मार्टिन
सेलिगमन (Martin Seligman): सकारात्मक
मानसशास्त्राचा जनक

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
मार्टिन
सेलिगमन हे आधुनिक मानसशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी आणि परिवर्तनशील
व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांनी मानसशास्त्राच्या पारंपरिक चौकटीला नव्या
दिशेने वळवले आणि या क्षेत्राला केवळ मानसिक आजार, विकृती आणि नैराश्य यांच्या अभ्यासापुरते मर्यादित ठेवण्याऐवजी मानवी आनंद
(happiness), जीवन-कल्याण (well-being) आणि उत्कर्ष (flourishing) यांचा वैज्ञानिक अभ्यास
करण्याची दिशा दिली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी
त्यांनी सुरू केलेल्या सकारात्मक मानसशास्त्र (Positive Psychology) या चळवळीने मानसशास्त्रात एक प्रकारची “वैचारिक क्रांती” घडवून आणली.
त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की मानसशास्त्राचे उद्दिष्ट केवळ “दुखः कमी
करणे” नसून “जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवणे” हे देखील असले पाहिजे (Seligman
& Csikszentmihalyi, 2000). त्यांच्या जीवनप्रवासातून आपण
अपयशाचा सकारात्मक अर्थ लावण्याची, आशावाद (optimism)
विकसित करण्याची आणि स्वतःच्या विचारसरणीत बदल करून जीवनात
सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा घेऊ शकतो.
