सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

व्यक्तिमत्त्व प्रकार आणि विकास | Personality Development

 

व्यक्तिमत्त्व प्रकार आणि विकास

किशोरवयीन आकाश हा मित्र आणि नातेवाईक यांच्या कोणत्याही कार्यक्रमात नेहमी पुढे असायचा. कोणतही नियोजन असो वा कार्यक्रम असेल तर आपलं म्हणणं निर्भीडपणे मांडायचा. त्याचा स्वभाव अगदी मनमोकळा आणि लाघवी होता. आकाश बरोबर असला की, सगळे मित्र निश्चिंत असत, नातेवाईकांतही तो धीट म्हणून ओळखला जायचा. जसजसा तो मोठा होत गेला तसा तो कॉलेजमध्ये आणि नंतर नोकरीच्या ठिकाणीही विविध गोष्टींवर चर्चा करताना निर्भीडपणे बोलायचा. सगळ्यांमध्ये मिसळणं त्याला आवडायचं. आपलंही व्यक्तिमत्त्व आकाश सारखं असाव असं इतरांना वाटत असते.

नम्रता ही अतिशय गोड मुलगी, नृत्य आणि मानसशास्त्र या दोन्हींचं शिक्षण घेऊन नृत्याचे शिकवणी घेते. मात्र तिला स्वत:ला समुपदेशक म्हणून काम करता येत नाही. खूपच कमी बोलते, त्यामुळे ती बोलण्यापेक्षा लेखन करते. लोकांत फारशी मिसळत नाही, सणसमारंभात जाणे तिला संकोचित वाटते. एकटं राहायला तिला आवडतं. मनन-चिंतन करणं, नवनवीन विषयाचं वाचन करणं तिला मनापासून आवडतं. मात्र तिच्या या एकलकोंड्या स्वभावाची घरच्यांना चिंता वाटत आहे.

आकाश हा बहिर्मुख किंवा एक्स्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्व प्रकारात मोडतो तर नम्रता ही अंतर्मुख किंवा इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्वाची आहे. बहिर्मुख व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशा वाटतात तर अंतर्मुख व्यक्तींबद्दल लोक फारसे उत्सुक नसतात. अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या संज्ञा कार्ल युंग यांनी मानसशास्त्रात आणल्या. पण मुळात व्यक्तिमत्त्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्त्वासंबंधी समज-गैरसमज दूर होण्यासाठी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ या.

व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

व्यक्तिमत्त्व हा शब्द इंग्रजी भाषेतील Personality या शब्दाचा मराठी भाषेतील प्रतिशब्द आहे. Personality हा शब्द पर्सोना (Persona) या मूळ लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. पर्सोना म्हणजे मुखवटा, पूर्वीच्या काळी नाटकांमध्ये भूमिका प्रभावी करण्यासाठी मेकअपचा आधार न घेता त्या त्या पात्राचे मुखवटे परिधान केले जात असत. त्यामुळे पात्र कोणते आहे? याचा बोध सहजपणे होत असे. पर्सोना शब्दापासून Personality हा शब्द तयार झालेला असला तरी पर्सोनाप्रमाणे Personality चा अर्थ मर्यादित नाही. व्यक्तिमत्त्व म्हणजे वरवरचा मुखवटा नसून त्यासंबधी महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

व्यक्तिमत्त्वाची संकल्पना समजण्यासाठी लक्षात ठेवावयाचे मुद्देः

जीवन जगण्याची शैली म्हणजे व्यक्तिमत्त्व, याचा अर्थ व्यक्ती अद्वितीय असणे असा आहे. प्रत्येकाचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्त्व असते. व्यक्तिमत्त्व आकलनामध्ये बाह्य देखावा, रंग, गोरेपणा, उंची आणि शारीरिक वैशिष्टे ही मर्यादित ठरतात.

व्यक्तिमत्त्व हा एक व्यक्तीचा सुसंघटीत भाग आहे, जो एकसारख्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळी सातत्यपूर्ण जाणवतो. व्यक्तिमत्त्वातील शारीरिक व मानसिक गुणांचे संघटन स्थिर नसून परिवर्तनशील असते. अभिवृत्ती, श्रद्धा व घनिष्ठ सवयी हे व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग आहेत जे सातत्यपूर्ण प्रेरणा देतात. एखाद्या परिस्थितीत दिलेल्या प्रतिक्रियेवरून आपण संपूर्ण व्यक्तिमत्त्वाविषयी भाकीत करू शकत नाही. एखाद्यास व्यक्तिमत्त्वाचे लेबल लावण्यापूर्वी त्याच्या सामाजिक आणि परिस्थितीजन्य संदर्भाने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.

या जगामध्ये आदर्श व्यक्तिमत्त्वाची अशी गुणवैशिष्टे कोणतीही नाहीत. ती व्यक्तीच्या संस्कृती व परिस्थितीनुसार निर्धारित होतात. फक्त गुणच नाही तर आपण वर्तनाद्वारे कसे व्यक्त होतो; हे फार महत्वाचे आहे. व्यक्ती सामान्यत: आपल्या व्यक्तिमत्त्व गुणांचे महत्त्व विशिष्ट क्रमाने संघटन करीत असते. हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ गाॉर्डन अलपोर्ट यांनी व्यक्तिमत्व अधिश्रेणीचे वर्णन तीन पातळीवर केलेले आहे.

1. प्रधान गुणविशेष (Cardinal Traits): व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व या प्रधान गुणविशेषाने प्रभावित झालेले असते. हा गुणविशेष व्यक्तीला समाज जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन देतो. हा गुणविशेष व्यक्तीच्या वर्तनाचा प्रधान नियंत्रक म्हणून काम करतो. काही ठराविक व्यक्तीमध्ये हा गुणविशेष आढळतो. प्रधान गुणविशेष हा व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देतो व तो त्यांच्यामध्ये एखाद दुसराच असतो. त्या गुणावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण ओळख आपल्याला होते. जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्धीप्रामाण्यवाद हा प्रधान गुणविशेष आढळतो. त्यांनी आपल्या तहयात सर्वांना न्याय मिळावा यासाठी जीवन व्यतीत केले. त्यासाठी त्यांनी भारतीय समाजातील अमानवीय प्रथाविरुद्ध लढा दिला. आपण खरच खूप धन्य आहोत जे भारतीय संविधान बुद्धीप्रामाण्यवादावर आधारित आहे. तसेच या गुणविशेषाची अनेक महान व्यक्तिमत्त्वे आहेत. जसे मदर तेरेसाचा दयाळूपणा, महात्मा गांधीची अहिंसा इत्यादी.

2. केंद्रीय गुणविशेष (Central Traits):  अधिश्रेणीमधील पुढील गुणविशेष प्रधान गुणविशेषाप्रमाणे अधिक प्रभावी नसला तरीही सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा मुलभूत पाया असतो. सर्वसाधारणपणे केंद्रीय गुणाविशेषांची संख्या ६ ते १२ इतकी असते. आपण सहजपणे या सातत्यपूर्ण दृश्य गुणविशेषाच्या सहाय्याने त्यांचे वर्णन करू शकतो. उदा. प्रामाणिकपणा, समाजाभिमुखता, वक्तशीरपणा, जबाबदारपणा इत्यादी. व्यक्ती वर्तनातून हे गुणविशेष सातत्याने अभिव्यक्त होत असतात. अमीर खान यास परीपूर्णवादी, बुद्धिमान, विचारशील, रणनीतीकार, संयमी समाजसेक्क, कलाकार आणि शिस्तबद्ध म्हणून संबोधले जाते.

3. दुय्यम गुणविशेष (Secondary Traits) अलपोर्ट यांनी दुय्यम गुणविशेषांना अधिश्रेणीमध्ये सर्वात शेवटी ठेवलेले आहे. हे गुणविशेष प्रधान गुणविशेषासारखे सातत्यपूर्ण दिसून येत नाहीत व प्रत्येक व्यक्तीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. हा गुणविशेष ठराविक प्रसंगी दिसून येतो म्हणजे यांचा वर्तनावर क्वचितच परिणाम होतो; शिवाय हा प्रभाव अल्प प्रमाणात असतो. व्यक्तिमत्त्व वर्णनामध्ये इतके महत्त्वाचे नाहीत. व्यक्तीची अभिवृत्ती, प्राधान्यक्रम, आवडनिवड इत्यादी या वर्गात सामाविष्ट होऊ शकतो. कचितप्रसंगी आपण ते व्यक्त करतो, कचितप्रसंगी आपण ते अव्यक्त ठेवतो आणि कधीकधी त्याच्या विपरीतही वर्तन करतो. उदा. एखादी शात व्यक्ती अचानक एखाद्यावर भडकू शकते. एखाद्या धाडशी व्यक्तीस स्टेजरची भीती असू शकते. 

सिग्मंड फ्राईडचे व्यक्तिमत्व सिद्धांत:

सिग्मंड फ्राईड यांनी व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करण्यासाठी मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. त्यांनी मनाचे तीन स्तर असतात असे सांगितलेले आहे. बोधमन/ जाणिव (Conscious), सुप्तमन (Subconscious) आणि अबोध मन (Unconscious) असे तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण त्यांनी मांडलेले आहे. बोध स्तरावर सद्यस्थितीत व्यक्ती अनुभवत असलेले वेदन, संवेदन, विचार, भावना, जाणिवा इत्यादींचे वास्तव असते.

सुप्तमन हे सर्व प्रतिक्रिया आणि स्वयंचलित क्रिया परिभाषित करते ज्या  आपण त्यांच्याबद्दल विचार केल्यास आपणास त्या जाणवू शकतात. उदाहरणार्थकार चालविण्याची आपली क्षमता: एकदा का आपण कर चालविण्यात प्राविण्य मिळविले की कधी कोणत्या गियरचा वापर करायचाकधी कोणते पेडल्स दाबायचे किंवा कोणत्या आरश्याकडे कधी पहावेकोठे थांबावे इ. या सर्व क्रिया स्वयंचलित  होऊन जातात. हे सर्व सुप्तमनाचे कार्य सतत चालू असते. त्यास आपण जशा सूचना देऊ किंवा विचार करू त्यापद्धतीने ते कार्य करते.

सिग्मंड फ्राईडचे असे मत आहे की आपल्या मनाचा बराच भाग हा अबोध मनाने व्यापलेला असतो. अबोध स्तरावर व्यक्तीच्या सहजप्रवृत्ती. इच्छा, प्रेरणा, ऊर्मी, अनुभाविश्वातील स्मृती इ. दडलेल्या असतात. याची जाणिव व्यक्तिला स्वत:ला  नसते. कधी कधी अनवधानाने अबोध मनातील उर्मी, इच्छा या बोलण्याच्या ओघात (स्लीप ऑफ टंग), स्वप्नातून व्यक्त होतात.

सिग्मंड फ्राईड यांनी मनोविश्लेषण सिद्धांतात व्यक्तिमत्वाचे इदम (Id), अहम (Ego) व पराअहम (Super Ego) या भागाचे स्पष्टीकरण केलेले आढळलते. हे तीनही भाग परस्पर संबधित असून त्यांच्यात सतत आंतरक्रिया सुरु असतात.

इदम: व्यक्तिमत्वाचा हा भाग सुखतत्वावर काम करतो. इदम पूर्णतया अबोध पातळीवर कार्य करतो कारण सुखकारक वेदानानुभव मिळविण्याचा सतत प्रयत्न करत असतो. यामध्ये सर्व मुलभूत मानवी गरजांचा (उदा. भूक तहान इ.) समावेश होतो. एखादी गोष्ट आताच हवी अशासारखी हट्टी व स्वार्थी प्रवृत्ती इदमची असते. परिणामांचा विचार न करत केवळ सुखप्राप्तीसाठी इदम् काहीही करायला तयार असतो त्यामुळे तो अवस्तावादी ठरतो. सामाजिक बंधने, नैतिकता, मुल्ये यांची फिकीर त्यांमध्ये नसते. हा भाग लहान मुलामध्ये प्राधान्यक्रमाने अधिक असतो.

अहम: व्यक्तिमत्व रचनेतील हा भाग वास्तववादी तत्वानुसार कार्य करतो. याचे कार्य बोध पातळीवर चालते, व्यक्तिमत्वाचा सर्वाधिक बुद्धिमान, विचारशील, तर्कसंगत व संयमी भाग म्हणून अहम ओळखला जातो. वास्तवतेचे भान ठेऊन तो इदम गरजा पूर्ण करण्यास उदुक्त करतो. वेळप्रसंगी इदमवर अंकुश ठेवण्याचे कार्य करतो.

पराअहम: पराअहम हा नैतिक तत्वानुसार कार्य करतो. चांगले-वाईट, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक यातील फरक तो जाणतो. नैतिक वर्तन करण्यास प्रवृत्त करतो. पराअहममुळे इदमच्या स्वार्थी व हट्टी प्रवृत्तीला आळा बसतो व व्यक्तिच्या सद्गुणांचा विकास होतो. 

वरील तीनही व्यक्तिमत्त्व सिद्धांत आणि त्यांच्या प्रकारानुसार व्यक्तिमत्व आणि त्यासंबंधीचे वर्णन आपण पाहीलेले आहे. आपण आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी अनेक थोर व्यक्तींचे जीवन चरित्र वाचत राहिले पाहिजे. थोर व्यक्तींनी आपले जीवन कसे घडविले त्यांनी कोणकोणते कार्य केले आहे. आपले स्वतःचे जीवनमान कसे उंचावले आहे यावरून आपण आपले सुद्धा व्यक्तिमत्व सुधारू शकतो.

शिक्षकांनी वर्गात नियमित आठवड्यातून एकदा मुलांना आपल्या वर्गातील मुलांसमोर कसे बोलायचे याचा सराव दिल्यास अशी मुले मोठेपणी कोठेही कोणत्याही विषयावर दोन भरभरून बोलू शकतात व व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच निश्चितच विकास होतो. व्यक्तिने आपल्या गुणदोषांची योग्य दखल घेऊन त्यात इष्ट असे बदल करण्याचा सतत प्रयत्न केला तर व्यक्तिमत्वाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात होऊ शकते. प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सरावाने आपले व्यक्तिमत्त्व निश्चित सुधारू शकतो.


(सर्व चित्रे, इमेज google वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...