गुरुवार, २८ जुलै, २०२२

हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (HPD) | नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार

 

हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (HPD) | नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार

आपल्या सर्वांची कदाचित अशी एखादी मैत्रीण असेल जिच्याशी आपण संभाषण करत असताना आपल्याला तिचा फोन दूर ठेवावा लागत असेल (असा एखादा मित्रही असू शकतो). त्यांना 'लाइक्स' आणि सेल्फीचे वेड लागलेले असते, ते सतत त्यांच्या इन्स्टाग्राम/फेसबुक आणि व्हाटसॲपच्या फोटोला किंवा व्हिडीओला तुमची मंजुरी मागतात. पण त्यामागे आणखी काही गंभीर कारण असू शकते का? हो हे शक्य आहे. सोशल मीडियाने आम्हाला वेळोवेळी थोडा मादकपणात गुंतण्याची मोकळीक दिलेली आहे, आणि अनेक लोकांसाठी ती निरुपद्रवी मजा असू शकते, परंतु स्वत:बद्दलचा हा सततचा ध्यास व्यक्तिमत्व विकाराची लक्षणे सक्रिय करू शकतो.

प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व असते. एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन हे त्यांना एकमेकांपासून वेगळे बनवते. व्यक्तिमत्त्वाचे प्रकार आणि वैशिष्ट्यांबद्दल अनेक भिन्न समजुती आणि सिद्धांत आहेत. त्यामुळे, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. व्यक्तिमत्व विकासाचे कारण समजून घेणे संकीर्ण स्वरूपाचे आहे.  तथापि, आपणास बालपणात ज्या परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि व्यक्तीचा अनुवंश  (वंशपरंपरा किंवा आनुवंशिक गुणधर्म) यामध्ये मोठी भूमिका बजावतात. प्रत्येक व्यक्तिमत्व विकाराची स्वतःची विशिष्ट लक्षणे असतात.  हा मानसिक त्रास काहीं लोकांना खूप अधिक तर काहींना फारच कमी असतो आणि अनेक वेळा पीडित व्यक्तीलाही समजत नाही की त्यांना काही त्रास आहे.  त्यांना असे वाटते की त्यांचे विचार सर्वसामान्य आहेत आणि ते त्यांच्या त्रासासाठी इतरांना दोष देऊ लागतात. या आजाराच्या लक्षणांमध्ये एकटेपणाची भावना, कंटाळवाणेपणा आणि इतरांबद्दल सहानुभूती यांचा समावेश होतो. सामान्यत: या समस्या आढळून येईपर्यंत पीडित व्यक्तीचे वय 20 ते 30 वर्षे होते.

हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (HPD) ही एक मानसिक स्थिती आहे जी अत्यंत भावनिकता आणि लक्ष वेधून घेण्याच्या वर्तनाद्वारे प्रकट केली जाते याची लक्षणे प्रौढावस्थेच्या सुरुवातीस दिसू लागतात आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये स्पष्ट होतात. नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार (HPD) हा DSM-5 (मानसशास्त्रीय संघटनेकडून प्रकाशित मानसिक विकारांच्या लक्षणांची माहिती पुस्तिका) मध्ये सांगितलेल्या 10 व्यक्तिमत्व विकारांपैकी एक आहे. याचे क्लस्टर बी विकारांपैकी एक म्हणून वर्गीकरण केलेले आहे, जे नाट्यमय, अती भावनिक आणि अनियमित म्हणून दर्शविलेले आहे. हिस्ट्रिओनिक या शब्दाचा अर्थ "नाटकीय किंवा ढोंगीपणा" असा होतो.

नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार लोकसंख्येच्या अंदाजे 2-3 टक्के लोकांना प्रभावित करते. नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार असलेले लोक सहसा सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी उच्च-कार्यक्षम पदावर कार्यरत असतात. त्यांच्याकडे सामान्यत: चांगली सामाजिक कौशल्ये देखील असतात पण त्यांचा वापर ते इतरांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी  तसेच समोरच्या व्यक्तीला हाताळण्यासाठी (manipulation) करतात.

नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार ही एक अस्थिर भावना, विकृत स्व-प्रतिमा आणि इतर लोकांच्या लक्ष वेधून घेण्याची जबरदस्त इच्छा यांनी अधोरेखित केलेली अशी मानसिक स्थिती आहे. नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार असलेले लोक इतरांचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा नाटकीय आव आणुन मोठ्या आवाजात बोलतात (आवश्यकता नसतांनाही, लक्ष वेधने हा त्यांचा उद्देश असतो) व असामाजिक पद्धतीने वागतात. नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार असलेल्या लोकांसाठी, त्यांचा आत्मसन्मान इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असतो आणि तो स्वत:च्या मूल्यांच्या खर्‍या भावनेतून येत नाही. त्यांच्यामध्ये लक्ष वेधून घेण्याची जबरदस्त इच्छा असते आणि लक्ष वेधण्यासाठी ते अनेकदा नाटकीय किंवा असामाजिक पद्धतीने वागतात.

या व्यक्तींना सतत सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन राहण्याची गरज असते. जिथे त्यांच्याशिवाय इतर कोणाला जास्त अटेंशन किंवा लाइक्स मिळत असेल तेव्हा ते अस्वस्थ होतात. सोशल मीडिया लोकांना त्यांच्या शारिरीक स्वरूप, ड्रेस आणि नकला याद्वारे सतत त्यांचे लक्ष वेधून घेण्यास अनुमती देऊ शकते. ज्यामुळे त्यांना त्यांच्या अनुयायांकडून (followers) मानसशास्त्रीय प्रबलन (psychological reward) मिळवून देणारी चित्रे अपलोड करण्याची संधी मिळते असे डॉ. कॅरोलिन कामाऊ लिहितात.

नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार असलेल्या लोकांचे सोशल मिडियावरील वर्तन

हे दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी लाईक्स मिळवण्यासाठी आपले प्रोफाईल पिक्चर बदलतात. लहान सहान कृतीना खुप मोठी अचिव्हमेंटस् असल्याचे भासवून लाइक्स मिळवतात. ज्या दिवशी मानसिक अस्वस्थता असते त्या दिवशी सतत काही ना काही पोस्ट करत असतात. जवळच्या व्यक्तीशी झालेले वादविवाद सोशल मिडियाच्या चव्हाट्यावर मांडून लोकांकडून सांत्वन मिळवतात आणि लक्ष वेधून घेतात. लोकांचे दुर्लक्ष होतंय असं वाटल्यास दुःखी किंवा भावनिक पोस्ट टाकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. इतरांद्वारे, विशेषत: ते ज्यांची प्रशंसा करतात त्यांच्याद्वारे सहजपणे प्रभावित होऊ शकतात आणि फसवले जाऊ शकतात. नातेसंबंध टिकवून ठेवण्यात अडचण येते, अनेकदा त्यांच्या संवादात खोटेपणा किंवा उथळपणा दिसून येतो. अशा व्यक्तीमध्ये वेगाने बदलणाऱ्या आणि उथळ भावना असतात.

DSM-5 नुसार नाटकीय व्यक्तिमत्त्व विकाराची लक्षणे

काही प्रकरणांमध्ये, व्यक्तीला हे लक्षात येत नाही की त्यांना नाटकीय व्यक्तिमत्त्व विकार आहे कारण त्यांची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत त्यांना नैसर्गिक वाटते आणि त्यांना येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांसाठी ते इतरांना दोष देतात. DSM-5 नुसार नाटकीय व्यक्तिमत्त्व विकाराची काही लक्षणे पुढीलप्रमाणे:

  • अशक्तपणा किंवा आजारपणाची अतिशयोक्तीपूर्ण लक्षणे दर्शविणे आणि इतरांना हाताळण्यासाठी आत्महत्येच्या धमक्या देणे.
  • टोकाची परंतु उथळ भावना आणि लक्ष वेधून घेणारे वर्तन प्रदर्शित करतात (म्हणजे लक्ष वेधण्यासाठी ते सतत काही ना काही  करत असतात).
  • मूड, मते आणि विश्वास क्षणभंगुर असतात; ते एखाद्या प्रसंगास किंवा घटनेला अतिशय तीव्रपणे आणि जलद प्रतिसाद देतात.
  • इतरांचे त्यांच्या भावनिक अभिव्यक्तीकडे लक्ष असणे आवश्यक असते अन्यथा ते तमाशा करतात.
  • इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी लैंगिक उत्तेजक वर्तन देखील करू शकतात.


DSM-5 नुसार नाटकीय व्यक्तिमत्त्व विकाराचे निदान

नाटकीय व्यक्तिमत्त्व विकारामध्ये इतर मानसिक विकार आणि वैद्यकीय आजारांसारखीच लक्षणे असू शकतात, आपले मिली डॉक्टर कदाचित इतर विकार किंवा वैद्यकीय स्थिती ज्या लक्षणांना कारणीभूत असतील अशा विकाराचे निदान करतील. DSM-5 नुसार, एखाद्या व्यक्तीला HPD चे निदान करण्यासाठी खालीलपैकी पाच किंवा अधिक चिन्हे किंवा लक्षणे असणे आवश्यक आहे:

  • लक्ष केंद्रीत नसलेल्या परिस्थितीत अस्वस्थता
  • अयोग्य लैंगिक प्रदर्शन किंवा प्रक्षोभक वर्तनाद्वारे इतरांशी संवाद
  • वेगवान हालचाल आणि उथळपणाने भावनिक अभिव्यक्ती
  • स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी सतत अंगविक्षेप वर्तन करणे
  • संभाषणाची शैली अत्यंत प्रभावशाली पण तपशीलांची कमतरता असते
  • नाटकीकरण, ढोंगीपणा आणि भावनांची अतिशयोक्तीपूर्ण अभिव्यक्ती दर्शविणे
  • इतरांद्वारे किंवा परिस्थितीमुळे सहजपणे प्रभावित होते
  • सर्वच नातेसंबंधांना ते वास्तविकतेपेक्षा अधिक घनिष्ट मानतात

नाटकीय व्यक्तिमत्व विकार कशामुळे घडते याची स्पष्ट कारणे माहित नसली तरी, हा एक मानसिक विकार आहे जो त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासातील दोष आहे. नाटकीय व्यक्तिमत्व विकार बहुधा शिकलेल्या आणि वारशाने मिळालेल्या दोन्ही घटकांचे एकत्रीकरण म्हणून विकसित होऊ शकतो त्यांवर नेमकं निदान स्पष्टपणे मांडण्यात आलेलं नाही. एक गृहितक असा आहे की नाटकीय व्यक्तिमत्व विकार बालपणात अनुभवलेल्या आघातांमुळे विकसित होऊ शकतो. मुले त्यांच्या परिस्थितीची तक्रार न करता सहन करून त्यांचा आघात व्यक्त न करता दाबून ठेवतात ज्यामुळे शेवटी हा व्यक्तिमत्व विकार होऊ शकतो.

नाटकीय व्यक्तिमत्व विकारातून बाहेर कसे पडावे

बऱ्याच लोकांना एकापेक्षा जास्त व्यक्तिमत्व विकार होण्याची शक्यता असते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना नाटकीय व्यक्तिमत्व विकाराचे निदान होण्याची शक्यता चार पट जास्त असते. तथापि, संशोधन असे सूचित करते की स्त्रियांना लैंगिक-उद्दामपणा सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य असल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना या विकाराचे निदान जास्त होऊ शकते. या विकारातून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रथम अशा व्यक्तींनी आपणास असा काही विकार आहे हे स्वीकारणे गरजेचे असते. त्यानंतर नाटकीय व्यक्तिमत्व विकारामध्ये महत्त्वाचा उपचार म्हणजे मानसोपचार.

नाटकीय व्यक्तिमत्व विकार असलेल्या रूग्णांसाठी सपोर्टिव्ह मानसोपचाराची शिफारस केलेली उपचार पद्धती आहे, कारण हा दृष्टीकोन उत्साहवर्धक, धोका नसलेला आणि आश्वासक असल्याचे आढळून आलेले आहे. सपोर्टिव्ह मानसोपचाराचे उद्दिष्ट भावनिक त्रास कमी करणे, आत्मसन्मान सुधारणे आणि रुग्णास त्याला होणाऱ्या त्रासाचा सामना करण्याची कौशल्ये विकसित करणे हे असते. एकंदर आरोग्याला आधार देणारे जीवनशैलीतील बदल अपेक्षित आहे. सातत्यपूर्ण आणि संतुलित आहार घेणे आणि झोपेचे वेळापत्रक तयार करणे, नियमितपणे व्यायाम करणे, उंचीनुसार वजन राखणे, ड्रग्ज आणि अल्कोहोल टाळणे, आपल्या विकारावर लक्ष ठेवण्यासाठी विश्वासू मित्र आणि कुटुंबीयांकडून मदत घेणे यासारख्या स्व-काळजी असलेल्या मूलभूत गोष्टींचा समावेश या विकारातून बाहेर पडण्यास उपयुक्त ठरू शकतो.    

         (सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार)

संदर्भ

American Psychiatric Association (2013). Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders 5 (DSM-5). Arlington, VA: American Psychiatric Association

Geoffrey, C. (2015). Histrionic Personality Disorder: The Ultimate Guide to Symptoms, Treatment and Prevention, Personality Disorder Series, CreateSpace Independent Publishing Platform

Kamau, C. (2020, July 1). Social Media and Histrionic Personality Disorder. Psychology Today. Retrieved July 20, 2022, from https://www.psychologytoday.com/za/blog/the-science-mental-health/202007/social-media-and-histrionic-personality-disorder

 


२ टिप्पण्या:

Thank you for your comments and suggestions

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

  आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness जीवनात आनंदी राहायचे असेल तर खूप सोपे आहे, पण आनंदी आहे हे दाखवायचे असेल तर ते महाग आहे. कारण...