बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

संदिग्धता प्रभाव | Ambiguity effects

 

संदिग्धता प्रभाव | Ambiguity effects

आपण एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करत असताना योग्य निर्णय घेण्यास अधिक चांगल्या प्रकारे माहिती रेटिंगद्वारे मिळू शकते. एकाला सरासरी रेटिंग आहे, तर दुसर्‍याला अद्याप कोणतेही रेटिंग नाही, कारण ते प्रोडक्ट नुकतेच अड झाले आहे. या परिस्थितीत, अनेक लोक सरासरी रेटिंग असलेली वस्तू निवडतात. अद्याप कोणतेही पुनरावलोकन नसलेली वस्तू अधिक चांगली असू शकते, तरीही आपण माहित असलेली गोष्ट मिळवत आहोत हे जाणून घेणे आपणास चांगले वाटते. यालाच संदिग्धता प्रभाव म्हणतात.

संदिग्धता प्रभाव हा एक बोधनिक पूर्वग्रह आहे जिथे माहितीच्या अभावामुळे किंवा अस्पष्टतेमुळे निर्णय घेण्यावर परिणाम होतो. या प्रभावाचा अर्थ असा होतो की लोकांचा कल हा अनुकूल परिणामाची संभाव्यता ज्ञात आहे अशा पर्यायांची निवड करण्याकडे असतो ना की, ज्या पर्यायासाठी अनुकूल परिणामाची संभाव्यता अज्ञात असते. कारण आपण अनिश्चितता नापसंत करतो आणि म्हणून विशिष्ट अनुकूल परिणाम साध्य करण्याची संभाव्यता ज्ञात आहे असा निश्चित पर्याय निवडण्याकडे आपला अधिक कल असतो. डॅनियल एल्सबर्ग यांनी प्रथम 1961 मध्ये या प्रभावाचे वर्णन केले होते. एल्सबर्गने खालील प्रयोगाद्वारे हा प्रभाव दाखवला:

कल्पना करा की एका बादलीमध्ये 90 चेंडू आहेत, त्यापैकी 30 लाल आहेत आणि बाकीचे काळ्या आणि पिवळ्या चेंडूंचे अज्ञात प्रमाण आहे. आपणास 2 पर्यायांमधून निवडण्याची परवानगी आहे: जर A मधून त्याने लाल बॉल काढला तर तो $100 जिंकतो, पण जर त्याने काळा किंवा पिवळा काढला तर तो $0 जिंकतो. किंवा B मधून जर त्याने पिवळा चेंडू काढला तर तो $100 जिंकतो. जर त्याने लाल किंवा काळा काढला तर तो $0 जिंकतो.

आपण काय निवडाल? पर्याय A, कि पर्याय B?

 

जर तुम्ही A पर्याय निवडला असेल तर लाल बॉल काढण्याची शक्यता 1/3 आहे.

जर तुम्ही B पर्याय निवडला असेल तर पिवळा बॉल काढण्याची शक्यता देखील 1/3 आहे. याचे कारण असे की पिवळ्या बॉलची संख्या 0 ते 60 मधील सर्व शक्यतांमध्ये समान प्रमाणात वितरीत केलेली आहे.

येथे असे दिसून येते की बहुतेक लोक पर्याय B ऐवजी A पर्यायावर पैज लावण्यास प्राधान्य देतील, दोन्हीमधील फरक एवढाच आहे की A ला ज्ञात अनुकूल परिणाम आहे, तर पर्याय B मध्ये एक संदिग्ध, अज्ञात अनुकूल परिणाम आहे. लोक पर्याय A पसंत करतात कारण दोन्ही संभाव्यता समान असल्या तरीही तो अधिक निश्चित असल्याचे समजले जाते.

अगोदरच्या काळी घर खरेदी करताना, बरेच लोक एक निश्चित व्याज दर निवडत होते, जेथे व्याज दर एका विशिष्ट कालावधीसाठी (सामान्यत: अनेक वर्षांसाठी) निश्चित केला जात होता, बदलते व्याज दर ठेवण्याकडे लोकांचा कल नव्हता कारण येथे व्याज दरात बाजारानुसार चढ-उतार होण्याची शक्यता असते. धोका कमी असलेल्या पर्यायाची निवड अधिक प्रमाणात केली जात होती. काळ बदलला तशी लोकांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची प्रवृत्ती देखील बदललेली आढळते.

अधिक वास्तववादी उदाहरण म्हणजे लोक ज्या पद्धतीने पैसे गुंतवतात. जोखीम नको असलेले गुंतवणूकदार त्यांचे पैसे सरकारी रोखे, सोने, स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी यांसारख्या "सुरक्षित" गुंतवणुकीत ठेवतात, शेअर बाजार, स्टॉक आणि फंड यांसारख्या अधिक अस्थिर गुंतवणुकीच्या विरोधात ते लोक असतात. जरी शेअर बाजारातून कालांतराने लक्षणीयरीत्या जास्त परतावा मिळण्याची शक्यता असली तरीही, गुंतवणूकदार स्पष्टता नसलेल्या शेअर बाजाराऐवजी "सुरक्षित" गुंतवणुकीला प्राधान्य देतात कारण यामध्ये परतावा ज्ञात आहे. पण प्रत्यक्षात जर आपण विशिष्ट शेअर्सचा अभ्यास करून दीर्घकाल शेअर बाजारामध्ये पैसे गुंतविले तर त्याचे फायदे अगणित आहेत.

वैयक्तिक भिन्नता आणि संदिग्धता प्रभाव

संदिग्धतेचा प्रभाव आपणास दोन व्यवहार्य पर्यायांचा समान विचार करण्यापासून रोखू शकतो. परिणामी आपल्या निर्णय घेण्यावर परिणाम होतो. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप धोकादायक आहे असे आपणास वाटते या वस्तुस्थितीवर आधारित आपण आपोआपच एखाद्या गोष्टीविरुद्ध निर्णय घेऊ शकतो. या बोधात्मक पूर्वग्रहात गुंतल्याने आपले विचार  मर्यादित होतात, कारण आपणास हे धोकादायक निर्णयांचे दीर्घकालीन फायदे मिळविण्यापासून प्रतिबंधित करतात .

 संदिग्धतेच्या प्रभावामुळे जोखीम टाळणे याकडे जरी आपला कल असला तरी, निर्णय घेणार्‍याकडे किती माहिती आहे यावरून दोन पूर्वग्रहातील भेदभाव केले जातात. आपल्याकडे उपलब्ध पर्यायांपैकी फक्त एकासाठी विशिष्ट परिणामाची संभाव्यता माहित असते तेंव्हा संदिग्धता प्रभाव होतो. आपणास दोन्ही संभाव्यता माहित असतात आणि कमी मोबदला असलेल्या परंतु यशाची अधिक शक्यता असलेल्या पर्यायाकडे आकर्षण असते तेंव्हा जोखीम टाळण्याकडे कल असतो. दोन्ही प्रकरणांमध्ये, आपण धोकादायक मानत असलेले पर्याय निवडण्याची आपली नापसंती फलदायी निर्णय घेण्याची आपली क्षमता मर्यादित करू शकतात.

 

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

सुरक्षितता आणि असुरक्षितता

पद्धतशीर विचार हे आपल्या दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या निवडींवर प्रभाव टाकू शकतात, परंतु त्याचा निर्णय घेण्यावरही मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. यामुळे शाळा, कंपन्या आणि शासकिय यंत्रणा सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन धोरणे किंवा कार्यक्रम सादर करण्याऐवजी अपयशी प्रणालींला चिकटून राहतात. जरी हे बदल सिस्टीमला अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतील तरी, गोष्टी चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत याची शाश्वती नसणे आणि शेवटी नवीन काही सुरू करण्याने आहे ती स्थिती वाईट होईल या कारणाने जैसे थे नियम राबवविले जाते. जरी वर्तमान प्रणाली इष्टतम नसली तरीही, बदल लागू करण्यापेक्षा तिच्याशी चिकटून राहणे अधिक सुरक्षित वाटते, कारण ते ज्ञात आहे आणि त्याचा अधिक अंदाज लावता येतो. जोखीम न घेण्याचा निर्णय घेऊन या कृती करण्याकडे दुर्लक्ष केल्याने संस्थांना आणि ज्या लोकांना त्यांचा फायदा होणार आहे त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो.

असे का घडत असावे?

इतर बोधनिक पूर्वग्रहांप्रमाणे, संदिग्धता प्रभाव का होतो यामागे अनेक सिद्धांत आहेत. एक म्हणजे हा एक व्यावहारिक नियम (Rule of thumb) आहे जो जलद, सहज निर्णय घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे. आणखी एक म्हणजे संदिग्धता टाळण्याची उच्च पातळी, एक सामान्य वर्तन ज्यामध्ये आपल्यापैकी बरेच जण गुंतलेले असतात, ज्यामुळे लोकांना हा पूर्वग्रह घडण्याची अधिक शक्यता असते.

व्यावहारिक नियम (Rule of thumb)

व्यावहारिक नियम म्हणजे संदिग्धता प्रभाव निर्णय घेण्याच्या सोयीसाठी वापरला  जाणारा नवगामी परिणाम (प्रयत्न प्रमाद पद्धती) आहे. नवगामी विचाराप्रमाणे, हे समस्या सोडविण्याच्या सामान्य दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्य करते. ही रणनीती आपोआप आणि सहजतेने उद्भवते आणि आपल्याला लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते. नवगमी विचार तोपर्यंत टिकून राहतात जोपर्यंत ते बरोबर असतात. तथापि, त्यांचा वापर करून, आपण चुकीचा किंवा चुकीची माहिती असलेला निष्कर्ष काढण्याचा धोका पत्करतो, कारण आपण तर्क आणि अनुमान वापरण्यात अयशस्वी होतो.

एका मर्यादेपर्यंत, संदिग्धता प्रभाव हा एक अनुकूल प्रतिसाद आहे. अनेक लोक कल्पनेवर आधारित पर्यायांपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असलेल्या पर्यायांना प्राधान्य देतात. आपल्याकडे खरोखर खूप कमी माहिती आहे त्यावेळी हे पर्याय टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याहूनही चांगले, अस्पष्टता परिणाम आपल्याला अस्पष्ट पर्यायाबद्दल अधिक माहिती मिळविण्यास प्रवृत्त करू शकतो, जेणेकरून अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येईल.

व्यावहारिक नियम काही प्रसंगी कार्य करतो. असे म्हटले जात आहे की, या नवगामी विचारावर जास्त अवलंबून राहणे आदर्श नाही. फ्रिश आणि बॅरन यांच्या संशोधनानुसार, संदिग्धता प्रभाव हा फ्रेमिंग प्रभावाचा एक प्रकार आहे, जसे की त्यातील काही अज्ञात घटकांकडे लक्ष वेधून किंवा दूर करून कोणताही पर्याय संदिग्ध किंवा अस्पष्ट वाटू शकतो. मूलत:, एखाद्याला दिलेल्या पर्यायाबद्दल सर्व काही माहित नसते. असा विश्वास ठेवणे हे फक्त "कोणती माहिती असू शकते याबद्दल कल्पनेच्या अभावाचा परिणाम असू शकतो." अशा प्रकारे, या नवगामी विचाराचा वापर करून निर्णय घेणे निश्चितच सोपे होते, परंतु ते जवळजवळ विश्वसनीय किंवा प्रभावी नाही.

आपल्या जीवनात याचे महत्व काय आहे?

इतर कोणत्याही बोधनिक पूर्वग्रहाप्रमाणे जेथे निर्णय घेण्याशी तडजोड केली जाते, संदिग्धतेचा प्रभाव काय आहे आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपण या पूर्वग्रहात गुंतलेले आहोत का हे ओळखण्याची क्षमता विकसित करण्याच्या दिशेने काम करू शकतो. ही जागरूकता आपणास हा पूर्वग्रह पूर्णपणे टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे आपणास तर्काच्या आधारे योग्य निर्णय घेणे शक्य होईल.

संदिग्धतेचा प्रभाव कसे टाळता येईल?

स्वतःला मर्यादित न ठेवण्यासाठी, संदिग्ध पर्याय आणि परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या सुरुवातीच्या प्रबळ इच्छा नजर अंदाज करायला शिकले पाहिजे. कोणत्याही नवगामी विचाराप्रमाणे, असे करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचे अस्तित्व आणि आपल्या निर्णय क्षमतेवर त्याचा प्रभाव ओळखणे. 

नवगामी विचार आपणास सहजतेने आणि आपोआप निर्णय घेण्याची परवानगी देत असले तरीही, संदिग्धता प्रभाव टाळण्याचा एक प्रमुख भाग म्हणून निर्णय घेण्यास आवश्यक वेळ घेणे गरजेचे आहे. आपण एका दिवसात असंख्य माहिती आणि अनेक पर्यायांचा सामना करतो, त्यामुळे आपल्या मानसिक संसाधनांचे योग्य विल्हेवाट लावण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. तथापि, काही निर्णय घेण्यास अधिक मेहनत घ्यावी लागते. कमी अस्पष्ट पर्याय सुरुवातीला अधिक इष्ट वाटू शकतो, परंतु, फ्रिश आणि बॅरनने निदर्शनास आणल्याप्रमाणे, आपणास वाटते त्यापेक्षा कमी माहिती असू शकते. परिस्थितीचा पुन्हा नव्याने विचार केल्याने असे दिसून येईल की कमी अस्पष्ट पर्याय दिसत होता तितका तो श्रेष्ठ नाही. शिवाय, अधिक संदिग्ध पर्यायाचे मूल्यांकन करताना, केवळ काय चूक होऊ शकते यावरच नव्हे तर काय बरोबर असू शकते यावर देखील लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. जेव्हा संदिग्धतेचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करतो, हे विसरतो की हा परिणाम सर्वोत्तम परिस्थिती असू शकतो.

समारोप

संदिग्धता प्रभाव हे आपल्याकडे किती माहिती आहे याचा निर्णय घेण्यावर कसा प्रभाव पडतो यांचे वर्णन करतो. विशेषत:, आपल्याकडे माहितीची कमतरता असते त्या पर्यायांचा तिरस्कार असतो. संदिग्धता प्रभाव हे पर्याय टाळण्यासाठी नवगामी विचार असू शकतात ज्यासाठी आपणास वाटते की आपल्याकडे पुरेशी माहिती नाही. याव्यतिरिक्त, उच्च पातळीच्या संदिग्धता टाळणारे लोक हे वर्तन व्यक्त करण्याची अधिक शक्यता असते. संदिग्धता प्रभाव टाळण्यासाठी, आपण निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील, सक्रिय दृष्टीकोन घेतला पाहिजे. कमी अस्पष्ट पर्याय आपोआप निवडण्याऐवजी, त्या पर्यायाबद्दल आपल्याला काय माहित नाही ते माहिती करून घेतले पाहिजे, तसेच अधिक अस्पष्ट पर्याय निवडण्याचे संभाव्य फायदे देखील ओळखले पाहिजेत.

संदर्भ

Ellsberg, D. (1961). Risk, ambiguity, and the Savage axioms. The quarterly journal of economics, 75(4), 643-669.

Frisch, D., & Baron, J. (1988). Ambiguity and rationality. Journal of Behavioural Decision Making, 1(3), 149-157.

Howard, J. (2018). Ambiguity Effect. Cognitive Errors and Diagnostic Mistakes: A Case-Based Guide to Critical Thinking in Medicine. 15-19. doi: 10.1007/978-3-319-93224-8_2

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

मानवी मेंदूचे नियम | Brain Rules

 

मानवी मेंदूचे नियम | Brain Rules

मानवी मेंदू हा कसा काम करतो हे माहिती नसणे, नातेसंबंधाच्या दृष्टीने मोठी गैरसोय ठरू शकेल कारण बोधात्मक साक्षरतेमुळे एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारे का वागते हे शोधण्यास, तसेच इतरांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यास मदत होऊ शकते. मेंदू कसा काम करतो याबद्दल अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनातून काही सामान्य नियम निदर्शनास आलेले आहेत. ते मेंदूचे नियम म्हणजे आपला मेंदू कसा कार्य करतो आणि आपण ते ज्ञान व्यावहारिक उपयोगात कसे आणू शकतो यावर एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण चित्रण आहे.

जॉन मेडिना हे सिएटल वॉशिंग्टन येथील एक प्रतिथयश आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि संशोधन सल्लागार आहेत; तसेच वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये बायोइंजिनियरिंगचे प्राध्यापक आहेत आणि सिएटल पॅसिफिक विद्यापीठातील ब्रेन सेंटर फॉर अप्लाइड लर्निंग रिसर्चचे संचालक आहेत. तज्ज्ञ मंडळींनी पुनरावलोकन केलेल्या विविध प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासांवर आधारित आपला मेंदू कसा कार्य करतो याबद्दलचे सत्य मांडण्यासाठी मेडिना यांनी मेंदूच्या 12 नियमांची  एक सूची तयार केलेली आहे. त्याचेच पुस्तक म्हणजे मेंदूचे 12 नियम (Brain Rules) होय.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2

 

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. अरिस्टॉटल

रागावर नियंत्रण ठेवण्याची तंत्रे आणि पद्धती

शिथिलीकरण

साधीसोपी शिथिलीकरण तंत्रे, जसे की खोलवर श्वासोच्छवास आणि आरामदायक स्थिती, रागाची भावना शांत करण्यात मदत करू शकतात. अशी काही पुस्तके आणि कार्यक्रम आहेत जे आपणास शिथिलीकरणाची तंत्रे शिकवू शकतात आणि एकदा का आपण ही तंत्रे शिकलात की आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचा वापर करू शकतो. जर आपण अशा नात्यात गुंतलेले असाल जिथे तुम्ही आणि तुमचा पार्टनर उग्र स्वभावाचे असाल, तर ही तंत्रे शिकणे तुमच्या दोघांसाठी चांगली कल्पना असू शकते. पण निसर्ग अशा लोकांना कमीच एकत्र येऊ देतो कारण त्यालाही स्वतःची फिकीर असेल ना! आपण प्रयत्न करू शकतो अशा काही सोप्या टिप्स:

आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा, हळूहळू आपला श्वास आता घ्या त्याची अनुभूती आपणास झाली पाहिजे तसेच उच्छवास हा हळूहळू बाहेर कसा पडतो याचीही अनुभूती घ्या.

शांतता निर्माण करणारे शब्द किंवा वाक्यांश जसे की "रिलक्स," "कुल" खोलवर श्वास घेताना पुनःपुन्हा उच्चारा. (3 इडीएटस मधील वाक्यांश छातीवर हात ठेवून म्हणा ‘आल इज वेल’)

तुमची स्मृती किंवा तुमच्या कल्पनेतून, आरामदायी अनुभवाची कल्पना करा, (व्हिज्युअलायझेशन तंत्र) एखाद्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही अनवाणी‍ पायांनी फिरत आहात अशी कल्पना करा किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आहात याची कल्पना करा.

अधिक तान द्यावे लागणार नाहीत असे सौम्य योगासनासारखे व्यायाम आपल्या स्नायूंना आराम देऊ शकतात आणि आपणास अधिक शांत वाटू शकते.

या तंत्रांचा दररोज सराव केल्यास आपणास तणावपूर्ण परिस्थितीत त्यांची आपोआप मदत होते.

बोधात्मक पुनर्रचना

सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ आपली विचार करण्याची पद्धत बदलणे. रागावलेले लोक शिव्याशाप देतात, उद्विग्नता किंवा चमत्कारिक शब्द उच्चारतात जे की त्यांचे आंतरिक  प्रतिबिंबित दर्शविते. जेव्हा आपण रागावता तेव्हा तुमची विचारसरणी अतिशोक्तीपूर्ण आणि नाटकीय असू शकते. आपले विचार अधिक तर्कसंगत विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, "अरे, हे भयानक आहे, ते अत्यंत वाईट आहे, सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे," असे स्वतःला सांगण्याऐवजी "हे किती निराशाजनक आहे, आणि त्यामुळे मी नाराज आहे याची जाणीव होणे, यामुळे काही जगाचा अंत होणार नाही आणि मा‍झ्या रागवण्याने तो काही सुटणार नाही की दुरुस्त होणार नाही.” त्यामुळे स्वतःबद्दल किंवा इतर कोणाबद्दल बोलताना "कधीही नाही" किंवा "नेहमी" यासारख्या टोकाच्या शब्दांपासून सावध रहा आणि नेहमी हे लक्षात असू दे की रागाने काहीही ठीक होणार नाही, पण प्रत्यक्षात त्रास आणि पश्चाताप मात्र होतो.

उत्तम संवादाने प्रश्न सुटतात

रागावलेले लोक निष्कर्षापर्यंत पोहोचतात - आणि त्यावर कार्य करतात - आणि त्यातील काही निष्कर्ष खूप चुकीचे असू शकतात. आपण वादविवाद सारख्या चर्चेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे संथ गतीने आणि आपल्या प्रतिसादांचा विचार करा. आपल्या डोक्यात येणारा पहिला विचार बोलू नका, शांत व्हा आणि आपणास काय म्हणायचे आहे याचा काळजीपूर्वक विचार करा. त्याच वेळी, समोरची व्यक्ती काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर देण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्या.

जेव्हा आपल्यावर टीका केली जाते तेव्हा बचावात्मक होणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्याशी लढण्यापेक्षा, त्यांनी काय उच्चारले आहे ते शांतपणे ऐका आणि अशा व्यक्तींना सौम्य शब्दात चपखलपणे उत्तर द्या. एका अर्थाने पाहिल्यास शहाण्या माणसाने मूर्खाच्या नादाला लागूच नये, शांत राहिल्याने परिस्थिती आपत्तीजनक होण्यापासून रोखता येते.

सभोवतालचे वातावरण हलके फुलके ठेवणे

"हलके फुलके विनोद" विविध मार्गांनी राग कमी करण्यास मदत करू शकतात. जेव्हा आपणास राग येतो तेव्हा, हलके फुलके विनोद मूड हलका करू शकतात आणि हे आपणास अधिक संतुलित दृष्टीकोन मिळवण्यास मदत करू शकतात. खरे तर, हास्य ही रागाच्या विसंगत भावस्थिती मानली जाते कारण काहीतरी मजेदार शोधण्याची मानसिक स्थिती रागाच्या मानसिक स्थितीशी विसंगत आहे. अगदी थोड्या क्षणासाठी, जेव्हा आपणास काहीतरी मजेदार आढळते आणि आपण हसतो तेव्हा राग नाहीसा होतो. त्यामुळे समोरची व्यक्ती रागवल्यावर व्यक्तीमध्ये किंवा आणीबाणीच्या परिस्थितीतही स्वतःला तटस्थ ठेऊन त्यामध्ये गंमत पाहण्याचा प्रयत्न करा.

आरोग्यदायी जीवनशैली

आपले शरीर हे निसर्गातील सर्वोत्तम स्वयंचलित यंत्र असून त्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्याचा वापर आपण अशक्य कामासाठी देखील करू शकतो. आरोग्यदायी जीवनशैली आचरणात आणणं, हा शरीरावर इतर कोणत्याही पदार्थांचा, उत्पादनांचा मारा करण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. आरोग्यदायी जीवनशैली आचरण न केल्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, झोपेच्या तक्रारी अलिकडे सामान्य होऊन गेलेल्या आहेत. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, सकाळचा नाष्टा पोटभर घेणे, निश्चित दिनक्रम आणि प्राधान्य क्रम आखून घेणे, इतरांशी सौजन्याने व्यवहार करणे, सदृढ नातेसंबंध जोपासणे, दिवसातून एकवेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालविणे, दुपारचे जेवण सामान्य आणि रात्रीचे जेवण हलके फुलके असावे आणि रात्री दहाच्या आत झोपी जाणे यामुळे मेंदूचे घड्याळ व्यवस्थित कामा करण्यास मदत होते.

राग आलाच नाहीतर काय होईल

आपण आपली नैसर्गिक आणि स्वाभाविक रागाची भावना व्यक्त केलीच नाही तर काय होऊ शकते यासाठी एक साधू आणि साप यांची कथा पाहू या.

जंगलात एक विषारी साप राहत होता. तो जंगलाच्या एका कोपऱ्यात संचार करायचा आणि तिकडे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. एके दिवशी एक साधू तेथे तपश्चर्या करायला आला. सापाने साधूला सगळी हकीकत सांगितली की लोक त्याला घाबरून त्याच्याजवळ कोणी येतच नाही. साधूने सापाला समजावले की त्याने कोणालाही दंश करू नये. साधूने आपल्या आशीर्वादाने सापाचे विषही संपवले. काही दिवसांनी साधू जंगल सोडून गेला. त्यानंतर काही दिवसांनी तो परत आला तेव्हा त्याला अर्धमेल्या अवस्थेत साप दिसला. चिंतित होऊन साधूने सापाला याचे कारण विचारले. साप सांगू लागला, जेव्हा मी लोकांना चावणे बंद केले तेव्हा त्यांनी मला घाबरणे सोडले. त्यांनी माझ्यावर दगडफेक सुरू केली. एवढेच नाही तर त्यांनी मला दोरी म्हणून वापर केला अनेक तर्‍हेने माझे हालाहल केले. यावर साधू म्हणाले, जे तुमचे नुकसान करतात त्यांच्यापासून तुम्ही स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही अस्त्र दिलेले आहे त्यांचा वापर समोरच्या व्यक्तीला घाबरण्यासाठी करायला हवे. साधूने सापाला सांगीतले की तू केवळ स्वत:च्या रक्षणासाठी फणा काढ म्हणजे समोरचा समजून जाईल की थांबले पाहिजे. सापाने त्याचे पालन केले आणि आनंदी जीवन जगू लागला. त्यामुळे निसर्गाने बहाल केलेले रागाचे अस्त्र कोठे, केंव्हा, कसे, आणि किती प्रमाणात वापरायचे हेच व्यवस्थापन आहे.

रागाने आपल्यावर नियंत्रण मिळवण्याआधी आपण रागावर नियंत्रण मिळवू या!

एक आजोबा आपल्या नातवाला एक प्राचीन दंतकथा सांगतात “दोन प्रचंड लांडगे प्रत्येकाच्या हृदयात आरामात, एक पांढरा आणि काळा. पांढरा लांडगा चांगला, दयाळू आणि प्रेमळ आहे, त्याला सुसंवाद आवडतो आणि जेव्हा स्वतःचे संरक्षण करण्याची किंवा प्रियजनांची काळजी घेण्याची गरज असते तेव्हा तो ठामपणे अडचणीसमोर उभा राहतो. दुसरा काळा लांडगा हिंसक आणि संतापलेला असतो. अनावश्यक घटनांनी रागावतो आणि सतत विनाकारण भांडत राहतो. त्याचे विचार द्वेषाने भरलेले असल्याने त्याचा राग निरुपयोगी आहे आणि त्यामुळेच तो समस्या निर्माण करतो. हे दोन लांडगे माझ्या हृदयात नेहमी भांडत राहतात ”.

नातवाने विचारले: "शेवटी, दोन्ही लांडग्यापैकी कोण जिंकतो?"

अजोबाने उत्तर दिले: “दोघेही, कारण मी फक्त पांढऱ्याला लांडग्याला खायला घातले, तर काळा लांडगा अंधारात लपून बसेल आणि माझे लक्ष विचलित झाल्यावर, पांढऱ्या लांडग्यावर प्राणघातक हल्ला करेल. त्याउलट, जर मी दिले लक्ष दिले आणि तिचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मी तिची शक्ती करू शकतो."

नातू गोंधळून गेला: "हे दोघे जिंकणे कसे शक्य आहे?"

आजोबाने हसत हसत स्पष्ट केले की, “काळ्या लांडग्याचे काही गुण आपल्याला काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असू शकतात, कारण तो बिनधास्त व दृढनिश्चयी आहे, तो हुशार आहे आणि त्याच्या संवेदनाही तीव्र आहेत. अंधाराची सवय असलेले त्याची डोळे आपल्याला धोक्यासंबंधी इशारा देतात आणि आपला बचाव करू शकतात. जर मी त्या दोघांना खायला घातले तर मा‍झ्या मनावर विजय मिळवण्यासाठी त्यांना भांडण करावे लागणार नाही, म्हणून केव्हा कोणता लांडगा निवडायचा हे मी ठरवू शकतो."

ही कथा आपल्यासाठी एक अत्यंत मौल्यवान धडा देते, दडलेला राग हा भुकेल्या लांडग्यासारखा आहे, जो खूप धोकादायक आहे. आपणास हे कसे नियंत्रीत करावे हे न कळल्याने ते कोणत्याही क्षणी आपला ताबा घेतील. या कारणास्तव, आपण आपल्या नकारात्मक भावना न लपवता आणि न दाबता त्या बिनशर्त स्वीकारल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आणीबाणीच्या परिस्थितीत वापरल्या पाहिजेत. ‘वेनम’ हा हॉलीवूडपट 2018 मध्ये प्रसारित झाला होता त्यामध्ये एका पत्रकाराच्या शरीरात एलियन प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल होतात तो एकाच वेळी शांत आणि भयंकर रूप धारण करू शकला कारण तो त्या काळ्या एलियनला नियंत्रित करू शकत होता.

समारोप:

जेव्हा आपण रागवतो आणि त्या अवस्थेत बोलतो तेंव्हा ते आपले सर्वोत्तम भाषण ठरू शकेल पण त्याचा पश्चाताप नेहमी होईल. रागाला धरून ठेवणे म्हणजे दुसर्‍यावर फेकण्याच्या उद्देशाने गरम कोळसा पकडण्यासारखे आहे; त्यामुळे दुसर्‍याला काहीही इजा होणार नही पण आपण मात्र होरपळून निघू. तथागत बुद्ध म्हणतात की, रागाला धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीने मरावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. त्यामुळे रागवलेल्या अवस्थेतील प्रत्येक मिनिटामध्ये आपण आनंदाचे 60 सेकंद गमावतो हे लक्षात असू दे. आपला प्रत्येक सेकंद आरोग्यपूर्ण आणि आनंदाने व्यतीत होवो हीच प्रार्थना!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. रिस्टॉटल

तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात घडून गेलेली एक घटना. शाक्य आणि कोलिया राज्यांच्या दरम्यान वाहणाऱ्या रोहिणी नदीचे पाणी अडवून दोन्ही राज्यातील लोक आपल्या पिकांना पाणी देत ​​असत. एकदा जेष्ठ महिन्यात पिके सुकलेली पाहून शाक्य आणि कोलिया या दोन्ही राज्यातील रहिवास्यांनी आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी रोहिणी नदीवर आले. आपल्या शेतात आधी पाणी कोण देणार? यावरून त्यांच्यात भांडण सुरु झाले. ही बातमी त्यांचे महसूल प्रतिनिधीकडून सेनापतीद्वारे शाक्य व कोलिया राजांना मिळाली. सर्व सेवक, सैन्य आणि सेनापती एकत्र आल्याने तलवारी बाहेर आल्या. जेव्हा सैन्य एकमेकाशी लढायला निघाले तेव्हा रोहिणी नदीच्या किनाऱ्यावर तथागत बुद्ध ध्यान करत बसले होते त्यामुळे ही बातमी त्यांना मिळाली. ते युद्धासाठी सज्ज असलेल्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. तेंव्हा शाक्य आणि कोलिया राज्यातील सर्वजणांनी शस्त्रे टाकून तथागत बुद्धाना नमन केले.

तथागत बुद्ध म्हणाले महाराज, हे कसले भांडण? लढा कशासाठी? दोन्ही राज्यांचे राजे म्हणाले की आम्हाला कारण माहित नाही. तथागत बुद्ध म्हणाले मग कारण कोणास ठाऊक असेल? कारण विचारात न घेता विनाकारण तलवारी काढल्या! कारणाचा शोध तरी घ्यायचा! राजे म्हणाले की कदाचीत सेनापतीला माहित असावं, सेनापतीनी सैन्य प्रमुखाकडे बोट दाखवलं, सैन्य प्रमुखाकांनी सैनिकांकडे बोट दाखवलं आणि शेवटी प्रकरण नोकरांपर्यंत पोहोचलं, तेंव्हा कोठे जाऊन कारण कळलं की भांडण हे पाण्यामुळे सुरु आहे. बुद्ध म्हणाले पाण्यामुळे! इथे नेहमीच पाणी वाहत असते, उद्याही ते वाहत राहणार त्यामुळे लढा पाण्यामुळे होऊ शकत नाही. सेवक म्हणाले की आधी पाणी कोणी वापरायचे यावरून लढा सुरु आहे. तेंव्हा बुद्ध म्हणाले, पाण्यामुळे भांडण होऊच शकत नाही. त्यामुळे पाण्याला दोष देऊ नका.

बुद्ध हसले आणि शाक्य आणि कोलियांच्या प्रमुखांना विचारले की, महाराज, पाण्याची किंमत काय आहे? राजा खूप लाजला आणि लाजून म्हणाला, अत्यल्प तसे पाहिल्यास काहीच नाही. पाण्याची किंमत ती काय! आणि बुद्धाने मानवांबद्दल विचारले, राजा आणखी संकोचला आणि म्हणाला की अमूल्य मानवापेक्षा अधिक मौल्यवान काय आहे! बुद्ध म्हणाले, मग विचार करा, अत्यल्प मूल्यासाठी तुम्ही अमूल्य नष्ट करणार आहात का? पाण्यासाठी रक्त सांडणार आहात का? आणि नदी अशीच वाहत राहील. एकमेकांना माराल किंवा तुम्ही स्वतः मराल; पण नदी अशीच वाहत राहिली, नदीला कळणारही नाही. तत्त्वशून्य गोष्टीसाठी आपण आपले अमुल्य गोष्ट गमावणार का? खडे आणि दगडांसाठी हिरे-माणिके फेकणार आहात का? म्हणूनच तुमच्या आयुष्यात दु:ख, चिंता आणि अंधार आहे. तथागत बुद्धांच्या बोलण्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते काय करत होते याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी पाणी तंटा सामंजस्यानी, सामोपचाराने वाटाघाटी करून सोडविला. अशाप्रकाराने रागातून आणि द्वेषभावनेतून सुरु झालेलं भांडण सकारात्मक पद्धतीने समाप्त झाले. पण मुळात राग का येतो? राग येण स्वाभाविक आहे का? राग येण्याची कारणे काय आहेत? कारण माहित झाल्यास त्यावर काही उपाय करता येतील का?

राग म्हणजे काय?

राग येणे हे पूर्णपणे सामान्य असून ती नैसर्गिक निरोगी मानवी भावना आहे. परंतु जेव्हा ती नियंत्रणाबाहेर जाते आणि विध्वंसक होते, तेव्हा त्यामुळे कामाच्या ठिकाणी, वैयक्तिक नातेसंबंधात आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे राग ही एक मनाची अवस्था असून ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. जेव्हा इच्छेविरुद्ध काही घडते आणि ते स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम निट करू शकत नाही. मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आहे. म्हणून राग ही एक मनाची नकारात्मक अवस्था आहे. अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्‍य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची संरक्षण यंत्रणा असते.

राग ही एक "भावनिक अवस्था असून ती सौम्य चिडण्यापासून ते तीव्र संताप आणि क्रोध यामध्ये बदलते," रागाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्पिलबर्गर यांच्या मते, इतर भावनांप्रमाणे रागामुळे शारीरिक आणि जैविक बदल घडतात; जेव्हा आपणास राग येतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढते, त्यामुळे ऊर्जा संप्रेरकांची पातळी वाढते.  

रागाची कारणे

शाक्य आणि कोलिया लोकांच्यामध्ये उद्भवलेले भांडण हे काही पाण्यामुळे नसून त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. पाणी हे केवळ निमित्त किंवा तात्कालिक कारण असू शकते. पण प्रत्यक्षात अनेकवेळा अशा छुल्लक घटना घडून गेलेल्या असतील त्या डोक्यात ठेवल्याने यावेळी त्याचा उद्रेक झालेला पाहायला मिळाले आणि तथागत बुद्धांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि कौशल्याने तंटा मिटविला. हे जरी असले तरी रागाचे मूळ काय असू शकते.

मनाला लागलेले अपयश, अन्याय किंवा निराशा यासारख्या अंतर्गत घटना आणि मालमत्ता किंवा विशेषाधिकारांचे नुकसान, उपहास किंवा अपमान यासारख्या बाह्य घटना या दोन्ही घटनांमुळे राग येऊ शकतो. आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर (जसे की सहकारी किंवा पर्यवेक्षक) किंवा परिस्थितीवर (ट्रॅफिक जाम, रद्द केलेली फ्लाइट) रागावू शकतो किंवा आपणास आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल चिंता किंवा विचार केल्यामुळे राग येऊ शकतो. क्लेशकारक किंवा संतापजनक घटनांच्या आठवणीदेखील संतप्त भावनांना उत्तेजन देऊ शकतात.

अ) जीवशास्त्रीय घटक: राग निर्माण होण्यास मेंदूतील कुंभखंड (टेंपोरेल लोब) आणि किनारी संस्था (लिंबिक सिस्टिम) कारणीभूत असते. तसेच विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था, ॲड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण, डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग देखील रागास कारणीभूत ठरू शकतात.

ब) अनुवांशिक घटक: रागाची भावना आनुवंशिक असू शकते. जसे XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती आणि अनुवांशिक व्यक्तिमत्त्व दोष असणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

क) मानसशास्त्रीय घटक: अति स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती, चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती, सारासार विचार न करता मत बनवणाऱ्या व्यक्ती, संशयीवृत्ती असणाऱ्या व्यक्ती, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती, न्यूनगंड, लैंगिक दमन करणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

आपल्या रागाचे प्रमाण किती असते?

काही प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत ज्या राग या भावनांची तीव्रता मापन करतात, आपणास किती राग येतो आणि तुम्ही ते किती चांगले हाताळता यांचे विश्लेषण त्याद्वारे करता येते. जर तुम्हाला रागाची समस्या आहे आणि तुम्हाला ते आधीच माहित असेल तर तिचा बिनशर्त स्वीकार करून त्यावर काम करा. जर तुम्ही नियंत्रणाबाहेर आणि भयावह वाटणाऱ्या मार्गांनी राग व्यक्त करत असाल, तर तुम्हाला या भावनांना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी मदतीची आवश्यकता असू शकते.

यासाठी स्टेट-ट्रेट अँगर एक्स्प्रेशन इन्व्हेंटरी (STAXI-2) ही सर्वात व्यापकपणे वापरली जाणारी राग शोधिका आहे. स्पिलबर्गर यांनी 1999 मध्ये त्याची सुधारित आवृत्ती आणलेली आहे. एकूण 57 विधाने असून रेटिंग चार-पॉइंट स्केलवर आहेत आणि स्थिती आणि वैशिष्ट्य याद्वारे रागचे मापन केले जाते. सदर चाचणी 16 वर्षांपेक्षा अधिक वयोगट असणाऱ्या कोणालाही देता येते.

काही लोक इतरांपेक्षा जास्त का रागावतात?

राग व्यवस्थापनात माहिर असलेले मानसशास्त्रज्ञ जेरी डेफेनबॅकर यांच्या मते, काही लोक खरोखरच इतरांपेक्षा जास्त "गरम" असतात; त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक सहज आणि तीव्रतेने राग येतो. असेही काही लोक आहेत जे त्यांचा राग जाणवेल असा व्यक्त करत नाहीत परंतु किरकिरे आणि चिडखोर असतात. सौम्यपणे रागावलेले लोक नेहमी शिव्याशाप देत नाहीत आणि वस्तूही फेकत नाहीत; कधीकधी ते सामाजिकरित्या माघार घेतात, निराश होतात किंवा शारीरिकदृष्ट्या आजारी पडतात.

काहीही कारण नसताना काही लोक सहज रागवतात, जसे ते रागाच्या काठावर बसलेले आहेत किंवा काही लोकांना केवळ निमित्त हवे असते रागवण्यासाठी. असे लोक गोष्टी किंवा घटनेतील चांगली बाजू न पाहता केवळ नकारात्मक अंगाने विचार करून जे काही चुकीचे घडत आहे ते त्यांच्याच बाबतीत घडत आहे असा समज करून घेऊन नेहमी रागाच्याच पावित्र्यात असतात. तर काही लोक विशेषतः परिस्थिती विशिष्ट प्रमाणात अन्यायकारक वाटल्यास ते रागावतात कारण त्यांना हक्क आणि जबाबदाऱ्या माहित असतात.

रागाचे संभाव्य धोके काय आहेत?

अनेक लोक अतिरागाला केवळ एक मानसिक समस्या मानतात. ते एक ढोबळपणे केलेले विधान आहे. जेव्हा आपण रागावतो तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था (ऑटोमिक नर्वस सिस्टीम) उत्तेजित होते. उदाहरणार्थ, आपल्या छुप्या नात्यासंबंधीचे पितळ उघड पडल्याने उद्भवलेल्या रागामुळे अनुकंपी (सिम्प्यथेटिक) मज्जासंस्था आणि संबंधित हार्मोनल आणि न्यूरोकेमिकल बदल होण्याची शक्यता असते. या शारीरिक प्रतिक्रियांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिसाद, श्वासोच्छ्वास आणि घाम, सक्रिय स्नायूंना रक्त प्रवाह आणि ताकद वाढू शकते. जसजसा राग कायम राहतो, तसतसा त्याचा परिणाम शरीराच्या अनेक प्रणालींवर होतो, जसे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, रोगप्रतिकारक शक्ती, पाचक आणि मध्यवर्ती मज्जासंस्था. यामुळे हायपरटेन्शन आणि स्ट्रोक, हृदयविकार, जठरासंबंधी आजार आणि आतड्यांसंबंधी रोग, तसेच जखम बरे ना होण्याचा धोका वाढतो आणि काही प्रमाणात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की राग हा हृदयविकाराचा एक मुख्य जोखीम घटक आहे. अनेक प्रकारच्या परिस्थितींमध्ये, वारंवार राग अनुभवण्याची प्रवृत्ती असणे, याला राग प्रवण अवस्था म्हणून ओळखले जाते. एका अभ्यासात सलग तीन वर्षे सामान्य रक्तदाब असलेल्या आणि राग प्रवण अवस्था असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका दोन ते तीन पटीने वाढलेला आढळला. आणखी एका अभ्यासात रागावर नियंत्रण कमी असलेल्या व्यक्तींना प्राणघातक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा सर्वाधिक धोका आढळला. अनेक संशोधनाच्या आधारे, तज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की राग प्रवण, दीर्घकालीन शत्रुत्व, रागाची अभिव्यक्ती आणि तीव्र रागाच्या घटनांमुळे वारंवार हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकृती होऊ शकते. जेव्हा राग वारंवार, तीव्र स्वरुपाचा आणि चिरकाल असतो त्यापेक्षा राग माफक प्रमाणात अनुभवला जातो आणि ठामपणे व्यक्त केला जातो तेव्हा तो कमी व्यत्यय आणतो.

सदर लेखाचा उर्वरित भाग आपण पुढील लेखात पाहू या.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)


शिक्षण एक अडगळ | Education is absent in system |

  शिक्षण एक अडगळ शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे मूलतत्त्व मानले जाते. UNESCO च्या 2021 च्या अहवालानुसार , शिक्षण हे सामाजिक प्रगती...