शनिवार, २ एप्रिल, २०२२

स्वमग्नता | ऑटिझम | Autism

 

स्वमग्नता | ऑटिझम | Autism

2010 मध्ये आलेल्या 'माय नेम इज खान' सिनेमात वारंवार 'आय अॅम नॉट अ टेररिस्ट' म्हणणारा शाहरुख खान आणि 2012 मध्ये आलेल्या 'बर्फी' या सिनेमातील प्रियांका चोप्राने साकारलेली झिलमिल आपल्या सर्वांनाच आठवत असतील. ऑटिझम हा आजार झालेली ही दोन्ही पात्र आपल्या लक्षात राहिली असतील आणि या पात्रांविषयी सिनेमा बघताना आपल्याला वाईटही वाटले असेल. मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा रुग्णांशी आपला सामना होतो, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बहुतांशवेळा बदललेला असतो.

ऑटिझम म्हणजे स्वमग्नता; स्वत:मध्येच गुंतून असणे असे या स्वमग्न मुलांचे वर्तन असते. हा एक मेंदूशी निगडीत वैकासिक विकार असून त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासात अनेकदा अडथळे निर्माण होतात. या आजारास 2013 पासून DSM-5 मध्ये ऑटीस्टिक डिसऑर्डर, अस्पर्जर सिंड्रोम आणि पेर्व्हेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर यांना एकत्रित ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) या नावाने ओळखले जाते. ऑटिझम आजार असणाऱ्या किंवा स्वत:मध्येच मग्न असणाऱ्या मुलांची वाढती संख्या ही चिंता वाढविणारी बाब आहे. जगभरामध्ये 2020 मध्ये दर 54 मुलांमध्ये एक मूल ह्या विकाराने ग्रस्त आहे, आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एका पाहणीनुसार भारतात दर हजारामागे सरासरी सात मुले या विकाराने ग्रस्त असलेली आढळून आलेली आहेत. याबाबत पालकांनी जागरूक राहून अशा मुलांच्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

ऑटिझम आजाराविषयी आजही आपल्या समाजामध्ये पुरेशी माहिती किंवा जागृती झालेली नाही. यासाठीचं जागतिक आरोग्य संघटनेने ऑटिझमविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, ऑटिझमविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून 2 एप्रिल हा दिवस 'जागतिक ऑटिझम दिवस' म्हणून साजरा केला जातो.

ऑटिझम विकार, मूल जन्मल्यापासून ते तीन वर्षांचे होईपर्यंत उद्भवत असल्याने त्या कालावधीमध्ये मुलांचा मानसिक विकास सामन्यपणे होऊ शकत नाही. मानसिक विकास बाधित झाल्याने ही मुले इतर सामान्य मानसिक विकास झालेल्या मुलांच्या मानाने वेगळी दिसू लागतात. ऑटिस्टिक मुले, त्यांच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळण्यास कचरतात. तसेच कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना इतर मुलांच्या मानाने जास्त वेळ लागतो. ह्या मुलांचा बुद्ध्यांक इतर सामान्य मुलांच्या मानाने भिन्न असतो. काही ऑटीस्टिक मुले विलक्षण बुद्धिवान असतात. त्यांचा बुद्ध्यांक देखील सामान्य मुलांपेक्षा जास्त असतो, पण ह्या मुलांना बोलण्यात आणि इतर सामाजिक व्यवहारामध्ये अडचणी येत असल्याने इतर मुलांसारखी प्रगती, ही मुले करू शकत नाहीत.

अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांच्या म्हणण्यानुसार बाळ एक वर्षाचे होईपर्यंत ऑटिझमचे संकेत मिळायला सुरुवात होते. अधिक स्पष्ट लक्षणे ही दोन किंवा तीन वर्षे वयामध्ये दिसू लागतात. ऑटिझम तीन गोष्टींवर प्रभाव टाकते. सामाजिक कौशल्ये, संप्रेषण कौशल्ये आणि वर्तनविषयक कौशल्ये. ऑटिझमग्रस्त असणाऱ्या तीन वर्षांच्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्यांची कमतरता दिसून येते. साधारणपणे एक ते तीन वर्षे वयातील मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे स्पष्टपणे दिसत असतात. सामान्य आणि ऑटिस्टीक मुले यांच्यातील फरक सुरवातीला जाणवणे कठीणच असते. तरीही काही विशिष्ट अडथळे आणि कमतरता लक्षात आल्यास त्यांची ओळख पटू शकते.

सामाजिक कौशल्ये

ऑटिस्टिक मुलांचा संघर्ष त्यांच्या सामाजिक कौशल्याबाबत सर्वात ठळकपणे दैनंदिन जीवनात दिसणारी ही गोष्ट आहे. वय वर्षे एक ते तीन दरम्यानच्या मुलामध्ये खालील सामाजिक कौशल्यामध्ये अडथळे येऊ शकतात:

  • स्वतःचे नाव पुकारल्यावरही प्रतिसाद देता येत नाही.
  • अशी मुले दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यास घाबरतात.
  • चेहऱ्यावरील निर्विकार भाव असतात.
  • शारीरिक संपर्क टाळतात किंवा विरोध करतात.
  • त्यांच्या सभोवतालच्या जगामध्ये रस नसतो.
  • शब्द आणि कृती अनुकरण करण्यात अयशस्वी.
  • भातुकलीचा खेळ किंवा मेकॉंनीचा खेळ खेळू शकत नाहीत.
  • अशी मुले एकटी राहण्यास प्राधान्य देतात, इतर लहान मुलांमध्ये मिसळून न खेळणे.

संप्रेषण कौशल्ये

ऑटिझम असलेल्या प्रत्येक व्यक्तीची संप्रेषण कौशल्ये भिन्न असतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही मुले व्यवस्थित बोलू शकतात, तर काही अजिबात बोलू शकत नाहीत. ऑटिझम असलेल्या मुलांसाठी 18-महिन्यांचे होईपर्यंत काही शब्द आत्मसात करतील आणि नंतर ते विसरणे हे सामान्य आहे. ऑटिझम असलेल्या लहान मुलामध्ये संप्रेषण कौशल्यामध्ये खालील अडथळे येऊ शकतात:

  • शब्द किंवा वाक्यांशांची सतत पुनरावृत्ती यास इकोलालिया असे म्हणतात.
  • कोणत्याही गोष्टीकडे निर्देश न करणे किंवा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे निर्देश करतो तेव्हा प्रतिसाद न देणे
  • अशी मुले हाक मारल्यास त्या हाकेला प्रतिसाद न देणे.
  • विचारलेली प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, आपले बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे.
  • एकाच गोष्टीसाठी किंवा कृतीसाठी वारंवार सूचना द्याव्या लागणे.
  • भाषिक आणि अभाषिक संवादात अडथळे असणे.
  • टाळ्या वाजवून किंवा हातवारे करून स्वागत अथवा निरोप देता येत नाही.

वर्तनविषयक कौशल्ये

ऑटिझम असणा-या मुलांची आवड आणि वर्तन समवयस्क मुलांच्या तुलनेत असामान्य असते. ऑटिझम असलेल्या लहान मुलामध्ये वर्तनविषयक कौशल्यामध्ये खालील अडथळे येऊ शकतात:

  • प्रत्येक वेळी नेमक्या त्याच पद्धतीने त्यांच्या खेळण्यांशी खेळणे
  • खेळण्यातील गोलाकार सारख्या विशिष्ट भागाबरोबर खेळण्यास प्राधान्य
  • त्यांच्या दिनचर्येत किरकोळ बदल केल्यास अस्वस्थ होतात
  • हात फडफडणे, शरीराचा विशिष्ट भाग हलवणे किंवा वर्तुळात फिरणे
  • सामान्य मुलांच्या तुलनेने ह्या मुलांचा शारीरिक व मानसिक विकास खूप मंद असतो
  • एकाच प्रकारचे कपडे घालणे, एकाच प्रकारचे खाणे अशी कृती करतात.
  • इतर कोणताही बदल झाला की ती प्रचंड चिडतात आणि अत्यंत आक्रमक असू शकतात.
  • एखादी वस्तू विशिष्ठ पध्दतीनेच लावणे हे त्यांच्यात रूजलेले असते.
  • मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त आहे. मुलांमध्ये 75 टक्के तर मुलींमध्ये 25 टक्के प्रमाण या आजाराचे असते .

जर लहान मुलांच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष दिले, तर जन्मापासून सहा महिने ते वर्षभराच्या आतच मुलाचा विकास सामान्य गतीने होतो आहे किंवा नाही हे समजू शकते. सर्वसाधारणपणे मूल वर्षाचे झाल्यानंतरही हसत नसेल, आईच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नसेल, तर मुलाचा विकास सामान्य नसण्याची शक्यता असते. पण बहुतेक केसेस मध्ये मूल तीन - चार वर्षांचे होईपर्यंत त्याचा विकास सामान्य नाही, हे लक्षात येत नाही. पण जर विकासाची गती सामान्य नाही हे लवकर लक्षात आले, तर त्वरित मनोवैज्ञानिकांशी संपर्क करणे अगत्याचे असते.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार)   

ऑटिझमची कारणे

ऑटीझम नेमका कोणत्या कारणामुळे उद्भवतो ह्याचे पक्के निदान अजूनही झालेले नाही, तरी असे म्हटले जाते की पर्यावरणीय आणि जेनेटिक कारणांच्या एकत्रित प्रभावामुळे हा आजार उद्भवतो. तसेच जेनेटिक म्युटेशन हे त्यामागील एक कारण असल्याचे अलिकडे स्पष्ट झाले आहे. पण हे जेनेटिक बदल कशामुळे होतात हे मात्र निश्चितपणे सांगितले जाऊ शकत नाही. पर्यावरणातील अपायकारक बदलांमुळे देखील ऑटीझम उद्भवू शकते असे वैज्ञानिक म्हणतात. ऑटीझम हा मुलाच्या जन्मानंतर त्वरित होऊ शकणारा आजार आहे.

  • हा आजार होण्यासाठी विशेषतः आनुवांशिकता आणि जेनेटिक फॅक्टर हे प्रमुख कारण असते.
  • 26 आठवडे होण्यापूर्वीचं बाळंतपण झाल्यास किंवा कमी वजनाचे बाळ
  • गरोदर स्त्रिचे वय अधिक असल्यास किंवा गर्भावस्थेत निर्माण झालेली गुंतागुंत 
  • मेंदूतील संसर्ग किंवा व्हॅलप्रोइक ऍसिड व थालीडोमाइड अशी औषधे प्रेग्नन्सीत घेणे अशी अनेक करणे बाळाला ऑटिझम होण्यासाठी जबाबदार ठरू शकतात.
  • गर्भावस्थेमध्ये असताना मातेला काही आजार किंवा गर्भवती महिला सतत मानसिक तणावाखाली असणे.
  • गर्भवती महिलेचे थायरॉइड ग्रंथीचे काम सुरळीत नसल्यामुळे पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या नर्व्हस सिस्टमवर नकारात्मक परिणाम होऊन ऑटीझम उद्भवू शकते.
  • क्वचित प्रसंगी गर्भातील बाळाला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने देखील ऑटीझमचा धोका उद्भवू शकतो.

ऑटिझमवरील उपचार

ऑटीझम हा औषध उपचारांनी पुर्णपणे बरा करता येत नाही. उपचाराच्या मदतीने ऑटिझमबरोबर मुलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठीचे उपयुक्त उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे जर वर दिलेली लक्षणे मुलामध्ये दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासाठी ऑटिझमवर उपचारामध्ये स्क्रीनिंग साधने, वर्तनविषयक थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, प्ले थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच आणि लँग्वेज थेरपी आणि औषधे यांचा वापर करून या मुलांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते.

पालकांची जबाबदारी  

ऑटिझमग्रस्त मुलांना आनंद वाटेल असे व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या मनाविरुद्ध व्यायाम करून घेऊ नयेत. पालकांनी आपल्याबरोबर त्यांना मोकळ्या हवेत सकाळी व संध्याकाळी फिरायला घेऊन जावे. मैदानात त्यांच्याबरोबर मोठया चेंडूने खेळावे. खेळ, व्यायाम आणि उपचारासोबत अशा मुलांना कुटूंबातील सदस्यांचे प्रेम व आधाराची अत्यंत गरज असते. पालकांनी त्यांना समजून घेणे खूप गरजेचे असते कारण अशी मुले जाणीवपूर्वक असामान्य वर्तन करत नसून ऑटिझममुळे होत असते. अशा मुलांचे सामाजिकीकरण देखील झालेले नसते कारण त्यांचा मेंदू त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सक्षम नसतो. त्यामुळे अशा मुलांना कुटूंबातील सदस्यांनी समजून घेऊन त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करावी जेणेकरून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

शाळा आणि समाजाची जबाबदारी

अशा मुलांसाठी विशेष शाळा उपलब्ध आहेत पण ऑटिझम असलेली 71% मुले मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की मुख्य प्रवाहातील शाळामध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक किंवा ऑटिस्टिक मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक पाठिंबा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे सर्व शाळा आणि शिक्षकांमध्ये ऑटिझमविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे आहे. समाजानेही थोडे परिपक्व झाले पाहिजे कारण ऑटिझम असलेले मुल सांभाळणे कोणत्याही पालकांसाठी एक खूप मोठे आव्हान असते. आपला समाज आजही ऑटिस्टीक मुले, मतिमंद, गतिमंद किंवा दिव्यांगजण यांच्याकडे कुत्सित नजरेने पाहतो. त्यांच्या व्यंगावर विनोद करण्यातचं ते धन्य मानत असतात. समाज म्हणून आपणही अशा मुलांच्या पालकांना भावनिक आधार व प्रोत्साहन दिले पाहिजे. ऑटिझम असलेल्या मुलांसाठी विशेष शाळा Chetana Apangmati Sanstha Kolhapur, Swayam School for Special Children Kolhapur, Sarth Foundation and DAWN Autism School, Centre for Children with Multiple Disabilities Pune, Prasanna Autism Centre Pune, Sopan Autism Centre Navi Mumbai, Ashiana Institute for Autism, Mumbai

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार)

संदर्भ

American Psychiatric Association (2013). Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (5th edition). Arlington, VA: American Psychiatric Publishing.  

Carpenter, Laura (2013). DSM-5 Autism Spectrum Disorder, US: Medical University of South Carolina

National Institute of Mental health (2018). Autism Spectrum Disorder, Bethesda: National Institute of Mental health

Om Sai Prakash (2014). Autism Spectrum Disorder: A Challenging disability, Secunderbad: National Institute for Mental Handicapped

Vanderbilt Evidence-based Practice Centre (2014). Therapies for Children with Autism Spectrum Disorder: Behavioural Interventions Update, Comparative Effectiveness Review, Vol. No.137

Vinood B. Patel, Victor R. Preedy, Colin R. Martin (2013). Comprehensive Guide to Autism, New York: Springer

WHO (2013) Autism spectrum disorders & other developmental disorders, Geneva: World Health Organization

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...