मानवी जीवनाचा अर्थ काय आहे? | man's search for meaning
अर्थाच्या शोधात (Man's
Search for Meaning) हे
प्रसिद्ध पुस्तक ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांनी
लिहिले आहे. हे पुस्तक एका व्यक्तीच्या जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रक्रिया आणि
संघर्षाचे सखोल निरीक्षण देते, विशेषतः हे ऑशविट्झसारख्या नाझी छळछावण्यांतील अनुभवावर आधारित आहे.
फ्रँकलने स्वतः त्या काळात जीवनाचा अर्थ शोधून कसा उध्दार केला, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
व्हिक्टर फ्रँकल यांनी दुसऱ्या
महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीच्या छळछावण्यांमध्ये अनुभवलेली परिस्थिती अमानवीय
आणि अत्यंत हृदयद्रावक होती. त्यांनी ऑशवित्झ, डखाऊ
आणि इतर छळछावण्यांमध्ये भोगलेल्या भयंकर दु:खद काळाचे वर्णन केले आहे.
छळछावण्यांमध्ये पोहोचताच माणसांची ओळख पूर्णतः पुसली जाई, त्यांना फक्त एक क्रमांक दिला जात असे. कुटुंब, संपत्ती, आत्मसन्मान
आणि माणुसकी—सर्व गमावलेल्या परिस्थितीत कैद्यांवर सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला
जाई. त्यांना अमानुष परिस्थितीत अन्नावाचून आणि थंडीतील हालअपेष्टा सहन करत जगावे
लागे. मृत्यू दररोज समोर दिसत असूनही, काही
कैद्यांनी जीवनातला काही तरी अर्थ गाठण्याच्या इच्छेने जगण्याचा प्रयत्न केला.
या छावण्यांमध्ये कैद्यांचे जीवन पशुतुल्य झाले
होते. भुकेने सुन्न झालेली मने, साथीचे
रोग, आणि सततची मारहाण हे त्यांच्या दैनंदिन
जीवनाचा भाग होते. छावण्यांमध्ये कुटुंब आणि प्रियजनांच्या गमावण्याचे दुःख, स्वतःच्या मृत्यूची भीती आणि प्रत्येक क्षणी
होणारी अमानवीय वागणूक यामुळे कैद्यांची मानसिक स्थिती कोलमडून जात असे. तथापि, फ्रँकल यांनी सांगितले की, ज्या कैद्यांना आपल्या जीवनाला काही तरी उद्देश
किंवा अर्थ जोडायचा होता,
त्यांनी या अमानुष परिस्थितीतही
मनोधैर्य राखले. परिस्थिती कितीही भीषण असली, तरी
मनाच्या स्वातंत्र्याने माणसाला उभे राहता येते, हे त्यांनी अनुभवातून शिकले.
लेखकाची पार्श्वभूमी आणि पुस्तकाचा उद्देश
व्हिक्टर फ्रँकल हे लोगोथेरपीचे जनक आहेत.
त्यांनी मानवी जीवनाचा अर्थ आणि संघर्ष कसा हाताळावा, याचा सखोल अभ्यास केला. नाझी छळछावण्यांतील
आपले अनुभव आणि निरीक्षणे त्यांनी "Man's Search for Meaning" मध्ये मांडली आहेत.
- माणसाला आयुष्यातील संघर्षातून कसा अर्थ सापडतो?
- कसे दुःख आणि संकटे पेलताना जीवनाचे मौल्यवान धडे मिळतात?
- जीवनाचा अर्थ कसा शोधायचा आणि त्याद्वारे मानसिक आरोग्य टिकवून
ठेवायचे?
सदर
पुस्तकात वरील प्रश्नांची चर्चा केलेली दिसून येईल. त्यामुळे आपण हे पुस्तक वाचत
असताना जीवनातील खडतर प्रसंग आणि अडचणी यांचे रडगाणे न गाता त्या प्रसंगातून
जीवनातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू या.
छळछावण्यांतील अनुभव
व्हिक्टर फ्रँकल यांनी ऑशवित्झसारख्या
छळछावण्यांमध्ये अत्यंत कठीण काळ व्यतीत केला. त्यांनी सांगितले आहे की, या छावण्यांमध्ये राहणाऱ्या कैद्यांची शारीरिक
व मानसिक स्थिती कशी बदलत जाते. फ्रँकल यांनी कैद्यांच्या मानसिक अवस्थेचे तीन
टप्पे स्पष्ट केले आहेत:
- शॉक : छावणीत पोहोचल्यावर सुरुवातीला कैद्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसतो. इथे लोकांना सर्वस्व गमवावे लागते – कुटुंब, मित्र, मालमत्ता आणि मानवी प्रतिष्ठा. कैद्यांना ओळख पटवण्यासाठी फक्त एक क्रमांक दिला जातो, ज्यामुळे त्यांची ओळख पुसली जाते. मानवी मुल्ये सोडाच माणूस म्हणून प्राथमिक ओळखच नष्ट केली जात होती.
- उदासीनता : सततचे भूक, थंडी, मारहाण, आणि अमानवीय परिस्थिती यामुळे कैद्यांमध्ये उदासीनता येते. माणसाला जिवंत राहण्यासाठी "फक्त जिवंत राहावे" ही भावना उरते. फ्रँकल म्हणतात की, अशा परिस्थितीतही काही लोकांनी आपली मनोधैर्य राखली, कारण त्यांना जगण्याचे "कारण" सापडले होते.
- स्वातंत्र्याची आशा : युद्ध संपण्याच्या आशेने आणि पुन्हा एकदा आपल्या जीवनाचा अर्थ गाठण्याच्या इच्छेने काही कैद्यांना जगण्याची प्रेरणा मिळाली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाची आशा आणि आशावादच माणसाला उभे राहण्याचे बळ देतात.
- छळ व मानवी मूल्यांचा ऱ्हास: फ्रँकल यांनी सांगितले की, छळछावण्यांमध्ये माणसाचे नैतिक मूल्य संपून फक्त शारीरिक अस्तित्व शिल्लक राहते. तरीही काही लोक असे असतात जे सर्व संकटांमध्येही आपले उच्च नैतिक मूल्ये टिकवून ठेवतात. असे लोक वैश्विक विचारांनी पछाडलेले असतात त्यांना स्वतःच्या जीवनाचे खरे मूल्य गवसलेले असते.
लोगोथेरपी – जीवनाचा अर्थ शोधण्याचे
तत्त्वज्ञान
व्हिक्टर फ्रँकल यांनी आपल्या भयानक
अनुभवांच्या आधारे लोगोथेरपी ही मानसशास्त्रीय संकल्पना मांडली आणि तिचा विकास आणि
विस्तार केला.
लॉगोथेरपी म्हणजे काय?
"लोगो" म्हणजे ग्रीक भाषेत अर्थ (Meaning) आणि लोगोथेरपी म्हणजे जीवनाला अर्थ
लावण्याच्या शोधावर आधारित उपचारपद्धती. फ्रँकल यांचा मुख्य सिद्धांत असा आहे की, माणसाला जगण्यासाठी काहीतरी "कारण"
हवे असते.
लोगोथेरपीचे महत्त्वाचे तत्त्व:
जीवनाचा अर्थ शोधणे:
प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात काही तरी
विशिष्ट उद्देश सापडतो. हा उद्देश प्रत्येकासाठी वेगळा असतो. पत्नीच्या मृत्यूनंतर
२२ वर्षांच्या अथक परिश्रमाने ज्यांनी डोंगर फोडून रस्ता तयार केला असे दशरथ मांझी,
दक्षिण भारतातील एक अम्मा जी आपल्या मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण गाव, रस्ते
जंगलमय करून त्याचे संवर्धन केले.
स्वतंत्रता आणि जबाबदारी:
परिस्थिती कशीही असली तरी आपण कसे प्रतिसाद
देतो यावर आपले नियंत्रण असते. माणूस आपले विचार आणि वर्तन निवडण्यास स्वतंत्र
आहे. "अनाथांची माय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई यांनी हजारो अनाथ
मुलांना आश्रय दिला व त्यांना चांगले शिक्षण आणि भविष्य घडवले. कैलाश सत्यार्थी
यांनी बालमजुरीविरोधी चळवळीत सक्रिय सहभाग घेत लाखो बालकांना मजुरीच्या जोखडातून
मुक्त केले आणि २०१४ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाले.
दुःखाचा स्वीकार:
जीवनातील दुःख हे टाळता येत नाही. मात्र, दुःखातून काहीतरी शिकता येते आणि त्यास जीवनाचा
अर्थ जोडता येतो. सिद्धार्थ गौतम राजपुत्र होते आणि त्यांना बालपणापासून ऐश्वर्य
आणि सुखसोयींनी वेढले गेले होते. मात्र, बाहेरच्या जगाचा अनुभव घेताना त्यांनी पाण्यावरून संघर्ष आणि युद्ध या जीवनातील अपरिहार्य दुःखांचा
सामना केला. या अनुभवांनी त्यांना विचार करायला प्रवृत्त केले की, "दुःख का होते, आणि त्यावर उपाय काय आहे?" बुद्ध म्हणतात दुःख अपरिहार्य आहे
त्याचा नकार करण्याऐवजी स्वीकार करायला हवे. स्वतःच्या चुकांमधून आणि अनुभवांमधून
शिकावे यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण होते. अंतर्मुख चिंतन दुःखाचे मूळ शोधण्यासाठी महत्त्वाचे
आहे. बुद्धांनी शिकवले की, दुःखाने आपल्याला इतरांच्या वेदना समजण्यास अधिक संवेदनशील बनवावे
यातून करुणा आणि सहानुभूती निर्माण होते.
अर्थ शोधण्याचे तीन मार्ग:
- प्रेम, नातेवाईकांसोबत वेळ घालवणे, निसर्गाचा आस्वाद घेणे यातून जीवनाला अर्थ मिळतो.
- काम, कला, लेखन किंवा आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांना काही तरी देणे यातून जीवनाचा अर्थ सापडतो.
- दुःखाला सामोरे जाऊन त्यातून शिकणे आणि त्याचा स्वीकार करून स्वतःला समृद्ध करणे हेही अर्थ मिळवण्याचे एक साधन आहे.
मुख्य संदेश
- प्रत्येक परिस्थितीत जीवनाला काही ना काही अर्थ असतो. तो शोधण्याची जबाबदारी आपली आहे.
- परिस्थिती बदलता येत नाही, पण त्या परिस्थितीला आपण कसे प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असते.
- परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाच्या स्वत्वाची ताकद त्याला जिवंत ठेवते.
- जीवन जगताना काहीतरी ध्येय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुस्तकाचे सामाजिक महत्त्व
- 'अर्थाच्या शोधात' हे पुस्तक फक्त भूतकाळातील छळछावण्यांचा इतिहास सांगत नाही, तर माणसाला जीवनात "का जगावे?" याचे उत्तर देते.
- आजच्या तणावग्रस्त व आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असलेल्या समाजासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरते.
- दुःख आणि संघर्षांना सामोरे जाण्यासाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी मार्गदर्शन आहे.
समारोप
'अर्थाच्या शोधात' हे केवळ एक आत्मचरित्र नाही तर एक जीवन बदलणारे तत्त्वज्ञान आहे.
व्हिक्टर फ्रँकल यांची कथा मानवी जिद्द, मानसिक
शक्ती आणि स्वत्त्वाच्या असीम सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे. फ्रँकल म्हणतात "जो
माणूस का जगतो हे जाणतो, तो कोणत्याही परिस्थितीशी सामना करू
शकतो." "अर्थाच्या शोधात" हे पुस्तक अशा व्यक्तीसाठी आहे ज्याला
जीवनाचा अर्थ शोधायचा आहे. यातून आपण शिकतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी
आपल्या विचारशक्तीवर आणि निर्णयावर आपले नियंत्रण असते.
"अर्थाच्या शोधात" हे पुस्तक
मानवी मनाच्या प्रचंड क्षमतेचे साक्षात्कार घडवते. जीवनाचा अर्थ केवळ सुखात नसून, संकटे आणि दुःखाचा सामना करताना योग्य
दृष्टिकोन ठेवून कसा साधला जातो, हे
शिकवते. फ्रँकलचा दृष्टिकोन "आपल्याला परिस्थिती बदलता येत नसली, तरी आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू
शकतो" हा आहे. हे तत्त्व आजच्या युगातही अत्यंत उपयुक्त आहे.
"आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थ असतो. तो फक्त शोधण्याची
गरज आहे."
संदर्भ:
Frankl, V. (2010). Man's Search for Meaning: The classic tribute to hope
from the Holocaust, RIDER Publication
फ्रँकल, व्ही. (2017). अर्थाच्या शोधात (Man's Search for Meaning या
इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद – विजया बापट), मेहता पब्लिशिंग हाउस
खूप छान लेख sir
उत्तर द्याहटवा