सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships

 

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships 

आज आपणास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल मग ते नोकरी असो किंवा व्यवसाय तर आपल्या अंगी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स अशी दोन अंत्यत महत्त्वाची कौशल्ये आवश्यक आहेत. हार्ड कौशल्ये ही आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या सगळ्या पदव्या किंवा गुणपत्रिका होत. हार्ड कौशल्ये, ज्यांना तांत्रिक कौशल्ये देखील म्हणतात जी नोकरीशी निगडीत असतात, जी प्रत्येक कामाच्या स्वरूपावरून आवश्यक पात्रता असते. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक कंपनीतील प्रत्येक पदासाठी एक अद्वितीय हार्ड कौशल्यांची सूची असते. उदाहरणार्थ, एका अकाउंटंटला बँक स्टेटमेंट्सची जुळवाजुळव कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे, तर ते शिक्षकास अनावश्यक आहे. त्याच वेळी, शिक्षकासाठी त्यांच्या अनुभवाची पातळी काहीही असो, शिकवित असलेल्या विषयातील आशय समृद्धी महत्त्वाची असते, परंतु इन्कम टक्स रिटर्न भरणे हे एक कौशल्य आहे जे सहसा शिक्षकासाठी आवश्यक नसते. म्हणजेच ज्या त्या कामासाठी मुलभूत ज्ञान आणि कौशल्ये अभ्यासक्रमातून आत्मसात केलेले असतात त्यास हार्ड स्किल्स किंवा तांत्रिक कौशल्ये म्हणतात. तांत्रिक कौशल्ये ही प्रशिक्षण, शिक्षण आणि सराव याद्वारे मिळवलेली आणि मापन करता येणारी कौशल्ये होत. यामध्ये आपले कार्य किती कौशल्याने केल्या जाते हे ठरविले जाते. विशिष्ट क्षेत्राशी निगडीत आवश्यक क्षमता असतात ज्यांना आपण साधारण कौशल्ये अथवा व्यवहारिक कौशल्य देखील म्हणू शकतो.

सॉफ्ट स्किल्स यास आपण नातेसंबंध हाताळण्याची किंवा अ-तांत्रिक कौशल्ये म्हणू शकतो, हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अंगभूत असलेले गुणविशेष तसेच आपल्याला दैनंदिन जीवनात इतरांशी संवाद साधताना आवश्यक असणारी गुणवैशिष्टये जी आपण निवडलेल्या क्षेत्रात तसेच नोकरी असो किंवा व्यवसायामध्ये यशस्वी  होण्यास आपणास मदत करत असतात. सॉफ्ट स्किल्स म्हणजे लोकांना हाताळण्याची कौशल्ये होत, ज्यामुळे इतर लोकांशी संवाद साधून त्यांचेकडून आपले काम करवून घेणे किंवा त्यांचेसोबत काम करणे आपल्याला सोपे होऊन जाते. यामध्ये सामाजिक कौशल्ये, संभाषण कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व गुणांचे संयोजन इत्यादी गोष्टींची कौशल्ये मोडतात.

आजकाल सॉफ्ट स्किल्स ही संकल्पना खरे तर खूपच घासून पुसून गुळगुळीत झालेली आहे; पिपल्स स्किल्स, लाइफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आदी नावांनी ओळखली जाणारी ही संकल्पना. सॉफ्ट स्किल्स समजण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे ते नेमके काय 'नाही', ते समजावून घेणे. उगाच गोड गोड बोलणे, पुढे पुढे करणे, आपलेच घोडे पुढे दामटणे, निव्वळ छान छान कपडे घालणे, एकूणच काय तर 'इम्प्रेशन मारणे' हे सॉफ्ट स्किल्स नाहीत. असेही लक्षात आले आहे, की सॉफ्ट स्किल्सचा सरसकट अर्थ 'फाडफाड इंग्लिश' बोलणे असाही घेतला जातो. इंग्रजीवर प्रभुत्व असणे ही चांगलीच गोष्ट असली, तरीही इंग्रजीच काय, कोणत्याही भाषेवरील प्रभुत्वाच्या बाबतीत लागू असणारी गोष्ट आहे, ती संवाद कौशल्य आणि ते सॉफ्ट स्किल्सचे एक महत्त्वाचे अंग आहे. आजकाल फिनिशिंग स्कूल या सदरात लाइफ स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स शिकवले जातात. काही ठिकाणी तर गटचर्चा आणि मुलाखत याची तयारी इथपर्यंतच सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण आहे. पण प्रत्यक्षात सॉफ्ट स्किल्स हे या सर्वांपलीकडचे आहे.

जीवन कौशल्ये दोन प्रकारची असतात. ज्या अंतर्गत सामान्य जीवन कौशल्ये आणि उच्चस्तरीय कौशल्ये येतात. या कौशल्यांच्या अंतर्गत अनेक प्रकारची कौशल्ये येतात. जे खालीलप्रमाणे आहेत.

सामान्य कौशल्ये -

  • आत्मविश्वास कौशल्ये.
  • निर्णय घेण्याची कौशल्ये.
  • ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्ये.
  • प्रतिकूल परिस्थितीत समायोजन कौशल्य.
  • स्व-जाणीवजागृती कौशल्ये.
  • सकारात्मक वर्तन कौशल्ये.
  • चिकित्सक विचार कौशल्ये.

उच्च स्तरीय कौशल्ये

  • उच्च मानसिक क्षमता.
  • विचार करण्याच्या पद्धती
  • मानसिक आणि शारीरिक आरोग्य.
  • ध्येय निश्चिती आणि समस्या परिहार.
  • संप्रेषण कौशल्ये.
  • निरोगी राहणीमान.

सॉफ्ट स्किल्स किंवा जीवन कौशल्याची गरज आणि महत्त्व

जीवन कौशल्याची गरज स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकसारखीच लागू होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहण्यास आवश्यक आहे. मग ते घर असो की बाहेरचं कार्यालय असो तसेच जागतिक शांतता आणि बंधुता, आरोग्य, रोजगार आणि व्यवसाय, असे कोणतेही विषय असो जीवन कौशल्ये आवश्यक आहेत. जीवन कौशल्याची गरज आणि महत्त्व खालील मुद्द्यांव्दारे वर्णन केली जाऊ शकते-

1) जीवनाच्या गुणवत्तेसाठी जीवन कौशल्ये आवश्यक आहेत.

2) जीवन कौशल्ये व्यक्तीला तिच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणण्यास मदत करतात.

3) अंगभूत शक्तींचा सर्वोत्तम विकास हा जीवन कौशल्याव्दारे होतो.

4) जीवन कौशल्ये संतुलित व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलता विकसित करतात.

5) जीवन कौशल्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्षमता विकसित करतात.

6) जीवन कौशल्ये माणसाला कर्तव्यनिष्ठ बनवतात.

7) जीवन कौशल्ये व्यक्तीला सामुदायिक जीवनासाठी तयार करतात.

8) वैज्ञानिक आणि तांत्रिक आविष्कारासाठी जीवन कौशल्ये आवश्यक आहे.

9) जीवन कौशल्ये सामाजिक सक्रियता आणि श्रम यांच्याकडे योग्य दृष्टिकोन विकसित करतात.

10) एकत्र राहण्यासाठी, एकत्र शिकण्यासाठी, कृती करण्यासाठी आणि सक्रीय राहण्यासाठी जीवन कौशल्ये आवश्यक आहेत.

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

  मानसिक आरोग्य सेवा कायदा ( MHCA, 2017) समुपदेशक (तथाकथित) : नमस्कार मला आपला फोन नंबर आपल्या मुलाच्या शाळेतून मिळाला. मी या क्षेत्रातील...