप्रमाणे:

"समजा रात्री तुम्ही झोपला असताना आणि संपूर्ण घर शांत असताना, एक चमत्कार घडतो. चमत्कार असा आहे की तुम्ही ज्या समस्यासाठी येथे आला आहात ती सुटली आहे. पण तुम्ही झोपेत असल्यामुळे, तुम्हाला माहिती नाही की चमत्कार घडला आहे. म्हणून, उद्या सकाळी उठल्यावर, ‘वॉव! अशी काहीतरी गोष्ट घडली असावी आणि समस्या निघून गेली!' असे म्हणण्यास प्रवृत्त करणारा छोटा बदल तुम्हास आढळू शकेल?"

अशा प्रकारे विचारले जाणारे, चमत्कारिक प्रश्न सल्लार्थीस भविष्यातील शक्यता शोधण्यास मदत करतात.    

अपवादा‍त्मक प्रश्न (Exception Questions)

अपवादा‍त्मक प्रश्न हे सल्लार्थीस अशा परिस्थिती (वेळ) ओळखण्यास मदत करतात जेव्हा त्यांच्यासाठी गोष्टी वेगळ्या होत्या. जेव्हा समस्या आताच्या एवढी मोठी नव्हती तशा परिस्थिती (वेळ) शोधणे होय. अशी काही उदाहरणे:

"तुम्ही जेव्हा सर्वात आनंदी असाल तेव्हा मला त्या वेळेबद्दल सांगा."

"त्या दिवशी काय विशेष होते ज्यामुळे तो दिवस चांगला वाटला?"

"तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आठवतात का जेव्हा आजची समस्या नव्हती?"

असे अपवाद कसे घडले ते शोधून, थेरपिस्ट सल्लार्थीस उपाय शोधण्यासाठी सक्षम करू शकतात.

श्रेणी-आधारित प्रश्न (Scaling Questions)

श्रेणी-आधारित प्रश्न सल्लार्थीस त्यांची समस्या गुणात्मक पातळी वर समजण्यास मदत करतात. असे प्रश्न प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि बदल मॉनिटर करण्यासाठी उपयुक्त मार्ग आहे.

साधारणपणे, स्केल 1 ते 10 पर्यंत असू असतात. उदाहरणार्थ, चिंताग्रस्त असलेल्या सल्लार्थीसोबत काम करताना, थेरपिस्ट असे म्हणू शकतो की, "जर 10 सर्वात जास्त चिंताग्रस्त आणि 1 सर्वात शांत असेल, तर तुम्ही आता कोणता अंक निवडला?"

यासारख्या प्रश्नांनंतर सामान्यत: स्केलिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातात, जसे की सल्लार्थीस त्यांनी निवडलेला अंक का निवडला आणि त्यांचा तो अंक एकने कमी का नाही हे विचारणे. थेरपिस्ट सल्लार्थीस वरील स्केलवरील बदलाबाबत विचारतील.  

SFBT ची मदत कशी होऊ शकते?

SFBT एखाद्या व्यक्तीला एखादे ध्येय गाठण्याचा किंवा एखाद्या विशिष्ट समस्येवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे स्वतंत्र उपचारात्मक पद्धती म्हणून किंवा इतर थेरपीसह वापरले जाऊ शकते. सर्व वयोगटाच्या लोकांवर आणि व्यसन, मुलांच्या वर्तनात्मक समस्या आणि नातेसंबंध समस्यांसोबत विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.

सामान्यतः मनोविकृती आणि स्किझोफ्रेनियासारख्या प्रमुख मानसिक स्थितींच्या उपचारासाठी या थेरपीचा वापर केला जाऊ शकतो.  

SFBT चा फायदा

SFBT चा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ कमी लागणारी पद्धत. SFBT ही "कमी कालावधीत पूर्ण होणारी थेरपी" आहे, जी सामान्यतः 5-8 सत्रांमध्ये पूर्ण होते. यामुळे, इतर थेरपीच्या तुलनेत ती अनेकदा कमी खर्ची असते.

जुन्या जखमांवर भर देण्याऐवजी, या थेरपीमध्ये समस्यांच्या निराकरणावर अधिक वेळ खर्च केला जातो, ज्यामुळे SFBT ही विशिष्ट ध्येय असलेल्या आणि ते गाठण्यासाठी थोडीशी मदत हवी असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे.   

परिणामकारकता

संशोधनातून असे दिसून येते की SFBT खालील गोष्टींसाठी प्रभावीपणे कार्य करते:

  • व्यसनाची तीव्रता आणि आघाताची लक्षणे कमी करणे
  • वैवाहिक समस्या आणि वैवाहिक कटुता कमी करणे
  • विशेष शैक्षणिक गरज असलेल्या मुलांमध्ये शालेय वर्तनात्मक समस्या सुधारण्यास मदत करते  
  • बाह्य वर्तनात्मक समस्या जसे की वर्तन विकार आणि संघर्ष व्यवस्थापन सुधारणे  
  • निराशा, चिंता आणि आत्मसन्मान यासारख्या अंतर्गत वर्तनात्मक समस्या कमी करणे

SFBT इतर पुराव्याधारित पद्धतींइतकीच (कधी कधी त्याहूनही अधिक) प्रभावी असू शकते, जसे की बोधनिक वर्तनात्मक चिकित्सा (CBT) आणि परस्पर संबंध मनोचिकित्सा.  

SFBT ची प्रमुख वैशिष्ट्ये

  • SFBT भूतकाळात अडकण्याऐवजी भविष्यातील ध्येय निश्चित करण्यावर भर देते.
  • SFBT कमकुवतींऐवजी व्यक्तीच्या आंतरिक शक्ती आणि स्रोतांवर भर देते.
  • SFBT मध्ये थेरपिस्ट आणि सल्लार्थी मिळून समस्यांवर एकत्रित तोडगा काढतात.
  • SFBT ही सामान्यत: 5 ते 20 सत्रांपर्यंत चालणारी अल्प-कालीन उपचार पद्धत आहे.
  • चिंता, नैराश्य, नातेसंबंधातील समस्या, पालकत्वाशी संबंधित समस्या, ताण-तणाव व्यवस्थापन, खाण्याच्या विकार, शोक आणि हानी यासारख्या मानसिक आरोग्य समस्यांवर उपचारासाठी SFBT उपयुक्त आहे. 

समारोप

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार (SFBT) ही समस्या परिहार आणि भविष्यावर केंद्रित असलेली अल्प-मुदतीची मानसोपचार पद्धत आहे. ही पद्धत एखाद्या व्यक्तीच्या आंतरिक शक्ती आणि स्रोतांवर आधारित असून त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यावर भर देते. पारंपारिक मानसोपचारांमध्ये ज्याप्रमाणे समस्यांच्या मूळ कारणांचा शोध घेतला जातो त्याच्या उलट, SFBT सध्याच्या आणि भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, SFBT ही विविध मानसिक आरोग्य समस्यांवर उपयुक्त आणि प्रभावी उपचार पद्धत आहे. तसेच, इतर उपचारांपेक्षा कमी सत्रांची आवश्यकता असल्यामुळे ही कमी खर्चिक उपचार पद्धत देखील मानली जाते.

 

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Friedman, D. (1995). Solution-focused therapy: A review of the outcome literature. The Family Journal, 3(3), 237-251.

Gingerich, W. J., & Weiner-Davis, M. (2010). Solution-focused brief therapy. In I. B. Weiner & W. J. Hudson (Eds.), Practicing solution-focused therapy: Brief methods for individuals, couples, and families (3rd ed.). Guilford Press.

Kim, J. (2013). Solution-focused brief therapy (J. S. Kim, Ed.). SAGE Publications.

Ratner, Harvey; George, Evan and Iveson, Chris (2012). Solution Focused Brief Therapy: 100 Key Points and Techniques, Routledge; 1st edition.

Shazer de, S. (1988). Clues: The forgotten key to the solution. W.W. Norton & Company.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...