शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. रिस्टॉटल

तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात घडून गेलेली एक घटना. शाक्य आणि कोलिया राज्यांच्या दरम्यान वाहणाऱ्या रोहिणी नदीचे पाणी अडवून दोन्ही राज्यातील लोक आपल्या पिकांना पाणी देत ​​असत. एकदा जेष्ठ महिन्यात पिके सुकलेली पाहून शाक्य आणि कोलिया या दोन्ही राज्यातील रहिवास्यांनी आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी रोहिणी नदीवर आले. आपल्या शेतात आधी पाणी कोण देणार? यावरून त्यांच्यात भांडण सुरु झाले. ही बातमी त्यांचे महसूल प्रतिनिधीकडून सेनापतीद्वारे शाक्य व कोलिया राजांना मिळाली. सर्व सेवक, सैन्य आणि सेनापती एकत्र आल्याने तलवारी बाहेर आल्या. जेव्हा सैन्य एकमेकाशी लढायला निघाले तेव्हा रोहिणी नदीच्या किनाऱ्यावर तथागत बुद्ध ध्यान करत बसले होते त्यामुळे ही बातमी त्यांना मिळाली. ते युद्धासाठी सज्ज असलेल्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. तेंव्हा शाक्य आणि कोलिया राज्यातील सर्वजणांनी शस्त्रे टाकून तथागत बुद्धाना नमन केले.

तथागत बुद्ध म्हणाले महाराज, हे कसले भांडण? लढा कशासाठी? दोन्ही राज्यांचे राजे म्हणाले की आम्हाला कारण माहित नाही. तथागत बुद्ध म्हणाले मग कारण कोणास ठाऊक असेल? कारण विचारात न घेता विनाकारण तलवारी काढल्या! कारणाचा शोध तरी घ्यायचा! राजे म्हणाले की कदाचीत सेनापतीला माहित असावं, सेनापतीनी सैन्य प्रमुखाकडे बोट दाखवलं, सैन्य प्रमुखाकांनी सैनिकांकडे बोट दाखवलं आणि शेवटी प्रकरण नोकरांपर्यंत पोहोचलं, तेंव्हा कोठे जाऊन कारण कळलं की भांडण हे पाण्यामुळे सुरु आहे. बुद्ध म्हणाले पाण्यामुळे! इथे नेहमीच पाणी वाहत असते, उद्याही ते वाहत राहणार त्यामुळे लढा पाण्यामुळे होऊ शकत नाही. सेवक म्हणाले की आधी पाणी कोणी वापरायचे यावरून लढा सुरु आहे. तेंव्हा बुद्ध म्हणाले, पाण्यामुळे भांडण होऊच शकत नाही. त्यामुळे पाण्याला दोष देऊ नका.

बुद्ध हसले आणि शाक्य आणि कोलियांच्या प्रमुखांना विचारले की, महाराज, पाण्याची किंमत काय आहे? राजा खूप लाजला आणि लाजून म्हणाला, अत्यल्प तसे पाहिल्यास काहीच नाही. पाण्याची किंमत ती काय! आणि बुद्धाने मानवांबद्दल विचारले, राजा आणखी संकोचला आणि म्हणाला की अमूल्य मानवापेक्षा अधिक मौल्यवान काय आहे! बुद्ध म्हणाले, मग विचार करा, अत्यल्प मूल्यासाठी तुम्ही अमूल्य नष्ट करणार आहात का? पाण्यासाठी रक्त सांडणार आहात का? आणि नदी अशीच वाहत राहील. एकमेकांना माराल किंवा तुम्ही स्वतः मराल; पण नदी अशीच वाहत राहिली, नदीला कळणारही नाही. तत्त्वशून्य गोष्टीसाठी आपण आपले अमुल्य गोष्ट गमावणार का? खडे आणि दगडांसाठी हिरे-माणिके फेकणार आहात का? म्हणूनच तुमच्या आयुष्यात दु:ख, चिंता आणि अंधार आहे. तथागत बुद्धांच्या बोलण्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते काय करत होते याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी पाणी तंटा सामंजस्यानी, सामोपचाराने वाटाघाटी करून सोडविला. अशाप्रकाराने रागातून आणि द्वेषभावनेतून सुरु झालेलं भांडण सकारात्मक पद्धतीने समाप्त झाले. पण मुळात राग का येतो? राग येण स्वाभाविक आहे का? राग येण्याची कारणे काय आहेत? कारण माहित झाल्यास त्यावर काही उपाय करता येतील का?

राग म्हणजे काय?

राग येणे हे पूर्णपणे सामान्य असून ती नैसर्गिक निरोगी मानवी भावना आहे. परंतु जेव्हा ती नियंत्रणाबाहेर जाते आणि विध्वंसक होते, तेव्हा त्यामुळे कामाच्या ठिकाणी, वैयक्तिक नातेसंबंधात आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे राग ही एक मनाची अवस्था असून ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. जेव्हा इच्छेविरुद्ध काही घडते आणि ते स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम निट करू शकत नाही. मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आहे. म्हणून राग ही एक मनाची नकारात्मक अवस्था आहे. अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्‍य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची संरक्षण यंत्रणा असते.

राग ही एक "भावनिक अवस्था असून ती सौम्य चिडण्यापासून ते तीव्र संताप आणि क्रोध यामध्ये बदलते," रागाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्पिलबर्गर यांच्या मते, इतर भावनांप्रमाणे रागामुळे शारीरिक आणि जैविक बदल घडतात; जेव्हा आपणास राग येतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढते, त्यामुळे ऊर्जा संप्रेरकांची पातळी वाढते.  

रागाची कारणे

शाक्य आणि कोलिया लोकांच्यामध्ये उद्भवलेले भांडण हे काही पाण्यामुळे नसून त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. पाणी हे केवळ निमित्त किंवा तात्कालिक कारण असू शकते. पण प्रत्यक्षात अनेकवेळा अशा छुल्लक घटना घडून गेलेल्या असतील त्या डोक्यात ठेवल्याने यावेळी त्याचा उद्रेक झालेला पाहायला मिळाले आणि तथागत बुद्धांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि कौशल्याने तंटा मिटविला. हे जरी असले तरी रागाचे मूळ काय असू शकते.

मनाला लागलेले अपयश, अन्याय किंवा निराशा यासारख्या अंतर्गत घटना आणि मालमत्ता किंवा विशेषाधिकारांचे नुकसान, उपहास किंवा अपमान यासारख्या बाह्य घटना या दोन्ही घटनांमुळे राग येऊ शकतो. आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर (जसे की सहकारी किंवा पर्यवेक्षक) किंवा परिस्थितीवर (ट्रॅफिक जाम, रद्द केलेली फ्लाइट) रागावू शकतो किंवा आपणास आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल चिंता किंवा विचार केल्यामुळे राग येऊ शकतो. क्लेशकारक किंवा संतापजनक घटनांच्या आठवणीदेखील संतप्त भावनांना उत्तेजन देऊ शकतात.

अ) जीवशास्त्रीय घटक: राग निर्माण होण्यास मेंदूतील कुंभखंड (टेंपोरेल लोब) आणि किनारी संस्था (लिंबिक सिस्टिम) कारणीभूत असते. तसेच विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था, ॲड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण, डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग देखील रागास कारणीभूत ठरू शकतात.

ब) अनुवांशिक घटक: रागाची भावना आनुवंशिक असू शकते. जसे XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती आणि अनुवांशिक व्यक्तिमत्त्व दोष असणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

क) मानसशास्त्रीय घटक: अति स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती, चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती, सारासार विचार न करता मत बनवणाऱ्या व्यक्ती, संशयीवृत्ती असणाऱ्या व्यक्ती, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती, न्यूनगंड, लैंगिक दमन करणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

आपल्या रागाचे प्रमाण किती असते?

काही प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत ज्या राग या भावनांची तीव्रता मापन करतात, आपणास किती राग येतो आणि तुम्ही ते किती चांगले हाताळता यांचे विश्लेषण त्याद्वारे करता येते. जर तुम्हाला रागाची समस्या आहे आणि तुम्हाला ते आधीच माहित असेल तर तिचा बिनशर्त स्वीकार करून त्यावर काम करा. जर तुम्ही नियंत्रणाबाहेर आणि भयावह वाटणाऱ्या मार्गांनी राग व्यक्त करत असाल, तर तुम्हाला या भावनांना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी मदतीची आवश्यकता असू शकते.

यासाठी स्टेट-ट्रेट अँगर एक्स्प्रेशन इन्व्हेंटरी (STAXI-2) ही सर्वात व्यापकपणे वापरली जाणारी राग शोधिका आहे. स्पिलबर्गर यांनी 1999 मध्ये त्याची सुधारित आवृत्ती आणलेली आहे. एकूण 57 विधाने असून रेटिंग चार-पॉइंट स्केलवर आहेत आणि स्थिती आणि वैशिष्ट्य याद्वारे रागचे मापन केले जाते. सदर चाचणी 16 वर्षांपेक्षा अधिक वयोगट असणाऱ्या कोणालाही देता येते.

काही लोक इतरांपेक्षा जास्त का रागावतात?

राग व्यवस्थापनात माहिर असलेले मानसशास्त्रज्ञ जेरी डेफेनबॅकर यांच्या मते, काही लोक खरोखरच इतरांपेक्षा जास्त "गरम" असतात; त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक सहज आणि तीव्रतेने राग येतो. असेही काही लोक आहेत जे त्यांचा राग जाणवेल असा व्यक्त करत नाहीत परंतु किरकिरे आणि चिडखोर असतात. सौम्यपणे रागावलेले लोक नेहमी शिव्याशाप देत नाहीत आणि वस्तूही फेकत नाहीत; कधीकधी ते सामाजिकरित्या माघार घेतात, निराश होतात किंवा शारीरिकदृष्ट्या आजारी पडतात.

काहीही कारण नसताना काही लोक सहज रागवतात, जसे ते रागाच्या काठावर बसलेले आहेत किंवा काही लोकांना केवळ निमित्त हवे असते रागवण्यासाठी. असे लोक गोष्टी किंवा घटनेतील चांगली बाजू न पाहता केवळ नकारात्मक अंगाने विचार करून जे काही चुकीचे घडत आहे ते त्यांच्याच बाबतीत घडत आहे असा समज करून घेऊन नेहमी रागाच्याच पावित्र्यात असतात. तर काही लोक विशेषतः परिस्थिती विशिष्ट प्रमाणात अन्यायकारक वाटल्यास ते रागावतात कारण त्यांना हक्क आणि जबाबदाऱ्या माहित असतात.

रागाचे संभाव्य धोके काय आहेत?

अनेक लोक अतिरागाला केवळ एक मानसिक समस्या मानतात. ते एक ढोबळपणे केलेले विधान आहे. जेव्हा आपण रागावतो तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था (ऑटोमिक नर्वस सिस्टीम) उत्तेजित होते. उदाहरणार्थ, आपल्या छुप्या नात्यासंबंधीचे पितळ उघड पडल्याने उद्भवलेल्या रागामुळे अनुकंपी (सिम्प्यथेटिक) मज्जासंस्था आणि संबंधित हार्मोनल आणि न्यूरोकेमिकल बदल होण्याची शक्यता असते. या शारीरिक प्रतिक्रियांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिसाद, श्वासोच्छ्वास आणि घाम, सक्रिय स्नायूंना रक्त प्रवाह आणि ताकद वाढू शकते. जसजसा राग कायम राहतो, तसतसा त्याचा परिणाम शरीराच्या अनेक प्रणालींवर होतो, जसे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, रोगप्रतिकारक शक्ती, पाचक आणि मध्यवर्ती मज्जासंस्था. यामुळे हायपरटेन्शन आणि स्ट्रोक, हृदयविकार, जठरासंबंधी आजार आणि आतड्यांसंबंधी रोग, तसेच जखम बरे ना होण्याचा धोका वाढतो आणि काही प्रमाणात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की राग हा हृदयविकाराचा एक मुख्य जोखीम घटक आहे. अनेक प्रकारच्या परिस्थितींमध्ये, वारंवार राग अनुभवण्याची प्रवृत्ती असणे, याला राग प्रवण अवस्था म्हणून ओळखले जाते. एका अभ्यासात सलग तीन वर्षे सामान्य रक्तदाब असलेल्या आणि राग प्रवण अवस्था असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका दोन ते तीन पटीने वाढलेला आढळला. आणखी एका अभ्यासात रागावर नियंत्रण कमी असलेल्या व्यक्तींना प्राणघातक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा सर्वाधिक धोका आढळला. अनेक संशोधनाच्या आधारे, तज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की राग प्रवण, दीर्घकालीन शत्रुत्व, रागाची अभिव्यक्ती आणि तीव्र रागाच्या घटनांमुळे वारंवार हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकृती होऊ शकते. जेव्हा राग वारंवार, तीव्र स्वरुपाचा आणि चिरकाल असतो त्यापेक्षा राग माफक प्रमाणात अनुभवला जातो आणि ठामपणे व्यक्त केला जातो तेव्हा तो कमी व्यत्यय आणतो.

सदर लेखाचा उर्वरित भाग आपण पुढील लेखात पाहू या.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

  रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills      एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहू...