बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन (Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र

 

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन (Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे वर्तनवादी परंपरेत विकसित झालेल्या मानसोपचार पद्धतींपैकी एक अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित तंत्र आहे. व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱ्या भीती, फोबिया, तीव्र चिंता, तणाव आणि टाळाटाळ करण्याच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी हे तंत्र अत्यंत यशस्वीपणे वापरले जाते. 1950 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील मानसशास्त्रज्ञ Joseph Wolpe (1958) यांनी या तंत्राचा विकास केला. Wolpe यांचे तत्त्वज्ञान मुख्यतः अभिजात अभिसंधानाच्या (Classical Conditioning) सिद्धांतावर आधारित होते, ज्यात एखाद्या उद्दीपकासोबत (stimulus) भावनिक प्रतिक्रिया तयार होते आणि त्यात हवे तसे बदल करता येतात (Pavlov, 1927). Wolpe यांनी असे मांडले की भीती हा जन्मजात गुण नसून अनेकदा शिकलेला प्रतिसाद असतो आणि त्याला ‘अनलर्न’ करून नवीन शांत प्रतिसाद ‘लर्न’ करता येतो. हेच सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचे मुख्य तत्त्व आहे (Wolpe, 1958).

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनची संकल्पना:

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनची संकल्पना वर्तनवादातील ‘अध्ययन सिद्धांतां’ वर आधारित आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट परिस्थिती, वस्तू किंवा कल्पनेविषयी तीव्र भीतीची प्रतिक्रिया निर्माण झालेली असते. ही प्रतिक्रिया अनुभवांद्वारे शिकलेली असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला लहानपणी कुत्र्याने घाबरवले असेल, तर भविष्यात कुत्र्याशी संबंधित कुठलेही उद्दीपक तिच्या/ त्याच्या मनात भीती उत्पन्न करू शकते. Pavlov यांच्या अभिजात अभिसंधनाच्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे, एकदा भीती-विषयक उद्दीपक मेंदूत सक्रिय झाला की भीतीची प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा निर्माण होते (Pavlov, 1927).

ही प्रतिक्रिया बदलता येते, हे Wolpe यांच्या “Reciprocal Inhibition” या संकल्पनेचे मूलभूत तत्त्व आहे. Wolpe (1954) यांनी प्रतिपादन केले की भीती आणि शिथिलीकरण (relaxation) या दोन अवस्था एकाच वेळी टिकू शकत नाहीत. म्हणजेच, जर व्यक्तीला भीती वाटणाऱ्या परिस्थितीत ठेवून तिला त्याच वेळी शिथिलीकरण शिकवले गेले, तर भीती हळूहळू कमी होते आणि शांतता/ शिथिलीकरण हा नवीन प्रतिसाद त्या उद्दीपकाशी जोडला जातो. या प्रक्रियेला counterconditioning असेही म्हणतात (Wolpe, 1958).

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला उंचीची भीती (Acrophobia) असल्यास, थेरपिस्ट तिच्यासाठी उंचीशी संबंधित परिस्थितींची यादी तयार करतात आणि सर्वात कमी भयकारक टप्प्यापासून सुरुवात करून ती व्यक्ती शिथिलीकरणाचा उपयोग करीत त्या परिस्थितीला सामोरी जाते. या प्रक्रियेत हळूहळू उंचीची भीती कमी होऊ लागते आणि मेंदू त्या परिस्थितीशी सकारात्मक शांत प्रतिक्रिया जोडू लागतो.

या तंत्राचा उद्देश:

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचा प्राथमिक उद्देश म्हणजे विशिष्ट भीती, अवास्तव भीती (irrational fear) आणि फोबिया यांचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होणारा दुष्परिणाम कमी करणे. या तंत्राद्वारे व्यक्ती भीतीपायी जे टाळाटाळ (avoidance) वर्तन विकसित करते, ते कमी केले जाते. याचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत:

  • प्रखर किंवा अवास्तव भीती कमी करणे: फोबियांचे बहुतांश प्रकार हे अवास्तव किंवा शिकलेल्या भीतीवर आधारित असतात. उदाहरणार्थ, पाण्याची भीती (Aquaphobia), उंचीची भीती (Acrophobia), परीक्षेची भीती (Test Anxiety). संशोधनानुसार सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन या भीतींवर सर्वाधिक परिणामकारक तंत्रांपैकी एक आहे (Öst, 1987).
  • फोबियाचे तीव्रतेने व्यवस्थापन: सामाजिक फोबिया (Social Anxiety Disorder), जनावरांची भीती, बंद जागेमध्ये भीती (Claustrophobia) अशा भीतींचे व्यवस्थापन या तंत्राद्वारे संरचित आणि टप्प्याटप्प्याने केले जाते. Paul (1966) यांच्या अध्ययनात हे सिद्ध झाले की व्यक्तीची फोबिक प्रतिक्रिया दीर्घकालीन पातळीवर कमी करता येते.
  • शारीरिक प्रतिक्रिया नियंत्रित करणे: भीतीची प्रतिक्रिया केवळ मनात नसते; ती शरीरातही दिसते, हृदयाचे ठोके वाढणे, तणाव, घाम येणे, स्नायू ताण, गोंधळ, श्वासोच्छवासात बदल. शिथिलीकरण तंत्रांमुळे या शारीरिक प्रतिक्रिया कमी होतात (Bernstein & Borkovec, 1973).
  • टाळाटाळ करण्याच्या वर्तनात घट: फोबिया असलेल्या व्यक्ती बहुधा भीतीच्या परिस्थितीपासून दूर राहतात. हे avoidance behavior भीती अधिक वाढवते. सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे टाळाटाळ कमी करून व्यक्तीला प्रत्यक्ष समस्येला सामोरे जाऊ शकण्याची क्षमता वाढवते.
  • व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवणे: जुनाट किंवा दीर्घकालीन भीतीवर नियंत्रण मिळाल्यावर व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, स्व-नियमन आणि भावनिक परिपक्वता वाढते. विविध संशोधनांनी दर्शवले आहे की एक्स्पोजर-बेस्ड तंत्रामुळे व्यक्तीचे coping skills सुधारतात आणि मानसिक आरोग्य दृढ होते (Barlow, 2002).

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचे तीन मुख्य टप्पे

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन ही Joseph Wolpe (1958) यांनी विकसित केलेली थेरपी आहे, ज्यामध्ये भीती, फोबिया, चिंता आणि अवांछित तणावाशी संबंधित प्रतिक्रिया कमी करण्यासाठी तीन टप्प्यांची वैज्ञानिक प्रक्रिया वापरली जाते. हे तीन टप्पे एकमेकांशी परस्पर-संबंधित असून, वर्तनवादातील reciprocal inhibition या मूलभूत तत्त्वावर आधारलेले आहेत, म्हणजेच भीती आणि शिथिलीकरण या दोन्ही प्रतिक्रिया शरीरात एकाच वेळी पूर्णतः सक्रिय राहू शकत नाहीत (Wolpe, 1958).

1. शिथिलीकरण प्रशिक्षण

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचा पहिला टप्पा म्हणजे शिथिलीकरण प्रशिक्षण, ज्यामध्ये क्लायंटला भीती उत्पन्न करणाऱ्या परिस्थितींचा सामना करण्यापूर्वी शांत, नियंत्रित आणि तणावमुक्त प्रतिक्रिया कशी निर्माण करायची हे शिकवले जाते. Wolpe (1958) यांनी यावर स्पष्ट केले आहे की, भीती कमी करण्यासाठी सर्वप्रथम व्यक्तीमध्ये “incompatible response” म्हणजेच भीतीशी विसंगत अशी शारीरिक-मानसिक शांतता निर्माण करणे आवश्यक असते. यासाठी विविध शिथिलीकरण तंत्रांचा वापर केला जातो.

  • दीर्घ श्वसन तंत्र (Deep Breathing): दीर्घ श्वसनाच्या तंत्रामध्ये व्यक्तीला हळूहळू, खोलवर श्वास घेणे आणि सोडणे शिकवले जाते. या प्रक्रियेमुळे पॅरसिंपथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते, हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि शरीरातील ताण हळूहळू कमी होतो (Barlow, 2002). संशोधनानुसार, दीर्घ श्वसनामुळे amygdala जो भीतीवर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा भाग शांत होतो आणि व्यक्तीला भीती निर्माण करणाऱ्या उद्दीपकाचा सामना करणे सुलभ होते.
  • स्नायू शिथिलीकरण (Progressive Muscle Relaxation – PMR): Jacobson (1938) यांनी विकसित केलेले PMR हे शिथिलीकरण तंत्र सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या तंत्रात व्यक्ती विविध स्नायुगटांना प्रथम ताण देऊन नंतर सैल सोडते. शरीरातील ताण लक्षात येऊन तो जाणूनबुजून कमी करण्याची क्षमता वाढल्याने चिंता, अस्वस्थता आणि भीती नियंत्रित ठेवणे सहज होते. संशोधन दर्शवते की PMR चा वापर केल्यास शारीरिक ताणाच्या पातळीमध्ये लक्षणीय घट दिसून येते (Bernstein & Borkovec, 1973). 
  • ध्यान व माइंडफुलनेस (Meditation & Mindfulness): ध्यान तंत्र एकाग्रता वाढवते, मन भटकण्याची प्रवृत्ती कमी करते आणि तणावावरील शारीरिक-मानसिक प्रतिक्रिया नियंत्रित करते (Kabat-Zinn, 1994). माइंडफुलनेस व्यक्तीला वर्तमान क्षणात राहायला शिकवते, ज्यामुळे भीतीविषयीचे अवास्तव विचार कमी होतात. हे तंत्र सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवते, कारण शांत मन भीतीच्या उद्दीपकाचा सामना अधिक नियंत्रित पद्धतीने करू शकते.
  • गायडेड इमॅजरी (Guided Imagery): या पद्धतीत क्लायंटला थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित, शांत आणि सुखद परिस्थितीची कल्पना करायला लावले जाते. मेंदू प्रतिमा आणि वास्तविक अनुभवांना मोठ्या प्रमाणात साम्याने प्रक्रिया करतो, म्हणून शांत प्रतिमांची कल्पना केल्याने भीतीचे उद्दीपक कमी भयावह वाटू लागतात (Singer, 1974).

या सर्व तंत्रांचा एकत्रित परिणाम असा होतो की व्यक्तीमध्ये शांततेची प्रतिक्रिया (relaxation response) अधिक मजबूत होते. एकदा ही प्रतिक्रिया शिकवली गेली की नंतर भीतीचा सामना करणे अधिक पद्धतशीर आणि सुरक्षित बनते.

2. भीतीची श्रेणी तयार करणे

दुसरा टप्पा म्हणजे भीतीची श्रेणी तयार करणे, जो सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचा अत्यंत महत्त्वाचा संरचनात्मक भाग आहे. Wolpe (1958) यांच्या मते, व्यक्तीला थेट तीव्र भीतीचा सामना करण्यास भाग पाडणे हे उपचारास प्रतिकूल ठरते; म्हणून भीतीचे उद्दीपक कमी ते जास्त तीव्रतेच्या क्रमाने मांडणे आवश्यक असते. ही यादी थेरपिस्ट आणि क्लायंट एकत्र बसून तयार करतात आणि ती क्लायंटच्या अनुभवांनुसार वैयक्तिकरित्या संरचित असते.

उदाहरणार्थ, कुत्र्याची भीती असलेल्या क्लायंटसाठी श्रेणी पुढीलप्रमाणे असू शकते:

  • कुत्र्याचा फोटो पाहणे
  • दूरवरून कुत्रा पाहणे
  • कुत्र्याजवळ उभे राहणे
  • कुत्र्याला स्पर्श करणे

ही यादी तयार करताना SUDS (Subjective Units of Distress Scale) 0 ते 100 च्या स्केलचा वापर केला जातो (Wolpe & Lazarus, 1966). या स्केलवर क्लायंट प्रत्येक परिस्थितीला भीतीचे अंक देतो. यामुळे थेरपिस्टला पुढील काही गोष्टी स्पष्टपणे कळतात:

  • कोणत्या परिस्थितीत सर्वाधिक भीती निर्माण होते
  • कोणत्या पातळीवर एक्स्पोजर सुरू करावे
  • उपचाराची दिशा आणि गती कशी ठेवावी

भीतीची श्रेणी ही संरचना क्लायंटसाठी एक प्रकारचा आराखडा (blueprint) असते, ज्यामुळे प्रत्येक टप्पा नियोजित, सुरक्षित आणि हळूहळू हाताळण्यास मदत होते.

3. हळूहळू सामोरे जाणे आणि शिथिलीकरण (Gradual Exposure + Relaxation)

तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे Gradual Exposure, ज्याला Wolpe यांनी “systematic exposure” असेही संबोधले आहे. या टप्प्यात क्लायंटला भीतीची श्रेणी यामध्ये नमूद केलेल्या परिस्थितींना एकेक पातळीवर, सर्वात कमी भीतीच्या स्तरापासून सुरुवात करून सामोरे जायला लावले जाते.

Exposure दरम्यान शिथिलीकरणचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा क्लायंट एखाद्या भीतीदायक परिस्थितीची कल्पना करतो किंवा वास्तविक परिस्थितीचा सामना करतो तेव्हा तो लगेचच शिथिलीकरण तंत्र (उदा., डीप ब्रीदिंग किंवा PMR) वापरतो. यामुळे भीतीच्या उद्दीपकाबद्दल शांत प्रतिक्रिया निर्माण होऊ लागते. Wolpe (1958) यांच्या प्रयोगांमध्ये याला counterconditioning असे म्हटले आहे, म्हणजे जुनी शिकलेली भीती नवीन शांततेच्या प्रतिक्रियेद्वारे बदलणे.

उदाहरणार्थ, क्लायंटला कुत्र्याचा फोटो पाहताना थोडी भीती वाटली तर तो शिथिलीकरण करत राहतो. काही वेळानंतर त्याची भीती 20–30 SUDS वरून 5–10 वर येते. एकदा ही तीव्रता लक्षणीय कमी झाली कि पुढील टप्प्यावर (उदा., दूरून कुत्रा पाहणे) जाता येते.

Gradual exposure चे वैज्ञानिक तत्त्व हे आहे की repeated, controlled, and safe exposure मुळे मेंदूचा amygdala नवीन शिकलेली शांत प्रतिक्रिया स्वीकारतो, आणि भीतीशी संबंधित neural pathways कमजोर होऊ लागतात (Foa & Kozak, 1986). यामुळे भीती संपुष्टात येते किंवा अत्यंत कमी होते.

ही प्रक्रिया वारंवार केली गेली की भीतीशी संबंधित “conditioned response” हळूहळू नष्ट होते, आणि त्याऐवजी शांततेची नवीन प्रतिक्रिया स्थिर होते. या neural reconditioning मुळेच सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन दीर्घकालीन परिणामकारक ठरते.

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचे फायदे

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे वर्तनवादावर आधारित अत्यंत प्रभावी आणि विश्वसनीय मानसोपचारतंत्र आहे. विशेषतः फोबिया कमी करण्यासाठी हे तंत्र सर्वाधिक व्यापकपणे अभ्यासले गेले आहे. उंचीची भीती, पाण्याची भीती, प्राणी किंवा कीटकांबद्दलची भीती अशा विशिष्ट फोबियांवर Wolpe (1958) यांनी केलेल्या संशोधनात या पद्धतीचे यश सर्वात आधी प्रदर्शित झाले. पुढील दशकामध्ये Marks (1975), Barlow (2002) आणि Rachman (1997) यांसारख्या संशोधकांनीही फोबियाच्या व्यवस्थापनात या तंत्राची प्रभावीता सिद्ध केली आहे, ज्यामुळे हे तंत्र व्यवहारोपचारातील मूलभूत तंत्रांपैकी एक बनले. संशोधनात असेही आढळले आहे की परीक्षा भीती, सामाजिक भीती आणि विविध प्रकारच्या चिंता समस्या या तंत्राच्या सहाय्याने कमी होतात (Paul, 1966). शिथिलीकरण प्रशिक्षणामुळे चिंता नियंत्रणात येते आणि एक्स्पोजरमुळे भीतीशी संबंधित चुकीच्या शिकलेल्या प्रतिक्रिया हळूहळू कमी होतात. त्यामुळे सामाजिक परिस्थितींमध्ये होणारा तणाव, सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती किंवा कामगिरीविषयक चिंता यावर हे तंत्र उपयुक्त सिद्ध झाले आहे.

या तंत्राचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचे दीर्घकालीन आणि स्थायी परिणाम. Wolpe (1958) यांच्या दीर्घकालीन फॉलो-अप अभ्यासात उपचारानंतर अनेक वर्षांनीही फोबिया परत येण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. एक्स्पोजर आणि शिथिलीकरण यांच्या मिश्रणामुळे व्यक्तीला नवीन शिकलेले प्रतिसाद स्थिरपणे टिकून राहतात; त्यामुळे पुनरावृत्तीचा दर कमी होतो (Barlow, 2002). याशिवाय, सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे औषधोपचाराशिवाय सुरक्षित पद्धत म्हणून त्याचा वापर. ज्या व्यक्तींना औषधे घ्यायची नसतात किंवा औषधोपचारांची साइड-इफेक्ट्सची भीती असते, अशांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. औषधाशिवाय असलेली उपचारपद्धती (non-pharmacological intervention) म्हणून तिची सुरक्षितता अनेक अभ्यासांनी दर्शविली आहे.

तसेच, हे तंत्र क्लायंट-केंद्रित आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करणारे असल्याने रुग्णाचा सहभाग वाढतो आणि उपचार प्रक्रियेत त्याची सक्रिय भूमिका राहते. चिंता-कमानुसार तयार केलेली hierarchy व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असल्याने उपचार व्यक्ती-विशिष्ट (individualized) होतो. ही प्रक्रिया भीतीच्या सर्वाधिक सौम्य स्तरापासून सुरुवात करते आणि हळूहळू तीव्र परिस्थितीकडे जाते, ज्यामुळे रुग्णाला भीतीचा सामना करताना सुरक्षित आणि नियंत्रित अनुभव मिळतो. संशोधनात असेही दिसते की या प्रक्रियेमुळे रुग्णाचा आत्मविश्वास आणि नियंत्रणाची भावना वाढते, कारण तो स्वतः आपल्या प्रगतीचा अनुभव घेतो (Öst, 1987). परिणामी, व्यक्ती भीतीच्या परिस्थितींना टाळण्याऐवजी त्या परिस्थितींना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करते.

कोणासाठी उपयुक्त?

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे विशेषतः फोबियांनी ग्रस्त व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी उपचारतंत्र मानले जाते. विशिष्ट फोबिया जसे की उंचीची भीती, पाण्याची भीती, प्राण्यांची भीती, विमानप्रवासाची भीती इत्यादींच्या उपचारासाठी हे तंत्र decades पासून वापरले जात आहे (APA, 2013). कारण या तंत्रात भीतीशी संबंधित शिकलेल्या प्रतिक्रियेचे पुनरशिक्षण (reconditioning) केले जाते, ज्यामुळे टाळाटाळ करणारे वर्तन कमी होते आणि anxiety-provoking परिस्थितीशी हळूहळू संपर्क वाढतो.

हे तंत्र चिंता विकारांमध्ये, विशेषतः mild ते moderate प्रकारात, प्रभावी असल्याचे अनेक संशोधनांनी सिद्ध केले आहे. सामाजिक चिंता, परीक्षा फोबिया, स्टेज फियर, कामगिरीविषयक चिंता  अशा परिस्थितींमध्ये व्यक्तीला शिथिलीकरण आणि exposure यांचे संयोजन अत्यंत उपयुक्त ठरते (Paul, 1966; Heimberg, 2001). ज्या व्यक्तींमध्ये टाळाटाळ करण्याचे प्रमाण जास्त असते—उदा., भीती निर्माण करणाऱ्या परिस्थितीत न जाणे, सामाजिक कार्यक्रम टाळणे, परीक्षा पुढे ढकलणे—त्यांच्यासाठी या तंत्राचा वापर फार फायदेशीर ठरतो. कारण exposure-based learning टाळाटाळीला कमी करते आणि behavioural engagement वाढवते.

तथापि, सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन सर्वांसाठी योग्य नसते. तीव्र मानसिक विकार (psychosis) असलेल्या रुग्णांमध्ये वास्तव-परीक्षण क्षमतेत बिघाड झाल्यामुळे हे तंत्र प्रभावी किंवा सुरक्षित ठरण्याची शक्यता कमी असते (Beck et al., 2009). याशिवाय, गंभीर नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये प्रेरणा कमी असते, ज्यामुळे exposure hierarchy पाळण्यात अडचण येते. तसेच तात्काळ धोकादायक परिस्थितींमध्ये—उदा., आत्यंतिक पॅनिक, सक्रिय आत्महानीची प्रवृत्ती, तत्काळ संकट—हे तंत्र प्राथमिक उपचार म्हणून उपयुक्त ठरत नाही. अशा स्थितींमध्ये प्रथम crisis stabilization आवश्यक असते.

सिद्धांताधारित पायाभूत आधार

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनचे पायाभूत सिद्धांत मुख्यतः वर्तनवादाच्या तत्त्वांवर आधारित आहेत. सर्वात प्रथम, अभिजात अभिसंधान हा Pavlov (1927) यांनी विकसित केलेला सिद्धांत या तंत्राचा आधारस्तंभ आहे. भीती ही अनेकदा शिकलेली प्रतिक्रिया असते—उदा., एखाद्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पुढे सर्व कुत्र्यांबद्दल भीती वाटणे. Pavlov यांनी दाखविल्याप्रमाणे शिकलेली प्रतिक्रिया extinction प्रक्रियेद्वारे नष्ट किंवा कमी करता येते, आणि तीच प्रक्रिया सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनमध्ये नियंत्रित exposure च्या माध्यमातून साध्य होते.

Joseph Wolpe यांनी प्रस्तावित केलेले Reciprocal Inhibition हे तत्त्व या तंत्राचे दुसरे महत्त्वाचे आधार आहे. Wolpe (1958) यांनी म्हटल्याप्रमाणे, “anxiety and relaxation cannot occur simultaneously.” म्हणजेच शिथिलीकरणची शारीरिक अवस्था anxiety ची physiological प्रतिक्रिया inhibit करते. त्यामुळे शिथिलीकरण कौशल्य शिकवून त्याच वेळी भीती निर्माण करणाऱ्या उद्दीपनाचा सामना करून anxiety responses कमी होतात. ही संकल्पना सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनची मुख्य क्रिया-प्रक्रिया मानली जाते.

तिसऱ्या स्तरावर, हे तंत्र Exposure Therapy च्या आधुनिक पद्धतींचे मूलभूत तत्त्व म्हणून ओळखले जाते. आज वापरण्यात येणारी graded exposure therapy, in vivo exposure, imaginal exposure इत्यादी तंत्रांची रचना Wolpe च्या सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन वर आधारित आहे. Foa आणि Kozak (1986) यांनी दिलेले Emotional Processing Theory हेही सांगते की भीतीचा सामना केल्याने तिच्याशी संबंधित चुकीच्या cognitive-physiological प्रतिक्रिया बदलतात, ही प्रक्रिया सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशनमध्ये systematic exposure द्वारे घडते.

समारोप:

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे मानसोपचारातील एक महत्त्वाचे, वैज्ञानिक आणि प्रभावी तंत्र आहे. भीती आणि चिंता यांवर हळूहळू, नियंत्रित आणि रचना असलेली पद्धत अवलंबून व्यक्तीला सुरक्षित पद्धतीने बदल घडवून आणण्याची संधी देते. वर्तनवादाच्या सिद्धांतावर आधारित या प्रक्रियेमुळे क्लायंटला भीतीची पुनर्रचना अनुभवायला मिळते. त्यामुळे फोबियासह इतर अनेक भीतींवर हे तंत्र आजही अत्यंत उपयुक्त व प्रभावी मानले जाते.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

American Psychiatric Association. (2013). Diagnostic and statistical manual of mental disorders (5th ed.). APA Publishing.

Barlow, D. H. (2002). Anxiety and its disorders: The nature and treatment of anxiety and panic (2nd ed.). Guilford Press.

Beck, A. T., Wright, F. D., Newman, C. F., & Liese, B. S. (2009). Cognitive therapy of substance abuse. Guilford Press.

Bernstein, D. A., & Borkovec, T. D. (1973). Progressive Relaxation Training. Research Press.

Foa, E. B., & Kozak, M. J. (1986). Emotional processing of fear: Exposure to corrective information. Psychological Bulletin, 99(1), 20–35.

Heimberg, R. G. (2001). Current status of psychotherapeutic interventions for social phobia. Journal of Clinical Psychiatry, 62(1), 36–41.

Jacobson, E. (1938). Progressive Relaxation. University of Chicago Press.

Kabat-Zinn, J. (1994). Wherever You Go, There You Are: Mindfulness Meditation in Everyday Life. Hyperion.

Marks, I. (1975). Behavioral treatment of phobias. International Universities Press.

Öst, L. G. (1987). Applied relaxation: Description of a coping technique and review of controlled studies. Behaviour Research and Therapy, 25(5), 397–409.

Paul, G. L. (1966). Insight vs. desensitization in psychotherapy: An experiment in anxiety reduction. Stanford University Press.

Paul, G. L. (1969). Behavior modification research: Design and tactics. In C. M. Franks (Ed.), Behavior therapy: Appraisal and status (pp. 29–62). McGraw-Hill.

Pavlov, I. P. (1927). Conditioned reflexes. Oxford University Press.

Rachman, S. (1997). Anxiety and behavior. Journal of Behavior Therapy and Experimental Psychiatry, 28(2), 79–93.

Singer, J. L. (1974). Daydreaming and Fantasy. Harvard University Press.

Wolpe, J. (1954). Reciprocal inhibition as the main basis of psychotherapeutic effects. Archives of Neurology and Psychiatry.

Wolpe, J. (1958). Psychotherapy by reciprocal inhibition. Stanford University Press.

Wolpe, J., & Lazarus, A. A. (1966). Behavior Therapy Techniques. Pergamon Press.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन (Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र

  सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन ( Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे वर्तनवादी परंपरेत वि...