सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

जीवन-कल्याणाचे मूलभूत घटक | Wellbeing: The Five Essential Elements

 

जीवन-कल्याणाचे मूलभूत घटक | Wellbeing: The Five Essential Elements

रजनीश ओशो यांनी कोलकात्याच्या एका श्रीमंत माणसाच्या अलिशान घराची सांगितलेली गोष्ट माणसाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. या गोष्टीत ओशो सांगतात की सुरुवातीला त्या श्रीमंत माणसाला त्याचं मोठं, आलिशान घर बघून खूप आनंद होत होता. त्याला स्वत:च्या संपत्तीचा आणि यशाचा अभिमान होता. ते येणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंदाने आपले घर, वस्तू, आणि सजावटीचे साहित्य दाखवून आनंदी होत होते. पण एके दिवशी, त्याच्या घरासमोर आणखी एक भल मोठं, त्याच्या पेक्षा जास्त आलिशान घर बांधलं गेलं. त्यानंतर मात्र त्याचं समाधान आणि आनंद गायब झालं, आणि तो निराश आणि असमाधानी राहू लागला.

ओशो या गोष्टीतून सांगू इच्छितात की माणसाचं समाधान आणि सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून असलं तर ते तात्पुरतं असतं. जेव्हा आपण स्वत:ची इतरांशी तुलना करतो, तेव्हा आपण कधीच पूर्ण समाधानी राहू शकत नाही. ही गोष्ट माणसाच्या अंतर्गत शांततेच्या शोधाचा आणि बाह्य जगातील तुलना आणि स्पर्धेच्या असमाधानाचे प्रतीक आहे.

आपण जीवन-कल्याण याविषयी आणखी एक गोष्ट जाणून घेणार आहोत. एका गावात एक ज्ञानी संत राहत होते. त्या संतांनी एकदा सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना एक बोधकथा सांगितली.

संत म्हणाले, "एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने एक सुंदर महाल बांधला. महालाचा पाया म्हणून पाच मजबूत खांब होते. व्यापाऱ्याने खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक या खांबांची उभारणी केली होती. त्या महालात तो व्यापारी खूप आनंदाने राहत होता. एके दिवशी, त्याने पाहिले की एक खांब थोडा झुकला आहे. त्याला वाटले, 'एका खांबामुळे काही फरक पडत नाही.' पण काही दिवसांनी दुसरा खांबही ढासळू लागला. आता व्यापारी चिंतेत पडला. काही दिवसांनी इतर खांबही कमजोर होत गेले, आणि शेवटी महाल कोसळून पडला."

शिष्यांनी प्रश्न विचारला, "संत महाराज, महालाच्या कोसळण्याचा आणि आमच्या जीवनाचा काय संबंध आहे?"

त्या संताने उत्तर दिले, "ते महाल म्हणजे आपले जीवन आहे, आणि पाच खांब म्हणजे आपल्या जीवनाचे पाच महत्त्वाचे पैलू: करिअर, सामाजिक संबंध, आर्थिक स्थैर्य, शारीरिक आरोग्य, आणि समुदायातील योगदान. जर तुम्ही या खांबांपैकी एखाद्याची काळजी घेतली नाही, तर हळूहळू ते कमजोर होऊ लागतील, आणि शेवटी तुमचे जीवन असंतुलित होईल."

संतांनी पुढे सांगितले, "करिअरमध्ये यश मिळवणे आवश्यक आहे, पण त्याबरोबरच सामाजिक संबंध आणि आर्थिक स्थैर्यही महत्त्वाचे आहेत. तुमचे शारीरिक आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करा, आणि तुमच्या समुदायाशी नाते ठेवा. जर तुम्ही या सर्व पैलूंची योग्य ती काळजी घेतली, तर तुमचे जीवन महालासारखे मजबूत राहील."

जीवनाचे पाच खांब म्हणजे करिअर, सामाजिक संबंध, आर्थिक स्थैर्य, शारीरिक आरोग्य, आणि समुदायाशी असलेले नाते हेच आपल्या जीवनाच्या आधारस्तंभासारखे आहेत. या सर्वांचा समतोल राखल्यासच जीवन-कल्याण साध्य होईल. यासंबंधी टॉम रथ आणि जिम हार्टर यांनी “Wellbeing: The Five Essential Elements” नावाचे बेस्ट सेलर पुस्तक लिहिले त्याविषयी जाणून घेऊ या.

जीवन-कल्याणाचे मुलभूत पाच घटक:

     आपल्या जीवन-कल्याणात सुधारणा घडवून आणेल असे आपल्याला वाटणारे बरेचसे विचार चुकीचे किंवा दिशाभूल करणारे असतात. 20व्या शतकाच्या मध्यापासून Gallup (ही एक अमेरिका स्थित बहुराष्ट्रीय विश्लेषण आणि सल्लागार कंपनी आहे, जॉर्ज गॅलप यांनी 1935 मध्ये स्थापन केलेली ही कंपनी जगभरात केल्या जाणाऱ्या जनमत सर्वेक्षणांसाठी प्रसिद्ध आहे.) वैज्ञानिक समृद्ध जीवनाचे आवश्यक घटक शोधत आहेत. अलीकडेच, आघाडीच्या अर्थतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि इतर प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या सहकार्याने Gallup, Inc. यांनी 150 हून अधिक देशांमध्ये जीवन-कल्याणाच्या सामान्य घटकांचा अभ्यास सुरू केला. यामुळे जगाच्या 98% लोकसंख्येच्या जीवन-कल्याणामध्ये एक समान दृष्टिकोन मिळाला. सदर संशोधनादरम्यान, जीवन-कल्याणाचे पाच वेगळे घटक किंवा सांख्यिकी घटक उदयास आले.

बर्‍याच लोकांना असे वाटते की जीवन-कल्याण हे केवळ आनंदी असण्याबद्दलच नाही तर त्याच्या विपरीत, ते फक्त श्रीमंत किंवा यशस्वी होण्याबद्दलही नाही तर ते केवळ शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीपुरते मर्यादित निश्चितच नाही. खरं तर, यापैकी कोणत्याही एका घटकावर लक्ष केंद्रित केल्यास आपण निराशा किंवा अपयशाच्या भावनांमध्ये अडकू शकतो.

विचार करा की किती लोक आपले वैयक्तिक संबंध दुर्लक्षित करून आपल्या नोकरीसाठी प्रमाणापेक्षा अधिक वेळ आणि ऊर्जा समर्पित करतात. जीवन-कल्याण हे आपल्याला दररोज काय आवडते, आपल्या नातेसंबंधांची गुणवत्ता, आपली आर्थिक सुरक्षा, आपल्या शारीरिक आरोग्यातील तरतरीतपणा आणि आपल्या समाजासाठी केलेल्या योगदानाचा अभिमान यांच्या एकत्रित संयोजनाबद्दल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या पाच घटकांचा कसा परस्पर संबंध आहे याबद्दल आहे.

66% लोक किमान एका क्षेत्रात चांगले काम करत आहेत, तर केवळ 7% लोक पाचही क्षेत्रात उत्कृष्ठ काम करत आहेत. जर आपण यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात संघर्ष करत असू, जसे बहुतेक लोक आहेत, तर ते आपले जीवन-कल्याणाची गुणवत्ता कमी करत आहेत आणि आपले दैनंदिन जीवन अधिक तणावपूर्ण बनवत आहेत. जर आपण या कोणत्याही क्षेत्रात आपले जीवन-कल्याण वाढवले, तर आपले दिवस, महिने आणि दशके चांगली जातील. परंतु जोपर्यंत आपण पाचही क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे जगत नाही तोपर्यंत आपले जीवन जास्तीत जास्त आनंददायी होणार नाही.

हे पाचही घटक जीवनातील महत्वाच्या गोष्टींचे वाहक आहेत. ते जीवनातील प्रत्येक तपशील समाविष्ट करत नाहीत, परंतु ते बहुतेक लोकांसाठी अत्यावश्यक असलेल्या पाच मोठ्या श्रेणींचे प्रतिनिधित्व करतात.

  1. पहिला घटक म्हणजे आपण आपला वेळ कसा घालवतो किंवा दररोज जे काही करत असतो त्यात आनंद मिळतो का? - करिअरविषयक जीवन-कल्याण.
  2. दुसरा घटक म्हणजे आपल्या आयुष्यातील मजबूत नातेसंबंध आणि प्रेम - सामाजिक जीवन-कल्याण.
  3. तिसरा घटक म्हणजे आपल्या आर्थिक जीवनाचे प्रभावी व्यवस्थापन - आर्थिक जीबन-कल्याण.
  4. चौथा घटक म्हणजे आपले चांगले आरोग्य आणि दररोजची कामे करण्यासाठी पुरेशी ऊर्जा असणे - शारीरिक जीवन-कल्याण.
  5. पाचवा घटक म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसराशी आपले संलग्नतेचे भावनिक नाते - समुदाय जीवन-कल्याण.

करिअर विषयक जीवन-कल्याण

    तुम्ही दररोज जे काही करता, ते तुम्हाला आवडतं का? हे कदाचित सर्वात मूलभूत, तसेच जीवन-कल्याणविषयी महत्त्वाचा प्रश्न असू शकतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारू शकतो. तरीसुद्धा, गॅलपने अभ्यास केलेल्या फक्त 20% लोकच याला ठाम "होय" म्हणून उत्तर देऊ शकले.

करिअरविषयक जीवन-कल्याण हे वरील पाच घटकांपैकी कदाचित सर्वात आवश्यक आहे. एका मूलभूत पातळीवर, प्रत्येकाला दररोज काहीतरी करण्याची, आणि आदर्शवत काहीतरी उत्सुकतेने वाट पाहण्यासारखं असण्याची गरज असते. आपण दररोज कशात आपला वेळ घालवता हे आपली ओळख घडवते, मग तुम्ही विद्यार्थी असाल, पालक, स्वयंसेवक, निवृत्त व्यक्ती किंवा पारंपरिक नोकरीत असाल. गॅलपच्या संशोधनानुसार, जर तुम्हाला नियमितपणे काहीतरी आवडतं ते करण्याची संधी मिळाली नाही, तर इतर क्षेत्रांमध्ये तुमचं जीवन-कल्याण उच्च असण्याची शक्यता लवकरच कमी होते.

शाळेत असताना, तुम्हाला फारसे रुचिकर नसलेला वर्ग आठवतोय का? कदाचित तुमचे डोळे घड्याळावर खिळलेले असतील किंवा तुम्ही फक्त शून्यात नजर लावून बसला असाल. तुम्हाला कदाचित घंटा वाजण्याची उत्सुकतेने वाट पाहण्याचा अनुभव लक्षात येईल, जेणेकरून तुम्ही तुमच्या जागेवरून उठून पुढच्या तासा साठी जाऊ शकाल. जगभरातील दोन-तृतीयांश कामगार दिवसाच्या शेवटी अशाच प्रकारची भावना अनुभवत असतात.

आपल्यातील बरेच जण पारंपरिक संस्थात्मक वातावरणात काम करतात, तर काही जण घरी, वर्गात, कारखान्यात किंवा बाहेर काम करतात. काहीजण निवृत्त आहेत किंवा स्वयंसेवक म्हणून काम करतात. आपण कुठेही आपला वेळ घालवला तरी, मूलभूत पातळीवर आपल्याला काहीतरी करायचं असतं — आणि आदर्शवत काहीतरी उत्सुकतेने वाट पाहण्यासारखं असतं. करिअर जीवन-कल्याण म्हणजे दररोज जे काही तुम्ही करता ते तुम्हाला आवडणं.

ज्यांचे करिअरविषयक जीवन-कल्याण उच्च आहे, ते दररोज सकाळी उठतात आणि त्या दिवशी काहीतरी नवीन करण्याची वाट पाहत असतात. त्यांना त्यांची ताकद आणि आवडी जुळवून आणणाऱ्या गोष्टी करण्याची संधी मिळते. त्यांना जीवनात खोलवर उद्देश असतो आणि त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची योजना असते. बहुतेकवेळा, त्यांच्याकडे त्यांना प्रेरणा देणारा नेता असतो जो त्यांना भविष्याबद्दल उत्साही बनवतो आणि त्यांच्या आवडीचे मित्र असतात.

      तुम्हाला वाटेल की ज्या लोकांचे करिअर जीवन-कल्याण उच्च आहे ते त्यांच्या नातेसंबंधाच्या खर्चावर जास्त काम करत असतील, परंतु Gallup च्या निष्कर्षांनुसार, असे लोक प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्याचा अधिक आनंद घेतात आणि गोष्टी गृहित धरत नाहीत. याचा परिणाम म्हणून, त्यांना दररोजचे त्यांचे काम आवडते.

करिअरविषयक जीवन-कल्याण वाढवण्यासाठी शिफारसी:

  • दररोज, तुमच्या ताकदीनुसार काम करा.
  • तुमच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या एकसमान ध्येय असलेल्या व्यक्तींचा शोध घ्या आणि त्या व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवा.
  • कामावर तुमच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये जे तुम्हाला आवडतात, त्यांच्यासोबत सामाजिकदृष्ट्‍या अधिक वेळ घालवा.

सामाजिक जीवन-कल्याण

"नातेसंबंध आपल्याला आपली ओळख निर्माण करण्यात आणि आपण काय होऊ शकतो हे ठरविण्यात मदत करतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या यशस्वीतेचा मागोवा घेतल्यास त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका नातेसंबंधाची आढळते." - डोनाल्ड क्लिफ्टन आणि पॉला नेल्सन

आपल्या आयुष्याची जडणघडण व्यक्तीपरत्वे भिन्न असते. जसे-जसे आपले नातेसंबंध वाढतात आणि विकसित होतात, तसेच आपल्या जीवन-कल्याणात देखील वाढ होते. आपले जीवन अधिक समृद्ध होते, आणि आपण इतरांद्वारे शिकतो, वाढतो आणि विकसित होतो.

जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय घटनांवर, अनुभवांवर आणि क्षणांवर विचार करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये एक गोष्ट सामाईक आहे - दुसऱ्या व्यक्तीची उपस्थिती. आपले सर्वोत्कृष्ट क्षण - आणि सर्वात वेदनादायक देखील - दोन व्यक्तींच्या आंतरक्रियेतून घडतात.

आपल्या निकटच्या नातेसंबंधांचा आणि सामाजिक कनेक्सनचा आपल्या जीवन-कल्याणावर होणारा परिणाम आपण बहुधा कमी लेखतो. तथापि, आपले जीवन-कल्याण आपल्या आसपासच्या लोकांवर तसेच आपल्या मित्रांच्या स्वतंत्र नेटवर्कवरील संबंधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. यापैकी काही मित्र-मैत्रिणी आपल्याला यशस्वी होण्यास मदत करतात, तर काही आपल्याला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करतात. सामाजिक कल्याण म्हणजे आपल्या जीवनात मजबूत नातेसंबंध आणि प्रेम असणे.

ज्यांचे सामाजिक जीवन-कल्याण चांगले असते त्यांच्याकडे अनेक निकटचे संबंध असतात जे त्यांना यश मिळविण्यास, जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी मदत करतात. त्यांच्याभोवती असे लोक असतात जे त्यांच्या विकासासाठी त्यांना प्रोत्साहित करतात, त्यांना जसे आहेत तसे स्वीकारतात आणि त्यांच्याशी सन्मानाने वागतात. ते जाणूनबुजून आपल्या आजूबाजूच्या नेटवर्कमध्ये गुंतून राहण्यासाठी वेळ घालवतात.

ज्यांचे सामाजिक कल्याण चांगले असते, ते सुट्ट्या किंवा मित्र आणि कुटुंबासोबत सामाजिक मेळावे आयोजित करण्यासाठी वेळ काढण्याची शक्यता जास्त असते, आणि त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांची अधिक दृढता होते. ते त्यांच्या जीवनात भरपूर प्रेम असल्याचे सांगतात, आणि हे त्यांना रोज सकारात्मक ऊर्जा देते.

सामाजिक जीवनकल्याणाला वाढवण्यासाठी शिफारसी:

  • मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत दररोज सहा तास सामाजिक वेळ घालवा (या वेळेमध्ये भेट, घरी वेळ घालवणे, फोन, ई-मेल आणि इतर संवादाचा समावेश असू शकतो)
  • आपल्या नेटवर्कमधील परस्पर संबंधांना मजबूत करा
  • शारीरिक क्रियाशीलता असलेल्या गोष्टी करून सामाजिक वेळ घालवा. उदाहरणार्थ, मित्रासोबत दीर्घकाळ चालत जा, ज्यामुळे तुम्ही एकमेकांना निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

आर्थिक जीवन-कल्याण

रस्त्यावरून जात असताना 500 रुपये सापडल्यामुळे आपल्या जीवन-कल्याणामध्ये जास्त भर पडेल की रुपये 500 आपल्या वीजबिलातून कमी झाले तर? रक्कम सारखीच असतानाही हा फरक जाणवतो का?

Gallup ने पैसे आणि त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व यावर केलेल्या विस्तृत संशोधनात अनेक गृहीतकांना आव्हान दिले. यावरून हे समजले की आपल्याकडे किती पैसा आहे, जो आर्थिक स्वास्थ्य मोजण्यासाठीचा पारंपारिक मानक आहे, तो आपल्या आर्थिक जीवन-कल्याणाचा निर्देशांक नाही, आणि आपल्या जीवनाचा तर नक्कीच नाही.

पैसा आनंद खरेदी करू शकत नाही, परंतु आपल्या मूलभूत गरजा भागवता येत नसतील तर आनंदी होणे अवघड आहे. त्यापलीकडे, आपल्याकडे असलेल्या पैशाची वास्तविक रक्कम तुमच्या एकूण जीवन-कल्याणावर जितका परिणाम करत नाही तितका आर्थिक सुरक्षा आणि तुमची पैशाचे व्यवस्थापन आणि खर्च यावर होतो. आर्थिक जीवन-कल्याण म्हणजे आपले आर्थिक जीवनाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे.

ज्यांचे आर्थिक जीवन-कल्याण उच्च असते ते त्यांचे वैयक्तिक वित्त व्यवस्थापन चांगले करतात आणि पैसे शहाणपणाने खर्च करतात. ते फक्त भौतिक वस्तूंच्या ऐवजी अनुभव खरेदी करतात आणि नेहमी स्वतःवर खर्च करण्याऐवजी इतरांना मदत करतात. मूलभूत स्तरावर, ते त्यांच्या एकूण जीवनमानाबद्दल समाधानी असतात.

त्यांच्या यशस्वी रणनीतीमुळे त्यांना आर्थिक सुरक्षा मिळते, जी कर्जामुळे होणारा दररोजचा ताण आणि चिंता दूर करते. ही आर्थिक सुरक्षा त्यांना जे हवे ते करण्यास मदत करते. त्यांच्याकडे त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त वेळ घालवण्याची मोकळीक असते. आपले वित्त व्यवस्थापन चांगले असणे आपल्याला हवे तेव्हा हवे ते करायची मुभा देते.

आर्थिक जीवन-कल्याण सुधारण्यासाठी शिफारसी:

  • अनुभवांवर खर्च करा - जसे की सुट्ट्या आणि मित्र किंवा प्रिय व्यक्तींसोबतच्या सहली.
  • केवळ भौतिक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी इतरांना मदत करा.
  • एक स्वयंचलित प्रणाली तयार करा (जसे की स्वयंचलित पेमेंट आणि बचत) जी दररोजच्या पैशांवरील चिंता कमी करते.

शारीरिक जीवन-कल्याण

ज्यांचे शारीरिक जीवन-कल्याण उत्तम असते ते आपले आरोग्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे करतात. ते नियमितपणे व्यायाम करतात, योग्य आहाराचे पर्याय निवडतात आणि पुरेशी झोप घेतात. ज्यांचे शारीरिक जीवन-कल्याण उत्तम असते ते चांगले दिसतात, चांगल्या भावना अनुभवतात आणि ते दीर्घकाळ जगतात.

आपल्या अल्पकालीन निवडी आपल्या एकूण शारीरिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. जेव्हा आपण निरोगी सवयी आत्मसात करतो आणि आहार, व्यायाम आणि झोप यासारख्या स्मार्ट जीवनशैलीच्या निवडी करतो, तेव्हा आपण चांगल्या भावना अनुभवतो, आपल्याकडे अधिक ऊर्जा असते, आपण चांगले दिसतो आणि दीर्घकाळ जगतो. शारीरिक जीवन-कल्याण म्हणजे चांगले आरोग्य आणि दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेशी ऊर्जा असणे.

ज्यांचे शारीरिक जीवन-कल्याण चांगले असते ते आपले आरोग्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात. ते नियमितपणे व्यायाम करतात, आणि त्यामुळे त्यांना अधिक चांगले वाटते. ते चांगले आहाराचे पर्याय निवडतात, ज्यामुळे त्यांची ऊर्जा दिवसभर टिकून राहते आणि त्यांची विचारशक्ती सुधारते. ते पुरेशी झोप घेतात जेणेकरून त्यांनी मागील दिवशी शिकलेली माहिती प्रक्रिया करू शकतील आणि दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात करू शकतील.

त्यांच्या निरोगी जीवनशैलीमुळे, ते त्यांच्या वयातील इतर लोकांप्रमाणे सामान्यत: जे काही करता येते ते सर्व करू शकतात. जेव्हा ते प्रत्येक दिवशी पुरेशी झोप घेतात, तेव्हा ते चांगले दिसतात, चांगल्या भावना अनुभवतात आणि त्यांच्याकडे जास्त ऊर्जा असते.

शारीरिक जीवन-कल्याण सुधारण्यासाठी शिफारसी:

  • दररोज किमान 20 मिनिटे शारीरिक क्रियाशील रहा - शक्यतो सकाळी, जेणेकरून तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.
  • पुरेशी झोप घ्या ज्यामुळे तुम्हाला विश्रांती मिळेल (साधारणपणे सात ते आठ तास) पण खूप जास्त झोपू नका (साधारणपणे आठ तासापेक्षा जास्त नाही).
  • किराणा सामान खरेदी करताना सकारात्मकपणे निवड करा. नैसर्गिक पदार्थांची निवड करा.

सामुदायिक जीवन-कल्याण

सामुदायिक जीवन-कल्याणात उत्तम असलेल्या लोकांनी त्यांच्या स्वतःची ताकद आणि आवडींनुसार त्यांच्या समुदायात योगदान देण्याच्या क्षेत्रांची ओळख पटवली आहे. ते या आवडींच्या बाबतीत इतरांनाही सांगतात जेणेकरून योग्य गट आणि कारणांशी त्यांचे संपर्क होऊ शकतील. त्यांचे योगदान लहानपणापासून सुरू होऊ शकते, पण कालांतराने ते अधिक गुंतून राहून समुदायावर खोलवर प्रभाव टाकते. सामुदायिक जीवन-कल्याणात उत्तम असलेल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे अशी समुदाय निर्माण होतो ज्याचा आपण कधी कल्पनाही केलेली नसते.

सामुदायिक जीवन-कल्याण म्हणजे लोक त्यांच्या एकूण जीवन-कल्याणाचे मूल्यांकन करताना विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा घटक होय. पण हा घटक चांगले जीवन आणि उत्कृष्ट जीवन यामधील फरक दर्शवू शकतो.

आधारभूत पातळीवर, आपल्याला ज्या ठिकाणी राहायचे आहे तिथे सुरक्षिततेची भावना असणे आवश्यक आहे आणि आपण पिणाऱ्या पाण्याची आणि श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता याबद्दल सुरक्षिततेची भावना असणे आवश्यक आहे. आपल्या गरजा पूर्ण करू शकणारे आपले एक घर आणि गर्वाने सांगू शकता असे एक समुदाय देखील आवश्यक आहे. जेव्हा आपण आपल्या समुदायात सहभागी होतो आणि समाजात परत देतो, तेव्हा त्याचा लाभ समुदायातील सर्व घटकांना आणि आपल्या संपूर्ण समुदायालाही होतो. "चांगले करणे" हे अधिक गहन सामाजिक परस्परसंवेदना, वाढीव अर्थ आणि उद्दीष्ट, आणि अधिक सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देते. सामुदायिक जीवन-कल्याण म्हणजे आपण ज्या क्षेत्रात राहतो त्यासोबत असलेल्या गुंतून राहण्याची भावना.

उच्च सामुदायिक जीवन-कल्याण असलेले लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सुरक्षित वाटतात. त्यांना त्यांच्या समुदायाचा अभिमान आहे आणि योग्य दिशेने जात असल्याची भावना देखील आहे. याचा परिणाम म्हणून ते समाजाला परत देण्याची आणि स्थायी योगदान देण्याची इच्छा बाळगतात. या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या ताकद आणि आवडींनुसार योगदान देण्याच्या क्षेत्रांची ओळख पटवली आहे आणि ते इतरांना या आवडींबद्दल सांगतात जेणेकरून योग्य गट आणि कारणांशी त्यांचे संपर्क होऊ शकतील.

त्यांचे समुदायातील योगदान लहानपणापासून सुरू होऊ शकते, पण कालांतराने ते अधिक त्यात गुंततात आणि त्यांच्या असण्याने समुदायावर खोलवर प्रभाव पडतो. असे प्रयत्न अशा समुदायांचे निर्माण करतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

सामुदायिक जीवन-कल्याण वाढवण्यासाठी शिफारसी:

  • आपल्या वैयक्तिक मिशनच्या आधारावर आपल्या समुदायात कसे योगदान देऊ शकतो हे ओळखणे.
  • आपल्या आवडी आणि उत्सुकता इतरांना सांगा जेणेकरून ते आपल्याला संबंधित गट आणि कारणांशी जोडू शकतील.
  • विशिष्ट अशा समुदाय गटात किंवा कार्यक्रमात सामील व्हा. याची सुरुवात लहानपणापासून करा, पण सुरुवात आजपासूनच करा.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Deci, E. L., & Ryan, R. M. (2008). Hedonia, eudaimonia, and well-being: An introduction. In Fave, Delle A. (Ed.), The exploration of happiness (pp. 43-58). Springer.

Diener, E., Oishi, S., & Lucas, R. E. (2009). Subjective well-being: The science of happiness and life satisfaction. Oxford University Press.

Rath, T., & Harter, J. (2010). Wellbeing: The five essential elements. Gallup Press.

Ryff, C. D., & Keyes, C. L. M. (1995). The structure of psychological well-being revisited. Journal of Personality and Social Psychology, 69(4), 719–727.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...