गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी | Self Awareness |



स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी
ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याने त्याच्या काळात मानव जातीला केलेले आव्हान आजही खरे ठरते. तो म्हणतो कोणावरही रागावणे हे सहज शक्य आहे, परंतु योग्य माणसावर योग्य वेळी योग्य कारणाकरिता, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात रागावणे अवघड असते." मानवाला बुध्दी आहे त्याचप्रमाणे भावनादेखील आहेत. आपली सर्व विचारप्रक्रिया ही भावनेशी निगडीत असते.
उदा. मला अमुक एक गोष्ट आवडते.
मला अमुक एक गोष्ट आवडत नाही.
            वरील दोन्ही वाक्यात निम्नस्तरावर अनुक्रमे धन आणि ऋण भावना व्यक्त होतात. आपल्या मेंदूतील Cerebral Cortex विशेषतः Pre-frontal Lobes हे विचारांशी संबंधित असतात तर त्या खाली असलेली Limbic system  विशेषतः Amygdala complex हे भावनाशी निगडित असते. त्यामुळे आपल्याला तार्किक मेंदू  (Rational Brain) आणि भावनिक मेंदू (Emotional Brain) असे दोन मेंदू आहेत असे समजण्यात येते. या दोन्ही मेंदूतील प्रक्रिया परस्परांशी पूरक आहेत फक्त तार्किक मेंदू खूप चांगला असेल तर आपल्याला इतरांशी योग्य प्रकारे जवळिक साधता येणार नाही. याउलट फक्त भावनिक मेंदू खूप विकसित झाला असेल तर जीवनात चांगले विचार निर्माण होणार नाहीत. त्यामुळे दोन्हीमध्ये संतुलन असणे महत्त्वाचे असते.
1995 पर्यंत IQ ला अधिक महत्त्व दिले जात होते. पण डॅनिअल गोलमन यांनी IQ हा व्यक्तीच्या जीवनात यश प्राप्तीसाठी 20 टक्के कार्यरत असतो तर परिपूर्ण यशासाठी आणखी एका गोष्टीशी संतुलन आवश्यक असते. ती म्हणजे भावनिक बुध्दिमता (EQ), असे प्रतिपादन त्यांनी केलेले आढळते.
     विचार आणि भावना या हातात हात घालून जीवनाला प्रगतीपथावर नेतात. आपल्या भावनांचे विशिष्ट परिस्थितीत विश्लेषण करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा योग्य पध्दतीने आविष्कार करणे आणि इतरांच्या भावना समजावून घेणे. त्यामुळे आपल्या भावनांना योग्य प्रकारे वळण लागते आणि अशा भावना विचारप्रक्रियेशी चांगल्या पध्दतीने साथ देवू शकतात.
         जी व्यक्ती स्वतःला ओळखू शकते ती इतरांना सहजपणे ओळखू शकते. परंतु स्वतःला ओळखणे म्हणजे काय? हा खुप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आपल्याला   होणा-या जाणिवेतून मिळत असते. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःची शरीरसंपदा, क्षमता, जवळच्या वस्तू, व्यक्तीचे स्वत:चे कुटुंबसमूह, सामाजिक  मूल्ये, ध्येय धोरणे, सामाजिक संस्था या सर्वासंबंधी धारण केलेल्या अभिवृती म्हणजे स्व-संकल्पना होय (शेरीफ). पण स्व-संकल्पना जाणून घेण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता असते.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीची स्व-संकल्पनेचे मूल्यांकन होणार आहे. त्या व्यक्तीची स्व-जाणीव पातळी ही समाधानकारक असावी लागते. म्हणजे त्या व्यक्तीस स्व-जाणीव नसल्यास ती स्वतःला ओळखू शकणार नाही व स्वतःला योग्य प्रमाणात ओळखू न शकल्याने ते इतरांना कसे ओळखतील?
डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुध्दिमतेचे पाच घटक सांगितलेले आहेत. यातील पहिले तीन घटक हे स्व-जाणिवेशी निगडीत आहेत व शेवटचे दोन घटक सामाजिक-जाणिवेशी निगडीत आहेत. स्व-जाणीव असे म्हणत असताना केवळ मी काय बोललो एवढे लक्षात ठेवून भागत नाही तर ते मी कसे व का बोललो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्व-जाणीव असलेल्या व्यक्तीत खालील गुणवैशिष्टये आढळून येतात.
1.  अशा व्यक्तींना विशिष्ट वेळी ते कोणत्या भावना अनुभवत आहेत आणि त्या प्रकारच्या भावना कोणत्या कारणामुळे अनुभवत आहेत याची पूर्ण जाणीव असते.
2.  अशा व्यक्तींचे बोलणे त्याच्या भावना आणि त्यांचे विचार या तीनही गोष्टी परस्परांना पूरक असतात. त्यामुळे त्यांच्या मनात जर विचार आला की विशिष्ट वाक्य विशिष्ट ठिकाणी बोलू नये तर ते त्या वाक्यावर भावनिक नियत्रण सहज ठेवू शकतात.
3.  आपल्या भावनांमुळे आपल्या निष्पादनावर कशाप्रकारे परिणाम होत आहे हे त्यांच्या सहज लक्षात येते. इतरांशी बोलताना आपल्या बोलण्यामुळे इतरांना त्रास होत आहे हे लक्षात आल्याबरोबर अशा व्यक्ती स्वतःचे बोलणे थांबवितात.
4.  अशा व्यक्तिंना स्वत:ची व्यक्तिगत मूल्ये व ध्येयांची पूर्ण जाणीव असते त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःचा वेळ व्यर्थ घालवीत नाहीत.
5.  अशा व्यक्तींना स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा माहित असतात. त्यामुळे ते ज्या गोष्टी करु शकतात त्यातच अधिक रस घेतात. काहीही करण्याकडे त्यांचा हव्यास नसतो.
6.  अशा व्यक्ती स्वतःच्या कार्याचे अधूनमधून मूल्यमापन करतात. आपण काय मिळविले, काय गमावले याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. त्या जीवनातील अनुभव विसरत नाहीत कारण अनुभवापासून आपण शिकू शकतो अशी त्यांची निश्चित धारणा असते.
7.  अशा व्यक्ती सतत काही नवीन शिकत असतात. जाणीवपूर्वक स्वतःचा विकास साधण्याकडे त्यांचा कल असतो.
8.  अशा व्यक्ती त्यांचे चुकले असल्यास ते लगेच मान्य करतात आणि नव्या दमाने पुन्हा कामाला लागतात.
9.  अशा व्यक्तींमध्ये थोडी विनोदबुध्दी असते. खेळकर वृत्तीमुळे ते इतरांना लवकर आपलेसे करु शकतात.
10. शक्य झाल्यास इतरांना मदत करण्याकडे त्यांचा कल असतो; स्वतःवर ठाम विश्वास असतो.
11. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याविषयी ते स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे ते कित्येकदा लोकांमध्ये एकाकी पडतात. परंतु त्यांचे त्यांना वाईट वाटत नाही.
12. अशा व्यक्ती खूप विचार करुन निर्णय घेतात आणि एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. त्यामुळे त्यांना काही वेळा त्रास देखील होतो.
वरील योग्यता किंवा गुणवैशिष्टये पाहिल्यानंतर काही अंशी आपणास स्थिर प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होवू लागते. स्व-जाणीव या दोन शब्दात अनेक गुण विशेष सामावलेले आहेत. तसेच हे गुणविशेष सामान्य बुध्दिमत्तेपेक्षा अगदी भिन्न आहेत. या गुण विशेषांचा जीवनात इतरांबरोबर वागण्यात, इतरांबरोबर काम करण्यात खूप फायदा होतो. हा गुण विशेषांचा समुच्चय म्हणजे भावनिक बुध्दिमतेचा अविभाज्य अंग होय. व्यक्तीस जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, स्व-जाणिवेचा स्तर हा उच्च असावा व त्याच बरोबर स्व-संकल्पनाही उच्च स्तराची असावी लागते. म्हणून स्व-संकल्पना व भावनिक बुध्दिमत्ता यांचा स्तर उच्च असणा-या व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यास पात्र आहेत. कारण अनेक महान पुरुषांनी असे नमूद केलेले आढळते की व्यक्ती ज्यावेळी स्वतःला ओळखते, स्वतःच्या क्षमता जाणते त्यावेळी जगातील इतर घटकाना ओळखण्यास, जाणण्यास पात्र होते.
स्व- जाणिव विकसित करण्यासाठी शाळेची भूमिका:
बरेच लोक स्वतःबद्दलचे सत्य स्वीकारण्यास तयार नसतात. उदाहरणार्थ, काही विद्यार्थी स्वतःची स्व-प्रतिम गंमतीशीर व्यक्ती म्हणून इतरासमोर सादर करतात त्यामुळे त्यास कोणीही अभ्यासाबाबत गंभीरपणे घेत नाहीत. पण प्रत्यक्षात, त्यास त्या गोष्टीचा फायदा अभ्यासात न होता तोटाच होतो कारण प्रत्यक्षात तो स्वतः कोण आहे याची जाणीव त्यास न झाल्याने व्यक्तिमत्वाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे स्व-जाणीवेसाठी स्वत:ची जागरुकता, प्रामाणिकपणा आणि धैर्य आवश्यक आहे. यासाठी शाळा महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.                                स्व-जाणिव विकसित करण्यासाठी शिक्षणाची भूमिका:
जर आपण स्व-जाणिव विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्थाबद्दल विचार केल्यास असे लक्षात येते की, आपण काय शिकत आहे आणि का शिकत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील तर आपला प्रवास न संपणाऱ्या मार्गाने सुरु आहे असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला काय हवे आहे? आपण हे समजू शकत नसेल तर आपण योग्य निर्णय आणि निवड कसे करु?  पुढे काय घडणार आहे याची जाणीव नसणे हा एक कठीण आणि गोंधळ निर्माण करणारा मार्ग आहे. त्यासाठी शिक्षण खुप महत्वाचे आहे. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी  प्रक्रिया आहे. व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्थाकडून औपचारिक आणि अनौपचारिक प्रकारचे शिक्षण घेत असते.                      स्व-जाणिव विकसित करण्यासाठी समवयस्कांची भूमिका:
स्व-जाणिव ही आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते, आपली बलस्थाने आणि कमकुवत बाजू, आपली आवड आणि नावड यांचा समावेश यामध्ये होतो. जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा दबावामध्ये असतो तेव्हा आपल्यात स्व-जाणिव विकसित होण्यास मदत होते. प्रभावी संभाषण आणि परस्परसंबंधांतून तसेच सहानुभूती विकसित करण्यासाठी देखील हे नेहमीच आवश्यक ठरते. आपली खरी ओळख हि आपले मित्रच असतात. त्यामुळे चांगल्या मित्रांची संगत करणे जीवनात खुप महत्वाचे असते.                     स्व-जाणीव विकसित करण्यासाठी कुटुंबाची भूमिका:
एखादी गोष्ट आपल्याबद्दल सत्य असू शकते हे स्वीकार करायला काही लोक तयार नसतात. म्हणून, आपण विशेषत: पालकांचे ऐकण्यासाठी तयार असले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कल्पित स्व-जाणिवेचे परीक्षण करण्यासाठी त्यांना परवानगी दिली पाहिजे. स्वतः कोणीही परिपूर्ण नाही आणि पालकही परिपूर्ण नाहीत. तरीसुद्धा, व्यावहारिक दृष्टिकोनातून, आपल्या पालकांचे ऐकले पाहिजे. कारण त्यांनी आपणास जन्मापासूनपासून खुप जवळून आणि चांगल्याप्रकारे पाहिलेले असते. इतर कोणाहीपेक्षा आपल्या वर्तनाची स्पष्ट अंतर्दृष्टी त्यांना अधिक असते. आपण त्यांचे सर्व विचार स्वीकारण्याची गरज नाही परंतु कमीतकमी त्यांचे म्हणणे ऐकले तरी पाहिजे. (लेविन, 2004) आपल्या जीवनात प्रथम कोण येतो, आपण कि आपले नातेसंबंध? नातेसंबंध याचे उत्तर असेल आणि प्रेम आणि प्रतिबद्धतेच्या खोल पातळीवर आधारलेले असले तर कुटुंबाशिवाय जगणे हे अस्वस्थ आणि विनाशकारी ठरेल. प्रेम हे एअर मास्कसारखेच असते (फेरारी, 2002). आपले स्वत:वर प्रेम नसल्यास आपण दुसऱ्यावर सर्वार्थाने प्रेम करू शकत नाही. त्यामुळे आपण प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यावर ते आपोआप येईल.
स्व-जाणिव असणे म्हणजे काय? यासाठी सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक मिश्चेरचे एक उदाहरण देता येईल. ते म्हणतात, ‘‘जर मी सलग तीन दिवस रियाज केला नाही तर माझ्या श्रोत्यांना ते माझ्या वादनातून कळते, मी सलग दोन दिवस रियाज केला नाही तर ते माझ्या समीक्षकांना कळते आणि मी एक दिवस जरी रियाज केला नाही तर कार्यक्रमावेळी ते मला कळते’’ स्व-जाणिव असलेली व्यक्तीच स्वत:शी प्रामाणिक राहू शकते आणि स्वतःशी प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीच इतरांशी प्रामाणिक असतात. त्यामुळे प्रथम स्वतःला ओळखा कारण ती यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
Ferrari, Michel & Robert J. (1998) “Self-awareness: its nature and development”New York: Cambridge University Press
Goleman, Danial (1996) “Emotional Intelligence”, New York: BantamBooks
Panisistala, Ramadevi (Editor) (Oct-2007) “University News” New Delhi: Association of Indian uniniversities. (Page no.12)
Rothman,J.C. (1998) “The Self-Awareness Workbook for Social Workers” New York: Harvard University Press
Singh, sutindar (Editor) (March-2000) “University News” New Delhi: Association of Indian Universities. (Page no.7)
संकपाळ, एस. पी. (जून,२०१२). स्व-जाणिव यशस्वी जीवनासाठी. भारतीय शिक्षण, अंक ६/६

७ टिप्पण्या:

  1. प्रत्येकाने स्व-चा शोध घेण्यासाठी अतिशय उपयुक्त व प्रेरणादायी लेख.
    डॉक्टर मनपूर्वक अभिनंदन व शतशःआभार

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली सर

    उत्तर द्याहटवा
  3. संवेदना, विचार आणि भावना हे तीन घटक कोणत्या संकल्पनेत सामावलेले असतात?

    उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...