बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

स्थितीस्थापकत्वाची कौशल्ये | Resilience skills | bounce back


यशस्वी जीवनासाठी स्थितीस्थापकत्वाची कौशल्ये
अपयश न येणे, काहीच न गमावणे म्हणजे आपला सर्वात मोठेपणा नसून, जेंव्हा केव्हा अपयश येईल किंवा आपण पडू तेंव्हा पुन्हा पूर्वीसारखे उभे राहणे त्यात खरा मोठेपणा आहे. - कन्फुशियस 
मानवी जीवन अनेक चढ-उताराणी बनलेले आहे. जीवनात पदोपदी सुख-दु:ख  एकामागून एक येतजात राहतात. त्यामुळे केवळ साकारात्मकतेच्याच पाठीमागे न लागता जीवनातील दुसरी बाजू जी अविभाज्य घटक आहे ती म्हणजे दु:ख/ नकारात्मकता होय. (मानवी जीवनाचा पाया म्हणजे दु:ख जे जन्मापासून व्यक्ती मरेपर्यंत सोबत असते. – बुद्ध तत्वज्ञान) म्हणून नाकारात्माकतेचाही तितक्याच प्रमाणात विचार व्हावा म्हणजे व्यक्तीचे जीवन न डगमगता व्यतीत होईल.
      प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी वाईट प्रसंगांना किंवा अनुभवांना सामोरे जावे लागतेच पण त्यातील काही लोक संकटाना झेलून अधिक कणखर बनतात व जीवनात तग धरतात तर दुसऱ्या बाजूला काही लोक हलक्या वाऱ्यानेदेखील नेस्तनाबूत होताना दिसतात.
            या सर्वातून बाहेर पडण्यासाठी, उभारी घेण्यासाठी किंवा समस्यांवर मात करण्यासाठीच्या क्षमता विकसित करण्याचा मार्ग काही असला पाहिजे; जेणेकरून व्यक्तीला आपला आनंदी स्वभाव टिकवून ठेवता येईल. स्थितीस्थापकत्वपणा (Resilience) हा सकारात्मक मानसशास्त्रातील मुलभूत घटक आहे. (ही संकल्पना bounce-back म्हणून अधिक सुपरिचित आहे) जीवन-कल्याण (Well-being) व चांगले आयुष्य व्यतीत करण्यासाठी स्थितीस्थापकत्वाचे योगदान खुप महत्वाचे आहे (सेलीगमन, 2007).
      स्थितीस्थापकत्व म्हणजे कठीण किंवा अवघड परिस्थितीतून उभारी घेणे आणि नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन परिणामकारकपणे करण्याची क्षमता होय (ब्रीगेट, ग्रीनवेल क्लेव्ह, 2012) काहीवेळा असे म्हटले जाते की स्थितीस्थापकत्वपणा हा व्यक्तिमत्वाचा गुण असून तो काही व्यक्तीच्यात जन्मजात असतो तर काहीच्यात अनुभवातून आलेला असतो पण अलीकडच्या काळात असे सिद्ध झालेले आहे की,  स्थितीस्थापकत्वपणा हे एक कौशल्य (skill) असून ते शास्त्रीय पद्धतीने आत्मसात करता येते. अलीकडील अनेक संशोधनातून असे सिद्ध झालेले आहे की ज्या व्यक्ती आपले जीवन अनुभवाधिष्ठित व सदसदविवेकबुद्धीने जगतात. ते कोणत्याही संकटाना तोंड देताना अस्थिर होत नाहीत कारण त्याचा पाया मजबूत असतो.
स्थितीस्थापकत्वाचे फायदे –
      स्थितीस्थापकत्वामुळे व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. स्थितीस्थापकत्व उच्च असणाऱ्या व्यक्तीमध्ये पुढील गुण आढळून येतात.
१. आव्हाने स्वीकारण्याची प्रवृत्ती व प्रगतीतील अडथळ्यांचे व्यवस्थापन करता येते.
२. भावनिकदृष्टया अधिक स्थिर असतात.
३. ताण-तणाव व दैनंदिन अडथळ्यांवर यशस्वीरित्या मत करण्याची क्षमता असते.
४. जीवन अधिक उत्साहवर्धक व आनंदी असते.
५. व्यक्ती चौकस व नवीन अनुभव घेण्यास नेहमी तयार असतात.
६. दुसऱ्यांना मदत करण्यास सदैव तयार असतात व इतराशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात अग्रेसर असतात.
स्थितीस्थापकत्वाची वैशिष्ट्ये –
व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या, अडथळे येत असतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने त्या समस्यांना सामोरे जाते. परीस्थीतीशी सामना करण्याची कौशल्ये व्यक्तिगणिक निरनिराळी आढळतात. अनेक संशोधकांनी त्यांच्या संशोधनातून स्थितीस्थापकत्वाची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. यातील काही  वैशिष्ट्ये विकसित करून ती अधिक उपयुक्त बनविली आहेत. ज्याद्वारे व्यक्तीला आपल्या प्रगतीतील अडथळ्यावर मात करण्याची सक्षमता वाढविता येईल.   
१. सजगता / जागृतता :
आनंदी स्वभावाच्या व्यक्तींना आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची संपूर्ण जाणीव असते. तसेच स्वतःचे भावनिक प्रतिसाद व वर्तनविषयी त्या सजग / जागृत असतात. अशा व्यक्ती भावभावनांचे व्यवस्थापन करण्यात  सक्षम असतात. कारण भावभावनांची कारणे त्यांना चांगल्या प्रकारे जाणता येतात. स्थितीस्थापकत्व असणाऱ्या व्यक्ती या सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात व त्यांच्या समस्यांची हाताळणी करण्याच्या नवनवीन मार्गांचा सतत विचार करत असतात.
२. प्रगतीतील अडथळे हे जीवनातील अविभाज्य अंग :
      मानवी जीवन हे अनेक आव्हानांनी बनलेले आहे हे सत्य स्वीकारून त्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. कारण जीवनातील समस्या, अडथळे व आव्हाने आपण टाळू शकत नाही. त्यामुळे आपण लवचिक होऊन मोकळेपणाने बदल स्वीकारले पाहिजे. तरच अडथळ्यावर मात करता येईल; परिणामी आपली प्रगती होईल.
३. आंतरिक नियंत्रण केंद्र :
      आपल्या आयुष्यातील यशापयश हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते. हि मनोभूमिका असणारे लोक आंतरिक नियंत्रण केंद्र असणारे असतात. याउलट नशीब किंवा दैवावर अवलंबून राहून प्रयत्न न करता यशाची अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्ती बाह्य नियंत्रण केंद्र असणाऱ्या असतात. मानसशात्रज्ञ ज्युलिअन रटर (१९५४) यांनी या संकल्पना व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी योजलेल्या आहेत. त्यामुळे ज्या व्यक्ती स्वकर्तुत्वावर विश्वास ठेवतात व स्वावलंबी असतात त्याच व्यक्ती यशस्वी झालेल्या आढळून येतात.
४. समस्या पररिहाराची ठोस कौशल्ये :
        आजच्या स्पर्धेच्या युगात समस्या परीहाराची कौशल्ये प्रत्येकाकडे असणे अत्यावश्यक आहे. जीवनात एखादी समस्या उदभवल्यास स्थितीस्थापकत्व असणाऱ्या व्यक्ती समस्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी तात्काळ समस्या परीहाराची कौशल्ये उपयोगात आणतात. एकादी भयानक परिस्थिती उदभवल्यास स्थितीस्थापकत्व उच्च असणाऱ्या व्यक्ती आपल्याभोवती सुरक्षित वलय निर्माण करतात. ज्याद्वारे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अगोदरच्या अनुभवांचा फायदा होईल. स्थितीस्थापकत्व उच्च असणाऱ्या व्यक्ती प्रत्येक समस्येकडे संधी म्हणून पाहते. कारण ‘पेला अर्धा भरला आहे’ या तत्त्वाचा अवलंब करून जीवनात यशस्वी होता येते, असा सकारात्मक दृष्टीकोन अशा व्यक्ती अंगी बाळगतात. 
५. भक्कम सामाजिक संबंध :
      आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर टी व्यक्ती जीवन जगत असताना किती माणसांचा विश्वास संपादन करते. कारण जीवनातील संघर्षमय प्रसंगास तोंड देत असताना समाजातील विश्वासू लोकांची मदत खुप मोलाची असते. संघर्षमय प्रसंग सोडविण्यास त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन मार्ग निघू शकतात. त्याच्यासमोर आपल्या भावना व मतांची अभिव्यक्ती करता येते. त्यामुळे स्थितीस्थापकत्व उच्च असणाऱ्या व्यक्ती अनेक मित्रांच्या (चांगल्या बर का!) सहवासात नेहमी असतात. आजकाल काही ऑनलाईन ग्रुप्स निर्माण झालेले आहेत जे आपल्या जीवनातील अनुभवाची देवाणघेवाण करतात. त्यामुळे त्यांचे संबध भक्कम व सलोख्याचे निर्माण होतात. परिणामी ते संबध व्यक्तीला स्थितीस्थापकत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करतात.
६. आपण वाचवणारे की बळी पडणारे :
      एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपण स्वत:ला वाचवणारे असले पाहिजे की त्या प्रसंगाला बळी पडणारे असले पाहिजे. काही लोक परिस्थितीसमोर नांगी टाकून परिस्थितीचे गुलाम बनतात व स्वत:ला दोष देत बसतात. जगातील सगळे अपयश किंवा सगळे दु:ख आपल्याच वाट्याला आलेले आहे. अशा व्यक्ती भावनिक असतात त्यामुळे अशा व्यक्ती त्या परिस्थितीला बळी पडतात. पण स्थितीस्थापकत्व उच्च असणाऱ्या व्यक्ती समस्येवर स्वार होऊन स्वक्षमतेपेक्षाही प्रचंड प्रमाणात यश संपादन करून दाखवतात कारण त्यांचा स्वत:च्या क्षमतावर विश्वास असतो. क्वचित प्रसंगी अशक्यप्राय परीस्थित नकारात्मक विचार न करता किमान सकारात्मक विचार करून त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधतात. त्यामुळेच त्या व्यक्ती परिस्थितीला बळी न पडता स्वत:ला परिस्थितीतून वाचविणाऱ्या असतात.
७. मदत मागण्याची क्षमता : 
      स्थितीस्थापकत्व कौशल्यामध्ये चातुर्य हि बाब महत्त्वाची मानली जाते. तसेच कोणत्या प्रसंगी लोकांच्याकडून मदत मागायची याची जाणीव चातुर्यामुळे येऊ शकते. कारण उठसुठ सगळयाकडून मदत मागितल्यास व्यक्तीची प्रसंगांना तोंड देण्याची  क्षमता क्षीण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक त्या कामासाठी मोजक्याच  (जी मदत करू शकतील) व्यक्तीकडून मदत घ्यावी म्हणजे काम सुरळीत पर पडू शकेल. आजच्या धकाधकीच्या व संवेदनहीन युगात अडचणीच्या प्रसंगी मानासश्स्त्रज्ञ, समुपदेशक व योग्य मार्गदर्शकांची मदत अत्यावश्यक बनलेली आहे. कारण या तज्ज्ञ व्यक्तीकडून आपणास कठीण प्रसंगाना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळते व त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यास ते आपल्याला मदत करतात या व्यतिरिक्त प्रेरणादायी पुस्तके, ऑ नलाईन सपोर्ट ग्रुप्स, स्वंयसेवी संस्था तसेच मानसशास्त्रीय उपचार पद्धतीचाही उपयोग होऊ शकतो.
स्थितिस्थापकत्वाकडे जाण्याचे मार्ग
            व्यक्ती आपल्या जीवनात अनेक तंत्रे, कौशल्ये, कार्यपध्दती औपचारिक व अनौपचारिक पध्दतीने शिकत असते. ज्यांचा वापर काही लोक स्वतःच्या व इतरांच्या अनुभवातून जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करतात. त्यासाठी काही कौशल्ये, तंत्रे, तसेच पध्दती जर आत्मसात केल्यास आपण अधिक स्थितिस्थापकत्वाकडे प्रवास करु शकतो.
1) स्वतःच्या क्षमतांवर सकारात्मकपणे विश्वास ठेवा :
            अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, ज्या व्यक्तीना स्व-आदराची जाणीव असते अशाच व्यक्ती तणावाच्या व कठीण प्रसंगातून यशस्वीरित्या उभारी घेतात. तसेच त्या व्यक्ती आणीबाणीच्या परिस्थितीशी तोंड देण्यास सक्षम असतात. लक्षात ठेवा केवेल तुम्हीच अशी व्यक्ती आहात जी स्वतःच्या समस्या व्यवस्थित जाणून तिच्यावर यशस्वीपणे स्वार होऊ शकता, म्हणून आपल्यामध्ये असणारी बलस्थाने, कमकुवतपणातून, अडचणीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा, संधीचे सोने करण्याची क्षमता व अडचणींना सामोरे जाण्याची मनोवृत्त्ती या स्वविश्लेषण (स्वट विश्लेषण) तंत्रातून विकसित होते. त्यामुळे व्यक्तीला स्वविश्लेषणाच्या माध्यतातून अधिक सक्षमतेकडे  घेऊन जाता येईल. So, be confident!
2) स्वतःच्या जीवनाचे महत्व ओळखा :
            काही लोक जगण्यासाठी खातात; तर काही लोक खाण्यासाठी जगतात. आपण  स्वतःला विचारा की, आपण यापैकी काय करतो. काही लोक भस्म्या रोग झाल्यासारखे दिसेल ते खात सुटतात. काही लोक जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक म्हणून खातात व इतरांनाही खाता यावं म्हणून जगतात. नेहमी आपला देह झिाजवत असतात. (उदा. आमटे कुटुंबींय, बंग दांपत्य आदिद) समाजहित डोळयासमोर ठेवून जीवनाचे श्रेय साध्य करणा-या व्यक्ती कणखर व आनंदी स्वभावाच्या असतात. त्यामुळे स्वतःच्या जीवनाचे महत्व वेळीच ओळखा आणि कसे जगायचे ते ठरवा. So, be Valuable!
3) भक्कम सामाजिक जाळे विकसित करा :
            आजकाल फेसबुक, व्टिटर व्हॉट्स-अप सारख्या माध्यतातून लोक आभसी सामाजिक जाळयात अडकेले आढळतात. त्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनमोकळेपणाने (अहंमपणा व पूर्वग्रहदूषितता बाजूला ठेऊन) सहजपणे आंतरक्रिया करा व इतरांशी सपर्क साधण्याचा प्रयत्न करा पाहा खूप काही गमावलेले तुम्हास परत मिळेल. जे तुम्हाला खरोखर कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासा मदत करेल. कारण मित्र, कुटुंबीय, सहाकरी व विविध संघटनेतील लोकांच्या प्रत्यक्ष सहवासातून आपले भावनिक, मानसिक व सामाजिक विश्व समृध्द होत असते. त्यामुळे आभासी जंजाळातून मुक्त होऊन वास्तव जगात जगण्याचा मनापासून प्रयत्न करा. म्हणजे भक्कम व ख-यखु-या आधाराचे सामाजिक जाळे विकसित होईल. So, be connected!
4) बदल स्वीकारा :
            या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे ती म्हणजे बदल. असा अमूल्य संदेश गौतम बुध्दाने सांगून जीवनात त्यांचा अंगीकार करुन जीवन समृध्द करण्याचा संदेश दिलेला आढळतो. यासाठीच स्थितिस्थापकत्वामध्ये लवचीकता हा महत्वाचा गुण मानलेला आहे. कठीण प्रसंगी आपणांस परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. कारण काही लोकांना लगेच राग येतो, चीड येते व ते ओरडून रिकामे होतात. त्यामुळे तो माहोल कलुषित होतोच शिवाय त्याचा वाईट परिणाम ओरडणा-यांच्या मानसिक व भावनिक आरोगयावरही होतो. त्यामुळे आपण लवचीक व्हायला शिकले पाहिजे. उच्च स्थितस्थापकत्व कौशल्य असलेल्या व्यक्ती बदल आत्मसात करुन कठीण प्रसंगही हलका-पुफलका करण्याचे मनोर्धर्य बाळगतात. त्यामुळे ज्या परिस्थितीत आपल्याला बदल करता येत नाही त्यावेळी आपण स्वतः बदलणे केंव्हाही चांगलेच. So, be Flexible!
5) आशावादी बना :
            अंधकारमय परिस्थितीत आशावादी बनून उभे राहणे अवघड असले तरी हा अंधकार कधी ना कधी नष्ट होणार ही आशा कायम असली पाहिजे. सकारात्मक विचार करणे म्हणजे समस्यांना नरअंदाज करणे नसून त्यातून चांगले काही निष्पन्न होऊ शकेल का ही सकारात्मकता असली पाहिजे. एकदा एका दुष्काळी भागात सर्व लोक ढगांच्या आगमाने घराबाहेर येतात. पण त्यातील एक मुलगा छत्री घेऊन आलेला असतो ही त्या मुलाची कृती म्हणजे आशवाद होय. आशावादी माणेसच यशस्वी झालेली पहायला मिळतात. So, be Optimistic!
6) स्वतःच व्हा स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार :
            इथे प्रत्येकजण वेगळा आहे. कारण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, अभिवृत्ती/दृष्टिकोन, आवाड-निवड आदीमुळे प्रत्येकाची काम करण्याची शिकण्याची गती वेगळी आहे. त्यामुळे स्वतःच्या क्षमतांचा दृष्टिकोनाचा व आवडी-निवडीचा शोध घेऊन त्यानुसार आपली जडण घडण करावी. नाही तर कुणीतरी सांगते आहे म्हणून काहीही करु नये जी व्यक्ती आपल्या क्षमतांना अनुसरुन आवडीच्या क्षेत्रात काम करते ती यशस्वी होते. त्यामुळे आपण स्वतःचे मूल्यांकन करायला शिकले पाहिजे. आयुष्यात आनंदी होण्यासाठी कोणीही कारणीभूत नसतो. तर स्वतःच आपण त्यास जबाबदार असतो. त्यामुळे पूर्ण करता येतील अशाच गरजांचा विचार करा. आनंदी रहाल अशा कृतीमध्ये किंबहुना लोकांमध्ये रममाण व्हा. या सर्व गोष्टींमुळे आपल्यामध्ये स्थितीस्थापकत्वाची कौशल्ये विकसित होतील व आपले भावनिक, सामाजिक, मानसिक व पर्यायाने शारीरिक आरोग्य चांगले राहील. So, Nurture Yourself!
7) समस्या परिहाराची कौशल्ये विकसीत करा :
            मुंगीचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, पावसाळा येण्याआधीच ती अन्नाचा साठा करुन ठेवते. तसे आपणही तिच्याकडून हा गुण घेतल्यास समस्या येऊन ठेपण्याअगोदरच त्यासाठी लागणा-या सामग्रीची, विचारांची, क्लुप्ती, तंत्रे व पध्दतीची जुळवाजुळव केल्यास समस्या सुटण्यास मदत होईल. कारण जीवनातील 90 टक्के समस्या या पूर्वसूतचित असतात. तर 10 टक्के समस्या सूचना न देता अचानक उदभवतात. त्यामुळे लढण्याची वृत्ती दाखविल्यास त्याही समस्या सुटण्यास मदत होते. आपले पूर्वानुभव तसेच इतरांचे अनुभव यातुन पुढील जीवनाची शिदोरी निर्माण होते. त्यातूनच स्थितिस्थापकत्वाचा विकास होतो. विवेकवाद, तार्कीकवाद व सदसदविवेक बुध्दीचा उपयोग करुन आपल्या जीवनातील समस्या सोडविण्याची कौशल्ये विकसीत करा. So, be Practical!
8) ध्येय उदिदष्टे प्रस्थापित करा :
            आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी अनेक छोटी मोठी उदिदष्टे साध्य करावी लागतात. कारण शिखरावर जाण्यासाठी अनेक पाय-या चढून जावे लागते तेंव्हा शिखर गाठता येते. त्यामुळे साध्य करण्यासारखी उदिदष्टे राखून ध्येयाप्रत पोहचायला हवे. जीवनात सगळेच प्रयत्न करतात पण यश मात्र सातत्यपूर्ण व ध्येयाधिष्ठीत प्रयत्न करणा-यांनाच प्राप्त होते. अनेकदा पडायला होते, जखमा होतात, कुणीतरी दुखावल जाते, त्यामुळे व्यक्तीने सकारात्मक राहुनच प्रसंगावर मात केल्याने जीवनात ठरवलेले साध्य आपण गाठू शकतो. So, best Wishes!
            जीवनात वादळे जेव्हा येतात तेंव्हा आपण आपल्या मातीला घटट रुजून राहावयाचे असते. ती जीतक्या वेगाने येतात; तितक्याच वेगाने निघून जातात. वादळे महत्वाचे नसतात, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो व त्यातुन कितपत ब-या अवस्थेत बाहेर येतो याचा आहे. त्यामुळे स्थितीस्थापकत्व विकसीत करा व जीवन आनंदी बनवा. व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे समाधान! त्यामुळे आपण आयुष्यात किती पैसा मिळविला यापेक्षा तो खर्च करुन किती समाधान मिळविले हे जो पहातो तो खरा आनंद.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ
Baumgardner, S. and Crothers, M. K. (2009). Positive Psychology. New Delhi: Dorling Kindersley (India) Pvt. Ltd. Pearson Education in South Asia
Grenville-Cleave, Bridget (2012).  Positive Psychology a practical guide. London: Introducing Books
Seligman, M. (2007). Authentic Happiness. London: Nicholas Brealey Publishing
Snyder, C. R. and Lopez, S. J. (2009). Positive Psychology: The Scientific and Practical Exploration of human strengths. New Delhi: Sage Publications India Pvt. Ltd.
संकपाळ, एस. पी. (2014). यशस्वी जीवनासाठी स्थितीस्थापकत्वाची कौशल्ये. भारतीय शिक्षण, पान 18-23

१६ टिप्पण्या:

  1. खुप उपयुक्त माहिती आहे व खुप सुंदरपणे मांडली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. Very nice information Suresh and in a simple language and systematic way u have put it

    उत्तर द्याहटवा
  3. सर खुप छानपणे व विस्तृत स्वरुपात माहीती दिलात त्याबद्दल आपले आभार !!!?

    उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

बार्नम प्रभाव | Barnum Effect

  बार्नम प्रभाव | Barnum Effect पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) ...