सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मनोवेध | Mindsight | Mindsight: The New Science of Personal Transformation

मनोवेध : वैयक्तिक कायापालट करण्याचे शास्त्र                    

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा, जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन?  उंडारल उंडारलं जसं वारा वाहादन..................

महान कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या या कवितेतून मनाचे गुपित मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. जगात कितीही अत्याधुनिक औषधांचा शोध लागला तरी माणूस हा एक भावनाशील प्राणी आहे हे विसरून चालणार नाही ! माणसाचं मन म्हणजे फक्त मेंदूरसायनांची पेशीत चाललेली झटापट नव्हे, तर त्यापलीकडेही त्याला काहीतरी अचूक अर्थ आहे. मेंदूरसायनांनी विचारांचे आवर्तने निर्माण होत असतील, पण या आवर्तनातून एकदा मनाची निर्मिती झाली की तेथे एक नवं विश्व उभं रहातं. हसणारं, रडणारं, हळवं होणारं, संतापणारं, विचार करणारं, जीवनाचा गहन अर्थ शोधणारं. मनाचं हे अद्भूत रूप मानसोपचाराला एक आव्हान आहे. शिवाय मानवी मनाजवळ जसा आजारी पडण्याचा कमकुवतपणा आहे तशी स्वत:लाच समजावण्याची, समजावून घेण्याची एक शक्ती आहे हे खालील चरोळीतून समजण्यास मदत होते. 

मन विकार मन विचार

मन व्याधी मन उपचार

मन बीज मन अंकूर

मन जखम मन फुंकर

मनाचा पद्धतशीर विकास कसा करावा. विवेकानंदांच्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे, केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणे म्हणजे शिक्षण नव्हे. जर विवेकानंदांना त्यांचे शिक्षण पुन्हा घ्यायचे झाले व त्याना जर काही अधिकार दिला तर घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच न लागता मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करणे आणि अशा निर्दोष साधनाने (मनाने) इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करणे असे शिक्षणविषय आपले मत मांडलेले आहे.

मुलामधे मन एकाग्र करण्याची शक्ती व ते वेगळे करण्याची शक्ती ह्या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजेत. मनाला इच्छेनुसार अलग करण्याची शक्ती न वाढविता एकाग्रतेची शक्ती वाढविली पाहिजे. आपण आपल्या इच्छेनुसार आपली मने वस्तूंवर केंद्रित केली पाहिजेत; वस्तूंनी आपली मने त्यांच्याकडे ओढू नयेत. सामान्यतः आपल्याला मन केंद्रित करणे भाग पडते. वस्तूंतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्या आकर्षणामुळे आपली मने त्या वस्तूंवर केंद्रित करणे आपल्याला भाग पडते. मनाच्या निरोधनासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कोठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते. त्यावाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. 

अलीकडेच डॅनियल सिगेल यांचे 'माइंडसाइट द न्यू सायन्स ऑफ पर्सनल ट्रान्सफॉरमेशन' हे पुस्तक वाचून झाले. पुस्तक वाचत असताना काही मुख्य संकल्पना मला भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि दर्शन शास्त्राशी निगडीत आढळल्या. सर्व प्रथम, मनोवेध म्हणजे काय? तर “मनोवेध ही एक प्रकारची लक्ष केंद्रित करण्याची आंतरिक प्रक्रिया आहे जी आपणास आपल्या स्वतःच्या मनाची अंतर्गत कार्ये अनुभवण्याची परवानगी देते. हे आपणास त्याच्या प्रवाहाबरोबर वाहून न जाता आपल्या मानसिक प्रक्रियांची जाणीव ठेवण्यास मदत करते. तसेच आपल्या नेहमीच्या सवयी आणि ऑटोपायलट प्रतिक्रियांपासून दूर नेण्यास सक्षम बनवते आणि या सर्वांमध्ये अडकण्याची प्रवृत्ती असणारी प्रतिक्रियाशील भावनिक पळवाटा पलीकडे घेऊन जाते. लक्ष केंद्रित करणारी कौशल्ये जे मनाचे भाग आहेत त्यांचे आंतरिक दर्शन, ते स्वीकारणे आणि त्या सोडण्याची वृत्ती आणि शेवटी त्याचे रूपांतरण करणे शक्य बनते.” असे डॅनियल सिगेल यांनी  'माइंडसाइट द न्यू सायन्स ऑफ पर्सनल ट्रान्सफॉरमेशन' या पुस्तकात मनोवेध संबंधी विवेचन केलेले आढळते.

सरळ शब्दांत मनोवेध म्हणजे, आपल्या आंतरिक भावनिक जगाविषयीच्या विशेष जागा, विश्लेषण आणि स्पष्टीकरण करण्याची क्षमता व आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल कसा प्रतिसाद दिला जातो याबद्दलची क्षमता होय. आपण विचारात पडला असाल, की ‘ही एक उत्तम संकल्पना आहे, परंतु यात विज्ञान कोठे आहे?’ तर यावर सिगेल असा युक्तिवाद करतो की जेव्हा आपण लक्ष देतो तर आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स एकत्रितपणे क्रियाशील होतात आणि आपल्या मेंदूचा तो भाग सक्रिय होतो. या प्रक्रियेत मेंदूत न्यूरोप्लास्टिसिटी (ही मेंदूमधील मज्जातंतूंच्या नेटवर्कमध्ये वाढ आणि पुनर्रचनाद्वारे बदल करण्याची क्षमता आहे) वाढते, जी आपणास आपल्या भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत करते. विविध भावनांवर प्रक्रिया करण्याची गरज असलेल्या मेंदूमधील तो भाग आपण अक्षरशः ‘जागा’ करतो आणि तो अनुभव घेत असतो.

मेंदूतील सक्रियता ही संकल्पना मानसिकदृष्ट्या दर्शविण्यास मदत करण्यासाठी सीगल यांनी लंडनमधील टॅक्सी चालकांवर केलेल्या प्रयोगाचे एक उदाहरण दिलेले आहे. टॅक्सी ड्राइव्हर्समध्ये हिप्पोकॅम्पस प्रत्यक्षात वाढलेला होता. आपण अवकशीय स्मृतीसाठी वापरत असलेल्या मेंदूचा हा भाग आहे. याव्यतिरिक्त, सिगेल स्पष्ट करतो, मेंदूत न्युरल रचनांची काटछाट चालू असते आणि न वापरल्या गेलेल्या विविध सर्किटमध्ये जाण्यासाठी तंत्रिका जोडणी काढून टाकते ज्यायोगे मेंदू अधिक विशेष आणि कार्यक्षम बनतो.

आपण आपल्या मेंदूची रचना करू शकतो.

सिगेल सुचवितो की जागरूकतेचे प्रशिक्षण घेतलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये ‘अ‍ॅप्रोच स्टेट’ च्या दिशेने बदल झाला होता ज्यामुळे त्यांना आव्हानात्मक परिस्थितींपासून दूर जाण्याऐवजी आव्हानाच्या दिशेने जाता आले - हे मेंदूचे स्थितिस्थापकत्वाचे लक्षण आहे.

मनोवेधसंबंधी प्रमुख उपयुक्त संकल्पनाः

भावनांची सुस्पष्ट जाणीव: हे मनोवेधसंबंधीचे प्रमुख तत्त्व म्हणजे आपण अनुभवत असलेल्या भावनांना अचूक ओळखणे होय. हे आपल्या स्वत:च्या जीवनात अनुकूल बनविल्यास खूप उपयुक्त आणि सोपे वाटते. आपण ज्या भावनांचा अनुभव घेत आहोत त्यास जर आपण योग्य  नाव दिले, तर त्यांच्यावर विरक्त होण्याऐवजी आपण त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी अधिक सक्षम बनतो. उदाहरणार्थ, “मी रागावतो आहे” आणि “मी राग अनुभवत आहे” यामधील फरकाचा विचार करा. त्यांच्यात एक अतिशय भिन्न फरक आहे. “मी रागावतो आहे” ही एक प्रकारची स्व-परिभाषा असून स्वत:पुरती मर्यादित स्थिती आहे. “मी राग अनुभवत आहे” हे एखाद्या भावनेच्या आहारी न  जाता भावना ओळखण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता सूचित करते.

ऑटोपायलट मोड सोडणे: सिगेलने सांगितलेली ही एक महत्त्वाची संकल्पना, मला असे वाटते की आजच्या धक्काधकीच्या आयुष्यात मला सर्वात जवळची वाटते, ती त्यांच्याबरोबर वाहून न जाता आपल्या स्वतःच्या मानसिक प्रक्रियेबद्दल जागरूक बनवते. आपल्या नेहमीच्या सवयी आणि ऑटोपायलट प्रतिक्रियांपासून दूर नेण्यास सक्षम बनवते आणि या सर्वांमध्ये अडकण्याची प्रवृत्ती असणारी प्रतिक्रियाशील भावनिक पळवाटा पलीकडे घेऊन जाते. आपल्यासाठी काय महत्वाचे आहे ते ओळखा, आपण आपला वेळ कसा घालवाल याचा मागोवा घ्या, आपल्या प्राधान्यक्रम याद्यांची तुलना करा, छोट्या बदलांबरोबर कधीही प्रारंभ करा, आपला फोन निश्चित काळासाठी खाली ठेवा आणि कधीही खेळायचे थांबवू नका ऑटोपायलट मोडमधून बाहेर पाडण्यासाठी हे काही ट्रिकस् आहेत.   

अग्र खंडातील क्रियाशीलतेचा सन्मान करणे: शारीरिक नियमन, सुयोग्य संप्रेषण, भावनिक संतुलन, प्रतिसाद लवचिकता, भीतीचे मोड्यूलेशन, सहानुभूती, अंतर्ज्ञान, नैतिक जागरूकता आणि अंतस्फूर्ति हे मनोवेध विकासाची प्रमुख भूमिका असलेल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या नऊ प्रमुख कार्यांचे विवेचन सिगेल करतो.  हे नऊ पैलू भावनिक कल्याणासाठी आवश्यक आहेत.  मनोवेध आपणास नऊ क्षेत्रांपैकी प्रत्येकातील कमतरता शोधण्यास मदत करते जेणेकरून आपण सक्षम आणि प्रतिबिंबित करण्यासाठी मनाचे नैसर्गिक साधन म्हणून उपयोग होतो. एकाच वेळी सर्व नऊ क्षेत्राबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करणे जबरदस्त वाटते, परंतु प्रत्येक आठवड्यात एका क्षेत्राला संबोधित करण्यात यशस्वी होता येते. प्रत्येक क्षमतेकडे लक्ष देऊन आपल्याबद्दल आणि आपल्या अंगभूत सवयींबद्दल शिकले पाहिजे.

परिवर्तनाची त्रिसूत्री : मनोवेधाचे मुख्य तत्व म्हणजे लक्ष केंद्रित करणे किंवा प्रतिबिंबित करणे. सिगेलने प्रतिबिंब यासाठी मोकळेपणा, निरीक्षण आणि वस्तुनिष्ठता या तीन स्तंभाची रचना केलेली आहे. हे वाटते त्यापेक्षा कठीण आहे! तथापि, भावनांवर चिंतन करण्याचा प्रयत्न करताना आपणास हे उपयुक्त ठरेल, आपण सामान्यत: राग, मत्सर, क्रोध आणि असुरक्षिततेखाली काम करण्याऐवजी, अगदी कमीतकमी आणि अधिक शांत वाटेल अशा सहजतेने पुढे जाण्यास आपण सक्षम होतो ते केवळ मनोवेध आणि वेळेमुळे.

सिगेल यांनी पुस्तकात वापरलेल्या उदाहरणांवरून मनोवेध प्रशिक्षणासाठी काही टिप्स -

 • स्वत:शी आणि आपल्या पालकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणे.
 • जीवनातील महत्त्वाच्या नातेसंबंधामद्धे सजगता निर्माण करणे.  
 • स्वत:च्या शरीराविषयी जागृत असणे म्हणजे ‘निजदेहभान’ येणे गरजेचे.   
 • दुसर्‍याच्या चेहऱ्यावरील भाव टिपणे आणि त्या भावनांचा अंदाज लावण्याचा अशाब्दिक खेळ.
 • आवाज बंद करून एखादा व्हिडिओ पाहणे आणि आपल्या मेंदूला ‘रिक्त स्थान’ भरु देण्याचा अशाब्दिक खेळ.
 • संवेदना सक्रिय करण्यास मदत करण्यासाठी आपल्या दिवसाभरातील दृश्ये / वास / आवाज लिहून काढणे.
 • मेंदूतील विविध कार्य वेगवेगळ्या बाजूंनी रेखाटण्याचा प्रयत्न करणे (या विषयावरील काही पुस्तकांची यादी खाली संदर्भ यादीमध्ये देत आहे).
 • स्वत:च्या भावना आणि त्यांची तीव्रता लिहून काढणे.
 • आपल्या अंतरिक जगाचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द शोधणे.
 • स्वतःशी आणि इतरांशी असलेले आपले संबंध आपण कसे पाहतो यासाठी आपल्या स्वत:चे आणि इतरांशी असलेले आपले नातेसंबंधाचे ‘मनोचित्रण’ (mindmaps) बनविणे.
 • काही स्नायूंबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी काही स्नायू ताणणे आणि मूळ पदावर आणणे.
 • एखाद्याला स्पष्ट शब्दात ‘नाही’ म्हणायला आणि नंतर एक छान ‘हो’ म्हणायला असं बर्‍याच वेळा बोलणं आणि दोन्ही शब्द सांगितल्यावर काय वाटतं यावर चर्चा करणे.

आज आपण स्वत:साठी किती वेळ देतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी गुणवत्तापूर्ण वेळ किती खर्च करतो, इतरांशी नातेसंबंध कसे आहेत इ. अशी न संपणारी यादी आपण सर्वानी मिळून मर्यादित करू शकतो आणि आपले जीवन गुणवत्तापूर्ण जगण्यास सक्षम बनवू शकतो. कारण ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’

 

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:

Daniel J. Siegel, D. J. (2010). Mindsight: The New Science of Personal Transformation, New York: Bantam Books

Edwards, Vanessa (2020). What is Mindsight? And How It Applies to You, science of people, online article  

Malle, Bertram, Hodges, Sara, eds. (2005). Understanding Other Minds, New York: Guilford book

गोगटे, म. ग. (2003). माणसाचा मेंदू व त्याचे कार्य, मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

जोशी आणि जवडेकर (2016). मेंदूतला माणूस, पुणे: राजहंस प्रकाशन

फोंडके, बा. (2016). अंगदेशाचा राजा मेंदू, पुणे: मनोविकस प्रकाशन

मेडिना, जे. (अनुवादक – उपाध्ये) (2016). ब्रेनरूल्स, औरंगाबाद: संकेत प्रकाशन 

सहस्त्रबुद्धे, सी. (2003). मानवी मेंदू शास्त्रीय मागोवा, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

सहस्त्रबुद्धे, सी. (2018). दुसरा मेंदू, मुंबई: परम मित्र पब्लिकेशन्स 

११ टिप्पण्या:

 1. Very nice. U r writing on Eastern methods of introspection and looking at subjective experiences from the objective lens n experience development. Eastern methods speak more from INSIDE OUT while Western methods focus on OUTSIDE IN. Both r complementary.

  उत्तर द्याहटवा
 2. Good one. Eastern methods speak from INSIDE OUT n don't separate science from personal life experiences while Western methods speak OUTSIDE IN n separates subjective experience from science. Both are complimentary if used for development

  उत्तर द्याहटवा
 3. Good one. Eastern methods speak from INSIDE OUT n don't separate science from personal life experiences while Western methods speak OUTSIDE IN n separates subjective experience from science. Both are complimentary if used for development

  उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

बार्नम प्रभाव | Barnum Effect

  बार्नम प्रभाव | Barnum Effect पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) ...