शनिवार, २९ जुलै, २०२३

बायस्टँडर / प्रेक्षक प्रभाव | Bystander Effect

 

लोक बघ्याच्या भूमिकेत का असतात?

रविवार 28 मे, 2023 रात्री नऊच्या आसपास एक मुलगा दिल्लीच्या शाहबाद डेअरीजवळ रस्त्यावर उभा होता. अनेक लोक रस्त्यावरून ये-जा करत होते. साक्षी तयार होऊन मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडते. तेव्हा रस्त्यावर उभा असलेला तो मुलगा साक्षीला थांबवतो. त्यानंतर त्याने एका हाताने साक्षीला पकडून दुसऱ्या हातात चाकूने हल्ला करतो. साक्षी भिंतीजवळ पडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा पुढील दोन मिनिटात साक्षीवर चाकूने 40 हून अधिक हल्ले करतो. साक्षी रस्त्यावर पडल्यावर तो मुलगा शेजारी पडलेल्या एका मोठ्या दगडाने तिच्यावर 6 वेळा हल्ला करतो. त्यानंतर तो साक्षीला लाथ मारून तिथून निघून जातो. या दरम्यान विविध वयोगटातील किमान 17 लोक तेथून जातात. त्यांच्यामध्ये काही महिला होत्या, परंतु त्यापैकी कोणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त सुरुवातीला एक मुलगा वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर तोही निघून जातो. सुमारे अर्धा तास साक्षीचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.

काही दिवसानंतर पुण्यातही अशीच घटना दिसून आली. वर्दळीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या सदाशिव पेठेतील एका रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार लागल्यामुळे जखमी झालेली तरुणी पळत सुटली. तरुणी धावत असल्याचे बघून तिचा पाठलाग करून तो तरुण वारंवार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. पण एका तरुणाने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला म्हणून मुलगी वाचली नाही तर भलतेच घडले असते. अशीच एक घटना पुन्हा पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क या ठिकाणी संध्याकाळी सातच्या सुमारास बर्निग घाट परिसरात घडली. तेथेही लोक केवळ बघ्याची भूमिकेत होते. लोक असे का वागतात? बहुसंख्य लोक मदत न करता घटना मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्यात का गुंतलेले होते? लोकांचे नैतिक वर्तन असे का असते? शेवटी असाही प्रश्न उपस्थित होतो की, माणुसकी संपत चालली आहे का? की यामागे मानसशास्त्रीय काही कारण असू शकते. यास बायस्टँडर प्रभाव म्हणजे प्रेक्षक प्रभाव असे म्हणतात.

बायस्टँडर / प्रेक्षक प्रभाव संशोधन

प्रेक्षक प्रभाव समजून घेण्यासाठी सहा दशके जुनी घटना जाणून घ्यावी लागेल, हि घटना 1964 ची आहे. अमेरिकेतील क्वीन्स शहरातील केव गार्डन नावाच्या ठिकाणी किट्टी जेनोवेस नावाची 28 वर्षांची तरुणी राहत होती. 13 मार्च रोजी या मुलीवर आधी बलात्कार आणि नंतर सार्वजनिकरित्या तिची हत्या करण्यात आली. हल्लेखोर जेनोवेसवर चाकूने हल्ला करतो तेव्हा तेथे 38 लोक उपस्थित होते.

हल्लेखोराने घटना घडवून आणण्यापूर्वी 35 मिनिटांहून अधिक काळ केव्ह गार्डन्सजवळ जेनोव्हेसचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने मुलीवर चाकूने तीन वेळा हल्ला केला. यादरम्यान जेनोव्हेस यांनी अनेकवेळा मदतीची याचना केली, मात्र तेथे उपस्थित असलेल्या सर्व 38 लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, जेनोव्हेसचा मृत्यू झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीने न्यूयॉर्क टाईम्सशी केलेल्या संभाषणात सांगितले की, मला या सगळ्यात सहभागी व्हायचे नव्हते. त्यांचा आपशी मामला होता. लॉस एंजेलिस टाईम्सच्या अहवालानुसार, या घटनेनंतर, मानसशास्त्रज्ञानी साक्षीदार असलेल्या प्रेक्षकांचे वर्तन स्पष्ट करण्यासाठी 'बायस्टँडर इफेक्ट' सिद्धांताचा शोध लावला.

बायस्टँडर / प्रेक्षक प्रभाव म्हणजे काय?

या प्रभावाचा अर्थ असा आहे की एखाद्या घटनेच्या वेळी जितके जास्त लोक उपस्थित असतील तितके लोक पीडित व्यक्तीला वाचवण्यासाठी कमी हस्तक्षेप करतील. ब्रिटानिका, इंग्रजी भाषेतील सर्वात जुना शब्दकोशानुसार, बायस्टँडर प्रभावावर संशोधन करणारे दोन मानसशास्त्रज्ञ होते. त्यापैकी एक सामाजिक मानसशास्त्रज्ञ बीब लताने आणि दुसरे जॉन डार्ली  होते. संशोधनानंतर त्यांनी हा प्रभाव स्पष्ट केला.

संशोधक लताने आणि डार्ली  यांनी सांगितले की, बऱ्याचदा घटना स्थळी उभे राहणाऱ्यांना अडचणीत असलेल्या लोकांची काळजी घ्यावीशी वाटते, परंतु ते गुन्हेगाराला थांबवतील की नाही हे खालील 5 गोष्टीवर अवलंबून असते…

  1. घटनेची नोंद घेणे: काहीतरी वेगळे घडत आहे हे लक्षात येणे
  2. आणीबाणीची परिस्थिती: विशिष्ट प्रसंगाचा अर्थ अचूकपणे लावणे
  3. वैयक्तिक जबाबदारी: मदत करणे स्वतःची जबाबदारी आहे हे ठरविणे
  4. मार्ग निवडणे: योग्य कृती करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये आहेत का?
  5. अंतिम निर्णय: शेवटी बचाव करण्याचा निर्णय घेणे.

यापैकी कोणतीही एक गोष्ट अनुपस्थित असेल तर घटनास्थळी उपस्थित असलेली व्यक्ती बचावासाठी हस्तक्षेप करणार नाही, असे तज्ज्ञ लताने आणि डार्ली  यांचे म्हणणे आहे.

लोक बघ्याची भूमिका का घेतात?

उपस्थित लोक हस्तक्षेप का करत नाहीत? सायकॉलॉजी टुडेच्या मते, लॅटेन आणि डार्ली हे यासाठी दोन कारणे देतात की पहिला जबाबदारीचा वाटा आणि दुसरा सामाजिक प्रभाव.

जबाबदारीचा वाटा: लताने आणि डार्ली  सांगतात की अशा घटनेच्या वेळी लोकांची संख्या जितकी जास्त असेल तितके कमी बचावकर्ते असतील. खरं तर, त्यांना असे वाटत असते की येथे आधीच पुरेसे लोक आहेत, म्हणून आम्हाला या प्रकरणात पडण्याची गरज नाही.

सामाजिक प्रभाव: या प्रकरणात घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना असे वाटते की जर कोणी या प्रकरणात हस्तक्षेप केला तर आपणही करू. सायकोलॉजी टुडे वेबसाइटनुसार, लोक हस्तक्षेप करत नाहीत याची अनेक कारणे आहेत. संशोधन असे दर्शविते की जेव्हा लैंगिक अत्याचाराचा प्रश्न येतो तेव्हा लोक हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी असते. कारण यामागे नैतिक किंवा अनैतिक गोष्टी असू शकतात. कारण वरील सर्व घटनांमध्ये हल्ला झालेले आणि केलेले एकमेकांना ओळखत होते.

      200 पेक्षा जास्त वेगवेगळ्या अभ्यासात असे आढळून आले की जर एखाद्या पीडितेने नावाने मदतीसाठी हाक मारली तर मदत एकाच व्यक्तीकडे येण्याची शक्यता असते, परंतु गर्दीची नाही. गर्दीतील बहुतेकांना वाटते की कोणीतरी मदत करेल. दुसरे कोणीतरी पहिले पाऊल पुढे टाकेल असे म्हणून जमाव जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळेच अधिक लोक असूनही ते प्रेक्षकच राहतात. त्याच वेळी, लोकांना इतरांच्या प्रकरणांमध्ये अडकणे टाळायचे असते आणि परस्पर समस्या मानून घटनेचे मूक साक्षीदार बनायचे असते. केटी गेनोव्हेस प्रकरणातही तेच घडले जे साक्षी हत्या प्रकरणात घडले. जेव्हा केटी गेनोवेसच्या शेजाऱ्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांनी सांगितले की त्यांना असे वाटते की हे दोन प्रेमींमधील प्रेमसंबंध आहे. लोकांना समजेपर्यंत किटीचा खून झाला होता. साक्षी प्रकरणात जमावाचे वर्तन असेच होते. चाकूचा मार्ग अवलंबला जात असला, तरी हल्लेखोराच्या हातात शस्त्र पाहून, पीडितेला वाचवायला गेल्यास त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. लोक अशा घटनांचे प्रत्यक्षदर्शी बनतात, हे स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचे मानसशास्त्र आहे.

बायस्टँडर / प्रेक्षक प्रभाव कमी कसा करता येईल?

बायस्टँडर प्रभवावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो? काही मानसशास्त्रज्ञ असे सुचवतात की या प्रवृत्तीची जाणीव असणे, कदाचित हे चक्र खंडित करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. कृतीची आवश्यकता असलेल्या परिस्थितीचा सामना करताना, बायस्टँडर प्रभाव आपणास कसा रोखून धरत असेल हे समजून घेणे आणि त्यावर मात करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलणे अपेक्षित आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण स्वत:ला धोक्यात आणले पाहिजे.

जर स्वतःलाच मदतीची गरज असेल तर? आपण लोकांना मदत देण्यासाठी कसे प्रेरित करू शकाल? गर्दीतून विशिष्ट व्यक्तीला मदतीस प्रेरित करणे ही अनेक तज्ञांनी सुचवलेली युक्ती आहे. त्या व्यक्तीच्या नजरेत नजर घालून विशेषतः मदतीसाठी विचारणे. तुमची विनंती वैयक्तिक करून, सामाजिक आणि नैतिक जाणीव निर्माण केल्यास त्या लोकांना नाकारणे अधिक कठीण होते. आपण एक सुजाण नागरिक म्हणून काय करू शकतो……….

  • बायस्टँडर प्रभावाची जाणीव: बायस्टँडर प्रभाव अस्तित्वात आहे हे ओळखणे आणि ते कसे कार्य करते ते समजून घेणे. ही एक सामान्य मानवी प्रवृत्ती आहे हे जाणून घेतल्याने आवश्यकतेनुसार त्याचा प्रतिकार करण्यास मदत होऊ शकते.
  • जबाबदारी घेणे: मदत किंवा हस्तक्षेप करण्याची वैयक्तिक जबाबदारी घेणे. कोणीतरी पाऊल टाकेल याची वाट न पाहता सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे हे स्वतःला स्मरण करून देणे. कारण इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्यास आवश्यक असल्यास आपणासही मदत मिळू शकेल.
  • अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवणे: जर तुम्हाला असे वाटत असेल की एखाद्याला मदतीची गरज आहे, तर तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि त्यावर कृती करा. तर्क वितर्क न करता किंवा इतरांनी पुढाकार घेण्याची प्रतीक्षा न करता त्या घटनेत योगदान देणारे घटक समजून घेऊन त्या परिस्थितीत अधिक सतर्क राहण्यास मदत होऊ शकते.
  • इतरांकडून मदत मिळविणे: आपत्कालीन परिस्थितीत इतर लोकांची मदत मिळवून परिस्थिती हाताळता येते का याचा अंदाज घेणे. त्यासाठी इतरांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेणे अन्यथा एखाद्या व्यक्तीला तात्काळ प्रथमोपचार किंवा वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास, विशिष्ट व्यक्तीकडे निर्देश करणे आणि त्यांना मदतीसाठी कॉल करणे.
  • आवाज उठविणे: मदतीची गरज असलेल्या परिस्थितीत इतर कृती करत नसल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, आपण प्रोत्साहित करणारा आवाज बना, बऱ्याच वेळेस, एक आवाज किंवा मदत पूर्ण समुदायास उत्तेजित करू शकते. आपल्या समुदायात किंवा कामाच्या ठिकाणी मदत करण्याच्या वर्तनाला प्रोत्साहन देऊन कठीण काळात एकमेकांना साथ देण्याच्या महत्त्वाबद्दल बोलले पाहिजे.

लक्षात ठेवा की बायस्टँडर प्रभवावर मात करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि जाणीव जागृती आवश्यक आहे. या घटनेची जाणीव ठेवून आणि त्याच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी सक्रिय पावले उचलून, आपण आपल्या समुदायात अधिक सक्रिय आणि दयाळू व्यक्ती बनू शकतो. शेवटी एकच प्रार्थना मानसाने मानसाशी मानसासम वागणे…………


(सर्व चित्रे आणि इमेजेस googleवरून साभार)

संदर्भ

Hudson, James M. & Bruckman, Amy S. (2004). "The Bystander Effect: A Lens for Understanding Patterns of Participation". Journal of the Learning Sciences. 13/2, 165–195.

Manning, R., Levine, M., & Collins, A. (2007). The Kitty Genovese murder and the social psychology of helping: The parable of the 38 witnesses. American Psychologist, 62/6, 555–562.

Sanderson, C. (2021). The Bystander Effect: The Psychology of Courage and How to Be Brave. HarperCollins Publishers Limited.

Understanding the Bystander Effect. (a.n.d.). Psychology Today. Retrieved July 26, 2023, from https://www.psychologytoday.com/us/basics/bystander-effect

नातू, वैद्य, आणि राजहंस (2012). सामाजिक मानसशास्त्र - बारावी आवृत्ती, दिल्ली: पिअरसन प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments

  मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments मानवी वर्तन अभ्यासत असताना अनेक प्रसिद्ध प्रयोगांनी मानसशास्त्राच्या मूलभूत समजुतीवर प...