सिग्मंड
फ्रायड (Sigmund Freud) : मनाच्या गूढ
प्रवासाचा निर्भय शिल्पकार

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
सिग्मंड
फ्रायड हे केवळ मानसशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी मनाच्या आतल्या जगात अबोध मन, दडपण,
संघर्ष आणि अस्वस्थतेने भरलेल्या प्रदेशात निर्भयपणे प्रवेश करणारे
मूलगामी विचारवंत होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी,
जेव्हा मानसशास्त्र प्रामुख्याने बोध अनुभव, निरीक्षणीय
वर्तन आणि जैविक प्रक्रियांपुरते मर्यादित होते, तेव्हा
फ्रायड यांनी “माणूस स्वतःला जितका ओळखतो, त्यापेक्षा तो फार
मोठा आहे” हा क्रांतिकारी दावा मांडला. या विधानामागे त्यांचा मूलभूत विचार असा
होता की मानवी वर्तनाचे, भावना-विचारांचे आणि निर्णयांचे खरे
स्रोत बहुतेक वेळा चेतन मनात नसून अबोध स्तरावर दडलेले असतात (Freud,
1900).
फ्रायड
यांच्या मते, मानवी मन हे केवळ तर्कशुद्ध आणि
सजग प्रक्रियांचे साधन नाही, तर दडपलेल्या इच्छा, अपूर्ण संघर्ष, बालपणीचे अनुभव आणि सामाजिक-नैतिक
बंधने यांचा गुंतागुंतीचा परिणाम आहे. त्यांनी अबोध मन या संकल्पनेला
मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी आणले आणि दाखवून दिले की स्वप्ने, चुकलेली कृती (Freudian slips), विस्मरण, तसेच न्युरोटिक लक्षणे ही “अपघात” नसून मनातील दडपलेल्या आशयाची प्रतीके
आहेत (Freud, 1901). त्यामुळे मन समजून घ्यायचे असेल,
तर केवळ व्यक्ती काय सांगते यापेक्षा ती काय दडपते, काय टाळते आणि काय अप्रत्यक्षरीत्या व्यक्त करते याकडे लक्ष देणे आवश्यक
आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“मनाच्या अंधाऱ्या प्रदेशात उतरलेले संशोधक” ही फ्रायड यांची ओळख विशेषतः
त्यांच्या लैंगिकता आणि आक्रमकता यांसारख्या त्या काळात वर्ज्य मानल्या जाणाऱ्या
विषयांवरील अभ्यासामुळे ठळक होते. बाललैंगिकता (infantile sexuality) ही संकल्पना मांडताना त्यांनी दाखवून दिले की मानवी विकास हा
नैतिकदृष्ट्या “निर्दोष” आणि “तटस्थ” नसून जैविक प्रेरणा, सामाजिक
नियम आणि अंतर्गत संघर्ष यांच्या परस्परसंवादातून घडतो (Freud, 1905). या विचारांमुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली, तरीही
त्यांनी सत्याच्या शोधासाठी सामाजिक अस्वस्थता स्वीकारली. हीच गोष्ट त्यांना
“निर्भय शिल्पकार” ठरवते, कारण त्यांनी मनाच्या वास्तवाचे शिल्प घडवताना
लोकप्रियतेपेक्षा प्रामाणिक निरीक्षणाला प्राधान्य दिले.
फ्रायड
यांच्या जीवनकार्याचे सार त्यांच्या मनाचा संरचनेच्या (Id,
Ego, Superego) सिद्धांतातही दिसून येते. Id ही
जैविक प्रेरणांची, Ego ही वास्तवाशी जुळवून घेणारी आणि Superego
ही सामाजिक-नैतिक नियमांची प्रातिनिधीक रचना, या तीन स्तरांतील
संघर्षातून मानवी व्यक्तिमत्त्व आकार घेत असल्याचे त्यांनी मांडले (Freud,
1923). त्यामुळे “माणूस स्वतःला जितका ओळखतो, त्यापेक्षा
तो फार मोठा आहे” हे विधान केवळ तात्त्विक नाही, तर
मानसशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. व्यक्ती स्वतःला एकसंध, सुसंगत समजते; परंतु प्रत्यक्षात तिचे मन अंतर्गत
संघर्षांनी, दडपणांनी आणि विसंगतींनी भरलेले असते.
एकूणच, सिग्मंड फ्रायड यांचे कार्य मानवी मनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकणारे
ठरले. त्यांनी मानसशास्त्राला केवळ वैज्ञानिक शिस्त न ठेवता मानवी अस्तित्वाच्या
गूढतेचा अभ्यास करणारी विचारप्रणाली बनवले. त्यांच्या संकल्पना आजही टीकेच्या झोतखाली
असल्या, तरी अबोध मनाचे महत्त्व, बालपणीच्या
अनुभवांचा दीर्घकालीन प्रभाव आणि अंतर्गत संघर्षांची भूमिका या मूलभूत कल्पना
आधुनिक मानसशास्त्र, मानसोपचार, साहित्य
आणि संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे फ्रायड हे केवळ एका सिद्धांताचे जनक
नसून, मानवी मनाच्या गूढ प्रवासाचे निर्भय शिल्पकार म्हणून
आजही प्रेरणादायी ठरतात.
बालपण आणि प्रारंभिक संघर्ष
Sigmund
Freud यांचा
जन्म 6 मे 1856 रोजी तत्कालीन ऑस्ट्रियन साम्राज्यातील फ्रीबर्ग (आजचे Příbor, झेक
प्रजासत्ताक) येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव Sigismund
Schlomo Freud असे होते. फ्रायड यांचे कुटुंब ज्यू वंशाचे होते आणि त्या काळातील
युरोपमध्ये ज्यू समाजाला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर अनेक
प्रकारच्या मर्यादा व भेदभावांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळेच फ्रायड यांचे
बालपण तुलनेने साध्या, संघर्षमय आणि अनिश्चित परिस्थितीत
गेले, असे अनेक अभ्यासक नमूद करतात (Gay, 1988).
फ्रायड यांचे वडील Jakob
Freud हे
लोकरीच्या व्यापाराशी संबंधित होते, परंतु
व्यवसायात सातत्याने यश मिळाले नाही. परिणामी कुटुंबाला वारंवार आर्थिक अडचणींना
सामोरे जावे लागले. फ्रायड अवघ्या चार वर्षांचे असतानाच त्यांच्या कुटुंबाने
फ्रीबर्ग सोडून प्रथम लाइपझिग आणि नंतर व्हिएन्ना येथे स्थलांतर केले. या
स्थलांतरामुळे बाल वयातच फ्रायड यांना अस्थिरता, अनिश्चितता आणि
सामाजिक बदलांचा अनुभव आला. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते, लहान वयातील ही
असुरक्षितता आणि बदलांची साखळी पुढे त्यांच्या अबोध मन आणि बालपणीच्या अनुभवांचे
महत्त्व या संकल्पनांवर प्रभाव टाकणारी ठरली (McLeod, 2019).
आर्थिक मर्यादा असूनही फ्रायड
यांच्या शिक्षणाकडे त्यांच्या कुटुंबाने विशेष लक्ष दिले. फ्रायड हे अत्यंत हुशार
विद्यार्थी होते आणि त्यांचे कुटुंबीय, विशेषतः आई Amalia
Freud, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल अभिमान बाळगत. घरातील इतर भावंडांपेक्षा
फ्रायड यांना अभ्यासासाठी स्वतंत्र दिवा आणि शांत वातावरण देण्यात येत असे, ही बाब
त्यांच्या बौद्धिक जडणघडणीसाठी महत्त्वाची ठरली (Jones, 1953). या
विशेष प्रोत्साहनामुळेच त्यांच्यात आत्मविश्वास, एकाग्रता आणि
अभ्यासाची शिस्त निर्माण झाली.
बालपणापासूनच फ्रायड यांना वाचनाची
विलक्षण आवड होती. ग्रीक, लॅटिन, जर्मन साहित्य
तसेच तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे ग्रंथ त्यांनी लहान वयातच वाचले होते. भाषांवरील
प्रभुत्व आणि तात्त्विक ग्रंथांचे वाचन यामुळे त्यांच्या विचारसरणीला खोलवर आकार
मिळाला. केवळ पाठांतर न करता, “हे असे का?” आणि “यामागील
कारण काय?” असे प्रश्न विचारण्याची त्यांची सवय होती. हीच चौकस वृत्ती पुढे
त्यांच्या वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय संशोधनाची पायाभरणी ठरली (Gay,
1988).
सामाजिक स्तरावरही फ्रायड यांना अनेक
अडथळे होते. व्हिएन्नामधील शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्र प्रामुख्याने ख्रिश्चन
बहुसंख्याकांच्या प्रभावाखाली होते. ज्यू असल्यामुळे फ्रायड यांना छुप्या आणि उघड
अशा दोन्ही प्रकारच्या भेदभावाचा अनुभव येत होता. तथापि, या सामाजिक
दबावाने त्यांची जिद्द कमी न होता, उलट स्वतःची
वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा दिली. संघर्षातूनच बौद्धिक स्वातंत्र्य आणि
स्वतंत्र विचार विकसित होतो, हा अनुभव फ्रायड यांच्या जीवनात
लहानपणीच अधोरेखित झाला (Roudinesco, 2016).
एकूणच, फ्रायड यांचे
बालपण हे केवळ साध्या परिस्थितीचे वर्णन नाही, तर ते संघर्ष, स्थलांतर, सामाजिक दबाव
आणि बौद्धिक कुतूहल यांचे मिश्रण होते. याच प्रारंभिक संघर्षांमधून त्यांचा
विचारशील, चिकित्सक आणि धाडसी संशोधक घडत गेला. पुढे त्यांनी मानवी मनाच्या घुड स्तरांचा
शोध घेतला, त्यामागे त्यांच्या बालपणीच्या या अनुभवांची
छाया स्पष्टपणे दिसून येते हे आज मानसशास्त्राच्या इतिहासात व्यापकपणे मान्य केले
जाते.
वैद्यकशास्त्रातून मनोविश्लेषणाकडे
सिग्मंड
फ्रायड यांचा मनोविश्लेषणाकडे झालेला प्रवास हा अचानक घडलेला बदल नव्हता, तर तो
वैद्यकशास्त्रातील प्रत्यक्ष अनुभव, संशोधनातील
मर्यादा आणि मानवी दुःख समजून घेण्याची तीव्र बौद्धिक अस्वस्थता यांचा परिणाम
होता. फ्रायड यांनी व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि
प्रारंभी त्यांनी स्वतःला पूर्णतः जैविक व शारीरिक दृष्टिकोनातून घडवले. त्यांच्या
सुरुवातीच्या संशोधनाचा केंद्रबिंदू मेंदू, मज्जासंस्था
आणि स्नायू हा होता. विशेषतः त्यांनी मेंदूतील संरचना, अफेसिया आणि
मज्जासंस्थेतील विकार यांचा शास्त्रीय अभ्यास केला होता (Freud,
1891).
या टप्प्यावर फ्रायड हे प्रस्थापित
वैद्यकीय विज्ञानाच्या चौकटीतच विचार करणारे संशोधक होते. त्या काळातील
वैद्यकशास्त्र प्रामुख्याने जैविक कारणे आणि शारीरिक
विकृती यांवर आधारित होते. कोणतेही लक्षण आढळले की त्यामागे मेंदू, स्नायू किंवा
मज्जातंतूंमधील बिघाड शोधला जात असे. मात्र रुग्णालयीन अनुभवात फ्रायड यांना असे
अनेक रुग्ण भेटले विशेषतः हिस्टीरिया असलेले जे पक्षाघात, अंधत्व, मुकेपणा, तीव्र वेदना
किंवा झटके यांसारखी गंभीर शारीरिक लक्षणे दिसत होती, पण तपासणीत
कोणतेही जैविक कारण सापडत नव्हते (Breuer &
Freud, 1895).
याच ठिकाणी फ्रायड यांची वैचारिक
अस्वस्थता सुरू झाली. “जर शरीर निरोगी आहे, तर मग हे लक्षण
येते कुठून?” हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
फ्रान्समधील न्यूरोलॉजिस्ट Jean-Martin Charcot यांच्या
मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्यासाने फ्रायड यांना महत्त्वाची दिशा दिली. Charcot
यांनी
हिस्टीरिया हा मानसिक कारणांमुळे उद्भवणारा विकार आहे हे दाखवून दिले होते आणि
सम्मोहन वापरून लक्षणांमध्ये बदल घडवून आणले होते (Ellenberger, 1970). यामुळे
फ्रायड यांना प्रथमच हे जाणवले की मन आणि शरीर यांचा संबंध केवळ जैविक नसून मानसिक
पातळीवरही खोलवर असतो.
यानंतर Josef
Breuer यांच्यासोबत केलेल्या रुग्ण-अभ्यासाने (विशेषतः “Anna
O.” प्रकरणाने)
फ्रायड यांच्या विचारांना निर्णायक वळण दिले. रुग्णाने दडपलेल्या भावनिक
अनुभवांबद्दल बोलल्यावर तिच्या शारीरिक लक्षणांमध्ये आराम मिळत होता, या अनुभवातून
फ्रायड यांनी असा निष्कर्ष काढला की दडपलेल्या आठवणी, भावना आणि
इच्छा या शारीरिक स्वरूपात व्यक्त होऊ शकतात (Breuer &
Freud, 1895). म्हणजेच लक्षणे ही केवळ शरीराची नव्हे, तर मनाची भाषा
होती.
याच टप्प्यावर फ्रायड यांनी पारंपरिक
वैद्यकशास्त्राच्या मर्यादा स्पष्टपणे ओळखल्या. केवळ आंतरिक शरीर पाहून, तपासण्या करून
किंवा औषधोपचार देऊन काही मानवी दुःख समजून घेता येत नाही, असे त्यांना
वाटू लागले. मनाच्या खोल पातळीवर जिथे समाजमान्य नसलेल्या इच्छा, बालपणीचे आघात
आणि विस्मरणात गेलेल्या आठवणी दडलेल्या असतात तिथे उतरल्याशिवाय उपचार अपूर्ण
राहतात, हा त्यांचा ठाम निष्कर्ष होता (Freud, 1900).
या बौद्धिक प्रवासातूनच मनोविश्लेषण
या क्रांतिकारी विचारप्रणालीचा जन्म झाला. मनोविश्लेषण ही केवळ उपचारपद्धती नव्हती, तर मानवी वर्तन, स्वप्ने, चुकांची साखळी
(slips of the tongue) आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास समजून घेण्याची एक
नवीन चौकट होती. वैद्यकशास्त्रातून सुरुवात करून फ्रायड मनाच्या अबोध स्तरापर्यंत
पोहोचले आणि त्यामुळेच मानसशास्त्राचा इतिहास कायमचा बदलून गेला.
अबोध मनाचा शोध (Unconscious
Mind)
सिग्मंड
फ्रायड यांनी मांडलेली अबोध मन ही संकल्पना मानसशास्त्राच्या इतिहासातील एक
मूलभूत आणि क्रांतिकारी वळण मानले जाते. फ्रायड यांच्या आधी मानसशास्त्रात मुख्यतः
जाणीव/ बोध अनुभव आणि निरीक्षणयोग्य वर्तन यांनाच
महत्त्व दिले जात होते. परंतु फ्रायड यांनी ठामपणे मांडले की मानवी वर्तन, विचार, भावना आणि
निर्णय यांचा मोठा भाग हा जाणीवेच्या पलीकडे म्हणजेच अबोध पातळीवर कार्यरत असतो.
माणूस स्वतः ज्या गोष्टींची जाणीव ठेवत नाही, दडपतो किंवा
विसरतो, त्या गोष्टीही त्याच्या वर्तनावर खोल परिणाम घडवून आणतात, हा त्यांचा
मुख्य दावा होता (Freud, 1900; 1915).
फ्रायड यांच्या मते अबोध मन म्हणजे
दडपलेल्या इच्छा, अपूर्ण भावनिक संघर्ष, वेदनादायक
आठवणी आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य विचारांचे साठवणूक केंद्र होय. या सामग्रीला
थेट जाणीवेत येण्याची परवानगी नसते, कारण ती
व्यक्तीस मानसिक वेदना किंवा चिंता देऊ शकते. तरीसुद्धा, ही अबोध
सामग्री वेगवेगळ्या अप्रत्यक्ष मार्गांनी व्यक्त होते उदा. स्वप्ने, जिभ घसरण (Freudian
slips), विस्मरण, चुकांची साखळी (errors),
तसेच न्युरोटिक
लक्षणे (Freud, 1915). त्यामुळे माणसाचे वर्तन केवळ तार्किक किंवा जाणीवपूर्वक
निवडींवर आधारित नसून, अबोध प्रेरणांनी ते मोठ्या प्रमाणावर
नियंत्रित होते, असा निष्कर्ष फ्रायड काढतात.
अबोध मन समजून घेण्यासाठी फ्रायड
यांनी स्वप्न-विश्लेषण ही महत्त्वाची पद्धत विकसित केली. त्यांच्या प्रसिद्ध
ग्रंथात The Interpretation of Dreams (1900) त्यांनी स्वप्नांना “अबोध
मनाकडे जाणारा राजमार्ग” असे संबोधले. फ्रायड यांच्या मते
स्वप्ने ही दडपलेल्या इच्छांची प्रतीकात्मक पूर्तता असते. स्वप्नातील प्रत्यक्ष
दिसणारी सामग्री (manifest content) आणि
तिच्यामागील दडलेला अर्थ (latent content) यांत फरक असतो.
स्वप्नातील रूपके, प्रतीके आणि विसंगती यांचे विश्लेषण
केल्यास व्यक्तीच्या अबोध संघर्षांचा आणि इच्छांचा उलगडा होऊ शकतो, असे त्यांनी
मांडले (Freud, 1900).
याच चौकटीत फ्रायड यांनी मनाची
संरचनात्मक संकल्पना Id, Ego आणि Superego विकसित केली. Id हे पूर्णतः अबोध पातळीवर कार्यरत
असून, ते जैविक प्रेरणा, लैंगिक व आक्रमक इच्छा आणि तात्काळ
सुख तत्त्वावर (pleasure principle) चालते. Ego हे जाणीव व सुप्तावस्थेच्या
पातळीवर कार्य करत वास्तव तत्त्वावर (reality
principle) चालते आणि Id व बाह्य वास्तव यांच्यात समतोल
राखते. Superego हे नैतिक मूल्ये, सामाजिक नियम आणि अंतःस्थ विवेकाचे
प्रतिनिधित्व करते, ज्याची मुळे बालपणीच्या
पालक–संस्कृती अनुभवांत असतात (Freud, 1923). या तीन घटकांतील संघर्ष हा
मानवी मानसिक ताण, अपराधभावना आणि व्यक्तिमत्त्व विकास
समजून घेण्याचा मुख्य आधार ठरतो.
फ्रायड यांच्या अबोध मनाच्या
संकल्पनेत बालपणीच्या अनुभवांना विशेष महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते बालपणीचे
भावनिक अनुभव विशेषतः पालकांशी असलेले नाते, दडपलेली इच्छा
आणि अपूर्ण संघर्ष हे थेट अबोध मनात साठवले जातात आणि पुढील आयुष्यात
व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध व मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकतात. Psychosexual
stages of development या संकल्पनेद्वारे त्यांनी दाखवून दिले की विकासाच्या विशिष्ट
टप्प्यांवरील अडथळे किंवा दडपण भविष्यात न्युरोटिक समस्या निर्माण करू शकतात (Freud,
1905).
त्यामुळे मानसिक समस्या केवळ वर्तमानातील नसून, त्या भूतकाळाशी
विशेषतः बालपणाशी घट्ट जोडलेल्या असतात, ही दृष्टी
मानसशास्त्रासाठी नवीन होती.
एकूणच, अबोध मनाच्या
संकल्पनेमुळे मानसशास्त्राचा फोकस केवळ निरीक्षणयोग्य वर्तनावरून अंतर्मनातील
प्रक्रियांकडे वळला. मानसोपचार, व्यक्तिमत्त्व सिद्धांत, साहित्य
समीक्षा, कला आणि सांस्कृतिक अभ्यास या सर्व क्षेत्रांवर फ्रायड यांच्या
विचारांचा सखोल प्रभाव पडला. जरी आज त्यांच्या अनेक कल्पनांवर टीका होत असली, तरी मानवी
वर्तन समजून घेण्यासाठी अबोध प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत हा मूलभूत विचार आधुनिक
मानसशास्त्रातही स्वीकारला जातो. त्यामुळे फ्रायड यांचा अबोध मनाचा शोध हा केवळ एक
सिद्धांत नसून, मानवी स्वभाव समजून घेण्याची नवी दृष्टी देणारा
बौद्धिक क्रांतीचा टप्पा मानला जातो.
टीका, विरोध आणि
चिकाटी
सिग्मंड
फ्रायड यांनी
मांडलेले सिद्धांत त्यांच्या काळातील प्रस्थापित वैद्यकीय व वैज्ञानिक
विचारधारांना थेट आव्हान देणारे होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे
प्रामुख्याने जैविक आणि भौतिकवादी चौकटीत मांडले जात होते. अशा वेळी फ्रायड यांनी
मानवी वर्तनामागे अबोध मन, दडपलेल्या इच्छा आणि लैंगिक प्रेरणा
कार्यरत असतात, असा दावा केला. हा दृष्टिकोन त्या काळातील नैतिक, सामाजिक आणि
वैज्ञानिक मूल्यांना धक्का देणारा होता. परिणामी, त्यांच्या
सिद्धांतांवर “अतिशय लैंगिक”, “अतार्किक” आणि
“वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव असलेले” अशी कठोर टीका झाली (Gay,
1988).
विशेषतः बाल लैंगिकता, ओडीपस संकल्पना
आणि स्वप्नविश्लेषण यांसारख्या कल्पनांमुळे फ्रायड यांना तीव्र विरोधाला सामोरे
जावे लागले. अनेक समकालीन मानसशास्त्रज्ञ आणि वैद्यक तज्ज्ञांनी त्यांच्या
पद्धतींना अवैज्ञानिक ठरवले, कारण त्या प्रयोगशाळेतील नियंत्रित
प्रयोगांवर आधारित नव्हत्या. वर्तनवाद उदयास आल्यानंतर तर फ्रायड यांच्या
विचारांना आणखी बाजूला सारले गेले, कारण
वर्तनवादाने केवळ प्रत्यक्ष निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनालाच महत्त्व दिले (Schultz
& Schultz, 2016).
तथापि, या सर्व
विरोधांनंतरही फ्रायड यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वतःच्या रुग्णांशी
केलेल्या दीर्घकालीन निरीक्षणांवर, आत्मविश्लेषणावर आणि केस स्टडीजवर आधारित आपले लेखन सुरूच ठेवले. The
Interpretation of Dreams (1900) आणि Three Essays on
the Theory of Sexuality (1905) यांसारख्या ग्रंथांनी टीकेनंतरही मानवी
मनाचा विचार करण्याची एक पूर्णपणे नवी चौकट दिली. अॅडलर आणि युंग सारखे अनेक
शिष्य आणि सहकारी त्यांच्यापासून दुरावले, तरीसुद्धा फ्रायड आपल्या मूलभूत
गृहितकांवर ठाम राहिले (Freud, 1900/1953).
या संपूर्ण संघर्षातून फ्रायड यांचे
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व स्पष्टपणे समोर येते. लोक काय म्हणतात यापेक्षा सत्याचा
शोध अधिक महत्त्वाचा आहे, हा त्यांचा बौद्धिक धैर्याचा गाभा
होता. एकाकीपणा, उपहास आणि शैक्षणिक बहिष्कार सहन करतही त्यांनी
विचार स्वातंत्र्य सोडले नाही. त्यामुळेच फ्रायड हे केवळ एक शास्त्रज्ञ न राहता, बौद्धिक
चिकाटीचे प्रतीक ठरतात.
जीवनाचा शेवट आणि अमर वारसा
फ्रायड यांचे आयुष्य केवळ बौद्धिक
संघर्षांनीच नव्हे, तर राजकीय आणि वैयक्तिक वेदनांनीही
भारलेले होते. 1938 मध्ये नाझी जर्मनीने ऑस्ट्रियावर कब्जा केल्यानंतर यहुदी
असल्यामुळे फ्रायड आणि त्यांच्या कुटुंबावर थेट छळ सुरू झाला. त्यांची पुस्तके
जाळण्यात आली, मुलीला अटक करण्यात आली आणि त्यांच्या जीवनाला
गंभीर धोका निर्माण झाला. या परिस्थितीत मित्र आणि शिष्यांच्या मदतीने फ्रायड
यांनी व्हिएन्ना सोडून लंडनला स्थलांतर केले (Gay, 1988).
या काळात फ्रायड कॅन्सर या गंभीर
आजाराने त्रस्त होते. जबड्याच्या कर्करोगामुळे त्यांना अनेक शस्त्रक्रिया, तीव्र वेदना
आणि शारीरिक अशक्तपणा सहन करावा लागला. तरीही त्यांनी लेखन आणि चिंतन थांबवले
नाही. Civilization and Its Discontents (1930) आणि Moses
and Monotheism (1939) यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी मानवी संस्कृती, धर्म आणि
आक्रमकतेवर सखोल भाष्य केले. ही गोष्ट त्यांच्या बौद्धिक जिद्दीचे आणि विचारांवरील
निष्ठेचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते (Freud, 1930/1961).
फ्रायड यांचे निधन 1939 साली झाले, परंतु त्यांचा
वैचारिक वारसा आजही अमर आहे. आधुनिक मानसोपचार, मनोविश्लेषणात्मक
थेरपी, व्यक्तिमत्त्व सिद्धांत, तसेच साहित्य, चित्रकला, सिनेमा आणि
तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांवर फ्रायड यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव दिसून
येतो. समकालीन मानसशास्त्राने त्यांच्या अनेक सिद्धांतांवर टीका केली असली, तरी अबोध मन, संघर्ष, आणि
आत्मविश्लेषण या संकल्पना मानवी अनुभव समजून घेण्यासाठी आजही अपरिहार्य ठरतात (Ellenberger,
1970).
म्हणूनच सिग्मंड फ्रायड यांचे जीवन
हे केवळ एका शास्त्रज्ञाचे चरित्र नसून, विचारस्वातंत्र्य, बौद्धिक धैर्य
आणि चिकाटी यांचे जिवंत उदाहरण आहे. विरोधाच्या अंधारातही सत्याचा शोध सुरू
ठेवण्याची प्रेरणा फ्रायड आजही देतात.
समारोप:
फ्रायड आपल्याला हे शिकवतात की स्वतःच्या
मनाकडे प्रामाणिकपणे पाहण्याचे धैर्य ठेवा. समाजाच्या चौकटींपलीकडे जाऊन प्रश्न
विचारा. टीकेला घाबरू नका; सत्याचा शोध सुरू ठेवा. सिग्मंड
फ्रायड यांचे जीवन हे आपल्याला सांगते की विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि बौद्धिक
प्रामाणिकपणा हेच खरे प्रेरणास्थान आहे. मनाच्या अंधारात प्रकाश टाकण्याचे धाडस
करणारा हा विचारवंत, म्हणूनच आजही आपल्याला प्रेरित करतो.
संदर्भ:
Breuer, J., &
Freud, S. (1895). Studies on Hysteria. London: Hogarth
Press.
Ellenberger, H. F.
(1970). The Discovery of the Unconscious: The History and
Evolution of Dynamic Psychiatry. New York: Basic Books.
Freud, S. (1891). On Aphasia: A Critical Study. New York: International
Universities Press.
Freud, S. (1900). The Interpretation of Dreams. London: Macmillan.
Freud, S. (1901).
The Psychopathology of Everyday Life. London: Hogarth Press.
Freud, S. (1905).
Three Essays on the Theory of Sexuality. London: Hogarth Press.
Freud, S. (1915). The Unconscious. Standard Edition, Vol. 14.
Freud, S. (1923). The Ego and the Id. London: Hogarth Press.
Freud, S. (1961). Civilization and Its Discontents. New York: W. W. Norton.
(Original work published 1930)
Gay, P. (1988). Freud: A Life for Our Time. New York: W. W. Norton.
Jones, E. (1953). The Life and Work of Sigmund Freud, Vol. 1:
The Formative Years and the Great Discoveries. London: Hogarth Press.
McLeod, S. A. (2019). Simply Psychology: Sigmund Freud. Simply Psychology.
Roudinesco, E. (2016). Freud: In His Time and Ours. Cambridge, MA: Harvard
University Press.
Schultz, D. P.,
& Schultz, S. E. (2016). A History of Modern
Psychology. Boston: Cengage Learning.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions